Friday, 31 July 2020

चित्रकाव्य



चौसोपी वाडा बहु सुंदर 
भव्य अशा या परसदारी
चकचकीत तांब्याचा बंब
घंगाळातील उष्ण वारी

वृंदावनीची तुळस हिरवी
बघ तुला कौतुके पहाते
तव न्हाण्याचा होई उत्सव
डोळे भरुनी मी ही बघते

पुरे झाले आटोप आता
किती खेळशील रे बाळा
उष्ण जरी हे पाणी आहे
तरी हुडहुडी भरी स्नेहाळा

नुकतीच सर येऊन गेली
ऊन कोवळे तव मुखावरी
पागोळ्यातील सरते पाणी
अभिषेक करी तव शिरावरी

आनंदाचे क्षण अनुभवसी
डोळे मिटुनी तू लडिवाळा
ऐसे राजस रुपडे तुझे
दृष्ट काढते रे घननीळा

रसिका राजीव हिंगे

श्रावण




आला श्रावण श्रावण  
 साज सरींचा लेऊन
ऊन पावसाचा खेळ
मन जाई हरखून

आला श्रावण श्रावण
लेकी आल्यात माहेरा
भ्रताराचे गुण गाता
होई मुखडा लाजरा

आला श्रावण श्रावण
झुले उंच उंच झुला
लेकी सुनांसवे माय
बाप मनी सुखावला

आला श्रावण श्रावण
बंधुराजा आनंदला
रक्षावया बहिणीने
धागा रेशमी बांधला

आला श्रावण श्रावण
जन्माष्टमी उत्सवाचा
आनंदाचा यशोदेस
देवकीस विरहाचा

आला श्रावण श्रावण
सृष्टी नटली सजली
शालू हिरवा लेऊन
जागोजागी बहरली

आला श्रावण श्रावण
भ्रताराच्या सुखासाठी
नववधू   पूजतात
भोळा सांब तो धूर्जटी

आला श्रावण श्रावण
सुखराशी उधळीत
धनधान्य समृद्धीस
देई हसत हसत

रसिका राजीव हिंगे


एकांत




किती तुझी घालमेल
मना बसावे सुखात
मला मिळतो विसावा
तुज  मिळे का एकांत

किती किती विचारांची
गर्दी तुझ्या आत आत
सैरभैर  होता होता
तुज मिळे का एकांत

एका क्षणी इथे तर
निघे दुसऱ्या पळत
रानोमाळ भटकतो
तुला नकोच एकांत

कुठे कुठे हिंडवितो
सारे मला रे अज्ञात
स्थान एक नसे तुला
कसा मिळेल एकांत 

क्षितीजाच्या पल्याड रे
नदीकाठी  शांत शांत
माझ्या मना जाऊ चल
तिथे असेल एकांत

स्थिरचित्त होण्यासाठी
गुरूपद हे प्रशांत
तिथे तुझ्या उनाडक्या
कसा लाभेल एकांत

माझे मना ऐक जरा
क्षण मिळू दे  निवांत
भासे गरज तुलाही
तेव्हा लाभेल एकांत

रसिका राजीव हिंगे





Saturday, 25 July 2020

ही वाट वेगळी तुझी



आज दिसले नाहीत
तुझ्या पावलांचे ठसे
ही वाट वेगळी तुझी
नाही कळलेच कसे

रोजचेच जाणे येणे
होत होती भेट तुझी
आज कशी वळलीस
ही वाट वेगळी तुझी

काय झाले सांग जरा
तुझ्या मनीचे गुपित
ही वाट वेगळी तुझी
समजले ग इंगित

बाळे लक्ष्मण रेषेच्या
जाऊ नकोस बाहेर
ही वाट वेगळी होई
आहे रावण समोर

जरा छानशी सुंदर
वाट निवडावी तुझी
मग म्हणतील सारे
ही वाट वेगळी तुझी

रसिका राजीव हिंगे
अकोला


चित्रकाव्य






इंद्रधनू समवेत
नारळाच्या झावळीत
विसावला श्रावण ग
वसुधेच्या सावलीत

आल्या श्रावणाच्या सरी
निथळत धरेवरी
हिरवाई आनंदून
    झोके घेई  ग भूवरी

सागराची शांत गाज
मोहरला श्रावण ग
गंध उधळीत आला
ऐसा मनभावन ग

जांभुळल्या मेघांची ग
दाटी जाहली नभात
