Monday, 26 April 2021

कर

चित्र ललित

कर#रसराज#युगंधर#बासरी#कृष्ण#









कसे सांगू काय सांगू

भाव माझ्या मनातले 

कर करात तुझीया

सुख हे विश्वातले



   नीलवर्णी युगंधराच्या बासरीचे सूर .....कालिंदी च्या किनारी सारा भवताल सुरमय करीत होते... कदंबाच्या पानापानातून सळसळ जाणवत होती...  कालिंदीच्या काळ्या पाण्यावर भावतरंग थुईथुई करत होते... सांज ऐन भरात असतांना च छम छम पदन्यास करीत ही बावरी धावत होती ......

   बासरीच्या सुरामुळे उतावीळ झालेली. तिचे महावस्त्र  वाऱ्याशी झगडते आहे. ...नजर शोधते आहे कालिंदीचा तीर ...कधी एकदा तिथे पोहचते आणि कृष्णसख्याला पाहते असे झाले होते.....

   हुरहूर मनी दाटते

   कधी पाहू गे श्रीरंग

   ताल धरिती पैंजणे

   परी दिसेना मृदंग

 अशी अवस्था झाली आहे राधाराणीची.... 

   आणि श्रीरंग! नभी चंद्र स्वतःच्या सौंदर्याने झळकत आहे,सभोवती त्याच्या तारकांचा रास रंगला आहे....पण मुरारीच्या गोपिका, राधा कुठे आहेत?  माधवाची नजर सारखी भिरभिरते आहे.... बासरीचे सूर व्याकुळ यायला लागलेत याची जाणीव श्रीहरीला होते.....

    पैंजणांची छम छम ऐकू यायला लागते, राधेच्या सौंदर्याचा, तिच्या प्रीतीचा सुगंध सारा आसमंत भारुन टाकतो आहे ,तिच्या गोऱ्या रंगाचा प्रकाश इतका शांत आणि शीतल आहे की चंद्राची ही शीतलता फिकी पडावी असेच भासते मुरलीधरास जणू....

    राधा कालिंदीच्या किनारी पितांबर धारी सावळे परब्रह्म पाहून हरखून जाते, कृष्णसख्या भोवती तिचे मन रास खेळायला लागतं, समर्पणाचे सारे भाव ती तिच्या कान्हाच्या  करात समर्पित करते, आत्म्याचे परमात्म्याशी झालेले मिलन....

    नीलवर्णी सावळ्याच्या हाती आपला गोरा हात देतांना क्षणभर समाजभान विसरून राधा असे तर म्हणत नसेल न

    

चंपक गोरा कर कोमल हा, करात तुझिया देते

नेशील तेथे-येते, सखया, नेशील तेथे-येते

     

रसिका राजीव हिंगे

 

Wednesday, 21 April 2021

अमृतवेल

 


अमृतवेल* 

वि. स.खांडेकर यांची अमृतवेल ही कादंबरी आठवीत असतांनाच वाचली होती. आता पुन्हा वाचली.

जीवनाविषयी जास्त लिहितात वि. स.खांडेकर असे वाचले होते. अमृतवेल या कादंबरीत विविध पात्रांच्या माध्यमातून जीवनाच्या कितीतरी व्याख्या त्यांनी इथे सांगितल्या आहेत. ज्याला जसे अनुभव येतात तशीच जीवनाची व्याख्या होते का असा प्रश्न पडतो. 

सहज बोलता बोलता जीवन विषयक तत्त्वज्ञान सांगणारी ही गोष्ट आहे नंदा, वसू आणि देवदत्ताची.

एका सामान्य सुसंस्कृत घरात जन्मलेली ही नायिका, भरभरुन प्रेम करणारे आई वडील. एम.ए. झालेली हुशार,वाचनाची आवड असलेली.  नंदाचे लग्न ठरते व विमान अपघातात तिचा होणारा पती शेखर याचे निधन होतं. सुखी संसाराची स्वप्न रंगवीत असतानाच नियतीचा असा विचित्र खेळ तिच्या वाट्याला येतो.

