Saturday, 29 April 2023

अखजी....

 अखजी....


     ठायी ठायी शिशिराची पानगळ सरली अन सळसळत्या पानांचे पैंजण लेऊन, जणू हिरव्या पाचूने सालंकृत होऊन सृष्टीचे रूप बहरले. कोवळे कोवळे गुलाबीसर पानांचे देठ कोवळी सुगंधित हिरवाई लेऊन उभे ठाकले, वसंतांच्या  स्वागतास. ही हिरवाई शुभकारक, मनमोहक, आकर्षक आणि सृजनात्मक. असा हा ऋतुराज म्हणजे वसंताची चाहूल लागली की शांताबाईची धावपळ सुरू व्हायची उन्हाळी कामं उरकण्याची. काय करू नि काय असे होऊन जायचे शांताबाईंना.

     शांताबाईंच्या माहेरी पण खूप मोठं खटलं म्हणजे कुटुंब होतं. एकत्र कुटुंब असल्याने घरात वीस पंचवीस लहान थोर होते. सगळ्या घराला शांताबाईंच्या काकांनी एकसंध बांधून ठेवले होते.  कुटुंबातल्या प्रत्येक जीवावर त्यांचं जीवापाड प्रेम होत. शिक्षणासाठी मुलं मुली असा भेदभाव न करता शिक्षण घेणं गरजेचे आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्या काळात मुलींच्या शिक्षणाची पण त्यांनी चोख व्यवस्था केली होती.  शांताबाई घरात सगळ्यात लहान होत्या. समंजस होत्या. बारावी पास झाल्यावर पुढे शिकायला तालुक्याच्या गावी जायचे असे ठरविले होते शांताबाईंनी. पण म्हणतात न आपण जे ठरवतो त्याला ईश्वराची पण साथ हवी तरच संकल्प पूर्ण होतात. त्यांचे ही तसेच झाले. कौंडण्यपुर च्या कुलकर्णी चे स्थळ शांताबाई साठी आले. मुलगा एम.एस.सी. कृषीविज्ञान झालेला असून गावातच घरची शेती सांभाळत होता. सगळचं मनासारखे होते, नाही म्हणायला जागा नव्हतीच. महेश त्याच्या आईवडील यांचे बरोबर शांताला पहायला आला होता. योग जुळून आले की सगळ्या गोष्टी अनुकूल होतात. शांता देशपांडे ची शांता कुलकर्णी होऊन तिने उंबाऱ्यावरचे माप ओलांडले. शिवशक्ती आहेत हे दोघे असे म्हणून महेशच्या आजीने नव परिणीत जोडप्यावरून मीठ मोहरी ओवाळून टाकली. शांताबाईंचे सासर पण मोठे होते. इथेही एकत्र कुटंबपद्धती होती. घरातली मोठी सून होण्याचा मान शांताबाईंनी मिळाला होता. आजेसासू आणि सासूबाईंच्या मदतीने शांताबाईंनी घराच्या जबाबदाऱ्या हळूहळू उचलायला सुरुवात केली. माहेरची सुसंस्कृत संस्कारांची शिदोरी प्रत्येक वेळी कामं करतच होती. बघता बघता शांताबाई घरातल्या सर्वेसर्वा झाल्या. त्यांच्याशिवाय घरात कोणाचेही पान हलत नसे. त्या पण सगळ्यांचे हौसेने आणि प्रेमाने करत होत्या. सगळ्या लेकीबाळींचे माहेरपण उत्साहाने करत होत्या. कुलकर्णी घराण्याच्या परंपरा, सणवार, लग्नकार्य सारेच कसे त्यांच्या अंगवळणी पडले होते. 

     दरवर्षी प्रमाणे सगळ्या माहेरवाशिणी चैत्रात जसा वेळ मिळेल तसे येऊन जात. प्रत्येकी सोबत उन्हाळ्याचे वाळवण, घरच्या कैरीचे,लिंबाचे लोणचे, पापड, मसाला सगळचं देत होत्या. त्यांच्या नणंदा, पुतण्या आणि लेक दरवर्षी अक्षय्य तृतीया आली की आठ दहा दिवस माहेरी येत असत. विदर्भात अखाजी म्हणजे अक्षय्य तृतीया हा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.

     शांताबाईचा उन्हाळी वाळवणं करण्यात दिवसच्या दिवस जात असे. शिवाय लेकिबाळी येणार म्हणून अंगात नवा उत्साह संचारला असायचा. अखजीला विशेष महत्व असतं ते चिंचवणीला. नवी चिंच निघाली असते. ती आधी आखजीला वापरायची असा अलिखित नियम. चिंच फोडण्यापासून तर ती मीठ लावून वाळवून साठवली जाते वर्षभरासाठी.  

     आखजीच्या आदल्या दिवशी घरात धांडे आणून ठेवायला गडी माणसाला सांगून शांताबाई पुरण शिजवायला बसल्या. या धांड्यावरच मांडा करायचा असतो. घागर किंवा करवा कुंभाराकडून आणण्यासाठी गावात धान्य घेऊन महेश गेला होता. धान्य देऊन घागर किंवा करवा आणण्याची परंपरा आजही गावात आहे आणि शांताबाई पण आपल्या घराची रीत निभावत होत्या. घागर ही स्वर्गस्थ पुरुषाचे  प्रतीक तर लहान करवा हे बाईचे प्रतीक. देवासमोर ते ठेऊन त्यांत पाणी भरायचे आणि झाकण म्हणून खरबूज ठेवायचे. त्याच्यासमोर पाने मांडायची.  पानावर वडे, भजे, कढी, नव्याने केलेले उन्हाळी वाळवण, पुरणाची पोळी किंवा मांडा, चटणी, कोशिंबीर, भाज्या, चिंचवणी असा विविध पदार्थांचा थाट दरवर्षी शांताबाई करत असत. मांडे करण्यात शांताबाई तरबेज होत्या. कणकेचा गोळा घेऊन त्यात पुरण भरायचे अन् हातावर वरती घेऊन गोल गोल फिरवत मांडा चांगला गोलाकार मोठा झाला की खापराच्या मडक्यावर शेकायचा. पाहूनच खायची इच्छा व्हायची घरातल्या सगळ्यांना. असं सगळं साग्रसंगीत झालं की सगळ्यांचे जेवणं झाली की शांताबाईंना  भरून यायचे. सासूबाईंनी दिलेला वारसा आपण नीट सांभाळू की नाही याची त्यांना काळजी वाटायची. पण सासरे म्हणायचे, तुझ्या सासूच्या मागे तू छान घर सांभाळते आहे. ती वर अगदी तृप्त होत असेल बघ. असे सासरे म्हणाले की शांताबाईंचे पापणकाठ ओलसर व्हायचे अन् कृतार्थ झाल्यासारखे वाटायचे.

     घरात माहेरवाशिणीचे हर्ष भरीत आवाज आणि नातवांचे बोबडे बोल ऐकल्यामुळे  घर हसत खेळत नाचत होतं. प्रत्येकीच्या घरचे वेगवेगळे किस्से ऐकून हास्याला जणू उधाण आले होते. अंगणातल्या बंगळी वर बसून आत्या भाच्या, बहिणी बहिणी, भाऊ बहिण यांच्या गप्पांना ऊत आलेला होता जणू. 

     आखाजी झाली अन् सगळ्या आपापल्या घराकडे जायला निघाल्या. जाताना प्रत्येकीचं समान वाढलेलं होतं. त्या सामना बरोबरच माहेरचे प्रेम, जिव्हाळा सोबत होता, भावाच्या डोळ्यातले पुन्हा लवकर ये ग असे भाव सासरची वाट धूसर करत होती, तर बाबांचे पुन्हा भेट होईल का ग हा प्रश्न घेऊन भरून आलेले डोळे साथ देत होते, मधून मधून येत जा ग असे सांगताना कर्तव्य कठोर शांताबाईंचा  डोळे पुसून ओला झालेला पदर मार्गात रामरक्षेचे कवच झाला होता.