परी हळदुले ऊन
घेई गिरकी क्षणात

निसर्गाची ही किमया
दाखवितो ग श्रावण
येतो म्हणुनी फुलून
करा करा ग रक्षण


रसिका राजीव हिंगे












ही वाट वेगळी तुझी



ही वाट वेगळी तुझी
झेप घेण्यास आकाशी
पिलू पडले बाहेर
जीव येतोय कंठाशी

निसरडी आहे वाट
ही वाट वेगळी तुझी
टाक हळूच पाऊल
वाटे काळजी ग तुझी

भेटतील सवंगडी
ओळखीचे अनोळखी
ही वाट वेगळी तुझी
ठेव नजर पारखी

कीर्ती जावी दिगंतरा
हीच इच्छा आहे माझी
लाभो यश वाटेवर
ही वाट वेगळी तुझी

रसिका राजीव हिंगे

अबोला



धरलाय अबोला पुस्तकांनी
कितीतरी दिवस झाले आता
पहात पण नाही माझ्याकडे
किती विनविते बोला आता

टाळेबंदी आहे म्हणूनच
केलीस ना माझ्याशी गट्टी
ऐसे रागाने बोलून बोलून
घेतलीच पुस्तकांनी मग कट्टी

पुस्तकांचा हा अबोला मला
फारच सारखा छळतो आहे
वेळ कोणी देईल का उसना
वेळे  अभावी हे सारे  आहे

सरीवर सरी याव्या ज्ञानाच्या
विहरावे याच्या अक्षर मळ्यात
असे स्वप्न रंगवत जाते मी
अबोला सोड धर माझी संगत

रसिका राजीव हिंगे

Monday, 20 July 2020

चित्र काव्य



वाटेवरी या निर्जन
काय देऊ तुला बाळे
रूप तुझे आरस्पानी
कुठे लपवू न कळे

काय म्हणू तुज बाळे
नभातील तू चांदणी
सांग मला तू राजसी
सौंदर्याची आहे खाणी

आहे का ग तू विश्वाची
जन्मदात्री नि निर्माती
हास्य तुझ्या ऐसे गाली
कुंद कळ्याही लाजती

भावपूर्ण निरागस
डोळे तुझे ग टपोरे
मुख चंद्रमा तेजस्वी
हरवून गेलो सारे

नच तू कोणाचीच ग
माझी आहेस सावली
चंद्र न तारका नसे
फक्त बाबांची लाडली

रसिका राजीव हिंगे










Saturday, 18 July 2020

विवेकानंद



लहान असतांना कधीतरी गोष्ट ऐकली होती स्वामी विवेकानंद यांची.
स्वामीजी एकदा रस्त्याने जात असतांना त्यांच्या मागे माकडांची टोळी लागते. स्वामी घाबरतात., पुढे पुढे भराभर चालत जातात. मागे वळून माकडांकडे पाहणे आणि पुढे चालणे, स्वामी थांबले की माकडे थांबत, ते पळाले की माकडे पळत असं बराच वेळ सुरू होत. पण मध्येच स्वामीजींना वाटले असे भिऊन कुठपर्यंत चालायचे. त्यांनी वळून माकडांच्या दिशेने चालणे,पळणे सुरू केले आणि काय आश्चर्य माकडं पळून गेली. तेव्हाच स्वामीजींनी ठरविले संकटांना घाबरायचे नाही, त्याच्या समोर जाऊन दोन हात केले की संकटे पळून जातात कारण संकटं भित्री असतात.
या गोष्टीमुळे मी इतकी प्रभावित झाले की आजही मला ही गोष्ट प्रेरणा देते आहे. मी माझ्या मुलांना विशेष माझ्या मुलीला कायम ही गोष्ट सांगत असते आणि मी तर स्वतः आचरणात आणते च आहे. आपल्यावर कशीही परिस्थिती आली तरी तिचा स्वीकार करायचा, पळून न जाता तिला सन्मुख व्हायचे हे मला स्वामी विवेकानंदांच्या  या गोष्टीने शिकवले.
माझ्या जीवन वाटेवरचे हे गुरू मला असेच मार्गदर्शन करत राहो.
रसिका राजीव हिंगे.

आजचा विषय इतका सृजनात्मक आहे की बुद्धीला बरंच खाद्य मिळाले आहे. जसे मला स्वामी विवेकानंद वाचायला आवडतात तसेच सुभाषचंद्र बोस ही आवडतात, सावरकर तर म्हणजे माझ्या घरात,माझ्या विचारात आहेत.
त्यामुळे कोण जास्त आवडतं हा प्रश्न संपत नाही. हे ही छान, ते तर खूपच भारी. ग्रेसच्या कविता , रणजित देसाई, शिवाजी सावंत कोण कोण. असे कितीतरी आहेत मला माहीत असलेले आणि असेही खूपच आहेत जे मला माहीत नाहीत

स्वातंत्रवीर सावरकर


स्वातंत्रवीर सावरकर

असे घर तुझे कारा
नसे भीती तुज उरी
लेखणीची शक्ती पाहे
कापे थरथर बारी

घडविण्या मूर्ती तुझी
देव कोणता होता रे
                                                      होते कसे रसायन
                                                     सांगावया पुन्हा ये रे

लोक झालेत बेधुंद
किती ही अराजकता
विनायका ये भूवरी
पुन्हा घे लेखणी हाता

अंदमान बेटातुनी
तुझी कमला येऊ दे
सहा सोनेरी पानांची
सळसळ पुन्हा होऊ दे

विनवितो भारत हा
तुम्ही या सावरकर
चळवळ थांबली हो
शांत हा सागरतीर

रसिका राजीव हिंगे


हे सांग तुज उमजेल का




पाऊसधारा बरसत आल्या
आसमंत ही गंधित झाला
या निसर्गरम्य प्रशांतवेळी
प्रीत तुझी मज  गवसेल का?
हे सांग तुज उमजेल का?

नयनी आठव घन दाटले
पापणकाठी जरा थांबले
तुझीच सारी आठव माया
आज पुन्हा बरसेल का?
हे सांग तुज उमजेल का?

वाटुली पाहे तुझी सांजवेळ
तुजवीण उदासली कातरवेळ
साजशृंगार हा तुझ्याच साठी
परी कुणी  मज सजवेल का?
हे सांग तुज उमजेल का?









बघताच तुला मन मोहरले
आनंदूनी  गहिवर दाटले
तुझा हा आश्वासक आधार
सांग सांग मज हसवेल का?
हे सांग तुज उमजेल का?

ही प्रीत आहे माझी साजणा
तुला कसे काहीच कळेना
स्वप्नचित्रं रेखिलेले माझे
आता तरी तुज समजेल का?
हे सांग तुज उमजेल का?

                                                                                                                    रसिका राजीव हिंगे









ओळख




फक्त व्यक्ती भोवतीच नसते हो ओळख
पशु पक्षी,झाडे लतावेली ची होते पारख

आकाशाची ओळख देई शांत निळाई
सावळी धरा ओळखली का मृदगंधाई

मनातील भावनांची ओळख नयन देती
प्रीतीच्या कबुलीची  हळूच चुगली करती

सुख दुःखाची भाषा मुख चंद्रमा करी
वैखरीचे साधेपण ओळख हीच खरी

दगड विटा माती पाणी मेळ झालासे
ओळख देई पावित्र्याची मंदिर सुंदरसे

विविध भाषा विविध प्रांत एकच देश
माणुसकीची ओळख माझा भारत देश

रसिका राजीव हिंगे




Sunday, 12 July 2020

पहाट











सुशांत वेळ ही पहाटेची
पूर्व क्षितिजी केशर दरवळ
सलज्ज धरा उभी स्वागतास
मोहरली चराचरी हिरवळ

रविराज रथात बैसोनिया
शिंपण तेजाचे करीतसे
बहरली पानफुलांनी धरा
अमृत सिंचन स्वीकारतसे

अवगुंठन ऐसे धरणीचे
तेजाचे नि गंधाळलेले
पारिजात होई प्रहर प्रहर
क्षणक्षण येति आनंदलेले

ऐशा प्रसन्न पहाटवेळी
नामस्मरणाचा व्हावा नाद
दत्त दिगंबर दत्त दिगंबर
गुरुराजास घालावी साद

स्मर्तृगामी सद्गुरुनाथ
दत्तात्रेया रामगुरूराज
ध्यास लागो रामनामाचा
हेचि  इच्छिते रसिकराज

