अलवार क्षणांची गुंफण
दृढ करी बंध रेशमाचे
अन सहज जुळुनी येती
नाते असे जन्मांतरीचे
तुझा अलवार हळूच स्पर्श होताच मोहरले मी नखशिखांत ... मोरपीस जणू तो स्पर्श... तुझे सगळ्यांमध्ये बसून मला पहाणे आवडलं होतं मला . आवडली होती तुझी धिटाई...
मला मात्र कळत नव्हते तुला कसे बघू... क्षणात वाटलं सावळा घन आहे का... की पुन्हा तोच आला राधेचा मुरारी. का आला आहे कुणी राजकुमार पांढऱ्या शुभ्र अश्वावर स्वार होऊन!
चंद्र सुद्धा ढगाआड झाला होता तुझी माझी पहिली भेट पाहतांना. त्यालाही हेवा वाटला असेल. ढगाआडून बघत होता मध्ये मध्ये येऊन.
चंद्राच्या साक्षीने झाली आपली भेट. अथांग सागर किनारा... पौर्णिमेचा चांदवा ऐन बहरात आलेला... सागराच्या लाटा भरतीमुळे उंच आकाशला गवसणी घालायचा प्रयत्न करत होत्या.... अन तुझा हात होता माझ्या हातात.
किनाऱ्यावरची वाळू सुद्धा शहारली होती लाटेच्या स्पर्शाने... फेसाळत येणारी वाट किनाऱ्यापर्यंत येऊन काय गुजगोष्टी करत होती तीच जाणे. मात्र एक निमिष थांबल्या सारखी वाटावी असे वाटले. का आपल्यालाच पहायला थांबत होती?
चंद्र प्रकाशात तीरावरच्या झावळीच्या सावल्या सुद्धा किती मोहक दिसत होत्या न.... जणू सारा सागर कवेत घेण्याचा प्रयत्न करीत होत्या...
सागराच्या आणि चंद्राच्या साक्षीने झालेले मनोमिलन .. साता जन्माच्या या गाठी अधिक घट्ट होत गेल्या...
एकदा बांधलेली गाठ ही जन्मांतरीची व्हावी,कधीही सुटू नये म्हणून अशा या प्रीतीच्या आणि परस्पर नात्यातील गाठीला रेशीमगाठी असे म्हणतात. कारण रेशमाची गाठ एकदा बांधली की सुटत नाही हे सुर्य प्रकाशाइतके सत्य आहे.
बंध रेशमाचे जुळत होते... उत्कट प्रीतीचा महोत्सव जणू... धुंद झालेले क्षण... हे सारे आनंदाने पहात असलेला रजनी नाथ...हलकेच चांदण्यांचे पांघरूण घालत साक्षीदार असल्याची ग्वाही देत होता.... सवे त्याची रोहिणी ही होती माझ्या समर्पणाची साक्षीदार......
©️रसिका राजीव हिंगे
8600047066
No comments:
Post a Comment