Saturday, 31 October 2020

शुभ सकाळ






 तो ही अदृश्य

तू ही दिसेना

मग हे द्वंद्व

कुणासाठी

तो सामर्थ्यशाली

भीतीचे सावट घेऊन

येतो काय

दिवसेंदिवस एकेक प्रांत

काबीज करतो आहे

जणू स्वतःचे साम्राज्य

निर्माण केले असे भासे

आता वेळ आली आहे

त्याला त्याची जागा

दाखविण्याची

तू असा स्वस्थ बसू नको रे

किती हाहाकार माजला

हतबल झाले सगळे

दहशत निर्माण झाली आहे

म्हणून तुला प्रार्थना करते

आता तू उठ आणि 

तुझा प्रभाव कळू दे त्याला

तो पळपुटा आहे रे

तू दिसला की तो पळणार नक्की

म्हणूनच तुला सांगते 

तुझ्याशिवाय कोणी नाही रे

आमचा वाली

ये पटकन आणि येऊ दे

या सृष्टीवर

नवी पहाट


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे



शुभ सकाळ

 जसे मनात विचार

तशी घडतसे कृती

कधी मोजता येई का

इवल्या मनाची गती 


येती नकोसे विचार

मनी सारखे सारखे

सकारात्मक कृतीस

होतो आपणच पारखे


सकारात्मकतेच्याच

द्याव्या मनास सूचना

भीती दहशत सारे

खेळ तुझेच रे मना


संकटांशी भिडण्याचे

आहे सामर्थ्य माझ्यात

ऐसे सांगावे मनास

भीती जाईल क्षणात


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


सहज सुचलं म्हणून... 4

 सहज सुचलं म्हणून...


 "संगत गुण की सोबत गुण" ही म्हण  लहानपणी ऐकून ऐकून डोक्यात फिट झाली अगदी. तेव्हा अर्थ कळत नव्हता म्हणण्यापेक्षा कळून घ्यायचाच नव्हता असे म्हंटले तर वावगे ठरू नये. कारण रोजच आईचा पाढा असायचा बाहेर गेली की कुठे गेली, का गेली आणि कोण होतं बरोबर हे जास्त महत्त्वाचे.  इतक्या बारकाईने तिने माझ्या संगतीवर, माझ्या मित्र मैत्रिणींवर नजर ठेवली म्हणून मला आज हे चांगलं आयुष्य जगता येतं आहे. असो.

      आपल्या आयुष्यात कितीतरी सोबत असतात त्यांच्या चांगल्या वाईट कृतीतून,बोलण्यातून आणि देहबोलीतून सुद्धा जीवन घडत जातं नकळतपणे. 

      "ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला , वाण नाही पण गुण लागला" ही शेतकऱ्याजवळ असलेली बैलजोडी. ढवळ्या शुभ्र पांढरा आणि पवळ्या पिवळसर. शेतकऱ्याला शुभ्रतेचे आकर्षण असल्यामुळे ढवळ्या जवळ जर पवळ्या बांधला तर तो पण पांढरा होईल या आशेने तो पवळ्या बांधतो. पवळ्या शांत,कामसू तर ढवळ्या द्वाड, मारकुटा म्हणून प्रसिद्ध. याचा परिणाम असा झाला की पवळ्या तर शुभ्र पांढरा झालाच नाही पण ढवळ्याचे दुर्गुण त्याने आत्मसात केले. वाईट संगतीचा परिणाम.

शुभ सकाळ

 जीवनभर कितीतरी

मित्रमैत्रिणी भेटलेले

सगेसोयरे सभोवती

संगतीस लाभलेले


घडवीत गेले सारेच

माझे जीवन सुंदर

जगणे झाले सोपे

आला जीवना बहर


अशीच आभाळमाया

लाभावी क्षणोक्षणी

संगतीस यांचेच मेळे

असावे आनंदघनी


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


शुभ सकाळ

 जे जे आहे प्रारब्धात

ते ते आहे मिळणार

का उगाच धडपड

जीवन क्षणभंगुर


गेला क्षण भूतकाळ

आहे क्षण वर्तमान

येईल तो भविष्याचा

ऐसे आहे हो जीवन


शुभ दिन

रसिका राजीव हिंगे


रसिक - मुक्तछंद

 रसिक - मुक्तछंद


रसिका

तू आहेस म्हणून

सगळ्या कला आहेत

चौसष्ट कलांना

मिळणारी तुझी दाद

हीच खरी कलेची

यशस्वीता आहे 

तू भरभरून दाद देतोस

म्हणूनच

पुरातन कला 

जतन केल्या जातात

लेखकाला दाद देणारा 

रसिक वाचक

सुरेल गाण्याला

मान डोलावून वाहवा

देणारा दर्दी 

प्रत्येक कलेचा जसा

उपासक तसा 

तू आहेस रसिका

तू असाच निर्मळतेने

दाद देत रहा

कारण जीवनात

कुठेतरी कौतुक हवे

असते कलाकाराला

तुझ्यामुळे हे सहज

साध्य होतं

रसिकतेने आस्वाद घेणारा

रसिक आहे  

त्यामुळे 

कलेस बहर आहे. 


रसिका राजीव हिंगे

 


रसिक - मुक्तछंद

 रसिक - मुक्तछंद


तू रसिक आहेस न

मग दे ना भरभरून

प्रतिसाद

तुझी दाद किती

महत्वाची आहे हे

तुला तरी माहीत

आहे का रसिका

तुझ्या प्रतिसादामुळे

लिहावेसे वाटते रे

उत्साह येतो

लिहायला

तुझ्या वाह 

या शब्दात खूप

जादू आहे बरं

प्रत्येक कलेचा उपासक

तुझ्या या शब्दाकडे

कान लावून बसलेला

असतो

त्यांचे टॉनिक आहेस तू

म्हणून म्हणते 

तू असाच सादेला 

प्रतिसाद दे बरं

म्हणजे आपल्या कला

जोपासल्या जातील


रसिका राजीव हिंगे


शुभ सकाळ

 मन अशांत अशांत

कधी होईल निवांत

काहूरल्या विचारांनी

मन झाले चिंताक्रांत


स्थिरचित्त व्हावयास

करी मनन चिंतन

परी हे मन चौखूर

उंडारते रात्रंदिन


कसा घालावा लगाम

नाही रहात ताब्यात

एकामागून एक

विचार तांडे येतात


गुरुराया तूच वाली

आता उघड कवाड

पाहू दे  दिव्य चरण

मन झाले फार द्वाड


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


शुभ सकाळ

 कुणी म्हणती श्रीहरी

 साद घालीती माधवा

भासे कुणास  गोविंद

ऐक ना हाक केशवा


कुणा दिसे गिरीधारी

सृष्टीचा पालनहारी

आहेस पुरुषोत्तम

वासुदेव चक्रधारी


तुज नमन नमन

मुरलीधरा मुरारी

मज भासतो रे तू

दत्तरुप नरहरी


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे







शुभ सकाळ

 तू येतोस रविराजा

नित्य नियमाने रोज

कंटाळा नाही येत का

उठायचा रोज रोज


दिवसभर फिरत

कामे करतो सगळी

पूर्वेकडून पश्चिमा

गाठतो वेळेच्यावेळी


तुझ्यासारखे आहे रे

सगळेच चराचर

पण हा मानव प्राणी

ऐकत नाही ना गजर


तुला सांगते भास्करा

आता ऐकतील सारे

आला न अदृश्य शत्रू

घेत तुझे ज्ञान सारे


आता घालतील बघ

तुला रोज नमस्कार

शक्ती तुझी देशील ना

ऐकू तुझा रे गजर


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे

प्रसंगानुरूप काव्य

 प्रसंगानुरूप काव्य

 The sound ऑफ music चित्रपटातील प्रसंगावर आधारित

 