आता आयुष्यात काहीच उरलं नाही, जगून तरी काय करायचं असा विचार तिच्या मनात सारखा येत राहतो,मनाची घुसमट वाढत जाते आणि यातच एक दिवस ती आत्महत्या करण्याचा विचार करते. सागरतीरावर उलटसुलट विचारांत ती खूप आत चालत जाते पण क्षणात आईचा विचार मनात येतो अन ती भानावर येते.

आत्महत्या करायला जाण्यापूर्वी मनातले सगळे विचार पत्र रूपाने दादां साठी लिहून जाते.

घरी यायला उशीर होतोय म्हणून दादा तिच्या खोलीत जातात आणि सहजच तिचे पुस्तक पहात असतांना त्यांना पत्र गवसतं जे त्यांच्यासाठीचं लिहिलेलं असतं.

दादा ते पत्र वाचतात. नंदाने तिच्या मनातील कोलाहल, विचारांची उलथापालथ या पत्रामध्ये लिहिलेली वाचून दादा अस्वस्थ होतात आणि तिला समजावणीच त्याच उत्तर लिहून तिच्या पुस्तकाजवळ ठेऊन देतात. उशिरा आलेली नंदा हे पत्र वाचते आणि शांत होते.

पीएचडी करावी या उद्देशाने ती आणि दादा दासबाबूंच्या घरी जातात.इथे दादा आणि दासबाबू तसेच नंदा आणि दासबाबू यांच्यातील संवाद लालित्यपूर्ण जीवनावर भाष्य करीत इतका सुंदर रंगवला आहे की पारिजात झाडावरून टपटप पडतो आहे का असे सुगंधित शब्द कितीही वेळा वाचलं तरी मन पुन्हा वाचावयास हो च म्हणतं.

नंदाच्या मनाची मनस्थिती बघता तिला 5-6 महिने बाहेरचे जग पाहू द्यावे असे दादांना वाटतं असतं. विलासपूरच्या जहागिरदारीण वसुंधरा यांना एक कंपॅनियन ची गरज आहे असे दासबाबू सांगतात. विलासपूरची जहागिरदारीन दुसरी कुणी नसून आपली कॉलेज मधील मैत्रीण आहे हे कळल्यावर नंदा तिच्या सोबत विलासपूरला येते.

विलासपूरला  आल्यावर वसुंधरा आणि तिचे पती देवदत्त वेगळे राहतात असे कळते. वसुंधरा याबाबत नंदाशी काहीच बोलत नाही. वसुंधराची मुलगी मधुराला फ़िट्स येत असतात त्यामुळे ती फार त्रस्त आहे.

उत्सुकता म्हणून नंदा एक दिवस देवदत्ताच्या घरी येण्याचा प्रयत्न करते. हरिणाच्या पाडसासोबत देवदत्ताचे बोलणे ऐकते. हरिणाचे पाडस आणि मृत्यू च फक्त माझे मित्र आहेत  देवदत्त असे बोलत असतानाच तिथेच नंदाची देवदत्ताशी ओळख होते. त्यांची लायब्ररी, पुस्तक वाचनाचे वेड,त्यावरील नोट्स वाचून नंदा आणि देवदत्ताची पुढे मैत्री वाढत जाते.

छोट्या मधुराच्या मनात देवदत्त म्हणजे एक राक्षस आहे अशी भावना का निर्माण झाली, आधीची हसतखेळत वागणारी , सुरेल गळ्याची वसुंधरा का चिडचिड करते, असे कोणते दुःख तिच्या मनात कोंडले आहे देवदत्त आणि वसुंधरा यांचे वादाचे कारण काय असु शकेल याचा शोध घ्यायचा असे नंदा ठरवते. 

देवदत्ताच्या आई वडिलांचे रहस्य उलगडल्यावर तिच्या हाती जे लागतं ते खूपच वेगळं आहे, यात दोष कुणाचाच नाही.

