Thursday, 7 January 2021

चित्र ललित

  

  



    



  केशरिया लेऊन,सोनसळी किरणांचे अलंकार ल्यालेली प्राची  प्रभाकरा समवेत पूर्वेस येऊन उभी राहिली. कुठंतरी रात्र रेंगाळत असल्याचा भास झाला. म्हणजे झुंजूमुंजू झालं तर. असे म्हणतच लगबगीने रविराजाला घाई करत प्राची आली .  पूर्व क्षितिजावर केशराचे सडे शिंपित सलज्ज उषाराणी स्वागतास उभीच होती. सूर्याचे तेज पाहून मनात लाजली तशी लाली गाली उमटलीच. 

     पाखरांचे थवे कलरव करत घरट्या बाहेर डोकावू लागली. वृक्षराजी आनंदाने डोलू लागली, लतावेली रविराजाच्या आगमनाने मनोमनी शहारल्या. मंद वारा ओढ्यावरून सुस्नात होऊन मध्येच शीळ घालत स्वतःचे अस्तित्व भासवत होता. 

     अशा सुरम्य वेळी हिरव्या पाऊल वाटेवर स्वतःचा कस्तुरीगंध सांडत ही ललना प्राजक्ताच्या सुगंधात न्हाऊन तिच्या आराध्याच्या पूजेसाठी निघाली. सात्विक तेजोवलय असलेली ही भाविका नऊवारी नेसून केसात सुगंधी फुले माळून, नाकात नथ घातलेली अशी नटून निघाली. तिला हे ठावे आहे देवदर्शनाला जाताना आपल्या आराध्याला जसे आवडेल तसेच जावे. मी देवाचे दर्शन घेईल तर तो पण मला पाहिलं न. त्याच्यासारखीच मी प्रसन्न वदना हवी हाच विचार करीत भक्तिरसात डुंबत आराध्याचे स्मरण करीत पंचोपचार पूजासाहित्य घेऊन हळुवार निसर्गाच्या सानिध्यात मंदिरी निघाली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर संपन्नतेचे, संपदेचे ,समाधानी भाव निसर्गालाही लाजवित होते.

     चालतांना मनोमनी मानस पूजन सुरू होते. पूजनात मग्न असलेली ही भाविका तिच्या सख्याचे  ही मन  तृप्त  केल्याचे कृतार्थतेचे भाव तिच्या नयनी साचलेले आहेत.

      कोण असेल बरे हिचे आराध्य?  कृष्णसखा?

      निळेच झाले

    चराचर सारे

    कृष्णरूप भासे

   सृष्टीचे बावरे

असेच असेल का हिच्या मनी?


रसिका राजीव हिंगे

     

     

No comments:

Post a Comment