कैसी किमया घडली

सहज आलास पुढती

गिरकी घेता घेता रे

तव हात आले हाती


 नृत्याविष्कार बघता

 मम काया शहारली

 जादू तुझ्या स्पर्शात

 लाज गाली विसावली


तव नयनांची भाषा

मज आकळे क्षणात

जन्मजन्मांतरीची 

भेट होई  निमिषात


कोण मी न मज ठावे

सहवास आनंदला

तुझा स्पर्श सांगतसे

मीच आधार ग तुला


ऐसी वृक्षा बिलगली

वेल नाजूक लाजून

स्वर्गसुख ते यापरिस 

सांग कोणते साजण



रसिका राजीव हिंगे







शुभ सकाळ

 शारदीय चांदण्यात

आसमंता ये बहर

कोजागिरी पुनवेचे

रम्य चांदणं पिठूर

रविराजा देई चंद्रा

प्रकाशाचे हे आंदण

तेच तेजाळले रूप

करी शीतलता दान

भारतीय संस्कृतीस

विज्ञानाचे अधिष्ठान

दुधाळल्या चांदण्यात

मिळे आरोग्याचे दान

कोजागिरी पुनवेचे

चला करू जागरण

को जागर्ती विचारत

करू चंद्राचे पूजन


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे



प्रियाविण उदास वाटे रात

 







आठवांच्या सागर किनारी 

येऊन बैसली चांद रात

प्रियाविण उदास वाटे रात


तेजोनिधी लपला गगनात

येईल आता रजनीनाथ

शुभ्र चांदण्यांच्या अंगणात 

प्रियाविण उदास वाटे रात


बोलावयाचे तुज संगती

किती साठलेले अंतरात

तुजवीण कशी रे सांजवात

प्रियाविण उदास वाटे रात


भामाचा पारिजात फुलला

कृष्णसख्याची चाहूल अशी

भासे जणू प्रीतमंदिरात

प्रियाविण उदास वाटे रात


दशदिशा ही बघ तेजाळल्या 

पौर्णिमेच्या चांद राती रे

भरतीला उधाण सागरात

प्रियाविण उदास वाटे रात


रसिका राजीव हिंगे


प्रियाविण उदास वाटे रात

 




पुनवेची चांदरात

सागरास ये भरती

उंच लाटा उसळुनी

तीरावरी त्या धावती


जाईजुई गंधाळली

रातराणी ये बहरा

फेर धरती चांदण्या

चंद्र आला लाजरा


लाजुनिया दरवळे

भामेचा ग पारिजात

समर्पण करी स्वतः

रुक्मिणीच्या अंगणात


ऐसी येई बहरास

धुंदावली पूर्णरात

प्रियावीण उदासली

वाटे मजला ही रात


रसिका राजीव हिंगे

दिवस

निमिष क्षण पळ

घटिका प्रहर युक्त दिवस

नियमाप्रमाणे

उगवतो आणि मावळतो

यात बदल होत नाही

प्रत्येक दिवस 

वेगळं वळण घेऊन

येतो 

नवे संकेत,नवी आशा

मनाला देत दिलासा

प्रत्येक दिवसांचं रूप

वेगळं 

कधी सुखाच्या हिंदोळ्यावर

तर कधी दुःखाच्या डोंगरावरून

कडेलोट करणारा दिवस

कसाही असला तरी

तो आपला असतो

माझा असतो

माझे सगळे जगण्याचे

धागे त्याच्याभोवती

गुंडाळलेले असतात

जोडलेले असतात

माय लेकरांच्या

नाळेसारखे.


रसिका राजीव हिंगे



दिवस


दिवस येतात जातात

काही आठवणीत

राहतात

तर काही

विस्मरणात जातात

एखादा दिवस

मृगजळामागे धावायला

लावतो 

कधी स्थिर थांबलेला

दिवस येतो.

कधीतरी विसरलेला

दिवस आठवतो आणि

आजचा दिवस दुखावतो

आजच्या दिवसाचे

महत्त्व कमी करणारा

भूतकाळातील दिवस

दुःख देणारा असतो

त्याच्या आठवाने 

आजचा दिवस 

विस्कटून जातो

आयुष्यात सुखाचे दिवस

आठवत नाहीत

दुःखाचे दिवस

जास्त आठवतात

वारंवार

एखाद्या ओढाळ

बैलाप्रमाणे.


रसिका राजीव हिंगे

दिवस स्वप्नातला

 दिवस स्वप्नातला


रोज एकच स्वप्न

एका दिवसाचे 

काहीच करायचे नाही

फक्त वाचायचे

लिहायचे

एका हातात 

आवडत्या लेखकाचे

पुस्तक असावे

बाहेर भुरभुरणारा पाऊस

हातात कॉफीचा मग

बसायला छान आरामखुर्ची

निवांत बसून वाचत

रहावे

कशाचीच चिंता नको

असा दिवस यावा

एकदातरी

मन शांत शांत 

करणारा.


रसिका राजीव हिंगे


बासरी




सूर बासरीचे 

रानी निनादले

खळाळे यमुना

वन बहरले


गायी हंबरती

ऐकूनिया सूर

लतावेलींनाही

येई हो बहर


नसे बासरीस

अहंकार बाधा

फक्त गाती सूर

राधा राधा राधा


षडरिपूंचे ही

होतसे गमन

श्वास उच्छ्वास

वेणूचे जीवन


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे



चित्रकाव्य

 


