Monday, 22 April 2024

मारुती राया...

 



तुला जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा...

मी इतकी मोठी नाही रे..

तुला शुभेच्छा देण्याइतकी..

तूच तर सांभाळतोस चराचराला..

तूच दिलेले तुला देतांना..

आनंद होतो बरं... 

जे मला मिळाले आहे ते कोणीतरी

दिलेलेच आहे न...म्हणून मी माझे

माझे करू का? हा देह सुद्धा मला

उसना मिळालेला आहे...माझे विचार..

माझी बुद्धी सगळेच परमात्म्याचे..

माझा फक्त अहंकार आहे...तो तू घे..

मी तू पण सरू दे माझे म्हणजे मला..

तुझ्या चरणी स्थिरावता येईल...

श्रीगुरुच्या कृपेने....

यासाठीच तुला शुभेच्छा देते आहे..

माझा अहंकार घे तू अन् मला स्वरूपाची

ओळख करून दे...

यापरिस काय मागू तुझ्याकडे...


रसिका राजीव हिंगे

Sunday, 21 April 2024

सामन्यातून असामान्यतेचा प्रवास महर्षी ब्रह्मगुप्त - गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ

 



महर्षी ब्रह्मगुप्त - गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ


     गरज ही शोधाची जननी आहे असे वचनच आहे. जसा जसा मानव विकसित होत गेला,त्याच्या गरजा वाढत गेल्या आणि या गरजांतून जिज्ञासा, कुतूहल वाढत गेले, यातून कळत नकळत बरेच शोध लागले, आणि विज्ञानाची प्रगती झाली. संशोधनाच्या पद्धती विकसित झाल्या आणि प्रगतीची अनेक क्षितिजे मानवाला खुणावू लागली. मुख्यत: खगोलशास्त्र, भूगोल, गणित, वैद्यक या क्षेत्रांमध्ये संशोधन केले. विश्वाचे गूढ उकलणं आग णि मानवी प्रगतीला अत्यावश्यक असलेले संशोधन शास्त्रज्ञांनी केले.

     प्राचीन काळापासून अनेक ऋषीमुनींनी, शास्त्रज्ञांनी आपल्या अनुभवाच्या कसोटीवर ज्ञान घासून जे शोध लावले ते आजही भारतीय संस्कृतीला प्रेरक ठरतात आहे. त्यापैकीच एक आहेत महर्षी ब्रह्मगुप्त! सातव्या शतकातील एक प्राचीन गणितज्ञ आणि खगोशास्त्रज्ञ. त्यांनी केलेले संशोधन भारतातील गणित आणि खगोलशास्त्र याच्या विकासासाठी उपयुक्त ठरले आहे, तसेच अरबांनी त्यांच्या ग्रंथाचे भाषांतर करून पुढे  युरोपमध्येही ब्रह्मगुप्ताचे संशोधन गणितज्ञाना प्रभावित  ठरले आहे.

     ब्रह्मगुप्तांचा जन्म राजस्थान मधील भीनमाळ या शहरात सन 598 मध्ये झाला.  आपल्या पूर्वजांबद्दल म्हणजे अशा थोर,महान व्यक्तीबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. लिखाणाचे साधन किंवा पाठांतर यावर त्याकाळी भर असल्यामुळे ही असेल कदाचित. त्यांच्या सुरवातीच्या काळातील त्यांच्या जीवनाबद्दल,शिक्षण, कौटुंबिक माहिती उपलब्ध नाही. पण त्या काळाच्या परिस्थितीनुरूप त्यांनी गणित आणि खगोलशास्त्र याविषयात  शिक्षण घेऊन महत्वाचे कार्य, शोध आपल्यासमोर ठेवले हे विशेष. जगाच्या दृष्टीने गणितीय योगदान फारच महत्वाचे ठरले.

     ब्रह्मगुप्तांच्या काळात आजच्या सारखे संगणक, कॅल्क्युलेटर  वगैरे नव्हते. स्वतः आकडेमोड करून सिद्धांत तयार करावे लागत असे. अंक म्हणून शून्य ही संकल्पना मांडली. शून्याचा समावेश असलेले समीकरणांचे नियम त्यांनी विकसित केले.दशांश संख्या प्रणाली जी आजही आपण वापरतो तिचा पाया ब्रह्मगुप्तांनी घातला आहे. किती प्रखर बुद्धिमत्ता होती. गणितासारख्या विषयात त्यांनी दिलेले हे योगदान फार महत्वाचे ठरले आहे. बीजगणितीय तंत्रात चतुर्भूज समीकरणांसाठी उपाय प्रदान केले. एकाधिक अज्ञान(two or more than variables) जसे की x, y, z यासारखे variables असलेले समीकरण याची उकल करण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. (x+3=5) तसेच नकारात्मक गुणांक(-2, -3, -4)असलेले समीकरणे यासाठी उपाय सांगितले आहेत. भारतीय बीजगणितीय तंत्राच्या विकासाचा पायाच त्यांनी घातला आहे.

