Sunday, 28 February 2021


रोज डे 


चुंबन

     

        पहाट झाली. रविराज आले अरुणाच्या रथात बसून आणि सोनसळी किरणांनी घेतले धरेचे चुंबन. मनोमन शहारली धरा अन लज्जेची गाली चढली तिच्या गाली. सारा आसमंत तिच्या या लाजऱ्या रुपात न्हाऊन निघाला. तिच्या लज्जेची सोनसळी गुलाबी छटा क्षितिजावर बिंबित झाली. पूर्वा ही लाजली जणू ह्या स्वर्गीय अनुभूतीने.

        स्वप्नात रंगली होती ती तिच्या राजस बाळाच्या. आई होणार होती न ती. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते याचा प्रत्यय तिला येत होता. आतुरली होती बाळाला पहाण्यासाठी. प्रसव वेणा सहन करत होती. गोंडस. तिच्याच आतड्याचे कातडं, तिच्याच रक्तामासाचा गोळा चुंबून घेतांना काय जाणवतं ती आई झाल्याशिवाय कसे कळणार! अगदी  "मज भासे हे गगन ठेंगणे" अशी तिची अवस्था झाली.

        पुनवेची चांदण रात. सागर उधाणला. सागराची प्रत्येक लाट आनंदून किनाऱ्याकडे धाव घेत होती. किनाऱ्यास चुंबन द्यावया. आणि परतत होती समर्पण करून. हा सोहळा चांदवा पहात होता नभांगणी तारकांसवे. तो हो लाजत मध्येच ढगा आड लपायचा प्रयत्न करत होता.

    ती रात्र तशी होती. हिंदोळ्यावर झुलायची. मनमयुर  थुईथुई नाचत तुझ्याभोवती पिंगा घालत होते. सारे चराचर गुलाबी रंग लेऊन माझ्या पुढती उभे होते अन....

      अधरा वरती अधर टेकती

     स्वर्गीय सुखाची अनुभूती

     आश्वासक त्या स्पर्शातून

     तुझी नि माझी फुलते प्रीती

  किती खट्याळ नजर तुझी. लाज कुठे लपवू असे झाले मला. असे असले तरी ती नजर माझ्यावर स्थिर व्हावी असे का बरे वाटावे? काल पर्यंत आपण अनोळखी होतो आणि आज जन्मजन्मांतरीची ओळख असावी असे वाटते. ही कैसी किमया. तुझ्या सहवासाची की तुझ्या प्रीतीची......


रसिका राजीव हिंगे






     *विषय - ही प्रीत बावरी* 

     



      आज सकाळी नेहमीप्रमाणेच झपझप पावलं उचलत फिरत होते. जाता जाता बाजूने   मोबाईल वर गाणे   ऐकू आले....

 इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राज़दार

 जितने के आस्मान पर तारे हैं  बेशुमार

     अलवार मनाच्या हळुवार भावना जपत जागलेली प्रीत सुखाच्या हिंदोळ्यावर झुलते आहे असे वाटावे इतके उत्कट  प्रेम. मनापासून दिलेली कबुली. पूर्वी नजरेने दिली जायची.   

     आज संपूर्ण जग प्रेम दिवस साजरा करते आहे. असं एक दिवसात साजरे होणारे आहे प्रेम? ही निरंतर वेदकाळापासून चालत आलेली मंत्रमुग्ध भावना आहे. 

     मला नटसम्राट मधील प्रसंग आठवतो. "अहो किती दिवसापासून तुम्हाला सांगायचे राहिले, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे बरं!" आणि त्यावर "इश्य" काहीतरीच काय ते काय सांगायची गोष्ट आहे का?" 

       तात्पर्य असे की ही सहज सगळ्यांच्या नकळत घडणारी गोष्ट किंवा कबुली.नजरेतून देहबोलीतून प्रीत फुलत राहते म्हणून ही प्रीत बावरी.

     दिवसभर सगळ्यांचं करता करता संध्याकाळी घरी येतांना आणलेला गजरा लपून तिच्या केसात माळताच प्रीतीगीताचा अनाहत नाद  ऐकू येऊ लागतो, मनमयुर थुईथुई नर्तन करायला लागतो.कृतार्थतेचे भाव नयनी दाटून प्रेमाश्रूंनी पापणकाठ ओलावतात. झालेला आनंद त्याला कळावा म्हणून हळूच नयनाच्या कोपऱ्यातून टाकलेला कटाक्ष ही पुरेसा असतो त्याच्यासाठी. या हृदयीचे त्या हृदयी असे पोहचते. हीच मौनाची भाषांतरे. ही आहे प्रीत बावरी.