रंग भरले चित्रात

दिसे रंगात श्रीरंग

श्वास भरता वेळूत

उठती भाव तरंग


फुंकरीने उमटला

मनामनात गंधार

सुकोमल सुरावरी

नादावला ग श्रीधर


निळ्या निळ्या नभातळी

घुमे हरिची सानिका

मोहरल्या ग गोपिका

मुग्ध जाहल्या कलिका


श्रीहरीस प्रिय झाली

सप्त छिद्रांकीत वेणू

राधेसम बासरी ही

श्रीहरिचा श्वास जणू



रसिका राजीव हिंगे





फेर

 फेर






डोंगराच्या पल्याड रे एक गाव वसलेले

सुंदरसे साजरे रे चांदण्यांनी भारलेले


होते गावी एक झाड नदी किनारी वाळूत

दाट सावलीत याच्या पशु पक्षी विसावत


कुणी नच पाही त्याला एकटाच उभा रानी6

हिरमुसे थोडा थोडा पाणी दाटे रे नयनी


आला एक वाटसरू गावी फिरत फिरत

दाट छायेत विसावे असा क्षुधा तृषाक्रांत


पाहुनिया वाटसरू झाड हर्षले मनात

जे जे इच्छिले ते देत गेले हो क्षणात


क्षणार्धात उठोनिया नाचू लागला  स्वानंदे

फेर धरी भोवताली सानथोर ही आनंदे


ऐका लौकिक झाडाचा असे झाड आनंदाचे

सावलीत याच्या मज क्षण लाभले सौख्याचे


कल्पवृक्ष असे जणू लाभे जे हवे तुम्हास

हाच आनंदवृक्ष रे सुखावतो आपणास


हात हाती आले ऐसे फेर धराया भोवती

सुख संवादन झाले अन सुखावली माती


हीच का ती रासक्रीडा यमुनेच्या तीरावरी

फेर धरी सवंगडी मधे  राधा नि मुरारी


रसिका राजीव हिंगे









डोंगराच्या पल्याड रे एक गाव वसलेले

सुंदरसे साजरे रे चांदण्यांनी भारलेले


होते गावी एक झाड नदी किनारी वाळूत

दाट सावलीत याच्या पशु पक्षी विसावत


कुणी नच पाही त्याला एकटाच उभा रानी

हिरमुसे थोडा थोडा पाणी दाटे रे नयनी


आला एक वाटसरू गावी फिरत फिरत

दाट छायेत विसावे असा क्षुधा तृषाक्रांत


पाहुनिया वाटसरू झाड हर्षले मनात

जे जे इच्छिले ते देत गेले हो क्षणात


क्षणार्धात उठोनिया नाचू लागला  स्वानंदे

फेर धरी भोवताली सानथोर ही आनंदे


ऐका लौकिक झाडाचा असे झाड आनंदाचे

सावलीत याच्या मज क्षण लाभले सौख्याचे


कल्पवृक्ष असे जणू लाभे जे हवे तुम्हास

हाच आनंदवृक्ष रे सुखावतो आपणास


हात हाती आले ऐसे फेर धराया भोवती

सुख संवादन झाले अन सुखावली माती


हीच का ती रासक्रीडा यमुनेच्या तीरावरी

फेर धरी सवंगडी मधे  राधा नि मुरारी


रसिका राजीव हिंगे














जोगवा


 शब्दसुमनांचा जोगवा

नवदुर्गेस घातला मी

जे जे तू कथीयले अंबे

तेच वर्णिले चंडिके मी


हे अपर्णे घडविलास

ऐसा भक्तीचा जागर टफ

म्हाळसाई गे निरंतर

हो तव नामाचा गजर


तुजसम शक्तीचे दान

कणखर खंबीर मन

वाढावे गे आत्मबळ

ऐसे सकला दे आंदण


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे





विजयपर्वाच्या शुभेच्छा

 तो आला 

सूक्ष्म रूप घेऊन

वसवलं साम्राज्य त्याने

आपलं

दहशत निर्माण केली

दे माय धरणी ठाय

करून सोडलं

पण.....

मनामनात सलोखा 

निर्मिला

अहंकाराच्या रावणाचे

दहन करण्यास 

सिद्ध झाला 

असूयेच्या

द्वेषाच्या महिषासुराचे

मर्दन त्याने केले

विजयादशमीच्या

सुमुहूर्तावर सीमोल्लंघन

करावयास सिद्ध झाला

सिद्धीदात्री आहे

त्याच्या सवे

तिचीच माया असेल 

का ही? 

भक्तांच्या रक्षणासाठी

निर्मिलेली!


ह्या विजयपर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

रसिका राजीव हिंगे


स्कंदजननी







 जगदंब जगदंब जगदंब

हे स्कंदजननी जगदंबा

मातृरूपेण जगदात्री

तुज नमो नमः धात्री


करुणामुर्ती सिंहारूढा

पद्मासना शांतिरुपिणी

पराक्रमाचे प्रतीक तू

भवसागरी मोक्षदायिनी


तुज आराधिती जे जे

त्यांसी लाभे मोक्षप्राप्ती

सदाश्रिते जाणूनिया गे

दे पुत्रपौत्रा सुखशांती


हे तेजस्विनी सर्वेश्वरी

निरागस नि सर्वज्ञानी

तुजसम होऊ दे सारे

आत्मनिर्भर आत्मज्ञानी


शुभ सकाळ🌹🙏🏻

©️रसिका राजीव हिंगे

8600047066

कात्यायनी

 







हे भगवती कात्यायनी

कल्याणी मातृरूपिणी

शुभंकर रूप तेजाळे

तुज नमो नमः भमिनी


ब्रह्मा विष्णू महेशाचे

तेजातुनी तू प्रगटसी

महर्षी कात्यायनी गे

प्रथम तुज आराधिती


ऐसे लाभे नामाभिधान

जगदंबे तुज कात्यायनी

अत्याचारास सारुनिया

वधिला महिषासुर रणी


कुमारिकांची आराध्या

इच्छित वर प्रदायिनी

चारी पुरुषार्थाची प्राप्ती

सहज लाभे तव चरणी


अराजक पुन्हा माजले

तुजसम देई आत्मबळ

आत्मरूपी एकरूपता

दे निवाराया सारे खळ


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे





सिद्धीदात्री







सिद्धीदायक  सिद्धीदात्री

दुर्गा भवानी स्वरूपिणी

सिंहारूढा कमलासनी

शोभसी तू वरदायिनी



महादेवे आराधिली दुर्गा

सर्वसिद्धी प्राप्त व्हावया

यक्ष गंधर्व किन्नर सारे

असुर ही ध्याती महामाया


गुरुकृपा प्रसादे साधका

सिद्धशक्तीचे लाभे साधन

सिद्धीदात्री करुणामयी

मोक्ष मुक्ती देई वरदान


जे जे इच्छिले रे सारे

महामाये दे साधकास

हे जगतजननी अंबिके

धैर्य शक्ती दे रसिकास


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे






महागौरी












 हे महागौरी मंगलदायिनी

शरण  तुजसी नारायणी

सुकोमल शांतस्वरूपिणी

नमन तुजसी दाक्षायणी


अंबे शंभू भ्रताराकारणे 

व्रतस्थ होसी तू गौराई

शीघ्र फलदायिनी गे

कुलस्वामिनी म्हाळसाई


वृषभरूढा तू शांभवी

तू वारीसी पूर्वसंचिता

शुभ्रवर्णा ज्ञानदायिनी

निरागस तू तेजस्विता


तुज प्रार्थिता कल्याणी

विद्वत्ता लाभे जीवनी

वरदहस्त कुळावरी गे

रसराज लिन तवचरणी


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे





कालरात्री








आदिशक्ती देवी दुर्गा

काळोखासम ते रूप

ऐसे तव हे मायाजाल

कालरात्री हे शक्तीरूप

संहाराया दुष्ट प्रवृत्ती

रूप घेसी ऐसे भयंकरी

भक्तांसाठी मातृरूपेंण

भक्तवत्सल शुभंकरी


शुंभ निशुंभ रक्तबीज

अति माजले सृष्टीवरी

तारावया त्रिभुवन सारे

रक्तबीज वधिला सत्वरी


गर्दभारुढा वज्रधारिणी

अंबिके तू भयहारिणी

विश्वव्यापक सुखकारक

नमो नमः कालरूपिणी


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


ब्रह्मचारिणी











 हे ब्रह्मचारिणी,

शक्तीस्वरूपिणी अंबे

नमन जपमाला धारिणी

अनंत अस्तित्वाची जाण

लाभे अंबिके तव चरणी


तुज आराधिता भवानी

आकळे गुण ब्रह्मचर्याचे

आत्मज्योत रूपिणी माते

भाव जागवी निरागसतेचे


कमंडलू धारिणी तेजसी

वाढो आत्मबळ सहज

तुजसम लाभो सामर्थ्य

प्रार्थितसे तुजसी रसराज


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


कुष्मांडा

 









 

