Tuesday, 30 June 2020

लाट

*लाट* ®️

निळी निळी *लाट* निळ्या सागरात
निळ्या नभा गवसणी, उंच उंच होत

निळी झुळूक धुंद निळ्याच किनारी
गंधाळली *लाट* निळ्या त्या सागरी

खळाळती *लाटा* सुरेल ऐकू गाज
निळी पैठणी ल्याली निळाच साज

पुनवेचा चांद पाहून उनाडते *लाट*
हर्षभरे धावत येई तीरावरी दाट

ओहोटीत *लाट* रुसुनी बसे आत
होते घुसमट तिची मनातल्या मनात

मनी साचले मळभ लाट देई फेकून
विरत जाई मागे रिक्त करीत मन

निळ्या *लाटेवरी* दिसे यशोदेचा कान्हा
राधेचा सखा अन देवकीचा ग तान्हा


©️रसिका राजीव हिंगे

Sunday, 28 June 2020

सहज सुचलं म्हणून... कृष्ण सखी द्रौपदी


      कृष्ण सखी द्रौपदी ही महाभारतातील असं व्यक्तिमत्व आहे की तितका जास्त विचार केला तितके जास्त तिच्यात
गुरफटत जायला होत.
महाभारतातल्या प्रत्येकाने कुठेतरी कपट केलेच आहे पण द्रौपदीने कधीच नाही अशी ती मानिनी,स्वाभिमानी होती. सौंदर्याची परिसीमा म्हणजे द्रौपदी. विपुल केशसंभार, विलक्षण सौंदर्य लाभलेलं. कुणालाही मोहिनी पडावी असे न भूतो न भविष्यती व्यक्तीमत्व.  द्रौपदी विविध नावांनी ओळखली जात होती. यज्ञातून आली म्हणून याज्ञसेना, द्रुपद राजाची कन्या द्रौपदी, पांचाल देशाची म्हणून पांचाली, सावळी म्हणून कृष्णा तर व्यास तिला मनस्विनी म्हणत असत.   प्रचंड बुद्धिमत्ता होती तिच्याजवळ. तिचे वाक् चातुर्य वाखाणण्यासारखे होते. युधिष्ठीर सम्राट असतांना त्याची सचिव होती पांचाली. सगळ्यांकडे तिचे लक्ष असायचे. कोमल हृदयाची द्रौपदी प्रसंगी कठोरपणे निर्णय ही घेत असे. इंद्रप्रस्थाचे सम्राज्ञी पद तिने लीलया पेलले होते.
इतकी सर्वगुणसंपन्न, द्रुपद राजकुमारी, बलाढ्य कुरुवंशाची कुलवधू,  पाच अजिंक्य पांडवांची सम्राज्ञी, पाच पुत्रांची माता असूनही एखाद्या सामान्य दासीसारखे विटंबनेचे प्रसंग तिच्यावर यावेत यापेक्षा दैवदुर्विलास तो कोणता?
स्त्रीला गृहीत धरूनच पुरुषाची  निर्णय घेण्याची वृत्ती ही फार पुरातन आहे. पांचाली ला न विचारता द्यूतात पणाला लावले जाते. सगळंच हरलेले पांडव निष्प्रभ झालेले, पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर यासारखे रथी महारथी कुरु सभेत दुर्योधनाने मांडलेल्या या अनाचारी कृत्यास त्रयस्थ म्हणून पाहण्या शिवाय काही करू शकत नाही.  महाराणी गांधारी, राजमाता कुंती सुद्धा हतबल होतात. तिचा सखा कृष्ण तिच्या मदतीला येतो. जणू चिंधीचे ऋण फेडण्यासाठी.
वनवासात जटासूर राक्षस तिला पळवून नेले त्यावेळी भीमाने द्रौपदीला राक्षसाच्या तावडीतून सोडवून आणले. जयद्रथाने तिला पळवले त्यावेळी अर्जुन आणि भीमाने जयद्रथाला पकडले. अज्ञातवासात विराट राजाच्या सभेत त्याचा मेव्हणा किचकाने तिला लाथ मारली, अभिलाषेने पाहिले, तिचा अपमान केला यावेळी ही भीमाने तिचे रक्षण केले आणि किचकवध केला. किती आणि कसे हे प्रसंग झेलत होती याज्ञसेना. अग्नीचे रुप ल्यालेली ही अग्निशिखा असूनही कसले भोग भोगत होती. तरीही ती डगमगली नाही. येईल त्या प्रसंगाला सामोरे जात राहिली. स्वतःचे पाच ही पुत्र युद्धात मारले गेले, तिच्या  रक्तांचा एकही अंश या पृथ्वीतलावर शिल्लक राहिला नाही याचे दुःख उराशी बाळगूनच पांडवासवे स्वर्गारोहण करती झाली.
मी सुरुवातीलाच म्हणाले की पांचालीचा जितका जास्त विचार केला, तिला वाचत गेले तर तिच्यात जास्त गुरफटले जातं. असे कोणते जन्मजन्मांतरीचे कर्म होते तिचे  की तिच्या वाटेला असे जीणे यावे.  समस्त स्त्री सामर्थ्याचे ती प्रतिनिधित्व करत होती, की ही कलियुगातील वास्तवता होती याचा विचार करता करता मन निःशब्द होत. हे केवळ तिचा कृष्णसखा जाणत असेल असे मला वाटतं.....

रसिका
05.06.2020

संयम



काय आहे संयम हा
कसे रूप आहे याचे
भाष्य सारे का करिती
आपुल्या अनुभवाचे

संयम आणि दातृत्व
बाजू दोन एक नाणे
त्यागाचेच रूप जणू
आहे ऐसेच जगणे

जगणे हे संयमाने
फळे मधुर मिळती
मनावरी संयम हा
येई जोडत नाती

रागावरी संयमाने
मात करावी सहज
ठेवा जिभेवरी याला
सुदृढता लाभे आज

राग,लोभ,मोह,मद
मत्सरासी ही टाळावे
संयमाने शांतपणे
जीवनास जगवावे

आहे बहुत सामर्थ्य
एका या संयमात
जेव्हा सुटे बेभान हा
सारे लया निमिषात

रसिका

Saturday, 27 June 2020

चित्रकाव्य



ही निरागसता, हास्य खळाळते
घेऊनिया येते, बालपणी।
दडला हृदयी, निर्व्याज आनंद
एकमेका साद, देती बाळे।
काय आहे मनी, यांच्या साठलेले
मिटुनी घेतले, लोचनेही।
मजुरी कराया, मायबाप जाती
बाळे बागडती, वाटेवरी।
कोणास पाहिले,कोणास हासती
पाहुनी श्रीमंती, दुःखीतांची।
रूप हे साजिरे, सुंदर गोजिरे
तुझे आहे का रे, परमेशा।
मला ऐसे वाटे, विठ्ठल रुक्मिणी
आले हो अवनी, धावूनिया।
म्हणे विठुराया, आषाढ मासात
भक्त पंढरीस, कसे येती।
जाऊ गे आपण, रूप पालटून
पाहू भक्तजन, धरेवरी।
म्हणोनिया आले, धरेवरी देवो
निरागस भावो, बालरूप।
आले सृष्टीवरी,  बसे वाटेवरी
मूर्ती ती हसरी, पाहे गे मी।

रसिका राजीव हिंगे








भक्ती


विचारत फिरे,  वाचले चरित्रा
भक्तीच्या त्या सूत्रा,  कोण सांगे।
काय आहे भक्ती, न कळे मज
सांगा कुणी गुज, काय असे।
कोण आहे भक्ती, कुठे ही राहते
कशी हो दिसते, सांगा मज।
ऐक ना एकदा, जाहली किमया
भेटे गुरुराया, मजला हो।
विचारले त्यांसी, सांगा भक्ती काय
माय गुरुराय, विस्तारोनी।
ऐक म्हणे बाळे, अंतरंगी भक्ती
निष्ठेची ती सक्ती, सदा असो।
नवविधा रूपे, आहेत भक्तीचे
श्रद्धेवीण साचे, सापडेना।
ईश्वरा भेटण्या, आहे तीन मार्ग
कर्म,भक्ती,योग, संसारी या।
मार्ग वाटे सोपा, करण्या कठीण,
साधाया साधन, भक्तीचे या।
उद्धव ही सांगे, भक्तीची लक्षणे
पूर्व सुकृताने, प्राप्त होय।
कर्म करी नीट, लागे मग लळा
भक्तीचा तो मळा, बहरेल।
ठावे आहे तुज, नारदाची भक्ती
कैसी आहे युक्ती, सांगितली।
ऐसी आहे भक्ती, सांगितली बाळा
तूचि करी ताळा, वाटे आता।
प्रेमभरे दाटे, अश्रू नयनात
कळले क्षणात, भक्तीसूत्र।
गुरुमाये तुझे, लेकरू मी सान
भक्ती आचरण, देई शक्ती।

रसिका राजीव हिंगे

Wednesday, 24 June 2020

पाऊस



धरेवरी सुगंधाचे                                                      सुरू जाहले सोहळे
अवकाशी लगबग
मेघ करीती सावळे

झरझर येती धारा
जांभुळले नभांगण
सजविती धरणीस
वरुणाचे सारे गण

रिमझिम बरसत
धारा आल्या कोसळत
सरीवर सरी येती
हुंदडत बागडत

वसुंधरा ही हर्षली
सानथोर सुखावले
आनंदला बळीराजा
चराचर समृद्धले

लतावेली बहरल्या
जाई जुई शुभ्र फुले
गुलाबाचे ताटवे ही
जागोजागी गंधाळले

पावसाच्या सरींसवे
उनाडला गंध सारा
भक्तिभाव जागवीत
येई सुगंधित वारा

मखमली हिरवाई
शोभे सावळ्या भूवरी
भासे आता ही धरणी
सौंदर्याची खाण खरी

रसिका राजीव हिंगे

जीवन सुंदर आहे...



वाटे पाखरासम गगनी घ्यावी भरारी
जीवन सुंदर आहे,कशास हव्या तक्रारी

माणसाने माणसास असे समजून घ्यावे
जीवन सुंदर आहे, नकोत ग हेवेदावे

नात्यांचा गोफ विणावा व्हावे संवादन
जीवन सुंदर आहे, कसे हे मानापमान

आकाश झुकले आहे दूर क्षितिजावरती
जीवन सुंदर आहे, नम्रता अपुली संस्कृती

त्याग,मैत्री,कर्म जाणत कर्णासम व्हावे
या सुंदर जीवनात दान मात्र करत जावे

जीवन सुंदर आहे जगून घ्यावे संसारी
नामस्मरणाचा नाद तारेल भवसागरी

रसिका राजीव हिंगे

सांजवेळ


निळ्याशार आभाळात सांज फुलून आली
लाजरी सांजवेळ चंद्रकळा लेऊनी आली

सोनसळी आभा ऐसी की लज्जेची लाली
गवताची पाती थरथरे लाली गाली आली

क्षितिजाला येऊन भिडले चमचमते अंबर
भामिनीचा पारिजात टपटपे जणू भूवर

चवथीची चंद्रकोर करते सौंदर्याचे शिंपण
जांभुळल्या नभास देते चांदण्याचे आंदण

सांज ही बघतांना तुझ्या मनी काय आले
माळरानी  उभा आहेस काय तुज दिसले

निसर्गाच्या सौंदर्याची पाहुनिया ही उधळण
हात जोडले नतमस्तक झाले शांत हे मन

रसिका राजीव हिंगे

Thursday, 11 June 2020

भास



भवसागरी जगतांना
मायेचाच आभास आहे
तूच एक सत्य आहे
बाकी सारा भास आहे
***********************
  वृक्ष भामेच्या अंगणी
  दरवळ रुक्मिणी  दारी
  कृष्णा हा भास आहे की
  आहे तुझी माया सारी
*****************************
   भोवताली चांदण्यांची रास आहे
   तू जवळ आहेस की आभास आहे
   संथ वाहे गार वारा चांद राती
  साथ आहे साजणी हा भास आहे               
  *****************************
 हिरवाई चा उत्सव चाले
 सुंदर सावळ्या भूवरी
 वास्तव आहे नसे भास ग
 आल्या पावसाच्या सरी
************************
भास सारे व्यापून आहे
आयुष्य हे मानवाचे
रसिकराज विनविते
तंत्र जपा माणुसकीचे
****************************

     रसिका

अशीच आपुली भेट घडावी



नभांगणी चांदणे फुलावे
रजनीने चंद्रकळा ल्यावी
अन चंद्राने गगनी यावे
रातराणी ही गंधळावी
अन्
अशीच आपुली भेट घडावी

जांभुळल्या मेघांची या
सर हळूच बरसून जावी
गंधित सावळ्या भूवरी
स्वप्ने सुखाचीच पहावी
अन्
अशीच आपुली भेट घडावी

निळ्याशार या आकाशात
जलदांची दाटी व्हावी
सरसर यावी संततधार
सृष्टी सारी हरखून जावी
अन्
अशीच आपुली भेट घडावी

हिरवाईचा लेऊनी शालू
धरा अशी नटूनी यावी
चराचरी हो आनंदवन
चैतन्याला जाग यावी
अन्
अशीच आपुली भेट घडावी

आषाढाची मोहक सर ती
सानथोरा भिजवुनी जावी
विठुचा गजर जागवीत
पंढरपुरची वारी यावी
अन्
अशीच आपुली भेट घडावी

©️रसिका

अशीच आपुली भेट घडावी



सुटत चाललाय बांध आता
वाटे सारी बंधने झुगारून द्यावी
नको ती संचारबंदी अन विलगीकरण
सगळंच थांबलं एकाजागी.
आणि ते देऊळ बंद
कुणी विचारत नाही,  का केलं
सगळे हतबल.
कोण तो फुसका चीनचॅन
एक विषाणू सोडून देतो
आणि सगळं कालचक्र थांबवतो.
तुझ्या लक्षात आलं का देवा
वाटतं रे तुझा सहवास घडावा
गुरुराजाचे पण दार बंद
सगळीकडेच बंद बंद.
हे मी तुला विचारते आहे
काय चाललंय काय आहे
असंच जर चालू राहिले
तर सगळीकडे अवकळा पसरेल
आमच्या आराध्याची
आम्ही आराधना कशी करावी
मान्य आहे रे जळी स्थळी
काष्ठी पाषाणी चराचरी
तूच भरून आहेस
पण तरीही तू भेटावास
म्हणून म्हणते एकदातरी
तुझी माया मज दिसावी
आणि
अशीच आपुली भेट घडावी.

रसिका©️

Tuesday, 9 June 2020

राजहंस










राजहंसा ऐट तुझी
नीर क्षीर बुद्धी तुज
दूत आहेस प्रीतीचा
चोच असे तुझे गुज

डौलदार चाल तुझी
राजहंस तुज म्हणती
पाही वळूनी उगाच
कोण येतसे मागुती


देई संदेश प्रीतीचे
पराक्रमी नलराजा
रूपवती दमयंती
सांगे सारे हंसराजा

तळ्यातली शुभ्र फुले
सोडोनिया कुठे आला
हिम नगरी कोण रे
काय सांगावया आला

तुज भेटले तिथे का
प्रेमवेड राजा राणी
मार्ग दाखवी काढुनी
पदनक्षी हिम रानी

रसिका







# राजहंस #पक्षीराजहंस #राजहंसकाव्य 

Monday, 8 June 2020

मृगजळ

                                                         


कुणी पाहिले आहे का
कैसे आहे मृगजळ
भास की आभास हा
आहे मनीची खळबळ

धावे पारधी रानात
तिच्या मागुती सावध
कळे ना हे मृगजळ
फसताच हो पारध

किती अशा सुकोमल
आहे सुंदर हरिणी
जागोजागी मृगजळ
त्यांस कळावे जीवनी

जीवनाचा सारीपाट
नसे साधा नि सरळ
शोधा पायवाटेवरी
चालतांना मृगजळ

मांदियाळी ती संतांची
सांगे सकळ जनांसी
माया मोह मृगजळ
स्मरा आता विठ्ठलासी

नामजप दिनरात
हेच जगण्याचे बळ
नको मायेची झापड
आहे सारे मृगजळ

रसिका






सहज सुचलं म्हणून....तिन्हीसांजा





     
     


    तिन्हीसांजा म्हणजे कातरवेळ, मनाला अनामिक हुरहूर लावणारी सांजवेळ. सतत  बाहेरच्या दाराकडे जाणारी नजर , कुणाची तरी वाट पाहणारी शामवेळ. आकाशात  सांज  का खुलते? सुर्यदेवाला निरोप देतांना जाता जाता तिच्या गालावर हळूच टिचकी देऊन सूर्यदेव गेले म्हणून लज्जेची ही लाली आहे की चंद्राची येण्याची वेळ झाली आहे,त्याची वाट बघतांना त्याच्या आठवणीत मोहरून आलेली अभिसारिका आहे. शामरंगी ढगांचे पुंजके नभात गोळा करून रासक्रीडा करणारी राधा आहे. सांज कुणीही असली तरी खूप मोहक आहे,वेड लावणारी आहे. हुरहूरणारी आहे.
सांजवेळ! प्रियकराला प्रेयसीने भेटण्याची वेळ, चिमण पाखरांची घराकडे परतण्याची वेळ, देवाजवळ शांतपणे तेवण्याऱ्या दिव्या च्या ज्योतीसम प्रसन्नतेची उधळण करणारी सांजवेळ. संस्कारांचे बीज पेरणारी सांजवेळ.
गोठयात   वासराला प्रतिसाद देण्यासाठी धुळीत हरवलेली धुरकट सांज ही वात्सल्याचे प्रतीक. कधी विरहातल्या विरहिणीची ती सखी.
तर कधी प्रीतीचा साज लेऊन हळुवार पदन्यास करीत धुंद नृत्याविष्कार करणारी कामिनी म्हणजे सांजवेळ.
किती रूप ह्या सांजवेळेची. मनी जसा विचार तशी ही सांजवेळ असं मला वाटतं...

रसिका