शुभ सकाळ
रसिका









Saturday, 11 July 2020

पिलासाठी सारे काही

किलबिल पाखरांची
भासे सुरेल गायन
शुभ सकाळ जाहली
गोड मधूर गुंजन

सोनसळी प्रभातीस
भास्करचे आगमन
अन्नकण वेचतांना
होई नादमय गान









भिरभिर पाखरांची
चाले अशी दिसभर
सुंदरसे घरटे ही                                                 
बांधीयले वृक्षावर

येता पंखामध्ये बळ
पिलू जाय दिगंतरा
सांगे गुज आनंदाचे
कानी रुणझुण वारा

पिलासाठी सारे काही
क्षणक्षण आणि पळ
कधी होई गळाभेट
कधी विरहाची झळ

शुभ सकाळ
रसिका




संवाद



















शोध घेत चहूकडे
मन ऐसे भिरभिरे
गर्दी किती सभोवती
संवाद ना कोणी करे

सुख क्षण आनंदाचे
कसे कोणास सांगावे
कधी दुःखाचे उमाळे
एकटेच का सोसावे

बहू माध्यमे असती
साधावया संवादासी
परी भासे अपूर्णच
मनातले बोलण्यासी

भेट प्रत्यक्ष घडावी
ऐसे क्वचितच होई
शर्यतीच्या अश्वासम
प्रत्येकच धाव घेई

फिरतसे अव्याहत
कालचक्र गोलाकार
संवादाने प्रकटावे
प्रत्येकाच्या ओठावर

रसिका









Friday, 10 July 2020

विदुषक/सर्कस






आला आला विदुषक
सर्कशीच्या रिंगणात
कोण कोण बरोबर
दिसे विविध रंगात

धडपडे खोटा खोटा
डोळे फिरे गरागरा
उड्या मारी टुनटुन
पहा चाले भराभरा

नाकावर शेंडा लाल
टोपीचाही गोंडा छान
वेशभूषा ती विचित्र
मधुनच घेई तान

चेष्टा नाना करुनिया
हसवितो बाळे सान
रंगवून चेहऱ्याला
दुःख लपवी महान

सर्कशीत प्राण्यांसवे
जीवघेणे ऐसा खेळे
घरी कारभारीण ती
पाहे वाटुली हो बाळे

रसिका राजीव हिंगे




Thursday, 9 July 2020

भेटे मज तुझिया रूपे



भेटे मज तुझिया रूपे
श्रीहरी सखा ठायी ठायी
कोणत्या रूपे भेटशील
याची काही खुण तू देई

पाऊस धारा होऊनिया
भेटे मज तुझिया रूपे
सुजलाम सुफलाम धरा
होई वरुणा तुझ्या स्वरूपे

मंद शांत निळी झुळूक
आल्हादक होई मानस
भेटे मज तुझिया रूपे
घननीळ कृष्ण राजस

सहनशील तू भूमाता
मातृत्वाची तुझी रूपे
बीजांकुरातून चराचरी
मज भेटे तुझिया रूपे

धीरगंभीर नभांगण
सामावून घे विश्वरूपे
क्षमाशील तत्व सांगत
मज भेटे तुझिया रूपे

भवसागरी तरतांना
नौका लाभे गुरुकृपे
सद्गुरुनाथा काय सांगू
सारे भेटे तुझिया रूपे

रसिका राजीव हिंगे











थाप

ढोलकीवर थाप पडता
पावले थिरकती
पाठीवर ची थाप
कौतुकाचे गीत गाती


नाविका नाव माझी
घेऊन चल तीरावर
थाप नीट सांभाळ
                                                      क्षणात गाठू पैलतीर