काय गवसतं तिला?यासाठी नक्की वाचा वि. स.खांडेकर यांची अमृतवेल.

शब्द सामर्थ्य, वाचत रहावे असे लालित्यपूर्ण लेखन वाचतांना मन लेखकाला नकळत  त्रिवार वंदन करतं......


©️रसिका राजीव हिंगे

Tuesday, 20 April 2021

चित्रकाव्य

 











ओंकाराचा नादातूनी

पडछाया झाली सुरेल

बिंब प्रतिबंब भेटतांना

जलाशयाचे भाव तरल


भूपाळीच्या स्वरांचा

प्रवास निर्मोही सगुण

घेई कवेत पश्चिमा

शिणलेला तो निर्गुण


सांज ही आळसावली

आठवांचे शेले विणत

दूर क्षितिजावर कुठे

कातरवेळेची सांजवात


काळोखल्या गर्भातल्या

धूसर झाल्या वृक्षछाया

भास सावल्यांचे भासे

आभासल्या काही छाया


रसिका राजीव हिंगे



Sunday, 18 April 2021

 प्रसंगकाव्य


चांद्रनगरीतून चांदण शेला 

लेऊन आलीस गे प्रिये तू 

मज भूलवाया प्रीत लाजरी

होऊनि अभिसारिका तू


गंधशाली मनरमणी ग

दरवळ उधळत वाटेवरी

मोहवीत हृदयास सखये

पदन्यास करी राधाबावरी


स्वप्नवत भासे साजणी ग

तव स्पर्शाची जादू अधिरी

मधाळलेले शब्द तुझे ग

नयन तुझे जणू कट्यारी


स्वप्नझुल्यावरी झुलतांना

तुझा हात असावा हाती

तुझ्या संगे दिवस फुलावे

गंधाळाव्यात चांदण राती


रसिका राजीव हिंगे



 








रुप अनेक परी तू एकच

भक्तांसाठी होसी सगुण

निराकार परब्रह्म तूच

साकारतो रे तू निर्गुण


प्राशावी भरली ओंजळ

भक्तीच्या  जलाशयातून

तेज गुरुकृपेचे गवसेल

घ्यावे  निरांजन ओवाळून


भुरभुरणारा वारा जैसा

अनाहत नाद नामाचा

व्यापून आकाश अवघे

नाद लावितो गुरुचरणांचा


असे त्रिस्थळीचे एकच सत्य

गुरुविण नाही नर नारायण

भवसागरी तारावया भक्त

गुरुतत्वाचे झाले अवतरण



रसिका राजीव हिंगे


प्रसंगकाव्य (सखी मंद झाल्या तारका...)


मनगंध पायघड्या

वाटेवरी घातल्या ग

ऐसी रुसुनी बसली

चल ये झडकरी ग


रजनीचा नाथ नभी

आला ग ऐन भरात

पारिजात टपटपे

यावे तैसे गे मनात


सुगंधित रात्र झाली

कमलिनी फुलल्या गे

लेऊनिया साज तू ये

सालंकृत होऊनि गे


उधळीत प्रीतगंध

वाट गंधित जाहली

दरवळ आसमंती

सखे अशी का तिष्ठली


शुक्रतारा चमकेल

आता गगनात राणी

घेऊनी ये ओंजळीत

फुले ती सौंदर्यखाणी


रसिका राजीव हिंगे





 आर्त


गात्र गात्र शहारले

हाक आर्त ऐकूनिया

कोण गात विरहिणी

सांज भरल्या समया


सांज प्रहर व्याकुळ

आस भेटीची मनात

आर्त हाक दे समीर

येई गे भिरभिरत


सांजवत लावतांना

थबकली सांज दारी

आठवांची ये चाहूल

परतुनी  पुन्हा घरी


शांत ज्योत थरथरे

आर्ततेने क्षणभरी

रानातला रव येई

ऐसा गोठ्यात हंबरी


आर्त त्राण परायण

भाव माझा दत्तगुरु

स्मर्तृगामी उभा ठाके

हाक देता विश्वंभरू


रसिका राजीव हिंगे


रंग

 

