Sunday, 29 May 2022

पर्व

 




    प्रत्येक मानव जन्माला येतांना त्याचे संचित, प्रारब्ध सोबत घेऊनच येतो, त्याला त्याच्या कर्मानुसार जगावेच लागते, तिथे पर्याय नाही हे पुन्हा प्रकर्षाने जाणवले जेव्हा डॉ. एस.एल. भैरप्पा यांची सौ. उमा कुलकर्णी यांनी भावानुवाद केलेली पर्व ही  कादंबरी वाचली  तेव्हा. 

    व्यास म्हणजेच कृष्णद्वैपायन यांनी लिहिलेल्या  महाभारता सारख्या महाकाव्यावर ही कादंबरी आहे. सतत बारा ते चौदा वर्षे या  विषयाचा अभ्यास केल्यानंतर भैरप्पा यांनी ही कादंबरी लिहिली. 

    महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही गुंतागुंतीची आहे. भैरप्पा यांनी त्या त्या व्यक्तिरेखा साकारताना त्यांच्या मनात जाऊन साकारल्या आहेत. कादंबरी ही पूर्णतः युध्दाभोवती फिरते आणि त्या त्या अनुषंगाने आलेले पात्र किंवा कथा मनाचा ठाव घेत पुढे सरकत जातात.

    युद्धासाठी भीम त्याचा मुलगा घटोत्कच याला आणण्यासाठी हिडिंब वनात निघाला असतांना द्रौपदी च्या मनाची अस्वस्थता, घालमेल म्हणजे भीम आता तिकडे गेल्यावर सालकटंकटी ला भेटेल, खूप दिवसांनंतर तो तिच्याकडे निघाला आहे परत येईल का, या आणि अशा प्रकारच्या स्त्रीसुलभ भावना तिच्या मनात येतात त्यामुळे तिची जी अस्वस्थता आहे ती भीमाने स्वतः समजून घ्यावी अशी तिची इच्छा असते. 

    कुंतीचे पाच ही पुत्र कसे झाले त्याची सर्वसामान्य  जनमानसात जशी धारणा असते किंवा समज आहे  म्हणजे मानवी भावभावनांशी समरस होईल असे मांडले आहे. कंसाच्या जन्मकथा सांगून आर्य, अनार्य, यांच्यातील वर्णसंकर कसा झाला किंवा कंस असा का राक्षसी वृत्तीचा होता याचे भावविश्लेषण पटत जातं आणि असेच असेल का असा विचार करायला मन प्रवृत्त होतं. धृतराष्ट्र आणि त्याच्या दासी, त्यांचे पुत्र. गांधारीने फक्त चौदा पुत्र आणि एक कन्या यांनाच जन्म आहे, बाकी सगळे धृतराष्ट्राचे दासी पुत्र असे कौरव शंभर झाले. 

    शल्य राजाची मुलगी हिरण्यवती वयात आलेली आहे, दारावर आलेल्या नाग लोकांतील एका बासरी वादकासोबत ती निघून जाते, द्रौपदी स्वयंवर, अर्जुनाने जिंकून आणलेली द्रौपदी पाच जणांमध्ये वाटण्याचे मुख्य कारण म्हणजे  पाचही पुत्रांना एकत्र बांधून ठेवता येईल. यासाठी कुंतीने केलेली पांचालीची मनधरणी,  पांडवांचा वनवास, इंद्रप्रस्थाची स्थापना, द्रौपदीची भर सभेत झालेली विटंबना, धृतराष्ट्र चे कपटी राजकारण, द्रौपदी ला धृतराष्ट्राने दिलेले वर , अर्जुनाचा सुभद्रेसोबत झालेला  विवाह याचे  बारकाईने आणि सूक्ष्म वर्णन भैरप्पांनी केले आहे.  व्यक्तिरेखा साकारताना त्या त्या ठिकाणची भौगोलिक स्थिती, वातावरण, याचेही तपशीलवार वर्णन भैरप्पांनी केले आहे.

