💫💫
*नव्या वाटेवरील प्रवास हा...* ®️
शांत प्रशांत सागर तीर. सागराच्या लाटांची गाज ऐकत बसावी इतकी शांतता. ती बसली आहे त्याच्या जवळ. समोर सागर शांतपणे लाटांवर लाटा बाहेर फेकतो आहे आहे पुन्हा उरात घेऊन परततो आहे. हिच्या मनाचा सागर तर भरती येऊन नुसता फेसाळला आहे.
आजपर्यंत आईबाबांच्या छत्रछायेत वाढलेली मी पटकन कशी वाट बदलू. असा विचार मनात येतो न येतो तोच दुसरे मन उसळी मारते. तुझा साथीदार तुझ्या संगती आहे तू त्याच्यावर विश्वासून त्याच्यासंगती जायला हवं. दोन मनामध्ये द्वंद्व सुरू आहे.
नव्या वाटेवरचे नवे क्षितिज खुणावते आहे. स्वप्नांच्या वाटेवर चालायचे आहे. तुझ्यासवे पाहिलेली स्वप्ने पूर्ण व्हावीत असे वाटते. पण जोपर्यंत आईबाबा परवानगी देणार नाहीत तोपर्यंत मी या वाटेवर कशी येऊ.
इथे आपल्याला दोघांनाच चालायचे आहे. सोबतीस कुणी नाही. स्वप्नांची वाट असली तरी खाचखळगे भरले आहेत या वाटेवर. आपण पार करू शकू का?
नव्याचे नऊ दिवस सरले की वास्तवाचे चटके बसायला लागतात. व्यवहार आहे हा साधा. प्रेम म्हणजे प्रेम असतं म्हणायला सोपं आहे पण आचरण करतांना पावलोपावली आपली मायेची माणसं लागतात तरच आणि तरच आपलं जगणं सुखकर होईल.
जगतांना फक्त प्रेम उपयोगी पडत नाही, परिस्थितीशी दोन हात करण्याची, झगडण्याची ताकद मनगटात असावी लागते तरच या नव्या वाटेवर चालतांना मजा येईल. घरातील सगळे मला हेच सांगत आहेत. आता तर माझे दोन्ही मन पण हेच आतून ग्वाही देतात आहे.
या नव्या वाटेवर जर चालायचे असेल तर तुझी भक्कम साथ असल्याशिवाय आपण कसे प्रवास करणार. चोखंदळपणे निवडलेली नवी वाट असावी, त्या वाटेवर आपल्या सभोवताली आपल्या दोघांवर मायेची पाखर घालणारा आधारवड असावा, वाटेवर चालतांना खचखळग्यांनी जखम झाली तर फुंकर मारायला एखादी आपली लतावेल असावी म्हणजे आपला या वाटेवरचा प्रवास सुखमय,आनंददायी होईल असं मला वाटतं.
नवी वाट नवे क्षितिज नवे स्वप्न नवी आशा
साथ तुझी रे साजणा लाभू दे हीच आशा
असावी रे सोबतीला बघ मायेची सावली
पंखाखाली सावलीच्या नवी वाट गवसली
©️रसिका राजीव हिंगे
व्वा मस्तच 👌👌💐
ReplyDelete