Monday, 31 August 2020

 का लाज येई इतकी

असे सारे हे  बहाणे

कोण गे तुझ्या समीप

त्यास पाहता लाजणे


आली नटूनी राणी तू

तुझा साजण ये दारी

नको लाजू तू एवढी

बघ तिष्ठला बाहेरी

रसिका


करी नयन चुगली

तुझ्या माझ्या प्रीतीची 

मोगराही गंधाळला

सांगे रीत प्रीतीची


रसिका


तुझ्या आठवांनी येई

लाज अशी बाई गाली

काही सुचेना मजसी

येई गालावरी लाली

रसिका


खळी तुझ्या गालावरी

गुज मनीचे सांगते

येई बहरा प्रीत ही

कानी का कुजबुजते

रसिका



👌🏻👌🏻

गालावरची खळी ही

सौंदर्याचे शिंपण जणू

का लाज बावरी होते

प्रीतीचा हा साज जणू


रसिका


👌🏻👌🏻

दर्पण ही लाजले

पाहून रूप तुझे

गंध तुझ्या कुंतली

दरवळ दर्पनी लाजे

रसिका

असते का उत्तर या प्रश्नांना

 असते का उत्तर या प्रश्नांना


कुणीच नाही जगती कोणाचे

परी जुळे नाते माणुसकीचे

कसे होती  दृढ  नाते जीवना

असते का उत्तर या प्रश्नांना


कधी जुळतील मने मनाशी

कधी तुटतील बंध जीवाशी

असे का घडते कुणी सांगा ना

असते का उत्तर या प्रश्नांना


आले गणराज आल्या गौराई

शक्तीची या अपार नवलाई

कुणी पाहिले आहे या शक्तींना

असते का उत्तर या प्रश्नांना


चराचरात मांगल्याचे लेणे

उत्साह आनंदाचे बहरणे

कुठून नि कसे आले कळेना

असते का उत्तर या प्रश्नांना


जीवनाच्या पाऊलवाटेवरी 

हीच शक्ती असे भवसागरी

म्हणुनी भक्तीचा हा सोहळा ना

असते का उत्तर या प्रश्नांना


रसिका राजीव हिंगे

पाहुणी/अतिथी

 


पाहुणी/अतिथी


आली लेक घरी  आज

होऊनिया ग पाहुणी

किती दाटले आभाळ

काय भरले या मनी


भरविले काल तिला

काऊ चिऊ चे घास ग

गिरविला श्रीगणेशा

वाटतात हे भास ग

खेळ सवंगडी तिचे

सारे रमले जीवनी

आली लेक घरी आज

होऊनिया ग पाहुणी


पैंजणांची छमछम

चिमुकल्या पावलात

नाद घुमतो मंजुळ

तिच्या सुखी संसारात

अशी बहरली वेल

घाले नभा गवसणी

आली लेक घरी  आज

होऊनिया ग पाहुणी


तिचे मोठे होणे जीवा

हुरहूर लावीतसे

जाण जबाबदारीची

सारे तिला कळतसे

सौभाग्याचे  लेणे ऐसे

रोज सुखाची कहाणी

आली लेक घरी  आज

होऊनिया ग पाहुणी


आली लेक घरी  आज

होऊनिया ग पाहुणी

किती दाटले आभाळ

काय भरले या मनी


रसिका राजीव हिंगे




अलक

 अलक


"काका नमस्कार करतो".

"अरे, ये .  इन्स्पेक्टर झालास.

"पण आज एवढी फौज घेऊन आलास ! "

"काका, तुमच्या शेतात  जाऊन पहाणी करायची आहे."

हे ऐकताच काका घेरी येऊन खाली कोसळले.


रसिका राजीव हिंगे


अलक


रजनी झपझप पावलं उचलत चालली होती.

"कुठे निघालीस ग बयो"?

"दवाखान्यात! छाया ला मुलगी झाली. दुसरी.

"असे का बरं!"

"तिच्या घरचे आले नाहीत कोणीच पहायला".