नवी दिशा नवी आशा

रंग हळवा रंग पिवळा

वैभव नि मांगल्याचा

असे रंग हा आगळा


रंग लाल रक्ताचा

प्रेरणा अन ऊर्जेचा

धगधगत्या ज्वाळेचा

रंग लाल क्रांतीचा


आकाशाची निळाई

निळसर हे सरोवर

रंग निळा हा देखणा

शोभे कृष्णाच्या तनुवर


राग,लोभ,शांततेचा

संगम म्हणजे जांभळा

मौज आणि मस्तीचा

रंग असे हा वेगळा


समृद्धीचा अन चैतन्याचा

रंग हिरवा रंग बरवा मी

जगण्याची लय सृष्टीचा त्राता

सौख्याचा दाता मारवा मी


त्यागाचा अन शौर्याचा

शिवबाच्या भगव्याचा

रंग केशरी सौंदर्याचा

सुगंधित केशर रानाचा


रंग पांढरा तेजाचा

पावित्र्याचा शांततेचा

सर्व रंगाचा जन्मदाता

रंग पांढरा शीतलतेचा


सात रंग हे इंद्रधनुचे

सूर्यकिरणांनी फुलती

आकाशात हे बागडती

ऐक्याचे हे गीत गाती


रसिका राजीव हिंगे

भाव तिथे देव

 


श्रद्धा नि भक्तीचा जेथे जाहला संगम

भाव मनी प्रगटला सारुनिया अहं तम


अहंकार असे मन बुद्धीची अशुद्धता

मनी भाव दाटता होई सारीच शुद्धता


विश्वासाचे पारडे जड जेव्हा होईल हो

भक्तीभावाची तुला तेव्हाच होईल हो 


क्षणभर जागतो मनामनातला भाव 

समोरच उभा ठाके आराधीला देव


नको जडजवाहीर नि पंचपक्वान्न

देव भावाचा भुकेला हवे समर्पण


रसिका राजीव हिंगे







 


दया प्रेम शांती 

हीच खरी भक्ती

भक्तीची ही शक्ती, गुरुराज।

शांत असे चित्ती

प्रशांत ही वृत्ती

माधुर्याची व्याप्ती गुरुदेव।

निस्वार्थ निर्मळ

जगण्याचे बळ

देई आत्मबळ गुरुमाय।

मी तू पण सरे

निवृत्ती अहं ची

वाट साधनेची गुरुनाथ।

ज्ञान तेज प्रेम

करुणा सागर

रूप निराकार गुरुदेव।

आकारात बद्ध

होई भक्तांसाठी

उभा राही पाठी सद्गुरू।

सद्शिष्य नित्य

येतसे शोधीत

न शोधावे रानात गुरुदेवा।

भावाचा भुकेला

मनी जागे भाव

भेटे गुरुदेव झडकरी।


रसिका राजीव हिंगे




शब्दांच्या वाटेवरती



शब्दांच्या वाटेवरती

मळा अक्षरांचा गवसे

कुण्या पांथस्थाची ही

शिदोरी नकळत दिसे


थंडीने लपेटून घ्यावी

शाल पांढुरकी जैसी

तैसे शब्द बिलगले

वासरा गाय भेटे जैसी


ऊन पांघरुनी आले

शब्द शब्द वाटेवरी

तेज सांभाळीत सूर्य

येई पूर्व क्षितिजावरी


हलकेच शीळ वाऱ्याची

कानी गुणगुणू लागली

शब्द परडी सुगंधित

हळूच उधळून गेली


वाट मखमली झाली

वरुण राजा भेटताच

पापणकाठ ओलावले

आठवात  शब्दांच्याच


शब्दांच्या या वाटेवरती

भाव शब्द भरून आले

मोत्यास लाभे कोंदण

तैसे भावनेस लाभले


पांथस्थ हो भावविभोर

उचलता शब्दशिदोरी

शब्द वाट वारसा देई

आनंदवन गे अंतरी


रसिका राजीव हिंगे





 


 


प्रसंग काव्य


काय असेल त्याच्या मनात

तिच्याविषयी

प्रेम? का अजून काही!

