Tuesday, 29 March 2022

आवर सावर

 



     ऑफिस मधून  घाईघाईने घरी निघाली. चार दिवसांवर आलाय गुढीपाडवा. म्हणजे हाच शनिवार आणि रविवार आहे घर आवरायला. कसं होईल? असा विचार करतच घरात शिरले अन भराभर आज जास्तीत जास्त आवरून घेऊ असे ठरविले. आपल्या भारतीय संस्कृतीत सण आले की घर आवरण्याचे वारे वाहू लागतात. मुख्यत्वेकरून गुढीपाडवा, दिवाळी या सणांना तर विचारायलाच नको. घर स्वच्छ करण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागली असते. 

     हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा असो की दिवाळी असो, संक्रांत, नवरात्र, घरी कोणी येणार असेल तर घर आवरले गेलेच पाहिजे. "एवढा मोठा सण वर्षांतुन एकदा येतो तर घर स्वच्छ करायला हवेच. शिवाय घरावरून वर्षांतून एकदा तरी हात फिरला पाहिजे त्याशिवाय कशी बरं घराची ओढ लागेल. घरातल्या लक्ष्मीचा हात जिथे जिथे फिरे तिथे लक्ष्मी वास करे." इति सासूबाई. सासूबाईचे घर आवरणे म्हणजे घरातली प्रत्येक वस्तू स्वच्छ व्हायला हवी.  स्वतः पुढे होऊन करायच्या. थकणे वगैरे प्रकार माहीतच नव्हता. "आताच तर घासले पाच सहा दिवसांपूर्वी हे चार डबे. पुन्हा का घासले?" असे विचारले तर  सगळेच छान चकचकीत दिसतात आहे मध्येच असे हे चांगले दिसत नाही." किंवा मौन उत्तर ठरलेले. त्यावेळी राग यायचा, पण आता मला ही सवय इतकी अंगवळणी पडली की मी पण असाच विचार करू लागले . माझेच मला कधी कधी आजकाल हसू येतं. घराचे संस्कार सासूबाई अशा पद्धतीने करत होत्या माझ्यावर. कधी रागावून, कधी मौन पाळून तर जास्त वेळा प्रेमाने, व्यवहाराची कास धरत.  माझी आई तर दर महिन्याला किराणा भरण्याआधी सगळे डबे घासून ठेवायची. स्वच्छ असले तरी.  एखाद्या डब्यात काही राहून गेले तर खराब नको व्हायला म्हणून सगळे डबे पाहायचे, रिकामे असलेले घासायचे. तेव्हा वाटायचे काय ही रिकामी कामं करते. पण आता त्याचे महत्व पटते आहे. संसारात रमण्याचा हा एक भाग असू शकतो असे वाटतं.  

     आजही घर आवरायला घेतलं की, जाऊ दे यावेळेस जास्त आवरू नाही . फक्त पुसपास करून घेऊ असे म्हणत म्हणत सगळंच चकचकीत केल्या जात. काही राहून नको जायला आवरायचे म्हणून रात्री जागून नाहीतर सकाळी लवकर उठून आवरले जातं अन मग मिळतं समाधान. खूप बरं वाटतं अशावेळी.

     घर आवरतांना त्या त्या वस्तूंशी जणू मूक संवाद सुरू असतो,  त्याच्याशी निगडित कडू गोड आठवणी जाग्या होतात. काही वेळेस पापणकाठ ओलावतात. अडगळ म्हणून वाटल्या तरी काही वस्तू फेकवत नाहीत. पुढच्या वेळेस  बघू असे होत होत घरात अडगळ साचत राहते. एकूण काय तर मन एकाग्र होतं अन पुन्हा भूतकाळातील आठवणी दंगा करायला लागतात. मनातला पसारा वाढत जातो. मन आवरायचे राहूनच जाते. 