रसिका राजीव हिंगे





स्पर्धेसाठी

1.

किडकिडीत आणि निस्तेज दिसणाऱ्या मुन्नाला आज एकदम हँडसम पाहून अजयला खूप आश्चर्य वाटले.

"वाह, किती छान दिसतो आहेस मुन्ना."

"काय करतोस रे सध्या?"

"काही नाही. आय. टी. कंपनी मध्ये नोकरी सुरू आहे. आणि रोज बारा सूर्यनमस्कार घालतो."


रसिका राजीव हिंगे


2.

का ग? नाराज दिसतेस!"

"गौराई आल्यात घरी."

"अगं मग आनंद व्हायला हवा न!"

दरवर्षी गोकुळ असतं ग. घर गजबजलेलं.

"यावेळी कोणीच नाही. लॉक डाऊन मुळे."


रसिका राजीव हिंगे



अलक


नीता भरभर आवरून कंपनीत मुलाखतीसाठी निघाली.

"अहो नीट पाहून रस्ता क्रॉस करा न. तुम्ही एकट्याच नाही रस्त्यावर!"

नीता चे लक्ष नव्हते तरी नीता त्या कार मधील व्यक्तीस वाटेल तशी बोलली.

मुलाखतीस चेंबर  मध्ये गेली तर मुलाखत घ्यायला कार मधील व्यक्ती पाहून नीता अवाक झाली.


रसिका राजीव हिंगे


प्रसंगानुरूप काव्य



हिरव्या पानांच्या पल्याड 

अंड्याचे कवच सारूनी

अळीचे होतसे आगमन

कीटक जन्मा ये फिरूनी


गुरफटुनी घेसी कोषात

पूर्णत्व तिथेच लाभते

मखमली रूप घ्यावया

सुरवंटाचे रूप मिळते


निसर्गाची ही किमया

देहरुप ऐसे बदलते

सुरवंटाचे फुलपाखरू

होणे किती कठीण होते


प्रसव वेणा साहिल्यास

सोहंम सोहंम म्हणत

सुंदरशा  जगात आलास

कोहम् कोहम्  विचारत


क्षणभंगुरल्या जीवनी

घेसी जगून आनंदाने

मोहवितो भिरभिरत

रंगीबेरंगी पंखाने


रसिका राजीव हिंगे


सहज सुचलं म्हणून..आरसा






     शाळेत दुसरी किंवा तिसरीत असतांना मराठीत एक धडा होता "आरसा रडला, आरसा हसला"  आणि चित्र पण छान होते आरशातले रडणारा आणि हसणारा चेहरा.

     प्रत्येकाने नीटनेटके रहावे असा साधा आणि सोपा बोध असला तरी खूप काही शिकवून गेला. 

     त्यावेळी फक्त आपण छान दात घासावे, केस विंचरावे, रोज अंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालावेत म्हणजे आरसा हसेल. इतका साधा विचार मनात असायचा. पुढे सवयीने करता करता ह्या गोष्टी अंगवळणी पडत गेल्या आणि आज जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. 

     आज जेव्हा माझी मुलं मला म्हणतात अगं काय सारखी मागे लागते आंघोळीच्या? एक दिवस नाही केली तर कोणता फरक पडतो? 

     पण ह्या आरशाने ही सवय लावली याला मी तरी काय करणार? हा आरसा आणि घरातील आधारवड यांनी संगनमताने हे बाळकडू पाजलेआहे.

     रोजची स्वच्छता,नीटनेटके पणाची सवय आता गरज होऊ लागली आहे. कोविड 19 चा प्रादुर्भाव जसजसा वाढतो आहे तसे तसे स्वच्छतेचे महत्व अधोरेखित होते आहे. 

     जाहिरातींमधून,आरोग्य विभागाकडून, शासनाकडून याचा अगदी अतिरेक होतो आहे. विशेष म्हणजे सगळी ही टेक्नोसॅवी पिढी भीतीने म्हणा किंवा एक सुरक्षा म्हणून याची अमंलबजावणी करते आहे.  

