Friday, 8 April 2022

चित्रकाव्य

 



सांज उतरली निळ्या सागरी

केशर ल्याली सृष्टी सारी

रविराजासी निरोप द्याया

अधीर झाली निशा बावरी


कोण कोठला योगी भासे

संन्यस्त दिसे अवघा सागर 

विरही मनास कसे आवरू

भरेल का ही प्रीती घागर


सांजवलेल्या कातरवेळी

क्षितिजापल्याड धावते नजर

किनाऱ्यावरी सखीसाजणी

भेटेल कशी नजरेस नजर


चंद्र प्रकाशा लेउन येई

पुनवेची ती रात चांदणी

अता नाविका वल्हव भरभर

उभी किनारी प्रीतसाजणी


रसिका राजीव हिंगे








Thursday, 7 April 2022

गीत वसंताचे गावे

 



ऋतुराज ये अंगणी

मोहरली सारी सृष्टी

निळी झुळूक मंदसी

आनंदाची करी वृष्टी


गंधभारे चराचर

दरवळ नटलासे

लाल गुलमोहरही

ठायी ठायी सजलासे


पळसाची पाने तीन

देई फुलास आधार

लालेलाल केशरिया

रंगलेला पुष्पहार


शीळ वाऱ्याची घुमते

सप्तस्वर आळवीत

गीत वसंताचे गावे

गंधाळल्या मैफिलीत


रसिका राजीव हिंगे


Wednesday, 6 April 2022

बकुळ




मंद गारवा गंध मारवा

दहा दिशाही धुंद जाहल्या

मनमनातील प्रीत फुलांनी

बकुळ फुलांचा सुगंध ल्याला


रूप मनोहर कोमल काया

गंध बावरा प्रीत लाजरा

चंद्रोत्सव या सावळ भू चा

संवत्सर भर होइ साजरा


स्पर्श बोलका भाव जाणतो

मौन जाहले शब्द अंतरी

गवाक्षातील निळी झुळूक 

क्षणी थबकली गंध लाजरी


पहुडलेल्या सर्द दुपारी

बकुळ फुलांचा गंधित उत्सव

चांदण राती घालुनी मांडव

रातराणीचा सजे महोत्सव


रसिका राजीव हिंगे



बकुळ#रसराज#गंध#सुगंध#





तळ्याकाठी



     
     "अरे, अभिराम काय करतो आहेस इथे तळ्याकाठी?  आई शोधतेय न तुला!" राधा त्याला शोधत आली तळ्याकाठी.  तिला माहीत होते अभिराम कुठे असेल.
 " काही नाही ग ताई, सहज आलो इकडे."
 "सहज?"
 " काय झालंय अभि? तू खूप अस्वस्थ दिसतोय.
 " चल, आई शोधत बसेल. ती सारखी माझी काळजी करत असते."
  राधा त्याच्याबरोबर निघाली खरी. पण तिलाही सारखं जाणवत होतं. अभिच्या मनात काय चाललंय ते कळायलाच हवे पण कसे हा यक्षप्रश्न होता तिच्यासमोर.
  लहानपणापासूनच अभिराम शांत स्वभावाचा. एकवेळ समुद्राचा सुद्धा तळ दिसेल पण त्याच्या मनाचा थांग लागणार नाही.काय चाललं असतं नेहमी याच्या मनात काही कळेना.
     दिसायला सावळा असला तरी रुबाबदार. पुरुषी सौंदर्य आणि कमावलेला पुरुषी आवाज. पाहताच क्षणी कोणीही याच्या प्रेमात पडावं असा. चुंबकीय व्यक्तीमत्व लाभलेला. त्याचे नाव ही त्याला साजेसे अभिराम म्हणजे सुंदर,मोहक.
