स्त्री एक शक्ती आहे हेच निर्विवाद सत्य आहे. कुठल्याही अडचणीतून मार्ग कसा काढायचा ह्याचे तिला वरदान प्राप्त झालेले आहे असे वाटते. एका स्त्री ने आपल्या छोट्या चार वर्षाच्या मुलीसह इराण ते अमेरिका हा केलेला खडतर प्रवास म्हणजे नॉट विदाऊट माय डॉटर ही सत्यकथा. बेट्टी महमुदी यांनी स्वतःचे अनुभव विल्यम हॉपर या सह लेखकाच्या सहाय्याने लिहिलेले हे पुस्तक, ज्याचा अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे.स्त्री ही मुळातच कोमल आहे पण प्रसंगी ती कठोर, कणखर तसेच आत्मनिर्भर असते याचा बेट्टी यांचे सत्यकथन वाचतांना पुनः प्रत्यय येतो.
अठ्ठावीस वर्षाच्या बेट्टी महमुदी आपल्या पहिल्या लग्नाचा कटू अनुभव पाठीशी घेऊन दोन मुलासह अमेरिकेत मिशीगन येथे रहात असतात. नोकरी करत स्वतःचे कर्तृत्व आजमावत मॅनेजर होण्याचे स्वप्न असतं. पण दैवाला वेगळंच मान्य असतं. डोकेदुखी आणि त्या अनुषंगाने होणारी अंगदुखी या आजारामुळे त्या हैराण होतात. त्यांच्यावर उपचार करण्याचे निमित्ताने सय्यद बोझोर्ग महमुदी या तरुण डॉक्टर शी ओळख होते आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झाले. अमेरिकन नागरिक असलेल्या बेट्टी आणि इराणमधून डॉक्टर होण्यासाठी अमेरिकेत आलेले सय्यद बोझोर्ग महमुदी ज्यांना सगळे मित्र मुडी म्हणत असतात यांचा संसार अमेरिकेत मिशिगन येथे सुरू होतो. मुलगा हवा अशी मुडी ची इच्छा असते पण त्यांना कन्यारत्न प्राप्त होत. याबाबत नाराजी न दाखवता तिचे नाव माहतोब ठेवण्यात येतं. माहतोब म्हणजे फारसी भाषेत चांदनी.
1984 साली बेट्टी आणि मुडी आपल्या तीन वर्षाच्या माहतोबला घेऊन इराण मध्ये जातात. नातेवाईकांना भेटण्यासाठी आपण तिकडे जात आहोत असे मुडी या दोघींना सांगतो. इराणला विमानतळावर उतरण्या आधीच उगाच चौकशी होईल असा धाक दाखवून मुडी बेट्टी कडून त्या दोघींचे पासपोर्ट हस्तगत करतो.
मुडीच्या घराण्याचा इराणमध्ये चांगलाच दबदबा असतो.
सय्यद हे उच्चकुलीन समजले जात. नाव, घराणं,खानदान याबरोबरच उच्च विद्याविभूषित असल्याचा अहंकार मुडीला असतोच. लहानपणीच आईवडील गेल्यामुळे मोठ्या बहिणीने मुडीचा सांभाळ केलेला असतो. एक प्रेमळ पती आणि पिता असलेला मुडी म्हणजे भावभावनांचा कल्लोळ,पाश्चिमात्य आणि पौर्वात्य विचारांचा आणि संस्कृतीचा पगडा असल्यासमुळे कायम तो द्विधा मनस्थितीत असतो. सर्वात प्रथम त्याच्या आयुष्यात त्याच्या घराण्याला,कुटुंबाला महत्त्व देत असे. प्रत्येकालाच असतो आपल्या घराण्याचा, कुटुंबाचा अभिमान.
बेट्टी या इराण विमानतळावर उतरल्या पासूनच त्यांना तिथे असुरक्षित वाटत होतं. विमानतळावर त्यांना घ्यायला आणि पहायला आलेली गर्दी पाहून बेट्टीला अगदी नकोसे होते तिथे येणे. तिथल्या स्त्रियांचे घातलेले ते लांबच लांब झगे म्हणजे नखशिखांत चादोर. चादोर म्हणजे अर्धचंद्राकृती कापडाचा तुकडा असून त्याने खांदे,नाक कपाळ व हनुवटीवरून पांघरलेला असतो. बेट्टी यांच्या म्हणजे नववधूच्या स्वागताचा इतका भयंकर प्रकार की वाचतांना अंगावर शहारे येतात. किळस,घृणा,राग चीड सगळ्यांच भावना एकत्रित होतात हे सगळं पाहून.
मुडीची मोठी बहीण सारा महमुदी घोसी म्हणजे एक बडं प्रस्थ असतं. सगळे तिला आमे बोझोर्ग म्हणत असे. तिनेही चादोर घातलेले असते. त्यालाच नाक पुसणे,तोंड पुसणे,खरकटे हात पुसणे असे गलिच्छ होत सगळं. महिनोंमहिने अंघोळ करीत नसे आमे बोझोर्ग. तांदळात किडे तसेच असत व भात शिजवला असे. घरात सगळीकडे अन्न सांडलेले, झुरळं, माशा यांचा सुळसुळाट असतो. सगळे एकाच ताटात जेवण करणे, हात न धुताच तसेच अंगावरील कपड्यांना पुसणे हे सगळं मुडी डॉक्टर असून कसा सहन करतो हे पाहून बेट्टीला खूपच वाईट वाटतं आणि आपण कसे फसलो याचेही आश्चर्य वाटतं. प्रारब्धापुढे कोणाचे चालत नाही हेच खरे असे विचार येत असावेत बेट्टीच्या मनात असे मला वाटले हा प्रकार वाचतांना.