     लहानपणापासूनच हा आरसा आमचा सखा, मित्र, मार्गदर्शकही आहे. 

     आरशातले प्रतिबिंब खरे रूप दाखवित असतं. पाण्यातले प्रतिबिंब जरी काळे अस्पष्ट दिसत असले तरी आरशातले मात्र सत्य रुप दिसतं आणि त्यावेळी आपण सावध होतो. 

     आयुष्यात वाटेवर असे बरेच आरसे आपल्याला दिसतात. काही आपले खरे रूप दाखवतात तर काही आरसे समोरच्याचे पण खरे रूप दाखवतात. फक्त आपल्याला ते पाहता यायला हवे.

     सद्गुरू नावाचा आरसा मात्र खरेच मार्गदर्शक होतो. मनाच्या स्वच्छते बरोबरच हृदयाचे पण परिवर्तन घडवून आणतात. आणि हा भवसागर लीलया पार करण्यास सहाय्यक होतात असे मला वाटतं...

     

रसिका राजीव हिंगे

     

     


अल्कपित




अल्कपित असेच काही सुचू दे

काव्यओळ ती ओठांवरी नाचू दे


शब्दांनो या सारे मन परडीत

आज लिहायचे काही अकल्पित

भावनांचा खेळ जरासा फुलू दे

अल्कपित असेच काही सुचू दे


अकल्पित अशी कुठली घटना 

घेऊ लिहावयास काही सुचेना

आठवांचे द्वार तरी उघडू दे

अल्कपित असेच काही सुचू दे


मन सैरभैर हुंदडते आहे

शब्द माझे सारे लपवते आहे

थांब मना शब्द माझे परत दे

अल्कपित असेच काही सुचू दे


किती अकल्पित घडले जीवनी

सुख दुःखाची ही सुमधुर गाणी

नादमय मैफिल माझी रंगू दे

अल्कपित असेच काही सुचू दे


अल्कपित असेच काही सुचू दे

काव्यओळ ती ओठांवरी नाचू दे


©️रसिका राजीव हिंगे

Sunday, 30 August 2020

अथर्वशीर्षाचा भावानुवाद(सुधाकरी अभंग रचना)





अथर्वशीर्षाचा भावानुवाद(सुधाकरी अभंग रचना)