     वेळेची मर्यादा असल्यामुळे घर आवरणे तर होऊन जातं पटकन, पण मन आवरणे कधी जमत नाही.  असे का व्हावे? दोन्ही ठिकाणी एकच क्रिया आवरण्याची,  तरी मन काही अडगळ कमी करू देत नाही.  सगळा पसारा सोबत घेऊन स्वच्छंद पणे उंडारत असतं दाही दिशांना.... 


©️रसिका राजीव हिंगे

Sunday, 27 March 2022

 चित्रकाव्य



काय शोधिसी चौकटीतले

काय हरवले तुझे सांग ना

भय नच ठावे उंचावरती

काय गवसले जरा सांग ना


काऊ चिऊ सवे खेळता

शिकवण देते कोमल ममता

शौर्याची ती गाथा प्रसवेल

बालपण असे जपता जपता


आनंदाच्या सोपानावर

वात्सल्याचे गाव लागते

सरसर उंची गाठत गाठत  

हवेहवेसे गवसत जाते


प्रयत्नांतीच मिळेल मेवा

चौकट मोडून ये बाहेरी

यशोशिखर तुज खुणवत आहे

पण संस्कृतीस जप परोपरी


©रसिका राजीव हिंगे








भगवद्गीता






वेदव्यासा लाभे ऐसें

आंदण दिव्यशक्तीचे

भूर्जपत्रावरी लेखन

अवकाशातील लहरींचे


पाराशर्ये ग्रहण करी

अवकाशीची ज्ञानाक्षरे

रणांगणी पार्थासाठी

भगवंत जे जे  उच्चारे


ऐसी ही भगवद्गीता

कळे जया तो भाग्यवंत

ममैवांशो जीवलोके

सांगे प्रत्यक्ष भगवंत


शरणागत होई भक्ता

सोडून दे अवघी चिंता

मोक्षाचे द्वार खुले असे

मम चरणी विसावता


सुखोपभोग, मनःशांती 

लाभे जीवा अपरंपार

भगवद्गीतेने कथीयले 

अवघ्या जीवनाचे सार


आपण सारे अर्जुन 

पाश्चिमात्यास कळले

अद्वैताचे दान घेण्यास

उगवतीस सारे निघाले



©®रसिका राजीव हिंगे









Thursday, 17 March 2022

मोहर पाचूच्या पानांचा

     


     अल्लडशा पाऊस धारा

     विरुनी गेल्या वाऱ्यावर

     हरित झाली सृष्टी सारी

     वसंत उभा उंबरठ्यावर


     ठायी ठायी शिशिराची पानगळ सरली अन सळसळत्या पानांचे पैंजण लेऊन, जणू हिरव्या पाचूने सालंकृत होऊन सृष्टीचे रूप बहरले. कोवळे कोवळे गुलाबीसर पानांचे देठ कोवळी सुगंधित हिरवाई लेऊन उभे ठाकले, वसंतांच्या  स्वागतास. ही हिरवाई शुभकारक, मनमोहक, आकर्षक आणि सृजनात्मक. 

     निसर्ग चक्र फिरत राहतं आणि ठराविक वेळी बदल होत राहतात, हेच ऋतू. ऋतूंचे बहरणे म्हणजे हा एक महोत्सव असतो. प्रतिक्षण सृष्टीचे सृजन सुरू असले तरी वसंत ऋतू आला की सृष्टी ही नवयौवना नववधू भासते. 

     भिरभिरणारा वारा शीळ वाजवत नुकत्याच यौवनात पदार्पण केलेल्या हिरव्या पानांशी उगाच सलगी करण्याचा प्रयत्न करतो तर राम प्रहरी सोनसळी सूर्य किरणे पानांना कवेत घेऊ पाहतात की ही हिरवाईच रविराजाला बिलगु पहाते काही कळत नाही. सृष्टीचे हे मनमोहक रुप पाहण्यासाठी रविराजाचा रथ पूर्वक्षितिजावर पहाटेस लवकर येण्याची घाई करतो. तसे पाहिले तर प्रत्येक ऋतूत सृष्टी ही मोहकच आहे तरीही वसंतातील हे मनभावन सृष्टीचे रूप वेड लावणारे आहे.