कळतही नसेल त्याला....

तरीही ही अनावर ओढ कशाची?

शहारतं वय त्याचं, अर्धवट ज्ञान

असलेलं......कुठेतरी वाचलेलं की

अनुकरण कोणाचं!

 हुंदडायचे ही वय नाही...  

 कुणा स्त्रीबद्दल आकर्षण 

 समजण्याचे... ही वय नाही

 अजाणते वय आहे  म्हणूनच ही

 संभ्रमावस्था.

 ती तर अभिजात सौंदर्याची

 परिसीमा

 तिला कळतंय..... पण वळत

 नाही...... त्रिशंकू सारखी अवस्था

 नजरेला नजर देता येत

 नाही..... त्याच्या

 अथांग सागर डहुळतो आहे

 त्याच्या डोळ्यात

 सैरभैर मन झालंय 

 तिचं ही

 कुठे थांबेल हे सगळं

 का असेच असेल

 स्वप्न

 अपूर्णतेच्या वाटेवरचं.....

 

सप्तपदी संसाराची

 सप्तपदी संसाराची


स्वप्न वाटावे ऐसेच

आले घडूनिया सारे

सप्तपदी संसाराची

आले चालून सख्या रे


साथ तुझी सुगंधित

मन मोहरून आले

ठसे माझ्या पावलांचे

तुझ्या सवे गंधाळले


सात पावलात सख्या

सात जन्म बांधीयले

जन्मोजन्मी तूच लाभो

ऐसे ईश्वरा प्रार्थिले


विश्वासाने फुलावी रे

फुलबाग जीवनाची

तडजोड करतांना

साथ तुझ्या रे प्रीतीची


संसाराची सप्तपदी

ऐसी फुलावी फळावी

कोंदणात प्रीतीच्या रे

बहरून नित्य यावी



रसिका राजीव हिंगे


चित्रललित

 



     काय तुझ्या मनात

     सांग माझ्या कानात

     खुल्लमखुल्ला रे.....

          

 अगबाई! कोण बोललं ग? मला भास तर होत नाही न?  का शब्दांच्या हिंदोळ्यावर झुलता झुलता शब्द सखा बोलला असेल! 

 काय बाई हे मन तरी सारखं तुझ्याकडेच धाव घेतं..... तुझ्या आठवणी लिहू म्हटले तरी गाली लाली येते.... सारखा तुझाच विचार. 

 हळूहळू सांज घराकडे परतत आहे आणि रात्र धरेवर आपलं साम्राज्य वसवू बघते आहे...

 चांदण फुलांनी आभाळ गच्च भरले आहे....सारी नक्षत्र आपलं  देणे द्यायला आतुरले आहेत... अलवार शी निळी झुळूक ...मधूनच तिचं अस्तित्व जाणवून देते आहे, रातराणी दरवळते आहे नि..... निशिगंध.... मुग्ध होऊन गंधित असा हा सोहळा पहाण्यास उत्सुकला आहे.......पण अजून नभी रजनींनाथ आलेला नाही, त्याची वाट सगळे चराचर  बघतो आहे...

 अगदी तशीच माझी अवस्था झाली आहे. 

 सारा शृंगार करून मी बसली आहे. ....तुझ्या आठवात प्रत्येक क्षण युगासारखा भासावा अशी माझी परिस्थिती आहे..

 माझी काजळरेखा पुसट होण्याआधी ये....हातातली कांकणं ही सारखी लगबग करतात आहे का कुणास ठाऊक! आणि माझ्या पायीची पैंजणे स्तब्ध झाली आहेत तुझी वाट पाहून पाहून....

