Tuesday, 19 November 2019

संवाद

शोध घेत चहूकडे
मन ऐसे भिरभिरे
गर्दी किती सभोवती
संवाद ना कोणी करे

सुख क्षण आनंदाचे
कसे कोणास सांगावे
कधी दुःखाचे उमाळे
एकटेच का सोसावे

बहू माध्यमे असती
साधावया संवादासी
परी भासे अपूर्णच
मनातले बोलण्यासी

भेट प्रत्यक्ष घडावी
ऐसे क्वचितच होई
शर्यतीच्या अश्वासम
प्रत्येकच धाव घेई

फिरतसे अव्याहत
कालचक्र गोलाकार
संवादाने प्रकटावे
प्रत्येकाच्या ओठावर

रसिका









दत्त गुरु

हेमंताच्या गारव्यात
पुनवेच्या चांदण्यात
चराचर हे प्रकाशले
शुभ्र दुधी प्रकाशात

शुभंकर मास ऐसा
शुभप्रद तो कार्तिक
जन्म घेतसे भूवरी
दत्तबाळ अलौकीक

रमणीय ती वनश्री
दरी डोंगराचा गाव
संत महात्मे वसती
त्याचे पांगरी हे नाव

आले ऐशा पुण्यक्षेत्री
नरहरी अवतारा
रामचंद्र सरस्वती
घेई  हो दत्तावतारा

निज चरणी आश्रय
संतोषले भक्तजन
भाग्यवंत या जगती
लाभे श्रीगुरुचरण

जगन्नाथा एक करी
आरोग्यता गुरुनाथा
देऊनिया करावे हो
शतायुषी रामनाथा

रसिका

Monday, 4 November 2019

गणपती स्तोत्र भावानुवाद

 ॐ नमस्ते गणपतये।
 त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि।।त्वमेव केवलं कर्त्ताऽसि।
त्वमेव केवलं धर्तासि।।त्वमेव केवलं हर्ताऽसि।
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि।।त्वं साक्षादत्मासि नित्यम्।
विश्वव्यापक परमेशा त्रिवार वंदन गणेशा
भालचंद्रा गणाधिशा तुजसी नमन ईशा
सर्वस्व आहेस तूच सर्वत्र तुझा महोत्सव
घडू दे संवाद परस्पर व्हावा नात्यांचा उत्सव
सर्वस्व तूच आहेस का अपमानित नारी
अराजक चहूकडे सांग ना रे या भूवरी
सर्वस्व तूच आहेस व्यास मुनींचा लेखनिक
नांदू दे इथे माणुसकी सृजन व्हावा प्रत्येक

ऋतं वच्मि। सत्यं वच्मि।।2।।अव त्वं मां। अव वक्तारं।
अव श्रोतारं।अवदातारं।अव धातारम अवानूचानमवशिष्यं।
अव पश्चातात्।अवं पुरस्तात् अवोत्तरातात्।अव दक्षिणात्तात्।अव चोर्ध्वात्तात।अवाधरात्तात।
सर्वतो मां पाहिपाहि समंतात्।।3।।
एकदंता गौरी तनया लंबोदरा  शंभुसुता
रिद्धी सिद्धी च्या वरा वंदन तुज शत शता
रक्षणकर्ता तू विश्वाचा रक्षी भारत सैन्यबळ
अबला नसे सबला ती दे शील रक्षण्या आत्मबळ
दश दिशातुनी ये देवा होऊनि गोपालक पुन्हा
रक्षणासाठी धरणीच्या  गजानना ये पुन्हा पुन्हा
गौराईसंगे ये विनायका स्वागतास सारे सजले
आहे त्रिवार सत्य हे रामगुरू रूपे तू रक्षिले

त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय: | त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः ||
त्व सच्चिदानंदाद्द्वितीयोऽसि | त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि |
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि || ४||
सिंदूरवदना वक्रतुंडा वरदविनायका सदया
बल्लाळेश्वर गिरीजात्मका गणपती बाप्पा मोरया
अधिराज्य तुझे शब्द सृष्टीवर दे शब्द भांडार , संवादासी।
तू आहे आनंद म्हणूनिया मन हो आनंदघन , सकलांसी।
तू आहेस ब्रह्म  अद्वैताचे सार हे परमेश्वर , सिद्धेश्वर

