Monday, 26 December 2022

गीताख्य

 गीताख्य


     कैलासावर शंकर पार्वती बसले आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या विषयावर गप्पा चालल्या आहेत. मध्येच शंकराचे लक्ष आपल्याकडे नाही,कुठेतरी तंद्री लागली आहे हे पार्वतीच्या लक्षात येतं. "कशाचा विचार चालला आहे एवढा? माझ्या बोलण्याकडे तुमचे लक्ष नाही नाथ!" यावर महादेव उत्तरले," गीतेचा विचार करतो आहे." पार्वती क्षणभर हिरमुसते. माझ्यापेक्षा सुंदर कोण असावी बरे ही गीता. "मला कळेल का या गीते विषयी! कोण आहे ही गीता?" अवघ्या विश्वाचे संतुलन राखणारे भोळे शंभूनाथ किंचित हसले अन् म्हणाले," सुंदरी, गीता म्हणजे वासुदेव कृष्णाने कुरुक्षेत्रावर कुंतीपुत्र अर्जुनाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत. ऐन युद्धाच्या वेळी अर्जुनाने गांडीव खाली ठेवले त्यावेळी समर भूमीवर सांगितलेली आहे ही गीता. समस्त विश्वाला तारून नेणारी. प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारी गीता. याविषयी मी विचार करतो आहे." हे ऐकून गौरी म्हणाली," नाथ मला पण सांगा आपले मनातील गीतेविषयी चे विचार."

     गीता! गीता एक धर्मग्रंथ आहे, वैश्विक ग्रंथ आहे. आपल्या संस्कृतीचा पाया आहे. सत्याचे परिमाण आहे.  कर्मयोग, ज्ञानकर्मसंन्यासयोग, सांख्ययोग, भक्तीयोग, मोक्षसंन्यास योग काय नाही या गीतेत. कर्मयोग्याला मार्ग सापडतो, भक्तांना भक्ती दिसते तर योगीजनांना मोक्ष मिळतो. यातील लालित्य पाहून साहित्यिक डोलू लागतात.  सत्व,रज, तम या गुणांचे विवेचन आहे तर श्रध्दा म्हणजे काय ती कशी असावी याचेही ज्ञान होते. सामान्य माणसाला जगण्याची दिशा देणारी, आत्मिक बळ वाढविणारी गीता. सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी जीवनाच्या मार्गावर आणून सोडणारी गीता आहे. सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती, अध्यात्म, वैराग्य,भक्ती,ज्ञान याचे शिक्षण देता देता श्रीकृष्णाने फक्त योग्य मार्गाकडे निर्देश केला आहे. बोट धरून चालत नाही आपल्याबरोबर. आपला मार्ग आपणच चालावा, चालता चालता सत्कर्म करत जा फक्त, फळाची आशा न करता. 

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्‌ ।                 यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्‌ 

     तू जे करशील ते मला अर्पण कर.  कशाला काळजी करतोस. मी आहे हा विश्वास जागवला आहे. विश्वरूप दाखवण्यासाठी आधी अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान केली. केवढे हे भक्ताचे लाड. भक्त ही तसाच होता जो गीतेच्या माध्यमातून घडत गेला. 

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌

     जे भक्त मला अनन्य भावाने भजतात, नित्य निरंतर माझे ध्यान करतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः वाहतो असा निर्वाळा दिला आहे भगवंताने गितेच्या माध्यमातून. यापरिस काय हवे हो. 

     जशी जशी गीता कळत जाईल तसे तसे जीवन सुकर होईल आणि हा भवसागर पार करून निश्चितच मोक्ष प्राप्त होईल हे निर्विवाद सत्य आहे. 

  "खरे आहे नाथ. गीता वाचावी, आचरणात आणावी म्हणजे जगणे किती सहज होईल. पण सातत्य असावे लागेल, प्रत्येक वेळी."

  " गौरी तू जशी नित्य नूतन भासते मला तशीच गीता आहे. जितके वेळा समजून घेशील तितके वेळा ती नवीन काहीतरी प्रदान करेलच. कळलं का गीता कोण ते!"

  शिवशक्तीच्या चेहऱ्यावर फक्त सलज्ज स्मित उमटले.


रसिका राजीव हिंगे 

मंतरलेल्या वाटा

 मंतरलेल्या वाटा


क्षण हळवे क्षण बावरे

साद घालिती मनामनाला

क्षणभंगुर हे जीवन आहे

जगून घ्यावे या जन्माला


गुंफण ऐसी ऋणानुबंधी

कधी नात्यांचा पाश भोवती

नियतीचे ह्या फासे कळेना

कधी नात्यांचा फास सभोवती


विसरुन सारे हेवेदावे

सद्गुरू चरणी लीन व्हावे

भवसागर हा तरून जाण्या

मनात जपले तुलाच द्यावे


आयुष्याच्या वाटेवरती

सडा फुलांचा किंवा काटा

परी होतील समर्पणाने 

या मंतरलेल्या वाटा


रसिका राजीव हिंगे 



हुरहूर मावळत्या संध्येची...

 

हुरहूर मावळत्या संध्येची...

     सांज उतरली निळ्या सागरी
     केशर ल्याली सृष्टी सारी
     रविराजासी निरोप द्याया
     अधीर झाली निशा बावरी
     सांज! म्हणजेच कातरवेळ. दिवस आणि रात्र यांना जोडणारी वेळ. रविराज आपल्या तेजाचा पसारा आवरत निघाला आहे घराकडे.  संध्येला निरोप देण्याची वेळ. तिच्या कपोलांवर रविराजाच्या प्रीतीची लाली पसरली, त्याची आभा पश्चिमेवर उमटली. पश्चिमा केशरिया लेऊन निश्चलपणे संध्येच्या  मनाची  वाढती हुरहूर अनुभवते. चराचरात संधिप्रकाश दाटून आला आहे. अशा कातरवेळी काळ पण थबकतो क्षणभर. भराभर पुढे सरकत नाही. उदासलेपण भरून आहे सारा आसमंत. त्याचे प्रतिबिंब धरेवर पडले. कणाकणास हुरहूर लागून राहिली आहे.
     विहंग पिलाच्या काळजीने घरट्याकडे निघाली तेव्हा त्यांचा चिवचिवाट गूढ भासत होता. धुराळ्याच्या धुक्याचे ढग गोळा झालेले पाहून गोठ्यातला वासरांचा हंबर व्याकुळतेने साद घालत आहे असे जाणवत होते. गवाक्षात उभ्या असलेल्या ललना साजणाची वाटुली पहात अधिकच अधीर झाल्या होत्या. त्या अधीरतेला बांध घालता यावा म्हणून की काय सांजवेळ ही दिवेलागण वेळ असावी. देव्हाऱ्यात देवाजवळ दिवा लावून घरातला अंधाराला बाहेर पिटाळून लावायचे. दिवा लावला की ज्योतीच्या प्रकाशात मनाची हुरहूर कमी होते. बाहेर जरी अंधार असला तरी मनात, हृदयात, घरात लख्ख उजेड असल्यामुळे भीती थोडीफार तरी कमी व्हायला मदत होते. त्यामुळे आपसूकच परमेश्वराची प्रार्थना करावीशी वाटते. दिव्याची तेजारती शुभं करोति कल्याणं ओठावर येऊ लागतं, घराघरांतून स्वर येऊ लागतात, नाद  उमटतो, ताल धरल्या जातो. हात आपोआप जोडले जाऊन नतमस्तक होतो आपण त्या जगन्नाथा समोर. हिच शक्ती मनाची घालमेल घालवते, हुरहूर शांतवते, अन् संध्या पण खुदकन हसते. निशा चंद्र चांदणे घेऊन  वेशीवर थांबलेली आहे, संध्या मावळते पण निशा सोबतीस देते, नवे स्वप्न, बघण्यासाठी....

रसिका राजीव हिंगे
19.12.2022
    

ऐक माझ्या मनातले

 ऐक माझ्या मनातले


सांग ना माझिया मना

किती आवरु सावरू

चंचलता सांभाळी तू

व्हावी स्थिरता आधारु 


उधळती पुन्हा पुन्हा

वारू माझ्या विचारांचे

कैसे खेचावे लगाम

तुझ्या वाऱ्याच्या गतीचे


कुठे कुठे नेशी मला

कल्पनेच्या पल्याड तू

उंच आकाशी फिरता

वास्तवाच्या अल्याड तू


ऐक माझ्या मनातले

मन जे तुझ्या अंतरी

गूज ऐक एकदाच

शांत हो हृदयांतरी



रसिका राजीव हिंगे 






चंद्र पौर्णिमेचा हसला गाली

 चंद्र पौर्णिमेचा हसला गाली


गंधाळली रात्र काळी चंद्रकळा ल्याली

अन् हा चंद्र पौर्णिमेचा हसला गाली


चांदण्यांचे सडे शिंपिले तारकांनी

रेखिली रंगावली सुरेख नक्षत्रांनी 

अवकाशीची फुले पाहुनी धवलाली

अन् हा चंद्र पौर्णिमेचा हसला गाली


निळ्या सागरी अवखळ लाटा उचंबळती

पूर्णत्वाचे रुप पाहुनी ये त्यास भरती

लाज बावरी लाट सागरी गे मोहरली

अन् हा चंद्र पौर्णिमेचा हसला गाली


चंद्रा समती प्रीत बावरी सखी साजणी 

रूप लाजरे अधर बोलके लावण्यखणी

अबोल त्याच्या स्पर्शातून चढली लाली

अन् हा चंद्र पौर्णिमेचा हसला गाली


रसिका राजीव हिंगे 


Monday, 19 December 2022

सारूनी पदर धुक्याचा....

 


      आली पहाट सजून

      वाट काढीत भुवर

     पांढुरक्या धुक्यातली

     काळी सावळी सुंदर


     रविराजास घेण्यासाठी अरुणाचा  रथ निघाला. त्याच्या शुभ्र अश्र्वांच्या पायाचा टप टप आवाज लांबून ऐकू येऊ लागला अन् रोहिणीने पदर सावरत चंद्राच्या गळ्यातील आपले चांदण्यांचे हात काढले. दाट काळ्याभोर कुंतली माळलेला नक्षत्रांचा कोमेजलेला गजरा तिच्या धुंदीचा कैफ सांगत होता. रजनीने  तिच्या नयनात घातलेली काजळरेखा पुसट होऊन तिच्या प्रीतीचे गोड संकेत देत होती. तिच्या पायातील मेघ रुपी पैंजण तिची लटकी लगबग पाहून उगाचच छमछमत होते. एकेक चांदणी दवबिंदूचे रुप घेऊन सृष्टीवर पांढुरक्या धुक्यातून वाट काढत विसावत होती. आळसावलेल्या निशा सवे पहाटेच्या प्रहरी पहारा करणारा शुक्रतारा पण निघाला. हळूहळू सप्तर्षी पण पहाटेच्या नित्यकर्म स्नानादी उरकण्यास आकाश गंगेकडे निघालेत. लगेच उषाराणीची लगबग सुरू झाली रविराजाच्या स्वागताची. केशराचे सडे शिंपीत सारा आसमंत सुगंधित केला. पारिजातकाच्या मनगंध पायघड्या अंथरल्या, जाईजुई, चमेलीच्या सुगंधित अत्तराचे  कारंजे थुई थुई करत सृष्टीला मोहवित होते. 

     रविराज आपल्या सहस्र सोनसळी बाहुंनी सृष्टीला कवेत घेण्यासाठी पूर्व क्षितिजी डेरेदाखल झाला. दाट पांढुरक्या धुक्याच्या पदरा आडून येणाऱ्या उबदार किरणांचा स्पर्श होताच सावळी धरा मोहरली, शहारली, अन् तिच्या आरक्त झालेल्या कपोलांची लज्जेची लाली पूर्व क्षितिजावर केशरिया उधळत होती. दवबिंदूचा चंदेरी साज लेवून कुंद कळ्यांचे गजरे माळलेल्या सृष्टीच्या या आनंदात सारे विहंग कलरव करीत सामील झाले.  सृष्टीनेही शुभ्र बगळ्यांची माळ रविराजास अर्पण केली.  

     पहाटेच्या धुक्यातील मंद गारव्यात  गोठ्यातील गोधनाचा हंबर,  राऊळात भूपाळीचे सुस्वर गायन, गृहिणींचे जात्यावर धान्य दळतांना गायलेल्या सुरेल ओव्या सारेच चराचरात चैतन्य फुलवीत होते. 

     अन् रविराज धुक्याचा पदर सारून सृष्टीला चैतन्याचे आंदण प्रदान करत तिच्या प्रीतीच्या हिंदोळ्यावर झुलत पूर्वेकडून पश्चिमेकडे  ओंकाराच्या सुरेल नादात धुंद चालत होता संध्येला केशरियाचे दान देण्यासाठी....


रसिका राजीव हिंगे 

#rasraj#पहाट #धुके#सारूनी पदर#

कल्पनेतील सुखांचा डोलारा...




     किती सांभाळू सांग

     मोह  मायेचा मनोरा

     षडरिपूचा हा पसारा

     वाटे सुखांचा डोलारा

     रातराणीचा मंद धुंद सुगंध, वाऱ्याची हलकीशी निळसर झुळूक, नभी पौर्णिमेचा चंद्र, आणि सागराला आलेली भरती. त्याच्या फेसाळत किनाऱ्याकडे धाव घेणाऱ्या लाटा अन् पुन्हा त्याच्यातच विलीन होणाऱ्या. सतत निसर्गाचे हे चक्र असेच फिरत राहील. ऋतुमागुन ऋतू येतील, स्वतः जवळचे देणे देऊन पुन्हा नव्याने बहरतील. समर्पण! जे आहे ते देत राहणे एवढंच त्याला ठाऊक. हाच त्याचा वास्तवातला आणि कल्पनेतल्या सुखाचा डोलारा. 

     पण मायेच्या आवरणाखाली किती अज्ञानी होऊन जगत असतो प्रत्येक जीव. जन्मापासून कोहं विचारणारा जीव या आभासी जगात आल्याबरोबर सुखाच्या मागे धावत असतो. 

     वास्तविक पाहता खरं सुख म्हणजे काय हे देखील कळत नसतं, तरीही सुखाचे इमले बांधण्यात  मश्गूल असतो. स्वतःला जे रुचेल,भावेल तेच सुख आहे असे मानणारा मनुष्य प्राणी. मग त्यासाठी काही चुकीचे घडते आहे का, कुणाला त्रास होतो आहे का याचा विचार देखील मनात येत नाही.अन् याच आभासी सुखाचे डोलारे मानव उभे करत असतो. 

     कल्पनेच्या दुनियेत, स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलत प्रत्येक जण जगत असतो हे निर्विवाद सत्य असले तरी स्वतःच्या सुखासाठी फुलण्या आधीच एखादी कळी तर कुस्करली जातं नाही न! सुखाच्या मागे इतके धावत रहातात की मायेची ऊब मिळावी म्हणून तिष्ठत असलेला लहानगा, अर्धवट वयाचा, स्वप्नांच्या दुनियेत ज्याने जगावे असा कंटाळून आयुष्य तर संपवत नाही न!  विचार करण्याची शक्ती नष्ट होतं असेल तर अशा सुखाच्या कल्पना का कराव्यात. कधी कधी त्या परमात्म्याला विचारावेसे वाटते, तूच देतोस ना सगळं, मग अशा कल्पनेचे मनोरे कसे नीट उभे असतात. विचार तूच देतो, शक्ती तूच देतो, जन्म तूच देतो, तुझाच हा सगळा पसारा. पारिजातकाच्या मनगंध पायघड्या तूच घालतोस, रानी वनी फुलांचा पसारा आणि मनात विचारांचा पसारा तूच करतोस, तरी पण असे का. हेच जर सुख असेल तर दुःख कोणते. 

     जशा किनाऱ्याला मोहवणाऱ्या लाटा आहेत तशाच भवसागर पार करण्यासाठी सद्विचारांच्या लाटा निर्माण व्हाव्यात,  सुगंधित फुलांनी चराचर दरवळत आहे तसेच माझे आयुष्य दरवळून टाकणारा कल्पवृक्ष हवा आहे.हा खरा माझ्या कल्पनेतल्या सुखांचा डोलारा जो मला चिरंतन उभा ठेवायचा आहे. हे ईश्वरा तुला अशक्य नाही रे असे करणे कारण तूच तर निर्माता आहेस. तुझीच माया आहे ही सारी. खरे आहे न!


©️रसिका राजीव हिंगे

rasraj#सुख#डोलारा#कल्पना#

Thursday, 15 December 2022

चित्रकाव्य. सावळ बाधा

 


दशदिशातुनी दाटत आली

सांज बिलोरी अवनीवरती

अवगुंठीत ग रूप लाजरे

कालिंदीच्या काठावरती


कैसी झाली सावळबाधा

दर्पणी पाहता  उगाच भासे

अवतीभवती चोहीकडे ग

प्रतिबिंबित होई आभासे


पैंजण पायी छमछम करती

का मुरलीचे सूर हे साजे

मेघ गरजले काळे सावळे

धा धा धिन ना मृदुंग बाजे 


मंद झुळुकशी अंगावरती

मोरपीस जणू गाली फिरते

रानीवनी ग हंबर ऐकता

सावळ चरणी मन विसावते


©️®️ रसिका राजीव हिंगे 


Monday, 5 December 2022

प्रश्न



 सहज सुचलं म्हणून ..

     संदीप खरे  यांचे कवितेचा कोपरा यु ट्यूब वर ऐकत होते. त्यांनी त्यांची पौंगडावस्थेतील मुलांवर लिहिलेली कविता वाचली. त्यात त्या मुलाला आभाळभर प्रश्न पडतात पण ढगभर पण उत्तर मिळत नाही असे होते. कविता अप्रतिमच आहे. त्यांची सादर करण्याची पद्धत, कविता कशी सुचली वगैरे सांगत ते कविता सादर करत होते. पण माझं मन आभाळभर प्रश्नांच्या भोवती घुटमळत होते. किती सुंदर शब्द, आभाळभर प्रश्न! 

