Wednesday, 30 October 2024

एकच तत्व..

    एकच तत्व..


     रोज सकाळी फिरायला (म्हणजे morning walk) सोबत माझी मैत्रीण असते. आजकाल सगळे जसे भेटले की हाय, हॅलो करतात तसे सकाळी तिची भेट झाली की मी गुरुदेव दत्त असे म्हणते आणि ती जय श्रीराम. तिने जय श्रीराम म्हटले की मी अगदी जणू आठवणीने गुरुदेव दत्त म्हणते. हळूहळू काही दिवसातच मी गुरुदेव दत्त म्हटले की ती पण गुरुदेव दत्त म्हणायला लागली. याची दखल घेतल्या गेली पण लक्षात यायला वेळ लागला. तिला हे लगेच कळले की जय श्रीराम म्हणा की गुरुदेव दत्त म्हणा शेवटी रूपं अनेक असली तरी तो परमात्मा एकच आहे. वेगवेगळ्या रूपात भक्तांच्या हाकेला साद घालण्यास तो पृथ्वीवर अवतार घेतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेच आहे न  "परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे"  वास्तविक पाहता अवतरण म्हणजे खाली येणे, खालच्या पातळीवर उतरणे. 

 पण परमात्मा इतका दयाळू आहे हो त्याच्या भक्तांसाठी तो काहीही करायला तयार असतो. फक्त त्याच्या अनुसंधानात राहता आले पाहिजे. रागाने, लोभाने, तिरस्काराने, गमतीने किंवा विनोदाने कोणत्याही परिस्थितीत जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याचेच स्मरण केले तर तो दखल घेतोच घेतो नव्हे घ्यावीच लागते. 

     भक्त प्रल्हादाला किती यातना सहन कराव्या लागल्या पण त्याने नारायण नाम सोडले नाही. पर्वतावरून ढकलून दिले तरी पर्वत नारायण, खोल दरी नारायण, उकळत्या तेलात तळून काढले तरी तेल नारायण, विस्तव नारायण. एका नारायणा वाचून दुसरे काहीच माहिती नाही. त्याच्या साठी प्रगटले न विष्णू खांबातून. असा हा परमात्मा भक्तासाठी काहीही करू शकतो. तुम्ही गुरुदेव दत्त म्हणा की जय श्रीराम म्हणा किंवा अंबाबाईचा गजर करा, एकच तत्व सगळीकडे भरून उरलेले आहे. फक्त ओळखता आले पाहिजे. त्यासाठी एकच सतत अखंड भगवंताचे अनुसंधान ठेवावे लागेल. माझे सद्गुरू म्हणतात, नामाचे इतके गाठोडे करा की ते वजनदार झाले पाहिजे. आजकाल कोणत्याही कामासाठी मोल देऊन काम करून घेण्याची सवय आहे.पण हे नामाचे गाठोडे वजनदार झाले तरी हे इतके अनमोल आहे की त्याची कशाशीच तुलना करता येणार नाही शिवाय प्रत्यक्ष भगवंत  सोबत असेल, सद्गुरू सोबत असतील यात शंका नाही. सद्गुरू सोबत आहेत म्हणजे सगळेच मार्ग, वाटा सुकर, सुलभ होतात.

     एकच तत्व सगळीकडे आहे याची जाणीव झाली की सगळेच सोपे होऊन जाते. जाणीव होणे गरजेचे आहे. जाणीव होण्यासाठी श्रीगुरु चरणी लीन व्हावे, त्यांना सेवावे, भजावे, त्यांचे सारे ऐकावे. अखंड नाम आपोआप घेतल्या जाईल....


रसिका राजीव हिंगे

सुख दुःख......

    सुख दुःख......