हे कुष्मांडा शक्तीदायिनी

 ऊर्जा प्रदायिनी नमो नमः

 अष्टभुजा तू विश्वनिर्माती

 सिंहारूढा तुज नमो नमः


बाण,चक्र,गदा,कमंडलू

अमृत कलश, धारिणी

शिवशक्ती नवनिर्माती

सुर्यमंडळ निवासिनी


शुभानने तुज प्रार्थिता गे

आत्मबळाचे होई सृजन

जगतजननी आराधिता

आरोग्याचे मिळे आंदण 


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे

चंद्रघंटा






 हे चंद्रघंटा माय भवानी

सुगंधप्रिय शांतरूपिणी

तुज नमन नमन त्रिवार

अपर्णा अहंकारनाशिनी 


चंद्रालंकारांनी सुशोभित

समशेर गदा शस्त्रधारिणी

कमलपुष्पासम सुकोमल

महापराक्रमी असुरवधीनी


हे हिमकन्यके स्वामिनी

लाभो मनाची सजगता

वाढावी गे कणखरता

मर्दिनी तुज आराधिता


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


शैलपुत्री










 कुलस्वामिनी म्हाळसाई

त्रिवार नमन तुज माते

दत्तरुप सद्गुरुनाथा

नमन वंदन तुज करिते


नवदुर्गेचा हा जागर 

शारदीय नवरात्री या

प्रथम रूप शैलपुत्रीस

साष्टांग नमन करुनिया


वृषभरूढा गिरीकन्यके

त्रिशूलधारिणी पार्वती

वज्राहुनी कठीण माये

रूप तुझे हे भक्त ध्याती


तुजसम कणखरपणा

नारीशक्तीस दे वत्सले

भिरभिरणारे चंचल मन

स्थिर,खंबीर कर अमले


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


प्रासंगिक काव्य

 











अशी का रुसली बयो

ये माझ्या पापणीवरी

तुज सगळ्या उपायी

आळविते परोपरी


काळाकभिन्न काळोख

पसरला चराचरी

चंद्र चांदण्यांची सभा

बघ भरली अंबरी

परी अजूनही अशी 

उभी का ग दुरवरी

अशी का रुसली बयो

ये माझ्या पापणीवरी


पाखरांच्या घरट्याची

बंद झाली कवाडे ग

निजल्या ग पायवाटा

शांतल्या रान वाटा ग

निशाचर गस्त घाली

पहुडल्या सृष्टीवरी

अशी का रुसली बयो

ये माझ्या पापणीवरी


नको ओलावू सारखा

नयनी पापणकाठ

आठवांच्या घागरीही

भरल्या ग काठोकाठ

ये ग ये ग नीज बाई

चटकन झडकरी

अशी का रुसली बयो

ये माझ्या पापणीवरी


किती चाळले ग्रंथ मी

जपजाप केले किती

किती सूर आळविले

काव्य ही रचले किती

नभी आला शुक्रतारा

येई पहाट हासरी

अशी का रुसली बयो

ये माझ्या पापणीवरी


अशी का रुसली बयो

ये माझ्या पापणीवरी

तुज सगळ्या उपायी

आळविते परोपरी


रसिका राजीव हिंगे

कृष्ण सखा अधिकमास











शब्द शब्द जुळवून

भाव सुमने वाहिली

स्वीकारावी कृष्णसख्या

शब्दफुले अर्पिलेली


तव चरणी जे आले

भवसागरी तरले

त्यांचे स्मरण करुनी

शब्द प्राजक्त वाहिले


नसे सामर्थ्य माझे हे

तूच लिहिविले सारे

धरूनिया लेखणीस

तूच गिरविले सारे


झालेल्या अपराधाची 

क्षमा करावी केशवा

सत्कर्माचे गुज सांग

मज एकदा माधवा


पुरुषोत्तमच्या पदी

अधिकातील अर्पण

जे जे भलेबुरे ते ते

सारे सारे समर्पण


रामसद्गुरू कृपे

तुज प्रार्थिते गोविंदा

आता सावर भारता

सारी आवर आपदा


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे



हिरवे जंगल भवती

 हिरवे जंगल भवती


बीज मातीत रुजले

कसे वाढले फुलले

कोणी सांगेल का गूढ

कुणी इथे रुजविले


आधी बीज की फळ

रुजविते कोणा माती

वृक्षराजी बहरून

होते हरित धरती


संतुलन धरतीचे

वृक्षराई ची निर्मिती

केली असे ईश्वराने

हेच सत्य भुवरती


सांभाळावे मनुजा रे

तुझा भूगोल धरती

आनंदात राही जेव्हा

हिरवे जंगल भवती


रसिका राजीव हिंगे


हिरवे हिरवे जंगल भवती

 हिरवे हिरवे जंगल भवती


रानवारा शीळ घालीतो

पाखरेही गायन करिती

काय आहे पाहण्या गेले

हिरवे हिरवे जंगल भवती


हिरवाईचा साज लेउनी

भासते नववधू नटली ती

सळसळ पानांची ऐकुनी

वाटले कंकणे किणकिणती


पाचोळ्याचे नादमय नृत्य

पैंजणे जणू तिची छमछमती

गंधाळलेले तिच्या सम हे

हिरवे हिरवे जंगल भवती


फळाफुलांनी लगडलेले

पशु पक्षी आनंदे वसती

गोकुळ भासे तिचे घरकुल

हिरवे हिरवे जंगल भवती


वृक्षराजी जिथे बहरती

आरोग्याचे आंदण देती

तिच्यासाठी कवच घेऊनी

हिरवे हिरवे जंगल भवती


ऐसी नववधुसम नटलेली

राहू दे देवा माझी धरती

आरोग्याचे शिंपण करीत

हिरवे हिरवे जंगल भवती


रसिका राजीव हिंगे


चित्रकाव्य






रूप पाहे निरखुनी

जलाशयाच्या दर्पणी

आले आभाळ क्षितिजी

घेई कवेत धरणी


डोंगर कपारी वाहे

मंद मंद गार वारा

उभी राहुनी सलज्ज

पाहे आभाळास धरा


पांघरली निर्झराने

निळी झुळूक बावरी

भाव तरंग उठुनी

धुंद पदन्यास करी


गर्द हिरवी पैठणी

ल्याली सावळी धरा

जलाशयातील बिंब

पाहुनी लाजली जरा


नीलवर्णी  आभाळाचे

रंग ल्याले निर्झराने

भासे जणू निलांबरी

धरणीही या रंगाने


आभाळाचा धरणीशी

ऐसा हा मिलनोत्सव

सारे चराचर पाही

प्रीतीचा हा महोत्सव


रसिका राजीव हिंगे


आतुरता

 