     अभिचे बाबा रघुनाथराव देशपांडे हे त्यांची पिढीजात शेती सांभाळत होते. नंदीग्रामचे देशपांडे म्हणजे  पिढ्यानपिढ्या शेती करत आलेले कुटुंब. गावात रहात असले तरी प्रत्येक पिढीत त्या त्या काळानुसार उच्च शिक्षणाची परंपरा कायम होती.  सुमित्रा सारखी सोज्वळ, सालस सहचारिणी आणि राधा अभिराम सारखी दोन गोंडस मुलं असा चौकोनी संसार. लक्ष्मीचा वरदहस्त होता, मेहनतीला कधी आराम  माहित नव्हता.
     शिक्षणासाठी शहरात होस्टेलवर मुलं राहत होती.  राधा आईसारखीच. सौंदर्याची परिमाण असलेली. मधूनच ती रघुनाथरावांना अभिराम बद्दल विचारायची.
     "अभिरामाचे काय ठरविले आहे? तो फार मनस्वी मुलगा आहे, एखाद्या ज्योतिषाला त्याची पत्रिका दाखवावी असे वाटते मला. कुठल्यातरी  गहन विचारात असतो कायम."
    " सुमित्रा, आज बोललीस हे शेवटचं. माझा पत्रिका, ज्योतिष यावर विश्वास नाही. स्वकर्तृत्वावर विश्वास आहे माझा. आपला अभि बारावी झाला की त्याला बाहेर पाठवू शिकायला, चार मित्रांसोबत राहिला तर होईल तो ठीक."
    पण आईचं मन  काही केल्या स्थिर होईना. कशाचा विचार करतो सारखा मनात? कितीतरी वेळा अभिला बोलतं करण्याचा प्रयत्न केला पण सांगत नाही. तसा सगळी कडे असतो. खेळणे वाचन आवडतं. तासनतास तळ्याकाठी बसायला, तळ्यात पोहायला केव्हाही तयारच.  मधूनच एकदम का अस्वस्थ होत असेल?  विचार करकरून सुमित्रा थकून जायची पण उत्तर सापडत नव्हते. 
    अभिरामने बारावीची परीक्षा दिल्यानंतर  Indian Institute of Technology (IIT) ची प्रवेश परीक्षा  दिली. Agriculture इंजिनीयर व्हायचे होते. निकाल यायचा होता म्हणून अभि घरीच होता.  पुन्हा तोच उद्योग तळ्याकाठी जाऊन बसणे.  गूढ गहन विचारात काहीतरी शोधत असायची त्याची नजर. त्यालाच कळेना का असे होते आहे. का सारखे यावेसे वाटते तळ्याकाठी?
    अभिरामच्या आय आय टी च्या प्रवेश परीक्षेचा निकाल आला. 
   " बाबा, खूप छान मार्क्स मिळालेत मला. चांगलं कॉलेज मिळण्याची शक्यता आहे. मला कुठेही प्रवेश घेण्यास संमती आहे न तुमची?" 
   "Yes my boy, जगाच्या पाठीवर कुठेही तुला जिथे मिळेल तिथे प्रवेश घे. फक्त पुन्हा इथेच भारतात यायचं."
   "बाबा, तुम्ही भारतात म्हणता आहात, मला तर आपल्याच गावात यायचे आहे. तसंही मी दुसरीकडे कसा राहू शकेल?"
   शेवटचे शब्द अभि मनाशीच बोलल्यासारखा बोलला. पण त्याच्या आईच्या नजरेतून ते सुटले नाही. तिला पुन्हा काळजी वाटू लागली. काय आहे असं या गावात  हे गाव सोडायचे नाही म्हणतो. 
    त्याची आय आय टी खरगपूर येथे निवड झाली होती. आपल्या घराण्याची उच्च शिक्षणाची परंपरा पुन्हा पुढे अशीच चालत राहील याचा रघुनाथरावांना सार्थ अभिमान होता. अभिरामने  कृषी तंत्रज्ञान हा विषय घेऊन बी. टेक. ला प्रवेश घेतला. सुरवातीपासूनच मेहनत करण्याची सवय अंगवळणी पडली होती त्यामुळे त्याला खरगपूरला राहणे आणि अभ्यास करणे कठीण जात नव्हते.  बी. टेक. करतानाच त्याने GRE ची परीक्षा क्रॅक केली. त्यामुळे त्याला भारताबाहेर MS करणे सोयीचे झाले. ETH Zurich स्वीझरलँड इथे त्याने त्याच्या आतापर्यंतच्या प्रगतीच्या बळावर वनस्पतीशास्त्र या विषयात मास्टर डिग्री मिळवली. 
