Tuesday, 28 June 2022

चित्रकाव्य - पायवाट

 


कशी कुठून ग चालत येई पायवाट

तुझ्या नि माझ्या आयुष्याची वहिवाट


चहूकडे गे हिरवळ सुंदर 

खाचखळगे  मधेच धूसर

अहाहा कसा बघ हिचा साजरा घाट

तुझ्या नि माझ्या आयुष्याची वहिवाट


वळणावरती जरा विसावू

सुखदुःखाचे सूर आळवू

मल्हारासी गाता गवसे नवा थाट

तुझ्या नि माझ्या आयुष्याची वहिवाट


घर कौलारू शिवार हिरवे

सृष्टीचे हे ऋण स्मरावे

आनंदाने पेरत जाऊ सुखे दाट

तुझ्या नि माझ्या आयुष्याची वहिवाट


कशी कुठून ग चालत येई पायवाट

तुझ्या नि माझ्या आयुष्याची वहिवाट


©®रसिका राजीव हिंगे

Saturday, 25 June 2022

पारिजात

 


उतरुन आल्या नभी चांदण्या

प्रतिबिंब जणू भासे भूवरी

केशर चांदण फुलवित हसले

सावळे रूप सखा श्रीहरी


रुक्मिणीच्या गंध ओंजळी

गंधित प्रीती भामेचीही

केशर लाली ठायी ठायी

गाली भासे धरणीच्याही


गंधभारले आंदण ऐसे 

देउनी परी नामनिराळा

पारिजातकी शुभ्र पांढरा

तयात दिसतो कृष्ण सावळा


सुगंधाची भरली परडी

समर्पणाचे भाग्य लाभले

दरवळलेले अंगण माझे

कृष्णचरणी मन विसावले


रसिका राजीव हिंगे



पोरीच्या रं बापा

 #बाप#दुडकी चाल#नुपूर#वाळे#


बाप

ती आली दुडक्या चालीने चालत....

तिचे पहिले पाऊल निनादले...

पायातील वाळे बोलले.. 

चालता येतंय तिला....

नुपुरांचा मंजुळ नाद ऐकतांना

मी भारावून गेलो.....

घरभर तिचेच अस्तित्व ....

खेळायला चंद्र आला की,

नुपुरे स्तब्ध व्हायची.....

आणि आज एकदम तिच्या

पैंजणांचा छमछम आवाज कानी

पडला....

अन मी भानावर आलो.....

गुरफटलो होतो...

तिच्या सगळ्याच नादात मी

मेंदीने रंगलेली...

सौभाग्यालंकारांनी नटलेली....

पाहिली तिची पाऊले,

हृदयात , कालवाकालव झाली..

ती निघाली आहे,

नव्या वाटेवर.... 

तिच्या भाग्योदयाकडे....


©रसिका राजीव हिंगे 





Saturday, 11 June 2022

बेधुंदपणाची एक लहर




जगणे बेधुंद


बघ धुंदल्या क्षणांना

मंतरल्या वाटेवरी

चांद आला उतरून

सागराच्या या किनारी


     आकाशात पौर्णिमेचा चंद्र उगवला अन साऱ्या चराचरात एक बेधुंद पणाची लहर उठली जणू. समिंदराच्या लाटा बेभान होऊन उंच उंच उसळत होत्या, चंद्रास जणू कवेत घ्यायला निघाल्या की काय असे वाटावे. किती हा बेधुंदपणा!

     आपणही जगावं असंच कधीतरी बेधुंद होऊन. उठू द्यावी एक लहर, तरंग बेधुंद पणाचा तनामनावर.  सुसाट धावावे वाऱ्यासारखे वाट फुटेल तिकडे, करूच नये विचार त्यामुळे काय नुकसान होईल,  उनाड वारा करतो का विचार!अगदी तसंच. मेघांच्या गडगडासारखे ओरडावे कधीतरी,  नाहीतरी मेघ गरजले तर कुठे पाऊस येतो. नुसतेच गडगडाट करतात. गर्जेल तो पडेल काय?जलधारांसम नृत्य करावे, काळ्या सावळ्या मेघांच्या मागे धावत लपतछपत पाठशिवणीचा खेळ खेळावा, काळोखल्या रजनी सारखी नयनी काजळ रेखा रेखावी, भूमातेच्या अंकावर मनसोक्त लोळावे, जसे पशुपक्षी लोळतात. तीच तर खरी माय आहे न. घ्यावा मोठेपणी तिच्या कुशीत शिरून प्रेमाचा ओलावा जो सुखावेल.  या पंचभूतांसारखेच आहे आपले जगणे.

     बेधुंद होणे म्हणजे काही वाईट नसावे. सृष्टीची म्हणजे प्रकृति, माया याची निर्मिती केली परमात्म्याने ती बेधुंदपणे, तिच्यावर आसक्त होण्यासाठीच. संपूर्ण चराचरात धुंदी आहे. वसंतातला बेधुंद निसर्ग जगायला शिकवतो, नव्याचे स्वागत करायला लावतो. मोगऱ्याचा दरवळ, चाफ्याचा सुगंध, निशिगंधाचा परिमळ, गंधाळलेली रातराणी प्रीत मंदिरी बेधुंद करतातच ना. त्यांच्यामुळेच प्रीत ही बेधुंदपणे वागत जाते. प्राजक्ताचे गंधित समर्पण श्रीहरीच्या चरणी विसावते म्हणजे काय भामेचे आणि रुक्मिणीचेही बेधुंद प्रीतीचे प्रतीकच म्हणावे लागेल. शिशिरातील पानगळीच्या पैंजणांचा नादही धुंद करतो. हेमंतातला गारवा मदहोश करणारा नि ग्रीष्मातील उष्णता रंगगंधाने मोहित करणारी, ऋतुचक्र धुंद होऊन फिरते आहे म्हणून जगरहाटी सुरू आहे.

     निसर्ग आणि मानव एकाच नाण्याच्या दोन बाजू. म्हणून जसा निसर्ग बेधुंद होतो तसाच मानवही. हो पण एक मानवाने लक्षात घ्यावे नेहमीच निसर्ग हा परमात्मा आहे. तो बेधुंद झाला तरी सावरतो आणि आवरतो ही तोच. आधारही तोच. 

     आजची तरुणाई नको त्या व्यसनाच्या मागे धावत बेधुंदपणे जगते आहे. याचे परिणाम पुढील पिढीवर नकळतपणे होत आहे. जगण्यात धुंद असावीच त्याशिवाय जगण्याला काही अर्थ असेल का? पण शेवटी प्रत्येक गोष्टीला मर्यादेचे कुंपण घालणे अत्यावश्यक आहे.  शेवटी काय तर भान ठेवून आयुष्य आखा आणि बेधुंद, बेभान होऊन जगा, मग कळेल आयुष्य किती सुंदर आहे....


©®रसिका राजीव हिंगे

     

     #rasraj#बेधुंद#क्षण#जगणे#

     


Friday, 10 June 2022

ऋतुराज वसंत

 


ऋतुराज वसंत


वसंताची चाहूल ती

पालवीस ये बहर

कोकिळेचे कुहुकुहू

सुगंधित चराचर

आम्रवृक्ष भारावला

सुखावली ग धरती

मंत्रमुग्ध जाहले मी

ईश्वराची ही निर्मिती


     ऋतुराज वसंताचे आगमन झाले की निसर्ग कोवळ्या पानांचे आणि गंधित फुलांचे तोरण लावून स्वागतास सज्ज होतो. पहाटेस शीतल वारा शीळ वाजवीत तर पानांची सळसळ जणू मृदुंगाच्या तालावर पदन्यास करीत आहे अन कोकिळ पंचम स्वर लावून ऋतुराजाचे स्वागत करण्यास उत्सुक झालेत असे वाटावे.

     आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी आपली जीवनशैली बांधून घेतली होती. निसर्ग आणि मानव म्हणजे चित पट, एकाच नाण्याच्या दोन बाजू. निसर्गात प्रतिक्षण बदल होत असतात कारण सृष्टीचे सृजन ही प्रतिक्षण सुरू असते. हे होत असलेले निसर्गातील बदल अचूक हेरत त्याचे सौंदर्य रोमारोमात साठवत जगण्याची कला आपल्या पूर्वजांना अवगत होती. प्रत्येक बदल हा नवा आहे, काहीतरी देणारा आहे, सांकेतिक आहे याचा शोध अनुभवांती लागत गेला.  त्या  बदलाच्या शोधाचे नामकरण झाले ऋतू.  असे हे अपूर्व संशोधन त्यांनी त्यांच्या योग शक्तीच्या द्वारे केले होते. तीच परंपरा पुढे चालत आली, ऋतुमागून ऋतू बदलत वर्तुळ पूर्ण होतं म्हणजेच ऋतुचक्र.यावरूनच त्यांची दिनचर्या ठरत असावी.  या ऋतुचक्रामध्ये सहा ऋतू, वसंत,ग्रीष्म, वर्षा, शरद,हेमंत आणि शिशिर. वसंत ऋतू हा राजा. सम्राट. नवनिर्मितीचा उद्गाता. 

     सौंदर्याचे शिंपण करत येतो वसंत ऋतू.  नवचैतन्याची लयलूट करत असतो निसर्ग. निसर्गाचे प्रत्येकच रूप मोहमयी असले तरी वसंत ऋतूत हा निसर्ग नवयौवना भासतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली  षोडशा किंवा नुकतेच लग्न झालेली नववधू जशी मोहरलेली, फुललेली असते, तिचा प्रत्येक क्षण हा गंधित असतो तसाच हा वसंत, मोहरलेला,गंधाळलेला. कृष्णसख्यासारखा मनभावन. गीतेमध्ये विभूतीयोगामध्ये स्वतः कृष्ण च सांगतो 

"ऋतूनां(ङ्) कुसुमाकरः" मी ऋतूमध्ये वसंत आहे. असा दैवी अधिष्ठान लाभलेला वसंत, परमात्म्याचे रूप वसंत.

     शिशिराच्या पानगळीनंतर  साचलेल्या, वाळलेल्या पाचोळ्यावर चालत, पैंजणांचा नाद करत येतो वसंत. निष्पर्ण झालेल्या झाडांवर लाल, पोपटी, हिरवटसर पाने दिसायला लागतात. या ओल्या पानांचा कोवळा सुगंध साऱ्या चराचरात भरलेला असतो. हवेतील गारवा आल्हादक वाटतो. कधी शीतल लहर तर कधी उष्मा जाणवतो वातावरणात. संमिश्र वातावरण तरीही आल्हादक. नवे काही करण्याची उर्मी प्रदान करणारे, सृजनात्मक. 

     डेरेदार आम्रवृक्षावर लगडलेल्या मोहराचा गंध आसमंतात दरवळत असतो. सुगंधाने मोहीत होऊन पक्षांची वासंतिक सभा जणू या आम्र तरुवर भरते. वसंताचे आगमन झाले की कोकीळ कुहुकुहू गायला लागतो म्हणण्यापेक्षा कोकीळ गायला लागला म्हणजे वसंत आला असे पूर्वीचे ठोकताळे असायचे. कोकीळ स्वरासोबत भारद्वाज, दयाळ यासारखे पक्षी मधुर गायन करण्यात दंग असतात. सुंदरेसे घरटे बांधावे आणि आपल्या चिल्यापिल्याना सुरक्षित ठेवावे ही सगळ्याच प्राणिमात्रांची आस. मग पक्षी कसे सुटतील बरे यातून. काडी काडी गोळा करत फिरत असतात नर आणि मादी. कुठेतरी डेरेदार वृक्षावर, घराच्या बाल्कनीत, परसदारी बागेत यांची गडबड सुरू असते घरटे बांधण्याची. ही पण वसंताची चाहूल.

     वसंताच्या सौंदर्यात भर घालणारे गुलमोहर, पळस, पांगारा, काटेसावर, बहावा हे वृक्ष. लाल फुले असलेला गुलमोहर गगनाला गवसणी घालत उभा असतो.  सुरवातील लाल फुलांचे छोटे गुच्छ हिरव्या पानातून वर येत असताना ही  रंगांची सरमिसळ विलोभनीय असते. पळस हा औषधी असलेला वृक्ष. पळसाची केशरी लाल फुले, पांगाऱ्याची पान नसतांना आलेली लालभडक फुले  तसेच काटेसावरीची पर्णहिन वृक्षावरची लालचुटुक फुले, बहाव्याची पानोपानी फुललेली पिवळीधम्मक झुबकेदार फुले उन्हाच्या काहिलीत मनाला , दृष्टीला थंडावा देणारी आहेत. हा फुलांचा बहर म्हणजे जणू सृष्टीच्या प्रीतीला आलेला बहर आहे असे वाटते. 

          ग्रीष्मातील वृक्षराजी

          लाल फुले बहरली

          प्रीत तुझी लाभली

          लाली गाली आली

    ऋतूनुसार देत राहणे, समर्पण करणे हा निसर्गाचा स्वभाव आहे. आम्रवृक्षावर लागलेली हिरवीगार कैरी पाहूनच मन शांत झाल्यासारखे वाटतं. आत शीतलता झिरपायला लागते. घराच्या दारांना, खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावून किंवा आजकाल कुलर, AC लावून घरात थंडगार कैरीचे पन्हे प्राशन करत दुपार पहुडलेली असते वसंतात. 

     सुगंध म्हणजे वसंत आणि वसंत म्हणजेच सुगंध हे समीकरणच आहे. वसंत ऋतूत सुगंधाचे आंदण देणारे फुल म्हणजे मोगरा. शुभ्र मोगऱ्याचे ताटवे बहरलेले असतात. काळसर हिरव्या पानाच्या आडून ही धवल फुले म्हणजे चांदवा आला उतरून धरेवर असे वाटते. पानापानात फुललेली मोगऱ्याची फुले आपला सुगंध लुटत सगळे चराचर गंधित करतो. हा गंध कुंतली माळला की मोगराही कृत्यकृत्य होत असावा. चाफ्याचे सोनचाफा, पिवळा चाफा, पांढरा चाफा, गुलाबी चाफा असे विविध रंग आणि प्रकार असले तरी वसंत ऋतूत आपल्या सौंदर्याचे आणि गंधाचे समर्पण करतो तो पांढरा चाफा. पांढऱ्या चाफ्याचा सडा जमिनीवर पडतो तेव्हा वाटतं नभीची नक्षत्र आहेत जणू सावळ्या भुईला सजविण्यासाठी आलेली. निशिगंध असेच पांढरे शुभ्र फुल. एकाच गुच्छात चारपाच फुल आपला सुगंध प्रदान करीत असतात. मोगरा, चाफा, निशिगंध ही सगळी पांढरी फुले. पांढऱ्या  रंगात उष्णता शोषून घेण्याची शक्ती आहे. ही सगळी निसर्गाची किमया. वसंत ऋतूने सृष्टीला दिलेले हे आंदण आहे.