     जन्मानंतर कोहं पासून सुरू झालेली प्रश्न मालिका सतत भोवती पिंगा घालत असते. प्रत्येक क्षणी प्रश्न आणि प्रश्न. उत्तर शोधायला गेले तर मिळेलच याची शाश्वती नाही.  असे म्हणतात  आधी उत्तर तयार होतं आणि नंतर प्रश्न. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहेच. मग का मिळत नाही आपल्याला. मुळात प्रश्न म्हणजे काय? तर ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत, त्याबद्दल ज्ञान नाही म्हणजे त्या गोष्टीचे आकलन होत नाही त्यामुळे निर्माण होतात ते प्रश्न. म्हणजे त्याविषयी जिज्ञासा. पण काहीवेळेस बऱ्याच गोष्टी माहित असूनही प्रश्न निर्माण होतातच. एखाद दुसरा प्रश्न नाही तर असंख्य प्रश्न, म्हणजेच आभाळभर प्रश्न. उत्तर मात्र ढगभर पण सापडत नाही. असे कितीतरी अनुत्तरीत प्रश्न आहेत. किंबहुना त्याचं उत्तर असलं तरी ते मान्य नसतं किंवा शंकेखोर मन मान्य करत नाही. एखाद्याने खूप प्रश्न विचारले तर लगेच सगळे म्हणतात," किती चौकस बुध्दी आहे न! हो आहे पण सगळ्या प्रश्नांची नाही तरी किमान एखाद्या प्रश्नाचे तरी उत्तर मिळते का? समजा मिळाले तरी बरोबर उत्तर आहे की नाही आणि समाधान होते का?

     तरणीताठी मुलं आत्महत्या करतात. कारण कधीच कळत नाही, कळलं तरी अगदी शुल्लक असतं. पण का असं वागावेसे वाटले, असं कोणतं आभाळ कोसळले होते, की आयुष्य संपवावे वाटलं. अशावेळी खरच आभाळभर प्रश्न पडतात ज्याचे उत्तर ढगभर ही कधीच मिळत नाही. अशा आणि याचसारख्या कितीतरी घटना घडतात. शाळेत पाचवी सहावी मध्ये शिकणारे मुलं मुली म्हणतात ती/तो माझा बी.एफ. आहे. आता मला वाटलं की बी.एफ.म्हणजे बेस्ट फ्रेंड. पण माझं ज्ञान किती अर्वाचीन(?) आहे हे तेव्हा कळलं जेव्हा हीच लहान लहान मुलं ओठांवर हात ठेऊन हसू दाबायचा प्रयत्न करून सांगत होती, बी. एफ. म्हणजे बॉय फ्रेंड. तेव्हा डोक्यावर हात मारण्याशिवाय पर्याय नव्हता.  यांच्या घरी माहित आहे का, मुलं बाहेर काय करतात?, कुणाशी बोलतात? कुठे जातात? अभ्यासाकडे लक्ष आहे की नाही? कुठे चालली आहे ही भारताची उदयास येणारी पिढी? अरे किती ही प्रश्न! पण उत्तर मिळत नाही. 

     शेवटी काय तर आयुष्यात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असलं तरीही ते मिळतच नाही. जे प्रश्न अनुत्तरीत राहतात त्यांना पूर्णविराम देऊन संपविले जातात स्वतः पुरेसे हेच खरं!


रसिका राजीव हिंगे

पुणे

     

     

     

     

     

Thursday, 17 November 2022

अन् माझे/त्याचे/तिचे आयुष्यच बदलले..



अन् त्याचेआयुष्यच बदलले..

    

      उदयाचली केशरियाची उधळण झाली, सलज्ज उषाराणी नटून भास्कराच्या स्वागताला उभी राहिली, पहाट पक्षी किलबिलत घरट्याबाहेर डोकावत निसर्गाचा आस्वाद घेण्यास आतुर झालेले होते, गंगेच्या पात्रात सोनसळी किरणांनी येऊन रविराज आल्याची वर्दी दिली अन चैतन्याला जाग आली. अशा प्रसन्न पहाटेच्या वेळी गंगेचे अभूतपूर्व सौंदर्य निरखत राहणे, तिच्या प्रवाहात हरवून तिच्याशी संवाद साधायला आशुतोषला फार आवडायचे. मनातलं सगळं तिच्याशी बोलले की त्याला एकदम शांत वाटायचे. दिवसभर ऑफिसमधे काम करायला उत्साह देणाऱ्या गंगेची ओळख झाली तीच एका चैतन्यमय व्यक्तिमत्वामुळे. जर त्यावेळी मला ती माऊली भेटली नसती तर मी आज कुठे असतो, कल्पनाही करवत नाही. गंगेच्या पाण्यातील गोल गोल उठणाऱ्या तरंगा सारखेच भूतकाळातील त्याच्या भवसागरातल्या तरंगावर तो तरंगत अगदी खोल खोल मुळाशी पोहचला.

     आशुतोष एक हुशार आणि समंजस विद्यार्थी म्हणून शाळेत ओळखला जायचा. लहानपणीच आईवडील गेल्यामुळे आजीच्या कुशीत लहानाचा मोठा झाला. आशुतोष दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला त्याचवेळी आजीस देवाज्ञा झाली. एकदा देवाज्ञा झाली की सामान्य माणूस कोणत्याच न्यायालयात दाद मागू शकत नाही हे निर्विवाद सत्य आहे. आजी गेल्यामुळे आशुतोष एकटा झाला. मामा मामी होते पण दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे त्यांनाही आशुतोषला वेळ देणे शक्य नव्हते. कॉलेजचे फुलपाखरी दिवस. म्हणणारे, बोलणारे कुणीच नाही त्यामुळे स्वतःच स्वतःचे निर्णय घेत जगत होता. काय चुकीचे, योग्य की अयोग्य कळत नव्हते. मित्रमैत्रिणीच्या सहवासात आशुतोष हळूहळू या आभासी जगात रमत गेला.

      वर्ष वाया न जाता पदवीधर तर झाला. मार्क्स ही बरे मिळाले, पण आशुतोष व्यसनांच्या आहारी गेला होता. हे जे चालले आहे ते काही योग्य नाही हे कळत होते. यातून बाहेर पडावेच लागेल हे त्याला कळत होते, पण पहिलाच पेला उचलताना संयम ठेवला तरच यातून सुटका आहे अन्यथा हा शेवटचाच असे म्हणत कधीच तो शेवटचा प्याला ठरत नाही. शिवाय ठायी ठायी तळीराम असतील तर नाहीच नाही. आशुतोषचे हे बेधुंद वागणे मामाला त्रासदायक होत होते. पदवीधर होईपर्यंत शिक्षणाचा खर्च मामा करत होताच, पण कुठेतरी हे थांबेल अन हा काही नोकरी करेल असे मामाला वाटत होते.

      मामाने आशुतोष ला बरेच वेळा समजवण्याचा प्रयत्न केला. "आशु, तुला पुढे शिकायचे असेल तर मी खर्च लावायला तयार आहे. तू मोठा व्हावंसं एवढंच मला तुला सांगायचे आहे.  दिवसेंदिवस तुझे वागणे मला असह्य होतं आहे. बाळा, असे किती दिवस चालेल! नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही. स्वतःच्या पायावर उभे रहावेच लागेल. आपल्यासारख्या सामान्य लोकांना अशी व्यसनं परवडत नाहीत. का जीवाला धोक्यात घालतो आहेस! हुशार आहेस तू , जगण्याचा उत्तम मार्ग निवड आणि आयुष्याचे सोने करून घे."  

     आशुतोषला सगळे कळत होते पण वळत नव्हते. नैराश्य त्याच्या मनात ठाण मांडून बसलं होतं. कुठेच मार्ग दिसत नव्हता. अवहेलना, अपमान ठायी ठायी होतच होता. घरातले, बाहेरचे टोचून जिव्हारी लागेल असे बोलत होते. व्यसनापासून मुक्तता मिळत नव्हती. त्यासाठी लागणारा पैसा पुरत नव्हता. मामा मामी नी पैसे देणे बंद केले होते. 

     सद्सद्विवेक बुद्धी हरवलेला आशुतोष पहाटेच सकाळी पाच वाजता घराबाहेर पडला. अन गंगेच्या दिशेने पळत सुटला. बेभान झाला होता, काहीच सुचत नव्हते. आता गंगाकाठच मला आधार देईल,  तिच्या कुशीत घेईल हा विश्वास त्याला वाटायला लागला.कमरेपर्यंत पाण्यात उतरला होता आणि आता जान्हवीच्या पाण्यात स्वतःला झोकून देणार एवढ्यात त्याला एका नाजूक पण आत्मविश्वास, आत्मबळ असलेल्या हातांनी मागे खेचले. आशुतोष बेशुद्ध झाला होता. त्याला काठावर इतर जणांच्या सहाय्याने आणले. त्याला सावध करण्याचा प्रयत्न चालू होता. थोड्या वेळातच तो शुद्धीवर आला. पण काही बोलू शकत नव्हता. डोळ्यातुन अखंड पाणी वाहत होते. त्याला तसेच तिने बसू दिले.  हळूहळू तो शांत झाला. आजूबाजूची गर्दी पांगली तशी ती सरळ काठावरच्या देवळाकडे चालू लागली. तिच्या मागे आशुतोष खेचल्यासारखा चालत गेला. 

      सगळे दरवाजे जेव्हा बंद होतात तेव्हा ईश्वर कवाड उघडतोच. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार आणि संचिताप्रमाणे त्याचे भाग्यात असलेले त्याला देण्यासाठी तो द्वार उघडतो. फक्त कोणत्या रुपात येईल हे सांगता येत नाही. आशुतोष साठी जान्हवी अशीच ईश्वर रूप घेऊन आली जणू असे वाटले त्याला. जान्हवी सेवानिवृत्त झालेली एक शिक्षिका. सकाळी फिरायला म्हणून रोज गंगेवर जाते. पहाटेचे प्रसन्न गंगेचे रूप पाहण्याची,अनुभवण्याची तिची सवय. पहाटेच्या चैतन्यमय वातावरणाशी, गंगेच्या संथ प्रवाहाशी संवाद करणे जान्हवीला फार आवडत होतं. आजही रोजच्याप्रमाणे जान्हवीचे सकाळी गंगेच्या प्रवाहसोबत हितगुज चालू होते. अन आशुतोष आला पुढ्यात प्रवाह पतित होत होता. 

      आशुतोषकडे एकटक पहात होती जान्हवी. त्याचे मन वाचण्याचा प्रयत्न करीत होती. त्याच्यातल्या हरवलेला विश्वास शोधत होती. आशुतोष काहीही न बोलता  बसला होता. यांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होण्यापूर्वी आपण इथून निघून जावे असे त्याला वाटले. तो निघाला.

      "थांब" जान्हवीच्या आवाजातील जरब पाहून आशुतोष एकही पाऊल पुढे टाकू शकला नाही. त्याच्यासमोर उभी राहून जान्हवी त्याला निरखत म्हणाली," काय झालं आहे? का एवढा जीवावर उदार झालास?  

      "मला जगायचं नाही, काही अर्थच नाही आहे आता जगण्यात. सगळीकडे आयुष्यात मी हरलो आहे" 

      "हरला आहेस म्हणजे. आयुष्य ही तुला स्पर्धा वाटते! तू मागितलं म्हणून नाही मिळालं हे आयुष्य. मग ते तुझ्या मना प्रमाणे कसं संपवू शकशील?" 

      आशुतोष काहीच बोलला नाही. का विचारते आहे ही बाई मला असे प्रश्न? काय अधिकार ह्यांना. कोण आहेत ह्या? मला ओळखत असतील का? मी तर ओळखत नाही ह्यांना. 

      "बोल काहीतरी बाळा." आजी गेल्यापासून कोणीच त्याला बाळा हाक मारली नव्हती. 

      "काय करायचं मग? असंच रडत भेकत जगायचे, लोकांची टोमणी ऐकत." 

     जान्हवीला कळाले की आत चांगलीच ठेच लागली आहे. हळूहळू आंजारून गोंजारून जान्हवीने त्याला बोलतं केलं. हाडाची शिक्षिका होती जान्हवी. बरेच विद्यार्थी तिच्या हाताखालून गेले होते.  आशुतोष पण जर मोकळा झाला, तिच्याशी बोलता बोलता. 

     " तू हुशार आहेस, चांगलं काहीतरी करू शकतोस. तुझी इच्छा असेल तर मी मदत करीन तुला. मान्य आहे का?"   आशुतोषला ही जान्हवीशी बोलायला  आवडत असे. तिच्याशी रोज संवाद होऊ लागला. गंगेशी संवाद साधायला जान्हवी ने शिकविले आशुतोषला. त्याच्यातला आत्मविश्वास जागवीत जान्हवीने आशुतोषला  यूपीएससीच्या मार्फत सीएसई परीक्षा द्यायला लावली, आशुतोष मुळातच हुशार विद्यार्थी होता. जान्हवीच्या सांगण्याप्रमाणे आशुतोष एकेक यशाची पायरी चढत गेला. आशुतोष चे यश पाहून मामाला पण खूप आनंद होत होता. आशूच्या आयुष्यातील काळे कभिन्न दिवस सरलेत याचे श्रेय जान्हवीचे होते याची जाणीव मामाला होतीच. योग्य मार्गावर हात धरून चालणारा भेटला की यशोशिखर गाठणे सहज शक्य होतं हे आशुतोष ने सिद्ध करून दाखवले. आशु IAS ची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याचा त्याच्यावरच विश्वास बसत नव्हता आपण एवढा मोठा पल्ला गाठला. 

     त्याचा ठिकठिकाणी सत्कार होऊ लागला. प्रत्येक सत्काराच्या वेळी आशुतोष  जान्हवीची माऊली म्हणून ओळख सांगत होता. सगळे श्रेय जान्हवीला देऊन तिचाच सत्कार करत होता.

     आताही गंगेशी हितगुज करतांना तो मनोमन गंगेचा आणि जणू तिचेच रूप असलेल्या जान्हवीचा, त्याच्या माऊलीचा मानस सत्कार करत होता...


रसिका राजीव हिंगे

     

     

      


भाषेचे सौंदर्य बोलीभाषेच्या वापराने वाढते किंवा कमी होते?

 भाषेचे सौंदर्य बोलीभाषेच्या वापराने  वाढते किंवा कमी होते?


व्यंजन आणि स्वरांचे

मिलन झाले  भूवरी

शब्द अवतरले अन

प्रगटली भाषा सुंदरी


     जेव्हा या सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळी संपूर्ण प्राणिजात जन्माला घालतांना निर्मात्याने मनुष्य प्राण्यास बुद्धी आणि  मन नावाची एक चीज दान केली आहे, या मनातील भावभावनांचे सादरीकरण करण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी भाषा प्रदान केली. 

     अक्षर केव्हा आणि कसे प्रगट झाले हे नक्की जरी सांगता येत नसले तरी अति प्राचीन  काळापासून  अक्षर अस्तित्वात आहेत,  हे निर्विवाद सत्य आहे.

     प्राचीन काळी मानव हा एकटाच जंगलामध्ये रहात होता. हळूहळू पुढे गट, समूह,  तयार करून रहायला लागला. आपसात देवाण घेवाण होऊ लागली, सहवासात राहिल्यामुळे त्याच्या भावना विकसित झाल्या. त्याच्या मनातील भावभावनांचे तरंग अक्षरांमध्ये उमटू लागले, हे  व्यक्त करण्यासाठी ईश्वराने प्रदान केलेल्या बोलण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. मुखावाटे आवाज येऊ लागला म्हणजेच अक्षरांचा बोध झाला, शब्द, वाक्य विकसित होऊ लागले. अक्षर, शब्द हे बुद्धीच्या कसोटीवर घासून, स्वतःच्या बुद्धीचे सामर्थ्यानुसार भाषेमुळे प्रेम, राग, द्वेष, मत्सर या सारख्या भावना व्यक्त होत गेल्या आणि भाषा समृद्ध होत गेली. 

     वास्तविक पाहता प्रत्येक बारा कोसांवर भाषा बदलते. भाषेचं स्वरूप बदलत जातं. तरीही तिचं सौंदर्य मात्र बदलत नाही. शब्द कसेही असले तरी त्या त्या भागातील ते प्रमाण असतात.  प्रांताची ओळख होते बोली भाषेमुळे. सांस्कृतिक वारसा, परंपरा, जगण्याची पद्धत, शब्द उच्चारण, यावरून त्या त्या ठिकाणी भाषा बोलली जाते. प्रत्येक बोलीभाषेत गोडवा कायम आहेच. 

     साधारण सगळ्याच बोलीभाषेची जननी संस्कृत भाषा आहे. असे असले तरी कालांतराने त्यात बदल होत गेले. उच्चारण पद्धती बदलली. जसे शब्द बोलता येत होते तसेच शब्द बोलल्या जाऊ लागले. आणि तीच त्या त्या प्रांताची बोलीभाषा झाली. परंपरेने चालत आलेल्या शब्दांचा, अक्षरांचा उपयोग पिढ्यांपिढ्या जसाच्या तसा होत गेला, वारसा तसाच पुढे जातो. बोललेले ऐकणाऱ्याला कळले की झालं, भाव व्यक्त होणे गरजेचे, भाषा शुद्ध की अशुद्ध याला महत्त्व नाही. बोलीभाषा टिकून राहिली तर संस्कृती टिकेल.

     ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत भाषेतील गीता सामान्य लोकांपर्यंत पोहचावी म्हणून मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली. ती लिहिता लिहिता समोर बसलेल्या सामान्य जनसमुदायला समजावत लिहीत गेले.  समोर बसलेला सामान्य इतका सामान्य होता की त्यांना ज्ञानोबा, ज्ञानेश्वर या शब्दांचे उच्चारण पण येत नव्हते, ग्यानबा म्हाराज असे उच्चारत त्यांनी महाराजांबद्दलचा आदरभाव, भक्ती व्यक्त केली, ग्यानबा तुकाराम च्या गजरातच  सगळ्यांच्या मनातला भक्तिभाव जागृत झाला. विशेष म्हणजे पुढे ग्यानबाच प्रचलित झाले. इथे शुद्धतेचे परिमाण मोजण्यापेक्षा शुद्ध भक्तिभाव, आदर आणि तसेच आचरणही महत्वाचे ठरले. भाषा शुद्धतेचा अडसर नाही आला इथे. म्हणजे काय तर बोलीभाषा कोणतीही असो भाव महत्वाचा. "माय, मले भाकर दे!" किंवा "आई, मला जेवायला वाढ!"  ह्या दोन्ही वाक्याचा अर्थ एकच आहे. इथे भाषा कोणती हे महत्वाचे नाहीच फक्त अर्थ अभिप्रेत आहे. त्यामुळे त्या भाषेचे सौंदर्य कमी होत नाही तर वाढतेच आहे.  कारण प्रत्येकालाच प्रमाण भाषा किंवा शुद्ध भाषा बोलता यावी हे गरजेचे नाही. बोलीभाषा ही त्या त्या प्रांताचे सांस्कृतिक आणि पौराणिक महत्त्व जपते.

     सर्वसाधारण बोलीभाषा आणि प्रमाण भाषा  दोन्ही जरी वापरात असल्या तरी ही प्रमाण भाषा महत्वाचीच आहे. शुध्दव्याकरण, शुद्ध उच्चारण व्यक्तिमत्व विकासाचे निकष ठरू शकेलं. यासाठी भाषा  बोलता येते म्हणजे त्या भाषेचे व्याकरण ही कळतेच असे नाही. त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे गरजेचे आहे. " व्यक्रियनो शब्द अनेन इति व्याकरणम्!" म्हणजे ज्याच्यामुळे अशुद्ध शब्द,अपशब्द वेगळे काढले जातात किंवा शुद्ध शब्दांचे ज्ञान होते ते व्याकरण. भाषेच्या  प्रत्येक कंगोऱ्याचे विवेचन केले जाते.  अशी तावून सुलाखून निघालेली भाषा म्हणजे प्रमाण भाषा, शुद्ध भाषा. शहरी भाषा ही प्रमाण भाषा.  बोलीभाषेत बोलणं असलं तरी लेखन हे प्रमाण भाषेतच लिहिल्या जातं. प्रतिभाशाली साहित्य लिहायाचे म्हणजे शास्त्रशुद्ध प्रमाण भाषेतच लिहिले तर वाचकांच्या पचनी पडतं म्हणजे वाचकांना आवडतं. किंबहुना साहित्य हे प्रमाण, शास्त्रशुद्ध भाषेतच असावे म्हणजे येणाऱ्या पिढीवर चांगल्या भाषेचे संस्कार होतील आणि भाषेचे सौंदर्य कसे आहे, तिला कोणकोणत्या अलंकारांनी सजवता येईल याचे ज्ञान कदाचित मिळेल. दीर्घ, र्हस्व जर चुकले तर अर्थ बदलतो. न आणि ण चे उच्चारण योग्य पद्धतीने व्हायलाच हवे. तरच भाषेचे सौंदर्य अबाधित राहील. वारंवार चांगलेच वाचायला मिळाले, ऐकायला मिळाले तर तरुणाईला पण भाषेचे सौंदर्य कळेल आणि भाषा अधिक सौंदर्यवती होईल, समृद्ध होईल.

     शास्त्रशुद्ध भाषा निर्मितीसाठी, भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी व्याकरणकार म्हणजे वाक्यकार वररूची, भाष्यकार पतंजली आणि सुत्रकार पाणिनी यांनी जे परिश्रम घेतले आहे ते वंदनीय आहेत. शास्त्रशुद्ध भाषेचे उच्चारण म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासातील एक मैलाचा दगड म्हणता येईल. सुशिक्षित असलेला जर बोलीभाषेत बोलत असेल तर  एक प्रकारे अशिक्षित पणाचे द्योतक आहे असे वाटते. ज्याला आपण इंग्रजीत standard maintain करणे म्हणतो ते शुद्ध भाषेमुळे होतं. 

     शेवटी काय तर ज्याला जे भावेल, रुचेल तेच  तो बोलेल.  बोलीभाषेमुळे भाषेचे सौंदर्य कमी होईल की वाढेल हे प्रत्येकाला आलेल्या अनुभवांती ठरेलच. नाही का!.......


©®रसिका राजीव हिंगे


     

     

     

     

     

     

     

     

पाल्य आणि पालक संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध?

   पाल्य आणि पालक संबंध मैत्रीपूर्ण असावेत की  शिस्तबद्ध?


   "मॅडम, कळलं का तुम्हाला! बारावीतील ऋत्विक ने काल आत्महत्या केली."

     कॉलेजमधल्या मॅडम ने ही बातमी सांगितली अन् सरसरून काटा आला अंगावर, ऐकून क्षणभर थिजल्यासारखे झाले. काही सुचत नव्हतं.  "का? असं, कोणतं आभाळ कोसळलं त्याच्यावर?  कारण काय आत्महत्या करण्याचे?" इतकं जीवावर उदार होऊन कसं काय ते संपवू शकतात?" खोलवर विचार करत याचं मूळ शोधत गेले तर मन विषण्ण होतं. परस्पर नात्यातील संवाद हरवत चालला आहे. आईवडील आणि मुलांमध्ये नाते फक्त नाते राहिले आहे. वात्सल्य,प्रेम, जिव्हाळा असला तरी व्यावहारिक स्तरावर आहे असे वाटायला लागले. याला कारणं बरीच असली तरी व्यवहार हा प्रेमाची, वात्सल्याची जागा बळकावण्याचा प्रयत्न करीत आहे हे नक्की. 

     का इतकी कमकुवत आहेत ही मुलं! काय वाटत असेल मनात आत्महत्या करतांना? इतका टोकाचा निर्णय घ्यावासा कसा वाटला? सगळ्या इच्छा आकांक्षा संपल्या? भीती,भय काहीच कसं वाटत नाही? प्रश्नांची मालिका संपतच नाही. नाती बदलली, पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा, फक्त मी आणि माझे एवढाच विचार करण्याची संकुचित वृत्ती. स्वतःच्या करिअरसाठी मुलांकडे होणारे दुर्लक्ष. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझा मुलगा किंवा मुलगी सगळ्यांचं क्षेत्रात अग्रेसर असावेत हा आईवडिलांचा अट्टहास. याचा मुलांवर काय परिणाम होईल याचा कधी विचार केला जात नाही. त्याला काय शिकायचे आहे, तुला काही समजत नाही असे म्हणून त्याच्या आवडीनिवडींना काही महत्वच द्यायचे नाही, याचा परिणाम मुलांना नैराश्य येतं. वास्तविक पाहता घर हे सगळ्यांचे असते, कोणताही घरासंबंधी निर्णय घेतांना सगळ्यांचा समावेश असावा असे गृहितक आहे. मुले जरी असली तरी त्यांचेही मत विचारात घेणे गरजेचे आहे.  पाल्यांच्या मनात यामुळे घरासंबंधी आस्था निर्माण होते, आईवडिलांविषयी आदर आणि प्रेम निर्माण होत.

     काळ बदलत चाललाय. जगण्याची शैली बदलते आहे, काळानुसार बदल अपेक्षित असले तरी काही अढळ अशा गोष्टी असतात किंवा असाव्यात. काळानुरूप समाजव्यवस्था आणि त्याबरोबर चालणे हे जरी खरे असले तरी संस्कृती बदलणे अपेक्षित नाही. जेव्हा संस्कृती बदलते तेव्हा नको त्या गोष्टी घडत जातात, असं खरचं असेल असे वाटते अशा काही घटना पाहिल्या, वाचल्या की. कारण संस्कृती, संस्कार, परंपरा जपण्याची जबाबदारी पालक या सदरातच येते

      मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली की लगेच तळपायाची आग मस्तकात कशी जाते? मुलांवर संस्कार करणाऱ्या माताच कमकुवत झाल्या की मागच्या पिढीचे संस्कार पुढच्या पिढीत संक्रमित होताना ते घेण्याची ताकद या पिढीत नाही. आईबाप होणं सोपं आहे पण जबाबदार पालक होणं अवघड आहे. फक्त जन्माला घातले म्हणजे आईबाबा झाले असे होत नाही. फक्त कडक शिस्त असली की मुलं ही शिस्तीत वाढतात, आदर्श होतात असे नाही. कधी आंजरून गोंजरून तर कधी प्रेमळ शब्दात समजावून, प्रसंगी एखादेवेळी रागावून सुद्धा मुलांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या तर आईबाबा बद्दल त्यांच्याही मनात आदर, प्रेम कायम राहील. प्रत्येकवेळी शिस्तीचा बडगा दाखवून मुलं कोडगी होतात, त्यांच्यावर कशाचाच परिणाम होत नाही,उलट ते जास्त बिथरतात. मुलांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मेहनत घेणे गरजेचे आहे, निदान त्याला त्याचे भले काय आहे हे कळेपर्यंत तरी. नाहीतर असे म्हणावेसे वाटेल 

      हाती नाही दोर

      दारी नाही आड

      त्याने फुलझाड लावू नये

      सोसता सोसेना संसाराचा भार

      त्याने आईबाप होऊ नये

     घराघरांतून होणारे संस्कार, मोठ्यांचे अनुकरण आणि कुल परंपरा याचा परस्परांतील नात्यावर परिणाम होत असतो. संस्कार ही एक प्रक्रिया आहे. ती हळूहळू पण नकळत घडत जाते. विभक्त कुटुंब पद्धती, नोकरीची गरज म्हणून एका घराचे दोन तीन घर झाले, लहान कुटुंब काळाची गरज त्यामुळे एका घरात जास्तीतजास्त दोनच मुले आहेत. एकेक नाते संपुष्टात येऊ लागले आहे. संसाराचा गाडा सुरळीत चालावा, महागाईशी दोन हात करता यावे म्हणून  स्त्री ने घराचा उंबरठा ओलांडला. अन् ज्या वयात आईवडिलांची विशेष गरज असते त्याच वयात मुलांची ससेहोलपट होऊ लागली. आपला पाल्य काय करतो आहे, त्याचे मित्र कोण, कोणत्या सोशल मीडियावर तो जास्त ॲक्टिव आहे, हे पाहणे गरजेचे असतांनाच आईबाबा वेळ देऊ शकत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. माती ओली आहे तोपर्यंत हवा तो आकार देता येतो. अन्यथा जे आहे ते स्वीकारून कर्माची फळं भोगणे भाग आहे. नात्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विश्वास आणि संवाद हवा.  आदरयुक्त मैत्री हवी, यामुळे नाते घट्ट आणि सुदृढ होत जातं. आईवडीलांचे आणि मुलांचे नाते हे मैत्रीपूर्ण असावे. असं म्हणतात एका विशिष्ट वयानंतर मुलांचे मित्र व्हावे.  आपला पाल्य काय सांगतो आहे, याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. अपेक्षा न ठेवता संवाद साधत त्यांच्या विचारांचा चिडचिड न करता शांतपणे विचार केला तर अपेक्षाभंग होत नाही. मुलांच्या मनात पालकांविषयी आदरयुक्त भाव, प्रेम निर्माण करण्याची जबाबदारी पालकांची आहे. स्वतच्या जबाबदारीचे ओझे मुलांवर लादले तर त्याचे अपेक्षित परिणाम मिळतीलच असे नाही.

     आजच्या या स्मार्ट युगात आणि कोविड मुळे अगदी बाल शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोबाईल शिवाय पर्याय नव्हता. या काळात पालकांची दुहेरी जबाबदारी होती.  स्वतःचे काम आणि मुलांचा अभ्यास, शिवाय मुले मोबाईल मध्ये काय पहातात आहे याचाही विचार करावा लागत होता. आता शाळा सुरळीत सुरू झाल्या आहेत. पण मुले अजूनही मोबाईल नावाच्या राक्षसाचा तावडीत आहेत. उगाचच पाल्याचा अपमान करत त्याला यापासून सोडवणे धोकादायक ठरू शकते. यावेळी संयम ठेवून, गोड बोलून त्यांना मोबाईलच्या विळख्यातून  बाहेर काढणे गरजेचे आहे. त्याचे फायदे तोटे समजतील अशा भाषेत त्यांच्याशी संवाद साधला तर अपेक्षित यश मिळेल.

     अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून, प्रसंगातून पालकांनी आपलं प्रेम दिसू दिले तर पाल्य ही आपोआप जोडल्या जातात. पालकांनी पाल्यारुपी झाडाला प्रेमाचे खतपाणी घातले तर ह्याचे वृक्षात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. फक्त अति खतपाणी नको की जेणेकरून रूप कुजून जाईल. मुलांचे मालक नव्हे पालक व्हावे.....


रसिका राजीव हिंगे 

     

     

  


Tuesday, 2 August 2022

तूच एक तारक...

 



तूच एक तारक....


     आपल्या आयुष्यात कितीतरी असंख्य क्षण असतात. प्रत्येक क्षण लक्षात ठेवणे शक्य नसले तरी एखादा क्षण अविस्मरणीय ठरतो. हातात पकडून ठेवलेला असतो तो क्षण. कधीही निसटू शकत नाही असा अविस्मरणीय.

     देव आहे की नाही, असेल तर कसा असेल? विश्वास ठेवावा की नाही? कोणत्या देवाची आराधना करावी?  प्रत्येकाच्या मनात अशा कितीतरी प्रश्नांची आवर्तन सतत सुरू असतात. माझ्याही मनात असेच नेहमी प्रश्न सतत गिरक्या घेतात भोवती. पण आयुष्यात काही घटना अशा घडतात की आजन्म विसरू म्हटले तरी शक्य होत नाही. खूप काही शिकवून जातात किंवा अनुभूती तरी देतात. 

      निर्गुण निराकार कोणत्या सगुण साकार रुपात सावरेल हे कळत नाही हेच खरे. निदान मला तरी असंच वाटतं. कारण काही गोष्टी या मानवाच्या पल्याड असतात, तिथे साधनेशिवाय माणसाला पोहचणे शक्य नाही. मला पण असेच वाटले एका प्रसंगामुळे. तो प्रसंग मी कधीही विसरू शकणार नाही, इतका की आधी दुःखद वाटणारा पण त्यानंतर मात्र सुखावणारा असा क्षण.

     घर संसार म्हटले की सणवार, सोहळे, नातीगोती, याची जंत्री चालूच रहाते. सर्व सामान्य माणूस यात रमत जातो. मी ही छोट्या छोट्या प्रसंगात सुख शोधत गेले. चारचौघांसारखे आयुष्य म्हणजे संसार मुलंबाळं, त्यांचे शिक्षण, लग्न, लग्नानंतर येणारे सणवार केले की झाली इतिकर्तव्यता.  माझ्या मुलीचे लग्न झाले आणि त्यानंतर  येणारा पहिला सण मंगळागौरी. यासाठी तिला माहेरी बोलावले. तिच्या सासरचे सगळे आवर्जून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रमासाठी सजावट करणे जणू आजकाल अपरिहार्य झाले आहे की काय न कळे. मूळ उद्देश साध्य करत असतानाच वेगवेगळी सजावट करणे हे विशेष आकर्षण ठरतं. पूजेची तयारी, आलेल्या पाहुण्याचे खाणे पिणे, त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे ह्यामध्येच माझा वेळ जात होता. सगळे आलेले पाहुणे  20 ते 25  जण घरात होतो.  

     इकडे आलेलो आहेच तर  शेगांवला जाऊन महाराजांचे दर्शन घ्यायचे ठरलेलेच होतं. सकाळी उठल्याबरोबर आज शेगावला जायचे असे ठरले. "आज नको आपण नंतर जाऊ, घाईघाई करण्यापेक्षा कार्यक्रम झाल्यानंतर जाऊ असे माझे म्हणणे होते. शिवाय नणंदेच्या विहिणबाईंकडे जेवायला जायचे होते. सकाळपासून लवकर आटपा प्रत्येकजण एकमेकाना म्हणत होते पण गप्पांचा ओघ काही थांबत नव्हता. स्वयंपाकाच्या काकू म्हणाल्याच," असे सगळे इथे तिथे बसून गप्पा करत बसला तर काही खरं नाही तुमचं शेगांव! आज एकादशी आहे, गर्दी असेल खूप." 