    शिक्षण संपवून अभि घरी आला आणि बाबांसोबत आपल्या शेतीच्या कामात स्वतःला झोकून दिले. कधी कार्यशाळा तर कधी कृषी प्रदर्शन, कुठे सेमिनार तर कधी व्याख्यान देत शेतीविषयक माहितीचे अभिने भांडार खुले केले. 
    मात्र तळ्याकाठी जाण्याची ओढ कमी होत नव्हती. काहीतरी जाणवतं होतं, जीवाची तगमग वाढत होती.  कुठली शक्ती आहे  जी मला सारखी तळ्याकाठी यायला प्रवृत्त करते आहे. असे असले तरी भीती वाटत नव्हती अभिला. दैवी शक्ती असेल का?  
    आई सारखी  त्याच्यावर लक्ष ठेऊन होती. त्याच्या प्रत्येक हालचाली टिपत होती.   संध्याकाळी घरी आल्यावर सगळं सोडून धावत तळ्याकाठी गेला. सुमित्राला काही सुचेना काय झालं अचानक. ती त्याच्या पाठी लगेच तळ्याजवळ गेली. पण अभि नुसताच भिरभिर फिरत होता, कोणीच नव्हते तिथे. 
    "अभिराम!"
    "आई! तू केव्हा आलीस इथे?" 
    "केव्हा म्हणजे, कोणी होतं का तुझ्याबरोबर?"
    "नाही ग, मी एकटाच तर आहे इथे."
    "तू अचानक कसा आला इकडे? 
    "यासाठी आलीस होय इथे? मला वाटलं की..."
    अभिचे बोलणे मध्येच तोडत सुमित्रा म्हणाली,
    "काय वाटलं तुला? अभि सांग बाळा, काय झालंय नक्की? का असा इकडे येतो सारखा?"  सुमित्राचे बोलता बोलता पापणकाठ ओलावले अन गहिवर दाटून आला. आईकडे पाहून अभिला पण भरून आले. पण काय सांगू हिला, जे मला जाणवतं ते सांगू? 
    "बघ पुन्हा तू हरवलास विचारात. सांगून मोकळा हो तुलाही शांत वाटेल अभि."
    "आई, ऐक. अशी कोणतीतरी शक्ती आहे मला इथे यायला भाग पाडते आहे. मला अस्तित्व जाणवतं पण दिसत नाही. मी सारखा शोधण्याचा प्रयत्न करतो पण अजूनही यश आलेले नाही. पण एक मात्र खरे की वाईट शक्ती नक्कीच नाही. ज्यावेळी इथे येतो न त्यावेळी मी आतून मोहरून येतो. काय असेल काही कळत नाही."
    अभिचे बोलणे ऐकल्यावर सुमित्राला ही कळेना काय बोलतो आहे . तिच्या विचारांची मती खुंटल्या सारखी झाली.  यंत्रवत ती अभिबरोबर घरी आली. रघुनाथरावांना  सगळा प्रकार सांगितला.
   " काही नाही, असं काही नसतं, पोरीच्या प्रेमात वगैरे पडला असेल म्हणून असे भास होत असतील त्याला. पण सुमित्राला काहीच सुचत नव्हते. 
      संध्याकाळी अभि तळ्याकाठी मंदिराच्या पायरीवर बसून होता. मनोमन मंदिरातल्या मूर्तीशी संवाद सुरू होता. आर्त भाव मनात दाटून आले होते.