ओंकार स्वरूपा नमन गणेशा

तुज गणाधीशा गणपती।                                        

तूच तत्वमसि सृष्टीचा निर्माता

पालन करता संहारक।

तूच अविनाशी हे आत्मस्वरूपा

हे ब्रह्मस्वरूपा गजानन।

रक्ष रक्ष परमेशा  वक्ता श्रोता दाता

अध्ययन कर्ता  वेदांताचे।

गुरू सानिध्यात जे जे उपासक

रक्षसि साधक प्रेमभरे।

दशदिशांतरी  रक्ष आसमंती

हे मंगलमूर्ती  सर्वव्यापी।


आनंद निधान शब्द सामर्थ्य तू

चैतन्यमय तू  वक्रतुंडा।

तू सत् चित् आनंदा  तूच ब्रह्माकार

अद्वैताचे सार शंभुसुता।

ज्ञानरुप देवा विज्ञानाधिष्ठित

हृदयाधिष्ठित  बुद्धिदाता।

विश्वाची उत्पत्ती, करी स्थिती लया

पुनःनिर्मावया  तुझ्या ठायी।

पंचभुतात्मका  सौंदर्य वसते

मधुरता असे  चौ वाणींची।


त्रिगुणांचा स्वामी सत्व रज तम

देह स्थूल सूक्ष्म कारण तू।

भूत वर्तमान भविष्याचा वेध

अवस्थांचा बोध तीनही तू।

सृष्टी मुलाधारा शक्ती प्रदायका

तू योगिध्यायका  सिद्धेश्वरा।

चतुरानन तू   तू सृष्टीपालक

सृष्टी संहारक  त्रिदेवा तू।

त्रिभुवनधीशा वायू प्राणदाता

हे अग्नी प्रदाता तेजोनिधी।

तू शीतल चंद्र स्वर्ग पृथ्वी रक्ष

तूच अंतरिक्ष ओमकारा।


अंती अनुस्वार ग् कार प्रथम

अकार मध्यम विद्या मंत्र।

प्रणव उच्चार वर्णाचे संधान

संधि संमीलन संहितेचे।

गणेश विद्या ही गणेशाची प्राप्ती

मंत्र अनुभूती एकाक्षरी।

गणक दाता हा  निचृद्गायत्रीच्छंद

गणेश देवता मंत्राची या।

गणेश गायत्री वक्रतुंड ध्यान

भक्तीचे संधान  द्यावे आता।













पाशांकुश अस्त्र आयुधे शोभती

वरदमुद्रा ती भग्नदंत।

रक्त ध्वजांकित मूषक वाहन

तेज रक्तवर्ण लंबोदर।

चतुर्भुज देवा ज्याचे शूर्पकर्ण

वस्त्रे रक्तवर्ण एकदंता।

उटी सर्वांगासी ती रक्तचंदनी

तांबडया फुलांनी भक्त ध्याती।

भक्तांवर दृष्टी निरंतर कृपा

ऐसा देवबाप्पा विश्वकर्ता।

प्रकृति पुरुष यांच्याही पुढती

जो जो कोणी ध्याती श्रेष्ठ योगी।


देवांच्या तू देवा व्रातगण पती

शिवगण पती नमो नमो।

ऐसा लंबोदर  असे विघ्नहर्ता

शिवशक्ती सुता  पूजीला मी।

इच्छा वरदाता देव श्रीगणेश

वंदिला भावेश  सिद्धेश्वर।

अथर्वशीर्षाचा भक्तीचा सोपान

चढण्याचा यत्न म्या केला हो।

मनी जे जे आले बाप्पाने कथिले

श्रीगुरू वदले  हेच भाव।


ऐका श्रोतेगण  आता फलश्रुती

सांगे गणपती  स्तोत्राची या।

अथर्वशीर्षाचे करी अध्ययन

ते ते भाग्यवान जगती या।

विघ्नाची न बाधा  पंचपाप मुक्ती

ऐसी आहे शक्ती स्तोत्राची या।

संध्या समयासी करा याचा जप

दिसातील पाप नाश पावे।

दिनजन्मावेळी करावे पठण

पापाचे क्षालन रात्रीचे या।

पठण त्रिवार चारी पुरुषार्थ

धर्म काम अर्थ मोक्ष प्राप्ती।

अथर्वशीर्षासी नसे श्रद्धा भाव

तयासी ही ठेव देऊ नये।

गणेशाची ठेव जरी अज्ञानाने

देई जो मोहाने पापी होय।

जे सहस्त्रवेळा करी आवर्तने

होतसे भक्तीने इच्छापूर्ती।


अथर्वशीर्षाने करी अभिषेक

ऐसे प्रमाणक वक्ता वाग्मी।

अथर्वण बोले चतुर्थी निर्जली

जपे मंत्रावळी विद्यावान।

स्तोत्रास जपती जाणे ब्रह्ममाया

होई तो निर्भया भय नसे।

कुबेरासम तो होई धनवान

हवन पूजन दुर्वांकुरे।                                                  