     ब्रह्मगुप्ताने सन 628 मध्ये ब्रह्मस्फूटसिद्धांत हा अंकगणितावरील सर्वसमावेशक असा ग्रंथ लिहिला. यामध्ये अपूर्णांक, बीजगणितीय समीकरणे,संख्या प्रणाली या विषयी सोदाहरण विवेचन केलेले आहे. हा ग्रंथ त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी लिहिला. हा ग्रंथ लिहिण्या मागचे कारण सांगताना ब्रह्मगुप्त म्हणतात, "ब्रह्मदेवाने सांगितलेले ग्रहगणित पुष्कळ काळ लोटल्यामुळे दृक प्रत्ययाच्या निकषावर अचूक येत नाही,म्हणून जिष्णूगुप्तांचा पुत्र ब्रह्मगुप्त ते स्पष्ट करून सांगत आहे." यावरून असे दिसते की, स्वतः वेध घेऊन ज्योतिष शास्त्रात शुद्धता आणण्याचे महनीय कार्य ब्रह्मगुप्ताने केले आहे, प्रखर बुद्धिमत्ता आणि स्वतः वेध घेऊन ज्योतिषशास्त्रात संशोधन केले होते. उज्जैनच्या वेध शाळेचे प्रमुख होते ब्रह्मगुप्त.

     गणित या विषयाच्या सगळ्याच क्षेत्रात किंवा आपण विभागात म्हणू ब्रह्मगुप्तांनी मुशाफिरी केली आहे. भूमिती सारख्या क्लिष्ट विषय देखील त्यांनी सहजपणे हाताळला आहे. भौमितिक आकार म्हणजे त्रिकोण, चौकोन, वर्तुळ अशा आकृत्यांचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्रे तयार केली.  चक्रीय चौकोनाचे क्षेत्रफळ मोजण्याचे सूत्र तयार केले. त्रिकोणामिती मध्ये काटकोन त्रिकोण याविषयीचे त्यांचे ज्ञान, साईन , कोसाईन ची गणना करण्यासाठी तयार केलेली सूत्रे त्याला प्रमेय म्हणता येईल, ती आजही आपल्याला मार्गदर्शक ठरत आहेत. अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार या व्यतिरिक्त प्रमाण आणि गुणोत्तरांची संकल्पना ब्रह्मगुप्ताने सर्व प्रथम मांडली.

     खगोलशास्त्रीय घटनाची गणना अचूक करण्याचे तंत्र विकसित केले. ग्रहांची स्थिती, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण यांची स्तिथी, कोणत्या वेळेस, कधी असेल याची अचूक गणना पद्धती शोधली. त्यामुळे याचा अंदाज घेता आला. पृथ्वीचा परीघ त्यांनी दोन decimal  पर्यंत अचूक मोजला आहे. खगोलशास्त्रीय घटनांची अचूक गणना करण्यासाठी त्यांनी ऑस्टोलेब्स आणि सनडियल ही उपकरणे तयार केली.

     सन 665 मध्ये खंडखड्याक हा ग्रंथ त्यांनी लिहिला. पण ब्रह्मस्फुटसिद्धांत सारखा हा ग्रंथ जास्त प्रचलित झाला नाही. यामध्ये ही गणिती आणि गणना याविषयी माहिती असावी. ब्रह्मस्फुटसिद्धांत (ब्रह्माच्या ग्रंथात दुरुस्ती) हा ग्रंथ नंतरच्या विद्वानांनी, गणितज्ञांनी आभ्यासला. 

     ब्रह्मगुप्ताच्या संशोधनाचा गणित आणि खगोलशास्त्राच्या विकासावर खोलवर परिणाम झाला, केवळ प्राचीन भारतातच नव्हे तर त्यानंतरच्या आलेल्या नवनवीन संस्कृतींवरही. त्याच्या ग्रंथांचे नंतर अरबीमध्ये भाषांतर करण्यात आले, ज्याने इस्लामिक जगामध्ये गणिताच्या विकासावर आणखी प्रभाव पाडला.

