Saturday, 26 September 2020

 






मन माझं गुंतलं


रे मना

तू कुठे कुठे धावतो

आणि सारखा गुंतत जातो

कधी संसारात

तर  निसर्गात कधी

कधी मायेच्या पाशात

तर कधी भरडला जातो

कामाच्या रामरगाड्यात

तरीही गुंतत जातो

कधी ही गुंतवणूक

फार त्रासदायक होते

चित्त स्थिर करायला.

मायामोहाचे पाश

इतके घट्ट आवळले आहेत

की त्यातच माझ्या मना

तू गुंतत चालला आहेस

या ऐवजी जर तू

नामस्मरणात गुंतवलंस

स्वतःला तर...

गुरुचरणी स्थिर केलंस

मला तर...

तू असंच कर 

तू कुठंतरी गुंतायचंच ठरवलं

तर हा पर्याय छानच 

आहे न?


रसिका राजीव हिंगे

 प्रसंगानुरूप काव्य


असा कसा तू जाऊ 

शकतोस

मला न सांगता

प्रेम केलं तुझ्यावर

स्वप्नवत सारे भासावे

असे तुझ्यात गुंतले

आणि गुंतत गेले

एका समाजरूपी वाऱ्याच्या 

झोताने आपल्याला 

वेगळं केलं

कधीही न भेटण्यासाठी

पण मी वाट पहाते आहे

कधीतरी येशील तू 

परतून

माझ्या प्रेमासाठी


तुझ्या सहवासातील क्षण 

आधार आहेत 

जगण्याचे

तुझ्या स्पर्शाचे आठव 

बळ देतात

चैतन्याचे

तुझे हास्य मोहून

टाकतात आजही

सारे क्षण

तू नक्की येशील

परतून

माझ्या प्रेमासाठी


काळानुरूप संदर्भ

बदलले तरी

तू तूच आहेस

आणि मी मीच आहे

आपण दोघे 

एकमेकांवर प्रेम करणारे

काळ पुढे सरकला की

संदर्भ बदलतात 

प्रेमाचे,जगण्याचे

बदलू दे सारे जग

पण तू ये

खरच येशील?

परतून,?

माझ्या प्रेमासाठी?


रसिका राजीव हिंगे


निनाद

 


निनाद


निनाद उमटे

आठवांचा

भावनेच्या

गाभाऱ्यात

लगेच उठती

भावतरंग

इवल्याशा

मनात


निनाद उमटे

कल्पनेचा

कलेच्या 

प्रांगणात

कौतुकाचे

स्वर ते येती

आनंदुनी

हृदयात


निनाद उमटवी

पारिजात

कोमलतेचा

नाद अनाहत

समर्पण करी

सर्वस्वाचे

विसरुनी

मी तू पण

क्षणात


सोहम सोहम

नाद चहुकडे

प्रणवाचे

उच्चारण हो

कोहम् कोहम्

नाद निनादे

सारेच असे

मायापाश हो


रसिका राजीव हिंगे





 चित्रकाव्य

     सांज पहाटेचा हात धरून निघाली आहे की पहाटेने सांजेचे बोट धरले  आहे. कोण कोणाचा आधार?          

     दिवसभराच्या श्रमाने थकलेली सांज काठी सह पहाटे कडून आधाराची अपेक्षा करते आहे की पहाट नव्याने चालायला सांजेचे बोट धरते आहे? 

     आयुष्याच्या संध्याकाळी कोणाचा तरी आधार हवा असतो. त्यांचे अनुभवाचे बोल ऐकायला  सक्षम कान हवे असतात. आणि आयुष्याची सुरवातच या आधार वडाचे बोट धरून केली जाते.

     असे हे परस्पर पूरक आहेत याची जाण ज्याला असते किंवा जाणीव होते त्याचे आयुष्य सुंदर आहे.

     

     पहाट सांगे सांजेस

     स्वप्नातला गाव

     किती सुंदर हा

     यास काय नाव?