     म्हणजे 

     धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना

     शब्द रूप आले मुक्या भावनांना

  हे शब्दरूप ही अबोल. नयनांचे शब्द नयनांना कळती असा प्रकार. चांदण्यात चालतांना धरला तुझा हात असं नुसतं ऐकल्यावर मनोमन मोहरून येतात गात्र न गात्र.

     खरे तर प्रीत या शब्दातच किमया आहे. किती खोलवर अर्थ दडलेला आहे या शब्दात. सागराची खोली कधी मोजता येईल का,नभीच्या चांदण्यांची मोजणी शक्य नाही अगदी तसेच ही प्रीत कशी आहे, कशी दिसते हे शब्दात सांगणे कठीण आहे. जसे अनुभव तसे प्रेम. म्हणून तर तिला बावरी म्हटले आहे न.

     *प्री- प्रीयाराधना* 

     *त- तन्मयतेने किंवा तत्परतेने* *करणे* 

     म्हणजे तन्मयतेने केलेली प्रियाची आराधना असे म्हणता येईल. 

     मग ती नल दमयंती यांची प्रीती असो किंवा दुष्यंत शकुंतलेची, श्रीकृष्ण रुक्मिणी असो किंवा अगदी आजच्या पिढीतल्या संस्कारित तरुण तरुणीची असो ही उत्कट तन्मयतेने केलेली प्रीती आहे असे मला वाटते आणि म्हणून च ती प्रीत बावरी आहे. 

     राधा! कृष्णमय झाली होती. समर्पणाचे प्रतिक. यमुनेच्या तीरावर रास खेळतांना, मुरलीधराच्या बासरीवर पदन्यास करणारी राधा, बावरी होती. तिची प्रीत पण बावरी होती.  इथे वासनेला थारा नाही, फक्त फक्त प्रीत आणि प्रीत. आत्म्याचे परमात्म्याशी झालेले मिलन म्हणजे राधा कृष्ण.

     मंगेश पाडगावकर म्हणतात 

     *प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम* *असतं* 

     *तुमचं आमचं साऱ्यांचं सेम* *असतं* 

  खरं आहे हे पण आताशा या तरुण मुलामुलींच पाहिलं की मन खंतावतं. प्रेम आंधळं असलं तरी मनापासून करावं, एखाद्याला स्वीकारलं की त्याच्या गुणदोषां सह स्वीकारावे आणि वेदकाळापासून चालत आलेल्या या अलवार भावनेचा आदर करीत जगतांना जाणवू लागतं आयुष्य किती सुंदर आहे.... आणि पुन्हा पुन्हा मनातून अनाहत नाद ऐकू येऊ लागतो....

  इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राज़दार

  जितने के इस ज़मीन पर झरे हैं बेशुमार 


©️रसिका राजीव हिंगे

      8600047066

Thursday, 25 February 2021

 अलक


1.

किडकिडीत आणि निस्तेज दिसणाऱ्या मुन्नाला आज एकदम हँडसम पाहून अजयला खूप आश्चर्य वाटले.

"वाह, किती छान दिसतो आहेस मुन्ना."

"काय करतोस रे सध्या?"

"काही नाही. आय. टी. कंपनी मध्ये नोकरी सुरू आहे. आणि रोज बारा सूर्यनमस्कार घालतो."


2.

का ग? नाराज दिसतेस!"

"गौराई आल्यात घरी."

"अगं मग आनंद व्हायला हवा न!"

दरवर्षी गोकुळ असतं ग. घर गजबजलेलं.

"यावेळी कोणीच नाही. लॉक डाऊन मुळे."

3.

खूप दिवसांपासून तो लिहीत होता. प्रत्येक वेळी प्रकाशित ही करत होता. पण प्रतिसाद मिळत नाही म्हणून लिहिणे बंद केले त्याने.

एक दिवस त्याचे प्रकाशित पुस्तकास पुरस्कार मिळाल्याचा  फोन आला.

4

"काका नमस्कार करतो".
"अरे, ये .  इन्स्पेक्टर झालास.
"पण आज एवढी फौज घेऊन आलास ! "
"काका, तुमच्या शेतात  जाऊन पहाणी करायची आहे."
हे ऐकताच काका घेरी येऊन खाली कोसळले.


