Sunday, 31 January 2021

अंत्य ओळ ललित लेखन


 अंत्य ओळ ललित लेखन


 *तो वळला आणि त्याच्या डोळ्यातून दोन अश्रू खळकन ओघळले....* 

  गंगेच्या पाण्यात उभे राहून उगवत्या सूर्याकडे तोंड करून राधेय सूर्याला अर्घ्य देत होता. अर्घ्य देऊन झाल्यानंतर नेहमीच्या सवयी प्रमाणे तीराकडे न पाहता दानवीर कर्णाने विचारले "कोणी याचक आहे का?" असे विचारल्याबरोबर हुंदका ऐकू आला. तो ही स्त्रीचा. तिला अभय देत "आपली इच्छा सांगावी पूर्ण करण्यात येईल," असे आश्वासन दिले राधेयाने. 

     "तू हवा आहेस कौंतेया. तू माझा जेष्ठ पुत्र आहेस" असे म्हणून राजमाता कुंती आपली ओळख सांगते. आणि  जेष्ठ पांडव असल्याचे सांगते. ऐकून कर्ण क्षणभर स्तब्ध झाला. काय आहे हा नियतीचा खेळ. ऐन युद्धा च्या वेळी मला माझे जन्मरहस्य सांगण्याचा हा प्रयत्न कशासाठी? असे विचार मनात येत असतानाच कुंतीने सारं त्यास समजावून सांगितले. कुंती एकीकडे बोलत होती आणि कर्णाच्या  डोळ्या समोरून गंगेत सोडून दिल्यापासून तर आतापर्यंत चा एकेक प्रसंग, अपमान सरकत होते. सुतपुत्र म्हणून हिणवणारी पांचाली दिसत होती.अर्जुन वधाची केलेली प्रतिज्ञा का फोल ठरावी? ज्या दुर्योधनाने मला आश्रय दिला, मानसन्मान दिला त्याला माझ्या स्वार्थासाठी सोडून द्यायचे! कसे शक्य आहे? कदापिही नाही.

     तू जर पांडवांना मिळालास तर जेष्ठ पांडव  म्हणून तुझा मान तुला मिळेल. हे वाक्य ऐकताच भानावर आला कर्ण.   क्षणाचाही विलंब न करता त्याने कुंतीला सांगितले," माते आता खूप उशीर झाला आहे. मला पांडव म्हणून जगणे शक्य नाही. व तू एक याचक म्हणून आली आहेस तुला रिक्त हस्ते कसे पाठवू.  सुतपुत्र राधेय तुला वचन देतो की, तुझे पाच पुत्र युद्धा नंतर ही पाचच राहतील. आणि उत्तरीय सावरत कर्ण गरम वाळूतून झपाझप चालू लागला. रथारुढ होण्याआधी त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातून दोन अश्रू खळकन ओघळले....


©️रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment