Thursday, 30 March 2023

 नमस्कार श्रोते हो,

अपूर्ण ते पूर्ण आणि आर्या वृतात श्री रामायण  या दोन्ही ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा करण्याचे ठरविले तेव्हा उगाचच माझ्या मनात एक विचार येऊन गेला की जेव्हा या पुस्तकाचे बीज यांच्या मनात रोवले गेले असेल त्यावेळी  चित्रगुप्त आणि श्रीविष्णु यांच्यामध्ये काय आणि कोणता संवाद झाला असेल याचे चित्र माझ्या डोळ्यासमोर आले.

भगवान विष्णू क्षीरसागरात शेषावर पहुडले आहेत, लक्ष्मी आहेच पायाशी, तेवढ्यात घाईघाईने चित्रगुप्त  श्रीविष्णूच्या दालनात प्रवेश करतात.

"या चित्रगुप्त, आसनस्थ व्हा. कसे आलात?"

"देवा, साधना डोंगरे नी VRS घेतली!"

" माहित आहे आम्हाला, तसचं ठरलं होतं."

"आता काय करेल ? बँके चा वेळ कसा जाईल!"

" आमचा शोध घ्यायला सांगितला आहे आम्ही"

ताडकन चित्रगुप्त आसनावरून उठून उभे राहिले.

"माधवा, हाय टेंपर आहे ती"

"मीच लिहून दिलेले मलाच का ऐकवता आहात तुम्ही चित्रगुप्त.? काळजी नसावी. आम्ही आहोत तिच्याबरोबर. अपूर्णते कडून पूर्णते कडे जायचे आहे ना तिला. सतीश ला आज्ञा केली आहे मदत करण्यासाठी. अन् बाकी आहेतच सगळे प्रोत्साहन द्यायला."

"पण तरी देवा तिची साधना पूर्ण होईल की नाही...

चित्रगुप्ता ला मध्येच थांबवत भगवंत म्हणाले,

"आम्हाला सोबत करावीच लागेल. कारण आमचं स्मरण जे करतात त्यांच्या सोबत आम्ही असतोच हे माहीत आहे की विसरलात तुम्ही?"

"होय देवा, आता तुम्ही सोबत आहे म्हणजेच पूर्ण गवसणारच न!"

एवढे सगळे बोलणे झाल्यावर ही चित्रगुप्त आसनावरून हलले नाही. भगवंत डोळे मिटून पहुडलेले होते. 

"काय झालं चित्रगुप्ता? अजून तुम्ही इथेच. काय अडचण आहे आता?"

"केशवा, सुषमा खानापूरकर . तिचं काय देवा. संसार पाशात पुन्हा गुरफटत चालली आहे."

आता मात्र भगवंत ताडकन उठून बसले. चित्रगुप्ता वर आपली नजर रोखून म्हणाले,

"चित्रगुप्ता, आम्ही सगळं तुम्हाला लिहून दिलेले असतं तरीही तुम्हाला या अडचणी येतात कशा?.  आमच्याकडे तक्रार घेऊन येण्या आधी किंवा कोणाचे काही विचारण्या आधी त्यांचे बद्दलचे वाचून घेत जा. कळल.? 

सुषमा खानापूरकर. कोण समजता तुम्ही तिला. तिची अध्यात्मिक बैठक किती उंचावर आहे माहित आहे न तुम्हाला!"

" मुरलीधरा, वैद्यकीय क्षेत्र ही सोडून दिलं तिने"

" चित्रगुप्ता, आर्या वृत्तात आमचा रामावतार गुंफायला सांगितला आहे आम्ही तिला."

"कठीण आहे देवा, कसं होईल हे लिहून, नातीशी खेळत बसते देवा ती!

"चित्रगुप्त नीट ऐका, तिची सगुण आणि निर्गुण भक्ती दोन्ही आम्हाला भावतात. शिवाय सद्गुरू उभे आहेत पाठीशी. आमचे तसे कामच नाही यासाठी. तरीही 

थोडा त्रास घेतला आम्ही म्हणजे असा की साधना मार्फत सूचना द्यावा लागल्या, विदुलाला ही सांगितले सांग बाई तिला काही, नलु साठी आर्या लिहिते तर आमच्यासाठी पण लिही. आम्ही भक्तांसाठी करतो सगळं चित्रगुप्त. शेवटी हे होणार होतेच पण इतरांना ही भार उचलायला लावला थोडा."

" असं होय. तुम्ही असल्यावर काय देवा,कमतरता नाहीच कशाची. आज अपूर्ण ते पूर्ण चा आणि आर्यावृत्तात श्री रामायण या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आहे. तुम्ही जाणार असाल च ना तिथे."

"म्हणजे काय? आमची उपस्थिती आहेच तिथे."