नजर तुझ्या वाटेकडे सारखी वळून चाहूल घेण्याचा प्रयत्न करत होती,शेवटी थकली रे ती पण....

 का उशीर होतो आहे येण्यास? मन रमावे म्हणून तुझ्या आठवणी , तुझ्या सहवासातील  सारे क्षण शब्दबद्ध करण्याचा खुळा प्रयत्न करते आहे.....पण....

 शब्द ही रुसले आहेत आज.... गहिवर दाटून येतो आहे शब्दांना.... लेखणीतून  उतरायलाच तयार नाहीत....

 तू असतोस त्यामुळे लेखणीची कधी आवश्यकता च भासली नाही....

 नयन बोलती गुज मनीचे

 हळवे क्षण ते सांगे प्रीतीचे

 असे होतं .....

 पण आज तू नाही तर  सगळेच माझ्यावर रुसले आहेत की माझ्याभोवती फेर धरून माझं मन रिझवायला रास खेळतात आहे...

 काही कळत नाही तुझ्याशिवाय.......

 

रसिका राजीव हिंगे

 

सांज

 


सांज क्षितिजासी

आली सोनसळी

रंग केशरिया

पश्चिमा उधळी


उधळी केशर 

सांजवेळी कोण

अशी गंधाळत

आली आठवण


आठवांचा सडा

जणू पारिजात

केशरिया देठ

ऐसी सांजवात


सांजवात देई

चाहूल तुझी रे

नजर दाराशी

जाई सारखी रे


 रे हुरहूरती

अशी सांजवेळ

तुझ्या आठवांची

ही कातरवेळ


कातरवेळ रे

कशाचा हा भास

उंबरठ्यावरी

सोनपावलांस


सोनपावलांनी

लक्ष्मी येते घरा

माझ्या घरी वाहे

समृद्धीचा झरा


रसिका राजीव हिंगे

चित्रकाव्य






कुण्या राजाचा महाल

नभा घाली गवसणी

जणू नीलवर्णी तारा

गवसला या गगनी


खुणावतो इतिहास

संपदेचा समृद्धीचा

राजा सारख्या मनाचा

शौर्य नि माणुसकीचा


पैंजणांची छमछम

कशी गंधाळली प्रीती

काळ्या मेघापरी दाटे

क्षण विरह एकांती


नक्षीदार गवाक्षात

कलासक्त हात गुणी

झिरमिळ्या पटलाचे

कुणी फिरविले झणी


पाय घट्ट रोवूनिया

नाते जोडीले भूमीशी

उंच जाई गगनासी

राखे इमान मातीशी



रसिका राजीव हिंगे

रम्य ते बालपण...

 




               असेच असू दे लहानपण

               जे जे मज बहु आवडे

               मनासारखे जगता येते

               ना चिंता ना कशाचे वावडे

       मस्त! ना चिंता ना काळजी! हे शब्दच माहीत नसतात बालपणी. निरागस,निरोगी आणि स्वच्छंदी बाल्य.

       प्रत्येकाच्याच वाट्याला येतं रम्य बालपण. असं कधीच होत नाही न एकदम तरुणपणच आले. बालपण आल्याशिवाय कसे बरे तरुण, वृद्धा वस्था येईल?असा खोडकर विचार आताच माझ्या मनात आला अन मी गेले हुंदडत भूतकाळात जिथे माझं बाल्य होतं.

       पाखरासारखे भुर्रऽऽऽकन उडून जातात हे बालपणातील दिवस. असे असले तरी या वयात झालेले संस्कार,लाभलेले मैत्र आजन्म पुरतील असे असतात.

       त्यावेळी कळतही नाही. चिमणदातांनी तोडलेले छोटे चिंचेचे बाटूक मैत्रिणीला देतांना वाटून खाण्याचा संस्कार नकळतपणे होत जातो.  भांडणे पण कशी तर आहे काय नाय काय. क्षणात गट्टी तर क्षणात कट्टी करणारी.