थापाड्याची थाप
किती ऐकशील ग
बोल बाताड्याशी
किती बोलशील ग


 विश्वासाची थाप देई
 जगण्याचे बळ
सहकार्याची थाप
वाढवी आत्मबळ


 प्रेमाची थाप देता
नसे शिक्षा काही
प्रेमात तर सारेच
सहज मान्य होई


धीराची थाप जरी
असेल ही फसवी
आश्वस्त करत करत
सारेच जीवन जगवी

रसिका

सहज सुचलं म्हणून...ध्यास




"झालं का ग तुझं?"
"जाऊ दे ग मला काही जमत नाही ग बाई !"
"अग असं कसं जमत नाही?" नीट लक्ष दे म्हणजे कळेल कस करायचं ते. कोणतंही काम असो माझं उत्तर आईला नेहमी ठरलेलं असायचं. आणि तीही अगदी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या शब्दात मला सांगायची.
"येत नाही याचा अर्थ सरळ आहे तू लक्ष घालत नाही कामात. कोणतंही काम जर यावं असं वाटत असेल तर त्याचा ध्यास घ्यावा लागतो ग. तसं नाही जमत वरवर नुसतं." किती मोठं तत्वज्ञान सांगायची न आई. विश्वामित्रा सारखं मागे लागलं पाहिजे हे नेहमी ती म्हणायची. म्हणजे काय हे मला आजही कळलेलं नाही. असो.
ध्यास घेतल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. अगदी छोटं काम सुद्धा.
साधी परीक्षा जरी असली शाळेची तरी सुद्धा त्या परीक्षेचा ,अभ्यासाचा ध्यास लागत नाही तोपर्यंत यश आपल्याकडे पाहत पण नाही. होऊन जाईल असे म्हटले की निकाल बरोबर जागा दाखवून देतो. ज्यांनी तन मन धन झोकून दिलेलं असत ते यशोशिखरावर आरूढ झालेले असतात.
आयुष्यात जगतांना सुद्धा जगण्याचा म्हणजे केवळ साधं जगण्याचा नाही तर काहीतरी चांगले कर्म करून,कीर्ती मिळवून जगायचे असेल तर त्यासाठी क्रमबद्ध तयारी करावी लागते , ध्यास घ्यावा लागतो तरच शक्य आहे अन्यथा जन्मला आलो अन.....
आजच्या तरुण पिढीला एक वेगळीच झिंग आली आहे जगण्याची. भरपूर पैसा कमविण्याचा जणू ध्यास लागला आहे. पण हा ध्यास सुखाचा मार्ग नाही तर सतत चिंता, टेन्शन देणारा आहे. हे कळायला हवं आहे आता या पिढीला.
भवसागर पार करायला नामस्मरण, भक्ती हे छान साधन आहे. पण जितकं सोपं आणि छान आहे तितकंच साध्य व्हायला कठिण. गुरुचरणाचा ध्यास जोपर्यंत लागत नाही,उठता बसता,जळी,स्थळी,काष्ठी,पाषाणी फक्त नाम दिसत नाही, नामाचा ध्यास लागत नाही तोपर्यंत  साधना फलद्रुप होत नाही.
थोडक्यात काय तर काहीही साध्य करायचे असेल तर त्याची आस हवी म्हणचे ध्यास लागतो, जेव्हा ध्यास हा श्वास होतो तेव्हाच आणि तेव्हाच प्रत्येक साध्य खास होतं. आणि हे जे खास  साध्य आहे न त्याचा कधीच ऱ्हास होऊ शकत नाही  त्याचा आपणांस नेहमीच सहवास लाभतो असं मला वाटतं....