5

रजनी झपझप पावलं उचलत चालली होती.
"कुठे निघालीस ग बयो"?
"दवाखान्यात! छाया ला मुलगी झाली. दुसरी.
"असे का बरं!"
"तिच्या घरचे आले नाहीत कोणीच पहायला".

6
किडकिडीत आणि निस्तेज दिसणाऱ्या मुन्नाला आज एकदम हँडसम पाहून अजयला खूप आश्चर्य वाटले.
"वाह, किती छान दिसतो आहेस मुन्ना."
"काय करतोस रे सध्या?"
"काही नाही. आय. टी. कंपनी मध्ये नोकरी सुरू आहे. आणि रोज बारा सूर्यनमस्कार घालतो."

7.
का ग? नाराज दिसतेस!"
"गौराई आल्यात घरी."
"अगं मग आनंद व्हायला हवा न!"
दरवर्षी गोकुळ असतं ग. घर गजबजलेलं.
"यावेळी कोणीच नाही. लॉक डाऊन मुळे."


8
नीता भरभर आवरून कंपनीत मुलाखतीसाठी निघाली.
"अहो नीट पाहून रस्ता क्रॉस करा न. तुम्ही एकट्याच नाही रस्त्यावर!"
नीता चे लक्ष नव्हते तरी नीता त्या कार मधील व्यक्तीस वाटेल तशी बोलली.
मुलाखतीस चेंबर  मध्ये गेली तर मुलाखत घ्यायला कार मधील व्यक्ती पाहून नीता अवाक झाली.

रसिका राजीव हिंगे

Monday, 15 February 2021

सहज सुचलं म्हणून....कन्यादान

 

सहज सुचलं म्हणून....

सुसंकृत आणि सुशिक्षीत झालेली उपवर कन्या दान करायची वेळ समीप येते त्यावेळी मनात असंख्य विचार थैमान घालायला लागतात.
मुलगी झाली हो पासून तर लग्न ठरलं हो पर्यंतचा हा प्रवास एखाद्या सिनेमातल्या खेळासारखा डोळ्यापुढे सरकत जातो.
बालपण, शैक्षणिक प्रगती,मित्र मैत्रिणी, समाजातील वावर आणि घरातील संस्कार याच्या बळावर ती सुसंस्कृत आणि सुशिक्षित होते. आणि विवाह घटिका समीप येते,  देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आगळा वेगळा विवाह सोहळा संपन्न होतो. धर्मानुष्ठान असलेले  कन्यादान हा विधी भावपूर्ण वातावरणात पार पडतो.
का करायचे कन्यादान?  जगरहाटी आहे म्हणून ?
जनक राजाला  दशरथ राजा म्हणतो "राजा तू किती भाग्यवान आहेस, आज तुझ्या दारात मी एक याचक म्हणून आलो आहे तुझ्या मुलीचे दान मागायला". किती मोठेपणा हा मनाचा.  खरचं भाग्यवान आहेत का मुलीचे आईबाप? होय. पूर्वजांच्या पुण्याईने,  जन्मजन्मांतरीचे पुण्य असले की कन्यारत्न प्राप्त होत.
स्त्री ही शक्ती आहे आणि शिवशक्ती चे मिलन होतं म्हणून जगरहाटी सुरू आहे.   स्त्री ही सृजनशील आहे,नवनिर्माती आहे. तिला लाभलेले हे सृजनत्व निसर्गदत्त आहे  स्त्रीला निसर्गाने प्रचंड शक्ती बहाल केली आहे.  सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषित कन्या  दान केली असता 28 यज्ञ केल्याचे पुण्य मिळतं असं म्हणतात. मुलगी ही 42 कुळांचा उद्धार करते असेही पुराण कथांमधून वाचले आहे. असे असले तरी कोणत्याही फळाची आशा न करता जगाच्या कल्याणा मनावर मैलाचा दगड ठेवून सालंकृत कन्यादान करायचं, चालत आलेली परंपरा म्हणून नव्हे तर स्त्रीशक्ती ही विश्वनिर्माती आहे म्हणून.

रसिका
28.02.2019

Wednesday, 10 February 2021

 नंदनवन / प्रपोज डे


     किती वर्ष झाली आज पण तो क्षण अलवार होऊन थुईथुई नाचत असतो. अगदी मयूर होऊन. माझ्या  आयुष्यात नंदनवन फुलवणारा लोभस क्षण.