     सगळ्या आपापल्या वाटेने निघून गेल्या अन् शांताबाईंना घर खायला उठले. पण लगेच पुढच्या वर्षी येतीलच न अखाजीला या विचाराने पुन्हा त्या उत्साहित झाल्या अन् पुढच्या अखजीचे स्वप्न मनात रंगविण्यात रमून गेल्या...


©️®️रसिका राजीव हिंगे 

     

     

     

लक्ष्मी ची किमया

 



     देव आणि दानवांचे युद्ध सुरू होते. या युद्धात दानवांचे पारडे जड झाले. तेव्हा दानव म्हणाले आपण समुद्रमंथन करू. देव तयार होईना. पण बृहस्पतीच्या सांगण्यावरून देव तयार झाले आणि समुद्र मंथन सुरू झाले. या मंथनातून चौदा रत्ने बाहेर आली. त्यापैकी एक रत्न म्हणजे लक्ष्मी. तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून प्रत्येकाला तिच्याशी विवाह करण्याची इच्छा झाली.  यामध्ये तपाचरणामुळे तापलेले क्रोधी ऋषीमुनी होते, ज्ञानवंत होते पण ते फारच आसक्त होते, काही थोर पुरुष होते, त्यागी होते पण त्यांना मुक्तीचा मार्ग माहित नव्हता, शौर्य होते पण काळावर मात करणारे नव्हते, सनकादिक होते पण त्यांनी आजन्म ब्रह्मचर्य पालन केले होते, मंगल गुण असलेले होते पण त्यांना लक्ष्मी विषयी आसक्ती नव्हती. दानव तर समुद्र मंथन विसरून गेले होते तिच्या सौंदर्यामुळे. हे सगळे तिच्या मागे होते पण तिने यापैकी कोणालाही वरले नाही. लांब ध्यानस्थ बसलेल्या षडेश्वर संपन्न श्रीविष्णू च्या गळ्यात तिने वरमाला घातली. कारण जो माझ्या मागे लागतो त्याच्या जवळ मी कधीच रहात नाही.  माझी आसक्ती ज्याला नसते त्याच्या पाठीमागे मी असते.  

     आज आपण पाहतो आहे सगळीकडे जो तो पैशाच्या मागे लागलेला दिसतो. आजची तरुण पिढी करीयर च्या मागे लागलेली आहे. सतत नोकरीची धरसोड करतात आहे. कारण जिथे पैसा जास्त मिळेल तिथे नोकरी करायची. त्यासाठी सगळ्याच गोष्टींवर तुळशीपत्र ठेवलं जातं याची जाणीव या तरुण पिढीला अजूनही होत नाही. वाटेल तशी मेहनत करून अमाप माया गोळा करतात, पण त्याचा उपभोग घ्यायला वेळ तर द्यायला हवे ना. एकवेळ उपभोग घेऊ नका पण घरातल्या तुमच्या नात्यांना तर वेळ द्यायला हवा आहे. तुमच्या आजूबाजूला जी सुगंधित फुले आहेत ती तुमच्या प्रेमाच्या पाण्याच्या सिंचना अभावी कोमेजली जातात आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उगाच पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करून आपली संस्कृती लयास जाते आहे. 

     आजकाल सरळ विद्या विभूषित पिढी म्हणते की पैसा खूप मिळतो म्हणून अमेरिकेत स्थायिक व्हावे. पण हे का कळत नाही आपल्या भरवशावर ही राष्ट्रे विकसित होतात आहे. पर्यायाने आपल्याच देशाची संस्कृती, ज्ञान या राष्ट्रांना विकसित करते आहे. जेवढे पैसे कमवावे तेव्हढेच गमवावे पण लागतात. कारण घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे काम केले तर शरीर नीट राहील का? शरीर सुद्धा एक यंत्र आहे असे समजले तरी त्यालाही मधून मधून प्रेमाची सर्व्हिसिंग करावी लागतेच. तुमच्या सोबत सात जन्म चालण्याचं वचन दिलेली तुमची सहचारिणी, ज्यांनी जन्माला घातले ते  आईवडील, जन्मभर पुरणार आहेत ती मुलं ही आहेत तुमच्या मनाची म्हणजेच पर्यायाने शरीराची सर्व्हिसिंग करणारे प्रेमाचे साधनं. फक्त लक्ष्मीच्या मागे लागल्याने आपण काय जमवतो आहे यापेक्षा किती गमवितो आहे हे पाहणे काळाची गरज आहे.

     आपले पूर्वज वेडे नक्कीच नव्हते. वरील कथा ही रूपकात्मक मानली तरी केवढा गर्भितार्थ भरला आहे यामध्ये. लक्ष्मीच्या मागे न लागता आपले कर्तव्य करत जर तिची पूजा मांडली तर तिच्या तेजामुळे, सौंदर्यामुळे ती घरदार उजळून टाकेल यात तिळमात्र शंका नाही...


रसिका राजीव हिंगे


समझोता गमोंसे करलो....



 मानवी जीवन असे अनुभवाची खाण

 सुख दुःखाचा फेरा, वर्म आयुष्याचे जाण

      जीवन म्हणजे काय तर दोन घडीचा डाव. तो कसा खेळायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे. माणूस जन्माला येतो तेव्हाच सोबत त्याचं संचित, प्रारब्ध आणि मृत्यू पण घेऊन येतो. जन्म आणि मृत्यू हे जरी आपल्या हातात नसले तरी जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास करताना क्रियमाण कर्म करण्याचा अधिकार आपल्याला असतो. सत्कर्म करत जायचे म्हटले तरी परिस्थिती कशी आहे  आणि आपली शक्ती किती आहे यावर अवलंबून आहे.

      आयुष्य आहे म्हणजे सुख आणि दुःख यांचा पाठशिवणीचा खेळ सतत चालत असतो. दुःखात माणूस होरपळून निघतो तर सुखात आनंदाच्या झुल्यावर झोके घेतो. असे असले तरी सर्वसाधारण दुःखाला कुरवाळत बसण्याची सवय असते माणसाला. कितीही मोठे संकट आले तरी त्याच्या सन्मुख होऊन त्याच्याशी लढता आले पाहिजे. हे केव्हा शक्य होईल, जेव्हा मनात सकारात्मक विचार येतील तरच. तशी सवय मनाला लावून घ्यावी लागेल. स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले होते सर्वधर्म परिषदेत बोलायला. वास्तविक पाहता त्यांना आमंत्रण नव्हते. पण या परिषदेत जायला कसे मिळेल यावरच ते सतत विचार करत होते. अपमान झाला त्यांचा, त्यांना तिथे जेवायला मिळाले नाही,पण स्वामीजी डगमगले नाहीत. संकटांशी दोन हात करण्याची त्यांची धाडसी वृत्तीच त्यांना सर्वधर्म परिषदेत घेऊन गेली. हातपाय हलवले की मार्ग दिसतात. जेवण मिळत नाही, तिथे कोणी ओळखत नाही, उपहासाने सगळे पाहतात आहे, हे कमी दुःख होतं का? पण सकारात्मक विचार आणि येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याची शक्तीच त्यांची ऊर्जा बनली होती. सांगायचा उद्देश हाच की दुःख तर येतातच पण त्याच्यावर मात करत आयुष्याची वाटचाल करत गेले तर आयुष्य खूप सुंदर आहे. 

      सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वता एवढे ॥

      तुकाराम महाराजांचे हे बोल हे अनुभवाच्या कसोटीवर घासून तपासून आलेले आहेत. आयुष्यात सुख कमीच आहे, त्यामानाने दुःख जास्त प्रमाणात आहे. असे असले तरी संतांचे वचन ध्यानात ठेवावे, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत गेले तर दुःखाची झळ कमी जाणवेल. जे जे दृश्य आहे ते सगळे नाशिवंत आहे. त्यामुळे जन्म आहे म्हणजे मुत्यू अटळ आहे. कर्तृत्व असे असावे की मरणोत्तर कीर्ती रूपाने आपण जीवंत रहावे.