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते | सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति |
सर्वं जगदिद त्वयि लयमेष्यति | सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति |
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ:|त्वं चत्वारि वाक्पदानि || ५ ||
जगदोद्धारक गजवक्रा सुखकर्ता जगपालका
तूच निर्मिसी हा पसारा विश्वतारक गिरीजात्मका
रूप तुझे वायू जल अग्नी तूच आहे गगन धरणी
पंचभुतात्मक एकदंता तुझ्या ठायी चारही वाणी
पंचभूतांचे रक्षण व्हावे ऐसी शक्ती दे मोरेश्वरा
वाणी माझी मधुर ठेवी ऐसे दान दे भक्तप्रियकरा

त्वं गुणत्रयातीत:| त्वं देहत्रयातीत: |
त्वं कालत्रयातीत:| त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्||
त्वं शक्तित्रयात्मक:| त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्|
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं| रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं|
वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं| ब्रह्मभूर्भुवः स्वरोम्||
चराचर तू व्यापून आहे त्रिकालाचा तूच स्वामी
त्रिगुणातीत सर्वात्मकाय तुज नमामी नमामी
शक्तीत्रयात्मक गणेश्वरा योगीजनांच्या ईश्वरा
आत्मबळ वाढविण्यास शक्ती दे गौरीकुमारा
मूलाधार तू सृष्टीचा सृष्टीकर्ता चतुरानन
ओमकारा सृष्टीपालक रुद्राय नमः गजानन
सर्वस्व तुच आहेस तुझी रूपे तिन्ही लोक
रक्ष रक्ष विघ्नराजेंद्रा माझा सुंदर भूलोक

गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम् |
अनुस्वार: परतर: |अर्धेंदुलसितम् | तारेण ऋद्धम् |
एतत्तव मनुस्वरूपम् | गकार: पूर्वरूपम् | अकारो मध्यमरूपम् |अनुस्वारश्चान्त्यरूपम् | बिंदुरुत्तररूपम् | नाद: संधानम् | संहिता संधि: | सैषा गणेशविद्या |
गणकऋषि: | निचृद्गायत्रीच्छंद: | गणपतिर्देवता | ॐ गँ गणपतये नम: ||७||
हेरंबा गजवदना सर्व विद्यांचा दाता
ओंकारा स्वरूप देवा तूच भक्तांचा त्राता
 ॐ गँ मंत्राक्षर तव रूप गणकऋषीनी दिला मंत्र
व्याकरणाचा नसे मज गंध तुज ध्यावे, ठावे हेचि तंत्र
ॐ गँ एकाक्षर मंत्राचे तव रूप रिद्धीसिद्धिच्या नाथा
गणेशविद्या म्हणती याला काय हे सांगा गुरुनाथा

एकदंताय विद्महे | वक्रतुंडाय धीमहि |
तन्नो दंती प्रचोदयात् || ८ ||
एकदंता सर्वार्थदाता तव स्मरण ही साधना
ब्रह्मात्मका वक्रतुंडा होऊ दे नित आराधना
ह्या गणेश गायत्रीचे व्हावे मज आकलन
मिळो प्रेरणा भक्तीची राखण्या मन संतुलन

एकदंत चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्। रदं च वरदं च हस्तै र्विभ्राणं मूषक ध्वजम्।।रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।। रक्त गंधाऽनुलिप्तागं रक्तपुष्पै सुपूजितम्।
भक्तानुकंपिन देवं जगत्कारणम्च्युतम्।। आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृतै: पुरुषात्परम।। एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनांवर:।। 9।।