    युद्धाचे वर्णन म्हणजे फक्त पराक्रम, जय पराजय असे नाही. अठरा अक्षोहिणी सैन्य असलेले हे युद्ध होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमा झालेल्या सैन्याला अन्नाची रसद पुरविणे, पाणीपूरवठा , त्याच्या मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था, हत्ती,घोडे यांची मलमूत्रामुळे युद्धभूमीवर पसरलेली दुर्गंधी, मोडलेले रथ, बाणांचे तुकडे,  मेलेल्या सैन्याच्या रक्तमासांचा खच, त्यामुळे तेथे जमलेल्या रान गिधाडांचा होणारा त्रास हे सगळं वाचतांना रणभूमी अक्षरशः डोळ्यासमोर उभी राहते. काय दैन्यावस्था झाली असेल त्यावेळी सामान्य सैनिकांची. सर्वनाश करणारे महाभयंकर असे हे युद्ध याचे व्यावहारिक दृष्टिकोणातूनही भैरप्पांनी मुद्देसूद वर्णन केले आहे की जे वाचतांना वास्तवाची जाणीव व्हावी.

    कृष्ण द्वैपायन यांच्या आश्रमात धर्म आणि अधर्म काय, नियोगाने जन्मलेली संतती राज्य करण्यास अधिकारी नाहीत का, याचे उत्तर शोधण्यास युद्धाच्या दोन दिवस आधी गेलेले भीष्म, तिथे  मृत्यू बद्दलचे विचार, जगणं,जन्म या गोष्टीचे कुठे आणि कसे महत्त्व आहे याबद्दल भैरप्पांनी मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार मांडले आहेत. द्रोणाचार्य यांचेही मनात असेच विचार येतात. वास्तविक पाहता खुद्द धृतराष्ट्र आणि पांडू हे नियोगानेच झालेले वारसदार होत. तरीही दुर्योधन पांडवांना अनौरस ठरवून राज्याचा अधिकार नाकारतो. द्रोणांना सतत असे वाटत राहतं आपण कोणाचे बाजूने लढतो आहे, धर्म की अधर्म. यावरचे उलटसुलट विचारच त्यांना युध्दास प्रवृत्त कसे करतात कर्णाचे जन्मरहस्य ऐन युद्धाच्या आधी सांगून त्याला पांडवांचे बाजूने लढायला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणारा कृष्ण, कुंती.एकलव्याची गुरुनिष्ठा, अर्जुनावरचा आकस, अशा सगळ्याच घटना भैरप्पांनी  मानवी जीवनात जशा असतील किंवा असू शकतात याचा विचार करतच प्रत्येक पात्रांचे मनात शिरून त्यांना बोलते केले आहे. चमत्कार, मंत्रतंत्र, शाप, यांच्या पल्याड जाऊन मानवी जीवनास अनुसरून पर्व लिहिले आहे. काही गोष्टी अशा आहेत की आपल्या मनाला पटत नाही म्हणण्यापेक्षा आपलं मन मान्य करत नाही. कृष्णाने सांगितलेली गीता, विश्वरूप दर्शन वगैरे काहीच आपणास इथे दिसत नाहीत. शरपंजरी उत्तरायणाची वाट पाहणारे भीष्म वाचायची, ऐकायची सवय असलेल्या मनाला भीष्मांनी शेवटी अन्न त्याग करून मृत्यूकडे केलेली वाटचाल या सगळ्या अनाकलनीय गोष्टी वाटतात. 

    भैरप्पांनी एक तत्वचिंतक या दृष्टिकोनातून लिहिलेली पर्व म्हणूनच मनाला भावते. एकदा वाचून समाधान होत नाही. सातशे पृष्ठाची ही कादंबरी सुरवातीपासून मनाचा ठाव घेत पुढे सरकत जाते. मध्ये मध्ये "म्हणे म्हणे" नकोसे होते.

    एकदा वाचून समाधान होतच नाही म्हणण्यापेक्षा पुन्हा पुन्हा वाचली तर प्रत्येकवेळी नक्कीच काहीतरी नवीन गवसेल अशी ही पर्व.


रसिका राजीव हिंगे

    

    

    

    

    

    

    

    

    

Friday, 27 May 2022

मृदगंध


सरसर शिरवे धरणीवरती

भिजले तनमन भिजली माती

ठायी ठायी गंध सोहळे

मृदगंधाने क्षण बहरती


मेघ सावळे वेगे धावत

प्रीत  बावरे कुणा शोधती 

लखलखीत त्या सौदामिनीस

का सरसरत्या जलधाराती


मेघ मृदंग  नादत दिड धा

ताल धरीत चपला नृत्यती

भिरभिर करतो शीतल वारा

उडवित नेई मृदगंध सारा


मृदगंधाने न्हाली सृष्टी

लेऊन आली रूप आगळे

राधा धारा शोधत येई

जलदांमधले रूप सावळे


©®रसिका राजीव हिंगे












Monday, 23 May 2022

....शेवटी राहूनच गेलं

 


     आभाळ काळ्या मेघांनी भरून आलं होतं. केव्हाही पाऊस धारा कोसळतील असे वाटत होते. मनाचीही हीच स्थिती होती. आत बाहेर सारखेच वातावरण होते. पावसा आधीचे हे साचलेले काळे मेघ पहात उर्मी सौधावर उभी होती. मधूनच येणारा गार वारा सुद्धा तिला नकोसा झाला होता.

     आयुष्य जगत असताना कितीतरी घटना, प्रसंग असे येतात की ते कायमचे मनावर परिणाम करून जातात. कितीही विसरू म्हटले तरी विसरता येत नाही.  उर्मीच्या ही मनात असेच वादळ उठले होते. 

     तिचा सखा सौमित्र तिची अनुमती गृहीत धरून जेष्ठ बंधुसमवेत वनात निघून गेला होता.नवपरिणीत  उर्मी राजवाड्यात प्रवेश करताना सप्तरंगी स्वप्न घेऊन आली होती. ती सगळी तशीच स्थिर,निःशब्द, अबोल झाली होती.  चौदा वर्षे वाट पाहणे याशिवाय काहीच हातात उरले नव्हते. कसा खेळ मांडला होता न नियतीने!  असे का व्हावे हे तिला कळत नव्हते. 

     जेष्ठ बंधू त्याच्या भार्येसह वनात गेला होता. तिचा हट्ट म्हणा किंवा तिचे संचित असे की निदान तिला पतिसेवेची संधी तरी प्राप्त झाली होती. पण मी कसे आवरू या मनाला. माझे संचित काय आहे. खूप आनंद झाला होता आपसातील बंधुप्रेम पाहून. सौमित्राने हे सेवेचे व्रत आचरले होते त्याचा मला किती अभिमान होता. त्याला सर्वोतोपरी सहाय्य करायचे, त्यासारखेच सेवाव्रत आचारायचे असे ठरवूनच मी त्याचा हात धरून आले होती. पण यामध्ये मी कुठेच नाही, माझेच मला जगायचे आहे, माझा मार्ग मीच आखायचा आहे हे तर मला माहीतच नव्हते. आईवडिलांच्या प्रेमळ छत्रछायेत बालपण ल्यायलेली मी तारुण्यात असा एकटीचा प्रवास असेल असे वाटलेच नाही. 

     राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी सगळी नगरी सजली होती, आनंदात डुंबत होती. प्रत्येकाच्या देहबोलीत, चेहऱ्यावर आनंदाचे  तुषार थुईथुई नाचत होते. कोपऱ्यात बसलेली नियती मात्र खदाखदा हसत होती. विचित्र दैवाचा घाला होता तो जो सगळ्यांना दुःख सागरात बुडवून गेला. वचन पुर्ततेची किंमत राजाला अश्याप्रकारे मोजावी लागली होती.  चौदा वर्षे वनवास. 

     पण माझे सगळे आयुष्य पणाला लागले होते जणू. चौदा वर्षानंतर तरी मला सौमित्राची साथ मिळेल, स्वप्नपूर्ती होईल या आशेवर जगत होते. पण राम राज्याची धुरा सांभाळणारा हा ध्वजदंड सौमित्र सेवेत कुचराई केली या आरोपाखाली दुर्वासाचा शाप त्याला माझ्यापासून हिरावून घेऊन गेला.

     आयुष्य भर ज्याच्यासाठी जगले त्या सौमित्रासवे आनंदाच्या हिंदोळ्यावर प्रीतीचे सोहळे साजरे करायचे शेवटी राहूनच गेले...... 


©रसिका राजीव हिंगे

     

     

     

Tuesday, 10 May 2022

सुट्टीचे आत्मवृत्त





चला सुट्टी झाली आता 

खूप खूप खेळायचे


    " कोण सारखं दार वाजवतंय? एकतर उन्हाची वेळ अन थोडा डोळा लागला तर सारखं खटखट, बेल का नाही वाजवत?" असा विचार करतच मी दार उघडले,

      " धन्यवाद ग सखी,मी आलेय बरं का?"

 " कोण ग तू? अन अशी एकदम घरात कशी आली?"

 "ओळखलं नाहीस ना मला ! मी सुट्टी. तुझ्याबरोबर गप्पा करायला आले आहे." 