      मोठ्या ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या आधी सामान्यच होत्या. त्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला. दुःखांचे डोंगर त्यांच्यावर कोसळले. शिवाजी महाराज आग्र्याहून परत आले ते त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या बळावर. शंभू राजे मागे ठेऊन आलेले महाराज स्थितप्रज्ञ होते. कशाच्या बळावर? माझं बाळ माझं बाळ म्हणत ते रडत बसले नाहीत. त्यांचा त्यांच्या मनगटावर आणि स्वतः वर पूर्ण विश्वास होता. हाच विश्वास त्यांना बळ प्रदान करत होता. आईचा बोट धरून आलेला पाच सहा वर्षाचा बाळ स्वराज्याची स्थापना करतो म्हणजे हे सहजासहजी घडले नाही. पन्नास वर्षांची हयात पणाला लावली. 

      दुःख येतच राहतील. संकट येतीलच कारण ती येण्यासाठी च असतात. दुःखाला कुरवाळत न बसता त्यावर सकारात्मक विचारांनी आणि स्वतः वरच्या विश्वासाने मात करता आली पाहिजे. तेच जगणं होय. संघर्षाचे बाळकडू लहानपणीच पाजले तर पुढे दुःखाचा बाऊ केल्या जात नाही. माहित असतं काहीही झालं तरी आणि कोणतीही परिस्थिती उद्भवली तर त्याच्याशी लढण्याची ताकद आहे. दुःखाशी समझोता करण्यापेक्षा त्याला ओलांडून पल्याड गेलं म्हणजे कळतं आयुष्य किती सुंदर आहे. यालाच जीवन ऐसे नाव......


©️®️रसिका राजीव हिंगे


मी एक फुल.....

 मी एक फुल.....


शुभ्र फुले रेखित रचिला चांद तू जुईचा

म्हणालीस, "चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा !"

     कॉलेजमध्ये असल्यापासूनच अरुण दाते यांच्या गाण्यांची आवड होती. अगदी अभ्यास करतांना सुद्धा गाणे ऐकत असे. ह्या ओळी ऐकल्या की डोळ्यासमोर चित्र उभे राहायचे. फुले वेचताना मीच स्वतःला पहायची. त्याचा चंद्र मीच रेखत होते. जुईची फुले कशी दिसतात ते पाहिले नव्हते. पण चंद्रोत्सव म्हणजे पांढरी फुलं आहेत एवढेच कळले.  त्यावेळी काही आता सारखे मोबाईल अन् गुगल बाबा नव्हते पटकन इमेज पाहू कशी आहे ते. असो. पण लग्न झाल्यानंतर माझ्या अंगणात जुईची वेल होती. पूर्ण गच्चीवर चढवलेली, पावसाळ्यात संध्याकाळी शुभ्र झालेली, आणि मंद गंधाने अंगण भारलेले. फुल खूपच नाजूक पाच पाकळ्यांचे. पण मोहवणारे. संध्याकाळी शाळेतून आले की गच्चीवर जाऊन पदरात जुईच्या कळ्या तोडून आणायची. सासूबाई गजरे करायच्या. सगळं घर मंद सुवासाने दरवळायचे. देवाजवळ लावलेला दिवा अन् घरात मंद धुंद सुगंध. प्रसन्न वातावरण असायचे. यावेळी कोणी आले तर या गंधाचे कौतुक केल्याशिवाय राहत नसे. जाताना हातात एखादा गजरा असायचाच. मी तर खूप माळायची गजरे. कळी उमलण्या आधी गजरा अगदी छोटासा असायचा. मी म्हणायची पण, अजून मोठा करा. म्हणजे मला लावता येईल. पण कळ्या उमलल्यावर  शुभ्र फुले इतकी गोड दिसतात की हातात घेऊन मोरपिसा सारखे अलगद गालावरून फिरवून घ्यावे. छान मंदधुंद गंध. 

     माझं आयुष्य ही या जुईच्या फुलासारखे गंधाळलेले होते. येणारा प्रत्येक दिवस अन् सांज माझी मोहरलेली असायची. येईल त्याला मी गंध गजऱ्याच्या रूपाने आणि माझ्या स्वभावानुसार देतच होते. रोज नवीन रुप घेऊन येणारा सुगंध मला मोहवत होता. याचा अर्थ संघर्ष नव्हता असे नाही. पण माझे घर माझ्यासोबत होते.  त्यामुळे धग कमी जाणवली त्यावेळी. एकाच देठातून निघतात कोणत्याही फुलांच्या पाकळ्या. जुईच्या फुलांच्या पाकळ्या नाजूक असल्या तरी समर्पण करण्यात कुठेच कुचराई करत नाहीत. माझ्या घरात पण असेच सगळेच समर्पण करण्यात तरबेज होते. मग ते कोणतेही क्षेत्र असो. तसे बाळकडू आम्हाला लहानपणीच मिळाले आहे.

     जुई नाजूक आणि गंधित आहे. नाजूक असल्यामुळे असेल किंवा निसर्ग नियम आणि तिचे संचित, प्रारब्ध असेल पण ती लवकर कोमेजून जाते. सकाळी संध्याकाळ सारखा तिचा माज? हो माजच रहात नाही. निर्माल्य स्वरूप घेते हळूहळू ती. समर्पणाचा दरवळ संपला की संपले सगळे. माझ्या आयुष्याशी किती जुळलेली आहे  ही जुई.  सुगंधाचे दान देऊन झाले की, संपले सगळे. माझे आयुष्य ही असेच लवकर कोमेजून गेले. सुखाच्या हिंदोळ्यावर उंच झोके घेताना मला कधी असे वाटलेच नाही मी पडणार आहे. त्यावेळी माझ्या आयुष्याची वेल जुई सारखीच आधाराने जगत होती. पण जुईचे फुल वेलीपासून वेगळे झाले की लवकर कोमेजते, पण कुठल्यातरी आधाराने वेलीवरच असले की बराच वेळ टवटवीत राहते. मात्र आधार गेला की सगळचं संपतं. उरतो तो फक्त निर्माल्याकडे जाणारा प्रवास..... असं असलं तरी हा प्रवास सुखदायी कसा होईल याचाच विचार हे फुल कोमेजतांना करत असावं. कारण पुन्हा संध्याकाळी उमलायचे आहे. त्या तयारी साठी पुन्हा कळीचे रुप धारण करतं. मी कोमेजली तरी माझा उपयोग कोणासाठी किती होईल याचाच विचार मी करत आहे. आपला मार्ग आपण शोधायचा हा निसर्गाने घालून दिलेला पायंडा ही जूईची वेल आत्मसात करते. साधी फांदी लावली तरी जागा मिळेल तिथून बहरत वर येतेच येते. तसेच असावे आयुष्य हा आत्मबोध मला जुईने करून दिला. देत रहा आणि आनंद मिळवून सुखरूप हो हा संदेश जणू जुई सगळ्यांना देत आहे...

 निसर्गाचे रूप सुंदर समर्पणाचे भाव

 सुगंधाचे दान देणे हेच जगण्याचे नाव


रसिका राजीव हिंगे 

वेड....

 


"अगं, वेडबीड लागलंय का तुला? डोकं ठिकाणावर आहे का?, कुष्ठ रोग्यांची सेवा करायला जाते म्हणे बाबा आमट्यांच्या आश्रमात." 

",किती लोक आहेत ग तिथे. सगळेच करतात सेवा. त्यांचाही वाली असावा न कोणीतरी!"

"सगळं खरं आहे. पण सेवा करणे म्हणजे साधी गोष्ट नाही ग. वेड लागलं की जमतं हे सगळं. वेड लागले पाहिजे म्हणजे त्याचा ध्यास घ्यावा लागतो. वेळ जात नाही म्हणून मी सेवा करते हे म्हणजे मूर्ख पणाचे लक्षण आहे. कळलं!

   मी बारावीत असताना घरात घडलेला हा संवाद.  तेव्हाचं वय म्हणजे काय पुस्तक वाचलं अन् गेले भारावून. सोप्पं वाटत होत त्यावेळी. आपल्याला ही सगळे चांगलं म्हणतील, किती गुणाची ग असे म्हणतील हेच पुस्तकातले वाचलेले अंगी भिनलेले. मनात प्रसिद्धीचे मांडे करत बसली,अन् स्वप्नाच्या हिंदोळ्यावर झोके घेत होते. आता कळतंय वेड लागणं म्हणजे स्वतः च्या इच्छा आकांक्षा वर पाणी सोडणे. पूर्णपणे जी गोष्ट करायची आहे त्याचाच ध्यास घेणे. त्या कार्याला वाहून घेणे. झोका जितका उंच जातो तितके उंच त्या कार्याविषयीचे वेड हवे, अन् ज्या वेगात खाली येतो तसे प्रसिध्दी पासून लांब रहाता आले पाहिजे. तरच ते वेड खरे.