     ब्रह्मगुप्ताच्या कर्तृत्वाने आणि अंतर्दृष्टीमुळे भारतीय गणितातील आणि खगोलशास्त्रातील एक प्रणेते,  म्हणून त्यांची कीर्ती निर्माण झाली.  या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी सगळे भारतीय आणि जगातील ज्यांनी त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास केला, त्यांचे ग्रंथ संदर्भ म्हणून उपयोगात आणले ते सगळेच त्यांचे ऋणी आहेत यात तिळमात्र शंका नाही.


रसिका राजीव हिंगे


प्रश्नावली


1. महर्षी ब्रह्मगुप्त कोण होते?

उत्तर - महर्षी ब्रह्मगुप्त ज्यांना ब्रह्म गुप्त किंवा ब्रह्म स्फुट असेही म्हंटले जात. ते एक प्राचीन गणितज्ञ आणि खगोल शास्त्रज्ञ होते.


2. ब्रह्म गुप्त यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? त्यांच्या वडिलांचे नाव काय होते?

उत्तर - ब्रह्म गुप्त यांचा जन्म राजस्थान मधील भीनमाळ या जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जिष्णूगुप्त होते.

3. ब्रह्म गुप्ताने कोणते ग्रंथ लिहिले?

उत्तर -  ब्रह्मस्फुटसिद्धांत आणि खंडखड्याक हे दोन ग्रंथ ब्रह्म गुप्ताने लिहिले आहे.

4. ब्रह्म गुप्तांच्या सिद्धांताची रचना केव्हा झाली?

उत्तर - ब्रह्मस्फुटसिद्धांत ची रचना इसवी सन 628 मध्ये झाली.

5. ब्रह्म गुप्ताने ग्रंथ कोणत्या विषयावर लिहिलेले आहेत?

उत्तर - ब्रह्म गुप्ताने लिहिलेले ग्रंथ गणित आणि खगोलशास्त्र या विषयावर लिहिलेले आहेत.

6. शून्य अंकाचा शोध कोणी लावला?

उत्तर - ब्रह्म गुप्ताने शून्याला स्वतः च्या गुणधर्म आणि क्रियांसह संख्या म्हणून स्थापित केले.

7. ब्रह्म गुप्ताचा व्यवसाय काय होता?

उत्तर - गणितज्ञ आणि खगोशास्त्रज्ञ या विषयातील विद्वान आणि शास्त्रज्ञ.

8. ब्रह्म गुप्त कोणत्या वेध शाळेचे प्रमुख होते?

उत्तर - उज्जैन येथील वेध शाळेचे ब्रह्म गुप्त प्रमुख होते?

9. ब्रह्म गुप्ताने खगोलशास्त्रीय अचूक गणना करण्यासाठी कोणती दोन उपकरणे डिझाईन केली आहेत?

उत्तर - खगोलशास्त्रीय घटनांची अचूक गणना करण्यासाठी त्यांनी ऑस्टोलेब्स आणि सनडियल ही उपकरणे तयार केली.

10. ब्रह्म गुप्तांचे ग्रंथ कोणत्या भाषेत अनुवादित झाले आहेत?

उत्तर - ब्रह्म गुप्तांचे ग्रंथ अरबी भाषेत अनुवादित झाले आहेत.


रसिका राजीव हिंगे 

     

  

     

     


Saturday, 20 April 2024

रागाच्या कथा - अविचारांचे तण

 






     मीरा सकाळपासून अस्वस्थ होती. काही सुचेनासे झाले होते तिला. कशातच लक्ष लागत नव्हते. विचार करून करून डोकं दुखायला लागले होते. संध्याकाळ झाली होती. आज हुताशनी पौर्णिमा असल्यामुळे सकाळी पुरणा वरणाचा स्वयंपाक करून नैवेद्य करून ती शाम ची वाट पहात होती. सहा वाजयला आले तरी शाम घरी आला नव्हता. वास्तविक लवकर घरी येतो असे कालच त्याने सांगितले होते. मीराच्या मनात नको ते विचार यायला लागले. मन चिंती ते वैरी न चिंती असे तिला झाले होते. विचारांचे आवर्तनं सुरूच होते. तेवढ्यात  शेजारच्या राधाने मीराला आवाज दिला.

"मीरा, चल खाली जाऊ. आता थोड्या वेळातच होळी पेटविण्यात येईल. नैवेद्य घे सोबत."

"चालेल, चल जाऊ या" मीराला वाटले खाली सगळ्या सोबत जरा बरे वाटेल. म्हणून ती निघाली. होळी पेटवली होती. नैवेद्य अर्पण करून दोघी मैत्रिणी बाजूला उभ्या होत्या.जे मिळेल ते, ओलं , सुकं सगळं हा अग्नी स्वतःच्या पोटात सामावून घेत होता. कशालाच त्याने दूर लोटलं नव्हतं. अग्नीचं हे रूप पाहून मीरा स्तब्ध झाली. धडधडणाऱ्या ज्वाळा वरवर जातांना पाहता पाहता तिच्या विचारांच्या ही ज्वाळा अशाच उंच उंच जाऊ लागल्या. आणि त्या ज्वाळांच्या लपेटात तिचं मन हळूच भूतकाळात सरकलं.

     शांत सोज्वळ स्वभावाची मीरा एम.बी.ए. फायनान्स मध्ये झाली. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी अन् आता तिचे लग्न करावे असे आईला वाटू लागले. मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मीराला सौंदर्याचे वरदान लाभले होते. कुणाला न दुखवता प्रत्येकाला मदतीचा हात देणारी,कमी बोलणारी मीरा सगळ्यांच्या मनात भरत होती. तिच्या या गुणांमुळेच पाटणकर यांनी आपल्या शाम साठी मीराला पसंत केले. एम.सी.ए.चे पदव्युत्तर शिक्षण घेतलेला शाम आय. टी.कंपनीत नोकरीला होता. साधा पण सावळा शाम मीराला भावला. तिच्याही नकळत तिने लग्नाला होकार भरला. थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. 

     माहेरच्या संस्काराची शिदोरी घेऊन सुसंकृत मीराने पाटणकरांच्या घरात मोत्याची रास उधळत प्रवेश केला. चार खोल्यांचा फ्लॅट, हॉलमध्ये ऐसपैस सोफा, दोन्ही बेडरूम आणि स्वयंपाक घर सुसज्ज फर्निचर असलेले असे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबतील इन मीन चार सदस्य असलेले घर. घरदार छान असले तरी तिला तिथे रुळायला वेळ लागला. शाम चे बाबा वासुदेवराव जरा कडक शिस्तीचे होते. मिलिटरी मध्ये असल्यामुळे असेल कदाचित पण खूपच शिस्तीचे होते. मीराला फार भीती वाटायची. मिलिटरीच्या शिस्तीत वागायची, राहण्याची तिला सवय नव्हती. वासुदेवराव तसे प्रेमळ होते पण शिस्त म्हणजे शिस्त हा त्यांचा खाक्या होता. त्यामुळे कधी कधी मीराला फार त्रासदायक वाटायचे.  देवकी म्हणजे सासूबाई खूपच प्रेमळ आणि मीरा ला जीव लावत होत्या. त्यांना मुलगी नव्हती म्हणूनही मीराचे त्यांना खूप कौतुक होते. नव्याचे नऊ दिवस म्हणतात तसे सुरवातीचे फुलपाखरी दिवस भुर्रकन निघून गेले. आता खऱ्या अर्थाने दोघांचा संसार सुरू झाला. मीराची नोकरी, शामला सकाळी लवकर जावे लागायचे. दोघांचे डबे तयार करणे, चहा, न्याहरी सगळे करतांना मीरा दमून जायची. सोबत सासूबाई असायच्या पण तिला घरी एवढी कामाची सवय नव्हती. सगळेच आई करून देत होती त्यामुळे आयतेच सगळे तयार असायचे. शाम तसा मदत करत नव्हता कारण मुलांनी काम का करायचे असे वासुदेव राव म्हणायचे. थोडक्यात काय तर घरातील पुरुष म्हणजे गुंडा पुरुष देव. 

     सुखाचे क्षण भराभर निघून जातात. संसारात सुख दुःखाचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतोच. एकाच ठिकाणी चार डोकी आली की विचार वेगळे, मतं वेगळी असे होणारच. मतं वेगळी असली तरी मतभेद नसावेत ही आईची शिकवण मीरा कटाक्षाने पाळत होती. कधीही कुणाला उलटून बोलणे नाही की उद्धटासारखे वागणे नाही. पण काही गोष्ठी अशा असतात की कितीही नाही म्हंटले तरी कधीतरी अतिरेक होतो अन् मनावरचा ताबा सुटतो. मीरा चे पण असेच झाले. पुरुषांनी काहीच करायचे नाही अन् स्त्रियांनी घरदार सगळेच सांभाळायचे हे काही तिला पटत नव्हते. शाम नोकरी करतो तर मी पण करतेच आहे की नोकरी असा तिचा सरळ हिशोब होता. पण वासुदेवरावांना हे काही पटत नव्हते. देवकी ने पण खूप समजावून सांगितले तरी ते आपले मत बदलायला तयार नव्हते. व्हायचे तेच झाले. 