     " अरे मस्त दिवस आहे आजचा, आता तू काहीच नाही वगैरे नको म्हणू , एकादशी आहे, छान योग आलाय दर्शनाचा. असे कर तू सव्वा किलोचा प्रसाद घेऊन चल महाराजांच्या नैवेद्यासाठी. मी तयार करते." वन्सनी फर्मान काढले. लगेच सव्वा किलोचा सांग्रसगीत वन्सना हवा तसाच नेहमीप्रमाणे उत्तम प्रसाद तयार झाला. विहिणबाईंकडे जेवायला गेलो सगळेच. घरी येईपर्यंत तीन वाजले होते. प्रसादाचा डबा घेऊन कुलपं घातली आणि आमचा लवाजमा जी. एम. म्हणजे गजानन महाराजांचे दरबारी जाण्यास निघाला. सव्वा चारला  दरबारी डेरेदाखल झाले. तिथे सगळ्यानी पेढे घेतले म्हणून मी ही घ्यायला गेले तर ," तू नको घेऊ पेढे, तू प्रसाद आणला आहेस ना. मलाही पटले आणि मंदिरात दर्शनासाठी निघालो. आधी नैवेद्य देऊन येऊ महाराजांना. सगळेच वर जिथे नैवेद्य स्वीकारल्या जातो तिथे प्रसाद घेऊन गेल्यावर तेथील पुजाऱ्यांनी प्रसादाचा शिरा पाहिल्याबरोबर लगेच म्हणाले, " माऊली, हा प्रसाद स्वीकारणार नाहीत महाराज आज. एकादशी आहे. आज कसा चालेल हा प्रसाद! हे ऐकल्याबरोबर माझे सगळे अवसान गळाले. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. का असे झाले? लक्षात कसे नाही आले माझ्या? सकाळपासून दोन तीनदा एकादशी आहे याचे उच्चारण झाले. तरी का असे! हेही माहीत आहे की एकादशीला मंदिराच्या आवारात सुद्धा उपवासाच्या पदार्थाशिवाय इतर पदार्थ चालत नाहीत. नको ते विचार मनात गोंधळ घालायला लागले. ही कोणत्या संकटाची नांदी तर नसेल ना! काय सुचवायचे आहे यातून? जड अंतःकरणाने तिथून निघाली. पापणकाठी अश्रूंच्या लाटा येऊन थडकत होत्या. 

     घरी पोहचल्यावर दार उघडले अन बैठकीत समोरच घरात लावलेली शोकेस खाली पडलेली दिसली. आधी वाटले चोरी झाली की काय घरात? पण हळूहळू लक्षात यायला लागले वर असलेली पुस्तकांची शोकेस खाली पडली. यामध्ये जवळपास 200 ते 250 पेक्षा जास्त पुस्तकं होती. शिवाय एका बाजूला काही शोभेच्या वस्तू होत्या. शोकेसच्या खालीच दिवाण आणि सोफा ठेवलेला. घरात पाहुणे इतके होते की  त्यावर कायम कुणी न कुणी बसलेलं असायचेच. जर का आम्ही घरी असतो तर काय झालं असतं या कल्पनेने माझे हातपाय थरथरायला लागले. सगळंच कल्पनेच्या पल्याड होतं. किती मोठं गंडांतर माझ्यावरचे टळले होते. काही विपरीत घडले असते तर आयुष्यभर मनाला टोचणी लागून राहिली असती. माझा मुलगा हळूच मला म्हणाला, "आई तुला तर असंच वाटत असेल आता, महाराजांनी वाचवलं आपल्याला." तो असं बोलल्याबरोबर लख्खकन वीज चमकावी तसे झाले, होय महाराज होते म्हणूनच आपण वाचलो. हा इतका मोठा धक्का होता. पण मुलाने असे म्हटल्यामुळे मी जणू भानावर आले. याच साठी केला होता अट्टहास तेथे दर्शनासाठी येण्याचा. 

     अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज.... च्या गजरातच त्यांचे मानस पूजन मांडले,  कृतार्थतेचे अश्रू त्यांच्या चरणांचे प्रक्षालन करत होते, विश्वासाचे गंधलेपन आणि भावफुलांची माला त्यांना अर्पण करून आर्ततेने आरती ओवाळली. त्यांच्या कृपामृताच्या वर्षावात मी तृप्त झाले होते.....

     

     एक परी रूप अनेक

     तूच तू रे भवतारक

     सांभाळी गुरुराया रे

     देवा भक्तप्रतिपालक


रसिका राजीव हिंगे


     

     

     


     

सध्याची परिस्थिती... चिंतन

 सध्याची परिस्थिती... चिंतन


     हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे

     माणसाने माणसाशी माणसासम वागणे

       कोविड-19 चा प्रादुर्भाव ओसरल्यावर दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेचे प्रांगण विद्यार्थ्यांनी फुलून आले होते. या विद्यार्थीरुपी फुलांचा सुगंध मनाला मोहवीत होता.  प्रार्थनेसाठी ओळीत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव दिसत होते. शाळेची सुरुवात बँडच्या तालावर एक सुरात प्रार्थनेने झाली अन विद्यार्थी आपापल्या वर्गात जायला निघाले. वर्गात जातांना सहज दोघी मैत्रिणींचा संवाद कानावर पडला.

       "अगं स्वाती, मी विसरूनच गेले ग ही प्रार्थना! आज आठवतच नव्हती मला."

       "करायची काय पाठ करून? आपलं हे दहावीचे वर्ष आहे. पुढच्या वर्षी आपण कॉलेजला जाणार आहोत. तिथे काही नसते प्रार्थना वगैरे. झालं बाई, एकच वर्ष सगळे नियम पाळायचे."

       "हो, ते ही खरेच आहे."

       त्या दोघी तर निघून गेल्या त्यांच्या वर्गात. पण मला विचार करायला भाग पाडून गेल्या. दिवसाची सुरुवात करतांना प्रार्थना म्हणायची असते, ज्यामुळे दिवस आनंददायी होतो, मनाचे आत्मबळ वाढविण्यासाठी  प्रार्थना करायची आहे, असे असतानाही मागचा पुढचा विचार न करता एका क्षणात उत्तर आले. का असं वाटावं. खरंच याचसाठी का हा अट्टहास मुलांना शिकविण्याचा! जणू असाच नियम असावा असे वाटले क्षणभर मला. फक्त  परीक्षेसाठी अभ्यास करायचा अन मार्क मिळवून पास व्हायचे. चांगले करियर करायचे, मोठ्या पगाराची नोकरी करायची की झाली इतिकर्तव्यता. याचसाठी का ही धडपड.  म्हणूनच लिहावीशी वाटली असेल समीर सामंत यांना ही प्रार्थना. कुठे चाललो आपण. मी मी किती करायचे. आपण समाजात राहतो तर त्याचं देणं लागतो हे कळतंच नाही आपल्याला.  आजकाल साधारण हाच सगळ्यांचा समज असतो की माझा फायदा आहे का काही, तर मी करतो. अगदी तराजू लावलेला असतो. का असे संकुचित विचार येतात मनात. निसर्ग करतो का असा विचार, आपल्याला जगायला जे जे आवश्यक आहे ते सगळंच निसर्ग बहाल करतो. आपणही निसर्गाचाच एक भाग आहे, तरीही सतत फायदा तोटा तोलत राहायचे ही संस्कृती नाही आपली. असा विचार केला तर प्रत्येकाच्या मनावर कसे शुद्धतेचे चांदणे पसरेल?  संस्कार लोप पावत चालले की, त्याचा वारसा पुढे चालविण्यात आपली पिढी कमी पडते आहे याचा विचार करायला लावणारा हा दोघी मैत्रिणींचा संवाद. 

       शिक्षणासाठी पर्याय म्हणून एकतर कोविडने  ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल नावाचा राक्षस विद्यार्थ्यांना भेट दिला. त्यामुळे आधीच नको ते ज्ञान विद्यार्थ्यांना झाले आहे. ग्रेग हॉफमन याच्या आईने त्याच्या हातात स्मार्टफोन देतांना ज्या अटी घातल्या त्याच यांना घालायला हव्या होत्या, पालकांच्या मदतीने. आता मोबाईल वापरू नको, असे म्हणणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा ठरेल, कारण सगळी भिस्त त्याच्यावरच होती करोना काळात. भरीस भर उरल्या वेळात दूरदर्शन.

      दूरदर्शन म्हणजे मानवाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. करमणुकीचे एक साधन म्हणून त्याने अवघे जीवन व्यापले आहे. घरातील आधारवड, त्यांच्यासाठी तर  दूरदर्शन एक पर्वणीच ठरली आहे. असे असले तरी घरातील स्त्री, सानथोर सगळेच मग ते कोणत्याही वयाचे असो अगदी समरस झालेले असतात संध्याकाळी या मालिकेतील व्यक्तींशी. 

      सहज संध्याकाळी एकदा मी दूरदर्शनवर मालिका पहात होते.  मी उगाचच एका चॅनेल वरून दुसऱ्या चॅनेल वर उडया मारत होते, पण कुठेही मला पहावेसे वाटले नाही. कोणतीही वाहिनी असो, मराठी किंवा हिंदी, असं छान मनाला भावेल असे काहीच पाहता येत नाही असे मला स्वतःला वाटायला लागले. माझी आवड वगैरे बदलली की काय! मला पटल्या नाहीत मालिका यापेक्षा का पटल्या नाहीत, का आवडत नाहीत ह्याचा विचार मी करू लागले. जगण्याची पद्धतच बदलली आहे. जगण्याचे जे मापदंड असतात त्यात बदल झाला आहे असे मला वाटले. अर्थात काळानुरूप बदल अपेक्षित आहेत, ते स्वीकारले आहेत, पण इतके बदल की जगण्याची शैली वेगळी वाटावी.  

              प्रत्येक मालिकेत स्वतःचीच पोळी कशी भाजल्या जाईल याचाच फक्त विचार आहे. मग त्यासाठी काहीही करायची तयारी. म्हणजे अगदी जीव सुद्धा घेण्याचा प्रयत्न होतो आहे. खलनायक, नायक असावेत, याशिवाय कथानक बाळसे धरु शकणार नाही, पण त्यालाही कुठेतरी मर्यादा हवी. आदर्शाचा बळी देऊन  हिसकावून घेणे हे पाहिले की मन सुन्न होतं. जे आहे त्यात समाधान मानणारी आपली संस्कृती. यामध्ये जे चांगलं आहे ते न घेता वाईटच घेण्याची वृत्ती असते सर्वसाधारण. मानव हा अनुकरणप्रिय असला तरी वाईट गुण लवकर आत्मसात केले जातात. हेच कमी झाले की काय, सोबत नेटफ्लिक्स, प्राईम व्हीडिओ, अमेझॉन प्राईम, हॉट स्टार हे ही आहेतच. युट्युब ने तर अक्षरशः धिंगाणा घातला आहे. तुम्ही काहीही शोधा सापडेलच तिथे. 

             प्रसार माध्यमांच्या जाळ्यात ही तरुण पिढी गुरफटली जाते आहे. यातून वेळ कसा मिळेल, केव्हा वाचतील आपल्या देशाचा जाज्वल्य इतिहास. होईल का ओळख आपल्या संस्कृतीची? "वाचाल तर वाचाल"  हेच खरे आहे, सत्य आहे हे सांगायला हवे आहे, हा संस्कार घरातच व्हायला हवा आहे.  शत्रूला सुद्धा माणुसकीने वागवणारा आपला देश. माणुसकीच्या पायावर उभी आहे आपल्या देशाची संस्कृती. पाश्चात्य आणि पौर्वात्यांचे अनुकरण करता करता आपण आपले नुकसान करून घेतो आहे, आपल्याच ज्ञानाच्या भरवशावर हे देश विकसित होत आहेत, आपण मात्र अजूनही विकसनशीलच आहोत, हे कळायला हवे तरुणाईला. 

             मी माझे माझे करतांना कधीतरी आपण सगळे असा विचार का येत नाही. स्वतः साठी फक्त असे असले तरी याचीही दिशा योग्य आहे का हे पाहायला हवे. नुसती पळापळ करण्यात काय अर्थ. तो धावतो आहे म्हणून मी धावतो. शर्यत असावी, पण समजून उमजून. सातत्य हवे. कासवाने सतत चालत राहून शर्यत जिंकली, धावत सुटला नाही. पुढच्यास ठेच लागली तरी मागचा शहाणा होत नाही. कारण त्यांच्या जवळ तेवढी विचार करण्याची शक्तीच उरली नाही असे वाटते. स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्याचा कधीतरी प्रयत्न करावा असे वाटायला हवे.  प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा प्रयत्न केला तर पोहता येईल. फक्त उडी मारण्याचे आत्मबळ हवे. 

             जे विचार करतात ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पण पोहून जातात.  सारासार विचार करण्याची सद्बुद्धी जागृत झाली तर बदल निश्चित होईल, कारण निसर्गाचं चक्र फिरतं आहे.....

          


रसिका राजीव हिंगे

             

ऋतू झरला पानापानातून...



आल्या आल्या आषाढ सरी

भिजली भिजली अवघी धरणी

गंध दरवळे ठायी ठायी

ऋतू झरलाय पानोपानी


     सावळेसे जांभुळले मेघ नभी दाटून आले, सौदामिनी कडकडायला लागली अन जलधारांचे नृत्य सुरू झाले सावळ्या धरेवरी.  तृषार्त धरणी तिचे सहस्र बाहू पसरवून जलधारा झेलीत होती. तृप्त होऊन ती हर्षभरे चिंबचिंब भिजत होती. तिच्या तृप्ततेचा सुगंध आसमंत व्यापून उरला होता. जणू गंधसोहळे साजरे करते आहे.  तिच्या अंगोपांगी बहरलेली हिरवाई स्वच्छ आणि सतेज दिसायला लागली. वरुण राजा बरसला होता. त्याची ती अगदी आतुरतेने वाट पहात होती.  झाडांच्या  पानापानातून चंदेरी थेंब पाठशिवणीचा खेळ खेळत जणू ही रत्नांची माला तयार करून वसुंधरेला अर्पण करत होते, भूमाता सगळं आनंदाने स्वीकारत होती. तिचीच लेकरं नदी, तळी, विहीरी, ओढे, तलाव आपापले कलश भरण्यात मग्न झालेले आहेत. कधी ओसंडून वाहतील काही कळेना. चराचरात, मनामनात ऋतू बहरायला लागला.

     आषाढ आला आहे याची ही नांदी आहे.  आषाढ सरीसवे वारकरी निघाले सावळ्याला भेटायला. काळ्याच्या भक्तांना त्रास होऊ नये म्हणून या आषाढ सरी हवेत गारवा आणतात अन भक्तिरसात न्हाऊन निघालेला वारकरी यांच्याशी समरस होऊन पंढरीची वाट चालत जातो. भक्तीचा ऋतू असा बहरतो ठायी ठायी, कणाकणात, वारकऱ्यांच्या नसानसात. 

     एकीकडे भक्तीच्या पानाफुलातून ऋतू झरत असतो तर कुठे प्रीतमंदिरी एखादी नवयौवना तिच्या श्रीहरीच्या आठवणीत व्याकुळ होऊन त्याची वाट पहात बसते. झरझरणाऱ्या पाऊस धारा, गंधाळलेले चराचर, पानामध्ये चाललेले थेंबांचे नर्तन पाहून तिलाही भिजावेसे वाटते.  नकळतपणे ही स्वप्न वेडी रंगून जाते. वाऱ्यावर स्वार होऊन, जलधारांच्या अश्वाचे लगाम खेचत तिचा साजण येतो. त्याच्या सहवासात, त्याच्या सानिध्यात ती भावविभोर साजणी स्वतःला झोकून देते. तिच्या रोमारोमातून वर्षा ऋतू झरत जातो. तिचं मन देहभान विसरून गायला लागतं

     कधी तू ...... कोसळत्या धारा थैमान वारा

    बिजलीची नक्षी अंबरात ...

    सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा

     चिंब पावसाची ओली रात ....

     कधी तू रिमझिम झरणारी बरसात


©®रसिका राजीव हिंगे

     

 rasraj#ऋतू#पानोपानी#

     

     

स्वातंत्र्य व्यक्तिमत्वाचे

     शॉपीजन कथा स्पर्धा

    

    स्वातंत्र्य व्यक्तिमत्वाचे


     घनदाट रानातून रमा झपाझप पावलं उचलत चालली होती. काळे सावळे मेघ आभाळात गोळा झाले होते. गार वारा सुटला होता. झाडांची सळसळ मनात भय निर्माण करत होती. पाऊस केव्हाही कोसळायला लागेल असे वाटत होते. भराभर चालू की पळत जाऊ रमाला कळत नव्हते. तिच्या विचारांच्या चक्रात ती चालत होती. तिला मधूनच असे वाटत होते की कुणीतरी तिचा पाठलाग करतं आहे. दोन तीन वेळा तिने अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण दिसलं कोणीच नाही. जंगली जनावर वगैरे असेल का? या विचाराने तिचे सर्वांग थरथरले. भीतीमुळे भराभर पावलं पण टाकू शकत नव्हती. तरीही  जीव मुठीत घेऊन जमेल तसे ती पळत सुटली आणि तिने घर गाठले. घरात येताच आईच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. रमाचा घाबरलेला आणि घामाने डबडबलेला चेहरा पाहून लक्ष्मीच्या मनात धस्स झालं.

     " रमा, काय झालं? तू का इतकी घाबरलीस? कोणी काही बोलले का? का जातेस रानातून? तू आणि तुझे बाबा का ऐकत नाहीत हेच कळत नाही मला!"

     यावर रमा काहीच बोलली नाही. पण तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते. कोण असेल पाठलाग करणारे की खरंच एखादा चित्ता!... ती पुन्हा शहारली भीतीने. बाबा पण असेच तर जातात रानातून, त्यांनाही असाच अनुभव येत असेल का? पण कधी बोलले नाहीत बाबा याबाबत! बाबा म्हणतात तसे असेल का काही? आपल्या कार्यामध्ये कोणी विघ्न आणण्याचा प्रयत्न तर करत नसेल न? काही झालं तरी आता घाबरायचे नाही. बाबा करतात तसंच करायचं. 

     रमाला शांत पाहून लक्ष्मीचा जीव कासावीस होत होता. तिला तिचे पूर्वीचे दिवस आठवत होते. असेच व्हायचे जेव्हा विष्णुपंत रानावनात हिंडायचे, डोंगराळ भागात शिकवायला जायचे तेव्हा  विष्णुपंत घाबरत नव्हते तरी त्रास होतच होता.

     विष्णूपंत हे एक हुशार आणि मेहनती व्यक्तिमत्त्व. लहानपणापासूनच हुशार असलेल्या विष्णुपंतांचे आईवडील शेतकरी. घरी भरपूर जमीनजुमला असलेले जमीनदार.घरात समृद्धी  आणि संस्कार हातात हात घालून होते. अशा सुसंस्कारित घरात विष्णुपंत लहानाचे मोठे झाले. सुशिक्षित आणि सुसंस्कृत विष्णुपंतांना तहसीलदार व्हायचे होते. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तेथील ग्रामातील सुधारणा करण्यासाठी, जमेल तसे खेडोपाडी जाऊन जनजागृती करायची होती. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा देऊन ह्या क्षेत्रात प्रवेश केला. आणि सुरू झाले विष्णूपंतांचे नोकरीच्या माध्यमातून समाजकार्य. प्रामाणिकपणे ते ज्या तालुक्यात बदलून जात तिथे काम करत होते. ऑफिसच्या व्यतिरिक्त इतर वेळेत गावागावात फिरून ग्रामस्थांना लिहिता वाचता येत नसेल तर त्यांना रात्रीच्या वेळी शिकवत असत. समोर आलेल्या अडचणी स्वतःच कशा प्रकारे सोडवाव्यात, स्वावलंबी व्हावे, याबाबत गावकऱ्यांशी गप्पांच्या ओघात बरंच काही सांगत होते. मनमिळाऊ स्वभाव आणि मदतीला तत्पर असलेले विष्णुपंत प्रत्येक गावात लोकप्रिय झाले. या लोकप्रियतेमुळे वधुपित्यांची जणू रांगच होती घरी त्यांच्या साठी. बी.ए. झालेली सालस लक्ष्मीची त्यांनी निवड केली आणि विष्णुपंत कुलकर्णी चा संसार सुरू झाला. 

     वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या होत गेल्या अन त्यांच्यापाठी लक्ष्मी फिरत होती. कधीही कोणतीच तक्रार न करता ती विष्णुपंताचे नोकरी साधून सुरू असलेले समाजकार्य अनुभवत होती. विष्णुपंतांच्या कार्याला आणि संसाराला ही छान बहर आला होता. त्यांच्या संसारवेलीवर लक्ष्मीचेच प्रतिरूप घेऊन रमा अवतार घेती झाली. त्यामुळे लक्ष्मी घरात पूर्णपणे अडकली होती. तरीही अडल्या नडल्याला मदत करतच होती. पण घरावर तुळशीपत्र ठेऊन कार्य करणे तिला पटत नव्हते. कितीदा तरी ती विष्णुपंतांना याविषयी बोलत असे. पण विष्णुपंत कधी लक्ष देत नव्हते तिच्या बोलण्याकडे, किंबहूना तिला समजवयाचे की,

     " लक्ष्मी, ही अडाणी लोकं आहेत. यांना स्वतःच भलं कशात आहे ते पण कळत नाही ग! आपला देश स्वतंत्र जाऊन इतकी वर्षे झाली, तरीही ही माणसं गुलाम असल्यासारखीच जगतात. स्वातंत्र्याचा खरा अर्थ यांना कळलाच नाही."

     "अहो, पण घर आहे,संसार आहे तुमचा. तिकडे पण लक्ष नको का द्यायला? दुसऱ्याचे संसार सांभाळतांना स्वतःचा वाऱ्यावर का सोडायचा?"

     "तसं काही होणार नाही लक्ष्मी. त्यांच्यातली जाणीव जागी करायची आहे. ते पण आपल्यासारखंच जगले पाहिजेत, असं नाही का तुला वाटत?" 

     लक्ष्मीला हे सगळं कळत होतं, पण वळत नव्हतं. विष्णुपंत तहसीलदार असल्यामुळे कायमच तालुक्याला राहावे लागत असे. त्यामुळे आजूबाजूच्या गावाशी संपर्क येतच होता. गावातील परिस्थिती पाहिली की तिच्याही पापणकाठी अश्रू गोळा व्हायचे. सरकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचत नाहीत म्हणण्यापेक्षा तळागाळातील लोकं त्या स्वीकारत नाहीत असे म्हणावे लागेल.  कारण तेवढं ज्ञान, समज त्यांना नाही. विशेष म्हणजे माहीत करून घ्यायचे पण नसतं. यासाठीच विष्णुपंत प्रयत्नरत होते. त्यांच्या कार्यात आडकाठी आणणारे बरेच असले तरी त्यांना मदत करणारेही होतेच. 

     रमा लहान होती तोपर्यंत कुठेही बदली झाली तरी काही विशेष जाणवले नाही. पण रमा मोठी होत होती. सतत खेडोपाडी फिरत असल्यामुळे लक्ष्मी समोर रमाच्या शिक्षणांचा प्रश्न आवासून उभा होता. तालुक्यातील शाळांमध्ये तिचे माध्यमिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. पण पुढील शिक्षणासाठी रमाला शहरात वसतिगृहात ठेवणे गरजेचे होते. रमा शिक्षणाच्या निमित्ताने शहरात वसतिगृहात राहू लागली. गावातली जगण्याची शैली आणि शहरातील जगणे यामध्ये बराच फरक रमाला जाणवला.  हा बदल स्वीकारत रमा शिक्षणातील एकेक शिखर सर करतच होती.  तिला तिच्या बाबांसारखेच कार्य करायचे होते. खूप हुशार नसली तरी प्रथम श्रेणीमध्ये रमा दरवर्षी उत्तीर्ण होत होती. बघता बघता पत्रकारिता हा विषय घेऊन तिचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. पण रमाला गावात राहणे जास्त आवडायचे.  लहानपणापासून खेडोपाडी राहिल्याने असेल कदाचित. 

     विष्णुपंतासोबत  आदिवासी पाड्यांमध्ये रमा फिरत होती. लहान असताना तिला त्यांच्याशी बोलायला, खेळायला आवडायचे. पण आता मोठी झाली आणि शिक्षणामुळे त्यांच्या अडचणी, त्यांचे अज्ञान, परंपरा आणि त्याविषयी असलेली अंधश्रद्धा पाहून यांच्यासाठी काहीतरी करावे असे वाटत असे. पण काय आणि कसे करावे याबाबत तिला मार्ग दिसत नव्हता. तिची धडपड सुरू होती, पण सहजासहजी कोणी हे मान्य करेल असे नव्हते. तिला सोबत हवी होती. तिचे बाबा असायचे पण नोकरी करून जास्त वेळ देऊ शकत नव्हते. या आदिवासी लोकांचे इतके पक्के विचार होते की ते बदलणे किंवा त्यांना काही सांगणे कठीण होते. पूर्ण पणे त्यांच्यामध्येच राहून बदलता आले तर शक्य होईल. आई परवानगी देत नव्हती जास्त वेळ बाहेर राहण्याची. कारण एकतर सगळा डोंगराळ भाग होता आणि गावात पोहोचायचे म्हणजे रानातून जावे लागत असे. घनदाट रान नव्हते तरी जंगली श्वापदे होतीच. दिवसा काही त्रास नव्हता पण थोडा जरी अंधार झाला तर भीती होतीच. 

     गावात त्यांचा म्होरक्या  भिकू याचा मुलगा जगन्नाथ तालुक्यातील शाळेत जायचा हट्ट करत होता. पण घरातील आजी आजोबा आणि आईवडील तसेच गावातील सगळेच वृद्ध नाही म्हणत. शिक्षणामुळे मुलं बिघडतात, घरापासून, आईबापापासून लांब राहतात. परंपरावादी असतात हे आदिवासी. शिवाय रोज रानातून जाणे येणे करावे लागेल. जगू अजून लहान आहे. जंगली प्राण्यांशी लढू नाही शकणार. अशा कितीतरी गोष्टी होत्या त्यामुळे तेथील लोक शिक्षण घेत नव्हते. पण जगूला रमा सारखे शिकायचे होते. ती जशी गोष्टी वाचून दाखवायची तसे त्याला वाचायचे होते. जगू सारखा रमाला म्हणायचा,"ताई,मला शाळेत जायचे आहे, नाहीतर तू शिकव."  रमाला कळत नव्हतं काय करावं.

     रमा तिच्या बाबांशी बोलली याबाबत. विष्णुपंत म्हणाले,  "मला माहीत आहे हे आदिवासी किती कट्टर आहेत ते. रमा, जीवाला धोका पण निर्माण होऊ शकतो. तरीही तू त्यांना तिथेच गावात शिकवायचे. घाबरू नको. मी तिथेच गावात असतो दिवसभर. मला बाहेर जावे लागले तर मात्र तू येऊच नको तिकडे. बघू काहीतरी मार्ग सापडेल. जगू दोन पावलं चालत आला आहे न, आपण चार पावलं चालत त्यांच्यापर्यंत जायचे."  बाबांच्या या शब्दांनी रमाला धीर आला.

     रमा रोजच्या प्रमाणेच गावात बाबांबरोबर जात होती. पण ज्यावेळी गावातले पुरुष शिकारीसाठी किंवा इंधन गोळा करण्यासाठी रानात जायचे त्यावेळी रमा जगूला शिकवू लागली. हळूहळू बाराखडी, छोटे छोटे शब्द जगूला सरावाने वाचता यायला लागले. जगुबरोबर गावातली पण चारपाच मुलं यायला लागली.  त्यांच्यात शिकण्याची गोडी निर्माण झाली. समजायला लागल्या काही गोष्टी. त्यामुळे जगुच्या वागण्याबोलण्यात फरक जाणवायला लागला. भिकूच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. पण तो शांत होता. वेड आहे, थोडे दिवस चालेल अन बंद होईल.

     रमा रोजच यायला लागली गावात. विष्णुपंत बाहेर असले तरी ती येतच होती. जेव्हा एखादा चांगल्या कार्यासाठी पाऊल उचलतो तेव्हा त्याचे पाय ओढणारे, त्याला मागे खेचणारेही असतातच. तसेच रमाच्या बाबतीत घडत होते. ज्यांना काहीच करायचे नसते अन दुसऱ्यालाही करू द्यायचे नसते असाच होता राणा. राणा म्हणजे गावातील भंटोल या सदरात मोडणारा होता. व्यसनांच्या आहारी गेलेला  राणा  रमाला अजिबात आवडत नव्हता. तरी तिने तिची शाळा घेणे सुरूच ठेवले. राणा काही न काही खुरापती काढतच होता. गावातील लोकांना रमा आणि विष्णुपंत यांच्या विरोधात भडकवीत होता. जगुच्या वडिलांना म्हणजे भिकूला हे कळत होतं. पण मुलाच्या प्रगतीकडे, त्याचे बदललेले व्यक्तिमत्व याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही हे अडाणी भिकूच्या लक्षात आले होते. राणाचा बंदोबस्त करावाच लागेल नाहीतर तो गावाच्या प्रगतीच्या आड येईल हे ओळखून होता भिकू. 

     तिचे बाबा बाहेर गावी असल्यामुळे आठ दहा दिवस झाले रमा एकटीच येत होती.  रानातून येतांना तिला रोज जाणवे, की  कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. पण दिसत कोणीच नव्हतं. असं किती दिवस चालणार आहे. याचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. रोजच्याप्रमाणे रमा निघाली, तिने भिकू आणि त्याच्या सोबत दोघे यांना तिच्यापासून थोड्या दूर अंतरावर मागे यायला सांगितले. सवयीप्रमाणे ती रानातून भराभर चालायला लागली, पण तिला पुन्हा जाणवलं तिचा पाठलाग होतो आहे. ती थांबली, अन मोठ्या आवाजात म्हणाली," जो कोणी असेल त्याने पुढे यावे, उगाच भेकडासारखा लपून का राहतो? असेल हिंमत तर ये पुढे!" पण कोणीच समोर आले नाही. फक्त पाण्यातून चालण्याचा आवाज आला. पावसामुळे रानात पाणी साचलेले होते.  रमाने अंदाज घेतला, भिकू आहे पाठीमागे, ती पुन्हा भराभर चालायला लागली. थोडे पुढे जात नाहीतर झाडीतून राणा आला समोर, रमा किंचित घाबरली, जवळून राणाला कधी पहायचा प्रसंग आला नव्हता. "का पाठलाग करतोस रोज माझा? सरळ बोल तुला काय बोलायचे आहे ते." 

     " रमा, तू आमच्या गावात येऊ नको. तुला दगा फटका होण्याची भीती आहे. गावातील वृध्द म्हातारे यांना पटत नाही तू गावातील मुलांना शिकवतेस ते." राणा चे शुद्ध आणि नम्र बोलणे ऐकून रमा अवाक झाली. तिला कळेना हा कसा काय असा वेगळाच आहे. "राणा, मला आधी सांग तू स्वतः तर चांगला शिकलेला वाटतोय तुझ्या बोलण्यावरून. पण मग मला का सांगतो आहेस शिकवू नकोस म्हणून."

     "रमा, मला लहानपणापासूनच शिकण्याची आवड होती. मी माझ्या आबा सोबत तालुक्याला जायचो तेव्हा तेथील शाळा पाहिली की, मला पण शिकावेसे वाटे. पण आबा नाही म्हणायचे. कोप होईल आपल्यावर, गावात वाळीत टाकतील आपल्या घराला, जगणं कठीण होईल वगैरे भीती घालून मला चूप करायचे. एकदा खूप राग आला मला घरातल्या सगळ्यांचा. मी रागातच घर सोडले आणि भटकत राहिलो वाट मिळेल तिकडे. घरापासून खूप लांब जायचे होते मला. घरातून गेलो तेव्हा 8 वर्षाचा होतो मी. नशिबाने साथ दिली अन एका सद्गृहस्थाच्या मदतीने माझी शाळा सुरू झाली. पांडुरंगशास्त्री भेटले नसते तर मी  पदवीधर झालो नसतो, कदाचित एखाद्या गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या असतो आज." बोलता बोलता राणा शांत बसला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. रमा पण भारावून गेली होती राणाची कथा ऐकून. भिकू पण अवाक झाला. भिकूचेही पापणकाठ ओलावले. 

     "आरं पन राना, तू आम्हांसनी सांगतल न्हायी तू शिकेल आहे बुक म्हून!" भिकू कडे राणा फक्त पहात होता. कारण त्याच्याविषयी गावात कोणीच चांगलं बोलत नव्हतं. 

     "बोल की रं राना! सगळे वंगाळ धंदे करतुया. कामून करतं हे समदं?"

     "काय बोलू भिकू दादा सांग न. गावात राहिल्यावर यापरिस वेगळं काय होणार? तुझ्यासारखे नाही रे सगळे गावात! शिवाय आबांनी स्वतःची शपथ घातली मला, तू शिकून आलास हे गावात सांगशील तर बघ. मी खूप चिडलो, पण काही उपयोग झाला नाही."

    " रमाने गावात येऊन शाळा सुरू केली ते मला खूप आवडले. आपण ही तिला मदत करावी असे वाटत होते. पण गावातली चावडीवरची चर्चा ऐकली अन रोज रमाचा पाठलाग करत होतो. कारण कधीही तिला दगा फटका होण्याची शक्यता  आहे."

    " हे बघ राणा, असं काहीही होणार नाही. जे चांगलं काम करतात त्यांना नेहमीच मदतीचा, सहकार्याचा हात मिळतो. तू सुद्धा माझ्यासोबत सहभागी हो. भिकू आहे आपल्यासोबत आणि गावातली बरेच लोकं आता विरोध करत नाहीत. तू अजिबात घाबरू नको."

    रमा घरी आली आणि तिने तिच्या बाबांना घडलेली सगळी हकीकत सांगितली. विष्णुपंतांना आश्चर्याचा धक्काच बसला ऐकून. किती ही अंधश्रद्धा, आणि अज्ञान! यावर काहीतरी मार्ग शोधावा लागेलच. दुसऱ्या दिवशी विष्णुपंतांनी गावातली पंचायत बोलावली. सगळ्यांसमोर  विष्णुपंतांनी राणा च्या शिक्षणाचा गौप्यस्फोट केला. ऐकल्याबरोबर सगळेच राणाला वाटेल ते बोलू लागले. पण विष्णुपंतांनी परिस्थिती पाहून रमा आणि राणा ला पंचायती समोर बोलायला सांगितले.  पण कोणीच ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. सगळा गोंधळ पाहून पंचायत उठून गेली.

     राणा आणि रमा रोज घरोघरी जाऊन त्यांना शिक्षणाचे फायदे, त्यामुळे आपल्यात कसा बदल होईल, गावातील बदल, सुधारणा होत जातील, आपली आर्थिक परिस्थिती बदलेल, शांतपणे सगळं नीट सांगत होते. राणाचे बोलणे ऐकून गावकऱ्यां मध्ये हळूहळू बदल जाणवायला लागला. शाळेत येणाऱ्या मुलांची आणि मुलींची पण संख्या वाढली. 

     विष्णुपंतांना स्वतःच्या मुलीचा खूप अभिमान वाटला. विष्णुपंतांच्या मदतीने राणा आणि रमा दोघांनी मिळून गावातील लोकांमध्ये विचारांची जागृती केली. त्यांची विचार करण्याची संकुचित प्रवृत्ती बदलली. त्यांच्यात विचार स्वातंत्र्य निर्माण केलं. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी डोंगराळ भागात, तळागाळातील लोकांमध्ये विचाराचे स्वातंत्र्य, जगण्याचे स्वातंत्र्य नाही, ही गोष्ट खरंच विचार करण्यासारखी आहे. 

     गावात शाळा सुरू झाली. फक्त शिकार करणारी तरुण मुलं वेगवेगळी कामं करण्यास उद्युक्त झाली, रोजगार निर्माण करणारे छोटे छोटे उद्योग सुरू करण्यासाठी सरकारी मदत मिळवून देणे यासाठी रमा, राणा आणि विष्णुपंत कार्यरत होते. गावाचा विकास व्हावा हा ध्यास जणू सगळ्यांनीच घेतला होता.