   गोपीना कृष्णाचे वेड होते म्हणजे त्या त्याच्यात सामावल्या होत्या. एका कान्हा शिवाय त्यांना काहीच दिसत नव्हतं. राधा तर बासरीचे सुर कानी आले की धावत निघायची कालिंदिच्या तीरावर. धावताना तिचा शेला झाडा झुडपात अडकतोय याचे ही भान नसायचे तिला.  आत्म्याचे परमात्म्याशी मिलन म्हणतात ते हेच. कबीर म्हणतात 

   कबिरा-कबिरा क्यूं कहे, जा जमुना के तीर। 

   एक गोपी के प्रेम में बह गये कोटि कबीर॥

 याला म्हणतात भक्तीचे वेड. निर्गुण निराकाराचे सगुण साकार रुपात वेड लागले म्हणजे भक्तीचे बीज अंतरंगात रुजले असे म्हणावे लागेल. 

    देश स्वतंत्र व्हावा, म्हणून अहोरात्र इंग्रजांशी लढा देणारे क्रांतिकारक वेडे होते. स्वतः चा जीव तळहातावर घेऊन लढत होते. देशभक्तीचे वेड लागले होते. कोणत्याही परिस्थितीत इंग्रज सरकारच्या कारनाम्यास बळी पडायचे नाही हे ठरवूनच वागत असत. जीव गेला तरी बेहत्तर पण हार मानायची नाही. सावरकरांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली तेव्हा न डगमगता म्हणाले होते, हे सरकार तोपर्यंत टिकेल तरी का? कसलं धाडस हो हे. आपल्याच भारताचे सुपुत्र. वेड लागले होते स्वातंत्र्याचे म्हणून आजही ते अजरामर आहेत. तुम मुझे खून दो, मै तुम्ही आझादी दुंगा असे म्हणत नाठाळ इंग्रज सरकारच्या विरुद्ध आवाज उठविणारे सुभाष बाबू, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे भर न्यायालयात जाब विचारणारे लोकमान्य टिळक ही सामान्य व्यक्तिमत्वे असामान्य झाली कारण ते ध्येयवेडे होते.

    सर्व सामान्य माणसाला जगताना कितीतरी संघर्ष करावा लागतो. वेड पांघरून पेडगावला जाणारे महाभाग असतातच ठायी ठायी. खोट्या आशेवर ठेवणारे हे खऱ्या अर्थाने वेडे असतात. यांच्या या वागण्यामुळे साधा सज्जन माणूस भरडला जातो. होरपळून निघतो.

   म्हणूनच चंद्रशेखर यांना ही चारोळी लिहविशी वाटली असेल...

    इथे वेडे असण्याचे

    खूप फायदे आहेत

    शहाण्यांसाठी जगण्याचे

    काटेकोर कायदे आहेत


रसिका राजीव हिंगे 

  

  

Thursday, 13 April 2023

शब्दावाचून कळले सारे...


शब्दांचाचून कळले सारे


कसे कळेना तुला पाहता भावबंध हे जुळून आले

या हृदयीचे त्या हृदयासी शब्दावाचुन सारे कळले ll धृ ll 


शीतल वारा अवतीभवती तव प्रीतीचे गात तराणे

कडेकपारी डोंगरमाथा सांगत फिरतो तुझे बहाणे

कशी सावरू लाज बावरी वदनावरती गुलाब फुलले

या हृदयीचे त्या हृदयासी शब्दावाचुन सारे कळले ll 1 ll 


निरोप द्याया कुणास सांगू गवाक्षात मग कपोत दिसला

राजहंस तो येई पुढती पाठवू मेघ जलद भारला 

आकळेना ग काय जाहले मन वेडे का  पुढे धावले

या हृदयीचे त्या हृदयासी शब्दावाचुन सारे कळले ll 2 ll 


राधा झाले जीवन गोकुळ जणू भासतो कृष्णसखा मज 

वरमाला ही अधीर झाली हळूच बोले सावधान मज

तुझ्यासवे मी चालत आले सप्तपदीची शुभद पावले

या हृदयीचे त्या हृदयासी शब्दावाचुन सारे कळले ll 3 ll 


सौभाग्याचा चुडा शोभतो मेंदी भरल्या हातावरती

शकुनाची गे हळद लागली उजळून निघे गोरी कांती

संभ्रम कैसा मनी दाटला उंबऱ्यावरी मी अडखळले

या हृदयीचे त्या हृदयासी शब्दावाचुन सारे कळले ll 4  ll 


रसिका राजीव हिंगे 


ब्रह्म सावळे

 



बघुनी पुढती कान्हा सखये

लाज सावरी नजर बावरी

गुलाब कलिका अडविती वाट

 परी खुणावे धुंद बासरी


पैंजण पायी नादत मंजुळ

शीळ वाजवी शीतल वारा 

अधीर जाहली अभिसारिका

पाहण्यास गे नंद कुमारा 


झाले तराणे सारे बहाणे

कालिंदीच्या तीरावरती

येउन अधरी सूर थबकले

फेर धराया अवतीभवती


घट पाण्याचे कुठे विसरली

झाली कैसी बाधा तुजला

का भरे घागर आनंदाची

ब्रह्म सावळे भेटे तुजला


©️®️रसिका राजीव हिंगे 







रसग्रहण

  




मृणालिनी  कानिटकर जोशी यांची माझी मराठी ही कविता मराठी भाषेवरील प्रेमातून लिहिली आहे. मराठी भाषेला मातृत्वाच्या पदावर विराजमान करून तिच्या ऋणातून मुक्त व्हायचे नाही. मराठी भाषेचे विविध अलंकारांनी कवयित्री ने मातेला सजविले आहे. सालंकृत मराठी भाषेचे वर्णन करताना कवयित्री च्या प्रतिभेला बहर आलेला जाणवतो. तिची थोरवी गातांना मराठी भाषा लेकुरवाळी आहे हे सांगायला कवयित्री विसरत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी अमृताते पैजा जिंके असे मराठी भाषेची थोरवी गातांना म्हंटले आहे याची आठवण होते ही कविता वाचतांना. मराठी भाषा म्हणजे अमृत आहे, जो बोलेल,शिकेल तो भाग्यवंत आहे असे कवियत्रीने निर्वाळा दिला आहे. विद्यार्थ्यांना ही कविता उद्बोधक आहे ....

रसिका राजीव हिंगे

चित्र ललित - सगुण साकार

 



     विश्व निर्मितीच्या आधीपासून असलेला तू निर्गुण निराकार. तुझं रुप कसे असेल हा अनादी काळापासून निर्माण झालेला प्रश्न किंवा जिज्ञासा. एवढं मात्र खरं की तू मनभावन आहेस. तुझ्या भक्ताला तुझं जे रूप भावतं तेच तो पुजत असतो. तुझ्या भक्तांसाठी तसचं रुप घेऊन तू सगुण साकार रुपात अवतरतो. अवतार म्हणजे खाली येणे. किती भक्तवत्सल आहेस तू विश्व निर्माता तरी कमीपणा घेतोस अन् भक्तांसाठी अवतरण करतोस.