     

     सुंदर उत्तर

     सांज सांगतसे

     जीवन आहे हे

     तुला भासतसे

     

     चला चला पाहू 

     थोडे वेगळाले

     या वाटेवरचे

     हे खाचखळगे

     

     नवे काही नाही

     अनुभव बोले

     जे जुनेच आहे

     नव्याने सांगणे

     

     गोल फिरणारे

     कालचक्र आहे

     कुठे सुरुवात

     कुठे अंत आहे

     

     घे ही संस्कृतीची

     भरली शिदोरी

     तुजसी देतांना

     हर्ष मनांतरी

     


रसिका राजीव हिंगे

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     


  


Wednesday, 16 September 2020

 



फिरत होते इथे तिथे मी

उरी घेऊनी निराशेला

एक सुंदर गाव कोठला

फिरता फिरता मला भेटला


काय सांगू  गावाची गंमत

मला भेटले इथे एक सखी

दुरावलेली  चारदश आधी

पुन्हा भेटली माझी खेळगडी


मिळुनी दोघी एकत्र भेटलो

सुख दुःखास देत मुलामा

ऐसा फुलला मैत्री मेळावा

भारावले पाहुनी कृष्ण सुदामा


काय झाले गे बयो तुजला

का उदासवाणे दिसे वदन

भवसागरी  चालता चालता

गेले ग मी एकटी थकून


जीवाभावाची सखी वदली

मी सोबती का होसी निराश

घे बोलून मनातले सगळे

कर मोकळे मन आकाश


अलौकिक अशी भेट घडली

निराशेचे मळभ गेले निघुनी

आधार आजही या मैत्रीचा

पुन्हा सुखावते आठवांनी


रसिका राजीव हिंगे




पाखरे

 पाखरे


किलबिल पाखरांची

चिवचिव करिती ग

सांगतात एकमेका

झाला रामप्रहर ग


निघे लगबग थवा

घेई झेप आकाशात

चित्त पिलापाशी राही

निजलेले घरट्यात


पिलासाठी चारा आणी

पाण्यासाठी शोधे माडी

बांधण्यास घरटे ते

घेई गवताची काडी


थकलेले पाखरू ग

येई पुन्हा घरट्यात

भरविती पिलास ग

चारापाणी आनंदात


सांजवेळी झाडावर

पुन्हा होती सारे गोळा

फांदी फांदीवर भरे

जणू पाखरांची शाळा



रसिका राजीव हिंगे


चित्रकाव्य












हळदीच्या पावलांनी

निघालीस तू सासरी

घालमेल जीवाची ही

किती दाटली ग उरी


प्रतिरूप तू माझेच

जणू मला ग भासले

तुला घडवतांना ग

आईपण मोहरले


पैठणीचा पदर तो

आता तूच सावर ग

दागदागिने सारेच 

तुझे तूच आवर ग


नव्या वाटेवरी तुला

चालायचे बाळा आता

दिले तुला संस्कार ग

सोड शिदोरी ती आता


तुज निरोप देतांना

पापणकाठ ओलेता

मागे वळुनी पाहते

संस्कारित ही दुहिता


इथेच मी थांबते ग

ये होऊनि तू पाहुणी

तुझ्या सुखी संसाराची

सांग बाळे तू कहाणी


रसिका राजीव हिंगे







सहज सुचलं म्हणून....चित्रकाव्य


  


  

     निखळ ,निर्व्याज हास्य, चेहऱ्यावरचे निरागस भाव असलेली ही बाला कुठे असेल बरे. मनात सगळी ठिकाण आणून पाहिली. कुठे शोधू हिला. ही भेटेपर्यंत चैन पडणार नाही जीवाला.

     

     आणि ती भेटली मला. कमळाच्या तळ्याकाठी. भराभर तळ्यातून कमळं आणून कमलमाला तयार करीत होती. चटकन फुले घेतली की लगेच माळ तयार. 