     अंधश्रद्धा आणि बुरसटलेल्या विचारांच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना परावृत्त करून त्यांच्यात जगण्याचे स्वातंत्र्य निर्माण झाल्याचे पाहून विष्णुपंत, लक्ष्मी, रमा आणि राणा सगळेच आनंदित होते. राणा स्वतः खूप समाधानी होता, कारण तो त्याच्या गावाचा विकास घडवून आणण्यात सहभागी झाला होता.


रसिका राजीव हिंगे

    


     

     

     

     

     

     

     

     

     

Monday, 4 July 2022

 #ऋतुगंध

#आषाढ_महोत्सव


आले दाटून नभात

मेघ जांभुळले काळे

नांदी आषाढाची झाली

बघा सृष्टीचे सोहळे।।धृ।।


लखलख सौदामिनी

चमचम प्रकाशली

सरीवरी सरी येती

अन धरणी हर्षली

सावळसा मृदगंध

ठायी ठायी दरवळे

नांदी आषाढाची झाली

बघा सृष्टीचे सोहळे।।1।।


उंडारला दशदिशा

ओलावला गंधवारा 

शीत लहर घेऊनी

साद घाली चरचरा

वृक्षवेली झुलवित

जणू बांधिले झोपाळे

नांदी आषाढाची झाली

बघा सृष्टीचे सोहळे।।2।।


जाईजुई पारिजात

महोत्सव सुगंधाचा

करी बेहोष बेधुंद

सहवास साजणाचा

ऐशा धुंदल्या क्षणांना

प्रीत सरी स्पर्शाळे

नांदी आषाढाची झाली

बघा सृष्टीचे सोहळे।।3।।


ऐसा कोसळे पाऊस

झाले स्वच्छ मनांगण

कृष्णसखा भासे जणू

काळे निळे नभांगण

कृष्णमेघ मृदंग हे

राधा वीज रास खेळे

नांदी आषाढाची झाली

बघा सृष्टीचे सोहळे।।4।।


आले दाटून नभात

मेघ जांभुळले काळे

नांदी आषाढाची झाली

बघा सृष्टीचे सोहळे


©®रसिका राजीव हिंगे

Tuesday, 28 June 2022

चित्रकाव्य - पायवाट

 


कशी कुठून ग चालत येई पायवाट

तुझ्या नि माझ्या आयुष्याची वहिवाट


चहूकडे गे हिरवळ सुंदर 

खाचखळगे  मधेच धूसर

अहाहा कसा बघ हिचा साजरा घाट

तुझ्या नि माझ्या आयुष्याची वहिवाट


वळणावरती जरा विसावू

सुखदुःखाचे सूर आळवू

मल्हारासी गाता गवसे नवा थाट

तुझ्या नि माझ्या आयुष्याची वहिवाट


घर कौलारू शिवार हिरवे

सृष्टीचे हे ऋण स्मरावे

आनंदाने पेरत जाऊ सुखे दाट

तुझ्या नि माझ्या आयुष्याची वहिवाट


कशी कुठून ग चालत येई पायवाट

तुझ्या नि माझ्या आयुष्याची वहिवाट


©®रसिका राजीव हिंगे

Saturday, 25 June 2022

पारिजात

 


उतरुन आल्या नभी चांदण्या

प्रतिबिंब जणू भासे भूवरी

केशर चांदण फुलवित हसले

सावळे रूप सखा श्रीहरी


रुक्मिणीच्या गंध ओंजळी

गंधित प्रीती भामेचीही

केशर लाली ठायी ठायी

गाली भासे धरणीच्याही


गंधभारले आंदण ऐसे 

देउनी परी नामनिराळा

पारिजातकी शुभ्र पांढरा

तयात दिसतो कृष्ण सावळा


सुगंधाची भरली परडी

समर्पणाचे भाग्य लाभले

दरवळलेले अंगण माझे

कृष्णचरणी मन विसावले


रसिका राजीव हिंगे



पोरीच्या रं बापा

 #बाप#दुडकी चाल#नुपूर#वाळे#


बाप

ती आली दुडक्या चालीने चालत....

तिचे पहिले पाऊल निनादले...

पायातील वाळे बोलले.. 

चालता येतंय तिला....

नुपुरांचा मंजुळ नाद ऐकतांना

मी भारावून गेलो.....

घरभर तिचेच अस्तित्व ....

खेळायला चंद्र आला की,

नुपुरे स्तब्ध व्हायची.....

आणि आज एकदम तिच्या

पैंजणांचा छमछम आवाज कानी

पडला....

अन मी भानावर आलो.....

गुरफटलो होतो...

तिच्या सगळ्याच नादात मी

मेंदीने रंगलेली...

सौभाग्यालंकारांनी नटलेली....

पाहिली तिची पाऊले,

हृदयात , कालवाकालव झाली..

ती निघाली आहे,

नव्या वाटेवर.... 

तिच्या भाग्योदयाकडे....


©रसिका राजीव हिंगे 





Saturday, 11 June 2022

बेधुंदपणाची एक लहर




जगणे बेधुंद


बघ धुंदल्या क्षणांना

मंतरल्या वाटेवरी

चांद आला उतरून

सागराच्या या किनारी


     आकाशात पौर्णिमेचा चंद्र उगवला अन साऱ्या चराचरात एक बेधुंद पणाची लहर उठली जणू. समिंदराच्या लाटा बेभान होऊन उंच उंच उसळत होत्या, चंद्रास जणू कवेत घ्यायला निघाल्या की काय असे वाटावे. किती हा बेधुंदपणा!

     आपणही जगावं असंच कधीतरी बेधुंद होऊन. उठू द्यावी एक लहर, तरंग बेधुंद पणाचा तनामनावर.  सुसाट धावावे वाऱ्यासारखे वाट फुटेल तिकडे, करूच नये विचार त्यामुळे काय नुकसान होईल,  उनाड वारा करतो का विचार!अगदी तसंच. मेघांच्या गडगडासारखे ओरडावे कधीतरी,  नाहीतरी मेघ गरजले तर कुठे पाऊस येतो. नुसतेच गडगडाट करतात. गर्जेल तो पडेल काय?जलधारांसम नृत्य करावे, काळ्या सावळ्या मेघांच्या मागे धावत लपतछपत पाठशिवणीचा खेळ खेळावा, काळोखल्या रजनी सारखी नयनी काजळ रेखा रेखावी, भूमातेच्या अंकावर मनसोक्त लोळावे, जसे पशुपक्षी लोळतात. तीच तर खरी माय आहे न. घ्यावा मोठेपणी तिच्या कुशीत शिरून प्रेमाचा ओलावा जो सुखावेल.  या पंचभूतांसारखेच आहे आपले जगणे.

     बेधुंद होणे म्हणजे काही वाईट नसावे. सृष्टीची म्हणजे प्रकृति, माया याची निर्मिती केली परमात्म्याने ती बेधुंदपणे, तिच्यावर आसक्त होण्यासाठीच. संपूर्ण चराचरात धुंदी आहे. वसंतातला बेधुंद निसर्ग जगायला शिकवतो, नव्याचे स्वागत करायला लावतो. मोगऱ्याचा दरवळ, चाफ्याचा सुगंध, निशिगंधाचा परिमळ, गंधाळलेली रातराणी प्रीत मंदिरी बेधुंद करतातच ना. त्यांच्यामुळेच प्रीत ही बेधुंदपणे वागत जाते. प्राजक्ताचे गंधित समर्पण श्रीहरीच्या चरणी विसावते म्हणजे काय भामेचे आणि रुक्मिणीचेही बेधुंद प्रीतीचे प्रतीकच म्हणावे लागेल. शिशिरातील पानगळीच्या पैंजणांचा नादही धुंद करतो. हेमंतातला गारवा मदहोश करणारा नि ग्रीष्मातील उष्णता रंगगंधाने मोहित करणारी, ऋतुचक्र धुंद होऊन फिरते आहे म्हणून जगरहाटी सुरू आहे.

     निसर्ग आणि मानव एकाच नाण्याच्या दोन बाजू. म्हणून जसा निसर्ग बेधुंद होतो तसाच मानवही. हो पण एक मानवाने लक्षात घ्यावे नेहमीच निसर्ग हा परमात्मा आहे. तो बेधुंद झाला तरी सावरतो आणि आवरतो ही तोच. आधारही तोच. 

     आजची तरुणाई नको त्या व्यसनाच्या मागे धावत बेधुंदपणे जगते आहे. याचे परिणाम पुढील पिढीवर नकळतपणे होत आहे. जगण्यात धुंद असावीच त्याशिवाय जगण्याला काही अर्थ असेल का? पण शेवटी प्रत्येक गोष्टीला मर्यादेचे कुंपण घालणे अत्यावश्यक आहे.  शेवटी काय तर भान ठेवून आयुष्य आखा आणि बेधुंद, बेभान होऊन जगा, मग कळेल आयुष्य किती सुंदर आहे....


©®रसिका राजीव हिंगे

     

     #rasraj#बेधुंद#क्षण#जगणे#

     


Friday, 10 June 2022

ऋतुराज वसंत

 


ऋतुराज वसंत


वसंताची चाहूल ती

पालवीस ये बहर

कोकिळेचे कुहुकुहू

सुगंधित चराचर

आम्रवृक्ष भारावला

सुखावली ग धरती

मंत्रमुग्ध जाहले मी

ईश्वराची ही निर्मिती


     ऋतुराज वसंताचे आगमन झाले की निसर्ग कोवळ्या पानांचे आणि गंधित फुलांचे तोरण लावून स्वागतास सज्ज होतो. पहाटेस शीतल वारा शीळ वाजवीत तर पानांची सळसळ जणू मृदुंगाच्या तालावर पदन्यास करीत आहे अन कोकिळ पंचम स्वर लावून ऋतुराजाचे स्वागत करण्यास उत्सुक झालेत असे वाटावे.

     आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी आपली जीवनशैली बांधून घेतली होती. निसर्ग आणि मानव म्हणजे चित पट, एकाच नाण्याच्या दोन बाजू. निसर्गात प्रतिक्षण बदल होत असतात कारण सृष्टीचे सृजन ही प्रतिक्षण सुरू असते. हे होत असलेले निसर्गातील बदल अचूक हेरत त्याचे सौंदर्य रोमारोमात साठवत जगण्याची कला आपल्या पूर्वजांना अवगत होती. प्रत्येक बदल हा नवा आहे, काहीतरी देणारा आहे, सांकेतिक आहे याचा शोध अनुभवांती लागत गेला.  त्या  बदलाच्या शोधाचे नामकरण झाले ऋतू.  असे हे अपूर्व संशोधन त्यांनी त्यांच्या योग शक्तीच्या द्वारे केले होते. तीच परंपरा पुढे चालत आली, ऋतुमागून ऋतू बदलत वर्तुळ पूर्ण होतं म्हणजेच ऋतुचक्र.यावरूनच त्यांची दिनचर्या ठरत असावी.  या ऋतुचक्रामध्ये सहा ऋतू, वसंत,ग्रीष्म, वर्षा, शरद,हेमंत आणि शिशिर. वसंत ऋतू हा राजा. सम्राट. नवनिर्मितीचा उद्गाता. 

     सौंदर्याचे शिंपण करत येतो वसंत ऋतू.  नवचैतन्याची लयलूट करत असतो निसर्ग. निसर्गाचे प्रत्येकच रूप मोहमयी असले तरी वसंत ऋतूत हा निसर्ग नवयौवना भासतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली  षोडशा किंवा नुकतेच लग्न झालेली नववधू जशी मोहरलेली, फुललेली असते, तिचा प्रत्येक क्षण हा गंधित असतो तसाच हा वसंत, मोहरलेला,गंधाळलेला. कृष्णसख्यासारखा मनभावन. गीतेमध्ये विभूतीयोगामध्ये स्वतः कृष्ण च सांगतो 

"ऋतूनां(ङ्) कुसुमाकरः" मी ऋतूमध्ये वसंत आहे. असा दैवी अधिष्ठान लाभलेला वसंत, परमात्म्याचे रूप वसंत.

     शिशिराच्या पानगळीनंतर  साचलेल्या, वाळलेल्या पाचोळ्यावर चालत, पैंजणांचा नाद करत येतो वसंत. निष्पर्ण झालेल्या झाडांवर लाल, पोपटी, हिरवटसर पाने दिसायला लागतात. या ओल्या पानांचा कोवळा सुगंध साऱ्या चराचरात भरलेला असतो. हवेतील गारवा आल्हादक वाटतो. कधी शीतल लहर तर कधी उष्मा जाणवतो वातावरणात. संमिश्र वातावरण तरीही आल्हादक. नवे काही करण्याची उर्मी प्रदान करणारे, सृजनात्मक. 

     डेरेदार आम्रवृक्षावर लगडलेल्या मोहराचा गंध आसमंतात दरवळत असतो. सुगंधाने मोहीत होऊन पक्षांची वासंतिक सभा जणू या आम्र तरुवर भरते. वसंताचे आगमन झाले की कोकीळ कुहुकुहू गायला लागतो म्हणण्यापेक्षा कोकीळ गायला लागला म्हणजे वसंत आला असे पूर्वीचे ठोकताळे असायचे. कोकीळ स्वरासोबत भारद्वाज, दयाळ यासारखे पक्षी मधुर गायन करण्यात दंग असतात. सुंदरेसे घरटे बांधावे आणि आपल्या चिल्यापिल्याना सुरक्षित ठेवावे ही सगळ्याच प्राणिमात्रांची आस. मग पक्षी कसे सुटतील बरे यातून. काडी काडी गोळा करत फिरत असतात नर आणि मादी. कुठेतरी डेरेदार वृक्षावर, घराच्या बाल्कनीत, परसदारी बागेत यांची गडबड सुरू असते घरटे बांधण्याची. ही पण वसंताची चाहूल.

     वसंताच्या सौंदर्यात भर घालणारे गुलमोहर, पळस, पांगारा, काटेसावर, बहावा हे वृक्ष. लाल फुले असलेला गुलमोहर गगनाला गवसणी घालत उभा असतो.  सुरवातील लाल फुलांचे छोटे गुच्छ हिरव्या पानातून वर येत असताना ही  रंगांची सरमिसळ विलोभनीय असते. पळस हा औषधी असलेला वृक्ष. पळसाची केशरी लाल फुले, पांगाऱ्याची पान नसतांना आलेली लालभडक फुले  तसेच काटेसावरीची पर्णहिन वृक्षावरची लालचुटुक फुले, बहाव्याची पानोपानी फुललेली पिवळीधम्मक झुबकेदार फुले उन्हाच्या काहिलीत मनाला , दृष्टीला थंडावा देणारी आहेत. हा फुलांचा बहर म्हणजे जणू सृष्टीच्या प्रीतीला आलेला बहर आहे असे वाटते. 

          ग्रीष्मातील वृक्षराजी

          लाल फुले बहरली

          प्रीत तुझी लाभली

          लाली गाली आली

    ऋतूनुसार देत राहणे, समर्पण करणे हा निसर्गाचा स्वभाव आहे. आम्रवृक्षावर लागलेली हिरवीगार कैरी पाहूनच मन शांत झाल्यासारखे वाटतं. आत शीतलता झिरपायला लागते. घराच्या दारांना, खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावून किंवा आजकाल कुलर, AC लावून घरात थंडगार कैरीचे पन्हे प्राशन करत दुपार पहुडलेली असते वसंतात. 

     सुगंध म्हणजे वसंत आणि वसंत म्हणजेच सुगंध हे समीकरणच आहे. वसंत ऋतूत सुगंधाचे आंदण देणारे फुल म्हणजे मोगरा. शुभ्र मोगऱ्याचे ताटवे बहरलेले असतात. काळसर हिरव्या पानाच्या आडून ही धवल फुले म्हणजे चांदवा आला उतरून धरेवर असे वाटते. पानापानात फुललेली मोगऱ्याची फुले आपला सुगंध लुटत सगळे चराचर गंधित करतो. हा गंध कुंतली माळला की मोगराही कृत्यकृत्य होत असावा. चाफ्याचे सोनचाफा, पिवळा चाफा, पांढरा चाफा, गुलाबी चाफा असे विविध रंग आणि प्रकार असले तरी वसंत ऋतूत आपल्या सौंदर्याचे आणि गंधाचे समर्पण करतो तो पांढरा चाफा. पांढऱ्या चाफ्याचा सडा जमिनीवर पडतो तेव्हा वाटतं नभीची नक्षत्र आहेत जणू सावळ्या भुईला सजविण्यासाठी आलेली. निशिगंध असेच पांढरे शुभ्र फुल. एकाच गुच्छात चारपाच फुल आपला सुगंध प्रदान करीत असतात. मोगरा, चाफा, निशिगंध ही सगळी पांढरी फुले. पांढऱ्या  रंगात उष्णता शोषून घेण्याची शक्ती आहे. ही सगळी निसर्गाची किमया. वसंत ऋतूने सृष्टीला दिलेले हे आंदण आहे.

     थबकला पहाट वारा

     घेण्यास चाफ्याचा गंध

     मोहरल्या वाऱ्यास करी

     मोगऱ्याचा दरवळ धुंद

       सृष्टीचा प्रियकर असलेल्या वसंतातील सांज तर अतिशय मोहक. हळूच पश्चिम क्षितीजाच्या गवाक्षातून  डोकावलेली सांज  केशरिया उधळत क्षितिजावर रेंगाळते. जाता जाता रविराज सांजेला कवेत घेतो, तिच्या आरक्त गालावरची लज्जा म्हणजेच जणू हा उधळलेला केशरिया आहे असे वाटावे, की त्या शशीकराची वाट पहाण्यासाठी ती उगाचच रेंगाळते आहे अन त्याच्या आठवात मोहरून अशी सलज्ज उभी आहे. दिवस मोठा होत असल्यामुळे रजनींनाथ यायला उशीर होतो आहे हे ठावे आहे तिला, म्हणूनच ती रेंगाळत असावी.