     तुझं ते शांत रुप, जे संतांनी वर्णिले आहे. सुंदर ते ध्यान म्हणत तुला आळविणारे सगळेच तुझ्या पायी लिन होतात. तुझं ध्यानमग्न रुप डोळ्यासमोर येतं अन् त्यातच हरवून जायला होतं. शांत, सोज्वळ भाव, ब्रह्मानंदी लिन झालेले सात्विक भाव चेहऱ्यावर उमटतात. किती अवतार घेतो. प्रल्हादासाठी अक्राळविक्राळ नरसिंह रुप पण घेतलेस. पण तुझे खरे भक्त नाही घाबरत बरे कशाला. तुझा श्रीराम अवतार म्हणजे तर आदर्शांची नियमावली ठरली. सावळ्या रामाचे रुप असेच शांत, सात्विक, निर्मळ. देवा, तुला माहित आहे आम्हाला मानव रुपात तू जन्माला घातलेस तेव्हा सोहम म्हणणारा जीव लगेच बाहेर आल्याबरोबर कोहं म्हणायला लागला तरी तू रागवला नाहीस. शांतपणे ठीक आहे आता द्वैत मानतो आहेस न पण जन्मापासून तर मृत्यू पर्यंत वेळ देतो मानवा, या प्रवासात तू अद्वैता पर्यंतचा प्रवास कर आणि माझ्यात लिन हो. फक्त मानव जन्मच असा आहे की ज्याला तू बुध्दी प्रदान केली आहे. पण आम्ही इतके कृतघ्न की सगळं करतो पण तुला विसरून. तुझ्या आश्रयानेच प्रपंचातील कर्तव्ये पार पाडली तरच तुझ्या चरणाचा लाभ होतो. सगळं कळतं रे पण आचरण नाही होत. षडरिपुंचा इतका घट्ट पाश आवळून घेतला आहे न की त्याच्या पल्याड काही दिसतच नाही. तरीही तू येतोस तुला साद घातली की प्रतिसाद द्यायला. पण कोणत्या रुपात येशील हे मात्र कळत नाही. कारण ती दृष्टीच आम्ही जागवली नाही.

     तुझा श्रीकृष्ण अवतार तर फक्त दुष्टांचे निर्दालन आणि सुष्टांचे रक्षण यासाठीच होता. वेड लावणारं तुझं रुप अन् तुझ्या लीला. तुझ्या प्रत्येक शब्दामागे काहीतरी अर्थ आणि कारण दडलेले आहेच. अर्जुनाला निमित्त करून तू समस्त मानव जातीला गीता सांगितली. प्रत्येक जीव हा तुझाच अंश आहे, जो मला भजतो त्याचे योगक्षेम करण्याची जबाबदारी माझी आहे असे तू सांगितले तरीही आम्ही तुला आमच्या सवडीने भजत असतो. ही भक्ती नाही हे तू गोपिंच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. भक्ती कशी तर गोपींनी केली ती भक्ती. पण पालथ्या घड्यावर पाणी असे आमचे सुरू असते. केलेलं कर्म मला अर्पण करा, फळाची आशा करू नका, मी आहे तुमच्यासाठी  असे वारंवार सांगत असतोस, भावाचा भुकेला तू. खल प्रवृत्तीच्या लोक जरी मला अनन्य भावाने मला शरण आले तरी त्यांचे कल्याण करेल असा निर्वाळा देतोस.

     तुझे ते चरण कमल जिथे दृष्टी जरी गेली तरी तू कल्याण करतोस, तू धारण केलेला पितांबर, तुझे नाभिकमल ज्यातून ब्रह्म निर्माण होऊन प्रकृतीच्या साहाय्याने सृष्टी निर्माण करणारा, तुझ्या गळ्यातील वैजयंती माला जी कधीच निर्माल्य होत नाही, तुझ्या वक्षावरचे वत्सलांच्छन म्हणजे तर तुझ्या प्रेमाचे कोणते रूप कळत नाही. तुझ्या शुभ्र दंतपंक्ती, तुझे अधर ज्यावर कधी बासरी विराजत होती, तुझे राजीव लोचन ज्यात अपार कारुण्य, प्रेम, भरले आहे, चेहऱ्यावर सात्विक, निर्मळ, तेजस्वी भाव, विशाल भाळ, मस्तकी खोवलेले मोरपीस, तुझा रत्न जडीत मुगुट, बस हेच तुझं रुप मी पहावे अशी मला शक्ती दे, याच रूपाचे ध्यान करावे, याच रूपाचे नाम घ्यावे असे बळ दे मला.. हे परमात्मा, यापरीस मी काय मागू शकते? 


रसिका राजीव हिंगे 

#rasraj#परमात्मा#सगुण साकार #


     


Tuesday, 11 April 2023

रसग्रहण

 वैभव जोशी यांच्या कबीर या गझलेचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न .....


मनात ओंकार नाद जागावयास थोडा उशीर झाला

जसा जसा जागला तसा रंध्र रंध्र माझा फकीर झाला

कधीच नाही सुटावयाचा असा कुठे मोहपाश आहे

मलाच ती गाठ शोधण्याचा कधी पुरेसा न धीर झाला.

असे कसे जाणले न मुक्ती सुखासुखीही मिळून जातो

सहज तुझे नाव घेतले, श्वास श्वास हा बेफिकिर झाला

पदोपदी भास होत आहे, जणू तुझा स्पर्श होत आहे

सदेह भेटायला तुला भक्त हा खरोखर अधीर झाला आहे.

मला न पर्याय राहिला, लेखणीस केले तुझ्या हवाली 

तुला न पर्याय राहिला, शब्द शब्द माझा कबीर झाला”


वैभव जोशी


रसग्रहण


वैभव जोशी त्यांच्या कबीर या गाझलेतून स्वतः च कबुली देऊन मोकळे झालेत. मी माझ्या आयुष्यात मनाच्या मोहपाशात इतका गुरफटलो की माझ्या मनात तू आहेस अन् त्याचा नाद होतोय, हे मी ऐकलेच नाही.  तो नाद मी  जागवला पण खूप उशीर झाला. मला ओमकराचा अनाहत नाद जेव्हा ऐकायला येऊ लागला तेव्हा माझे रोमरोम, माझे चित्त तुझ्या कडेच वळले.

असा कोणता मोह आहे या जगात सुटणार नाही. इथे त्यांना गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला केलेला उपदेश आठवला की काय असे वाटते. कारण अभ्यासाने सगळं प्राप्त होऊ शकतं, असं कोणतीच गोष्ट नाही की अशक्य प्राय आहे. माझाच अभ्यास कमी पडला असावा म्हणून तर या मोहाची गाठ सोडण्याचा धीर मी करू शकलो नाही.

काहीही न करता कधी मुक्ती सुखासुखी मिळते का असा प्रश्न विचारून कवी ईश्वराला च प्रश्न विचारतो आहे की मी कसा इतका मायेच्या आवरणाखाली होतो की मला कळलच नाही तुला कसे भेटायचे.

पण आता माझे मायेचे आवरण पार गळून पडले आहे आणि तुझ्या भेटीची उत्कटता वाढते आहे. 

गझलकार इथे पूर्णत: शरणागती पत्करतो आणि मी तुझाच झालेलो आहे, आता तुझ्या आणि माझ्यात काहीच फरक राहिलेला नाही, तुझ्या चरणी मी लिन होऊन आलेलो आहे आता आश्रय दे....


रसिका राजीव हिंगे 

रसग्रहण

 




बा.भ.बोरकर यांची ही कविता आयुष्यात जगताना असलेले जे ठोकताळे असतात ते किती फोल आहेत ह्याची जाणीव करून देणारी कविता. 

पैलतीरावर दृष्टी लागलेल्याची काय स्थिती असू शकेल हे कवीने सांगितले आहे.

आपली आपली म्हणणारी सगळी नाती ज्यांच्याशी खूप दिवसांपासून आपण बांधलेले असतो ती सुद्धा बेसूर होतात. 

ऐन तारुण्याच्या बहरातले दिवस कसे वाकडी वाट करून निघून जातात हे सांगताना चांदणे झुरून जाते हे खूप भावतं.

वय उतरणीला लागलं नि देह पण झिजायला लागला आहे. सगळी गात्र थंडावली आहेत.

आयुष्यातले चढ उतार, प्रेम, हेवे दावे सगळचं जाणवायला लागतात. या आठवणी मन सुन्न करत जातात. 

पैलतीरावर चा अनाहत नाद ऐकायला येऊ लागतो आणि ऐलतीरा वरचे सगळेच पाश सोडून एकट्यालाच प्रवास करायचा आहे याची जाणीव होते.


रसिका राजीव हिंगे 

रसग्रहण

      




     एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्व भोवती फिरणारी  झाड गूढ ही बा.भ.बोरकरांची कविता घरातले आधारवड डोळ्यासमोर उभे करते.

