"आजी, गोष्ट सांग न! आज कोणती सांगशील ग?" आजीचे नातवंडं तिच्या भोवती फिरत फिरत गोष्ट सांगण्यासाठी तगादा लावत होते.
"आधी सगळे बसा इथे, मी आज सांगणार आहे ससुल गड्याची गोष्ट. ससुल म्हणजे ससा."
सगळे आजीच्या चेहऱ्याकडे लक्ष देऊन ऐकू लागले ससुल गड्याची गोष्ट. "मी तर ससुल गडी,वाघोबाचे कान च तोडी" आजी अगदी तालासुरात गावून गोष्ट सांगत होती आणि सगळे आजीची गोष्ट ऐकत होते.
हेच संस्कार. साध्या सोप्या भाषेत गोष्टीरूपाने केलेले.कधी रामायण तर कधी महाभारत तर कधी ऐतिहासिक. या श्रवणातून पेरले जाते श्रवण भक्तीचे बीज. सगळ्यात महत्वाचे म्हणजे श्रवण करण्याची, लक्षपूर्वक ऐकण्याची सवय होत जाते. अक्षर ओळख नसली तरी शब्द कळत जातात. हावभाव, शब्द उच्चारण्याची लकब,पद्धत यामुळे त्या शब्दांचा अर्थ कळत जातो.
पूर्वीच्या काळी कुठे ग्रंथ संपदा होती. श्रवणाद्वारेच ज्ञान संपादन करत असत. ज्ञान देणारे कोण तर आपल्याच अनुभवाच्या कसोटीवर घासून ज्ञान मिळविलेले असे ऋषीमुनी, संत महात्मे, योगी आणि घरातील अनुभवसिद्ध आधारवड.
उपनयन संस्कारानंतर गुरुगृही शिक्षण घ्यावे लागत असे. तिथेही गुरुमुखातून निघालेले श्रवण करून कंठस्थ केल्या जायचे. प्रत्येक विद्यार्थ्यांची ज्ञानाची कसोटी लागत असे. अध्यापन,अध्ययन हे ज्ञाननिर्मिती च्या उद्देशाने केले जायचे. रट्टा मार प्रकार नव्हता. आज शिक्षण क्षेत्रातील ज्ञानरचनावाद ही नवसंकल्पना फार पूर्वी गुरुकुलात राबवली जायची त्यामुळे श्रवण, मनन, चिंतनाच्या आधारे विद्यार्थी बहुश्रुत होत असे.
श्रवण हे ज्ञान मिळविण्याचे उत्तम साधन आहे. श्रवणा द्वारे आध्यत्मिक, वैज्ञानिक ज्ञानप्राप्ती तर होतेच होते, आत्मज्ञान मिळविणेही शक्य होतं जातं.
दासबोधामध्ये रामदास स्वामींनी श्रवण काय करायचे तर पिंडी ते ब्रहमांडी जे जे आहे ते सगळे श्रवण करावे. जे चांगले आहे तेच फक्त नीरक्षीर बुद्धीने वेचावे, ग्रहण करावे, आत्मसात करावे. मनन चिंतन करत परमात्म्याशी संधान साधावे. तंत्रज्ञानाने केलेली प्रगती पाहता, तसेच छपाई ची कला विकसित झाल्यावर ही श्रवण करण्याची सवय कमी झाली नाही. संत, ज्ञानसंपन्न बहुश्रुत व्यक्तींचे शब्द ऐकायला आजही आनंदाने उत्सुक असतात.
सौंदर्याकडे आकर्षित होणारी मानवाची प्रवृत्ती. ही प्रवृत्ती लक्षात घेऊनच भगवंताचे सगुण साकार रूप म्हणजे श्रीकृष्ण आणि राम. ही दोन्ही रूपं मनमोहक आहेत. गोपी,राधा याना आधी कृष्णाचे रूप भावले, कुंती, द्रौपदी, कुब्जा, उद्धव यांनी कृष्णाच्या बाललीलांचे, पराक्रमाचे वर्णन श्रवण करीत करीत च त्याच्याकडे आकर्षित झाले आणि हळूहळू त्याच्यात प्रेम म्हणजेच भक्तीचे बीजांकुरण झाले.
ऐन युद्धच्या वेळी समरभूमीवर शस्त्र खाली ठेवणारा अर्जुन भगवंताने सांगितलेले ऐकले,श्रवण केले आणि त्याचा अज्ञानाचा पडदा सारला गेला. अर्जुन युद्ध करायला तयार झाला. ,हीच भगवद्गीता ऐकली आणि सत्यावर विजय मिळविणे शक्य झाले.भगवंतांच्या चरित्राचे, पराक्रमाचे वारंवार श्रवण करावे म्हणजे प्रेम उत्पन्न होत जातं आणि भक्तीरुप घेतं.
यज्ञ याग करतांना राक्षस,आसुरी शक्तींचा त्रास होतो म्हणून राम आणि लक्ष्मणास आपल्या सोबत घेऊन जातात विश्वामित्र ऋषी या शक्तींचा नाश करण्यासाठी. जाता येता किती ज्ञान दिलं विश्वामित्रांनी, किती शस्त्र,अस्त्र याचे प्रदान केले,ते कसे केव्हा उपयोगात आणायचे यासंबंधीचे सगळे बारकावे सांगितले, विश्वामित्र म्हणजे तर चालते फिरते विद्यापीठच नाही का? विश्वामित्र सांगत होते आणि हे दोघे ऐकत होते. श्रवणेंद्रिया द्वारे मिळालेले ज्ञान सर्वश्रेष्ठच. किती श्रवण केलं असेल राम लक्ष्मणांनी! त्याचे सतत चिंतन, मनन केले म्हणून तर असुरीशक्ती वर विजय मिळविता आला.
त्यांच्या या गुणांचे, पराक्रमाचे,चरित्राचे सतत श्रवण करत जावे. वारंवार एखादी गोष्ट होत गेली की त्यातील अर्थ,सौंदर्य हळूहळू कळायला लागतं. म्हणूनच भगवंतांचे, संतांचे चरित्र पारायण करण्याची पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. पारायण करणे म्हणजे वारंवार एकाच गोष्टीचे पठण,वाचन,श्रवण करणे. पठण,वाचन एकप्रकारे श्रवणच होय. पारायणे केली की भगवंता बद्दल प्रेम वाढू लागतं, यातूनच भक्तीची वाट चालणे सोयीचे होते. भक्ती आणि प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
ऐसे हे अवघे ऐकावे ।
परंतु सार शोधुनि घ्यावे ।
असार ते जाणोनि त्यागावें ।
या नाव श्रवणभक्ती । (दा. ४.१.२९)
जे जे चांगले आहे ग्रहण करावे, निरुपयोगी समजून सोडून द्यावे. यालाच समर्थांनी श्रवण भक्ती म्हंटले आहे.
सतत चांगले विचार पठण,श्रवण केले की त्याच्या आयुष्यात फायदा होतो. धुंधुकारीने जेव्हा भागवत कथा श्रवण केली त्यावेळी त्याची प्रेत योनीतुन सुटका झाली.
भवसागर पार करतांना श्रवणभक्तीचा सोपान चढणे कठीण असले तरी अशक्य ही नाही. स्थिर,शांत वृत्तीने चालत गेल्यास भगवंताशी एकरूप होणे सहज शक्य होईल ....
©️रसिका राजीव हिंगे