     थबकला पहाट वारा

     घेण्यास चाफ्याचा गंध

     मोहरल्या वाऱ्यास करी

     मोगऱ्याचा दरवळ धुंद

       सृष्टीचा प्रियकर असलेल्या वसंतातील सांज तर अतिशय मोहक. हळूच पश्चिम क्षितीजाच्या गवाक्षातून  डोकावलेली सांज  केशरिया उधळत क्षितिजावर रेंगाळते. जाता जाता रविराज सांजेला कवेत घेतो, तिच्या आरक्त गालावरची लज्जा म्हणजेच जणू हा उधळलेला केशरिया आहे असे वाटावे, की त्या शशीकराची वाट पहाण्यासाठी ती उगाचच रेंगाळते आहे अन त्याच्या आठवात मोहरून अशी सलज्ज उभी आहे. दिवस मोठा होत असल्यामुळे रजनींनाथ यायला उशीर होतो आहे हे ठावे आहे तिला, म्हणूनच ती रेंगाळत असावी.

       नाविन्याची सुरुवात, सृजनात्मक अश्या ह्या वसंत ऋतूत हिंदूंचे नवं संवत्सर सुरू होते. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी याच ऋतूत अवतार धारण करून मीच हे सृष्टीरुप, विश्वरूप आहे, याचे संकेत दिले. मारुतीरायाने पण याच ऋतूत जन्म घेउन या वसंत ऋतूमध्ये किती शक्ती आहे याचे प्रात्यक्षिकच दिले आहे. 

       प्रत्येकाच्या आयुष्यात असाच आनंदी आणि चैतन्यदायी वसंत ऋतू यावा.

       मुदित झाले वातावरण

       ऋतुराजाच्या आगमनाने

       धवल कुमुदिनी फुलल्या

       भरला आसमंत सुगंधाने


रसिका राजीव हिंगे

       

       

       

   

     

     


Thursday, 9 June 2022

निसर्गास पत्र

 




तीर्थरूप निसर्ग राजा,

     प्रिय म्हणू की तीर्थरूप म्हणू? तीर्थरूप फक्त आईवडीलांनाच लिहायचे असते नाही का, बाकी सगळे तीर्थस्वरूप किंवा प्रिय. तुला तीर्थरूपच म्हणते कारण तू तर सगळ्यांचाच पिता आहेस, यापेक्षा मला बाप आहेस असे म्हणायचे आहे. खरे आहे न. तू समजतोस माझ्या भावना! उगाच नमनाला घडाभर तेल नको. असो.

     तुला पत्र लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे मला तुझे आभार मानायचे आहे. माझ्या बकेट लिस्ट मधीलच हे एक आहे. पण एक विचारायचेच आहे. तू असा कसा रे वागतोस? तू लहरी आहे हे माहीत आहे, पण आजकाल तर केव्हाही कोणतेही रूप धारण करतोस. अन काय रे निसर्गराजा, तू ऋतुचक्र वगैरे फिरवलेस की काय! चक्र फिरणारच पण त्याची गती? ती कुठे हरवली आहे. सगळ्या ऋतूंनी जागा बदलली की काय?

     आजकाल तू नेमेची येतो पावसाळा ही म्हण खोटी ठरवतो आहेस, येतोस तू पण त्याची काही वेळच नाही. केव्हाही कोणत्याही महिन्यात बरसत  राहतो, नाही तर स्वतःकडे डोळे लावून बसायला सांगतो.

     तुझ्या आषाढ सरी बरसल्या की काळी आई ओलीचिंब होते अन सुगंधाचे सोहळे सुरू होतात. कळत नाही रे काहींना तुझं रूप, पण ज्याला कळतं न तो तुझ्याशी एकरूप होतो बघ.

     श्रावणातील तुझं ते  मनाला वेड लावणारं विलोभनीय रुपडे, काळे सावळे मेघ जणू मृदुंग वाजवीत आहेत आणि त्या तालावर चाललेले जलधारांचे नृत्य, मध्येच एखादी प्रकाश शलाका यावी तशी लखलखीत सौदामिनी येऊन या नृत्याला सलाम करून जाते. रविराज हळूच आपल्या अस्तित्वाची दखल देत सोनसळी किरणांची लयलूट करतो.  कधी बेभान होऊन अंगात शिरशिरी भरवतो, कधी मंद निळी झुळूक होऊन तनामनाला उत्साहित करतोस. किती देत राहतोस रे. 