साळीच्या लाह्यांनी करिती हवन

धावे गजानन सर्वगामी।

इच्छित फळ ते लाभती सर्वत्र

मोदक सहस्त्र हवनासी।

अष्ट ब्राह्मणांसी करी उपदेश

जैसा व्योमकेश तेजस्विता।

जे ग्रहणकाळी जप नदीकाठी

रमती मंत्रपाठी  सिद्धमंत्र।

जपता हा मंत्र मूर्तीच्या जवळ

एक लक्ष वेळ दोषमुक्त।

नाश पावे पाप राही ना निःशेष

पावती संतोष सर्वत्रही।

महात्म्य पाठाचे लाभे कृतार्थता

आणि सर्वज्ञता पाठकर्त्या।

उपनिषद श्रुती  श्रीगणेश प्राप्ती

धन्यता पावती स्तोत्राने या।

अथर्वशीर्षाचा गणेश प्रसाद

हा भावानुवाद  पूर्ण होई।

सद्गुरू नाथा घालूनिया साद

हा गुणानुवाद कथियेला।

त्रिवार क्षमा ती करावी आपण

चुकले प्रमाण  श्रोतेजन।


रसिका राजीव हिंगे






Tuesday, 18 August 2020

मातृदिना निमित्ताने


 


तुला स्मरतांना आज

बालपण आठवे ग

तुझी मूर्त पुढे येई

आई मला आकळे ग


तुझे संस्कारांचे देणे

तेव्हा नव्हते कळत

येई प्रचिती मजला

आज प्रत्येक क्षणात

तुझे बोलणे वागणे

आज आठवे सारे ग

तुझी मूर्त पुढे येई

आई  मला आकळे ग


आई झाले असतांना

कसे जगावे जीवनी

तूच आहेस आदर्श

दुजा नसे ग कोणी

मीच मजला सांगते

तुझी थोरवी काय ग

तुझी मूर्त पुढे येई

आई मला आकळे ग


तुझे वाचन संस्कार

घडवीत गेले मला

तुझ्या प्रतिभेचा वसा

पुढे चालवू दे मला

सारे करिती वाहवा

कौतुकास तू नसे ग

तुझी मूर्त पुढे येई

आई मला आकळे ग


तुला स्मरतांना आज

बालपण आठवे ग

तुझी मूर्त पुढे येई

आई मला आकळे ग


रसिका राजीव हिंगे




Monday, 3 August 2020

सहज सुचलं म्हणून


     पाऊस सरसर आला आणि धरतीला चिंब भिजवून गेला. धरेवर कुठे तळी साचली तर कुठे पाणी वाहून गेलं. जिथे तळी साचली  त्या तळ्यात  बालपण येतं खेळायला. लहान लहान सगळे सवंगडी जमून वहीची पाने भराभर फाडून नावा तयार करायच्या किंवा कोणाकडून तरी करून घ्यायच्या. आई बाबा तर हक्काचे असतात अशा कामांसाठी.   कागदाच्या नावा करून पाण्यात सोडायच्या आणि त्याच्या हेलकाव्याकडे पहात रहायचे एवढंच. त्या हेलकावण्याचा अर्थ सुद्धा कळत नसतो या अल्लड वयात, ही निरागसता  फक्त आणि फक्त हास्याच्या आणि आनंदाच्या किनाऱ्यावर  उभे राहून लक्ष ठेवून असते माझी नाव कितीवेळ तरंगते याकडे.





वारा झालासे उनाड
पावसाचे हे  थैमान 
तळी विहिरी भरल्या
बागडले बालपण

नावा घेती हेलकावे
साचलेल्या पाण्यातून
झाले उतावीळ बाल्य
दिसे प्रतिबिंबातून

    भवसागरात आपली नाव कशी सोडायची आणि हा सागर पार कसा करायचा याचे हे प्रात्यक्षिक असेल कदाचित. सोबत कसेही सवंगडी असले तरी पार तर व्हावे लागेलच न. सवंगडी बदलले तरी भाव तोच आहे किती वेळ माझी नाव तरंगेल?  एखादया वेळेस असाच एखादा उनाड ढग वाऱ्याबरोबर येऊन नाव भिजवत असेल आणि ....एका क्षणात होत्याच नव्हतं होत असेल नाही का? 
पण ज्यावेळी आपल्या नावेचे सुकाणू  गुरुरायाच्या हातात असतात तेंव्हा मात्र हा भवसागर लीलया पार होतो, पठण, श्रवण, मनन, चिंतन आणि नामस्मरण याच्या बळावर साधना वाढत जाते आणि नावेचे सुकाणू आपल्या आराध्याकडून आपल्या गुरुकडे सोपविले जातात. 
इथे नाव भिजण्याची शक्यता नसतेच आणि हेलकावे पण नाही असं मला वाटतं....