इराणमध्ये आल्याबरोबर आमे बोझोर्ग ने बेट्टी ला कोट आणि मफलर भेट दिले. कोट म्हणजे मोंटो आणि मफलर म्हणजे रुझारी हे बाहेर जातांना घातलेच पाहिजे असा तिथे नियम आहे. चादोर घालण्याची बेट्टी ला आणि माहतोब सक्ती करण्यात येते.
अशा गलिच्छ देशात बेट्टी आणि माहतोब यांना राहाणे म्हणजे एकप्रकारे शिक्षा च वाटते. अमेरिकेतील तिच्या आईवडिलांची,मुलांची आठवण तिला स्वस्थ बसू देत नाही. सुरवातीला बेट्टी मुडीच्या विनवण्या करते अमेरिकेला परत जाण्याविषयी. परंतु काही कारणे काढून मुडी टाळत असतो. इराणमध्ये आल्यावर अमेरिकेतील नोकरी गेल्याचे मुडी बेट्टी ला सांगतो. हळूहळू बेट्टी च्या लक्षात यायला लागतं की इथे आपल्याला व माहतोबला फसवून कायमचं इराण मध्ये आणलं आहे.
हळूहळू मुडीचा जाच वाढत जातो. तिचे फोनवर चे बोलणे बंद करण्यात येत. आमे बोझोर्ग आणि तिचा मुलगा यांच्या सहाय्याने मुडी बेट्टी ला घराण्याचे नियम आत्मसात करायला भाग पाडतो. इंग्लिश मधील कुराण वाचणे हा बेट्टी ला आवडता छंद झाला असतो. कुराणाचा दाखला देऊन ती घरातील सगळ्यांशी वाद घालण्याचा निष्फळ प्रयत्न करते. वेळ नेहमीच माणसाची परीक्षा घेत असते हेच सत्य आहे.
पुढे मुडी माहतोब ला तिथेच शाळेत दाखल करून तिचे शिक्षण चालू करतो. माहतोब ला शाळेत सोडणे, आणणे
यानिमित्ताने बेट्टी ला बाहेर पडायला मिळत होते आणि दर गुरुवारी कुराणाचा क्लास त्याचा फायदा असा झाला की बाहेर मैत्री वाढत गेली. यावरही काही दिवसातच मुडी अंकुश लावतो. काही दिवसातच मुडीला पण तिथे नोकरी मिळते.
अमेरिकेत जाण्यासाठी बेट्टी वारंवार सांगते तरीही तिकडे लक्ष न देता बेट्टीला मारहाण करणे, नजरकैदेत ठेवणे, माहतोब ला आणि बेट्टी ला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणे असे अमानवी क्रूर कृत्य करत राहतो. जेणेकरुन बेट्टी पुन्हा अमेरिकेचा हट्ट करणार नाही. अशाही परिस्थितीत बेट्टी अमेरिकेला जाण्याचे प्रयन्त चालूच ठेवते. तिला काही लोक खूप चांगले भेटले, काहींनी फसविले. हेलन बालासेनियन ही इराण मध्ये एंबसीत काम करणारी स्री , एक दुकानदार हमीद, बेट्टीच्या काही मैत्रिणी झरी,फरिश्ते,अँलिस चँमसे यांची बेट्टीला खूप मदत मिळाली. मदत करणारा कोणत्या धर्माचा,पंथाचा किंवा जातीचा आहे हे महत्वाचे नाही तो माणुसकी जपणारा आहे हे महत्वाचे आणि अशाच माणुसकीने जगणाऱ्या लोकांच्या चांगुलपणावर जगरहाटी सुरू आहे असे वाटते.
इच्छा तिथे मार्ग यावर बेट्टी चा विश्वास असतो. एक दिवस असाच एक अनामिक एका चिठोऱ्यावर एक पत्ता खरडून बेट्टी ला देतो. त्या पत्त्यावर बेट्टी जाते. इथे अमाल नावाच्या व्यक्तीस भेटते आणि सुरू होतो तिचा अमेरिकेच्या दिशेने प्रवास.
रक्त गोठवणाऱ्या थंडीत अतिशय खडतर प्रवास, प्रत्येक क्षणी टांगती तलवार, कल्पना केली तरी मनात प्रचंड वादळ उठतं, असे असूनही बेट्टी फक्त माहतोबसाठी ही रिस्क घेते. वाचतांना अंगावर अक्षरशः शहारा येतो. तिला मदत करणाऱ्यांच्या डोळ्यात देखील अश्रू येतात. साथ देणाऱ्या चिमुकल्या माहतोब चे खूप कौतुक वाटत.स्त्री ही अनंत काळासाठी माताच आहे हे जाणवतं. मुडी आणि त्याच्या नातेवाईक यांच्याबद्दल मनात चीड,घृणा निर्माण होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून केवळ मुलींसाठी बेट्टी हे साहस करते. बेट्टी च्या या साहसाला त्रिवार मुजरा.
रसिका राजीव हिंगे
अकोला
8600047066