       नाविन्याची सुरुवात, सृजनात्मक अश्या ह्या वसंत ऋतूत हिंदूंचे नवं संवत्सर सुरू होते. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी याच ऋतूत अवतार धारण करून मीच हे सृष्टीरुप, विश्वरूप आहे, याचे संकेत दिले. मारुतीरायाने पण याच ऋतूत जन्म घेउन या वसंत ऋतूमध्ये किती शक्ती आहे याचे प्रात्यक्षिकच दिले आहे. 

       प्रत्येकाच्या आयुष्यात असाच आनंदी आणि चैतन्यदायी वसंत ऋतू यावा.

       मुदित झाले वातावरण

       ऋतुराजाच्या आगमनाने

       धवल कुमुदिनी फुलल्या

       भरला आसमंत सुगंधाने


रसिका राजीव हिंगे

       

       

       

   

     

     


Thursday, 9 June 2022

निसर्गास पत्र

 




तीर्थरूप निसर्ग राजा,

     प्रिय म्हणू की तीर्थरूप म्हणू? तीर्थरूप फक्त आईवडीलांनाच लिहायचे असते नाही का, बाकी सगळे तीर्थस्वरूप किंवा प्रिय. तुला तीर्थरूपच म्हणते कारण तू तर सगळ्यांचाच पिता आहेस, यापेक्षा मला बाप आहेस असे म्हणायचे आहे. खरे आहे न. तू समजतोस माझ्या भावना! उगाच नमनाला घडाभर तेल नको. असो.

     तुला पत्र लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे मला तुझे आभार मानायचे आहे. माझ्या बकेट लिस्ट मधीलच हे एक आहे. पण एक विचारायचेच आहे. तू असा कसा रे वागतोस? तू लहरी आहे हे माहीत आहे, पण आजकाल तर केव्हाही कोणतेही रूप धारण करतोस. अन काय रे निसर्गराजा, तू ऋतुचक्र वगैरे फिरवलेस की काय! चक्र फिरणारच पण त्याची गती? ती कुठे हरवली आहे. सगळ्या ऋतूंनी जागा बदलली की काय?

     आजकाल तू नेमेची येतो पावसाळा ही म्हण खोटी ठरवतो आहेस, येतोस तू पण त्याची काही वेळच नाही. केव्हाही कोणत्याही महिन्यात बरसत  राहतो, नाही तर स्वतःकडे डोळे लावून बसायला सांगतो.

     तुझ्या आषाढ सरी बरसल्या की काळी आई ओलीचिंब होते अन सुगंधाचे सोहळे सुरू होतात. कळत नाही रे काहींना तुझं रूप, पण ज्याला कळतं न तो तुझ्याशी एकरूप होतो बघ.

     श्रावणातील तुझं ते  मनाला वेड लावणारं विलोभनीय रुपडे, काळे सावळे मेघ जणू मृदुंग वाजवीत आहेत आणि त्या तालावर चाललेले जलधारांचे नृत्य, मध्येच एखादी प्रकाश शलाका यावी तशी लखलखीत सौदामिनी येऊन या नृत्याला सलाम करून जाते. रविराज हळूच आपल्या अस्तित्वाची दखल देत सोनसळी किरणांची लयलूट करतो.  कधी बेभान होऊन अंगात शिरशिरी भरवतो, कधी मंद निळी झुळूक होऊन तनामनाला उत्साहित करतोस. किती देत राहतोस रे. 

      शिशिरातली पानगळ सुद्धा पैंजणांचा मंजुळ नाद निर्माण करणारी, नव्याची आतुरतेने वाट पाहणारी अशीच. हा तुझाच नियम आहे न एकाची निर्वाणी तर दुसऱ्याची पर्वणी. तुझ्या अंकावर विसावलेले सगळेच हा नियम पाळतात.  

     काळ्याशार आभाळात सांडलेली चांदणफुलें आणि पुनवेचा तेजाळलेला चांदवा म्हणजे तुझ्या सौंदर्याचे परिमाण आहे.  तुझ्या दुधाळलेल्या शारदीय चांद्र प्रकाशात प्रीतीच्या समिंदरात अश्या काही बेभान लाटा उचंबळतात की तुझ्या निर्मितीला कडकडीत सलाम ठोकल्या जातो.

     वसंत ऋतू म्हणजे तुझा मास्टर स्ट्रोक. काय  सांगू तुला. (तुझेच तुला सांगते बरं) कोकिळेचा पंचम स्वर ऐकवू की मोगरा, चाफा, निशिगंध यांचा दरवळ सांगू, पळस, गुलमोहर, पांगारा यांच्या रंगसंगतीचे वर्णन करू. कसे काय तुला हे साधते. मानवात का नाही असे अष्टपैलूत्व. काही न काही कमतरता आहेच. 

     एकापाठी एक येणारे हे ऋतू एकमेकाना पूरक असे आहेत. हेमंतातली थंडी गारठून टाकते म्हणूनच शिशिराची पानगळ, वसंताची नवनिर्मिती, ग्रीष्मातील ऊन  वर्षा ऋतूमध्ये जलधारांचे रूप घेऊन बरसते. त्यामुळे शरदात  नटलेला पहायला मिळतोस तू.  तुझे चक्र अव्याहतपणे सुरू आहे म्हणून तर आम्ही जगतोय.

     रत्नाकराच्या स्वरूपात खळखळणारे तुझे जलरूप म्हणजे तारुण्याची मस्ती. अन खरंच तू त्याच्या तळाशी रत्न लपवून ठेवतोस! कमाल आहे तुझी. म्हणून तर मला नेहमीच वाटतं की तू खरा जादूगार आहेस.  बरं प्रत्येक ठिकाणी विविधता. भूगर्भात पाण्याबरोबर कितीतरी धातूंच्या,तेलांच्या खाणी तू सांभाळतोस. म्हणून मी सुरवातीलाच लिहिले न तुझे आभार मानायचे आहेत. तुझं हे विराट रूप पाहिले की आपोआपच नतमस्तक होते मी.

     सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून शिवबाच्या पाठी उभा राहिलास. गनिमाची धूळधाण करण्यासाठी, स्वराज्य स्थापनेसाठी. किती ही उदारता. हिमालयाची उंचच उंच पांढरीशुभ्र शिखरे आव्हान करतात शौर्याला. तसेच तिथली शांतता, आपले साध्य साधण्यास साधन आहेत ऋषीमुनींना, योगी महात्म्यांना. पर्वतराजीं संरक्षक तटबंदी जणू . सौंदर्याने नटलेल्या दर्याखोऱ्यातून , गुहेतून तूच वास करतोस परमात्मा होऊन.

     प्रत्येक प्राणीमात्रांना रहायला जागा हवी हा तुझा अट्टहास. यासाठी तू जंगल निर्माण केलं. स्वच्छंद पणे पशु पक्षांना विहरता यावे म्हणून.  जंगल निर्मिती केलीस म्हणून तो वरुणराजा प्रसन्न होतो. आम्ही बघ किती कृतघ्न, सरळ जंगलाच्या जंगल उध्वस्त करत आहे.

     समर्पण हा तुझा गुण  तू समस्त मानवजातीला दिला, उपयोग फारच थोडे लोक करतात.  जे असेल ते मुक्त हस्ते उधळत राहतोस.

     पण तुझं रौद्र रूप पाहिलं की भीतीने गाळण बसते रे. भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, ढगफुटी, अशी अस्मानी संकटे म्हणजे तुझंच रौद्र रूप. याला बहुतांशी आम्हीच कारण आहोत पटतंय आता. तुझ्याकडून आम्ही फक्त घेतच राहतो. वास्तविक पाहता तू दिलेलेच पुन्हा तुला अर्पण करत राहिले, तर चक्र फिरत राहील, जर जे आहे ते जपून वापरले तर. वैज्ञानिक प्रगतीच्या नावाखाली मानवाने जो विध्वंस मांडला आहे  त्यामुळे तुला प्रदूषणाचे रूप घ्यावे लागले.  तुला एक गुपित माहीत आहे का, आज जे हे विज्ञानाच्या टीमक्या मिरवतात न ते आधीच ऋषीमुनींनी शोधले आहे. काहीही नुकसान न करता. लागला होता तुला कधी धक्का पूर्वी!   वेगाच्या मागे धावतांना काय सुटतंय ते  कळत नाही. कोविडचे रूप घेऊन आलास की समस्त मानव जातीला समज द्यायला. दे माय धरणी ठाय केलंस सगळ्यांना.

     पण तुला आता आम्ही सगळे वचन देतो, तुझी काळजी घेणार आहे, तुझ्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणार आहे, लगेच जमेल की नाही माहीत नाही पण प्रयत्न नक्कीच असेल. 

     खूप दिवसांपासून तुझ्याशी संवाद साधायचा होता. म्हणून  हा पत्रप्रपंच. तुझंच रूप तुझ्यापुढे उकलण्याचा प्रयत्न केला . आता मस्त वाटतंय. सुरवातीला तुला मी बाप म्हणाले पण मनातलं सगळं लिहिल्यावर आता माझा सखा वाटतोय... कृष्णसखा. 

      तुझ्या सगळ्या रुपांना तुझाच अंश असलेल्या माझा साष्टांग नमस्कार...


                              तुझीच

                            रसिक सखी

     

    #निसर्ग#पत्रलेखन# सृष्टी#rasraj# 

      

Wednesday, 8 June 2022

चित्रकाव्य-स्वीकार

 


अवसानासी नकोस गाळू

ऐसी हतबल होऊ नकोस

चौकटीतले जीवन जगणे 

उंबरठ्याला सांगू नकोस


काय बरोबर किती चुकीचे

हिशोब कुणास कळले नाही

आयुष्याच्या सारीपटावर

दान हवे ते पडले नाही


घरट्यातील चिल्यापिलांना

आश्वस्त करी अश्वत्थापरी

वात्सल्याच्या पंखावरूनी

अवकाशीची उंच भरारी


घडेल ते ते घडू द्यावेत

जे मिळेल ते स्वीकारावे

अनुभवसिद्ध संध्याकाळी

सुखदुःखासी अता त्यजावे



©®रसिका राजीव हिंगे























प्रवाहाच्या विरुद्ध मी....

 




     "जनरीतीला धरून चालावे बघ नेहमी, उगाच सारखं सारखं वेगळं करायच्या नादात स्वतः स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेशील" असे नेहमीच सगळे म्हणतात. पण जनरीत म्हणजे काय? याला प्रमाण काय? सगळे एकाच दिशेने निघाले तर आपणही त्याच्या पाठी जावे का? पुढचा ठेचकाळत चालला तरी आपण शहाणे व्हायचे नाही का?  पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे जर असेल तर मग का पुढच्याचा पाठलाग करायचा! 

     जरा वेगळी वाट चालून पहावी म्हणण्यापेक्षा विरुद्ध दिशेने चालून पहावं. स्वतः अनुभवाच्या मुशीतून तावून सुलाखून निघून यावं. म्हणजे कळतं आयुष्य म्हणजे प्रवाहाच्या दिशेने पोहणे नसून विरुद्ध दिशेने पोहणे आहे. कल्पनेच्या पंखावर आरूढ होऊन स्वप्नांच्या जगात भराऱ्या घेणे म्हणजे आयुष्य नाही. वास्तवाची जोड देऊन येईल त्या वाटेवर चालणे म्हणजे आयुष्य, जीवन.

     या मार्गावर  मखमली पायघड्या अंथरलेल्या नसतील पण काट्याकुट्यातून मार्ग कसा चालावा याचे प्रशिक्षण नक्की मिळेल. सुखाचे इमले बांधण्याचे स्वप्न पाहणारे विरुद्ध दिशेने चालू शकणार नाहीत कदाचित. कारण अडथळ्यांची शर्यत आहे इथे. वाऱ्याच्या दिशेने उडणारा पालापाचोळा, धूर, धूलिकण, हे वजनाने हलके आहे त्यामुळे  जसा वारा धावेल तसा वाहतात. पण दगड हा अभेद्य, कणखर, आणि जड आहे. जे असे पत्थर दिल असतात, मनाने कणखर असतात पण हृदय अतिशय कोमल असतं तेच प्रवाहाच्या विरुद्ध, जनरीत मोडून जे योग्य आहे तसेच करण्याचा प्रयत्न करतात. 

     यासाठी बरेचदा वाईटपणा घ्यावा लागतो, नको ते ऐकून घ्यावे लागते. ज्ञानेश्वर महाराजांशी लोक कितीही वाईट वागले तरी ते चांगलेच वागत होते, जर का तेपण इतरेजनांसारखेच वागले असते तर ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ निर्माण झालाच नसता, जो यावश्चंद्र दिवाकर सगळ्याना मार्गदर्शक आहे.  सावरकर, नेताजी आणि त्यांच्या सारखेच क्रांतिवीर जर जे चाललं आहे ते चालू द्या असे म्हणत स्वतःचे हित साधत जगले असते तर आजही आपण पारतंत्र्यात खितपत पडलो असतो. 

     या भ्रष्ट दुनियेत दुसऱ्याच्या समोरचे ताट ओढून घेणारे आहेत. माझ्या स्वतःच्या आयुष्यात मला बरेचदा या गोष्टींचा खूप त्रास झाला, होतो आहे. पण माझ्या आईने दिलेले संस्कार असे आहेत की आधी तुझं भलं हो त्यापाठी माझं.  त्यामुळे तो तसा वागतो म्हणून मीपण का चांगलं वागायचे, नेहमीच माझ्याच तत्वांना का मुरड घालायची या आणि अशा विचारांना माझ्या मनात थाराच नाही. तुला जसे करायचे तसे कर, मी तसेच करणार नाही किंवा वागणार नाही या माझ्या भूमिकेमुळे मला नेहमीच मानसिक ताण सहन करावा लागतो. आज इतक्या दिवसानंतर आयुष्याच्या मध्यावर मला कळतं आहे की विरुद्ध दिशेने पोहण्यात,चालण्यात जो आनंद आहे, जे आव्हान आहे ते खूपच शक्तीदायक आहे, आत्मबळ वाढविणारे आहे. 

     असे असले तरी प्रवाहाच्या विरुद्ध जगत असतांना समाजभान ठेवणे गरजेचे आहे. आपण समाजात राहतो तर त्याचे पण देणे लागतो हा विचार करत चालत गेलो तर कळतं आयुष्य खूप सुंदर आहे...


रसिका राजीव हिंगे

Sunday, 29 May 2022

पर्व

 




    प्रत्येक मानव जन्माला येतांना त्याचे संचित, प्रारब्ध सोबत घेऊनच येतो, त्याला त्याच्या कर्मानुसार जगावेच लागते, तिथे पर्याय नाही हे पुन्हा प्रकर्षाने जाणवले जेव्हा डॉ. एस.एल. भैरप्पा यांची सौ. उमा कुलकर्णी यांनी भावानुवाद केलेली पर्व ही  कादंबरी वाचली  तेव्हा. 

    व्यास म्हणजेच कृष्णद्वैपायन यांनी लिहिलेल्या  महाभारता सारख्या महाकाव्यावर ही कादंबरी आहे. सतत बारा ते चौदा वर्षे या  विषयाचा अभ्यास केल्यानंतर भैरप्पा यांनी ही कादंबरी लिहिली. 

    महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही गुंतागुंतीची आहे. भैरप्पा यांनी त्या त्या व्यक्तिरेखा साकारताना त्यांच्या मनात जाऊन साकारल्या आहेत. कादंबरी ही पूर्णतः युध्दाभोवती फिरते आणि त्या त्या अनुषंगाने आलेले पात्र किंवा कथा मनाचा ठाव घेत पुढे सरकत जातात.

    युद्धासाठी भीम त्याचा मुलगा घटोत्कच याला आणण्यासाठी हिडिंब वनात निघाला असतांना द्रौपदी च्या मनाची अस्वस्थता, घालमेल म्हणजे भीम आता तिकडे गेल्यावर सालकटंकटी ला भेटेल, खूप दिवसांनंतर तो तिच्याकडे निघाला आहे परत येईल का, या आणि अशा प्रकारच्या स्त्रीसुलभ भावना तिच्या मनात येतात त्यामुळे तिची जी अस्वस्थता आहे ती भीमाने स्वतः समजून घ्यावी अशी तिची इच्छा असते. 

    कुंतीचे पाच ही पुत्र कसे झाले त्याची सर्वसामान्य  जनमानसात जशी धारणा असते किंवा समज आहे  म्हणजे मानवी भावभावनांशी समरस होईल असे मांडले आहे. कंसाच्या जन्मकथा सांगून आर्य, अनार्य, यांच्यातील वर्णसंकर कसा झाला किंवा कंस असा का राक्षसी वृत्तीचा होता याचे भावविश्लेषण पटत जातं आणि असेच असेल का असा विचार करायला मन प्रवृत्त होतं. धृतराष्ट्र आणि त्याच्या दासी, त्यांचे पुत्र. गांधारीने फक्त चौदा पुत्र आणि एक कन्या यांनाच जन्म आहे, बाकी सगळे धृतराष्ट्राचे दासी पुत्र असे कौरव शंभर झाले. 