समिंदराच्या किनारी, लाट उंच उंच धावे

आतुरता तिच्या मनी,चंद्रा नभीच्या पहावे


पुनवेच्या रातीसही धाव घेई तीरावरी

आतुरली होती लाट द्यावी भेट कोणीतरी


एकटीच होती लाट शांत ऐकतसे गाज

आतुरल्या नजरेने पाहे कोण आहे आज


नारळाच्या झावळीत विसावले कोण कोण

आतुरतेने पाही ती  फक्त चंद्राचं चांदणं


विसरुनी सारे सारे, म्हणे येईल पहाट

आतुरता वाढवित, चैतन्याची आली लाट


रसिका राजीव हिंगे




पळस









 शिशिर जातो वाट चालत

पाचोळ्याचे पैंजण नादवीत

गर्द रंगाचे सौंदर्य लेऊन

ग्रीष्मात येतो तू मोहवीत


तुझं फुलणं, तुझं बहरणं 

पानाफुलातून दरवळणं

आरोग्याचे शिंपण करीत

मनाला भुलवित तुझं येणं


तुझ्या अस्तित्वाने फुलते

पायवाट ती रानीवनी

सुर्यसखा आहेस का तू

दावानल भासे दुरुनी


रसिका राजीव हिंगे


चित्रकाव्य







मान झुकवुनी असा का

दिससी तू शरणागता

काय कमी तुजसी रे

विश्वाची आहे का चिंता


दिसभर राबराबतो

मोहवीते हे तंत्रजाल

नयनात ये अश्रुधारा

परी सुटे ना मोहजाल


श्रीमंतीचा एकच ध्यास

धावधावतो एकसारखा

आरोग्याचे मोल देऊनी

भेटशील का या सुखा


वेगास या आवर घाल

होईल ऐसे शुष्ककाष्ठ

जरा बघ ना चोहीकडे

उघड तुझे सुंदरसे ओष्ठ


शुष्ककाष्ठ झाले कैसे

थांबले रे जलसिंचन

नको धावू ऐसा वेड्या

कर समाधानाचे शिंपण


रसिका राजीव हिंगे






मन



मन! 

काय काय दडलय आहे

याच्या गाभाऱ्यात?

सगळ्या जगाची उलथापालथ

आहे मनाच्या तळाशी.

याची अस्थिरता पाहून

वाटतं तळाशी असतील 

लपलेले स्थिरतेचे मोती. 

खोलखोल काळ्याकभिन्न

डोहात असतील का

दडलेले पाचू जे

प्रकाशाचा मार्ग

दाखवतील.

मना,  तुझं आनंदाने

भिरभिरणं  म्हणजे 

अल्लड बालिका तुझ्या

किनारी भिरभिरते आहे

शंख शिंपले शोधत

हे सगळं मोहवून

टाकतं रे कधी कधी.

तुझं स्वच्छंद उंडारणं

सुखाची चाहूल आहे की

काय असे वाटावे.

तुझं अलवार होणं 

कोणी हृदयस्थ प्रवेश

करतो आहे तुझ्या

दालनात.

तू जेव्हा पाखरू होऊन

आकाशी झेप घेतोस न

ती असते यशाची,

किर्तीची भरारी

तुला बांध घालणं

अशक्यच नाही तर

कठीण आहे बरं

तू कसाही वाग मला

आवडतोस तू

कारण माझंच

रूप दिसते मला तुझ्या 

स्वच्छ आरशात.


रसिका राजीव हिंगे




माझे अंगणी

 माझे अंगणी


निसर्ग आला ग

माझिया अंगणी

रूप घेऊनिया

ऐक ना साजणी


ऊन सोनसळी

ये रामप्रहरा

खेळे फुलांसवे

गंधाळला वारा


माझिया अंगणी

पहुडली दुपार

विसावली सांज

वेळ ही कातर


चंद्र चांदणेही

दारी उतरले

जाईजुई चाफा

रातीस फुलले


श्रावणाची सर

भिजले अंगण

मृदगंधानेही

शहारे अंगण


काऊ चिऊ आले

रंगीत पाखरे

आले अंगणात

ही फुलपाखरे


माझे हे अंगण

आले गे फुलुनी

सुख  विसावले

माझिया अंगणी


रसिका राजीव हिंगे




प्रसंगानुरूप काव्य

 प्रसंगानुरूप काव्य


निःशब्द रात्र

शीतल चांदणे

प्रणय बहर

का असे रुसणे

प्रीतीच्या  शपथा

किती ती वचने

परी काय झाले

कशास बहाणे

काय द्यावे आता

सारे समर्पण

उरले न काही

तुलाच अर्पण

दिशा वाऱ्याची ही

कधी का कळेना

प्रीत मनातली

तुज उमजेना

तुझ्याचसाठी रे

असे शृंगारणे

येणे मोहरून

अन बहरणे

कसली देतोस

मजला तू सजा

तुजवीण नसे

जगण्याची मजा


रसिका राजीव हिंगे




हा अबोला कुठवरी

 





हा अबोला कुठवरी


हे रुसणे लटकेच

धुसफूस किती उरी

ऐसे तोंड फिरवणे

हा अबोला कुठवरी


संवादच संपलाय

प्रश्न अनुत्तरीतच

न बोलता धुमसणे

वाद हे वाढणारच


राग तर येणारच

जात नाही मनातून

म्हणून का हा अबोला

तुझ्या या वागण्यातून


तुझे माझे करण्यात

वेळ नकोस घालवू

सारे क्षणभंगुर हे

नको मनात साठवू


कस लागेल जीवनी

राग लटकाच जरी

होऊ दे संवादन

हा अबोला कुठवरी



रसिका राजीव हिंगे



क्षण

 


प्रसंगानुरूप काव्य


सारेच क्षणभंगुर

क्षण येतात 

स्वतःचं अस्तित्व घेऊन

आलेला क्षण अनुभवत

असतांनाच पुढचा

उभा असतो उंबरठ्यावर

असे हे चक्र सुरू आहे

अव्याहतपणे

क्षण प्रेमाचे

तर कधी विरहाचे

सुखाच्या पाठी

दुःखाचे क्षण आहेतच

कधी आनंदाच्या झुल्यावर

मनसोक्त विहरत

येतात तर कधी 

मायेने ओतप्रोत भारलेले

तर काही होत्याचं

नव्हतं करतात निमिषात

प्रत्येक क्षणाचं अस्तित्व

वेगळं निराळं

गेलेला क्षण परत येत नाही

येणारा क्षणही

आपला आहे की नाही

सांगता येत नाही

असे हे विविधरंगी ढंगी

क्षण ज्याने अनुभवले

जगले,सोसले 

त्याच्यासाठी

आयुष्य खूप सुंदर

आहे

क्षणभंगुर असलं तरी.


रसिका राजीव हिंगे


करशील पुन्हा खोड्या?















यमुनेच्या तीरी वाजवी बासरी

भुलवितोस ती राधा बावरी

येती सारे बोल लावत कान्हा

करशील का सांग खोड्या पुन्हा?


गोपबाला धावत येती घरी

वस्त्रे पळविलीस तू यमुनातीरी

आले भांडत गोकुळ बघ कान्हा

 करशील का सांग खोड्या पुन्हा?


दही दुधाची चोरी करुनी

गोपांसवे मग गट्टम करिसी

मथुरेच्या बाजरी काय धाडू कान्हा

करशील का सांग खोड्या पुन्हा?


वाटेवरती फोडीसी हंड्या

ओलेत्या गोपी बोलती साऱ्या

द्वाड म्हणती यशोदेचा तान्हा

करशील का सांग खोड्या पुन्हा?


कशी देऊ सजा सांग लल्ला

खांबासी बांधता तुला माधवा

ब्रह्मान्ड दिसे तुजभोवती कान्हा

कशा सावरू  सांग खोड्या पुन्हा


मज ठावे सारे तू पालनकर्ता

लीला दाविसी रे तू विश्वत्राता

सामान्य  भक्ता कळेना कान्हा

म्हणुनी तू करू नकोस खोड्या


रसिका राजीव हिंगे


श्रीहरी













आले दाटून मेघ पुन्हा

काळे नि जांभुळले

जणू भासे धरेवरी

कृष्णरूप हे सावळे


वीज कडाडली नभी

आल्या सरीवर सरी

करी कृपेचा वर्षाव

मधुसूदन श्रीहरी


गार वारा भिरभिरे

गंधाळली फुले सारी

दिसे मजला भूवरी

वासुदेव गिरीधारी


टपटपे पारिजात

नादमय पदन्यास

राधासवे रचियेला

वाटे मुरारीने रास


असतोच इथे तिथे

श्रीकृष्णा कणाकणात 

सद्गुरू रूपे मज

भेटतो चराचरात


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


युधिष्ठिर






जेष्ठ असे कुंतीपुत्र

युधिष्ठीर धर्मराज

न्याय्य कर्तव्यकठोर

सत्यप्रिय त्यागराज


अस्त्र शस्त्र प्रवीण जो

पराक्रमी महारथी

द्युतक्रीडेच्या रणात

पडे मात्र धारातीर्थी


राज्य संपत्ती बांधव

सारे लावले पणास

काही उरे ना जवळी

याज्ञसेना ही पणास


राजसत्तेचे कपट 

खेळ होता सत्तांधेचा

अंधत्वाचा डोळसपणे

डाव हा हरवण्याचा


सत्य जिथे तिथे न्याय

संहारुनी राखे लाज

कुरुवंशाचा सम्राट

शोभे खरा धर्मराज


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


दारुक





गरुडध्वज 

कृष्णाच्या

रथाचे सारथ्य

तू केलेस

सारथी, अश्व

पागा याव्यतिरिक्त

कुठलाही विचार नसे.

सामान्य व्यक्तिमत्त्व

कृष्णाच्या सहवासात

तू असामान्य झालास.

त्याच्या छायेत जो असेल

तो सामान्य कसा असेल

बरं.असामान्यत्व बहाल 

करण्यासाठीच तर तो

होता न. 

अश्वासंबंधी खडानखडा

माहिती असलेला तू.

कृष्ण रथारूढ होण्याआधी

तुझे पादवंदन स्वीकारताना

गळाभेट देतसे तुला

आभाळ ठेंगणे वाटायचे

न तुला?

खरं सांग.

यादवांच्या, शत्रूपक्षांच्या

मनाच्या विचारांचे

सारथ्य करणाऱ्या,

प्रत्येकाच्या जीवनरथाचे

वेग ज्याच्या हाती आहेत

त्या युगंधराच्या रथाचे

सारथ्य तू करत होतास

कोणते सत्कर्म केलेस रे

तुझं संचित इतकं पुण्यमय

होतं दारुका?


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


धृतराष्ट्र

 





राजकारणी कपटी 

कर्तव्यदक्षतेचं सोंग घेतलंस

पुत्रप्रेमाने  अधीर 

फक्त राज्याचा विश्वस्त

तरीही जागत्या कुटील

भावनेने राजमुकुट चढवून

अनभिषिक्त सम्राट

समजलास स्वतःला

जन्मांधतेचं कारण

रणसंग्राम कधी केलेच

नाहीत

कुटील डावपेच आणि राजनीती 

सभोवतालही तसाच होता

प्रचंड शक्ती असूनही 

त्याचा उपयोग राज्यासाठी

नाही केलास

पुत्राच्या कुटील कारवायांना

साथ देत गेलास 

कुरुवंशाचा नाश ओढवला

सत्यप्रिय सहचारिणी

न्यायकठोर भीष्म

कुरुवंशाचे गुरू कृपाचार्य

द्रोणाचार्य विदुर असे 

रथी महारथी असतांना

कुरूवंशाची लाज 

सांभाळू शकला नाहीस

यापरिस दैव दुर्विलास तो

कोणता?


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे

अर्जुन






सव्यसाची

धनंजय,पार्थ अशा 

विविध नावांनी ओळखल्या 

जाणाऱ्या गुरू द्रोणाचार्यांच्या

शिषोत्तमा 

इंद्रपुत्र अर्जुना

प्रत्यक्ष अग्नीकडून तुला

प्राप्त झालेले तुझे 

गांडीव धनुष्य आणि 

अक्षय भाता 

याचे बळावर किती

रणसंग्राम लीलया जिंकलेस

कुरुक्षेत्रावर आप्तस्वकीय

पाहून हतबल झालास

तुझ्या धनुष्याची शक्ती

जणू संपुष्टात आली असे

भासले तुला

का?

धर्मयुद्ध होते हे

सत्याचा विजय निश्चित होता

तुझा केशव तुझ्या सोबत होता

तरी घाबरलास

रणभूमीवर समोर शत्रू

उभा ठाकला होता

गीतेसारखे ज्ञानामृत तुला

भगवंताने दिले

ते ग्रहण करण्याची

दिव्य शक्ती  प्रदान केली. 

अवघ्या विश्वाचा रथ 

चालविणारा वासुदेव

रथाचे सारथ्य करतो 

यातच

तुझे यश तुझा विजय 

निश्चित होता पार्था

सत्य सत्कर्म जिथे

तिथे कृष्ण आहेच हेच

अंतिम सत्य आहे.


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


सुदामा

 


















मैत्री 

अतूट बंधन

तुझी आणि कृष्णसख्याची

मैत्री अजरामर झाली.

सांदीपनी ऋषींच्या

अंकपाद आश्रमात 

एक गरीब सच्छिल ब्राह्मणकुमार 

एक यादवांचा राजकुमार

गुरुबंधू म्हणून भेटलेला 

कृष्ण तुला मैत्रीसारखे 

अमोल रत्न देता झाला. 

तुला मांडीवर घेऊन 

तुझ्या पायातले काटे काढणारा

तुझी पाद्यपूजा करणारा सखा

तुझे पोहे स्वीकारून 

तुला  समृद्धीचे आंदण

देणारा द्वारकाधीश तुझा सखा

तुला गळाभेट देणारा तुझा

गुरुबंधू परममित्र श्रीकृष्ण

किती रुपं ही तुमच्या मैत्रीची

मैत्रीच्या आड कोणतीच गोष्ट

येऊ शकत नाही याचे

उदाहरण म्हणजे ही मैत्री

जगज्जेता श्रीकृष्णाशी

मैत्री म्हणजे पूर्वसंचित

तुझे उत्तम होते हेच 

सत्य. होय ना?


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे

कर्ण

 कर्म संचित प्रारब्ध जर

जन्मजन्माचे सूत्र असेल 

कर्ण सुतपुत्र म्हणून जगला 

श्रीकृष्ण गवळ्याचं पोर.

एक सुर्यपूत्र तर एक 

प्रत्यक्ष पालनकर्ता विष्णुरुप

महाबलाढ्य कुरुवंशात 

जन्मास आलेला कर्ण 

अठरा कुळ असलेल्या

महापराक्रमी यदुवंशात

जन्म लाभलेला कृष्ण 

दोघांचेही भाळी अवहेलना

होतीच 

जन्म झाल्याबरोबर एकास स्वतःच

गंगा पार करून किनारा गवसला 

सुतपुत्र झाला.

कृष्णास

भीतीच्या सावटाखाली

यमुना पार करून गवळ्याचं

पोर व्हावं लागलं.

एक दानवीर होऊन

कर्म करत गेला तर 

एक सूक्ष्म कर्म रहस्य

उलगडून सांगत होता.

प्रत्यक्ष ईश्वरास कर्मभोग

चुकत नाहीत हे सांगण्यासाठी

हा अवतार होता.

फळाची आशा

न करता सत्कर्म करत रहा 

हेच जगण्याचे सूत्र 

नारायणाने नरजन्म घेऊन

सिद्ध केले.


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे
















अक्रूर

 कंसाचा मंत्री

म्हणून

आमंत्रण द्यायला आला 

गोकुळीं बलराम कृष्णास

धनुर्यागाचे

तू तर मंत्री होतास

फक्त राजाज्ञा पाळणे

एवढेच तुझे कर्तव्य

तरीही कंसाचे कपट

सांगून नंदराजास

सावध केलेस

बलराम कृष्णास ही 

पूर्वकल्पना दिली

का?

तुझ्या मनात कसलं

द्वंद्व सुरू होतं

गोकुळातून कृष्णास घेऊन

जाणे कष्टप्रद होईल की

कंस कृष्ण आणि बलरामाचा

कपटाने वध करेल.

तुला हे ही माहीत होत न

कृष्ण हा परमात्मा आहे

कंस वधासाठी आणि दुष्टांचे

निर्दालन करण्यासाठीच

हा अवतार आहे.

तरीही तू का आलास 

हे सांगितलंस.

कृष्णावरच्या भक्तीमुळे

की प्रेमामुळे 

का या यादवश्रेष्ठास

प्रथम तुला पाहण्याची

इच्छा झाली म्हणून

तू हे आव्हान

स्वीकारले?


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


उद्धव

 कृष्णाचा सखा 

परमसखा

मथुरेला पहिल्या भेटीतच

सुगंधित पुष्पमाला घालून

केलेले कृष्णाचे स्वागत

त्यावेळी भारावलेला हरी

आणि सुखावलेला तू

अप्रतिम दृश्य ते

खाली वाकून कृष्णास

मोठा बंधू म्हणून तू

नमस्कार केलास की

तुझा सखा म्हणून गळाभेट

दिलीस की तुझा ईश्वर तुझ्या

पुढ्यात उभा होता म्हणून 

तुझ्या आनंदाश्रू नी त्याला

अभिषेक केलास?

सावलीसारखा त्याच्या

बरोबर होतास

कृष्ण प्रत्येक क्षण तुला

सांगायचा असा तू

भक्तांचे प्रतिनिधीत्व करत

होतास. 

सगळ्या सामान्य भक्तांच्या 

मनात येणारा प्रश्न तू 

विचारलाच

ऐसी सुलभ भक्ती देवा

परी सारे का न करिती?

तुझ्यासारख्या योग्याला 

समजेल असेच भक्तवत्सल

उद्गारला

भाग्येवीण भक्ती न लाभे 

उद्धवा!


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


सुभद्रा

 यदुवंशाची तू कन्या

बलराम कृष्णासारख्या

पराक्रमी भावांची बहीण तू

तुझेही हरण झाले

कोणी केले तर

कृष्णाच्या आवडत्या पार्थाने

सव्यासाची अर्जुनाने.

रूपवती होतीस

साध्या भोळ्या

बलरामास फितवले

कपटी दुर्योधनाने.

तुझ्याशी विवाह करण्याचा 

घाट घातला 

सगळ्या विश्वाचा 

रक्षणकर्ता तुझा

भ्राता कृष्ण

तुझ्या पाठी होता

तुझ्या नकळत 

तुझे हरण करण्याचा

तुला पळवून नेण्याचा

आदेशच जणू अर्जुनास झाला

तुझे भाग्य तुझ्या समोर आले

धर्मयुद्धाची अजून एक 

ठिणगी पडली.

नियतीने जे ठरवले

तेच घडणार हेच सत्य

त्रिभुवनाचा पालनकर्ता 

तुझ्या पाठीशी होता 

तुझ्या कर्माचे फळ तुला

मिळालेच.


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे



गोपाल आणि कृष्ण

चल कान्हा घे मुरली

जाऊ गोधन घेऊनी

सवे सारे सवंगडी

यमुनेच्या तीरावरी


खांद्यावरी घे कांबळे

घेई हातात बासरी

उडवित धुळमाती

निघे मुरारीची स्वारी


आट्यापाट्या चेंडूदांडू

घेऊ डोहात डुबकी

न्यारी अंगतपंगत

थोडी माध्यान्ही डुलकी


मुरलीचे सुरावरी

सांज आली उतरून

गात नाचत गोकुळीं

येती सारे  परतून


गोपांसवे खेळामध्ये

ऐसा रमतसे हरी

खेळ सारेच विश्वाचे

खेळतसे गिरीधारी


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे





गांधारी

 तुझा हट्ट तू पूर्ण केलास

डोळ्यावर पट्टी बांधलीच

पती अंध आहे 

म्हणून मला पण हे सुंदर

जग पाहण्याचा

अधिकार नाही.

तू डोळ्यावर पट्टी 

बांधूनच 

कुरुवंशात प्रवेश केलास.


शंभर पुत्रांची माता

झाली त्यावेळी

किती मणाचे दगड

मनावर ठेवलेस

एकदाही असे वाटले

नाही पुत्रांचे मुख

पहावे 

किती मन मारले

का सवय झाली असेच

जगण्याची.


जेष्ठ पुत्राची अराजकता

डोळसपणे पाहणारी

सत्यप्रिय म्हणून

प्रसिद्ध असणारी तू

पुत्रास सावध करु

शकली नाहीस की

पुत्रप्रेमाने करू शकली

नाहीस.


धर्म आणि अधर्म यामध्ये

चाललेला रणसंग्राम 

तुला कळत होता

काय न्याय्य आणि अन्याय

तुझ्या लक्षात येत होत

कारण तुझा विवेक

तुझी सत्यप्रियता.


युद्धात सगळे पुत्र 

मारले गेले 

दुःखाने हतबल झालेली

तू तुझा विवेक हरवून

बसली आणि

वासुदेव कृष्णास यादवी

नष्ट होण्याचा शाप 

देती झालीस. का?


तू इतकी सामर्थ्यशाली

होतीस, तुला सगळं भविष्य

आधीच कळलं होतं, दिसत

होतं तरीही तू हे

पाऊल उचललस

तू निमित्त झाली 

हे तर विधिलिखित होत

तो सगळं ठरवूनच

आला होता न

स्वतःचं आणि 

सगळ्यांचच.


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


राधा

 

कान्हा कान्हा जपतांना

झाली राधा ग बावरी

अभिसारिका होऊनि

धावे  यमुनेच्यातीरी


रास खेळसी कान्हासवे

टिपरीवरी टिपरी पडे

मुग्ध झाली राधा वेडी

दिसे कान्हा चोहीकडे


राधेसाठी बासरीचे

सूर घुमे रानीवनी

पैंजणांच्या तालावर

रास खेळे राधाराणी


राधा राधा राधा राधा

झाली जीवनाची धारा

राधा एक तत्व असे

भारलेले चराचरा


भामा कृष्णा जांबुवती

सोळा सहस्त्र, रुक्मिणी

राधाकृष्ण राधेश्याम

सारे जपती जीवनी


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


रुक्मिणी

 किती मोठं धाडस

केलं तू 

प्रेमपत्र पाठविलेस

अन तेही जगन्नाथास

पराक्रमी विदर्भाची कन्या तू

राज्यात तुझ्या स्वयंवरासाठी

कडेकोट बंदोबस्त


साधी नजर उचलून

परपुरुषास पाहण्याची 

हिंमत नाही

तुझ्या भावांच्या

पित्याच्या राज्यात

अन तू निरोप पाठवतेस

स्वतःचे हरण करण्याबाबत

अर्थात

कृष्ण काही तुला 

परपुरुष नव्हता

तू मनोमन त्याला

वरलं होतंस

तुझ्या सादेला

प्रतिसाद मिळाला


तुझ्या कर्मबंधनाचे फळ

तुला मिळाले

तुझे संचित,प्रारब्ध

तुला साथ देत 

कृष्णसखा तुझे

क्रियामाण कर्म

म्हणून पुढे उभे होते

यापरिस सदभाग्य ते

कोणते ग!


रसिका राजीव हिंगे




रूप/लावण्य

 


रूपगर्विता

सखी साजणी

लावण्य तुझे

गे आरस्पानी


पारिजातक

अति कोमल

परी अससी

तू सुकोमल


ही रातराणी

गंधाळली ग

तू ही गंधित

यापरिस ग


नभीचा चंद्र

बघ लाजेल

रूप पाहून

तो हरखेल


तुझ्या रुपात

रत्नांच्या खाणी

लावण्यवती

लेक ही गुणी


रसिका राजीव हिंगे


अरुपा

 किती रूपे तुझी

तू एकच आहेस  परी

धारण केलेस अनेक रुपं

भक्तांसाठी

स्वतः अरुपा असूनही

राधेसह सगळेच तुझ्या

कृष्णरूपावर भाळतात

नामजप करतांना

कोदंडधारी असा तू दिसतो

पराक्रमाच्या गाथा सांगतांना

नयनी परशुराम सामावतो

बटुरुपातला वामन असो की

दत्तरुप अवधूत 

तुला आळवतांना कधी

श्रीपाद तर कधी 

प्रल्हादासाठी

स्तंभातुन कडाडत येणारे

नरसिंह रौद्ररूप

समुद्रमंथनातून निघालेले

विष कंठात धारण करणारा

नीलकंठ तर कधी

गुरुराज रामदत्तरूप

ही विविध रूप धारण

करणे म्हणजे तुझी

माया आहे परमेशा

रुपं ही प्रतिकात्मक 

आहेत 

भक्ती करायची 

नाम घ्यायचं तर 

कुणाचं

यासाठी केवळ भक्तांना

तारावया साठी तू निरकारा

आकारास येतो

निर्गुण रूप सगुणरूप

होतं आणि भक्त

तुझ्या नामात तुझ्या

रुपात तल्लीन

होतो

हेच खरं परमेशाचे

रूप समजून तो तुझ्या

चरणी लीन होतो

आणि मोक्ष मिळवतो

केवळ ह्या 

लावण्यमय रुपामुळे.

रसिका राजीव हिंगे


अरुपा

 तू एक परी रूपे अनेक

आकळेना तव सगुणरूप

भक्तांसाठी अरुपा तू रे

धारण करिसी विविध रूप


कधी ध्याती कृष्णसखा

तुज आळवाया परमेशा

कधी तारावया भक्ताना

दिससी नयना व्यंकटेशा


कधी दत्तरूप अवधुता

कलियुगी श्रीपादांचे रूप

स्तंभामधुनी कडाडले

तव नरसिंह रौद्ररूप 


रामनाम जपतांना रे

दिसे कोदंडधारी राम

तव पराक्रमाची गाथा

सामावे लोचनी परशुराम

रसिका राजीव हिंगे


यशोदा

 


असे सौभाग्य माझ्या भाळी

जन्मजन्मांतरीची पुण्याई

माझाच मला वाटे हेवा

भगवंताची झाले आई


कान्हा कान्हा म्हणता म्हणता

दिस तो माझा निघून जाई 

चांदण्यांचे घेत पांघरूण

रात्र येई गात अंगाई


तुझ्या बाळलीला पाहुनिया

हर्ष मनी मोहरून येई

तुझ्यामुळेच रे कान्हा मी

आनंद  क्षण वेचित जाई


तुज म्हणती वासुदेव जरी

देवकीचा आहेस तान्हा

परी ऐसे ही वदती जगी

सारे तुज यशोदेचा कान्हा


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे







देवकी

 


मातृत्व


कसे आहे हे

कर्मबंधन

तुला जन्माला घातले

पण पालन पोषण 

मात्र यशोदेने केले

कृष्णा खरेच कसले 

हे संचित माझे

तू जन्माला येणार म्हणून

मी किती आनंदली होती

मनात भीती होती तरी

विश्वास होता तुला हा

कंस मारू शकणार नाही

माझा विश्वास खरा ठरला

पण तूझ्या बाललीला 

मी पाहू शकले नाही

तुझे बालपण अनुभवू

शकले नाही 

तुझ्या बालपराक्रमाच्या

कथा ऐकत होते 

आणि मनोमन 

हरखत होते

यशोदेचा कधी हेवा

वाटला नाही पण 

मी मातृत्व उपभोगले

नाही याची खंत 

मात्र मला होती

कायमच


रसिका राजीव हिंगे



कुब्जा

 अरे ही कोण?

कुब्जा!

माझ्यावर नितांत

भक्ती असणारी

माझ्यात सामावलेली

पाठीत वाकलेली

कंस मामाला 

गंधलेपन करणारी

माझी प्रिय भक्त

मथुरेत माझ्या

दर्शनाची आस

लावून प्रतिक्षा

करणारी 

माझं दर्शन होताच

आनंदाने अष्टभाव

जागृत झाले तिचे

भारावल्यासारखी

माझ्याकडे साश्रु 

नयनांनी पहात बसली

तिच्या पाठीवर हात

फिरवताच ती 

सरळ ताठ उभी राहून

मला न्याहळतांना

किती आनंद झाला तिला

जन्माचे सार्थक 

झाल्यासारखे वाटले.


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे

कुंती

 


नित्य तुजला स्मरण्यासाठी

दुःख दे तू मजला केशवा

विसर न पडावा तुझा कधी

ऐसे साधन दे रे  माधवा


सुखात असे सारे जीवनी

ध्याती न तुजसी कान्हा कुणी

दुःखात असता न कळे काही

सारेच धावती तुझ्या चरणी


ऐसे वदली कुंती मुरारीस

होऊ दे कृपा सकलांवरी

तुझ्या नामातच जगावे

ऐसेच मजला दान करी


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे






द्रौपदी

 कृष्ण कृष्ण धावा करीता

कृष्णसखा आला  धावत

वसने पुरवी पांचालीस

चिंधीचे  ऋण ते राखत


सूक्ष्म कर्मबंधनाचे त्या

फळ दिधलेस द्रौपदीला

सत्कर्माच्या मार्गावरी

सांभाळतसे भक्ताला


स्मरण करताच येईन

मीच आहे कणाकणात

ग्वाही देई अस्तित्वाची

सदभक्ताला क्षणाक्षणात


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे








निळा कृष्ण

 निळ्या आभाळी

निळा चांदवा

झुळूक निळी

निळा गारवा


सागर निळा

निळसर लाटा

निल डोंगरी

निळ्याच वाटा


निळेच झाले

चराचर सारे

कृष्णरूप भासे

सृष्टीचे बावरे


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे

Saturday, 10 October 2020

चित्रकाव्य





धरा झेपावते जणू गगनी

क्षितिजी अंबर ये उतरुनी


घे भरारी निळ्या आभाळी

व्यक्तिमत्वास ग ये झळाळी


तू विश्वाची माय निर्माती

गगन ठेंगणे तुज पुढती


उत्तुंगतेला घाल गवसणी

दशदिशा ही येती उजळुनी


निळे डोंगर अन निळ्या वाटा

हिरवाइच्या दाटल्या लाटा


या वाटेवरुनी चालतांना

घे मोकळा श्वास बहरतांना


रसिका राजीव हिंगे