रसिका

चैत्रमास आला आला
गंधाळल्या दशदिशा
मोहरला आम्रवृक्ष
पल्लवित नव्या आशा

मोगऱ्याचा दरवळ
गुलमोहर फुलला
संवत्सरा स्वागतास
परिसर हा नटला

नवं संकल्प एकची
सुखी करूया स्वकीय
संकटांशी लढण्याला
संघटीत भारतीय

ऐसी शक्ती गुरुराया
देई सकल भारता
माझा देश सुखी कर
हीच प्रार्थना भगवंता

तुजवीण नसे आता
मज कोणता पर्याय
शुभवेळ ती येऊ दे
आठविती तव पाय

शुभ शुभेच्छा आपणा
नवं शुभ संवत्सराच्या
घडवूया सारे छान
सदिच्छा रसराजच्या


रसिका



सोबतीस सारे आहे
काय करेल विषाणू
एकमेका साह्य करू
हाकलून लावू कणू

नका घालू यास भीक
घरी बसा सारे शांत
नामजप करुनिया
जोपासावे आता छंद

चीन सह सारे जग
झाले आहे याचे भक्ष्य
हद्दपार करू कोरोना
हेच आहे आता लक्ष्य

घरादारा द्यावा वेळ
संधी मिळाली सर्वांना
लढा करूया यशस्वी
हरवूया कोरोनाला

देशासाठी घरी बसा
नका पाहू हा कोरोना
तिरंग्याची शान राखा
सारे घरात बसा ना

रसिका












गिरनार यात्रा
एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ती पूर्ण होतेच असं म्हणतात. याचा मी आताच अनुभव घेतला. निमित्त होते गिरनार यात्रेचे. श्री प्रमोदजी केणे यांचे गिरनार यात्रेबाबत चे अनुभव 17  ऑक्टोबर 2019 रोजी ऐकले. श्री प्रमोदजी हे दर पौर्णिमेला गिरनार फक्त 2 तास 30 मिनिटात चढून जातात. त्यांचे 256 वारीचे अलौकीक अनुभव  ऐकून मला आयुष्यात एकदा तरी गिरनार पहावे चढावे असे सारखे वाटायला  लागले आणि मनाला सतत एकच ध्यास लागला गिरनार वारीचा. 
आणि सद्गुरु कृपेने तो सोनियाचा दिन उजाडला. गिरनार यात्रेला जाण्याचे ठरले. सोबत चांगली असली की सगळंच चांगलं होतं. म्हणतातच न " सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो"  अशीच सुसंगत गिरनार यात्रा करतांना लाभली आणि माझी गिरनार चढून जाण्याची इच्छा  पूर्ण झाली.





गिरनार यात्रा लागला हो ध्यास
पुरवावी आस, गुरुराजा।
व्हावया पूर्तता केली विनवणी
पुन्हा मनोमनी, गुरुनाथा।
लाभे गुरुकृपा केली हो सिद्धता
जाहली पूर्तता, मायबापा।
माय अंबाजीने अंकी बैसविले
मज चढविले, गिरनारी।
गवसणी नभा तुझी रे भव्यता
हिमालय सुता, उमाबंधू।
गुरू दत्तात्रेया चरण कमल
दाविले सकल, पूर्व भाग्ये।
पाहता पादुका दाटे गहिवर
आनंदाला पूर, नयनात।
कृपा गुरुनाथा व्हावी मजवरी
पुन्हा व्हावी वारी, गिरनार।

रसिका









शब्द








शब्दांवाचून कळले सारे
शब्दांच्या पलीकडले
नयन तुझे सांगून गेले
गुज तुझ्या मनातले

शब्दांचा का आधार घ्यावा
सलज्ज तू नयनी दिसली
डोळे हे जुल्मी गडे
असेच तू मनात वदली

राग,द्वेष,मत्सर,असूया
शब्द भांडार होई रिते
लोचनीची भाषा मग
गर्भितार्थ सांगून जाते

