Monday, 16 November 2020

चित्रकाव्य

 




तू येतोस 

रोज नियमाने

ठरलेल्या वेळेस

कसं जमतं तुला

हे वेळेचे बंधन

पाळणे

प्राची घेऊन येतोस

सोबत

सगळा चराचर

केशरी होतो

उषेच्या गालीची 

लाली असते 

रे ही

तुला पाहून धरा

पण मोहरून येते

आणि गंधाळते

सगळ्या फुलांचे 

गंधकोष घेऊन

तुझ्या स्वागतासाठी 

असतं रे हे सगळं

तू आलास की

भूवरी असतं

आनंदवन.


रसिका राजीव हिंगे

दिवाळीच्या शुभेच्छा

 




दिन दिन दिवाळी

आली माझिया घरी

आनंदाला उधाण

आले ग घरोघरी


धनत्रयोदशीचा

पहिला आला दिस

धन्वंतरी पुजावा

देई आरोग्यास


सुख नि समृद्धीची

नात्यांची ही संपदा

परस्परात वाढो

हीच धनसंपदा


माणुसकीची ज्योत

लावावी संवादाने

जगण्याचे हे मर्म

जगावे आनंदाने


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे

दिवाळी

 




आली ती

लखलख तेजाळत

उत्साहाचे पैंजण

घालून

आनंदाचा पदन्यास 

करीत आली.

सारा आसमंत आता

उजळून निघेल

तिच्या प्रत्येक ज्योतीमध्ये

सामावले आहे आरोग्य

समृद्धी,यश आणि

चैतन्य

प्रकाशाचे आंदण

देण्यास

प्रत्येकाचे जीवन 

उजळण्यासच

ती येते 

हे तेजाची जननी

तुझे स्वागत आहे

सारे सानथोर 

आतुरले आहेत

तुझ्या स्वागतास

काळ्याकभिन्न काळोखात

आशेचे, संपदेचे आणि

हो ग आरोग्याचे किरण

पण घेऊन ये

सारे चराचर 

निरामय होण्यासाठी.


शुभ सकाळ

रसिका राजीव हिंगे


Saturday, 14 November 2020

सहज सुचलं म्हणून..

 





हे दिवाळी तू आलीस
तेजाचे रूप घेऊन चराचर
व्यापून आलीस
आनंद,उत्साह,चैतन्य, धनधान्य, 
समृद्धी आरोग्याचे दान
घेऊन आलीस तू.

जशी पूर्वी यायचीस...
माझ्या लहानपणी सारी सृष्टी
आनंदविभोर, भावविभोर व्हायची
तशीच
तू अजूनही येतेस
पूर्वी तुला खरा आनंद
मिळायचा, तुझं स्वागत
औपचारिक नसायचं.
मनापासून आतुरतेने वाट
पाहुन केलेलं असायचे स्वागत
तू पण हरखून जायचीस न.
सोबत आणलेले सारे दान
करत यायचीस
त्यामुळे प्रत्येक घरात
संपदा, समाधान असायचे
कोणत्याही गोष्टीची हाव
नव्हती आहे त्यात
आनंदाने जगणारी, माणुसकी
जपणारी,नाते जपणारी
मानवसृष्टी होती.

दिव्यांचा लखलखाट नव्हता ग
पण ज्योतीचे तेजाळलेपण होते
थरथरत्या ज्योतीत पण आत्मविश्वास
असायचा. सारा आसमंत प्रकाशित
करण्याची ताकद पणती च्या ज्योतीमध्ये
आहे असं वाटतं.

आताची ही लखलख भपका पहिला
की तुझं ते शांत रूप मनाला भावतं
निसर्गाच्या गाभ्यातून तुझं येणं
त्याचवेळेस धरतीच्या गर्भातून
आलेल्या हिरवाईने नटलेली
धुक्याची शाल पांघरलेली
पहाट. अहाहा नयनरम्य ग
सगळंच.

पण आता सगळं कसं ग
औपचारिक झाल्यासारखे वाटतं
सगळ्यांची नुसती पळापळ
कशाच्या तरी मागे धावणारी ही
पिढी तुझं स्वागत असंच करेल ग
औपचारिक, परंपरा आहे म्हणून
पण हे असंच चालायचे ग
कालाय तस्मै नमः

भौतिकवादी पिढी विज्ञानाच्या टीमक्या
वाजवत राहते पण हे विज्ञान
आधीच आपल्या ऋषीमुनींनी
शोधलं आहे नव्हे अगं
निसर्ग म्हणजेच विज्ञान
हे सांग बाई या पिढीला
म्हणजे पुन्हा पूर्वीसारखे
तुझे मनापासून स्वागत होईल
कारण हे कालचक्र गोल फिरते
आहे  पहिला बिंदू
येईलच.
खरे आहे न ग?

रसिका राजीव हिंगे
8600047066

Tuesday, 3 November 2020

चित्रकाव्य

 



तव पदी दे आश्रय

तुज शरण गौतमा

पुन्हा यावेस तू जन्मा

विनवितो परमात्मा


झालो व्याकुळ जीवनी

नच शांती लाभे जीवा

शांतिरुपा परमेशा

मार्ग दावी मज देवा


विष्णुरुप तू भूवरी

सिद्ध करी रे सिद्धार्थ

आठवे अवतारी होता

तैसा असे रे मी पार्थ


रामराय चित्ती आहे

दूत होऊनि आलो रे

प्रेमभाव अंतस्थ हा

तुज भेटाया आलो रे


तुज न्याहाळता  भासे

भार्गव तू परशुधारी

होऊ दे रणकंदन

अहंकाराचे या भूवरी


बटुरुप वामनाचे

धरेवरी पुन्हा तू घे

सारी अराजकता ही

त्रिपदात व्यापून घे


शांतिस्वरूपा गौतमा

तुज कळे सारे सारे

तव द्वय चरणांशी

म्हणूनिया आलो रे


रसिका राजीव हिंगे