      शिशिरातली पानगळ सुद्धा पैंजणांचा मंजुळ नाद निर्माण करणारी, नव्याची आतुरतेने वाट पाहणारी अशीच. हा तुझाच नियम आहे न एकाची निर्वाणी तर दुसऱ्याची पर्वणी. तुझ्या अंकावर विसावलेले सगळेच हा नियम पाळतात.  

     काळ्याशार आभाळात सांडलेली चांदणफुलें आणि पुनवेचा तेजाळलेला चांदवा म्हणजे तुझ्या सौंदर्याचे परिमाण आहे.  तुझ्या दुधाळलेल्या शारदीय चांद्र प्रकाशात प्रीतीच्या समिंदरात अश्या काही बेभान लाटा उचंबळतात की तुझ्या निर्मितीला कडकडीत सलाम ठोकल्या जातो.

     वसंत ऋतू म्हणजे तुझा मास्टर स्ट्रोक. काय  सांगू तुला. (तुझेच तुला सांगते बरं) कोकिळेचा पंचम स्वर ऐकवू की मोगरा, चाफा, निशिगंध यांचा दरवळ सांगू, पळस, गुलमोहर, पांगारा यांच्या रंगसंगतीचे वर्णन करू. कसे काय तुला हे साधते. मानवात का नाही असे अष्टपैलूत्व. काही न काही कमतरता आहेच. 

     एकापाठी एक येणारे हे ऋतू एकमेकाना पूरक असे आहेत. हेमंतातली थंडी गारठून टाकते म्हणूनच शिशिराची पानगळ, वसंताची नवनिर्मिती, ग्रीष्मातील ऊन  वर्षा ऋतूमध्ये जलधारांचे रूप घेऊन बरसते. त्यामुळे शरदात  नटलेला पहायला मिळतोस तू.  तुझे चक्र अव्याहतपणे सुरू आहे म्हणून तर आम्ही जगतोय.

     रत्नाकराच्या स्वरूपात खळखळणारे तुझे जलरूप म्हणजे तारुण्याची मस्ती. अन खरंच तू त्याच्या तळाशी रत्न लपवून ठेवतोस! कमाल आहे तुझी. म्हणून तर मला नेहमीच वाटतं की तू खरा जादूगार आहेस.  बरं प्रत्येक ठिकाणी विविधता. भूगर्भात पाण्याबरोबर कितीतरी धातूंच्या,तेलांच्या खाणी तू सांभाळतोस. म्हणून मी सुरवातीलाच लिहिले न तुझे आभार मानायचे आहेत. तुझं हे विराट रूप पाहिले की आपोआपच नतमस्तक होते मी.

     सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून शिवबाच्या पाठी उभा राहिलास. गनिमाची धूळधाण करण्यासाठी, स्वराज्य स्थापनेसाठी. किती ही उदारता. हिमालयाची उंचच उंच पांढरीशुभ्र शिखरे आव्हान करतात शौर्याला. तसेच तिथली शांतता, आपले साध्य साधण्यास साधन आहेत ऋषीमुनींना, योगी महात्म्यांना. पर्वतराजीं संरक्षक तटबंदी जणू . सौंदर्याने नटलेल्या दर्याखोऱ्यातून , गुहेतून तूच वास करतोस परमात्मा होऊन.

     प्रत्येक प्राणीमात्रांना रहायला जागा हवी हा तुझा अट्टहास. यासाठी तू जंगल निर्माण केलं. स्वच्छंद पणे पशु पक्षांना विहरता यावे म्हणून.  जंगल निर्मिती केलीस म्हणून तो वरुणराजा प्रसन्न होतो. आम्ही बघ किती कृतघ्न, सरळ जंगलाच्या जंगल उध्वस्त करत आहे.