   " श्रीरंगा, काय आहे हे सगळे, मला का कळत नाही? तूच मार्ग दाखव मला यातून. कसली ओढ आहे ही, कोणती शक्ती आहे जी मला अशी भावविभोर करते आहे? असं वाटतंय कोणीतरी माझ्या अवतीभोवती आहे, मला सारखे आर्जव करते आहे, विचार करता करता अभिचे भान हरपले. तो स्वतःच्याच तंद्रीत मग्न होता.
   मंदिरातील घंटेचा नाद झाला. तसा अभि ताडकन उठून आत गेला. इतक्या वेळा इथे आलो तरी मी का कधीच मंदिरात गेलो नाही याचे त्याला आश्चर्य वाटले. 
   ती मंदिराच्या बाहेर आली. पायऱ्या उतरून वळणार तोच  तिला अभि दिसला.
   "अरे आज अजून इथेच आहेस तू? घरी जायचे नाही का?" तिने हसून अभिला विचारले. त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. 
   "म्हणजे तू ओळ्खतेस मला? कोण आहेस तू ? आजपर्यंत मला कधी इथे दिसली नाहीस!"
   "तू पहिलंच कुठे? नुसता भिरभिर फिरत असतोस काठावर."तिचा आवाज म्हणजे  पैंजणांचा मंजुळ नाद जणू. 
   "तू पाहिलंस मला?, मग का आधी बोलली नाहीस माझ्याशी? आज अशी समोर आलीस तर मग याआधी....
   "अरे किती प्रश्न विचारशील? माझा नियम आहे रोज मंदिरात यायचा. माझ्या आजोबांनी सांगितले मला रोज या मंदिरात यायला. कुणाशी तिकडे बोलायचे नाही असेही सांगितले होते त्यांनी."
   " मग आज का बोललीस?"
   "तेच म्हणाले, रघुनाथराव देशपांडे यांच्या मुलाशी तुझे लग्न ठरले आहे, फक्त रघुनाथाने आता ऐकायला हवे."
   "म्हणजे?"
   "म्हणजे तुझ्या आजोबांनी आणि माझ्या आजोबांनी आपलं लग्न मी जन्माला आले तेव्हाच ठरविले होत."
   "नाव तर सांग तुझं."
   " यावर ठरवणार आहेस, माझ्याशी लग्न करायचे की नाही ते?"
   "तसे नव्हे ग. पण...."
   "म्हणजे तू करणार आहेस माझ्याशी लग्न! करेक्ट.
   "............"
       हे जन्मजन्मांतरीचे धागे होते जे विधात्याने अशा प्रकारे जुळवून आणले. तिचे भावविभोर अस्तित्व होते इथे, सहधर्मचारिणी प्राजक्ता.
       आयुष्याच्या सुंदरशा वळणावर साथ द्यायला उत्सुक असलेल्या प्राजक्ताकडे अभि फक्त पहात होता. काय बोलावे कळेना. मंत्रमुग्ध झाला होता अभि. 
    " असा का पाहतोस?" अन दुसऱ्याच क्षणी प्राजक्ता अभिच्या बाहुपाशात विसावली. 
       आभाळात शुक्राची चांदणी तेजाने चमकत होती. तिचे तेज अधिक का आपल्या बाहूपाशातील चांदणीचे अधिक त्याला ठरवता येईना. आपल्याच भाग्याचा हेवा त्याला वाटायला लागला. तेवढ्यात... काळ्या मेघांनी चांदण्यांना झाकून टाकले. आणि बघतो तर काय त्याच्या मिठीतही कोणीच नव्हते. 
तो भानावर आला. सत्य आणि आभास ह्यातली रेषा पुसट झाली होती. त्याचे पुन्हा भान हरपले....
     प्राजक्ताला जाऊन किती वर्षे झाली तरीही रोज आठवणींच्या आवर्तनात प्राजक्ताशी एकरूप होत होता अभिराम. जन्मभर साथ देण्याचा निश्चय केलेली प्राजक्ता अशी अभिला साथ देत होती, गेल्यावरही.