     नवे स्वप्न घेऊन आलेली नववधू संसारात किती समरस झाली आहे ,संसाराच्या गाठी  बांधण्यासाठी ती काहीही करायला तयार आहे, सज्ज आहे. पाताळ फोडते आकाश वेढते  ही कविकल्पना सुखवून जाते. संसारवेल  हळूहळू वाढत जाते. त्याचा आकार मर्यादित ठेवण्यासाठी आणि सुखासाठी अविरत ईश्वराला साकडे घालणारी ही सुखात आणि दुःखात ही आनंदी आहे.  कुठल्याही संकटाची तमा न बाळगता  स्वप्न आणि जागृतीच्या उंबरठयावर सतत पहारा देत उभी आहे.

बा.भ बोरकर यांनी निसर्गाच्या माध्यमातून कर्तबगार व्यक्तिमत्वाचे आयुष्य रेखाटले आहे असे वाटते.


रसिका राजीव हिंगे 

रसग्रहण





 कवयित्री इंदिरा संत यांची औक्षण ही कविता म्हणजे हृदयाला पीळ पडणारी आर्त साद देणारी काव्य रचना आहे. सीमेवर लढणाऱ्या सैनिकाप्रती दाटून आलेल्या भावना या कवितेत कवयित्री ने मांडलेल्या आहेत. सैनिकाचे शौर्य किती मोठे आहे, त्याचे सामर्थ्य किती आहे याची तुलना करतांना लाभलेला हा जीव सुद्धा किती लहान आहे. इथे असे वाटते की त्यांनी हा थरार अनुभवला आहे की काय! 

तुझे रणांगणावर जिद्दीने पडणारे पाऊल तुझ्या शौर्याचे गूज सांगून पापनकाठ ओलवतात, अशा असंख्य अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तुला औक्षण केले जाते आहे, हीच तुझे रक्षण आहे. 

ओळीओळीतून, शब्दाशब्दातून कवियत्री च्या प्रतिभेचे आणि शब्द सामर्थ्याचे दर्शन आपल्याला होत जातं.


रसिका राजीव हिंगे

रसग्रहण




सुंदर भावकाव्य. बालकवी हे निसर्गप्रेमी. त्याच्या कवितेतली आई मुलाला उठवताना त्याला संस्काराचे बाळकडू सुद्धा देते आहे. तसेच निसर्गाची पण ओळख व्हावी या उद्देशाने बालकाचे लक्ष निसर्गाकडे वेधू इच्छिते. पक्षांचा कलरव,  सकाळच्या वेळी वारा हा थंड असतो तरीही चैतन्यमय असतो. पूर्वेला रवी आला म्हणजे पूर्वा ही उगवती आहे हेच तिला बाळाला शिकवायचे आहे.

बालकवी निसर्गात रमणारे आणि सृष्टी शी संवाद साधणारे कवी आहेत हेच या कवितेवरून लक्षात येत.


रसिका राजीव हिंगे

रसग्रहण

 




आनंद पेरत जाणारा हा आनंद पक्षी बालकवी नी आपल्या काव्यात गुंफला आहे. . या आनंद पक्षाचा पत्ता म्हणजे, सुबत्ता, संपदा जिथे भरली आहे तिथेच हा पक्षी निवास करतो. या पक्षाचे स्वच्छंदी बागडणे कसे हे सांगताना बालकवी ची सौंदर्य दृष्टी चौफेर फिरते अन् त्यातील लावण्य टिपत जाते. मानवी आयुष्यात असाच आनंद जर भरायचा असेल तर या पक्षासारखे ब्रह्मानंदी लिन होऊन विहरत रहावे. यासाठी बालकवी पाखरास याचना करतात आहे, भिक्षा मागतात आहेत निर्भेळ आनंदाची...


रसिका राजीव हिंगे

रसग्रहण

 




शांता शेळके या अलवार मनाच्या कवयित्री आहेत. काळया सावळ्या मेघांनी आच्छादलेले आभाळ, पाऊस पडुन गेल्यावर त्यातून डोकावणारे सूर्यबिंब, सुस्नात धरतीला बिलगणारे कोवळे सोनसळी सूर्यकिरणे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे करण्याचे कसब शांताबाईंच्या सगळ्याच कवितांमध्ये दिसून येते. पर्जन्य राजाच्या कृपा वर्षावाने धरणी संतोषली आणि हासली.किती सुंदर कल्पना. हसरी सृष्टी पाहण्याची दृष्टी लाभलेली कसदार कवयित्री यपरिस मोठे भाग्य कोणते आपले.

रसिका राजीव हिंगे

रसग्रहण

 




वारकरी संप्रदायाच्या संत जनाबाई यांचा अभंग. भक्तीचे दुसरे रूप म्हणजे संतांची मांदियाळी. विठ्ठलाच्या भक्तीत ही इतकी रंगून गेली की तोच मी आहे म्हणजे अहं ब्रह्मासी. परमात्म्याशी इतकी एकरूप झाली आहे की, तिने परमेश्वराने माझ्याच हृदयात वास करावा म्हणून भक्तिरुप दोरीने त्याला बांधून ठेवले आहे. शब्दांच्या साखळ्या करून त्याच्या पायात बेडी रूपाने बांधल्या आहेत. अन् सतत तू अन् मी एकच आहे याचा जप तिने चालविला आहे. विठ्ठल ही हे जाणतो आणि तिच्या तत्वमसी या तत्वाला  जणू मान्यता देतो.

परमेश्वर हा भावाचा भुकेला आहे, तुम्ही त्याला फक्त साद घाला तो प्रतिसाद देतोच देतो हेच तत्व सुचवायचे आहे नाम्याच्या जनीला ....


©️®️रसिका राजीव हिंगे

रसग्रहण

 




मला ही रचना बालगीत वाटली. मी वाचलं सुद्धा बडबड गीताच्या चालीवरच. निसर्गाचं रूप बालका समोर आणण्याचं आणि सहा ऋतू पैकी हिवाळा या ऋतूचे ज्ञान व्हावे या हेतूने हा कविता असावी.  कारण छोट्या बालकाला थंडी ही माहित आहे. तुलाच कुठे थंडी वाजते, बघ रानातल्या बोरीला पण वाजते आहे. हिवाळा हा सकस आहाराचा ऋतू तसेच या ऋतूमध्ये येणाऱ्या फळांचे ज्ञान बाळाला करून दिले आहे. बोर, पेरू, हरबरा,चिंच यासारखे फळं पाहून रानातले पाखरं पण किती स्वच्छंदी झाले आहेत बघ. थंडी पळवण्याचे साधनाची पण ओळख करून दिलेली आहे.

असे हे बडबड गीत असावे असे मला वाटते.


रसिका राजीव हिंगे

रसग्रहण

 





विं. दा. करंदीकर यांची पाऊस आला पाऊस आला ही बाल कविता. अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांची कशी त्रेधतिरपीट उडते याचे वर्णन कवींनी यात केले आहे.

कडाड कडकड विजा, भणाण वारा ह्या उपमा देऊन याचे ज्ञान विद्यार्थ्यांना करून देण्याचा प्रयत्न.

हा अचानक आलेला पाऊस बहुधा हेमंताच्या शेवटी किंवा शिशिर ऋतूत बरसला असावा. दिवाळीचा किल्ला वाहून गेला, आजोबांनी छत्री शिवायला घेणे, वाळवण ओले होणे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर असे दिसते हा अवेळी आलेला पाऊस आहे का? शाळेला सुट्टी मिळाल्याचा आनंद  आजही जसाच्या तसाच आहे. बालपणाची आठवण करून देणारी, निसर्गाचे वेगळे रुप उलगडून दाखवणारी ही भाव कविता आहे.

रसिका राजीव हिंगे

Sunday, 2 April 2023

 साहित्यसंपदा आयोजित उपक्रम

पत्र लेखन


चि. चारुता, उन्मेष, 

     तुमचे दोघांचे एकत्रित असलेले पत्र मिळाले. खूप बरं वाटलं तुम्ही पत्र लिहिलं म्हणून. नाहीतर आजकाल फोनवर बोलणं होतं फक्त. पत्र लेखन कला काळाच्या आड जाते आहे हे माझे बोलणे तुम्ही दोघांनी खूपच मनावर घेतलेले दिसते. असो लिहावेसे वाटले हेच खूप आनंददायी आहे.