     समर्पण हा तुझा गुण  तू समस्त मानवजातीला दिला, उपयोग फारच थोडे लोक करतात.  जे असेल ते मुक्त हस्ते उधळत राहतोस.

     पण तुझं रौद्र रूप पाहिलं की भीतीने गाळण बसते रे. भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, ढगफुटी, अशी अस्मानी संकटे म्हणजे तुझंच रौद्र रूप. याला बहुतांशी आम्हीच कारण आहोत पटतंय आता. तुझ्याकडून आम्ही फक्त घेतच राहतो. वास्तविक पाहता तू दिलेलेच पुन्हा तुला अर्पण करत राहिले, तर चक्र फिरत राहील, जर जे आहे ते जपून वापरले तर. वैज्ञानिक प्रगतीच्या नावाखाली मानवाने जो विध्वंस मांडला आहे  त्यामुळे तुला प्रदूषणाचे रूप घ्यावे लागले.  तुला एक गुपित माहीत आहे का, आज जे हे विज्ञानाच्या टीमक्या मिरवतात न ते आधीच ऋषीमुनींनी शोधले आहे. काहीही नुकसान न करता. लागला होता तुला कधी धक्का पूर्वी!   वेगाच्या मागे धावतांना काय सुटतंय ते  कळत नाही. कोविडचे रूप घेऊन आलास की समस्त मानव जातीला समज द्यायला. दे माय धरणी ठाय केलंस सगळ्यांना.

     पण तुला आता आम्ही सगळे वचन देतो, तुझी काळजी घेणार आहे, तुझ्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणार आहे, लगेच जमेल की नाही माहीत नाही पण प्रयत्न नक्कीच असेल. 

     खूप दिवसांपासून तुझ्याशी संवाद साधायचा होता. म्हणून  हा पत्रप्रपंच. तुझंच रूप तुझ्यापुढे उकलण्याचा प्रयत्न केला . आता मस्त वाटतंय. सुरवातीला तुला मी बाप म्हणाले पण मनातलं सगळं लिहिल्यावर आता माझा सखा वाटतोय... कृष्णसखा. 

      तुझ्या सगळ्या रुपांना तुझाच अंश असलेल्या माझा साष्टांग नमस्कार...


                              तुझीच

                            रसिक सखी

     

    #निसर्ग#पत्रलेखन# सृष्टी#rasraj# 

      

Wednesday, 8 June 2022

चित्रकाव्य-स्वीकार

 


अवसानासी नकोस गाळू

ऐसी हतबल होऊ नकोस

चौकटीतले जीवन जगणे 

उंबरठ्याला सांगू नकोस


काय बरोबर किती चुकीचे

हिशोब कुणास कळले नाही

आयुष्याच्या सारीपटावर

दान हवे ते पडले नाही


घरट्यातील चिल्यापिलांना

आश्वस्त करी अश्वत्थापरी

वात्सल्याच्या पंखावरूनी

अवकाशीची उंच भरारी


घडेल ते ते घडू द्यावेत

जे मिळेल ते स्वीकारावे

अनुभवसिद्ध संध्याकाळी

सुखदुःखासी अता त्यजावे



©®रसिका राजीव हिंगे























प्रवाहाच्या विरुद्ध मी....

 




     "जनरीतीला धरून चालावे बघ नेहमी, उगाच सारखं सारखं वेगळं करायच्या नादात स्वतः स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेशील" असे नेहमीच सगळे म्हणतात. पण जनरीत म्हणजे काय? याला प्रमाण काय? सगळे एकाच दिशेने निघाले तर आपणही त्याच्या पाठी जावे का? पुढचा ठेचकाळत चालला तरी आपण शहाणे व्हायचे नाही का?  पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे जर असेल तर मग का पुढच्याचा पाठलाग करायचा! 