एकदंत आणि चतुर्भुज पाशांकुश आयुध धारक
भग्नदंत वरदमुद्रा हाती रक्तध्वजाकिंत वाहन मूषक
लंबोदरा शूर्पकर्णिका मंगलमूर्ते रक्तवर्णा
रक्तचंदनाचे लेपन रक्तपुष्पे तव पूजना
ऐसे रूप तुझे साजिरे विघ्नहर्ता सृष्टीकारक
प्रकृतीच्या ही पल्याड ऐसा तू वरदविनायक
तो योगियांमध्ये श्रेष्ठ असा गणेश जो ध्याती
ठेवी वरदहस्त शिरी येई क्षणा क्षणा प्रचिती
नमो व्रातपतये | नमो गणपतये | नम: प्रमथपतये | नमस्तेSस्तु लंबोदरायैकदंताय | विघ्ननाशिने शिवसुताय | श्रीवरदमूर्तये नमो नम: || १० ||
देवांच्या देवा गणेशा तुज नमन नमन
शिवगणांचा अधिपती त्रिवार वंदन वंदन
शिवसुताय एकदंता गौरीतनया नमो नमः
विघ्नहर्ता लंबोदरा वरदमूर्ती नमो नमः
सुखकर्ता ऐसा बाप्पा गुरुराजा मी वर्णिला
व्हावा समृद्ध भारत म्हणूनिया मी प्रार्थीला
रसिका(रसिकराज)






























Saturday, 2 November 2019

शुभ सकाळ

गुरूपीठ परंपरा
चालवीती दत्तगुरु
कुणी म्हणे गजानन
तर कुणी रामगुरू

नरहरी अवतार
क्षेत्र करंज नगरी
हाक देई श्रीपादा
जाऊनिया पिठापुरी

स्थित त्या अक्कलकोटी
स्वामीराज श्रीसमर्थ
दास डोंगरी राहतो
रामदास श्रीसमर्थ

पुण्यधाम गोंदवले
राम राम म्हणे सदा
दत्त वासुदेवानंद
माणगावी वसे सदा

किती पुण्यपदे आहे
किती आहे  ज्ञानमय
भारतीय हिमालय
आहे हो रहस्यमय

वंदनीय विभूतीस
स्मरुनिया करी आज
रामगुरू श्रीचरणा
लीन होई रसराज

शुभ सकाळ
रसिका





शुभ सकाळ

सूर्यबिंब नभांगणी
आभा पसरे केशरी
पूर्व क्षितिज उजळे
पडे प्रकाश भूवरी

आसमंत दरवळे
चैतन्यही झळाळले
शुभ सकाळ जाहली
जीव सारे उत्साहले

मास कार्तिक हा
शारदीय चांदण्याचा
नामजप महायज्ञ
प्रभातीस करण्याचा

शुभ सकाळ
रसिका


दीपावली

मनसागरातील आनंद तरंग
दिसे रंगारंग , सभोताल।
आली दीपावली करू स्वागतास
दिव्यांची आरास , चहूकडे।
सजवावे घर, ऐसे वाटे मना
रंगावली नाना, अंगणात।
परी हा पाऊस अभिषेक धार
धरी धरेवर,  अखंडित।
वरुण करितो आवर्तने किती
भिजली धरती , चिंबचिंब।
थांबव हा चाळा पर्जन्य राजा रे
दिवाळी आली रे, घरोघरी।
येतील घरासी  पाखरे दुरून
घे रे सांभाळून, वाटेवरी।
माहेरासी सुखे नववधू येति
भ्रतारा संगती, आनंदाने।
म्हणुनी विनंती  सकल करिती
आता घे विश्रांती, क्षणभर।