     

     तिला सहज विचारलं," मला देशील का ग दोन तीन कमळं तोडून? तळ्यातून फुले तोडायची मला भीती वाटते ग. माझ्या आराध्याला कमलपुष्पे खूप आवडतात. त्यांच्या चरणी अर्पण करायची आहेत ग"

     

     तिने पाहिलं माझ्याकडे आणि इतकं गोड हसली की मी मलाच विसरून गेले. काय नव्हतं त्या हास्यात? निरागस, निखळ,  निर्व्याज  सौंदर्य म्हणतात ते हेच का?  खळाळून हसताना तिचे कमलदलासारखे नयन थोडे निमुळते झाले होते, दात शुभ्र कुंदकळ्यांसारखे चमकत होते, चेहऱ्यावरचे भाव निरागस,  पटकन तिला कुशीत घ्यावे असे वाटले.

     

     कुठेही स्पर्धा नाही, कोणाविषयी आकस नाही, मनात शांत तरल भाव, स्वतःच्या कामात गर्क असलेली ही खरं अध्यात्म जगत होती. स्वतःजवळ जे आहे ते देत होती. किती किती शिकवून गेली ती मला क्षणात. 

     माझं मन तिच्या भोवतीच फिरत होत. तिने लगेच मला तीन कमळं आणून दिली. तिच्या हाताचा ओला गंध या कमलदलापेक्षा जास्त गंधित भासला. कमळापेक्षा तिचे सौंदय जास्त गुलाबी वाटले. दोघांची ही निर्मिती करणारा तर तो एकच न. तरी का असा भास व्हावा हे न उलगडणारे कोडे घेऊनच मी परतले.

     कमलाक्षी कमलनयना अशीच दिसत असेल नाही का? यापेक्षा काय ती सुंदर असणार.  असं मला वाटतं...

     


रसिका राजीव हिंगे

चित्रकाव्य

 



किती गोड ग कोण तू साजिरी

कुंदकळ्यासम हास्य तव अधरी


कमळदलासम नयन गे तुझे


केस भुरभरे  वाऱ्यासवे तुझे


कुठे निघाली अशी बागडत

तळ्याकाठी का ग फुले वेचत


तव हास्याने गंधित वारा

सामावला गंध ओल्या करा


कुणा वाहसी ही कमलफुले

कोण तुझे आराध्य मनी खुले


या पुष्पासम तू  सौंदर्यवती

कमलाक्षी की आहे सरस्वती



रसिका राजीव हिंगे


Friday, 11 September 2020

 *प्रसंगानुरूप मुक्तछंद* ®️


अचानक भेट झाली

कितीवेळा भेटलो

बोललो

पण तू कधी बोलला नाहीस

आणि मला कळले नाही

वाटा वेगळ्या झाल्या

चांदण्यांचे हात हातात होते

सुख म्हणजे काय ते 

पहात होते

जरा विसावू या वळणावर

म्हणता म्हणता 

अचानक पुन्हा तू भेटला

तेव्हा कळले 

का बोलला नाहीस तेव्हा

एकट्यानेच सारं सोसलं

प्रत्येक भेटीत वेगळा

भासायचा रे तू

तेव्हा कळले नव्हते

आज सारे उमगले

भेटशील का असाच 

मला नेहमी

जसा कृष्णसखा भेटतो

द्रौपदीस.


©️रसिका राजीव हिंगे

Thursday, 10 September 2020

दिवस पावसाचे

 


