Friday, 29 March 2024

जीवन आनंद

 


जीवन आनंद


पाठशिवणीचा खेळ..


     मानवी जीवनाला कायमच आनंदी जगण्याची ओढ आहे. आयुष्यात कधीच दुःख फिरकू नये असे वाटत असतं. पण दुःखातच आनंद भरला आहे. दुःखामुळे मनाचा निचरा होतो आणि मन शुद्ध होते. शुद्ध मनातच आनंद सामावला आहे. आनंद हा क्षणभंगुर असला तरी सगळं विश्व या आनंदा भोवती फिरत आहे. वास्तविक पाहता आनंद कशात आहे हे कळतच नाही की वळत नाही.  उगाचच माणूस त्याचा शोध घेत असतो. पण तुझं आहे तुजपाशी परी तु जागा चुकलासी असे होतं. आपल्या जवळच आनंद आहे, फक्त तो आपण कसा स्वीकारतो यावर त्याची परिभाषा करता येईल कदाचित. ज्याला जसे अनुभव येतील तसा तो आनंद अनुभवेल.

     पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणारे वारकरी निर्भेळ आनंद अनुभवत असतात. भजन कीर्तन गात हे वारकरी बेभान होऊन नाचत त्यांच्या आराध्याच्या दर्शनासाठी जात असतात. तिथे मी तू पण नसल्यामुळे ही त्यांना आनंद गवसत असेल.

     सूर्य उगवला की सगळ्यांनाच सारखा प्रकाश देतो. आवडता, नावडता असा भेद त्याच्याजवळ नाही. तो आनंदरूप आहे म्हणून सगळ्यांना त्याच्या येण्याची ओढ आहे. पहाटेचे निसर्गरम्य रूप पाहून प्रत्येकालाच सुखाची, आनंदाची अनुभूती येते. इतकंच काय सूर्य मावळताना सुद्धा आकाशात जी रंगांची उधळण होते ती सुद्धा आनंददायी आहे, सुखकारक आहे.

     समाधान असेल तर मन प्रसन्न होते आणि प्रसन्नता म्हणजेच आनंद. समाधान आणि आनंद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. उगाच दुःखाचे प्रदर्शन करून मनाची प्रसन्नता घालवण्यात काय अर्थ आहे. सगळेच मनाचे खेळ नाही का हे? आनंदी राहिल्याने बरेच आजार आपोआप कमी होतील.

        निसर्गाची भव्यता, दिव्यता पाहिली की मन प्रसन्न होते. निसर्गाचे सतत सृजन चालू असते. प्रत्येक ऋतू आनंदाचे आंदण घेऊन येतो. हाच आनंद आहे जो निसर्गाप्रमाणे आपल्याला ही उपभोगता येतो. कारण निसर्ग आपल्या मनाचा आरसा आहे. निसर्गाचे प्रतिबिंब माझ्यात पडलेले आहे. 

     जीवनात सुख दुःखाचा पाठशिवणीचा खेळ चालूच असतो. कुणाच्या म्हणण्याने मला फरक पडता कामा नये. इतरांच्या बोलण्याचा आणि प्रतिक्रियांचा विचार करत बसलो तर आपल्या आयुष्यातील आनंद हरवून जाईल. नको त्या विचारांच्या गर्तेत आपण आपला आनंद हरवत जातो. नकारात्मक विचारांमुळे दुःखाचे अनुसंधान सतत राहते अन् आनंद पडद्या आड जातो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, महत् भाग्याने हा नरदेह लाभला आहे याचाच अर्थ असा की तू तुझा शोध घे. तुझ्याच अंतरात आनंद लपलेला आहे. तू सत् चित आनंदरूप आहेस. हाच आनंद शाश्वत आहे. कधीही न संपणारा. परमात्मा आनंदरूप आहे म्हणजे आपण सगळे आनंदरूप असायला हवे. कारण प्रत्यक्ष भगवंतानेच गीतेत सांगितले आहे ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः भगवंतांचे अंश असलेले आपण सगळेच आनंदरूप आहे हे सूर्य प्रकाशाइतके सत्य आहे. प्रपंचातील सुख दुःखाच्या पल्याड गेल्याशिवाय तो आनंद अनुभवता येत नाही हेही सत्य आहे. प्रत्येक जण हा आनंद मिळवू शकणार नाही तरी त्या वाटेवर तर नक्कीच चालू शकेल. सकारात्मक विचार करत शाश्वत आनंदाच्या वाटेवर चालता चालता आनंद पेरला तर "याची देही याची डोळा पाहू मुक्तीचा सोहळा" हे अशक्य नाही. ही साधना प्रत्येक जण त्यांच्या प्रारब्धानुसार करत असतोच. तुकाराम महाराजांना संसारातील अडचणी कमी नव्हत्या, पण तरीही ते ब्रह्मानंदी लीन होते. प्रपंचातील अडचणी त्यांचा आनंद हिरावू शकल्या नाहीत. त्यांच्या आनंदाच्या डोही आनंद तरंगच होते. सकारात्मक विचार म्हणजेच आनंद. असूया, द्वेष,मत्सर यांची कीड न लागू देता तसेच नात्यांमधील गोडवा कायम ठेवत तुझं माझं करण्यात वेळ न घालवता या आनंदाच्या क्षणांना उपभोगून घ्यावे.  परमात्म्याच्या अनुसंधानात राहिले तर आनंद सोहळा म्हणजेच जीवन याचा प्रत्यय येईल अन् सहजच कळेल....

    आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे.


रसिका राजीव हिंगे 

8600047066

सुस, पुणे

rasikahinge@gmail.com 


rasraj#आनंद#जीवन#आनंदी आनंद गडे#