     एक गोष्ट मात्र खूपच म्हणजे खूपच खटकली मला तुमची. तुम्ही कोणत्या भाषेत पत्र पाठवले हे तुम्हाला तरी कळले का रे? मराठी मातीत, मराठी घरात जन्माला येऊन तुमची भाषा इतकी खालच्या दर्जाची असावी याचे खूप वाईट वाटले बघा. मराठी भाषा नीट बोलता आणि लिहिता यायलाच हवी. इंग्रजी शब्दांचे मराठीकरण होते की मराठीचे इंग्रजीकरण होते कळले नाही. 

     मराठी भाषेत आपल्या पूर्वजांनी इतके साहित्य लिहिले आहे, त्याचा अभ्यास केल्याशिवाय कशी बरे येईल आपली भाषा. प्रत्येक भाषेचा अभिमान असावा पण आपल्या भाषेचा माय मराठीचा स्वाभिमान बाळगला तरच ती पुढे टिकून राहील हे आधी लक्षात घ्या बाळांनो. मी फक्त तुम्हालाच सांगते आहे असे नव्हे तर तुमच्या सारख्या इंग्रजाळलेल्या तमाम नवीन पिढीला सांगते आहे. कारण तुम्हीच उद्याचे भविष्य आहात. 

     आपले सगळे ग्रंथ हे संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत. वेद उपनिषदापासून तर  रामायण महाभारत या सारखे महाकाव्य सुद्धा संस्कृत मध्ये लिहिलेले आहे. सर्वसामान्य व्यक्तीला  आपले सगळे ज्ञान जे संशोधन करून स्वबळावर अनुभवाच्या पट्टीवर घासून आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवले आहे ते सहजपणे समजायला हवे, आत्मसात करता यायला हवे हा विचार आपल्या संतांनी केला. आणि हळूहळू सगळे ज्ञान मराठी जी महाराष्ट्राची बोली भाषा आहे त्यामध्ये लिहून सगळ्यांपर्यंत पोहचविले.

     संस्कृत भाषा जगासि कळेना

     म्हणोनी नारायणा दया आली हो

      देवाजीने परि घेतला अवतार

       म्हणति ज्ञानेश्वर तयालागि हो!

   अन् मराठी रुजली इथे, फळली,फुलली. आज ती मातृत्वाच्या पदावर विराजमान आहे. वास्तविक पाहता दर बारा कोसावर भाषा बदलते. महाराष्ट्रात मराठी या भाषेचेच विविध रूपं ऐकायला मिळतात. तिचीच ही सारी लेकरं.  

     मराठी  ही जशी बोली भाषा तशी स्वीकारल्या गेली कारण तिचे बोलणे, समजणे आकळणे सोपे वाटले असावे.

     तुम्हाला माहित आहे का मराठी भाषा जशी वाकवली तशी वाकते असे साधारण बोलल्या जाते. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असलेली ही एकमेव भाषा. त्यातून ऱ्हस्व दीर्घ यामुळे ही अर्थ बदलत जाणारी ही भाषा. तरीही या मराठमोळ्या भागात ती बहरली, तिचा सुगंध आसमंतात दरवळतो आहे.

     शिक्षणासारख्या क्षेत्रात सुद्धा मराठी भाषेतून शिक्षण द्यावे म्हणजे विद्यार्थी लवकर ज्ञान आत्मसात करतील असे आहे.

     आता आपली जबाबदारी आहे या मातेचे संरक्षण करण्याची. हिच्याच अंकावर बसून आकाशी भराऱ्या घेण्याचे स्वप्न पाहिले आपण. मराठीचा हात धरूनच गगनाला गवसणी कशी घालता येईल याचा विचार करायला हवा. आपल्या पूर्वजांनी मराठीचे बीज या महाराष्ट्राच्या मातीत रुजवले, प्राणपणाने जपले आणि आपल्याला आज ही मधुर फळे मिळतात आहे. मराठी भाषा कशी टिकून राहील, तिचा प्रचार, प्रसार कसा करता येईल हे आपले सगळ्यांचे स्वप्न असावे तरच कवी सुरेश भट म्हणतात तसे आपण अभिमानाने संपूर्ण जगाला सांगू शकू 

     लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

     जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

      धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी

      एवढ्या जगात माय मानतो मराठी

हीच मराठीला मानवंदना ठरेल..

     कळलं का! मला तुम्हाला उपदेश करायचा नाही पण आपली भाषा आपणच नीट सांभाळली तरच तिचा अभिमान वाटेल आणि स्वाभिमान पण. 

     पुढचे पत्र शुद्ध मराठी भाषेत असेल या अपेक्षासह.

     

रसिका राजीव हिंगे

पुणे

 

    


 तीर्थरूप तात्या (श्री वि.दा. सावरकर),

शि.सा.नमस्कार,


     आजकाल खूप आठवण येते हो तात्या तुमची. तुम्ही हवे होता.  अंदमानच्या काल कोठडीतून बाहेर आलेली तुमची साहित्य संपदा पाहिली की आपोआप नतमस्तक व्हायला होतं. इतक्या विपरीत स्थितीत तुमची कमला फुलली, अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर वाचून तुमच्या प्रतिभेला साष्टांग प्रणिपात घातल्या जातो. चांदण्यात ही कविता वाचताना तुमची तरल भावप्रीती दिसून येते. तुमच्यासारखे साहित्यिक आता होणे नाहीच. या सम हा. 

      राष्ट्रासाठी आयुष्यातला कण अन् कण तुम्ही वाहिला, तात्या आजच्या या परिस्थितीत तुमच्यासारखे धाडसाने पुढे येणारे कोणीच नाहीत. सगळ्या विश्वाचे आदर्श आहात तुम्ही तरीही ज्यांना साधं सावरकर हा शब्द उच्चारता येत नाही, तुमचं नाव सुद्धा घ्यायची ज्यांची लायकी नाही ते तुमच्यावर वाट्टेल तसे बोलतात, खूप राग येतो,वाईट वाटतं, पण मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही हेच खरे.  

        आजचा आपला भारत सावरायला, योग्य दिशा दाखवायला तरी या एकदा. तुम्ही सांगितलेली सगळी ठोकताळे तंतोतंत खरी ठरली आहेत हे दुर्भाग्य आपल्या भारताचं.  आज आपला देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे. वेग खूप आहे तात्या प्रगतीचा पण सगळी अडथळ्यांची शर्यत होते हो. तुमचे धारदार शब्द पुन्हा एकदा या पवित्र भूमीवर उमटू द्या. जन्मापासून मृत्यू पर्यंतच्या प्रवासात आपला देश लागतो असे ठणकावून एकदा सांगायला या तात्या. 

        बाकी काय लिहू. माझ्यासारखेच बरेच जण असे आहेत ज्यांचे तुमच्या आठवणीत अश्रू अनावर होतात. 

        पुनश्च तुम्हाला साष्टांग प्रणिपात.


तुमची एक भारतीय नागरिक

रसिका राजीव हिंगे 

#rasraj#पत्र #सावरकर#तात्या#

मला बाप्पा भेटला...

 

     

     शुभांगी खूप घाबरली होती. काय करावे तिला कळत नव्हते. ही काहीतरी जादू आहे की खरच हातचलाखी आहे. तिला लहानपणी पाहिलेले जादूचे प्रयोग आठवत होते. आईने लहानपणापासून मनावर बिंबवले आहे की सृष्टीच्या कणाकणात ईश्वर सामावला आहे. पण हे काही तसे दिसत नाही. गणपती बाप्पा दूध पितो आहे म्हणजे नेमके काय करतो. काहीतरी गोंधळ नक्कीच आहे. पण याचा छडा लावलाच पाहिजे. सहज तिची नजर हातातल्या घड्याळाकडे गेली. आई वाट पहात असेल गेले पाहिजे. शुभांगी गाडी काढून सरळ घरी निघाली. तिची मैत्रीण रेवती होती सोबत. ती अगदी श्रध्देने हे सगळं पहात होती. शुभांगी ला निघालेले पाहून धावतच तिच्याजवळ आली.

