मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा....
असे मनाशी गुणगुणत च सखी मध्येच कृष्ण सख्याच्या भेटीसाठी आनंदून स्वतःभोवती गिरकी घेत घेत साजशृंगार करते आहे. समोर दर्पणी तिला कान्हा दिसला की काय लाजून नयन झुकवून कानी कुंडलं घालावीत.
अगं अजून तयार नाहीस का सखे तू? गुणगुणत काय बसलीस ! कान्हा बाहेर तिष्ठला बघ रास खेळायला. आणि तू अजून तयार नाहीस!
सखये किती करशील ग शृंगार? तुझं मूळ रूप इतकं लोभसवाणे आहे की त्यास शृंगाराची आवश्यकता नाही. चल कानातली तेवढी कुंडलं घाल आणि ये राणी बाहेर पटकन.
तुझा नृत्याविष्कार पहायला आतुरला आहे ग कृष्णसखा. विद्युलतेसम थिरकणारी तुझी पावलं आणि तुझ्या पैजणांचा नादमधुर स्वर यांचं मिलन होऊ दे ग बयो.
हे राधिके यमुनेच्या तीरावर बघ ढोल ताशांचा गजर वाढलाय. सारे गोकुळ जमले आहे किनारी. चांदवा पूर्ण तेजोमय झाला आहे. चांदण्यांनी पण चंद्रा भोवती फेर धरलाय.
नभांगणात बघ सारे तारे मनमोहनास तुझ्या सवे पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. बघ बघ कान्हाच्या मुरलीचा स्वर येतो आहे का ऐकायला.
हे मृगनयने तुझ्या नयनातील काजळरेखा भासावी इतकी रात चढून आली आहे. तुझे सुगंधित कुंतल जणू आभाळभर पसरले का ग? हा मुखचंद्रमा सत्य की नभीचा चांद.
रातराणी,जाई जुई,चाफा किती फुलला आहे पाहिलस का! या सुकोमल पुष्पांचा दरवळ लेऊन आलीस असे भासावे बरं त्या चित्तचोराला.
चल नभीच्या गवाक्षातून शुक्रतारा डोकावण्याच्या आत रास रंगायला हवा.
स्वतः लाजत आणि गिTरकी घेत ही अभिसारिका निघाली तिच्या कृष्ण सख्याला, मनमोहनाला भेटण्यास, त्याच्यासवे नृत्याविष्कार करत सर्वस्व समर्पण करायला...
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment