गीताख्य
कैलासावर शंकर पार्वती बसले आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या विषयावर गप्पा चालल्या आहेत. मध्येच शंकराचे लक्ष आपल्याकडे नाही,कुठेतरी तंद्री लागली आहे हे पार्वतीच्या लक्षात येतं. "कशाचा विचार चालला आहे एवढा? माझ्या बोलण्याकडे तुमचे लक्ष नाही नाथ!" यावर महादेव उत्तरले," गीतेचा विचार करतो आहे." पार्वती क्षणभर हिरमुसते. माझ्यापेक्षा सुंदर कोण असावी बरे ही गीता. "मला कळेल का या गीते विषयी! कोण आहे ही गीता?" अवघ्या विश्वाचे संतुलन राखणारे भोळे शंभूनाथ किंचित हसले अन् म्हणाले," सुंदरी, गीता म्हणजे वासुदेव कृष्णाने कुरुक्षेत्रावर कुंतीपुत्र अर्जुनाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत. ऐन युद्धाच्या वेळी अर्जुनाने गांडीव खाली ठेवले त्यावेळी समर भूमीवर सांगितलेली आहे ही गीता. समस्त विश्वाला तारून नेणारी. प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारी गीता. याविषयी मी विचार करतो आहे." हे ऐकून गौरी म्हणाली," नाथ मला पण सांगा आपले मनातील गीतेविषयी चे विचार."
गीता! गीता एक धर्मग्रंथ आहे, वैश्विक ग्रंथ आहे. आपल्या संस्कृतीचा पाया आहे. सत्याचे परिमाण आहे. कर्मयोग, ज्ञानकर्मसंन्यासयोग, सांख्ययोग, भक्तीयोग, मोक्षसंन्यास योग काय नाही या गीतेत. कर्मयोग्याला मार्ग सापडतो, भक्तांना भक्ती दिसते तर योगीजनांना मोक्ष मिळतो. यातील लालित्य पाहून साहित्यिक डोलू लागतात. सत्व,रज, तम या गुणांचे विवेचन आहे तर श्रध्दा म्हणजे काय ती कशी असावी याचेही ज्ञान होते. सामान्य माणसाला जगण्याची दिशा देणारी, आत्मिक बळ वाढविणारी गीता. सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी जीवनाच्या मार्गावर आणून सोडणारी गीता आहे. सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती, अध्यात्म, वैराग्य,भक्ती,ज्ञान याचे शिक्षण देता देता श्रीकृष्णाने फक्त योग्य मार्गाकडे निर्देश केला आहे. बोट धरून चालत नाही आपल्याबरोबर. आपला मार्ग आपणच चालावा, चालता चालता सत्कर्म करत जा फक्त, फळाची आशा न करता.
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् । यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्
तू जे करशील ते मला अर्पण कर. कशाला काळजी करतोस. मी आहे हा विश्वास जागवला आहे. विश्वरूप दाखवण्यासाठी आधी अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान केली. केवढे हे भक्ताचे लाड. भक्त ही तसाच होता जो गीतेच्या माध्यमातून घडत गेला.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्
जे भक्त मला अनन्य भावाने भजतात, नित्य निरंतर माझे ध्यान करतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः वाहतो असा निर्वाळा दिला आहे भगवंताने गितेच्या माध्यमातून. यापरिस काय हवे हो.
जशी जशी गीता कळत जाईल तसे तसे जीवन सुकर होईल आणि हा भवसागर पार करून निश्चितच मोक्ष प्राप्त होईल हे निर्विवाद सत्य आहे.
"खरे आहे नाथ. गीता वाचावी, आचरणात आणावी म्हणजे जगणे किती सहज होईल. पण सातत्य असावे लागेल, प्रत्येक वेळी."
" गौरी तू जशी नित्य नूतन भासते मला तशीच गीता आहे. जितके वेळा समजून घेशील तितके वेळा ती नवीन काहीतरी प्रदान करेलच. कळलं का गीता कोण ते!"
शिवशक्तीच्या चेहऱ्यावर फक्त सलज्ज स्मित उमटले.
रसिका राजीव हिंगे
.jpeg)


.jpeg)