     पाचूच्या रत्नासम भासणारे  हिरवे तोरण सृष्टीने दारी बांधले आहे, हिरव्या पानांमधून लाल ज्योतीसम दिसणारे पळस, पांगारा, गुलमोहर म्हणजे चाफा,मोगरा, निशिगंध या फुलांच्या अत्तराचे दिवे  लावले आहेत  की काय असे भासावे. सारा आसमंत गंधाने दरवळतो आहे. 


            आंब्याच्या हिरव्या पानात आणि पिवळ्या मोहरात लपलेली एखादी छोटीशी कैरी हिरवीकंच पैठणी ल्यायलेल्या  नवगर्भार सृष्टीचे डोहाळे पुरविण्यास आपल्या अस्तित्वाची दखल देत झाडावरच झोके बांधते अन कोकीळ सृष्टीचे मन रिझवण्यासाठी दाट आमराईत लपून गीत गायन करतो.

     ह्या नवयौवना नववधूचे पाचूच्या रत्नांसम हिरवाईने नटलेले हे रूप म्हणजेच वसंत ऋतू. 


©®रसिका राजीव हिंगे

     

Monday, 7 March 2022

अडगळ

 




 " काय ग! काय झालं? अस्वस्थ का आहेस एवढी? "  

"सुचतंच नाही ग काही. सारखी घालमेल होते आहे. मन कुठेच का स्थिर होत नाही. वाईट विचारच जास्त येतात माझ्या मनात."

"एक सांगू का? तुझ्या डोक्यात आणि मनातही जो विचारांचा भडका उडाला आहे न तो आधी शांत कर.नाही नाही ते विचार करत बसते, कोण काय म्हणेल, कोणाला आवडलं नाही तर, माझ्या बद्दल त्यांच्या मनात गैरसमज तर नाही होणार न, असे आणि यासारखे किती बावळटपणा सारखे प्रश्न घेऊन फिरत असतेस. त्यामुळे हे सगळं. कळलं?"

"अग पण कितीही आवरले तरी तेच ते सारखं मनात येत राहतं आणि अस्वस्थ व्हायला होतं. नामस्मरण सुद्धा सध्या नीट होत नाहीये."

"हे बघ, आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर नव्हे प्रत्येक वेळी कोणी न कोणी आपल्याला जज करतच असत. म्हणून काय तू जगणं सोडून देते आहेस का? झालं गेलं गंगेला मिळालं असा विचार जोपर्यंत करत नाहीस तो पर्यंत ही विचारांची अडगळ तुला त्रास देतच राहील. आता फेकून दे मनातील, डोक्यातील अति साचलेली, कुजलेली विचारांची अडगळ अन बंद कर मनाची कवाडे. याशिवाय मन प्रसन्न होणार नाही"

असे उपदेशाचे डोस पाजून माझी मैत्रीण निघून गेली घरी. पण खरंच असं होतं का मनातली ही अडगळ दूर करण्यात कोणी यशस्वी झाले असेल? ओढाळ बैलासारखे मन पुन्हा पुन्हा तेच तेच खूप दिवसांपासून साचलेले विचार करत असतं बऱ्याचवेळा. नवीन विचारांची भर पडते तसे जुन्या गोष्टी नको का निघायला सरळ. असा काहीतरी फंडा मिळाला पाहिजे. साठत जातं, आतल्या आत. काढून टाकू म्हटले तरी काढता येत नाही.जसे काही सोन्याचे ,हिऱ्याचे दागिने आहेत पिढ्यानपिढ्या जपून ठेवायला.

घरातील अडगळ तरी एखाद्या वेळी अट्टहासाने काढली जाते, पण मनातील अडगळ मात्र कायम आपल्या सोबत असते सखीसारखी.  हो सखीच. सखीचे विचार पटले नाही, तिची एखादी गोष्ट खटकली तरी आपण मैत्री तोडत नाही, क्षणभर अबोला होईल पण खरी सखी सोबतच असते. नाही का?

मनातल्या विचारांची अडगळ खरंच कमी करायची असेल, बाहेर अगदी फेकून द्यायची असेल तर नामस्मरण हाच एकमेव उपाय आहे यावर. सद्गुरू चरणी सगळं समर्पित करून फक्त नामस्मरण केले की एखाद्या वेळी शक्य होईल या अडगळीच्या तावडीतून सुटणे. अन्यथा जे आहे ते असेच सुरू राहील....


©रसिका राजीव हिंगे

     

रूप

 




रूप अनेक परी तू एकची

कसे ओळखू सांग मजसी

अंतरंगात तूच वसतो का

की  भास अन तू आभासी


     तुझे रूप कसे आहे? हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. तू कसा दिसतो, तुझी वेशभूषा कशी असेल, तू कसा प्रत्येकाच्या हाकेला साद देतोच असे आणि याहीपेक्षा जास्त प्रश्न मला पडले होते... पण हे मनाला भुरळ घालणारं निसर्गाचं रूप पाहिलं आणि तू कोण आहेस, कसा आहेस ते मी माझ्या मनानेच ठरवू लागले. अर्थात प्रत्येकाला हवे तसे तुझी मूर्ती डोळ्यासमोर ठेवून तुला पूजतात, सजवतात आणि भक्तिमय जगतात. 

     निळ्याशार नभाचे रूप घेऊन तू असा समोर येतोस ना तेव्हा कळते तुझी विशालता. तू किती उदार आहेस हे लक्षात यायला लागतं जेव्हा तू ही आभाळाची उबदार शाल घेऊन आमच्यावर मायेची पखरण करतोस. तुझ्या विशाल हृदयात आमचे सगळे अपराध साठवतो. 

     बघ ना कसा अगदी हिरव्यागार वृक्षाच्या रुपात उभा राहून माऊलींच्या ममतेने कुशीत घेतोस, सहस्र बाहू पसरलेल्या तुझ्या कृपासावलीत आश्रय मिळाला न की मानव जन्माला आल्याचे सार्थक झाले असे वाटते. 

     कधी डोंगर कपारीत तर कधी झुळझुळ वाहणाऱ्या निर्झरा सम अवखळ, अल्लड, बालिश, मोहक रुपडं वेड लावतं रे अक्षरशः. खळाळणारा पाण्याचा आवाज ऐकला न  की वाटतं संगीतातले स्वर असेच निर्माण केलेस तू. सुरेल,लयबद्ध, ताल धरायला लावणारी समिंदराची  लाट असो की शांत वाहणारी गंगा,कृष्णमाई असो या तुझ्या  निर्मितीला नकळत दंडवत घातल्या जातो आणि हेही तुझेच रूप तर नसेल न असा प्रश्न ही मनाला पडतो.

     कणाकणात, चराचरात तूच तू  भरलेला आहेस. इतकेच नव्हे तर  "ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः" म्हणजे प्रत्येक प्राणिमात्र तुझेच अंश आहेत हे तू गीतेत अर्जुनाला ठासून सांगितले आहे. 

     एवढं मात्र खरं आहे की निसर्गच म्हणजे तू, निसर्गाचाच एक भाग म्हणजे ही जीवसृष्टी आणि यात सामावलेला तू म्हणजेच परमात्मा आहेस, किती रूपं घेतोस! अशा विविध रुपात तू समोर येतोस तरीही आम्ही तुला ओळखू शकत नाही हा किती मोठा दैवदुर्विलास आहे. खरे आहे न?...... असे असले तरी तुझे प्रत्येक रूप हे विलोभनीय आहे, मनमोहक,मनभावन आहे....

     

©®रसिका राजीव हिंगे