" मधुसूदना, एकच विचारतो, भेटले का तुम्ही साधनाला? तुमचा शोध घ्यायला सांगितला होता ते"

" पुस्तकात आमची पूर्तता करून दिली चित्रगुप्ता, पण वास्तवात ती अडकली आहे आर्या, विहान मध्ये."

"देवा, ही कोणती सौंदर्य स्थळं?"

" म्हणून सांगतो आम्ही तुम्हाला नीट लक्ष ठेवा. कर्माचा हिशोब नीट ठेवा. तुमच्या कॉम्प्युटरचे formatting करून घ्या."

"देवा, सगळं व्यवस्थित आहे. मी वाचूनच आलो होतो. पण ते सौंदर्य स्थळे नाही समजली म्हणून आलो होतो विचारायला."

भगवंतांनी आपले नेहमीचे मोहक हास्य केले, अन् चित्रगुप्त ला आज्ञा दिली,

"ठीक आहे. या आता."


ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।


पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।


ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ।


रसिका राजीव हिंगे


श्रीराम जानकी संवाद..

 



श्रीराम शांत बसले होते. पण मन अशांत होते. काय करावे कळत नव्हते. त्रेता युगात आपण होतो तर  अराजकता माहीतच नव्हती काय आहे. कली चे प्राबल्य वाढणार होतेच, पण इतके वाढेल असे वाटले नव्हते. याच विचाराने श्रीराम अस्वस्थ झाले होते. तेवढ्यात सीतामाई आल्या आणि श्रीरामांना अस्वस्थ पाहून त्यांना काळजी वाटायला लागली. सीता त्यांच्या बाजूला बसली तरी रामाचे लक्ष नव्हते.

"नाथ, कसला विचार करता आहात आपण?"

वैदेहीच्या आवाजाने राम भानावर आले. उगाचच इकडे तिकडे पाहिल्या सारखे करून म्हणाले,

"जानकी केव्हा आलीस तू इथे? माझे लक्ष नव्हते बरे."

"तेच म्हणते आहे मी, कशाचा विचार सुरू आहे तुमचा?

पुन्हा पृथ्वी वर जाण्याचा विचार तर करत नाही न तुम्ही!"

"नाही. सीते, ती वेळ अजून आली नाही. पण खूपच त्रास होतो आहे ग, पृथ्वीवर सगळीकडे कलीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतोच आहे. लोकांची ईश्वर निष्ठा कमी होत चालली आहे."

"पण आपण काय करू शकणार यामध्ये. प्रत्येकाला त्याचे प्रारब्ध नुसार जगावेच लागेल नाथ!"

"जानकी, तू म्हणते ते खोटे आहे असे मला म्हणायचे नाही,पण आपल्यालाच काहीतरी करावे लागेल असे दिसते आहे."

"आपण केले न कृष्णावतारात. त्यासाठी तो अवतार होता. दुष्टांचे निर्दालन आणि सज्जनांचे रक्षण."

"वैदेही ते द्वापार युग होते. आता कलियुग आहे."

"ते ही खरेच आहे म्हणा. नाथ, एक सांगू का? तुम्हाला राग येणार नसेल तर?"

"कल्याणी, काय हा प्रश्न तुझा. मी कधी रागावलो का तुझ्यावर!"

"तसं नव्हे आर्य, पण तुमच्या भक्तांना काही बोललेले तुम्हाला चालत नाही म्हणून विचारले. आजची जी ही पिढी आहे न देवा, ती फार आळशी आहे. सगळं त्यांना तयार म्हणजे इन्स्टंट हवं असतं. थोडा त्रास झाला की लगेच त्यांचा अहंकार दुखावतो."

"तसे नाही शुभानने, कृष्णावतरात गीता सांगताना सांगितलेले अर्धवट आचरणात आणतात. आता बघ न

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्‌ । साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ 

यामध्ये त्याचा असा समज आहे की कसेही वागलो तरी आपल्या उद्धार होईलच. पण सगळे फक्त अपि चेत्सुदुराचारो आणि पुढचे साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः एवढेच घेतात. मधले भजते मामनन्यभाक्‌ हे विसरतात. मला जो अनन्य भावाने शरण येईल तोच माझा भक्त हे विसरून जातात आहे."

"पण स्वामी यावर काहीतरी मार्ग काढावा लागेल.

श्रीराम काहीच बोलत नाही. पुन्हा आपल्याच विचारात हरवून जातात. 

"वैदेही, लक्ष्मणाने आखून दिलेल्या रेषेच्या बाहेर तू आलीस म्हणून तुझे हरण झाले,अन्यथा झालेच नसते. पण इथे किती रेषा आखणार अन् कसे वाचविणार माता भगिनींना? प्रत्येक पावलावर इथे दशानन उभा आहे. श्रध्दाच जिथे निर्भया होते तिथे यापरिस वेगळे काय घडणार ग."

"रघुकुल भूषण राघव आज चिंताक्रांत पाहून मलाही भीती वाटली क्षणभर. नाथ, अजिबात घाबरु नका. आज पृथ्वी वर तुमच्या जन्मभूमी वर तुमचे मंदिर उभे राहते आहे. कशाच्या बळावर देवा. ही माणसं तुमच्या भक्तीच्या बळावरच हे मंदिर उभे करतात आहे न. सगळे विरोध बाजूला सारून ही संघटीत शक्ती बघा राघवा, म्हणजे कळेल तुम्हाला 

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥ 

यावरच ही शक्ती उभी आहे. आता सगळे विचार सोडून यांच्या पाठीशी तुम्हाला उभे राहायचे आहे."

"सीते अगदी बरोबर आहे, यांना भासवायचे आहे की मंदिर त्यांनीच उभे केले."

"राघवा, नेहमी तुम्हीच बोलता तेच मी आज तुम्हाला सांगते, प्रत्येकाचं प्राक्तन जसे असेल तसे भोग भोगावे लागतील हे खरे असले तरी अनन्य भावाने तुम्हाला जो शरण येईल त्याचे प्राक्तन तुम्ही बदलवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे निसर्ग आहे हा त्याचे चाक तुम्ही फिरवता आहात, ते गोलच फिरते आणि पुन्हा पहिल्या बिंदू जवळ येतं. खरय ना हे."

"अगदी खरय कल्याणी हे, काही झाले तरी माझ्या भक्तांना त्रास झालेला मला चालणार नाही. त्यांच्या सेवेला मी स्वतः हजर असेन."

"आत्ता वाटतात  रघुकुल भूषण राजा राम."

श्रीराम आपल्या नेहमीच्या मोहक हास्यात सामावून गेले अन् सीतेला म्हणाले,

"चल जानकी, पृथ्वी वरचा माझा जन्म सोहळा पाहू या आणि सगळ्यांना पुन्हा सांगू या,

पत्रं पुष्पं फलं तोयं ये मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ll "


रसिका राजीव हिंगे 


Wednesday, 8 March 2023

चल खेळू या होळी

 #rasraj#holi#krushna




आला आला ग  कान्हा आला ग गोकुळी

चल चल ग सखे  चल खेळू या होळी

बघ तो नटवर गिरिधारी
रंगात रंगला कृष्ण मुरारी
हाती घेऊनी पिचकारी
मनभावन हा खेळी याची वेगळी
चल चल ग सखे  चल खेळू या होळी

वाट अडवितो नंदांचा नंदन
खोड्या करुनी पाहतो वदन
गोपांचा सखा राधेचा रमण
परी चाले मुजोरी याची सगळी
चल चल ग सखे  चल खेळू या होळी

कान्हा कान्हा जपता जपता
रंगात राधा रंगा पुजता
दिसे सावळा श्री सभोवता
अवघा रंग एक झाला किमया आगळी
चल चल ग सखे  चल खेळू या होळी

रसिका राजीव हिंगे
06.03.2023

Monday, 6 March 2023

सुगंधाचे लेणे


#rasraj #वसंत#काटेसावर #


पाचोळ्याचे पैंजण नादत शिशिर भिरभिरे चराचरी

आला आला वसंत आला चाहूल देत वेशीवरी ll धृ ll 


सुवर्ण चंपक गंध भारला सुखावतो गे मनोमनी

काटेसावर पळस लालसर फुलून आले रानीवनी

सौंदर्याची उधळण करतो रंग दाटसा गुलमोहरी

आला आला वसंत आला चाहूल देत वेशीवरी ll 1 ll 


आम्रतरुंचा मोहर गंधित ठायी ठायी दरवळला

मंद गारवा उनाड वारा शीळ वाजवित भरारला

धुंद मोगरा अत्तर उडवित विहरे सावळ धरेवरी

आला आला वसंत आला चाहूल देत वेशीवरी ll 2 ll 


रसिका राजीव हिंगे 





नाम बाधा

 



काळजी नको करूस बाळा साद आली स्वामी
वेदना ती मम हृदयाची हो कशी कळे निजधामी

आर्तता, अर्थार्थी, जिज्ञासू  न ध्याती वीण काजा
स्मर्तृगामी  ब्रीद राखीसी तू एक  दत्त राजा

धावत येता भक्तजनांसी सांभाळाया नाथा                            

वात्सल्याने अंकी बसवून जोजविता गुरुनाथा

व्यथेतून का जन्म होतसे नाम जपाचा अवधूता
म्हणुनी वदली पृथा माधवा दुःख दे यदुसूता

आवर सावर माया सारी ओठी येउ दे नाम
प्रल्हादासम अंत:करणी साठवू दे तव नाम

गुरुनाथाच्या कृपा सावलीत कोण करेल बाधा
सारे विसरुन व्हावी दत्ता  गुरुनामाची बाधा

रसिका राजीव हिंगे
05.03.2023