दिवाळी शुभेच्छा

घरदार  छान छान
कसे कोण सजविती
हात फिरे घरावरी
गुज करिती ह्या भिंती

स्वच्छ आणि प्रसन्नता
वास करी लक्ष्मी तिथे
सांगे पुराण वेद ही
ऐश्वर्याची खाण तिथे

लखलख प्रकाश हा
जणू चांदणे चंदेरी
चंद्रासह रोहिणी ही
जशी आली या भूवरी

उत्साहाला ये उधाण
घरोघरी रोषणाई
आली आली दीपावली
स्वागताची झाली घाई

दिवाळीचा आपणास
देते शुभेच्छांचा साज
घ्यावा लेऊनी आपण
विनवीते रसिकराज

रसिका



















हिंदू परंपरा

हिंदू परंपरा
रक्षती संस्कृती
आकारा आकृती, सृजनाची।
सण समारंभ
हे विज्ञाननिष्ठ,
पूर्वज ही श्रेष्ठ, ऋषीमुनी।
श्रद्धा ठायी ठायी
उत्साह अमाप
नसे मोजमाप, परस्परा।
ऐसा सण मोठा
दिव्यांचा उत्सव
होई महोत्सव, दीपावली।
पर्जन्य राजा ही
मनी सुखावला
आला पहायला, भूवरी या।
लखलख दिवे
पाहुनी हर्षला
सुखे हुंदाडला, सृष्टीवरी।
माझ्या भारताची
ऐसी ही संस्कृती
सारे सामावती, चराचरी।








ढग








शुभ्र पुंजका ढगांचा
निळ्या नभी विहरतो
मन बावरे धावते
सुख क्षण आठवतो।

चालतांना दिसे छान
ऐट त्याची असे न्यारी
जणू शाल ही धुक्याची
वाटे घेई अंगावरी।

शारदीय महोत्सवी
धुके घेऊनि येतसे
दवबिंदू हे चंदेरी
रुप तयाचे होतसे।

कधी भरुनी जलद
दिसतसे जांभुळला
विरहिणी सवे गुज
सांगे श्रावण ग आला।

कधी चंद्रास झाकोनी
मिलनाची साक्ष देई
अति खोडकर ढग
चांदणेही त्याचे होई।

रसिका







शुभ सकाळ

रोज नित्य नियमाने
उगवसी प्रभाकरा
तव किरण स्पर्शाने
तेजाळसी चराचरा

ऐसे नित्य नियमाने
घडू दे नामस्मरण
रामगुरू चरणांचे
व्हावे रोजच दर्शन

ऐसी कृपा मजवरी
रामदत्ता करावी हो
ध्यास नामस्मरणाचा
नित्य मज लागावा हो

उंच उंच गिरीनारी
जावे वाटे तीर्थक्षेत्री
तव कृपेच्या संगती
दर्शनासी पुण्यक्षेत्री

रसिका




Sunday, 13 October 2019

सहज सुचलं म्हणून.....कोजागिरी



आज कोजागिरी पुनव. आकाशात शांत शीतल शरदाचं चांदणं बहरलं आहे. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र दुधाळ प्रकाशाचं शिंपण करत सृष्टीवर शीतलतेच दान करतो आहे. चंद्र हा स्वयं प्रकाशित नाही. सूर्याकडून प्राप्त झालेल्या  प्रकाशाने चंद्र शीतलता दान करतो. केवढे हे औदार्य.  या ईश्वरी शक्ती फक्त आणि फक्त देत राहतात. देणे ह्या संस्कृतीचा पाया आहे असे आपण म्हणतो ते याच कारणास्तव.
आज या विज्ञान युग म्हणणाऱ्या जगात वावरतांना प्रकर्षाने जाणवतं की आपले पूर्वज वेडे नव्हते,अंधश्रद्धाळू तर नाहीच नाही. आपल्या संस्कृतीत प्रत्येक सण हा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून साजरा केला जातो. शरदाच्या चांदण्यात कोजागिरीला रात्रीच्या चंद्र प्रकाशात  आटवलेल्या दुधाचं जे महत्व, चव  आहे , त्याच्या साक्षीने एकत्र येऊन नात्याचा होत असलेला उत्सव तसेच या चंद्र प्रकाशामुळे आरोग्याचे जे आंदण मिळतं ते अलौकिक आहे यात शंका नाही. तेव्हा हा पुनवेचा चंद्र पहावा,अनुभवावा आणि जगावा पण असं मला वाटतं....