सरीवर सरी आल्या 

चिंब भिजली धरणी

हे दिवस पावसाचे

आला पाऊस अंगणी


हे दिवस पावसाचे 

चिंब चिंब भिजायचे

क्षण क्षण आठवांची

साठवण करायचे

उर भरून येतो ग

अश्रू दाटले नयनी

हे दिवस पावसाचे

आला पाऊस अंगणी


कोसळतो पाऊस हा

सोसाट्याच्या वाऱ्यासवे

नेतो वाहून सारेच

साचलेले पाण्यासवे

नदी नाले ओसंडले

वाहे दुथडी भरुनी

हे दिवस पावसाचे

आला पाऊस अंगणी


श्रावणात पावसाचे

रूप आगळे वेगळे

हळदुले ऊन कधी

कधी मेघ जांभुळले

कधी सरसर धारा

इंद्रधनू नभांगणी

हे दिवस पावसाचे

आला पाऊस अंगणी


रिमझिम बरसत 

येती आषाढाच्या  सरी

भक्तिभाव जागवीत

धावतात धरेवरी

शमविती तृषार्त ही

माय माझी धरणी

हे दिवस पावसाचे

आला पाऊस अंगणी


सरीवर सरी आल्या 

चिंब भिजली धरणी

हे दिवस पावसाचे

आला पाऊस अंगणी


रसिका राजीव हिंगे




Wednesday, 9 September 2020

उनाड दिवस

 


एक दिवस असा यावा

मस्तवाल जीव व्हावा

दिवसभर फिरफिरावे

ऐसा दिस उनाड व्हावा


फुलपाखराच्या मागे

धावता ठेचकाळावे

चिंचाबोरे तोडतांना

काट्यांनी मज टोचावे


उगाच रस्त्यात चालता

दगडास  उडवत जावे

कारण नसतांनाही

कुणाशीही मग भांडावे


पावसात भिजताना

गारा वेचित उंडारावे

वळचणीखाली जात

धारा झेलीत नाचावे


अश्या उनाड दिवसाने

घ्यावे सगळेच व्यापून

विसरुनी सारे सारे

जगावे जरा बालपण



©️रसिका राजीव हिंगे

Sunday, 6 September 2020

सहज सुचलं म्हणून....व्यथा

 



सहज सुचलं म्हणून....

व्यथा 


व्यथा वेदनेचे जणू सार आहे

मनाचा मनातील हा भार आहे


व्यथा! सारं जीवन व्यापून उरलेली ही व्यथा. संसारात जगतांना असा एकही जीव नसेल ज्याला व्यथा किंवा दुःख नाही. कारण जगण्याचं मुळच दुःख आहे. 

जन्माला येण्यापूर्वी सोहम् सोहम् म्हणणारा जीव जन्म झाल्याबरोबर कोहम् कोहम्  म्हणायला लागतो आणि सुरुवात होते दुःखाला पर्यायाने व्यथेला. 

जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत 'पाहिजे, हवं आहे' यासाठी धडपडणारा जीव मिळालं नाही की व्यथित होतो. 

व्यथेचे पण बरेच प्रकार आहेत.  ब्रह्मदेवाने हे जग निर्माण केलं. त्याचं संगोपन व्हावं, सृष्टीचं सृजन व्हावं म्हणून प्रयन्तरत असलेले निसर्गप्रेमी मनासारखे घडलं तर आनंदी होतात पण जर यश मिळाले नाही तर मनात कुठेतरी  व्यथित होतात आणि या व्यथेच्या मग कथा होतात. 

प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असलेला श्रीकृष्ण यादवांचे परस्परातील भांडणे पाहून व्यथित झाला. ईश्वर असला तरी मानवाचे रुपात होता त्यामुळे सगळे भोग आलेच की पर्यायाने. गांधारीचे शंभर पुत्र मारले गेले म्हणून दुःखाने, व्यथित अंतःकरणाने कृष्णाला शाप दिला यादवी नष्ट होण्याचा. म्हणजे काय तर व्यथेतून व्यथा निर्माण होते आणि जीव दुःख भोगत असतो. वास्तविक पाहता गांधारी ही पुत्रप्रेमाने व्यथित होऊन शाप देती झाली, कोणताही सारासार विचार न करता कारण तेव्हा फक्त तिला तिचे पुत्र महत्वाचे वाटले. 

