Friday, 27 January 2023

पाऊस

 

तू किती दिवस थांबणार आहेस अजून?
तुला कंटाळा नाही येत इथे
अरे तिकडे जा न तू
तिथे तुझी गरज आहे आता
ती तुझ्या एका नजरेसाठी
आसुसलेली आहे रे
कधी येशील म्हणून तुझ्या वाटेकडे
डोळे लावून बसली आहे
जरा जा न तिकडे
तिलाही तुझ्या सहवासाची
ओढ आहेच रे
तुलाच कशी नाही
छान नटून बसली आहे ती
खरच सांगते पावसा
आता तू जा आणि
तिकडे बरस थोडा
तडा गेल्यात रे तिच्या
हृदयाला तरीही ती नटली
तुझ्यासाठी
म्हणून सांगते
तुझा आता मुक्काम हलव
इथला आणि जा
माझ्या एकनाथांच्या
पैठणला, माझ्या
देवगिरीवरून खळाळू
दे तुझ्या सरी
वाहू दे दुथडी भरून
नदी नाले,.....हसू येऊ
दे माझ्या मराठवाड्यात
प्रत्येकाच्या ओठी......
कृतार्थतेचे!

 


रसिका राजीव हिंगे
साहित्याची अविरत नित्य वाहते गंगा
प्रासंगिक भान ठेवत वाहते गंगा
स्वरचित साहित्याला समजत येई बहर
चारोळी काव्य उमगत वाहते गंगा

प्रीतीच कृष्ण आहे राधेस त्या कळाले
कोणास उमगले  जे कृष्णास समजलेले
ध्यासात तूच आहे ध्यानात तूच राणी
हे उमगले तुला का  प्रेमात साचलेले

ध्यास तुझा नाद तुझा रात्रंदिन आहे
यास प्रेम म्हणावे हे तुला कळले का
प्रीती हा नसे खेळ ध्यास तो आहे
जे मला उमगले तुला समजले का

गर्भार हस्तिणी मातृत्वाने भारलेली
घाला दैवाचा सारे क्षणात संपले
संस्कृतीतील विकृती भयावह ही
मला न समजले कोणा न उमगले

रसिका


 

वादळ

पेल्यातल्या वादळापेक्षा
मनातलं वादळ तसं शांत
पेल्यातलं वादळ चक्राकार
मनात वादळ वक्राकार होतं

मनातले वादळ
तळाशी येतं
पेल्यातलं वादळ
चक्राकार फिरतं


वादळात दिव्याची वात
फरफरत आहे
आडोसा नाही परी
दिवा तेवत आहे


मनी माझ्या आहे
वादळाचे गाव
कसे आणि काय
सांगू त्याचे नाव


आठवांचे वादळ
भावनेच्या सागरी
मेघ काळे दाटले
पापणीच्या किनारी

रसिका



वादळवाटा झाल्या धूसर
सोबत असता नसे भीती
सावरतांना एकमेकांना
नाही होणार कोणती क्षती
रसिका

वादळ कोणतेही असो
निसर्ग किंवा मनाचे
झळ तर पोहचतेच
परिणाम पण भोगायचे
रसिका

निसर्गाची वादळे
सृष्टी उध्वस्त करतात
तर आयुष्यातली वादळे
मनास उध्वस्त करतात
रसिका