     आज मीरा ऑफिस मधून उशीरा घरी आली. ऑफिस मध्ये मैत्रिणीचा वाढदिवस असल्यामुळे घरी येण्यास तिला वेळ झाला. शाम घरी आला होता. वासुदेव रावांचा रागाचा पारा चढत चालला होता. शाम आणि देवकीला पुढच्या महाभारताची कल्पना आली होतीच. चिंता करत होते. मीरा घरी आली अन् दारात च वासुदेव राव उभे होते. मीरा घाबरली,पण निश्चयाने तिने घरात पाऊल टाकले अन् वीज कडकडावी तसे वासुदेव राव कडाडले.

"तिथेच थांब. ही काय वेळ आहे का घरात येण्याची? किती वाजलेत पाहिले का? घरातली काही जबाबदारी असते हे विसरलात का सूनबाई तुम्ही? हे घर आहे धर्मशाळा नाही. शाम केव्हाचा आलेला. त्याची जेवायची वेळ झाली. केव्हा स्वयंपाक करणार, जेवणं केव्हा. काही ताळतंत्रच नाही वागण्याला." एका दमात वासुदेवराव तावातावाने बोलून गेले. काहीही विचार न करता. त्यांचा संताप देवकी ने  अनुभवला होता. ती उगाचच आत घरात थरथरत होती. आज मीरा पण चिडली. तिचाही मनावरचा ताबा सुटला. 

"बाबा मी या घरात तुमची सून आणि शामची सहचारिणी म्हणून आले आहे, मोलकरीण नाही. मला पण काही भावना आहेत, माझेही बाहेर मित्र मैत्रिणी आहेत. ते जसे मला वेळ देतात तसा मला पण वेळ द्यावा लागतो."

"असे इथे चालणार नाही."

"का? मी माणूस नाही. पुरुषांनी घरात काही केलं तर काय फरक पडणार आहे. जसे पुरुष कमवतात तसेच स्त्रिया ही कमवतातच न! नुसतच म्हणायचे का संसार दोघांचा आहे, सगळचं दोघांनी करावे."

शाम मध्येच बोलला,"मीरा तू शांत हो आणि बाबांना सॉरी म्हण आणि थांबव हे सगळे. उगाच शब्दांनी शब्द वाढत जातो आहे."

"अरे पण हे किती दिवस सहन करायचे? बाबांना मला दुखवायचे नाही. पण त्यांचे विचार, परंपरा का माझ्यावर लादल्या जात आहेत? हे बघ शाम हे मला मान्य नाही." असे म्हणून ती रागातच आत गेली. तिला रडू आवरत नव्हते. असे कोणते आभाळ कोसळले मी उशीरा घरी आले तर. तिला कळत नव्हते. उलट सुलट विचार ती करत होती. अन् तिचेच तिला जाणवले. मी कधीही न बोलणारी का बोलली इतके? कसा ताबा सुटला मनावरचा? जे झाले ते चांगले झाले नाही. पण आता पुढे काय? बाबा तर बोलतही नाहीत माझ्याशी. शाम पण मनातून दुखावला गेला आहे मी बाबांचा अपमान केला म्हणून. काय करू. 

     देवकी ने वासुदेव रावांना खूप समजावले, "असे काय तुम्ही बोलता? ती नवीन आहे अजून तिला थोडा वेळ द्यावा लागेल या घराच्या परंपरा अंगवळणी पडायला.  मी नोकरी करून तुमचे सगळे ऐकले म्हणजे मीरा ने पण तसेच वागावे हा अट्टाहास का? काळ बदलला आहे. बदल होतच राहतील. तुमचे वडील जसे वागले तसे तुम्ही तरी आहात का? आधी हा विचार करा मग बोला. एक जमेची बाजू आहे की मीरा इतर मुलीसारखी उद्ध्ट नाही. आज खरच तिचा तोल गेला खरा पण सारखे सारखे बोलले की असे होणारच होते. तेव्हा आता थोडा तिला वेळ द्या. एवढं माझं ऐका."