     "अगं चाललीस कुठे? थांब जरा. मी बाजूच्या दुकानातून दूध घेते,आपण पण देऊ गणपतीला दूध."

     "हे फुकटचे उद्योग मला नाही जमणार. तू कर तुला काय करायचे ते. माझा अजिबात विश्वास नाही यावर." 

     "अरे, असं बोलू नको, गणपती आहे तो! त्याच्याबाबतीत असे बोलशील तर पाप लागेल ग. का उगाच संकटांना आमंत्रण देते आहेस?"

     "मी घरी चालली आहे. तुला काय करायचे ते कर. माझ्या आई बाबांना नाही आवडत असे थोतांड."

     असे बोलून शुभांगी घरी तर निघाली. पण गाडीवर जाताना तिच्या मनात उलट सुलट विचारांनी अक्षरशः थैमान घातले. खरच काही होईल का?  माझं शेवटचे वर्ष आहे कॉलेजचे, काही गडबड तर होणार नाही ना.? खूपच घाबरली होती शुभांगी. घरात आल्याबरोबर तिचा चेहरा पाहून आईने विचारले, " शुभांगी काय झाले? तू अशी का दिसते आहेस घाबरलेली? कोणी काही बोलले का?" ही आई पण न. हिला कसं कळतं सगळं काय माहीत.

     "अग आई, काही नाही झाले. थकली आहे म्हणून वाटत असेल तुला." पण शांत बसेल ती आई कुठली!

     "शुभांगी, जेवून घे आधी."

     "मला भूक नाही. नंतर जेवेल." आता मात्र आई तिच्याजवळ बसली.  तरुण मुलगी बाहेरून अशी घाबरत आली की आईच्या मनात नको ते विचार यायला लागतात. तिचं चित्त थाऱ्यावर नाही रहात.

     "शुभांगी, काय झालंय? तू खूप अस्वस्थ वाटते आहेस."

     "तसं विशेष काही नाही ग. रेवती म्हणत होती की गणपती दूध पितो आहे तर आपण पण त्याला दूध देऊ. पण मी नाही म्हटले, आणि निघून आले घरी."

     ",ठीक आहे न मग यात घाबरण्यासारखं काय आहे? तुला नव्हतं असं काही करायचं तर तू नाही केलं. विषय संपला."

     "आई, विषय संपला नाही इथूनच सुरू झाला. रेवती म्हणाली की  संकट येईल अश्याने. म्हणून जीव घाबरतो आहे. काही संकट आले तर? असं करते थोडे दूध घेऊन देऊन येते तिथे म्हणजे मन शांत होईल आणि संकट ही येणार नाही."

     "शुभांगी, डोकं ठिकाणी आहे का तुझं? कसला विचार करते आहे तू? अग आज चार दिवस झाले ह्या बातमीला, सगळी कडे हेच चालू आहे. गणपती दूध पितो आहे. काहीतरी शुभ घडेल वगैरे."

     "म्हणजे आई, तुला हे माहीत आहे! तू नाही गेली दर्शनाला आणि दूध द्यायला."

     "अग बाळा, असा कधी बाप्पा येतो का? ही केवळ अंधश्रद्धा आहे ग."

     "पण तू तर म्हणते की, देव कणाकणात भरलेला आहे. मग आता का म्हणते की ही अंधश्रद्धा आहे."

     " बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, ईश्वर असा भेटत नसतो कुणाला, त्याच्यासाठी खूप मोठी साधना लागते जन्मजन्मातरीची. अग असे भोंदू असतातच ठायी ठायी पसरलेले. काहीतरी सांगून भोवती लोक गोळा करणे आणि पैसा कमवणे. यातून एवढेच साध्य होणार. समाज रसातळाला जाईल खरे तर यांच्यावर विश्वास ठेवला तर."

     "पण ते तर दाखवत होते न दूध पितो आहे गणपती म्हणून. चमच्यातले दूध कमी व्हायचे ग."

     "जुगाड करतात ग सगळा. ती मूर्ती मातीची आहे, त्या मातीतच दूध जिरत नसेल कशावरून. देवाच्या नावाखाली भोळ्या भाबड्या लोकांना असले भोंदू जाळ्यात ओढतात अन् नादी लावतात. हा सध्या बाजार च झालाय बघ सगळीकडे. आपल्या शास्त्राचा अभ्यास करत नाही, अर्धवट काहीतरी वाचतात,ऐकतात त्यावरून स्वर्ग गाठायला जातात बघ. मध्ये अशीच आवई उठली होती की रुद्राक्षाने सगळे रोग बरे होतात. होतात शंभर टक्के होतात बरे.पण तो रुद्राक्ष कसा असावा, कोणता रुद्राक्ष आहे ज्याने रोग बरे होतात याचे काही ज्ञानच नाही कोणाला. अन् मग हे सगळे थोतांड आहे असा प्रचार करायला मोकळे होतात अंधश्रद्धावाले."

     "थांब आई, मंत्र विज्ञान पण आहे न ग काहीतरी."

     "आहे न. आपले पूर्वज वेडे नक्कीच नव्हते. अनुभवाच्या कसोटीवर घासून त्यांनी शास्त्र सांगितले आहे. संस्कृत मंत्राचा उच्चार योग्य झाल्याशिवाय त्याचे परिणाम दिसत नाही. वेद, उपनिषद,ब्रह्म सूत्रे म्हणजे गंमत वाटते या लोकांना. अर्धवट ज्ञान घेऊन भोळ्या भक्तांना नादी लावयचे आणि मग भक्तांचा कसाही उपयोग करून घ्यायचा हा बाजार झाला आहे आजकाल. तेव्हा असे गणपतीला दूध नाही दिले तर  आपल्यावर संकट येईल असे अजिबात नाही."

     "तिकडे खूप गर्दी होती. खूप लोकं दुधाच्या पिशव्या आणून देत होते."

     "आत्ताच काय सांगितले मी तुला, भक्तांना नादी लावणे अन् पैसा कमविणे हेच काम असतं या भोंदू लोकांचं. यामुळेच आपल्या संस्कृतीला आपणच नावं ठेवतो आणि आपले शास्त्र आपण वेड्यात काढतो. हातचलाखी करून जुगाड करायचे अन् भोळ्या विशेष करून स्त्रियांना फसवायचे. असं कधीही होत नाही.  हवेतून अंगारा काढला,कुंकू काढलं, अंगात देवी आली वगैरे काही नसतं. यासाठी मी कोण आहे, ईश्वर म्हणजे कोण, सृष्टी कशी निर्माण झाली, याचे उत्तर शोधले की कळतं सगळं पण त्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालवे लागेल तरीही यश मिळेल की नाही हे सांगता येत नाही. तेव्हा आता तू या अशा गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही अन् घाबरायच नाही. खरा देव आपल्या भक्तांसाठी काहीही करायला तयार असतो, संकट कधीच येवू देत नाही."

     "आई, मला आत्ता छान वाटतं आहे. तुला कसं ग इतकं माहित आहे."

     "आमच्या लहानपणी आमचे आईवडील सांगायचे, या जगात चमत्कार वगैरे काही होत नाही. खूप श्रम करा, मेहनत करा, प्राणीमात्रांवर दया करा अन् त्यांच्यातच देव पहा. गीता आमच्या कडून अर्थासह पाठ करुन घेतली होती शाळेत. त्यामुळे मला एकच माहित आहे अनन्य भावाने ईश्वरास शरण गेले तर आपले सारे तोच पाहतो.

     अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥ 

     बाकी सगळे खोटे आहे. कशा वरच विश्वास ठेवायचा नाही.आपल्यावर आपला विश्वास हवा."

     "आई तू खूप छान आहेस ग. मी आता यावर काहीतरी कार्य नक्की करेल बघच तू "

     "शाब्बास, याच साठी होता माझा अट्टाहास तुला शिकविण्याचा आणि सुसंस्कृत करण्याचा."

     आईच्या कुशीत शुभांगी काय करता येईल यावर याचा विचार करतच शांत पडून होती. ...


रसिका राजीव हिंगे