Thursday, 7 January 2021

अपेक्षा

 अपेक्षा


किती वाहसी मनुजा

अपेक्षांचे हे ओझे

उगाच आशा ठेवी

म्हणत तू माझे माझे


     खरच का अपेक्षा करणे बरे नव्हे. असं सगळे म्हणतात पण हे ओझे मात्र वहात असतात. कुणाची कुणाकडून का अपेक्षा ठेवावी? याचं उत्तर अगदी साधं आहे. अपेक्षा असली की समोरचा आपल्यात अडकत जातो. वास्तविक पाहता हे अपेक्षापूर्ती वगैरे काही नसतं. पण याने माझ्यासाठी केलं म्हणून मी करतो, किंवा मी याचे केले पाहिजे म्हणजे उद्या जर माझ्यावर वेळ आली तर कोणी तर उपयोगी पडायला हवे ना. या भावनेने सारं घडत असतं. 

     आई लेकरांमध्ये निरपेक्ष प्रेम असतं इथे काही देवाण घेवाण याला अर्थ नाही असे  एकीकडे म्हणतांना  माझ्या दुधाची लाज राख रे बाबा असेही आहे. म्हणजे ही एक  प्रकारची अपेक्षा च नव्हे काय? फरक इतकाच आहे की अपेक्षा आहे पण पूर्तता झाली नाही तर अपेक्षाभंग वगैरे कमी प्रमाणात असतो.

     प्रत्यक्ष ईश्वराच्या दारी जातांना सुद्धा आपल्या किती अपेक्षा असतात. मी इतका जप केला म्हणजे माझे चांगले होईल, पारायण करायला हवे म्हणजे सगळं सुरळीत होईल, आज मी माझ्या बाळाचं सगळं व्यवस्थित होण्यासाठी देवाला साकडं घातलं.  संकल्प च तसा केला आहे मी.  मी मी किती मी मी. नाही झालं तर अपेक्षाभंग. मी इतकं केलं देवाचं पण देव काही पावलाच नाही बाई असे म्हणायला मोकळे.

     एकदातरी असे घडते का आज काहीही मनात भाव नाही अपेक्षा नाही फक्त आणि फक्त सहज मंदिरात हात जोडले गेले. प्रत्येक वेळी काहीतरी आपण मनात म्हणतोच  न.  फळाची अपेक्षा न करता कर्म करा असे कृष्ण सांगतो. फक्त नाम घ्या. कशाची गरज भासणार नाही. पण हे नाम घेणं पण इतकं सोपं नाही हे जेव्हा कळतं तेव्हा साधी वाटणारी गोष्ट किती मोठी आहे हे कळत. पण  खरच अपेक्षा विरहित आपण त्याच नाव सुद्धा घेत नाही. जेव्हा मनातून अगदी आतल्या गाभ्यातून जेव्हा त्याचं स्मरण होतं, मनात भक्तिभाव जागृत होतो त्यावेळी तो संत होतो. देह आहे तो भोग भोगतो आहे त्याचे सोयरसुतक संतांना नसतं.

     मी मधून हे अपेक्षांचे रोप उगवतं आणि उगाच वात्सल्याचे, प्रेमाचे खत पाणी देत आपण त्याला वाढवत जातो. आणि शेवटी अपेक्षाभंगाचे सल मनात घेऊनच जगत असतो हे निर्विवाद सत्य आहे असं मला वाटतं...


रसिका राजीव हिंगे

     

     

No comments:

Post a Comment