मायेच्या वात्सल्यासाठी
शब्द नाहीत ग जगती
गहिवर मनी दाटून येई
नयनी प्रेमधारा झरती

शब्दास पर्याय नयन
मिळे आम्हास आंदण
वर्तुळ पर्णत्वाचे होण्यास
लाभले आम्हास लोचन

रसिका

शब्द शब्दांची साखळी
मन मनास जोडते
घडू दे संवाद आता
हेच फक्त हे सांगते
रसिका

शब्द असावेत सुंदर
नववधू सम नटलेले
हृदयीचा ठाव घेतीलच
नव्या आशेने भारलेले
रसिका


शब्द असावेत असे
जणू समुद्राची गाज
शांत वाटावे मनास
पाहुनी शब्दांचा साज
रसिका

शब्दांच्या मैफिलीत 
पदन्यास चारोळीचे
काव्य होऊनि येई
नृत्य शायरीचे
रसिका

c








दवात भिजल्या भूवरी
डोलू लागली हिरवाई
गंधाळल्या पानफुलांचा
दरवळ ये ठायी ठायी

शिशिरात गंधित वारा
धावे वेगे  चहूकडे
कधी कधी घालीत येई
सुरेल मधुर शीळ गडे

आल्हादक हा गारवा
अनुभवे सारे चराचर
पूर्वक्षितिजी रविराज
उबदार करी परिसर

किती सुंदर हा निसर्ग
अगणित ते देई दान
करू त्याचे संरक्षण
राखवयासी संतुलन

जे आहे उत्तम उदात्त
त्यासी अर्पण करू या
गुरुकृपा ही होईल हो
पर्यावरणासी रक्षावया

               रसिका राजीव हिंगे

शुभेच्छा













आले नववर्ष साजिरे
भराभर उलटली पाने
नवे संकल्प नवे विचार
चला करू या आनंदाने

जावे पूर्णत्वास सारे
लाभो यश कीर्ती ही
आरोग्याचे दान मिळावे
लाभावी सुखसमृद्धीही

आज येई क्षितिजावर
नव्या आशेचा सूर्यदेव
त्यासम हो स्वयंप्रकाशी
जपावा नित वासुदेव

झाले गेले ते विसरुनी 
नवी पायवाट चालावी
आयुष्याच्या सुंदरतेची
वहिवाट अनुभवावी

नववर्षाच्या शुभेच्छा
नवा दिस आला आज
इष्ट कामना पूर्ण होवो
सांगे ईश्वरा रसिकराज

शुभ सकाळ

आठवांचे मेघ























जांभुळले मेघ पुन्हा
आले दाटून नभात
गार गार वाऱ्यासवे
सरी पुन्हा धावतात

मनातले आठवांचे
मेघ जणू पुन्हा येति
ऐशा पावसाच्या सरी
पुन्हा पुन्हा बरसती

आठवांचे रूप कैसे
भास की आभास असे
चिमुकल्याचे आठव
जणू  नयनी बरसे

रुप गोजिरे पहावे
असे पुन्हा पुन्हा वाटे
कर्तव्याची जाण होई
मन मना ऐसे भेटे

















दत्तरुप  ये भूवरी
नरहरी अवतार
रामगुरू दत्तराज
आनंदले चराचर

स्मर्तृगामी दत्तात्रेय
संतोषवि भक्तगणा
दिगंबरा दिगंबरा
जयकार क्षणाक्षणा

ग्रंथ वाचन त्रिपदी
उपासना प्रवचन
दत्तकृपा भुवनी या
रुद्रपाठ संकीर्तन

संत येति  संत घरा
पहावया हा सोहळा
ऐसा दत्त जन्मोत्सव
याची देही याची डोळा

भक्तांसवे संवादन
करी दत्त गुरुराज
आनंदाश्रू ये नयनी
