Friday, 29 January 2021

चित्र ललित तिरंगा


सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा

हम बुलबुलें हैं इसकी, यह गुलिस्ताँ हमारा


     किती सुंदर ओळी आहेत या. खरे ही आहे न हे. साऱ्या सृष्टीवर माझ्या भारतासारखा सुंदर देश कोणताच असू शकत नाही. अंतराळात राकेश शर्मा असतांना इंदिराजींनी प्रश्न विचारला होता "उपरसे अपना देश कैसे दिखता है?" क्षणाचा ही विलंब न करता उत्तर आले होते "सारे जहाँ से अच्छा". 

     तिरंगा भारतीय राष्ट्रध्वज केशरी,पांढरा आणि हिरव्या रंगाचा, मध्ये अशोक चक्र असलेला फक्त भारतीयांचे प्रतीक,भारतीयांचे प्रतिनिधित्व करणारा, भारतीयांची शान, मान असलेला असा तिरंगा. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेला तिरंगा. 

     ह्या देशाचा तिरंगा जेव्हा गगनाला गवसणी घालत उंचावर फडकतो तेव्हा सगळ्या भारतीयांचे उर अभिमानाने भरून येतात, नकळत एक कडक सलामी तिरंग्यास दिली जाते. स्वातंत्र्य यज्ञात ज्यांनी आपल्या जीवनाच्या समिधा अर्पण केल्या त्यांच्यासाठी नतमस्तक व्हायला होतं.

     देशप्रेमाचे बाळकडू लहानपणापासून च मिळालेले. शाळेत ते वाढत जातं. मंगल पांडे पासून तर अगदी स्वा. सावरकरांपर्यंत सगळ्या कथा पुस्तक वाचूनच देश काय आहे हे कळत गेले. देशासाठी यांनी किती मोठे कार्य केले आहे. स्वतःचे आयुष्य पणाला लावले. घरादाराची राखरांगोळी झाली तरी देशासाठी लढणारे लढतंच राहिले. एकच ध्येय उराशी बांधून भारतमातेचे स्वातंत्र्य.

     देशासाठी लढतांना कावळ्या चिमणीचा संसार केला नाही म्हणून आज आपण आपला संसार सुखाने करतो आहे. आसेतु हिमाचल आज तिरंगा डौलाने फडकतो आहे, याला उंचावर नेणारे मात्र अमर हुतात्मे झाले.वि. म. कुलकर्णी म्हणतात तसेच

           हा राष्ट्रध्वज साक्षीला

           करू वंदन करू याला

          जयगीत गाऊया अपुले

          ते देशासाठी लढले 

     या देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या, तिरंग्याची शान, मान उंच करणाऱ्या या स्वातंत्र्यवीरांचे, हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देणे हे आपल्या हाती आहे आता. त्यांचेच पावलावर पाऊल ठेवून आपण आपल्या देशाचे रक्षण करणे गरजेचे आहे, ते आपले कर्तव्य आहे.    

      डौलात फडकतो तिरंगा उंच आभाळी

     भाग्यवंत सारे स्वातंत्र्य आमुच्या भाळी

     वारसाने लाभले आपणास स्वातंत्र्य

     महासत्ता करू या आपले भारत तंत्र


     या माझ्या देशाच्या तिरंगा ध्वजास शतशः नमन


रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment