Tuesday, 18 January 2022

तृषार्त

 

तोलुन धरते अवघे विश्व
भार कशाचा वाटे मजला
मीच आधार जगण्याचा रे
आहे ठावे सारे मजला

दशदिशातुनी संकटांनी
फेर धरलाय सभोवता
तूच मांडला खेळअनोखा
कसवटी कशी घेतो आता

जलाशयाच्या खांद्यावरती
थांबवलेले तृषार्त जीवन
घेऊ दे ना श्वास मोकळा
जगण्याचे रे आले दडपण

झऱ्या झऱ्यातून वाहे पाणी
परी रिकामी माझी घागर
नाथा घरच्या पाणक्या रे
सावरायास ये रे सत्वर

देई आता आत्मबळासी
संस्कारित करू दे शावका
तूच निर्मिसी तूच तारिसी
कसे हे भोग सांग निर्मिका

रसिका राजीव हिंगे

(शावक म्हणजे इथे पिल्लू किंवा बाळ असे अभिप्रेत आहे)

Monday, 17 January 2022



 उतरुन आला स्वर्गच जणू

मौज पहाया अवनीवरती 

गंधित कुमुदिनी पांघरलेल्या

पाहुन वसला सृष्टी वरती


पायरीवरी जरा विसावे

मोहक दिसते या नयनाला 

काय पाहू नि कसे करावे

सौंदर्याच्या परिभाषेला


बहरत परिमल चोहीकडे 

प्रसन्नतेचा दरवळ आला

संभ्रम पडला तया मनाला

सृष्टी छान की स्वर्ग चांगला


इंद्रधनू सम भासे सारे

धरा सावळी सजली नटली

ऋतू गुलाबी लेऊन आली

कोण अप्सरा कुठून आली


रसिका राजीव हिंगे







Tuesday, 11 January 2022

चित्रकाव्य संस्काराचे देणे

 



मधुर शैशव रसाळलेले रानोमाळी विखूरलेले

निसर्गाच्या कुशीत रमले एकमेकास म्हणती अपुले 


आभाळासी पांघरूनिया भूमातेच्या अंकावरती

संस्काराचे होई दर्शन उजळती जणू वत्सल ज्योती


संवादन हे घडवित असते नात्याचे ते अतूट बंधन

सहवासाने कळते सारे सरते माझे माझे मी पण


कोण रंक नि कोणता राव  नसावा इथे हो भेदभाव

विणत रहावी गुंफण ऐसी देत रहावा हृदयात ठाव


माणुसकीचा कर धरूनिया विश्वासावर जगते दुनिया

संस्काराचे आंदण द्यावे बाल्य बहरते मोहरुनीया


रसिका राजीव हिंगे

Thursday, 6 January 2022

*शुभ सकाळ*

 *शुभ सकाळ* 


दिसे सोनेरी किनार

ढगाळल्या आभाळात

सोनसळी किरणांची

आभा खुलली नभात


दाटे मळभ तरीही

येई प्रकाश भूवरी

ऐसे घडावे जीवनी

दिशा उजळावी खरी


ढगाळल्या मनांगणी

यावी सकारात्मकता

अशा सोनकिरणांनी

निवळेल उदासता


नामयज्ञ व्हावा नित्य

ध्यावे मनी आराध्यासी

गुरुचरणांसी लिन

त्यागावे हो मीपणासी


©️रसिका राजीव हिंगे

Wednesday, 5 January 2022

नाद




छमछम पैंजणांचा

नाद नादावला तीरी

देहभान विसरुनी

कोण नर्तती किनारी


वाऱ्यावरी स्वार झाला

सूर वेणूचा सत्वरी

येई अवघे गोकुळ

पावा वाजवी मुरारी


ताल धरुनी टिपरी

नाद एकरूप झाला

लयबद्ध पदन्यास

रास राधेचा रंगला


रात्र गंधित जाहली

चंद्र तारका गगनी

यमुनेचा जलाशय

आनंदला मनोमनी


ऐसा खेळीया खेळवी

खेळ आयुष्याचे न्यारे

लय नाद ताल सूर

यावे एकत्रित सारे


रसिका राजीव हिंगे


Tuesday, 4 January 2022

चित्रकाव्य

 



दाटत येते जरा धवलशी

निळसर माया आभाळाची

हिरवाईला घेउनि कवेत

शाल ओढते दवबिंदूंची


विसावते ही नदी किनारी 

तरंग उठती मन जलाशया

स्वप्नच भासे सारेच गडे

परी असे ही निसर्ग किमया


शीतल वारा शीळ घालीत

हुंदाडत ये दरी कपारी

सळसळ पाने  पैंजण रुणझुण 

रास खेळतो कृष्ण मुरारी


आरक्त होइ धवलशी काया

रविराजाची येता स्वारी

त्या सोनसळी किरणांमध्ये

सारे सारे समर्पण करी


रसिका राजीव हिंगे




 आल्हादक गार वारे

भिरभिरे पौष मासी

येई घेऊनी भास्कर

उबदार किरणांसी


निळ्या नभी पसरली

आभा रंगीत केशरी

जणू भासे उषाराणी

उभी सलज्ज लाजरी


निघे पाखरांचा थवा

कलरव आनंदक

आगमन भास्कराचे

सृष्टी दिसते मोहक


मोहरत्या गारव्यात

धरा दवात भिजली

धुके शुभ्र लपेटून

शहारून गंधाळली


शुभ सकाळ🙏🏻🌹

©️रसिका राजीव हिंगे

Sunday, 2 January 2022

ही गुलाबी पहाट




     आरस्पानी सौंदर्यवती  पहाटेस  शिवशक्तीचे मिलन झाले आणि सृष्टीची निर्मिती झाली. सारे चराचर मोहक, गंधमय झाले. शिवाच्या प्रीतीने मोहरलेली शक्ती लाजेने अगदी चुर झाली, तिचे आरक्त  रूप पाहून की काय  पहाट ही गुलाबी झाली.

     अहाहा! काय सुंदर आल्हादक वातावरण आहे न! मनाला भुरळ घालणारी, प्रीतीला पोषक आणि आवाहन करणारी ही  गुलाबी पहाट अशीच रहावी, उत्साहपूर्ण, चैतन्यमय.... तारुण्याने भारलेली, बहरलेली, सुखाची उधळण करणारी, सुगंधित सौंदर्यवती.

     पहाट झाली तरी तम पेंगुळलेला असतो, चंद्र तारका ही जरा गुलाबी थंडीचा आस्वाद घेत पहुडलेल्या असतात  त्यामुळे रविराज ही जरा अंमळ उशिराच उठतात... पण तोपर्यंत पश्चिमेचा गार वारा दवबिंदूचे शिंपण करून धरेला भिजवतो आहे की तिच्या सौंदर्यात दवाच्या  चंदेरी कणांनी भर घालतो आहे कळत नाही. कडे कपारी, डोंगर दऱ्यातून पांढुरके धुके आपला वेगळाच थाट दाखवत आहे. अन उषाराणी दवबिंदूनी सालंकृत होऊन धवल धुक्याची शाल लपेटून, लाजत, मुरकत रविराजाच्या स्वागताची तयारी करते आहे. नभांगणी पूर्वा सोनसळी साज लेऊन प्रभाकरा सवे उगवती कडे जाण्यास डौलदार गजगामीनी सम चालत निघाली आहे. क्षितिजावर केशरिया शिंपत अरुण रथारूढ होऊन भास्कराच्या द्वारी तिष्ठत उभा आहे. पाखरांचा मधुर कलरव,  पानांची सुरेल सळसळ, पहाटे भोवती फेर धरून जणू रास खेळत आहे.



      गंधित कुमुदिनी उमलत आपल्या सुगंधाने पहाटेचे आल्हादक वातावरण अधिकच  मदहोश करीत नवं तारुण्याला बेधुंद करीत आहे....प्रीतमंदिरी या गुलाबी पहाटेच्या धुंद वातावरणात प्रीतीला उधाण आले आहे जणू.    पवित्र प्रीती बंधनाचे अश्व मात्र अशा गुलाबी पहाटेस चौखूर उधळतात. 

     पहाटेची निर्मिती करतांना परमात्म्याने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे, म्हणून तर ती इतकी मनोहर, आहे. रोज नवे रूप,नवीन आशा, नवे संकल्प घेऊन, नव्या वाटा दावित जगण्याचे बळ देते,आत्मबळ वाढविते.....


रसिका राजीव हिंगे

     

     

Saturday, 1 January 2022

      किती ही सोज्वळता! घरंदाज, खानदानी सौंदर्य ग तुझं.  कोणता देव ग तुझ्या निर्मितीस कारण.सावकाश विचार करत घडवले आहे तुला. 

     मुखकमल पाहताच महालक्ष्मी चा भास होतो. तुझे नयन म्हणजे जणू कमळाची पाकळी भासावी असे, शांत भाव साठले आहेत नयनात. चाफेकळी सम असलेल्या नासिकेत मोती डुलतो आहे. त्या मोत्याला पण तुझ्या नासिकेत शांत विसावेसे वाटले हे त्या मोत्याचे भाग्य आहे की त्याच्यामुळे तुझ्या नासिकेचे सौंदर्य वाढले आहे हे तो देवच जाणे.

     केशसंभार! काळोखालाही संभ्रम पडावा स्वतःच्या रंगाचा आणि रेशमाला ही हेवा वाटावा तुझ्या तलम मऊशार कुंतलाचा.

     कर्णफुले ही मुग्ध झालीत बघ तुझ्यासारखीच. कानात झुलायचीच विसरलीत बहुधा. 

     कंठातील सौभाग्याचे मंगळसूत्र तुझ्या शालीनतेत, सौंदर्यात भर घालते आहे. सुवर्ण अलंकार झळाळतात आहे गळ्यात की तुझ्या मनभावन साजणाच्या प्रीतीचे तेज तुझ्या सर्वांगावर भारले आहे!

     असेच असावे. तुझ्या मुखकमलावरील मुग्ध हास्य, तुझ्या नयनात साठलेले प्रीतीचे भाव पाहून तरी असेच वाटते आहे की तू खूप वेळ प्रतीक्षा केल्यानंतर तुझा साजण तुझ्या पुढ्यात उभा आहे, तुझ्या देहबोलीतून तू त्याचे स्वागत करते आहे हाच तो घरंदाज ठेवा,दिखाऊपणा नसलेला! खरे आहे न ?


रसराज

पुढे पसरला अथांग सागर

 



पुढे पसरला अथांग सागर

निराकार ते निर्गुण रूप

भवितव्याचे घेउनि आंदण

उभे ठाकले जणू जलस्वरुप


अथांगतेतून गवसेल मग

विशालता त्या निर्मिकाची

वेगवेगळी रूपे निर्मितो

कैसी किमया नियंत्याची


किती शिंपले मोती विरहित

लाटा समेत येती किनारी

स्वातीचे ते थेंब घडविती

कितीक मोती याचे उदरी


 संचित प्रारब्ध सवे देतसे

 कर्मानुसार हा भवसागर

 क्रियामाण ते करावयासी

 पुढे पसरला अथांग सागर



रसिका राजीव हिंगे

 










चित्र ललित

    चित्र ललित

   


  "अरे किती दिवसांनी भेटलीस ग"

तूच खरी माझी मैत्रीण होतीस,आजही आहेस खरे तर पण या संकुचित वृत्तीच्या ,कोत्या मनाच्या समाजबांधवांना आपली मैत्री रुजली नाही,पटली नाही. एक स्त्री आणि पुरुष अशी निखळ मैत्री असते हेच खरे या समाजाला कळत नाही की कळून मान्य करायचे नाही, हेच मला कळलं नाही ग. निरपेक्ष भावनेने केलेले प्रेम म्हणजे मैत्री मग ती कोणाचीही असो. मैत्रीत स्त्री पुरुष असा भेदभाव असू नये असे वाटते. 

     वास्तविक पाहता अश्या मैत्रीचा या समाजाने अनुभव घेतला आहे. आणि यास मान्य ही केले आहे. द्रौपदी आणि कृष्णाची मैत्री. तिचा तो खरंच सखा होता, कृष्णसखा. तसा तर तो सगळयांचा सखा होता,आजही आहे,उद्याही असेल. अशी निखळ मैत्री कुठे पहायला मिळणार नाही. कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता मित्रत्वाचे नात्याने द्रौपदी ची मैत्री फुलली होती, फळली होती, कुणाला ती आक्षेपार्ह ही वाटली नाही. आजही असेच  आहे. केव्हाही त्याला मनापासून साद घातली की त्याचा प्रतिसाद असतोच असतो. कृष्णसखा! त्यानेच हा पायंडा पाडला, तरीही आज समाजात कोणाला स्त्री पुरुष यांच्यामध्ये निखळ मैत्री असू शकते यावर विश्वास बसत नाही की विश्वास ठेवायचा नाही हे कळत नाही.

     आता असे वाटायला लागले आहे की कृष्णसख्याने पुन्हा अवतार घ्यावा आणि पुन्हा एकदा त्याने सगळ्यांशीच मैत्री करावी.


रसिका राजीव हिंगे