अन मी ऐकत बसले सुटीच्या व्यथेच्या कथा.

    काय हे! सारखं दडपण येतं आजकाल मला. मुलांच्या मेळाव्यात रमणारी मी, पण नको वाटतं जायला. कुणी वेळच देत नाही मला. पूर्वी किती छान होतं न सगळं. माझी वाट पहायची मुले. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी तर नुसता गोंधळ असायचा. प्रत्येक जण आनंदाने गात असायचा

     चला सुट्टी झाली आता 

      खूप खूप खेळायचे

      उन्हाळा म्हणजे सुटीचा ऋतू असे जणू समीकरणच वाटे मला. ग्रीष्मातील उन्हाचा बाऊ न करता त्याला सामोरं जात उंडारत असत बालगोपाल. मित्र मैत्रिणी, दादा-ताई, छोटू गोटू, बाळ्या, बेबी सारेच असायचे दुपारचे एकत्र. काय काय खेळाचे न! पत्ते सूर पारंब्या, विटीदांडू तर कधी बंदी साखळी, दोरीवरच्या उड्या आणि थकले भाकले की झाडाच्या सावलीत रंगायचा चम्पूल.  दुपार कधी निजलीच नाही मी  असतांना. धमाल तर असायचीच पण त्याचबरोबर वाचनवेडे वीर एखादा कोपरा शोधून वाचत बसायचे तासनतास. मुलांना सुट्टी लागली म्हणजे घराघरातून सहलीचे, तीर्थयात्रेचे बेत आखले जायचे, घरात लग्न  तर जाणून उन्हाळ्याच्या सुटीत काढायचे. महोत्सव भासायचा हा लग्नसोहळा.

         पण आता मला असे काही दृश्य पहायला मिळत नाही. मला आठवतं पूर्वी मी येणार म्हणजे सगळं घरदार हसत आनंदाने माझं स्वागत करायचे. पण आजकाल मी येणार म्हणजे पालकांची डोकेदुखी वाढत जाते. पूर्वी मोठे कुटुंब असायचे, शिवाय आई नोकरी करणारी असेलच असे नाही. उलट सुटी म्हणजे चला आता मुलांच्या अभ्यासातून सुटका. थोडा निवांतपणा यायचा. आजकाल तसे नाही न! छोटे कुटुंब, दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे मी येणार म्हणजे यांची तारांबळ उडणारच. दिवसभर नसले तरी किमान चार पाच तास तरी मुलांना अडकविणे आवश्यक आहे असे वाटू लागले आणि यातून जन्म झाला छंद वर्ग आणि संस्कार वर्ग. आईबाबा ही सुटले आणि काम करणाऱ्याला काम मिळाले. पण खरंच असे एक महिन्याचे संस्कार वर्ग घेऊन होतात का संस्कार?  हे असे  छंद वर्ग म्हणजे एक टास्क आहे मुलांसाठी  हा ही अभ्यासक्रम आहे करियर च्या दृष्टीने असेच वाटते मुलांना. पूर्वी मी आली की मामा ,मावशी, आत्या यांच्याकडे जाणे व्हायचे, किंबहुना सुट्टीच यासाठी असते असे गृहीत धरलेले असायचे. हे नात्यांचे बंध जोपासायचे बाळकडू असे लहानपणापासून दिले जायचे. सोबत राहणे, मदत करणे, घासातला घास देणे म्हणचे आजच्या भाषेत शेअरिंग करणे हा पण एक संस्कार च होय अगदी नकळतपणे केलेला आणि कोणतीही फी न आकारता. उलट प्रेमाची, वात्सल्याची देवाणघेवाण होई, सहवास मिळत असे , त्यामुळेच नाते घट्ट विणले जात असे.

         गेल्या दहा पंधरा वर्षापासून मला येऊच द्यायचे नाही असा जणू चंग बांधला आहे की काय न जाणे. कारण वार्षिक परिक्षा संपते न संपते तोच पुढच्या इयत्तेचा अभ्यासक्रम सुरू होतो. प्रचंड स्पर्धा वाढली आहे. जो तो फक्त पळत सुटला आहे. हे पण पहात नाही की आपण ज्या वाटेने चाललो आहे ती आपल्यासाठी योग्य आहे की नाही. पुढे किती खाचखळगे आहेत हे जरी माहीत नसले तरी स्वतःच्या ताकदीचा,आवडीचा विचार करणे गरजेचे आहे. 

