Sunday, 20 December 2020

क्षण धुंद झाले....





             पारिजात गंधाळला

बहरली रातराणी

आसमंत दरवळे

तुझ्यासाठी गे साजणी


     चंद्राच्या दुधाळल्या प्रकाशात चांदणे आणि सृष्टी न्हाऊन निघत होते. 

     शीतल वारे शीळ वाजवत वातावरण अधिकच मादक करण्याचा प्रयत्न करत होते. 

     सुगंधांचे पैंजण घालून अलवार पदन्यास करीत रात ऐन बहरात होती. अशा धुंद क्षणांना मुठीत धरत ती सख्याची वाट  बघत होती. प्रत्येक क्षण एक युग वाटावा असं झाले होते. 

     मनाच्या अंगणात स्वप्नमोर आपला पिसारा फुलवून आधीच स्वप्नात रंगलेल्या तिला जास्तच स्वप्नवेडी करण्याचा प्रयन्त करत होता.

     तिच्या व्याकुळल्या मनाला अजूनच व्याकुळ आणि प्रतीक्षेत धुंद झालेल्या तिच्या क्षणांना बेधुंद करीत गवाक्षातून चंद्रप्रकाश हळूच डोकावत होता. 

     चंद्रकळा ल्यायलेली, केसात जाई जुईची सुगंधित फुले माळून, डोळ्यात काजळरेखा आणि कपाळी चंद्रकोर लावून ही चंद्रमुखी सारा साजशृंगार करून त्या बेधुंद क्षणाची आतुरतेने वाट पहात होती. 

     आणि तो आला. तिच्या प्रतिक्षेचा काळ संपवित, तिच्या अलवार धुंद क्षणांना बेधुंद करण्यासाठी आला. त्यालाही ओढ होतीच तिच्या सहवासाची, स्पर्शाची. 

     तोही  अनुभवत होता चंद्राचे चांदणे, रातराणीचा गंध, पारिजातकाच्या दरवळाने त्याचा प्रत्येक  क्षण नव्हे निमिष गंधाळला होता. गार समीरा संगे तो पण शीळ घालतच रंगमहालात प्रवेशित झाला.

     समोर मूर्तिमंत सौंदर्य. पैजणांचा सुमधुर नाद करीत ही अभिसारिका त्याच्यात सामावली. वेलीने वृक्षाचा आधार घेतला, आकाश आणि धरतीचे मनोमिलन झाले. सगळेच प्रतिक्षेचे, समर्पणाचे क्षण धुंद झाले...


रसिका राजीव हिंगे

     

Saturday, 19 December 2020

अक्षरांच्या बाजारात

 





अक्षरांच्या बाजारात

शब्दांसाठी होती बोली

कुणी न ये घ्यावयास

शब्द परडी चिंतावली


माझा ज्ञानियांचा राजा

कुठे गेलास रे तुका

जनाबाई ये ग माये

शब्द विनवितो तुका


मांदियाळी संतांची ही

शब्द गोंजारत होती

भाव अंतरीचे येती

होई साहित्य निर्मिती


अरे कशी किमया ही

झाली अचानक झाली

जणू नभीची नक्षत्रे

बाजारात प्रवेशली


अभिरुची कलासक्त

साहित्याचे प्रेमी सारे

शब्दांना उचलून घेती

सारेच शब्दांचे भारे


गहिवरे शब्द मनी

पापणकाठ ओलावले

आनंदाने जुळून आले

पुन्हा साहित्य निर्मिले


रसिका राजीव हिंगे





Friday, 4 December 2020

माझी शाळा

 





माझी शाळा* ®️

शाळा असावी शाळेसारखी

शाळा असावी शाळेसारखी नकोत नुसत्त्या इमारती
इथे असावे शिक्षक सगळे सांदिपनी समती
नकोच नुसती टक्केवारी अन विद्यार्थ्याची श्रीमंती
इथे असावा समभाव कॄष्णासंगे सुदामाही घडती
ह्या शाळेतून विद्यार्थि घडावे घेंण्यास उंच भरारी
आकाशास गवसणी घालून किर्ती ज़ावी दिगंतरी
नकोत नुसते परिक्षार्थी विद्यार्थिच इथे घडावे
सुधाकराच्या शीतल प्रकाशी असेच नित्य घंडावे
                               रसिका राजीव हिंगे

     आजचा माझी शाळा  विषय वाचला आणि लगेच वरील मी केलेली कविता आठवली. मी ज्या शाळेत नोकरी करते त्या शाळेत विद्यार्थ्यांशी बोलतांना सुचलेली कविता आहे.
    शाळा! फुलपाखराचे पंख ल्यालेली, संस्काराचे भांडार असलेली माझी शाळा. स्वप्नाचे दुसरे रूप म्हणजे शाळा. आज जेव्हा मी माझेच,माझ्या आयुष्याचे सिंहावलोकन करते तेव्हा प्रकर्षाने जाणवत काय नि किती दिलं शाळेने. कलागुणांना प्रोत्साहन इथेच मिळते, तुमच्यातील सुप्त गुण इथेच हुडकले जातात.
     मला आठवतं मी आठवीत असतांना सहामाही परीक्षेत मराठीच्या पेपरमध्ये माझा निबंध वाचून मॅडमनी माझे नाव विचारले होते. खूप आनंद झाला होता. "निबंध छान लिहिलास, खूप वाचत जा छान लिहशील" असे जेव्हा त्या म्हणाल्या तेव्हा मूठभर मास चढले हो अंगावर.
     शाळेत मी कधी खेळ खेळले नाही की कधी कुठे स्पर्धेत नव्हते तरीही माझी शाळा मूकपणे माझ्यावर करायचे ते संस्कार करतच होती. आज आश्चर्य वाटतं की किती मागे होती मी. दुसऱ्या बेंचवर असली तरीही.
     शाळेतली एकसुरातील प्रार्थना,  कवायत,राष्ट्रीय उत्सव साजरे करण्यातील मजा, एकसारखे दिसणारे युनिफॉर्म घातलेले विद्यार्थी,सगळं कसं शिस्तबद्ध असायचं. शिक्षक रागावले, छड्या मारल्या तरी पालक कधी शाळेत येऊन शिक्षकांशी भांडले नाहीत आजच्यासारखे.
     न्यू ईरा हायस्कुल अकोला म्हणजे अकोल्यातील आमच्या काळातील टॉप मोस्ट शाळा. दरवर्षी शाळेतून मेरिट ठरलेले. अशा शाळेच्या भरभराटीच्या काळात मी शाळेची विद्यार्थिनी होते याचा मला अभिमान आहे.
     अशीच शाळा प्रत्येकाने आपल्या शालेय जीवनात जगावी,अनुभवावी असे मला वाटतं....
    
                                 
    ©️रसिका राजीव हिंगे

*