    वासुदेवराव मनातून दुखावले गेले होते तरी आत कुठेतरी त्यांनाही याची जाणीव झाली की मी इतकी टोकाची भूमिका घ्यायला नको होते. तिला नीट सांगितले असते तरी तिने ऐकले असते. राग कधीच बरा नव्हे याचा प्रत्यय त्यांना वारंवार येत होता तरीही आज तेच झाले जे व्हायला नको होते. मीरा शी बोलायला हवे. शाम ला पण सांगावे लागेल की तू थोडे तरी घरात लक्ष दे. देवकी म्हणते तेच खरे, बदल होतात आणि ते स्वीकारावे पण म्हणजे माणसांची. साखळी वाढत जाईल.

"अगं मीरा, चल घरी! कुठे हरवलीस?" राधाच्या आवाजाने मीरा भानावर आली. खरच किती किती चुकले माझे. मी मोठ्याचा अपमान करायला नकोच होता. आज शामचे बाबा म्हणजे माझेच बाबा नाही का? मी माझ्या बाबांना बोलले असते का अशी. इतका अहंकार कुठून आला माझ्यामध्ये? बरे तर बरे बाबा पुन्हा काही बोलले नाहीत. माझ्या बद्दल त्यांच्या मनात कटुता मी निर्माण केली. शिस्तीचा बडगा असला तरी ते प्रेमळ आहेत. जीव लावतात मला. कदाचित माझ्यावरचा माये मुळे ही ते मला रागावले असतील असा विचार का नाही आला माझ्या मनात. तिचे डोके सुन्न झाले. शांत होत असलेल्या होळीच्या,अग्नीच्या ज्वाळा कडे तिचे लक्ष गेले. मनोमन तिने होलिका मातेस नमस्कार केला अन् प्रार्थना केली,"हे माते, माझ्या मनातला अहंकार तू भस्म करून टाक, माझ्या मनांगणात जे अविचाराचे तण उगवले आहे ते सगळे जाळून नव्याने सद्विचारांचा अंकुर येऊ दे." आता तिचे मन शांतावले. घरी गेल्याबरोबर बाबांची क्षमा मागायची अन् नव्याने पुन्हा चैत्रवती होऊन अंकुरायचे हे मनाशी ठरवतच मीरा निघाली नव्या वसंतोत्सवाचे स्वागत करायला....तिच्या संसाराचा वसंत फुलवायला.......



©️®️रसिका राजीव हिंगे


# होळी

#. रागाच्या कथा

# अविचाराचे तण


     

सायबर आणि पालकत्व

   



     "का एवढे फोटो टाकते आहेस इंस्टाग्राम वर?. फेसबुक वर तेच. सगळीकडे मित्र मैत्रिणी सारखेच आहेत तरी दहा ठिकाणी अपलोड करत राहते. कोण केव्हा आणि कसा उपयोग करेल काही सांगता येतं का? इतकं सगळं ऐकता तरी तसेच वागता ग. काय म्हणावे तुम्हाला." असे आणि या प्रकारचे थोड्या फार फरकाने आई मुलीला आणि मुलाला पण सतत सावध करत असते. कारण या tech savvy असणाऱ्यांना एक प्रकारची धुंदी असते की काय, मला किती येतं आणि मी अजून काय करू शकतो याकडेच यांचा जास्त ओढा असतो. पालक म्हणून जबाबदारी वाढते ती इथेच. 

     प्रत्येक पिढीत मागच्या पेक्षा जास्त चतुरस्त्र पिढी आहेच पण परिस्थिती साधारण तीच आहे. आमच्या वेळी असे नव्हते असे ऐकावे लागतेच. आज जग इतकं पुढे गेले आहे, तंत्रज्ञानानं फार उंच भरारी घेतली आहे. सोशल मीडिया म्हणजे आपण त्याला समाज माध्यम म्हणू शकतो असे बरेच उपलब्ध झाले आहेत. ए आय सारखे एका क्लिक वर हवी ती माहिती देणारे प्लॅटफॉर्म तयार झाले आहेत. दूरदर्शन जरी जास्त पाहिले तरी आई रागवायची ही आमची परिस्थिती. पण आता तसे नाही. कोरोना काळात ऑनलाईन  शिक्षण पद्धती मुळे मोबाईल नावाचा ब्रह्म राक्षस लहान लहान चिमण्या बाळांच्या तालावर नाचू लागला. काळाची गरज म्हणून आपण त्याला मान्य केले तरी तो त्याचे गुण दाखवणारच. शिवाय इंस्टाग्राम, फेसबुक, नेटफ्लिक्स, हॉट स्टार, अमेझॉन हे पण आहेतच दिमतीला. तरुणाई तर अक्षरशः या सगळ्या गोष्टीच्या इतकी आहारी गेली आहे की, स्वतः च्या प्रत्येक इव्हेंट चे फोटो वेगवेगळ्या पोज मध्ये अपलोड करत असतात. सुरवातीलाच जर या सगळ्या वर नियंत्रण ठेवता आले तर कुठेतरी याला मर्यादा पडतील. हीच पालकांची खूप मोठी जबाबदारी वाढली आहे.

