सद्गुरू कृपेने जे ऐकले, वाचले, कळले तेच लिहिले.
सर्व येथे राहणार l काही न येई बरोबर l
सत्कर्म आणि सदाचार l हेचि जीवाचे सांगाती ll
श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्रीगुरुचरित्रातील ही ओवी, ह्या ओवीची ओळख आधी श्रीगुरूंनी करून दिलेली, नंतर कळले संक्षिप्त श्रीगुरुचरित्रातील ही ओवी आहे. श्रीगुरु कायम सांगत असतात. नित्य नियमाने जणू या ओळींची आठवण करून देत असतात. हे सद्गुरुंचे सांगणे, नुसतेच सांगणे नाही तर वारंवार सांगणे..मनावर ठसविणे... सांगणे म्हणजे शिकवणे...सद्गुरू शिष्याला शिकवतात. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत शिकवतात. आयुष्याला दिशा देणारे वचन. वास्तवाची जाणीव करून देणारे शब्द. श्रीगुरूंच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द म्हणजे वेदवाक्य. श्रीगुरु सांगतील तेच प्रमाण. हा भवसागर तरुन जायचा असेल तर श्रीगुरु सांगतील तेच, तेवढेच आणि तस्सेच वागले तरच शक्य आहे. केवळ भक्ताच्या कल्याणासाठीच वारंवार एकच गोष्ट प्राधान्याने श्रीगुरु सांगतात. असे असले तरी श्रीगुरु असे कर तसे कर असं काही सांगत नाही पण अप्रत्यक्ष पणे इशारा करतात. म्हणजे hint पास करतात. ते ज्याला कळले तो हा भवसागर सहज तरुन जाईल. सत्कर्म करायचे, सदाचरण म्हणजे काय याची जाणीव सद्गुरू करून देतातच. त्यांच्या शब्दातला गर्भितार्थ कळायला हवा.
मान, सन्मान, यश, किर्ती, धन दौलत, नात्यांचे बंध सगळे इथेच सोडून जायचे आहे. कारण ते नाशिवंत आहे. यातील काहीही सोबत नेता येत नाही. सोबत येणार आहे ते फक्त सत्कर्म आणि सदाचार.
कर्म याचा साधा सरळ अर्थ म्हणजे काम करणे. जे जे काम किंवा क्रिया करतो ते सगळे कर्म होय. कर्माशिवाय कोणताही मनुष्य राहू शकत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाला कर्म करावेच लागते. कारण प्रत्येक जन्माला आलेला जीव त्रिगुणांच्या स्वाधीन आहे, त्यामुळे त्रिगुण कर्म करायला भाग पाडतातच. शास्त्रानुसार प्रत्येक क्षण हा सत्कर्मातच घालवायला हवा. प्रत्येक कर्म निष्काम भावनेने केलेले असावे. कर्म करून त्याच्या फळाची आसक्ती न ठेवता केलेले कर्म नैष्कर्म होय. असे शास्त्रविहित कर्म म्हणजे सत्कर्म, सदाचरण. जे कर्म आपल्या मनाला आनंद, समाधान देतात, ज्याच्यामुळे इतरांचे कल्याण होते ते सत्कर्म. स्वतः करता केलेले नसून केवळ दुसऱ्या करता केलेले असते ते सत्कर्म. केलेल्या कर्माचे कर्तेपण स्वतःकडे न घेता म्हणजे निष्काम भावनेने केलेले ते सत्कर्म. म्हणजेच चांगल्या कर्माला शास्त्रीय भाषेत सत्कर्म म्हणतात. समजा बाहेर निघायच्या वेळी एखादा अतिथी आला तर त्याचे स्वागत आनंदानेच करता आले पाहिजे. अतिथी म्हणजे तिथी, वार, वेळ न सांगता आलेला. आता कशाला आले हे अवेळी, छान बाहेर जायचं प्लॅन होता सगळा फिस्कटला यांच्यामुळे असा विचार मनात सुद्धा येता कामा नये. मनात जरी विचार आला तरी त्याचा ओरखडा उठतोच, ईश्वर दरबारी त्यांची नोंद होतेच. त्यांची खाण्या राहण्याची व्यवस्था नीट केली तर ते ही प्रसन्न होतात आणि आपल्याला ही समाधान मिळते. मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता केलेले कर्म हेच शास्त्र विहित सत्कर्म, सदाचरण. आता नोकरी व्यवसायातील कर्मे निष्काम करणे शक्य नाही कारण फळ मिळाले नाही तर प्रपंच कसा चालेल? इथे फळाची अपेक्षा आहेच पण फसवणूक, लुबाडणूक करून व्यवसायात्मक कर्म नको. अट्टाहासाने कुणाला लुबाडले असे नको. "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" हे लक्षात ठेवता आले पाहिजे तरच ते सत्कर्म होईल. मोठमोठे हॉस्पिटल बांधणे, शाळा बांधणे, अन्नछत्र, पाणपोई चालवणे, शिक्षणासाठी होतकरू विद्यार्थ्याला मदत करणे हे सत्कर्मच आहेत. पण मी केले, मी बांधले, माझ्यामुळे झाले असे मी मी माझे माझे मिरवून कर्मयोगी वगैरे बिरुदे स्वतःला लावून घेतात. त्यामुळे निष्कामता जपल्या जात नाही. अशी सकाम कर्म केली की त्याचे फळ ही तसेच तात्पुरते आहे. फळाची आशा, अपेक्षा केली की त्याचा काहीही उपयोग होत नाही. मुलांचे संगोपन, त्यांचे शिक्षण, त्यांच्यावर आपल्या आचरणातून होणारे संस्कार हे उत्तमरित्या व्हावे हे पालकांचे कर्तव्य आहे. यामध्ये कुठेही आशा, अपेक्षा न ठेवता करता यावे. म्हातारपणाची काठी म्हणून जर मुलाकडे पाहिले अन् तसे झाले नाहीतर जे दुःख होते ते शब्दातीत आहे. अपेक्षा केली की अपेक्षा भंग ठरलेलाच आहे. आईवडिलांनी व्यवस्थित संगोपन केल्यावरही जर मुलाने सांभाळले नाही तर हे प्रारब्ध आहे. अपेक्षा ठेवलीच नाही तर दुःख होतच नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला कर्म ठरवून दिलेले आहेत ती करावीच लागतात किंवा आपण स्वतः स्वीकारलेली, पत्करलेली कर्मे निभावून नेण्यातच इति कर्तव्यता आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंतानी सांगितलेच आहे, " " ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालंक्षीणे पुण्य मर्त्यलोकं विशन्ति । एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥" सकाम भावनेने वेदविहित आणि यज्ञादि कर्मे करणारे, भगवंताची उपासना करून पापमुक्त लोक स्वर्गप्राप्तीच्या कामनेने कर्म करतात. इंद्रलोकात दिव्य भोग भोगतात. पण पुण्याचा संचय संपला की पुन्हा तीन वेदात सांगितलेले कर्माचे पालन करून हे सकाम कर्मी यांना मृत्युलोकात यावेच लागते. म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका नाहीच. म्हणून निष्काम भावनेने कर्म केले की बंधनात अडकत नाही. हेच सद्गुरूंना सांगायचे आहे. कर्म कर पण कर्मफळाची अपेक्षा करू नकोस ह्यालाच सत्कर्म म्हणतात. असा अप्रत्यक्ष इशारा सद्गुरूंनी दिला आहे.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, " विधीते पाळीत l निषेधाते गाळीत l मज देऊनि जाळीत l कर्मफळे ll विधीचे पालन म्हणजे त्याग. कर्मफळ मला(भगवंताला) अर्पण कर म्हणजे ती निःशेष होतील. वेदविहित, शास्त्रानुसार कर्म करायचे, कर्मफळाची आशा बाळगायची नाही आणि कर्तृत्वाची अपेक्षा करायची नाही हे कर्मसिद्धांत आहे. या सिद्धांतावर आधारित कर्म केले तर ते निष्कामच होईल. हेच सांगायचे आहे श्रीगुरूंना. निष्काम भावनेने कर्म केले की चित्त शुद्ध होईल. "सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ।" सुख दुःख, यश अपयश, लाभ हानी, कीर्ती अकिर्ती याचा सम पातळीवर विचार केला म्हणजे सुखाने न हुरळून जाता आणि दुःखाने होरपळून न जाता चित्ताची समाधानता ठेवता आली तर निष्कामता जोपासल्या जाईल. प्रत्येक निष्काम कर्म ही भगवंताची पूजा आहे या भावनेने केले तर भगवंत प्रसन्न होतो. त्यामुळे मन प्रसन्न होऊन बुद्धी स्थिर होते. तसेच अखंड नामस्मरण. माझ्या श्रीगुरूंनी सांगितले आहे, नामस्मरणाचे मोठे मोठे गाठोडे बांधा, तेच सोबत येणार आहे. अखंड अनुसंधान ठेवायचे आहे भगवंताशी. नामस्मरण हाच सदाचार आहे. जीवनात उपासनेचे अनन्य साधारण महत्व श्रीगुरु अधोरेखीत करून देतात. निष्काम उपासनेचे बीज सद्गुरू पेरून देतात. त्याला खत पाणी घालण्याची जबाबदारी शिष्याची आहे. कारण क्रियामण कर्म करण्याचे अधिकार मानवाला प्रदान केले आहेत ईश्वराने. श्रद्धेने आणि समर्पण भावनेनी केलेली निष्काम उपासना ही चित्त शांत करते. शुद्ध आणि शांत चित्त झाले म्हणजे सदाचरण आपोआप घडेल. सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे अहंकार. श्रीगुरूंना ज्ञात आहे हा अहंकार जाता जाणार नाही. म्हणूनच सत्कर्म आणि सदाचरण सांगितले. सत्कर्म आणि सदाचरण केव्हा घडेल चित्त शुद्ध आणि शांत झाल्यावर. यासाठी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना सांगितली. शुद्ध, शांत चित्ताने आणि अभ्यासाने, सततच्या सरावाने हळूहळू षडरिपूंना आवर घालता येईल. अहंकाराचे श्रीगुरूंच्या चरणी अनन्य शरणागतीने समर्पण केले की अंतःकरण स्थिर होईल.
आतापर्यंत शिष्याने श्रीगुरूंचे बोट धरलेले असते, पण जेव्हा निष्काम कर्म आणि निष्काम उपासना यामुळे चित्त शुद्ध आणि शांत झालेले आहे, अंतःकरण स्थिर झाले म्हणजे श्रीगुरु शिष्याचे बोट धरतात, अन् अज्ञानाचे आलेले आवरण सारून मोक्षाची वाट दाखवतात. नुसती दाखवत नाही तर सोबत येतात. श्रीगुरूंच्या अनुग्रहाशिवाय, त्यांच्या कृपेशिवाय मोक्ष गवसत नाही. फक्त निष्कामता आणि श्रीगुरु चरणी अनन्य शरणागती हवी म्हणजे सपशेल शरणागती...बस. कर्म आणि उपासनेने मोक्ष मिळत नाही हे खरे असले तरी कर्माशिवाय आणि उपासनेशिवाय मोक्षाची वाट गवसत नाही असा श्रीगुरूंनी अप्रत्यक्ष इशारा दिला आहे किंवा hint पास केली आहे.
रसिका राजीव हिंगे