हाच उत्सवाचा साज

ऐसे भाग्य जन्मोजन्मी
लाभो मज जगन्नाथा
हेच मागणे चरणी
नरहरी रामनाथा

           रसिका










हेमंताच्या गारव्यात
पुनवेच्या चांदण्यात
चराचर हे प्रकाशले
शुभ्र दुधी प्रकाशात

शुभंकर मास ऐसा
शुभप्रद तो कार्तिक
जन्म घेतसे भूवरी
दत्तबाळ अलौकीक



रमणीय ती वनश्री
दरी डोंगराचा गाव
संत महात्मे वसती
त्याचे पांगरी हे नाव

आले ऐशा पुण्यक्षेत्री
नरहरी अवतारा
रामचंद्र सरस्वती
घेई  हो दत्तावतारा

निज चरणी आश्रय
संतोषले भक्तजन
भाग्यवंत या जगती
लाभे श्रीगुरुचरण

जगन्नाथा एक करी
आरोग्यता गुरुनाथा
देऊनिया करावे हो
शतायुषी रामनाथा 

रसिका

शुभ सकाळ




किलबिल पाखरांची
भासे सुरेल गायन
शुभ सकाळ जाहली
गोड मधूर गुंजन

सोनसळी प्रभातीस
भास्करचे आगमन
अन्नकण वेचतांना
होई नादमय गान

भिरभिर पाखरांची
चाले अशी दिसभर
सुंदरसे घरटे ही
बांधीयले वृक्षावर

येता पंखामध्ये बळ
पिलू जाय दिगंतरा
सांगे गुज आनंदाचे
कानी रुणझुण वारा

पिलासाठी सारे काही
क्षणक्षण आणि पळ
कधी होई गळाभेट
कधी विरहाची झळ

शुभ सकाळ 
रसिका




शुभ सकाळ


रोज नित्य नियमाने
उगवसी प्रभाकरा
तव किरण स्पर्शाने
तेजाळसी चराचरा

ऐसे नित्य नियमाने
घडू दे नामस्मरण
रामगुरू चरणांचे
व्हावे रोजच दर्शन

ऐसी कृपा मजवरी
रामदत्ता करावी हो
ध्यास नामस्मरणाचा
नित्य मज लागावा हो

उंच उंच गिरीनारी
जावे वाटे तीर्थक्षेत्री
तव कृपेच्या संगती
दर्शनासी पुण्यक्षेत्री

रसिका














हिंदू परंपरा 
रक्षती संस्कृती
आकारा आकृती, सृजनाची।
सण समारंभ 
हे विज्ञाननिष्ठ,
पूर्वज ही श्रेष्ठ, ऋषीमुनी।
श्रद्धा ठायी ठायी 
उत्साह अमाप
नसे मोजमाप, परस्परा।
ऐसा सण मोठा 
दिव्यांचा उत्सव
होई महोत्सव, दीपावली।
पर्जन्य राजा ही 
मनी सुखावला
आला पहायला, भूवरी या।
लखलख दिवे
पाहुनी हर्षला
सुखे हुंदाडला, सृष्टीवरी।
माझ्या भारताची
ऐसी ही संस्कृती
सारे सामावती, चराचरी।








शुभेच्छां













घरदार  छान छान
कसे कोण सजविती
हात फिरे घरावरी
गुज करिती ह्या भिंती

स्वच्छ आणि प्रसन्नता
वास करी लक्ष्मी तिथे
सांगे पुराण वेद ही
ऐश्वर्याची खाण तिथे

लखलख प्रकाश हा
जणू चांदणे चंदेरी
चंद्रासह रोहिणी ही
जशी आली या भूवरी

उत्साहाला ये उधाण
घरोघरी रोषणाई
आली आली दीपावली
स्वागताची झाली घाई

दिवाळीचा आपणास
देते शुभेच्छांचा साज
घ्यावा लेऊनी आपण
विनवीते रसिकराज

रसिका