Friday, 29 January 2021

कृष्णकिनारा

 


     राधा, कुंती, द्रौपदी महाभारतात नेहमीच न कळलेल्या स्त्रीया. कृष्णा सारख्याच मनाचा ठाव घेणाऱ्या अशा तिघी. स्त्री मनाची तरल भावना, तिची घुसमट, आयुष्यातले रुकार आणि नकार. या पैलूंवर सहज भाष्य करणारा, या तिघीनाही उलगडणारा कृष्ण किनारा. विलक्षण शांतता असलेला तरीही आतून खळाळणारा किनारा. अरुणा ढेरे यांचे कृष्ण किनारा वाचतांना असंच मन खळाळून  येत.

     प्रस्तावनेतच हे का लिहिलं याचं उत्तर देतांना अरुणा ढेरे यांनी या तिघीच्या माध्यमातून कृष्ण  साकारला आहे. खूप वेगळा भासतो कृष्ण. तसाही कृष्ण कोणाला पूर्णपणे कळला आहे. प्रत्येक वेळी तो वेगळाच भेटतो.

     राधा, कुंती आणि द्रौपदी.  पुराणकथांमधून भेटलेल्या काळाची अवघड वाट चालत आपल्यापर्यंत पोहचलेल्या.

  राधा! कृष्णाची मैत्रीण,सखी. समर्पणाचे प्रतीक. तर 

  कुंती फक्त मातृत्वाचे लेणं लाभलेली बाईपण जगत असलेली.

  द्रौपदी म्हणजे तर सौंदर्याची परिसीमा, धगधगतं अग्निकुंड. अवहेलना स्वीकारलेली कृष्णसखी.

  स्त्रीत्वाची जातकुळी शोधतांना याच्या महासागराच्या किनाऱ्याला असलेला कृष्ण पूर्ण पुरुष ,पुरुषोत्तम याच्या साहाय्याने या उलगडत जातात.

      असहनीय दुःख झेलणारी. उतार वयात कृष्णाला मध्यरात्री भेटलेली राधा असो की मातृत्व आणि बाईपण याचा कुठेही संबंध नसलेली कुंती असो.अथवा कृष्ण सखी कृष्णा असो.

 सगळ्यांचे जगणे वेगळे तरीही दुःख एकच आहेत  असे वाटावे.

 कृष्णा मला दुःखच दे असे वरदान मागणारी कुंती नंतर कृष्णाला म्हणते मी उगाच दुःख मागितलं आधीच माझ्याजवळ किती आहे.

 कृष्णा ला राधा कळली नाही की राधेला कृष्ण. सारच अनाकलनीय.

 पाच पांडवांची पांचाली, बलाढ्य कुरुवंशाची कुलवधू तिच्याही पाचवीला पुजलेले दुःख च.

 कुंती-विदुर, कृष्ण-कुंती, पांचाली- कृष्ण, राधा- कृष्ण यांचे नाते संबंध छान रेखाटले आहेत. 

 पैलतीर गाठण्याआधी वानप्रस्थाश्रमात कुंतीला झालेले विदुराचे भास, शेवटची भेट घेण्यासाठी तरी एकदा माधवा ने यावे असा ध्यास घेतलेली कृष्णा आणि मी तुला भेटायला आली मी निरोप घायचा की तू कृष्णा असा भाबडा प्रश्न विचारणारी राधा. याची उत्तरे मिळविण्यासाठी तरी कृष्णकिनारा आहे.

 या पुस्तकाचे मला भावलेले एक वैशिष्ट्य म्हणजे यातील ललित. अप्रतिम भाषा, सुंदर उपमा आणि कृष्ण असेल तर कथा भावतेच न?

 वाचावे असे काही ते एकदा तरी कृष्णकिनारा वाचवा असे मला वाटतं...


©️रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment