गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन
अल्लड नवयौवना धुंद गंधाळल्या क्षणांना सोबत घेऊन तिच्या प्रियाच्या कानी अलगद गुज सांगण्यासाठी निघाली. मंद गार वाऱ्यामुळे तिचे कुंतल ही तिच्या गर्भ रेशमी गालांशी लगट करताहेत. काय बरे सांगायचे आहे तिला!
तुझी नि माझी उत्कट प्रीत आता मिलनाकडे वाटचाल करते आहे. ऐक ना सखया, सारे चराचर दरवळले आहे आपल्या प्रीतीच्या सुगंधाने.
होय! गंधित च आहे आपले नाते. अगदी पुराण काळापासून चालत आलेला वारसा आहे हा. प्रेम ही एक तरल भावना. प्रत्यक्ष परमात्मा सुद्धा या भावनेत अडकला म्हणण्यापेक्षा त्यानेच तर ही प्रीत, प्रेम या भावना निर्माण केल्या नाही का?
कृष्णसखा आणि राधा यांची अशीच मंत्रमुग्ध करणारी प्रीत, जिथे वासनेला थारा नाही तशीच आपली पण प्रीत आहे ही.
प्रीत असावी नजरेची भाषा बोलणारी, स्पर्शातून जन्मजन्मांतरीचे नाते घट्ट करणारी,या हृदयी चे भाव त्या हृदयी सहज समजणारी, मनातल्या भावनांचा अनाहत नाद ऐकणारी. विश्वासाच्या पायावर प्रीतीचा राजमहाल तोलून धरणारी.
तुला सांगते प्रेम करणे म्हणजे काही गुन्हा नाही रे. प्रेम आंधळं असलं तरी ते डोळसपणे करावे, केवळ आकर्षण म्हणजे प्रेम नाही. प्रेम सौंदर्यावर करावं असे जरी असले तरी बाह्य सौंदर्य च नव्हे, प्रेम अंतर्गत सौंदर्यावर करावे, गुण दोषांवर करावे,स्वभावावर करावे.
प्रेम अगदी अंतरंगातून करावे, एकदा स्वीकार केला की त्याच्या गुण दोषांसह स्वीकारावे.
हेच असेच विचार मनात घेऊन ही अभिसारीका निघाली आहे सजणा ला भेटायला. सुगंधाने भारलेल्या पुष्पांचा सांगावा द्यायला.
सख्या ऐक ही गंधित पुष्पे काय बरे सांगतायत! तिच्या तरल प्रीतीची कहाणी..... आणि तिच्या प्रेमाचे ऋणाईत व्हायला....
प्रेमा काय देऊ तुला
भाग्य दिले तू मला
रसिका राजीव हिंगे