     जरा वेगळी वाट चालून पहावी म्हणण्यापेक्षा विरुद्ध दिशेने चालून पहावं. स्वतः अनुभवाच्या मुशीतून तावून सुलाखून निघून यावं. म्हणजे कळतं आयुष्य म्हणजे प्रवाहाच्या दिशेने पोहणे नसून विरुद्ध दिशेने पोहणे आहे. कल्पनेच्या पंखावर आरूढ होऊन स्वप्नांच्या जगात भराऱ्या घेणे म्हणजे आयुष्य नाही. वास्तवाची जोड देऊन येईल त्या वाटेवर चालणे म्हणजे आयुष्य, जीवन.

     या मार्गावर  मखमली पायघड्या अंथरलेल्या नसतील पण काट्याकुट्यातून मार्ग कसा चालावा याचे प्रशिक्षण नक्की मिळेल. सुखाचे इमले बांधण्याचे स्वप्न पाहणारे विरुद्ध दिशेने चालू शकणार नाहीत कदाचित. कारण अडथळ्यांची शर्यत आहे इथे. वाऱ्याच्या दिशेने उडणारा पालापाचोळा, धूर, धूलिकण, हे वजनाने हलके आहे त्यामुळे  जसा वारा धावेल तसा वाहतात. पण दगड हा अभेद्य, कणखर, आणि जड आहे. जे असे पत्थर दिल असतात, मनाने कणखर असतात पण हृदय अतिशय कोमल असतं तेच प्रवाहाच्या विरुद्ध, जनरीत मोडून जे योग्य आहे तसेच करण्याचा प्रयत्न करतात. 

     यासाठी बरेचदा वाईटपणा घ्यावा लागतो, नको ते ऐकून घ्यावे लागते. ज्ञानेश्वर महाराजांशी लोक कितीही वाईट वागले तरी ते चांगलेच वागत होते, जर का तेपण इतरेजनांसारखेच वागले असते तर ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ निर्माण झालाच नसता, जो यावश्चंद्र दिवाकर सगळ्याना मार्गदर्शक आहे.  सावरकर, नेताजी आणि त्यांच्या सारखेच क्रांतिवीर जर जे चाललं आहे ते चालू द्या असे म्हणत स्वतःचे हित साधत जगले असते तर आजही आपण पारतंत्र्यात खितपत पडलो असतो. 

     या भ्रष्ट दुनियेत दुसऱ्याच्या समोरचे ताट ओढून घेणारे आहेत. माझ्या स्वतःच्या आयुष्यात मला बरेचदा या गोष्टींचा खूप त्रास झाला, होतो आहे. पण माझ्या आईने दिलेले संस्कार असे आहेत की आधी तुझं भलं हो त्यापाठी माझं.  त्यामुळे तो तसा वागतो म्हणून मीपण का चांगलं वागायचे, नेहमीच माझ्याच तत्वांना का मुरड घालायची या आणि अशा विचारांना माझ्या मनात थाराच नाही. तुला जसे करायचे तसे कर, मी तसेच करणार नाही किंवा वागणार नाही या माझ्या भूमिकेमुळे मला नेहमीच मानसिक ताण सहन करावा लागतो. आज इतक्या दिवसानंतर आयुष्याच्या मध्यावर मला कळतं आहे की विरुद्ध दिशेने पोहण्यात,चालण्यात जो आनंद आहे, जे आव्हान आहे ते खूपच शक्तीदायक आहे, आत्मबळ वाढविणारे आहे. 

     असे असले तरी प्रवाहाच्या विरुद्ध जगत असतांना समाजभान ठेवणे गरजेचे आहे. आपण समाजात राहतो तर त्याचे पण देणे लागतो हा विचार करत चालत गेलो तर कळतं आयुष्य खूप सुंदर आहे...


रसिका राजीव हिंगे