       शाळेत जातांना येतांना होण्याऱ्या गमतीजमती, एकमेकांसाठी थांबणे, म्हणजे सोबतच जाणे येणे. घरातील कामे सुद्धा आम्ही मैत्रिणी एकमेकींना करू लागायचो पाचवीत होते त्यावेळेस चे आठवले. असा आधार असायचा बालपणात मैत्रीचा.

       संध्याकाळी गिल्ली दांडू,लगोरी,दोरीवरच्या उड्या, पतंग उडविणे आणि चिडवचिडवी. राग आला तर येऊ दे असा खाक्या होता. अभ्यास ही सोबतच करायचा,जणू मिनी शाळाच भरायची रोज आळीपाळीने एकेका घरी.

       हरतालिकेची पूजा सोबतच, गल्लीतले सगळे मुलेमुली मिळून कार्यक्रम सादर करायचे हरताळकेच्या दिवशी. त्याची 15 दिवस आधीपासूनच तयारी.  कार्यक्रमच्या तालमी अशा थाटात व्हायच्या की जणू राज्यस्तरीय कार्यक्रम आहे.  त्यावेळी काही भाड्याने वगैरे ड्रेपरी आणण्याची पद्धत नव्हती. घरातलेच जे कपडे आहे ते त्या भूमिकेला साजेसे घालायचे, एखादीला कमी पडले तर ज्याचे जवळ आहे त्याने द्यायचे हा अलिखित नियम, नाही दिले तर भांडून घ्यायचे अन कार्यक्रम साजरा व्हायचा.

       तुझा भाऊ,बहीण ते माझेही असायचे असे विश्व बंधुत्वाचे बीज पेरणारे बालपण आजकाल च्या मुलांना नाही अनुभवता येत याची खंत वाटते.ही तंत्रज्ञान प्रेमी(टेक्नोसॅव्ही) पिढी असे स्वच्छंदी, रम्य बालपण जगू शकेल का? बाल्य हरवले तर नाही ना अशी भीती,काळजी वाटते या पिढीकडे पाहून. असो. कालाय तस्मै नमः.

       बालपणाने दिलेली ही शिदोरी आजही पुरते आहे म्हणून तर या जगात घट्ट पाय रोवून उभे राहणे शक्य झाले आहे असे मला वाटतं....

       

       रसिका राजीव हिंगे

       

चित्रकाव्य


 




नाद वेणूचा भुलवी 

कान्हा रे वेळी अवेळी

मुग्ध कालिका फुलती 

अन सृष्टी ही गंधाळी


कालिंदीच्या जळावरी

शुभ्र धवल चांदणे

तुज भेटण्यासी शोधी

मन बावरे बहाणे


रीत शृंगाराची न्यारी

रातराणी नि चमेली

चाफा जाई जुई अन

किती माळीसि कुंतली


आंदोळते मन माझे

जैसी यमुना डहुळी

कुठवर ऐसे येणे

तुजसाठी तरुतळी


नीलवर्णी आकाशात

तूच भासतो मजसी

जांभुळल्या आभाळात

तूच चांदवा आभासी


रसिका राजीव हिंगे






सहज सुचलं म्हणून.....

 





हिंदू नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


    सकारात्मकतेची गुढी उभारू आज... आणि करू तिचे मानस पूजन... कारण मानस पूजनात जास्त शक्ती आहे.

    जसे विचार तसा आचार या न्यायाने ह्या हिंदू नवं वर्षाच्या सुमंगल पर्वावर मनात सकारात्मक विचार आणायचे... मान्य आहे सोपे नाही पण प्रयत्न करूयात. 

    सकारात्मक विचारात खूप मोठी ताकद आहे. आपल्या पूर्वजांनी वारसाच दिलाय आपल्याला. 

    श्रीराम जरी विष्णूचा अवतार असले तरी ते मानव रुपात होते. त्यांच्या सकारात्मक विचारामुळेच सागरावर सेतुबंधन झाले आणि दुष्ट शक्तीचा बिमोड झाला. अंदमानच्या काल कोठडीत सावकारांनी साहित्याचा नजराणा भारतीयांना बहाल केला केवळ सकारात्मक विचारांवर. 