     स्वतः चे पोर सुसंस्कृत आणि सुशिक्षित करण्याची जबाबदारी पालकांची आहेच पण आज पालकत्व विखुरले आहे. करीयर हवे म्हणून किंवा गरज आहे म्हणून नोकरी करण्यासाठी आई वडील दोघेही घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे आजी आजोबा ही नाती घरातून संपुष्टात येते कारण प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य होत नाही.याला कारणे वेगवेगळी असली तरी हा पण एक भाग आहेच. पालक आणि पाल्य संवाद होत नाही म्हणण्यापेक्षा वेळ मिळतच नाही. आपला पाल्य सोशल मीडियावर किती वेळ असतो, तो काय पाहतो, काय वाचतो, याची मजल कुठपर्यंत गेली आहे यावर पालकाचे नियंत्रण असणे ही काळाची गरज आहे आज. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठीक आहे. पण मर्यादा ओलांडली की सगळचं संपतं. सीतेने मर्यादा ओलांडली तिला त्याचे परिणाम भोगावे लागले. 

     सायबर गुन्हे इतके वाढले आहेत की कुठलीही साईट हॅक होते आहे, कोणाचाही फोटो वापरून त्याला ब्लॅक मेल करण्याचे तर प्रमाण फारच वाढले आहे. पालक म्हणून जबाबदारी येते की माझा पाल्य यात कुठे अडकला आहे का याची वेळच येऊ नये. यासाठी उत्तम माध्यम म्हणजे संवाद. आपल्या पाल्याला क्वालिटी टाइम दिलाच पाहिजे. माती ओली आहे तोपर्यंतच त्याला हवा तो आकार देता येतो, सुरवातीपासून काय चांगले, काय वाईट म्हणण्यापेक्षा कशाची मर्यादा किती वाढवावी याचे भान पाल्याला करून देणे गरजेचे आहे. स्वतः पालकाने सोशल मीडियाचा स्क्रीन टाइम मर्यादेत ठेवला पाहिजे तरच आणि तरच पाल्य हा आदर्श होईल. त्याला त्याचे स्वतः चे साधक बाधक विचार करण्याची क्षमता लाभेल. मानव हा अनुकरणशील आहे. मुलं घरातलं पाहूनच शिकतात. वेगळं असं फार सांगावे लागत नाही. तेव्हा पालकांना आता अष्टावधानी असावे लागेल. डिजीटल युगात जगण्याचे जे फायदे आहेत त्याचा उपयोग जर आयुष्यात व्हावा आणि आयुष्य सुखासीन व्हावे असे वाटत असेल तर पालकांनी स्वतः वर नियंत्रण ठेवून मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादेत ठेवला तर सायबर या विषयाशी मैत्री होऊ शकेल आणि स्वतः चा उत्कर्ष ही होईल....


©️®️रसिका राजीव हिंगे 


#सायबर

# पालक

# डिजीटल

#  स्क्रीन टाइम 

     

Tuesday, 2 April 2024

श्रीगुरु रामदत्त बावन्नी

 