रसिका राजीव हिंगे



#तळ्याकाठी#रसराज#गूढ#मंदिर#

   
   
   
   

Sunday, 3 April 2022




भास की आभास

की वास्तव.

कळेना काही.

स्वप्नवत वाटावं असं

घडलंय सगळं.

तुझ्या आठवांच्या 

कॅनव्हास वर 

माझ्या भावनांचे

रंग आले उतरून.

मनासारखे

तुझ्या नि माझ्याही?

पण 

घाई झाली

तुला सामावण्याची,

अन मला पुन्हा

समर्पणाची...


©रसिका राजीव हिंगे

गर्दी

    हिंदू नववर्षाच्या वासंतिक शुभेच्छा

   


      काय झालंय? असं का वाटतंय सारखं आजूबाजूला खूप गर्दी आहे! कशाची गर्दी वाढली इतकी? असा प्रश्न मनात येतो न येतो तोच पहाट वारा कानात शीळ घालायला लागला.  "अगं तुला माहीतच नाही का, कळलं कसं नाही तुला? ही गर्दी आहे सुगंधाची. बघ न!  शिशिराचे पैंजण नादवत हा वसंत आला अन सगळीकडे बघ ह्या गंधाने इतकी गर्दी केलीय.

      रात्रभर जागून ह्या चांदण्या  सगळ्या चराचरात गंध भरत फिरतात आणि अगं हा पूर्वेचा केशरिया उधळत आलेला रविराज, त्याच्या सोनसळी किरणात न्हात असलेल्या सृष्टीवर हळुवार चांदण्यांनी भरलेल्या अत्तराची कुपी लवंडून देतो, म्हणून इतकी गर्दी वाढलीय.

     पाहिलंस का कोवळ्या कोवळ्या झाडांच्या पालवीचा ओलसर गंध, मध्येच कडुलिंबाचा कडूसर पण आरोग्यदायी वास, आंब्याच्या मोहराचा गोडसर सुगंध, तुला आलाय का गंध दाट हिरव्या पानांच्या मागे लपलेल्या कैरीचा!  

      शुभ्र धवल मोगरा तर नुसता दरवळतो आहे. याच्यामुळेच जास्त गर्दी झाली बरं. अन त्याच्यासोबत तो निशिगंध, पांढरा चाफा यांचा परिमल पण गर्दी करतोच आहे. यांच्यातून वाट काढीत तो उभा असतोच न हळदुल्या बहावा, लाल भडक गुलमोहर आणि पळस. या सगळ्या सुगंधाच्या गर्दीतही हे स्वतःच्या रंगाची गर्दी करीत उभे आहेतच.

     अरे पहाटेस तूच  पसरवतो सगळीकडे हा गंध अन सारखा मला सांगतो आहेस ही गर्दी सगळी सुगंधाने दरवळली आहे, या गर्दीला तूच जास्त कारणीभूत आहेस.,  कळलं!  तू उंडारला नाही म्हणजे ही गंधित गर्दी होणार नाही असे नाही, पण तू असा सैरावैरा  धावत असतो या गर्दीत त्यामुळे अजूनच वाढते ही गर्दी.

     पण असू दे ही गर्दी आवडते सगळ्याना. यामुळे प्रसन्न सकाळ होते, नवी उभारी देणारी आहे ही गर्दी, हवीहवीशी आहे. सगळी सृष्टी आनंदात बहरत असते या सुगंधाच्या गर्दीमुळे. ही गंधित गर्दी म्हणजे परमात्म्याने सृष्टीला दिलेले आंदण आहे, खरे आहे न!  मग होऊ दे गर्दी अन दरवळू दे सारी सृष्टी.....

     अन अशीच गंधाळलेली गर्दी असलेला वसंत प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ दे अन नात्यांच्या सुगंधाची गर्दी जीवनभर दरवळू दे, सद्गुरुंच्या कृपाछायेचा परिमळू तर दरवळतो आहेच.......


रसिका राजीव हिंगे