रसिका राजीव हिंगे


चित्रकाव्य



निःशब्द वाटेवरी हिरवाईच्या संगती
आभाळ भारलेले धारा केव्हा बरसती

चालत चालत जावे लांब लांब कुठपर्यंत
आकाश धरेस टेकते त्या क्षितिजापर्यंत

हिरवाई माझी सखी या रम्य वाटेवरती
अबोल ऐसे संवादन होई तिज संगती

मनातले गुपित माझे सांगते मी सखीला
शीळ घुमवित येईल ग कोण या वाटेला

एकटी नव्हे ग मी, आहे निसर्ग सोबती
स्वप्न रंगवीत चालते धुंद या वाटेवरती

रसिका राजीव हिंगे












Saturday, 4 July 2020

गुरू




अवघे चराचर गुरू असे भासे मजसी
गुरू आहे एक तत्व ऐकावे या कथेसी

शोधण्यास गुरुसी न हिंडावे रानी वनी
सद्शिष्यासी शोधीतीसे गुरू क्षणोक्षणी

जन्मजन्मांतरीच्या भाग्याने गुरू लाभतो
पूर्वजांच्या पुण्याईने जीवनी गुरू भेटतो

गुरुपीठ परंपरा चालवी दत्तगुरु त्रिमुर्ती
चोवीस गुरू करुनी दे शिकवण जगती

गुरूवीण नसे ज्ञान नसे गुरूवीण शक्ती
गुरूवीण नाही मोक्ष नसे गुरूवीण भक्ती

भगवंताला नसे नाम देती त्यास भक्त
गुरुकृपेच्या बळावरी साधले हे फक्त

गुरुकृपेचा स्पर्श होता साधते साधन
गुरूवीण नाही सृष्टीवरी  नर नारायण

घाली मायेची पाखर  धरी कृपासावली
म्हणूनच म्हणती सारे  गुरूसी माऊली

गुरुच असे सारथी चालविण्या जीवनरथ
साधून घ्यावी  पर्वणी होई जीवन कृतार्थ

रसिका राजीव हिंगे














बघ नौका जाती दुरुनी



नात्यांचा गोफ विणतांना
प्रत्येक धागा घट्ट विणला
काही सुटत गेले तरी                                                         
गोफ नाही सैलावला
सुखाच्या समिंदरातूनी
दुःखाच्या नौका जाती दुरुनी

ताळमेळ संसाराचा ह्या
कधीच नाही जमत बयो
अधिक असले सारे तरी
वजा काही होत जात बयो
अर्थाच्या ह्या सागरातूनी
हौसेच्या नौका जाती  दुरुनी

संसाराच्या सारीपाटावर
मनासारखे दान पडले
संसारवेल ही बहरली
सारेच असे जुळून आले
आज मात्र वादळातुनी
एकच नौका जाते दुरुनी

वादळात ही शीड उभारून
नौका भवसागरी डोलते
गुरुकृपेचा नाविक भेटता
जीवन नौका सहज तरते
वडवानल पेटला जरी
माझी नौका जाते दुरुनी

रसिका राजीव हिंगे








Wednesday, 1 July 2020

सहज सुचलं म्हणून....बाप


                                                                             

'हॅलो '
"कोण बोलतंय?"
"तुझा बाप!"
असे शब्द ऐकले फोनवर की समोरचा क्षणभर का होईना बावचळत असेल किंवा अगदीच निडर असेल तर एक निमिष हादरत असेल, इतकी शक्ती आहे या बाप शब्दात. याच्यापुढे कोणीच नाही. सुप्रीम authority  म्हणजे बाप, वडील, बाबा, पिता, तात. एक संरक्षक कवच असतं बाबाच आपल्या व्यक्तिमत्वाभोवती. कर्णाला जसे जन्मतः कवच कुंडले मिळाली होती तसेच असतात बाबा आपली कवच कुंडले.
आईसारखे बाबांशी पटकन कनेक्ट नाही होता येत. एक प्रकारचा भीतीयुक्त आदर असतो बाबा.  कितीही मोठी संकट आली तरी बाबा भक्कमपणे उभा असतो पाठीशी. आपल्या आयुष्यातले आनंदाचे क्षण आपल्याही नकळत तो साजरे करत असतो. नंतर केव्हातरी कळतं. आई बाबा होणं इतकं सोपं असतं का? असे उद्गार एका डॉक्टर ने मला ऐकवले आहे. खरच आहे हे सोपं नाहीच . आणि त्यातल्या त्यात बाबा होणं तर फारच कठीण असं मला वाटतं.  त्यांचे कणखर संस्कार आपल्या नकळत आपल्यावर होत राहतात.  आपल्या आयुष्यात बाबांचं काय स्थान असतं हे बाबा नसले जास्त जाणवतं.
बाबांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. आईला परमेश्वराचे रुप मानतात, पण बाबाला पर्याय नाही. बाबा हा अतुलनीय,अभेद्य आहे कारण बाप बापच असतो असं मला वाटतं...
रसिका राजीव हिंगे
8600047066

चित्रकाव्य अंकुर



खोडातून निष्पर्ण या
आले अंकुर बहरात
जगण्याची जिद्द होती
आलो फुलून क्षणात

वाऱ्यासवे उन्मळून
होतो निष्पर्ण वनात
धारा झरझर आल्या
आलो फुलून क्षणात

अंकुरला देह सारा
होई अंगांग हरित
पाने फुले फळे येती
आलो फुलून क्षणात

उभारलो आनंदाने
पुन्हा जगू दिमाखात
ऐसे मनी ठरविता
आलो फुलून क्षणात

राजा म्हणती आंब्यास
भरे अमृत रसात
कळले हे  विचारांती
आलो फुलून क्षणात

गुज एकच सांगतो
जगा सारे आनंदात
माझ्यासम बहरावे
यावे फुलून क्षणात

रसिका राजीव हिंगे