Thursday, 10 October 2019

आनंदाचे झाड



आनंदाचं झाड माझ्या
लावायचे आहे दारी
कसे असेल हे झाड
आले विचार अंतरी

उंच उंच वाढावे हे
पाने ही सहवासाची
फुले नात्यांची सुंदर
गंधाळल्या संवादाची

खत पाणी प्रेमभरे
द्यावे त्यास आदराचे
जमिनीत मुळे घट्ट
रोवतील विश्वासाचे

फवारणी मित्रत्वाची
करतांना गोंजारावे
असूयेची कीड खाली
पडताही आंजारावे

ऐसे झाड आनंदाचे
बहरावे दारोदारी
चराचर सुखावेल
आनंदवन भूवरी

रसिका





Tuesday, 8 October 2019

महिषासुर मर्दिनी स्तोत्र भावानुवाद

गुरु कृपेने लाभली लिखाणास या स्फूर्ती
कुलस्वामिनी म्हाळसा संकल्पासी देई शक्ती

अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते।
गिरिवरविन्ध्य-शिरोधि-निवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते
भगवति हे शितिकण्ठ-कुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।1

सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते
त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते।।
दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते।
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।2

हे गिरी कन्यके अंबे विश्व तारक मोदीनी
तुज ध्याती शिवगण अंबिके शिव मोहिनी।
गिरीश्रेष्ठ या शिखरी विंध्याचल निवासिनी
विष्णू प्रिया भगवती तुज वंदी गे भामिनी
गृहस्वामिनी तू सखी प्राणिमात्रा सुखविसी
कुलस्वामीनी म्हाळसा पूर्ण करी संकल्पासी
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार
आनंदाचे रूप तुझे कृपा देवगणांवरी
वधी दुर्मुख धाकही अति घोर त्या असुरी
त्रिभुवन पालक तू नीळकंठा तोषविसी
तुझा जयघोष करी पाप तयांचे हरिसी
हे सागरकन्यके तू क्रोधी दैत्यकुळांवरी
वधी दुर्मद दानव सेनापती अति घोरी
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार

अयि जगदम्ब  कदम्बवनप्रियवासिनि तोषिणि  हासरते
शिखरि शिरोमणि तुङ्गहिमालय-शृंगनिजालय-मध्यगते
मधुमधुरे मधुकैटभगञ्जिनि महिषविदारिणि रासरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।3

अयि निजहुँकृतिमात्रनिराकृतधूम्रविलोचनधूम्रशते
समर-विशोषित-रोषितशोषित-बीजसमुद्भव-बीजलते
शिव शिव शुम्भ-निशुम्भमहाहवतर्पितभूतपिशाचरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।4

जगन्माते म्हाळसाई हास्य विलसे अधरी
प्रिय कदंबाचे वन तेथे रमसी सुंदरी।
उच्च ह्या गिरीशिखरी वास करी हिमालयी
मधुपेक्षा ही मधुर रूप तुझे सुखदायी।
मधु कैटभारी दैत्य तू सहज विनाशिले
रास खेळतांना किती रममाण  गे अमले।
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।
तव हुंकाराने भस्म झाला तो धुम्रलोचन
माये मारीयले ऐसे  क्रोधभरे दैत्यगण।
रक्तबीजा संहारिले गिळवुनी रक्तकणू
भासे समरांगणात रक्तबीज लता जणू।
शुंभ निशुंभ असुरा धाडी गे यमसदनी
भूत पिशाच्चासमेत रणी फिरसी रागिणी
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।

अयि शतखण्डविखण्डितरुण्ड-वितुण्डित शुण्ड गजाधिपते
निजभुजदण्डनिपातितचण्ड-विपाटितमुण्डभटाधिपते
रिपुगजगण्ड-विदारणचण्डपराक्रमशौण्डमृगाधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।5

धनुरनुषङ्ग-रणक्षणसङ्ग-परिस्फुरदङ्ग-नटत्कटके
कनकपिशङ्गपृषत्कनिषङ्गरसत्भटशृङ्गहताबटुके
हतचतुरङ्गबलक्षितिरङ्ग-घटद्बहुरङ्ग-रसद्बटुके
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।6