    शल्य राजाची मुलगी हिरण्यवती वयात आलेली आहे, दारावर आलेल्या नाग लोकांतील एका बासरी वादकासोबत ती निघून जाते, द्रौपदी स्वयंवर, अर्जुनाने जिंकून आणलेली द्रौपदी पाच जणांमध्ये वाटण्याचे मुख्य कारण म्हणजे  पाचही पुत्रांना एकत्र बांधून ठेवता येईल. यासाठी कुंतीने केलेली पांचालीची मनधरणी,  पांडवांचा वनवास, इंद्रप्रस्थाची स्थापना, द्रौपदीची भर सभेत झालेली विटंबना, धृतराष्ट्र चे कपटी राजकारण, द्रौपदी ला धृतराष्ट्राने दिलेले वर , अर्जुनाचा सुभद्रेसोबत झालेला  विवाह याचे  बारकाईने आणि सूक्ष्म वर्णन भैरप्पांनी केले आहे.  व्यक्तिरेखा साकारताना त्या त्या ठिकाणची भौगोलिक स्थिती, वातावरण, याचेही तपशीलवार वर्णन भैरप्पांनी केले आहे.

    युद्धाचे वर्णन म्हणजे फक्त पराक्रम, जय पराजय असे नाही. अठरा अक्षोहिणी सैन्य असलेले हे युद्ध होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमा झालेल्या सैन्याला अन्नाची रसद पुरविणे, पाणीपूरवठा , त्याच्या मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था, हत्ती,घोडे यांची मलमूत्रामुळे युद्धभूमीवर पसरलेली दुर्गंधी, मोडलेले रथ, बाणांचे तुकडे,  मेलेल्या सैन्याच्या रक्तमासांचा खच, त्यामुळे तेथे जमलेल्या रान गिधाडांचा होणारा त्रास हे सगळं वाचतांना रणभूमी अक्षरशः डोळ्यासमोर उभी राहते. काय दैन्यावस्था झाली असेल त्यावेळी सामान्य सैनिकांची. सर्वनाश करणारे महाभयंकर असे हे युद्ध याचे व्यावहारिक दृष्टिकोणातूनही भैरप्पांनी मुद्देसूद वर्णन केले आहे की जे वाचतांना वास्तवाची जाणीव व्हावी.

    कृष्ण द्वैपायन यांच्या आश्रमात धर्म आणि अधर्म काय, नियोगाने जन्मलेली संतती राज्य करण्यास अधिकारी नाहीत का, याचे उत्तर शोधण्यास युद्धाच्या दोन दिवस आधी गेलेले भीष्म, तिथे  मृत्यू बद्दलचे विचार, जगणं,जन्म या गोष्टीचे कुठे आणि कसे महत्त्व आहे याबद्दल भैरप्पांनी मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार मांडले आहेत. द्रोणाचार्य यांचेही मनात असेच विचार येतात. वास्तविक पाहता खुद्द धृतराष्ट्र आणि पांडू हे नियोगानेच झालेले वारसदार होत. तरीही दुर्योधन पांडवांना अनौरस ठरवून राज्याचा अधिकार नाकारतो. द्रोणांना सतत असे वाटत राहतं आपण कोणाचे बाजूने लढतो आहे, धर्म की अधर्म. यावरचे उलटसुलट विचारच त्यांना युध्दास प्रवृत्त कसे करतात कर्णाचे जन्मरहस्य ऐन युद्धाच्या आधी सांगून त्याला पांडवांचे बाजूने लढायला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणारा कृष्ण, कुंती.एकलव्याची गुरुनिष्ठा, अर्जुनावरचा आकस, अशा सगळ्याच घटना भैरप्पांनी  मानवी जीवनात जशा असतील किंवा असू शकतात याचा विचार करतच प्रत्येक पात्रांचे मनात शिरून त्यांना बोलते केले आहे. चमत्कार, मंत्रतंत्र, शाप, यांच्या पल्याड जाऊन मानवी जीवनास अनुसरून पर्व लिहिले आहे. काही गोष्टी अशा आहेत की आपल्या मनाला पटत नाही म्हणण्यापेक्षा आपलं मन मान्य करत नाही. कृष्णाने सांगितलेली गीता, विश्वरूप दर्शन वगैरे काहीच आपणास इथे दिसत नाहीत. शरपंजरी उत्तरायणाची वाट पाहणारे भीष्म वाचायची, ऐकायची सवय असलेल्या मनाला भीष्मांनी शेवटी अन्न त्याग करून मृत्यूकडे केलेली वाटचाल या सगळ्या अनाकलनीय गोष्टी वाटतात. 

    भैरप्पांनी एक तत्वचिंतक या दृष्टिकोनातून लिहिलेली पर्व म्हणूनच मनाला भावते. एकदा वाचून समाधान होत नाही. सातशे पृष्ठाची ही कादंबरी सुरवातीपासून मनाचा ठाव घेत पुढे सरकत जाते. मध्ये मध्ये "म्हणे म्हणे" नकोसे होते.

    एकदा वाचून समाधान होतच नाही म्हणण्यापेक्षा पुन्हा पुन्हा वाचली तर प्रत्येकवेळी नक्कीच काहीतरी नवीन गवसेल अशी ही पर्व.


रसिका राजीव हिंगे

    

    

    

    

    

    

    

    

    

Friday, 27 May 2022

मृदगंध


सरसर शिरवे धरणीवरती

भिजले तनमन भिजली माती

ठायी ठायी गंध सोहळे

मृदगंधाने क्षण बहरती


मेघ सावळे वेगे धावत

प्रीत  बावरे कुणा शोधती 

लखलखीत त्या सौदामिनीस

का सरसरत्या जलधाराती


मेघ मृदंग  नादत दिड धा

ताल धरीत चपला नृत्यती

भिरभिर करतो शीतल वारा

उडवित नेई मृदगंध सारा


मृदगंधाने न्हाली सृष्टी

लेऊन आली रूप आगळे

राधा धारा शोधत येई

जलदांमधले रूप सावळे


©®रसिका राजीव हिंगे












Monday, 23 May 2022

....शेवटी राहूनच गेलं

 


     आभाळ काळ्या मेघांनी भरून आलं होतं. केव्हाही पाऊस धारा कोसळतील असे वाटत होते. मनाचीही हीच स्थिती होती. आत बाहेर सारखेच वातावरण होते. पावसा आधीचे हे साचलेले काळे मेघ पहात उर्मी सौधावर उभी होती. मधूनच येणारा गार वारा सुद्धा तिला नकोसा झाला होता.

     आयुष्य जगत असताना कितीतरी घटना, प्रसंग असे येतात की ते कायमचे मनावर परिणाम करून जातात. कितीही विसरू म्हटले तरी विसरता येत नाही.  उर्मीच्या ही मनात असेच वादळ उठले होते. 

     तिचा सखा सौमित्र तिची अनुमती गृहीत धरून जेष्ठ बंधुसमवेत वनात निघून गेला होता.नवपरिणीत  उर्मी राजवाड्यात प्रवेश करताना सप्तरंगी स्वप्न घेऊन आली होती. ती सगळी तशीच स्थिर,निःशब्द, अबोल झाली होती.  चौदा वर्षे वाट पाहणे याशिवाय काहीच हातात उरले नव्हते. कसा खेळ मांडला होता न नियतीने!  असे का व्हावे हे तिला कळत नव्हते. 

     जेष्ठ बंधू त्याच्या भार्येसह वनात गेला होता. तिचा हट्ट म्हणा किंवा तिचे संचित असे की निदान तिला पतिसेवेची संधी तरी प्राप्त झाली होती. पण मी कसे आवरू या मनाला. माझे संचित काय आहे. खूप आनंद झाला होता आपसातील बंधुप्रेम पाहून. सौमित्राने हे सेवेचे व्रत आचरले होते त्याचा मला किती अभिमान होता. त्याला सर्वोतोपरी सहाय्य करायचे, त्यासारखेच सेवाव्रत आचारायचे असे ठरवूनच मी त्याचा हात धरून आले होती. पण यामध्ये मी कुठेच नाही, माझेच मला जगायचे आहे, माझा मार्ग मीच आखायचा आहे हे तर मला माहीतच नव्हते. आईवडिलांच्या प्रेमळ छत्रछायेत बालपण ल्यायलेली मी तारुण्यात असा एकटीचा प्रवास असेल असे वाटलेच नाही. 

     राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी सगळी नगरी सजली होती, आनंदात डुंबत होती. प्रत्येकाच्या देहबोलीत, चेहऱ्यावर आनंदाचे  तुषार थुईथुई नाचत होते. कोपऱ्यात बसलेली नियती मात्र खदाखदा हसत होती. विचित्र दैवाचा घाला होता तो जो सगळ्यांना दुःख सागरात बुडवून गेला. वचन पुर्ततेची किंमत राजाला अश्याप्रकारे मोजावी लागली होती.  चौदा वर्षे वनवास. 

     पण माझे सगळे आयुष्य पणाला लागले होते जणू. चौदा वर्षानंतर तरी मला सौमित्राची साथ मिळेल, स्वप्नपूर्ती होईल या आशेवर जगत होते. पण राम राज्याची धुरा सांभाळणारा हा ध्वजदंड सौमित्र सेवेत कुचराई केली या आरोपाखाली दुर्वासाचा शाप त्याला माझ्यापासून हिरावून घेऊन गेला.

     आयुष्य भर ज्याच्यासाठी जगले त्या सौमित्रासवे आनंदाच्या हिंदोळ्यावर प्रीतीचे सोहळे साजरे करायचे शेवटी राहूनच गेले...... 


©रसिका राजीव हिंगे

     

     

     

Tuesday, 10 May 2022

सुट्टीचे आत्मवृत्त





चला सुट्टी झाली आता 

खूप खूप खेळायचे


    " कोण सारखं दार वाजवतंय? एकतर उन्हाची वेळ अन थोडा डोळा लागला तर सारखं खटखट, बेल का नाही वाजवत?" असा विचार करतच मी दार उघडले,

      " धन्यवाद ग सखी,मी आलेय बरं का?"

 " कोण ग तू? अन अशी एकदम घरात कशी आली?"

 "ओळखलं नाहीस ना मला ! मी सुट्टी. तुझ्याबरोबर गप्पा करायला आले आहे." 

अन मी ऐकत बसले सुटीच्या व्यथेच्या कथा.

    काय हे! सारखं दडपण येतं आजकाल मला. मुलांच्या मेळाव्यात रमणारी मी, पण नको वाटतं जायला. कुणी वेळच देत नाही मला. पूर्वी किती छान होतं न सगळं. माझी वाट पहायची मुले. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी तर नुसता गोंधळ असायचा. प्रत्येक जण आनंदाने गात असायचा

     चला सुट्टी झाली आता 

      खूप खूप खेळायचे

      उन्हाळा म्हणजे सुटीचा ऋतू असे जणू समीकरणच वाटे मला. ग्रीष्मातील उन्हाचा बाऊ न करता त्याला सामोरं जात उंडारत असत बालगोपाल. मित्र मैत्रिणी, दादा-ताई, छोटू गोटू, बाळ्या, बेबी सारेच असायचे दुपारचे एकत्र. काय काय खेळाचे न! पत्ते सूर पारंब्या, विटीदांडू तर कधी बंदी साखळी, दोरीवरच्या उड्या आणि थकले भाकले की झाडाच्या सावलीत रंगायचा चम्पूल.  दुपार कधी निजलीच नाही मी  असतांना. धमाल तर असायचीच पण त्याचबरोबर वाचनवेडे वीर एखादा कोपरा शोधून वाचत बसायचे तासनतास. मुलांना सुट्टी लागली म्हणजे घराघरातून सहलीचे, तीर्थयात्रेचे बेत आखले जायचे, घरात लग्न  तर जाणून उन्हाळ्याच्या सुटीत काढायचे. महोत्सव भासायचा हा लग्नसोहळा.

         पण आता मला असे काही दृश्य पहायला मिळत नाही. मला आठवतं पूर्वी मी येणार म्हणजे सगळं घरदार हसत आनंदाने माझं स्वागत करायचे. पण आजकाल मी येणार म्हणजे पालकांची डोकेदुखी वाढत जाते. पूर्वी मोठे कुटुंब असायचे, शिवाय आई नोकरी करणारी असेलच असे नाही. उलट सुटी म्हणजे चला आता मुलांच्या अभ्यासातून सुटका. थोडा निवांतपणा यायचा. आजकाल तसे नाही न! छोटे कुटुंब, दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे मी येणार म्हणजे यांची तारांबळ उडणारच. दिवसभर नसले तरी किमान चार पाच तास तरी मुलांना अडकविणे आवश्यक आहे असे वाटू लागले आणि यातून जन्म झाला छंद वर्ग आणि संस्कार वर्ग. आईबाबा ही सुटले आणि काम करणाऱ्याला काम मिळाले. पण खरंच असे एक महिन्याचे संस्कार वर्ग घेऊन होतात का संस्कार?  हे असे  छंद वर्ग म्हणजे एक टास्क आहे मुलांसाठी  हा ही अभ्यासक्रम आहे करियर च्या दृष्टीने असेच वाटते मुलांना. पूर्वी मी आली की मामा ,मावशी, आत्या यांच्याकडे जाणे व्हायचे, किंबहुना सुट्टीच यासाठी असते असे गृहीत धरलेले असायचे. हे नात्यांचे बंध जोपासायचे बाळकडू असे लहानपणापासून दिले जायचे. सोबत राहणे, मदत करणे, घासातला घास देणे म्हणचे आजच्या भाषेत शेअरिंग करणे हा पण एक संस्कार च होय अगदी नकळतपणे केलेला आणि कोणतीही फी न आकारता. उलट प्रेमाची, वात्सल्याची देवाणघेवाण होई, सहवास मिळत असे , त्यामुळेच नाते घट्ट विणले जात असे.

         गेल्या दहा पंधरा वर्षापासून मला येऊच द्यायचे नाही असा जणू चंग बांधला आहे की काय न जाणे. कारण वार्षिक परिक्षा संपते न संपते तोच पुढच्या इयत्तेचा अभ्यासक्रम सुरू होतो. प्रचंड स्पर्धा वाढली आहे. जो तो फक्त पळत सुटला आहे. हे पण पहात नाही की आपण ज्या वाटेने चाललो आहे ती आपल्यासाठी योग्य आहे की नाही. पुढे किती खाचखळगे आहेत हे जरी माहीत नसले तरी स्वतःच्या ताकदीचा,आवडीचा विचार करणे गरजेचे आहे. 

         तंत्रज्ञान प्रगत झालं त्यामुळे त्याच्या अनुषंगाने सगळेच प्रगत होणे गरजेचे आहे आणि हा अपरिहार्य बदल स्वीकारणे मला तसे जड गेले नाही. प्रत्येक पिढीतील बदल काळानुरूप  हळूहळू अंगवळणी पडतात. पण दिवसेंदिवस घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे झाले आहे. मुलांनी प्रत्येक क्षेत्रात पारंगत असावे हा जो अट्टहास आहे तो फार घातक आहे असे आता वाटायला लागले. माझ्या सहवासात बालगोपाल किती खुश असायचे. आताही असतात पण जे स्वरूप  बदलले आहे ते कुठेतरी काहीतरी चुकते आहे, मुलांच्या मनाचा, त्यांच्या भावनांचा, त्यांच्या ताकदीचा,आवडीचा विचार न करता माझा जो उपयोग होतो आहे त्यामुळे मला फार अस्वस्थ वाटतं, अन काळजी पण.

            या दोन वर्षात तर सुट्टी असते शाळा संपल्यावर हेच सगळे विसरून गेले आहेत. कारण कोविड मुळे घरातच शाळा, ती पण मोबाईल वरच. इंटरनेट बंद झाले की शाळा बंद. नको ते खेळ मोबाईलवर खेळून अक्षरशः वेळ घालविणे हा प्रकार. याला काही अपवाद असतील ही. प्रत्येक नियमाला अपवाद असतोच तसा. पण सर्वसाधारण पणे मोबाईल आणि विद्यार्थी हे मला पचनी पडत नाही अजून.

      जुनं ते सोनंच  असं मला म्हणायचे नाही. काळा बरोबर सुधारणा होणे गरजेचे आहे. पण प्रगतीच्या झोतात सगळंच वाहून जायला नको न असे मला वाटतं. नर्सरी पासून तर बारावी पर्यंत सगळेच माझे सखसोबती. त्यांच्याबरोबरच आईबाबा, आजी आजोबा सगळेच मला हवेहवेसे. सुकोमल  असले तरी उद्याच्या राष्टाचे भविष्य आहे, म्हणूनच त्यांना कणखर होण्यासाठी माझी गरज आहे म्हणजे त्यांच्या व्यस्त अभ्यासक्रमात मी म्हणजे एक विरंगुळा आणि अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी वेगळे शिकण्यासाठी मिळालेला वेळ. आयुष्याच्या वाटेवर चालतांना मुलांबरोबर सगळ्यांनाच थोडी तरी उसंत मिळावी, पुन्हा नव्या उत्साहाने  पुढे चालता यावे यासाठी निसर्गाने माझी निर्मिती केली. प्रत्येक गोष्ट कारण असल्याशिवाय आणि अर्थ असल्याशिवाय परमात्म्याने निर्माण केली नाही.मी म्हणजे तुमची बॅटरी चार्ज करणारी विद्युलता आहे.  या सवडीच्या झुल्यावर मस्त हिंदोळे घेता घेता किती तरी ज्ञानकण वेचले जातात हे कळत ही नाही. 

      ह्या सुट्टीचे मर्म जाण तू बाळा

      झुलविन  रे ज्ञानाचा हिंदोळा

      तुझ्या संगती खेळता खेळता

      घडवू आपण भारत वेगळा

      

      किती किती फायदे आहेत न, तरी मला का सगळे विसरत चालले आहेत. कागदोपत्री मी असतेच पण प्रत्यक्ष मात्र कुणी पहातही नाही ग माझ्याकडे. हीच खरी माझी व्यथा आहे....

   

© रसिका राजीव हिंगे