     पावसाच्या सरींनी पदन्यास करत रिमझिम बरसत ही धरा चिंब भिजवावी असा तो क्षण चिंब भिजलेला तुझ्या माझ्या प्रीतीचा.

     ओळख तशी जुनीच पण वयात आल्यावर तू वेगळा भासू लागला. तुझे ते इशारे, तुझं धीटपणे माझ्याशी बोलणं, उगाच चार जणांमध्ये निरखून बघणं,सारं हवंहवंसं वाटावं इतकं लोभसवाणं असायचे आणि मन गाऊ लागायचे

            इशारों इशारों में दिल लेने वाले

           बता ये हुनर तूने सीखा कहाँ से

    मनात भीतीयुक्त प्रीत फुलत होती. कुणी काही म्हणेल का,बोलेलं का, तुझ्याशी बोलावंस खूप वाटायचं, तसं तर ओळख म्हणून बोलत होते पण हे प्रीतीचे रेशीम धागे गुंतत चालले आहे हे तुला कसं सांगू.

            कशी सांगू प्रीत माझी

             सांग ना रे साजणा

            लाज येई गाली ऐसी

           कैसे बोलू मन भावना

      नाठाळ मन तुझ्याभोवती सारखं उंडारत होत. तुझे शिक्षण पूर्ण करून तू नोकरीच्या निमित्ताने लांब निघून गेलास. तुझा निरोप घेतांना मन धडधडत होतं. कसं बोलू तुझ्याशी? मी बरोबर आहे का? उचललेलं पाऊल पुढे टाकू की नको अशी द्विधा मनस्थिती झाली होती. 

      आणि जाता जाता तुझ्या नजरेने ग्वाही दिली आपल्या पहिल्या प्रीतीची. तू  तर निघून गेलास अन माझे मन आनंदून नाचायला लागले गायला लागले, स्वतःभोवती गिरकी घेत तुझ्या वाटेवर माझ्या प्रीतीच्या पायघड्या घालू लागले.

      एकेक दिवस एक युग वाटतो आठवणीत असं सगळे म्हणतात  त्याची प्रचिती मी घेत होते.  मी तुझ्या वाटेकडे नजर लावून बसले. अगदी चातका सारखी तुझी वाट बघत बघत होते., तुझ्या आठवांचे मेघ दाटून येऊन पापणकाठ ओलावत होते.

      अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले

       दाटुनी आभाळ आले मेघ बरसू लागले

        अशा चिंब ओल्या क्षणी

       पुकारे तुझी साजणी ! 

 अशी अवस्था झाली माझी.

      माझ्या प्रीतीचा स्वीकार करायला तू आलास.  भारावलेला क्षण होता रे तो. सांज केशरिया लेऊन आलेली,  धुंद जाई जुई दरवळत होत्या माझ्या मनात, माझी गात्र न गात्र तुझ्याभोवती गिरकी घेत पदन्यास करत होती. तुझ्या नजरेतले होकार मला फुलवत होते पण शब्दांचे काय? ते ओठाबाहेर येऊन मी ऐकण्यास आतुरली होती. 

      आणि तुझे मोतीयांचे शब्द आलेत. आभाळ ठेंगणे वाटू लागले. सारा आसमंत माझ्या सवे बेभान होऊन नृत्य करतो आहे असे वाटले. कोकीळ सुद्धा अवेळी गातो आहे असे भास झालेत. वारा छमछम करीत कानी गुणगुणत आला. माझ्या आयुष्यात नंदनवन फुलले.... आणि सारी सृष्टी गाऊ लागली....

      जीवनात ही घडी अशीच राहू दे

      प्रीतीच्या फुलांवरी वसंत नाचू दे...



रसिका राजीव हिंगे

      


     

Tuesday, 2 February 2021

शुभ सकाळ* 🙏🏻🌹

 *शुभ सकाळ* 🙏🏻🌹


चांदण्यांनो जा घरासी

रविकर  येई आता

सोनसळी झाली पूर्वा

वाट द्या अरुणरथा


सहस्त्र या किरणांनी

वाटा दिसती सहस्त्र

दिसभर सृष्टीवरी

त्याचा पहारा सशस्त्र


वाट अपुली आपण

निवडावी हो सावध

मग संगती भास्कर

कशी होईल पारध


विखुरले हे पारधी

अंधारल्या वाटेवरी

प्रकाशली वाट करी

आनंदाने भवपारी


©️रसिका राजीव हिंगे

       8600047066