         तंत्रज्ञान प्रगत झालं त्यामुळे त्याच्या अनुषंगाने सगळेच प्रगत होणे गरजेचे आहे आणि हा अपरिहार्य बदल स्वीकारणे मला तसे जड गेले नाही. प्रत्येक पिढीतील बदल काळानुरूप  हळूहळू अंगवळणी पडतात. पण दिवसेंदिवस घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे झाले आहे. मुलांनी प्रत्येक क्षेत्रात पारंगत असावे हा जो अट्टहास आहे तो फार घातक आहे असे आता वाटायला लागले. माझ्या सहवासात बालगोपाल किती खुश असायचे. आताही असतात पण जे स्वरूप  बदलले आहे ते कुठेतरी काहीतरी चुकते आहे, मुलांच्या मनाचा, त्यांच्या भावनांचा, त्यांच्या ताकदीचा,आवडीचा विचार न करता माझा जो उपयोग होतो आहे त्यामुळे मला फार अस्वस्थ वाटतं, अन काळजी पण.

            या दोन वर्षात तर सुट्टी असते शाळा संपल्यावर हेच सगळे विसरून गेले आहेत. कारण कोविड मुळे घरातच शाळा, ती पण मोबाईल वरच. इंटरनेट बंद झाले की शाळा बंद. नको ते खेळ मोबाईलवर खेळून अक्षरशः वेळ घालविणे हा प्रकार. याला काही अपवाद असतील ही. प्रत्येक नियमाला अपवाद असतोच तसा. पण सर्वसाधारण पणे मोबाईल आणि विद्यार्थी हे मला पचनी पडत नाही अजून.

      जुनं ते सोनंच  असं मला म्हणायचे नाही. काळा बरोबर सुधारणा होणे गरजेचे आहे. पण प्रगतीच्या झोतात सगळंच वाहून जायला नको न असे मला वाटतं. नर्सरी पासून तर बारावी पर्यंत सगळेच माझे सखसोबती. त्यांच्याबरोबरच आईबाबा, आजी आजोबा सगळेच मला हवेहवेसे. सुकोमल  असले तरी उद्याच्या राष्टाचे भविष्य आहे, म्हणूनच त्यांना कणखर होण्यासाठी माझी गरज आहे म्हणजे त्यांच्या व्यस्त अभ्यासक्रमात मी म्हणजे एक विरंगुळा आणि अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी वेगळे शिकण्यासाठी मिळालेला वेळ. आयुष्याच्या वाटेवर चालतांना मुलांबरोबर सगळ्यांनाच थोडी तरी उसंत मिळावी, पुन्हा नव्या उत्साहाने  पुढे चालता यावे यासाठी निसर्गाने माझी निर्मिती केली. प्रत्येक गोष्ट कारण असल्याशिवाय आणि अर्थ असल्याशिवाय परमात्म्याने निर्माण केली नाही.मी म्हणजे तुमची बॅटरी चार्ज करणारी विद्युलता आहे.  या सवडीच्या झुल्यावर मस्त हिंदोळे घेता घेता किती तरी ज्ञानकण वेचले जातात हे कळत ही नाही. 

      ह्या सुट्टीचे मर्म जाण तू बाळा

      झुलविन  रे ज्ञानाचा हिंदोळा

      तुझ्या संगती खेळता खेळता

      घडवू आपण भारत वेगळा

      

      किती किती फायदे आहेत न, तरी मला का सगळे विसरत चालले आहेत. कागदोपत्री मी असतेच पण प्रत्यक्ष मात्र कुणी पहातही नाही ग माझ्याकडे. हीच खरी माझी व्यथा आहे....

   

© रसिका राजीव हिंगे

      

        

Monday, 2 May 2022

दरवळ

 



दरवळणारे बाल्य सुकोमल

गंधकोषी सुखे पहुडले

वणवण अवघी जगण्यासाठी

शिणवट देही घेउन फिरले


सुखदुःखाची कसली चिंता

पलंग मेदिनी गगन पांघरे

सावलीतून येणे जाणे

सांजवातीचे घास स्मरे


भार वाहतो वाटे सारे

कैसे संचित  कर्मगतीचे

भावभावना उरी दाटल्या

द्वार खुलावे सत्कर्माचे


नकोच जगणे लाचारीचे

कष्टाला त्या मोल कळावे

ऐसी शक्ती मजला दे रे

स्वाभिमानास तूच जपावे


रसिका राजीव हिंगे