श्रीगुरु रामदत्त बावन्नी


जय जय सद्गुरू रामदत्ता

त्रिगुणात्मका भक्तत्राता ||1||

सगुण रूपी चतुर्थावतारी

रामदत्ता तूच नरहरी ||2||

कार्तिक त्रिपुर पुनवेसी

पांगारी क्षेत्री जन्मा येसी||3|| अवतरसी 

सरस्वती नारायण नंदना

तूच तारक भक्तजना ||4||

जन्मजन्मांतरीची पुण्याई

कुलकर्णी कुलोत्पन्न होई||5||

नृसिंह सरस्वती जागृत करीती

गुरुपरंपरेची देती प्रचिती ||6||

साक्षात दर्शने उपदेशती 

त्रिरात्री तुज बोध करिती||7||

अपूर्ण कार्य पूर्ण कराया

स्वामी सांगती श्रीगुरुराया ||8||

न्यावे भवपारी सद्भक्तांना

जे जे येतील तव चरणा||9||

गुरुचरिताचे करीसी पारायणा 

अव्याहतपणे तू नारायणा||10||

सप्तदिनाचा भक्ती महोत्सव 

श्रीदत्त जन्माचा असे उत्सव ll11ll 

भवसागर हा तरून जाया 

चरणी तुझिया ये आश्रया ll12ll 

प्रपंच अवघा मिथ्या जरी

जन सुखाची आस धरी ll13ll 

पांडे यांचा गाणग ग्रामीचा

नवस पूर्णत्वास नेई साचा ll14ll

चंदन पादुका स्विकारूनी

कृतार्थ केले तया जीवनी ll15ll 

पायी खडावा कटी पितांबर

अंगावरती शाल भरजर ll16ll 

ऐसे यावे सद्गुरू भोजना

गोखल्यांची तू पुरवी कामना ll17ll

वांझ महिषी दोहविली जैसी 

सगुण नरहरी अवतारासी ll18ll

तैसे आणिले त्वरित जलासी 

ग्रीष्मातल्या शुष्क नळासी ll19ll

अहंपणाने कुटाळ येती 

नित्य जयाची दांभिक वृत्तीll20ll

क्षणात दिधली तया प्रचिती

प्रत्यक्ष आम्ही संन्यासी यती ll21ll 

दामले यांच्या मनीची आस

पुरविली जाऊनी इंद्रपुरास ll22ll 

यावे कन्येस आशिष द्याया

दत्त स्वरुपा तू गुरुराया ll23ll 

प्रपंचाची शिकवण द्यावया

गृहस्थाश्रम स्विकारी सदया ll24ll

दुःखी जीव अगणित परी

रक्षियेले या भवसागरी ll25ll

असुर शक्ती त्या सहस्रार

कथियेले ते किती प्रकारll26ll

सावध करुनी भक्तांना

रक्षियले त्वा दयाघनाll27ll

दत्तोपासक श्रीकांतास

छळी पिशाच्च रात्रंदिस ll28ll

त्रिकालज्ञ तू त्रयमूर्ती

पुनीत करे देसी विभूती ll29ll

गुरुकृपेविण नाही ज्ञान

हेचि त्रिवार सत्य जाण ll30ll 

मधुकर दत्तात्रय कुलकर्णी

पुत्र तयांचा रक्षी धावुनी ll 31ll 

आधीव्याधी क्लेश भीती

कोणा आकळेना कर्मगती ll32ll 

अविरत भ्रमण भुवरती

 स्थिर जेथे स्थान महती ll 33ll

 दत्तकृपा सदन तीर्थ झाले

 भक्त जनांचे भाग्य उदेले ll34ll 

 देसी फळ पूर्व सुकृताचे 

 गत जन्मीच्या कन्येस साचे ll35ll 

 सगुण रूपाचा वियोग होता

 हृदयी स्थिरावले निर्गुण त्राता ll36ll 

दत्तात्रेय पुत्र नारायणासी

दत्तोपासनेची आवड मानसीll37ll

तपाचरणासी निघून जाता

तूच रक्षिले श्रीसद्गुरुनाथाll38ll

अतृप्त आत्म्यास मुक्ती देसी

कृतार्थ केले त्वा भगिनीसीll39ll

श्रीकांत अत्र सांगे कथा

स्वानुभवाची गुप्त गाथा ll40ll 

केला नामयज्ञ सव्वा कोटीचा

अर्थ कळाया नामस्मरणाचाll41ll

यज्ञी प्रगटले श्रीपाद यती 

तव संकल्पाची ही महती ll42ll

सगुण साकार मानव रुप

तूच निर्गुण ब्रह्मस्वरूप ll43ll

सांगसी देह हा आहे अनित्य

सत्कर्म सदाचार हेच सत्य ll44ll

तीर्थक्षेत्रीचा महिमा सांगसी

घेऊनी जासी सवे भक्तांसी ll45ll

निजभक्तास देसी प्रचिती

कृपाप्रसादे येई अनुभूती ll46ll

श्रध्दा भक्ती नि भावबळे 

चरणी येता दुःख पळे ll47ll 

जे जे येती तव दरबारी

सुखरूप होती या संसारी ll48ll

तेच लिहीते लेखणी नाथा 

जे कथियेले तू गुरुनाथा ll49ll

अधिक न्युन झाले दयाळा 

क्षमा करावी मजसी कृपाळा ll50ll

नित्य असावी ध्यानी मनी

सद्गुरू रामदत्त बावन्नी ll51ll

श्रीगुरु रामा दत्त दिगंबरा

करा करा हो जयजयकारा ll52ll 



अवधूत चिंतन श्रीगुरुदेव