भीष्म पितामह यांची व्यथा वेगळीच. धृतराष्ट्राचे पुत्रप्रेम आणि दुर्योधनाने माजविलेल्या अराजकता यामुळे ते दुःखी होत होते,कुरूंचे सिंहासन सांभाळण्याची घेतलेली जबाबदारी नीट पार पाडणे खुप कठीण झाले होते. मनातील व्यथा विदुराने पण भोगली आहे. द्रौपदी च्या तर व्यथेची कथा म्हणजेच महाभारत. 

एक मात्र खरे की व्यथेच्या जेव्हा कथा होतात तेव्हा त्या सृजनात्मक ठरतात. ज्ञानेश्वरांच्या मनात भक्तांविषयी कळकळ होती, माझ्या सामान्य माणसाला ही गीता नाही कळली तर त्यांचे कसे होईल, ही व्यथा त्यांना होती.त्यातूनच ज्ञानेश्वरीची माऊलींनी निर्मिती केली असावी. व्यास महर्षींनी स्वतःचा उदो उदो व्हावा म्हणून नाही साहित्य निर्मिती केली. हे ज्ञान पुढच्या पिढीला नाही कळले तर अशी व्यथा त्यांच्या मनात निर्माण झाली असावी म्हणून न भूतो न भविष्याती अशी साहित्य निर्मिती झाली.

जगण्याचे मूळ कारण जरी दुःख, व्यथा असेल तरी काहीवेळेस ही व्यथा सृजनात्मक तरते असे मला वाटतं...


रसिका राजीव हिंगे






Friday, 4 September 2020

चित्रकाव्य


 


तुझं रुजणं,तुझं अंकुरणं

तुझं फुलणं, तुझं बहरणं

सगळंच अनाकलनीय

कसं जमलं रे मोहरणं


धरेच्या गर्भातील ओलावा

शिडकावा असे तो मायेचा 

तरारून आलास धरेवर

घेऊन सवे भार पानांचा


ताठ मानेने जगावे याचे

बाळकडू घेऊन आलास

नको मिंधेपण जगण्यात

नको लाचारी आसपास


अंकुरण्यास आपोआप

खडकातही जागा मिळते

शोधले म्हणजे सारेच

मनासारखे गवसते


दगड विटांच्या जंगलात

नसे मातीला ही थारा

पाय रोवूनी उभे रहावे

सुखवित जावे चराचरा


रसिका राजीव हिंगे



चित्रकाव्य




मातृत्वाची गुढ भाषा

साऱ्या सृष्टीवरी एक

तान्हुल्यास सारे कळे

भाव मातेचे अनेक



माय किती ती हसरी

काय सांगे गुज बाळा 

खेळ खेळविता ऐसे

वात्सल्याचा वाजे वाळा


संस्कारांचे बाळकडू

देई असे ममतेने

भूतदया ठेवी बाळा

सांगे ती सहजतेने


असो पशू  वा मानव

आई म्हणजे आईच

नसे पर्याय तिजला

जगतात या कोणीच


रसिका राजीव हिंगे

04/08/2020


सहज सुचलं म्हणून....


     शांत प्रशांत सागरतीर. रात्रीची निरव शांतता. नितळ स्तब्ध पाणी आणि त्यावर तरंगणारी नाव. इतकी शांतता की पाण्यावर हवेने उठलेले तरंग सुद्धा शांततेचा भंग करतात का असे वाटावे. जणू सुख दुःखाच्या पल्याड शांत जीवनासारखे

     

     चंद्राच्या शीतल प्रकाशात न्हाऊन निघालेला परिसर जणू खुणावतो आहे चल नाव तयार आहे, हातात हात घालून सागराच्या पाण्यावर तरंगून येवू. आजपर्यंत किनाऱ्यावर बसून सागराची गाज फक्त ऐकली आता अनुभवू.


     रात्रीच्या काळ्या अंधारात पाणी काळसर झाले असले तरी चंद्रप्रकाशामुळे निळ्या नावेचे प्रतिबिंब पाण्यात स्पष्ट दिसते आहे जणू कितीही अंधार असला तरी कुठूनतरी प्रकाशाचा कवडसा येतो आणि सगळंच उजळून टाकतो तसंच.भरतीच्या वेळी सागरात आधी नाव हेलकावेच घेते पण हळूहळू संथ होत जाणाऱ्या ओहोटीच्या पाण्यावर  तरंगायला लागते कुठेतरी स्थिरता यावी तशी. 