तव शक्तिशाली गज करी असुरांचे खंड
शत छिन्न-भिन्न देह विखंडीत करी धड।
अष्टभुजा शिवशक्ती तुझ्या भुजा बलदंड
सहजची तू संहारी असुर ते चंड मुंड।
असुरांच्या या संगरी झेपावतो गजावरी
आहे जयाची  स्वामिनी तोच समर्थ केसरी।
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।
धनुष्याचा टणत्कार शर वर्षाव पाहुनी
बाहू वीरांचे स्फुरती नृत्य करिती हर्षुनी।
सोनियाच्या भात्यातील परयुक्त त्या शरांनी
योद्धे होतसे घायाळ सैन्यातील गर्जनांनी।
चतुरंग बल दैत्य अति घोर रिपू ध्वनी
त्रिभुवन थरथरे रक्तपाट वाहे रणी।
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।

अयि रणदुर्मद-शत्रुवधाद्धुर-दुर्धरनिर्भर-शक्तिभृते
चतुरविचारधुरीणमहाशय-दूतकृत-प्रमथाधिपते
दुरित-दुरीह-दुराशय-दुर्मति-दानव-दूतदुरन्तगते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।7

अयि शरणागत- वैरिवधूजन-वीरवराभयदायिकरे
त्रिभुवनमस्तक-शूल-विरोधि-शिरोधिकृतामलशूलकरे
दुमिदुमितामर-दुन्दुभिनाद-मुहुर्मुखरीकृत-दिङ्गनिकरे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।8

युद्ध मद दैत्य गणा चढतसे रणांगणी
शत्रूवध करावया शक्तीशाली तू कल्याणी।
अधिपती हा गणांचा धुरंधर नि चतुर
ऐसा दूत नेमियला उमापती गे शंकर।
परी दुर्वर्तनी दुष्ट दूत येति दानवाचे
तव  दूत सुविचारी करी हरण गर्वाचे।
 महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।
येति वैरी स्त्रीयागण देसी वीरांना अभय
येई जो शरण तुला नसे तया काही भय।
दिव्य शूल तव हाती त्रिभुवनी शोभतसे
करी विरोध तयाचे शीर हाती फळ जैसे।
विजयश्री लाभे तुज नाद दुंदुभीचा वाजे
देवगण आनंदीत हर्षे दशदिशा गाजे।
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।

सुरललनाततथेयित - थेयित-थाभिनयोत्तर-नृत्यरते
कृतकुकुथा-कुकुथोदिडदाडिक - –तालकुतुहल गानरते
धुधुकुटधूकुटधिन्धिमितध्वनि –- धीरमृदङ्ग - निनादरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।9

जयजय-जाप्य-जये जयशब्द –परस्तुतितत्पर-विश्वनुते
झणझण-झिञ्झिम झिङ्कृतनुपूर-शिञ्जितमोहितभूतपते
नटितनटार्ध -नटीनटनायक - –नाटन- नाटित - नाट्यरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।10

सुर सुंदरी  करी गे नर्तनची तुज सवे
शिवसखी तू रमसी करी तकथै बरवे।
दिड दिड दा ताल हा दशदिशा निनादतो
करी कुकुथा कुकुथा ध्वनी वाद्यांचा होतो।
धुधुकुट मित ध्वनी बोल मृदंगाचे येति
सखे गायनी वादनी रमलीस तू पार्वती।
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।
जयघोष करी भक्त गाती स्तुती तव अंबे
विश्व हे स्तविती तुज होई प्रसन्न जगदंबे।
झण झण झिम झिम तव नुपूर वाजती
भूतनाथा मोहविसी सखी अंबिका भारती।
कुणी पूर्ण नटलेले रंगलेले अर्ध कुणी
नट नटी समवेत नृत्य करिसी मोहिनी
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।

अयि सुमनः सुमन: सुमनः सुमनः सुमनोरमकान्तियुते
श्रितरजनीरजनीरजनीरजनीरजनीकरवत्रभृते
सुनयनविभ्रमरभ्रमरभ्रमरभ्रमरभ्रमराभिहते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।11

महितमहाहववल्लभ-तल्लक-वल्लिक-रल्लित-भल्लिरते
विरचितवल्लि-कपालिक-पल्लिक झिल्लिक-भिल्लिक वर्गवृते
श्रुतकृतफुल्लसमुल्लसितारुण-–तल्लज—पल्लव-सल्ललिते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।12