उनाड वाऱ्यासवे
वादळ सुसाटले
काय ठावे त्यास
सोबत काय नेले
रसिका

घरटे



कसे शिकली ग बयो
तुझे घरटे विणायला
निसर्गाची किमया ही
तूच शिकवली जगाला

पिले तुझी गोड छान
माता सार्थ आहेस तू
दाणा दाणा चोचीमध्ये
शक्ती तयांना देसी तू

तुझी जोडण्याची कला
तुझे संस्कार शिंपण
समजले त्या पिलांना
तुझ्या मायेचे कोंदण

रसिका

काळाच्या गर्भातून


काळाच्या गर्भातुनी वेळ येतसे जन्मास
क्षणांच्या सृजनातून  आकार आयुष्यास

प्रहर घटिका पळे निसटून ऐसे जातात
नक्षीदार संवत्सरे जणू एका निमिषात

मी  तू अहंकारात का तू ऐसा बुडविसी
सख्य जोडीत जावे मोजलेल्या श्वासांसी

कसा कधी पडेल घाला विचित्र दैवाचा
कर्म संचित प्रारब्ध खेळ हा नियतीचा

उगाच अट्टहास का भौतिकी जगण्याचा
शाश्वत आहे तोच आधार असे  सृष्टीचा

रसिका राजीव हिंगे
 

पायवाट

 पायवाट


नागमोडी वळणाची
वाट कुठे धावतसे
रान वारा सवे घेत
कुठे गडप होतसे

विसावते वळणाशी
जरा वळून बघते
पुन्हा अखंड प्रवास
घेत गिरक्या चालते

क्षण सौख्याचे भेटता
आनंदाने ही नाचते
वळतांना थांब्यावरी
मनोमनी ही हासते

मेघ दाटती सावळे
सरसर बरसती
निसरडी होते कधी
घसरण ही क्षणांती

घनदाट झाडातुनी
धरी पदर सावली
ममतेने कुरवाळी
भासे ही गुरू माऊली

ठायी ठायी जगतांना
रोज सुंदर पहाट
साथ देई क्षणोक्षणी
जीवनाची पायवाट

रसिका राजीव हिंगे
 

मोकळ्या केसात तुझ्या

 मोकळ्या केसात तुझ्या


मोकळ्या केसात तुझ्या
मेघ सावळे साजणी
मोगरा माळला कुंतली
जणू लखलख सौदामिनी

तुझे मोकळे केस काळे
भिरभिरती वाऱ्यावरी
जीव वेडावतो सखे
उधाणली प्रीतबावरी

मोकळ्या केसात तुझ्या
गंध कैसा फुलारला
जाई जुई गुलाब ही
बघ सखये ग बावरला

कोसळत्या पावसाचे
थेंबथेंब बघ लगटले
मोकळ्या केसात तुझ्या
पुन्हा पुन्हा स्थिरावले

रसिका राजीव हिंगे 


चित्रकाव्य

रजनीचा नाथ बाई
प्रकाशला गगनी ग
उधाणला बघ दर्या
चांदणल्या रात्रीस ग

कैसा नाविक लाभला
भवपार तारावया
लखलख प्रकाशात
आयुष्यास उजळाया

खडतर प्रवासात
मार्ग आपण शोधावा
वाट दावितो नाविक
श्रद्धा, विश्वास असावा

असे कारंजे सौख्याचे
आनंदाच्या सागरात
व्हावे जगणे प्रकाश
तेजाळल्या जीवनात

रसिका राजीव हिंगे




 

जीवनाच्या वाटेवरी

 जीवनाच्या वाटेवरी


जाणीवांच्या पायघड्या
दान मिळे कर्तृत्वाचे
जीवनाच्या वाटेवरी
दीपस्तंभ पूर्वजांचे

नागमोडी वळणाची
जीवनाची पायवाट
अनुभव सिद्ध होता
नवी उजाडे पहाट

ठायी ठायी विखुरली
मोतीयांची रास जणू
जीवनाच्या वाटेवरी
भेटे प्रकाशाचा कणू

काळोखात हरवते
धुके  पांढुरके कधी
जीवनाच्या वाटेवरी
समृद्धीचे मेघ कधी

कधी असते ही वाट
मखमली मऊशार
जीवनाच्या वाटेवरी
कधी काटे टोकदार

हात घेऊनि हातात
नाते सांभाळत जावे
जीवनाच्या वाटेवरी
क्षण आनंदाचे यावे

हाक दुःखाची येताच
साद सुखाची घालावी
जीवनाच्या वाटेवरी
एकमेका साथ द्यावी

रसिका राजीव हिंगे
 

सांग मनातले सर्व काही

 सांग मनातले सर्व काही


सांग मनातले सर्व काही
खोल खोल डोहातले
गुज सागर तळातील
मोतीयांच्या मनातले

का राजसीचा मनडोह
उर भरुनी खळाळतो
पारध येता जाता अशी
कशी कोण  करून जातो

कवडसा दिसता दिसता
सारा जीव काळोखला
उभ्या जन्मातील सारा
त्यानं दावा हा साधला

फिनिक्स होऊनि पुन्हा
अवकाशी घेई भरारी
दाटल्या काळोखातच
चमकेल तारा अंबरी

रसिका राजीव हिंगे