     

     या नावेत बसलेले सगळेच प्रवासी एक ध्येय घेऊन किंवा एका निश्चित ठिकाण ठरवून आलेत. ज्या दिशेने जावयाचे आहे त्याच नावेत बसले की किनारा सहज गाठता येतो. जणू जीवनाचे ध्येय ठरविले की यशोशिखर लीलया गाठता येतं तसेच. 

     

     ही नाव, सागर , चंद्रप्रकाश सगळंच जीवनाशी कसं जोडल्या जातं आहे. का ही जीवननौका आहे भवसागरात स्थिरावलेली. कृतार्थतेच्या आनंदसागरात स्थिर झालेल्या योगियाच्या जीवनासारखी...

     

रसिका राजीव हिंगे



तुझी आवड म्हणून


 तुझी आवड म्हणून


ही तुझीच आवड म्हणून

वाचनाची गोडी लागली

तुझे वाचन वेड पाहून

मी ही कविता करू लागली


किती किती वाचायची ग तू

कथा कादंबऱ्या नि उपन्यास 

चरित्र भयकथा बालसाहित्य 

साऱ्यांचा लाभला सहवास


तुझा वाणवसा सांभाळीन

दे शक्ति मज माझिये माते

संस्कारित ऐसे ऋण दिधले

ही परंपरा  पुढे चालविते


नकोच मज उतराई याची

वाढू दे  पुढती ऐसे ऋण 

वाचन छंद मी जोपासते

ही तुझीच आवड म्हणून


रसिका राजीव हिंगे


Wednesday, 2 September 2020

मंत्रमुग्ध

 



रमणीय सुंदरसे

निसर्गाचे रूप किती

मंत्रमुग्ध जाहले मी

ईश्वराची ही निर्मिती


वसंताची चाहूल ती

पालवीस ये बहर

कोकिळेचे कुहुकुहू

सुगंधित चराचर

आम्रवृक्ष भारावला

सुखावली ग धरती

मंत्रमुग्ध जाहले मी

ईश्वराची ही निर्मिती


लाल तो गुलमोहर

ग्रीष्म आला सांगतो

सावलीत दाट त्याच्या

वाटसरू विसावतो

लाल रंगात हिरवी

पाने हळू डोकावती

मंत्रमुग्ध जाहले मी

ईश्वराची ही निर्मिती


पावसाच्या झरझर

धारा येती धरेवरी

जलदांचे जांभुळले

मेघ दाटे नभावरी

वर्षाऋतु आला आला

सानथोर आनंदती

मंत्रमुग्ध जाहले मी

ईश्वराची ही निर्मिती


ऋतू शरदाचे येणे

चंद्र चांदणे गगनी

उत्साहाला ये भरती

गंधाळते रातराणी

शारदीय चांदण्यांची

पखरण भुवरती

मंत्रमुग्ध जाहले मी

ईश्वराची ही निर्मिती


आरोग्याचे दान देई

योग्य आहार विहार

हेमंतही हेच सांगे

हेच आरोग्याचे सार

निसर्गास त्या वंदन

केली ऐसी निर्मिती

मंत्रमुग्ध जाहले मी

ईश्वराची ही निर्मिती


असा उदासवाणा ग

ऋतू शिशिर वेगळा

पानगळ झडझड

भासे मज तो आगळा

पाचोळ्याचे पैंजण ग

छमछम ते वाजती

मंत्रमुग्ध जाहले मी

ईश्वराची ही निर्मिती


रमणीय सुंदरसे

निसर्गाचे रूप किती

मंत्रमुग्ध जाहले मी

ईश्वराची ही निर्मिती


©️रसिका राजीव हिंगे