सुकोमल मनोहर गंधयुक्त पीतवर्णी
पुष्पासम तव कांती आहे गे मनहरणी।
आल्हादक तव रुप तूच दुर्गा निलवर्णा
पुनवेच्या चंद्रासम सुखदायी तू सुवर्णा।
नील नेत्र तयावरी भृंग फिरती मोहूनी
तुज त्रासवी चंचले परी शोभे तू मालिनी
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।
महा भीषण समरी सैन्यबळ लढतसे
करी विश्राम शिबीरी तालयुक्त गान असे।
पुष्प लता सुमनांनी सुशोभित पर्णकुटी
तुजसाठी निर्मिती गे जे वंदितात धुर्जटी।
किरकिरी रातकिडे सवे भिल्ल वर्ग नारी
पुष्प कर्णभूषा शोभे साजे तुजसी सुंदरी।
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।

अयि सुदतीजन-लालस-मानस-मोहन-मन्मथराजसुते
अविरलगण्डगलन्मदमेदुरमत्तमतङ्गगजराजगते
त्रिभुवनभूषण-भूत-कलानिधिरूप-पयोनिधिराजसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।13

कमलदलामल-कोमलकान्ति -कलाकलितामल –भाललते
सकल-विलास-कलानिलय-क्रमकेलिचलत्-कलहंस कुले
अलिकुल-सङ्कुल-कुन्तलमण्डल-मौलिमिलिन्द-बकुलालिकुले
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।14

शुभ्र दंतपंक्ती युक्त मन मोहक मदन
पुत्र मानसी वत्सले देई तया जीवदान।
मदोन्मत्त गजराज मद स्त्राव जया शिरी
ऐसी तू गजगामिनी तव चाल डौलदारी।
त्रिभुवन भूषण ही  शशी सम सुखकर
क्षीरसागर कन्यका  आली गे अवनीवरी।
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।
सुकोमल कांतीमान चंद्रकोरी सम भाल
भासे कमलदल हे अति सुंदर विशाल
कला विलास आश्रया कला निपुण मानिनी
चाल तव हंस गती  अति ऐट गे मोहीनी
तव कुंतल माळीती फुले बकुल गंधित
जणू भासे भृंग येति तव बटा उडवीत।
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।

करमुरलीरव –वर्जित-कूजित-लज्जित-कोकिल-मञ्जुमते
मिलितमिलिन्द-मनोहर-गुञ्जित-रञ्जितशैल-निकुञ्जगते
निजगणभूत-महाशबरीगण-रङ्गणसम्भृत-केलिरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।15

कटितटपीत-दुकूल-विचित्र-मयूखतिरस्कृत - चण्डरुचे
जितकनकाचल -मौलिमदोर्जित -गर्जितकुञ्जर-कुम्भकुचे
प्रणतसुराऽसुर- मौलिमणि-स्फुरदंशुलसन्नखचन्द्ररुचे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।16

तव करी गे मुरली स्वर मधुर निर्मीती
स्वर ऐसे मुरलीचे कोकिळाही लाजती।
गिरी शिखरी सुंदर लता वेली कुंजवनी
भृंग गुंजन नादन रम्य स्थळी निवासनी।
सख्या आदिवासी भिल्ल तव सभोवती येति
रमणीय ऐसे नृत्य तुज संगती क्रीडती।
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।
कटी पीत वसन गे लखलख तेज ऐसे
कांती झळके प्रकाशी रविकर फिका भासे।
कनकचि गिरिवरी घेई मृगेंद्र जयनी
गजशिर भव्य तसे वक्ष गे जननी
देव दानव ठेवीती तव पायी मुकूटही
हिऱ्यासम चमचमे तव पदीची नखेही
 महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।

विजित-सहस्रकरैक -सहस्रकरैक -सहस्रकरैकनुते
कृतसुरतारक-संगरतारक-संगरतारक-सुनूनुते
सुरथ-समाधि -समान –समाधि-समान-समाधि - सुजाप्यरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।17

पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे
अयि कमले कमलानिलये कमलानिलय स कथं न भवेत्
तवपदमेव परं पदमस्त्विति शीलयतो मम किं न शिवे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।18

सहस्त्रचि किरणांनी युक्त ऐसा रविराज
जयावरी विजयी तो तुज स्तविती अधोक्षज।
देवगणा रक्षण्यास स्कंद ये समरांगणी
वधियेलें तारकास पुत्र वंदी तुज जननी।
स्तवी सुरथ समाधी राजा वैश्य उभयता
प्राप्त होई इष्ट फल लाभे तुझी प्रसन्नता।
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।
सर्व मंगल मांगल्ये प्रतिदिन तुज ध्याती
कमलनिवासिनी गे विष्णु स्वरूप ते होती
तव चरण कमल हेच परमपद गे
ब्रह्म चारीणि तू शिवशक्ती रमणी गे।
ऐसे ब्रह्मपद तुझे मनी मानसी कमले
त्यासी शिवपद प्राप्ती कैसी न होई अमले।
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।

कनकलसत्कलसिंधुजलैरनुषिञ्जति ते गुणरङ्गभुवम्
भजति स किं न शचीकुचकुम्भ-नटीपरिरम्भ-सुखानुभवम्
तव चरणं शरणं करवाणि सुवाणि पथं मम देहि शिवम्
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।19

तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं कलयन्ननुकूलयते
किमु पुरुहूत-पुरिन्दुमुखी-सुमुखीभिरसौ विमुखी क्रियते
मम तु मतं शिवमानधने भवतीकृपया किमु न क्रियते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।20

अयि मयि दीनदयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे
अयि जगतो जननीति यथाऽसि मयाऽसि तथाऽनुमताऽसि रमे
यदुचितमत्र–भवत्पुरूगं कुरु शाम्भवि देवि दयां कुरु मे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।21

सुवर्णचि कुंभातील जल सिंचन करिती
तव सुंदर अंगणी भक्त तुज जे ध्याती।
स्वर्ग सुखचि असे हे त्यांसी सुखावह भासे
आनंदानुभव घेई अप्सरांच्या सहवासे।
तव चरणी शरण आहे गे माय मृडानी
करी मम कल्याण  देई मज मधु वाणी।
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।
तव मुखचंद्रमा गे तेजाळे प्रकाश ऐसा
भासे दुजा चंद्र जणू  मान्य करी नभ ऐसा।
तव रूप गे तेजस्वी अति मोहक सुंदर
इंद्रपुरी च्या ललना झुकविती गे नजर।
शिवनाम ज्या हृदयी तूच हे जगज्जननी
करी सर्व तव कृपा ऐसे वाटे माझे मनी।
महिषासुरमर्दिनी तुझा जयजयकार
अति मोहक रमणी तव हा केशसंभार।
हे उमे कल्याणकारी  दीनांवरी कृपा जैसी
सदोदित मजवर माते कृपा दृष्टी  तैसी।
जगताची तू जननी रमे कृपावती माता
मान्य करी गे मजसी पदी दे आश्रय आता।
हेचि उत्तम योग्यच दैन्य कष्ट दूर  करी
तुज शरण शरण  वत्सले परमेश्वरी।

         श्रीमद शंकराचार्य यांनी रचलेल्या
    महिषासुरमर्दिनी स्तोत्राचा भावानुवाद संपूर्ण.

रसिका




























Monday, 7 October 2019

परतीचा पाऊस



छाया आभाळाची येई
मंद मंद वाहे वारा
दिस कधी उजाडला
कसे कळे ह्या चराचरा

परतीचा पाऊस हा
किती घालतो धिंगाणा
वीज कडाडते राती
गडगडे नभ ठाणा

जेव्हा ढग गडगडे
आई सांगे बालपणी
दळे दळण म्हातारी
आता नाही येत पाणी

गर्जे तो पडे का कधी
असे असले तरीही
सर घेऊनिया मोठी
मेघ भिजवितो मही

शुभ सकाळ
रसिका