    आजपासून म्हणजे चैत्र प्रतिपदेपासून शालिवाहन शक

 सुरू झाले असे म्हणतात. शालिवाहन राजाने त्याच्या सैन्यात चैतन्य निर्माण केले, सकारात्मक विचार दिले शकाचा पराभव केला आणि शालिवाहन शक सुरू झाले म्हणून गुढ्या तोरणे उभारले गेले असे इतिहास सांगतो.

    सकारात्मक विचार केले की आपल्या मनातुन हळूहळू नकारात्मकता कमी व्हायला लागते. आपण सगळे विज्ञान युगात जगणारे आहोत,प्रत्येक गोष्ट प्रयोगाने सिद्ध करून मान्य करतो.

    तसंच करून तर पाहू सकारात्मक विचार. आणि काय सिद्ध होतं ते पाहू असं मला वाटतं....


रसिका राजीव हिंगे




 

साक्षीदार


      अहाहा! काय नयनरम्य, सुंदर दिसतंय न नभांगण... शुभ्र शशी आज निळाई घेऊन आला आहे... अग बाई सावळी धरा पण निळीच भासते आहे....वृक्ष , लतावेली सारीच निळाई...

कृष्ण कृष्ण कृष्ण

     अलगद शब्द आले ओठावर.... अरे रजनीनाथा कसली ही निळाई...  आज पुनवेची रात, तुझा दुधाळलेला पांढुरका प्रकाश येईल अवनीवरती असे वाटत असतानाच तू असा निळा का झालास?

     का तुलाही झाली कृष्ण सख्याची बाधा... राधेसारखी! असो. तू नभी आलास न की मन वेडावते तुला बघण्यासाठी  बऱ्याच आठवणी आहेत तुझ्या संगतीच्या...

     आता ही निळाई च बघ न तुझ्या स्वभावाचे द्योतकच जणू. शांत, आल्हादक.... एखादी निळी झुळूक यावी अन मन सुखावून जावे असेच तुझे रूप आजचे रे. 

     नवपरिणीता प्रीतमहाली अवगुंठून बसली आहे सख्याची वाट बघत तुझ्याच साक्षीने. अशा कितीतरी सखींचा तू सोबती होतास,आहेस आणि राहशील पण. नाही का? कारण सगळ्या रात्री तर तुझ्याच साक्षीने फुलतात,बहरतात आणि विरह पण तुझ्याच साक्षीने सोसतात. खरे आहे न!

    अल्लड षोडशा तुझ्याच संगतीने स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलते, रोमांचित होते. तुझं हे लोभसवाणे रूप पाहिले की सारं विसरायला होतं आणि तूच खरा सखा असे वाटायला लागतं. 

    तुला असं कधी वाटत का तुझ्या स्वच्छ प्रकाशात एखादी तुला न रुचणारी,क्रूर,समस्त मानवजातीला काळिमा फासणारी एखादी घटना घडली तर तू त्याची पण साक्ष देऊ शकशील? देऊ शकशील. नक्की च देशील कारण जिथे तू आहेस तिथे काहीच लपत नाही,आपोआप ते उघडकीस येतं....अशा अप्रिय कथा नको गडे.. 

    तुझी एक गोष्ट मला फार आवडते. देत राहणे. तू स्वतः स्वयं प्रकाशित नाहीस. रविराजकडून तुला प्रकाश मिळतो आणि तू तो हो वाटून टाकतोस,अगदी जे जे आहे मजपाशी ते ते घे तू तुजपाशी असे म्हणत सगळं समर्पण करतोस.... किती  ही उदात्त भावना.....

    पण खरंच तू म्हणूनच खूप छान दिसतोस,सौंदयाची परिसीमा म्हणजे तू असं मला वाटतं...


रसिका राजीव हिंगे