     काळ वेगात धावत असतो. सगळ्यात जास्त घाई वेळेला असते. वेळेला वेळच नसतो विचार करायला. क्षणभर काळ थांबला असे कधी होतं का? हो. एक निमिष काळ थांबतो, जेव्हा एखादा दुःखद अनुभव येणार असेल तेव्हा. कितीही म्हटले की सुख दुःख नाहीच कुठे, हे आभास आहे. काल्पनिक आहे तरी संसारात, या भवसागरात जगत असताना यांच्याशी सामना करावाच लागतो. सुख प्राप्त झाले की आनंदाच्या लाटा उसळतात. पण दुःख आले की मात्र या आनंद सागराचे पर्यवसन शोक सागरात होते. असे का? यावरून एकच सिद्ध होते की मानव किती गुरफटला आहे या मायेच्या बंधनात. सुख दुःख हे मानले तर आहे हे सगळं कळत असतं, पण वळत नाही. सामान्य जीव दुःखात होरपळून निघतोच आणि सुखात हुरळून जातो. एक लाट विरत नाही तर दुसरी लाट तिच्या पाठी असतेच तसेच दुःखाचे क्षण येत जातात. एका जखमेवर खपली धरत नाही तर दुसरी जखम तयार आहे. भळाभळा रक्त वाहतेच आहे. किती मलम पट्टी करावी, तरी जखम ठसठसते. डोळ्यातले अश्रू सुद्धा थिजून जातात. यालाच संसार सागर म्हणायचे का? केव्हापासून चे असेल प्रारब्ध, संचित कधी सांगता येत नाही. सत्कर्म करा हे बाळकडू घेतच लहानाचे मोठे झालो आम्ही. या सत्कर्माचे फळ मिळावे न कुठेतरी. मिळाले असेल तर दिसावे. पण ईश्वराचा नियमच वेगळा आहे. तो देतो पण दिसत नाही आणि कळत ही नाही. सूक्ष्म कर्म  मग ते चांगले असो की वाईट त्याचे ते फळ देऊन तो मोकळा होतो. हेच ते संचित. ज्याचे प्रारब्ध भोगून झाले तो इथे राहूच शकत नाही. थांब पाहू पुढे नाहीच. उधारी नाहीच. जाणारा निघून जातो, पण त्याच्या पाठी असलेले त्यांचं आयुष्य एक निमिष थांबतच. काळ थांबला म्हणजे काय ते हेच. तो एकच क्षण असतो सगळं संपलं असे सांगणारा. पण पुढचा क्षण उभा आहे न समोर सांगायला, "सावर बयो, काळ पुन्हा पुढे सरकतो आहे." तो पुढे चालतच असतो, माझ्या साठी थांबला होता एक निमिष फक्त.....हा पण भास असेल कदाचित....

हीह

रसिका राजीव हिंगे

Wednesday, 16 October 2024

सहज सुचलं म्हणून.....कोजागिरी




आज कोजागिरी पुनव. आकाशात शांत शीतल शरदाचं चांदणं बहरलं आहे. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र दुधाळ प्रकाशाचं शिंपण करत सृष्टीवर शीतलतेच दान करतो आहे. चंद्र हा स्वयं प्रकाशित नाही. सूर्याकडून प्राप्त झालेल्या  प्रकाशाने चंद्र शीतलता दान करतो. केवढे हे औदार्य.  या ईश्वरी शक्ती फक्त आणि फक्त देत राहतात. देणे ह्या संस्कृतीचा पाया आहे असे आपण म्हणतो ते याच कारणास्तव. 

आज या विज्ञान युग म्हणणाऱ्या जगात वावरतांना प्रकर्षाने जाणवतं की आपले पूर्वज वेडे नव्हते,अंधश्रद्धाळू तर नाहीच नाही. श्रद्धा ही अंध कधीच नसते. अश्रद्ध म्हणता येईल एखादेवेळी. आपल्या संस्कृतीत प्रत्येक सण हा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून साजरा केला जातो. शरदाआच्या चांदण्यात कोजागिरीला रात्रीच्या चंद्र प्रकाशात  आटवलेल्या दुधाचं जे महत्व, चव  आहे , त्याच्या साक्षीने एकत्र येऊन नात्याचा होत असलेला उत्सव तसेच या चंद्र प्रकाशामुळे आरोग्याचे जे आंदण मिळतं ते अलौकिक आहे यात शंका नाही. तेव्हा हा पुनवेचा चंद्र पहावा,अनुभवावा आणि जगावा....

याच कोजागिरीच्या दिवशी गोपींनी आपल्या पायाची धूळ त्यांच्या कान्हा साठी पाठवली होती. आजारी असल्याची लीला करणाऱ्या श्रीकृष्णा साठी. रात्रभर रास खेळल्या कृष्णाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन. शबरी माहित नाही असा एकही भारतीय नसेल. निस्सीम भक्त श्रीरामाची. गुरूच्या शब्दावर विश्वास ठेऊन अविरत श्रीरामाची वाट पाहणाऱ्या शबरीचा जन्म याच दिवशी. गोपी किंवा शबरी नामाचे महत्त्व सांगतात आहे जणू. अखंड अनुसंधान परमात्म्याशी. श्रीकृष्णाशी आणि श्रीरामाशी एकरूप होऊन गेलेल्या. कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी रात्री फिरते कोजाग्रती विचारत. जागे आहात का याचा अर्थ नरदेह कशासाठी मिळाला आहे याचे भान आहे न! जागा हो. चौऱ्यांशी लक्ष योनी फिरल्यानंतर तुझे पाप पुण्य समसमान झाले अन् तुला हा नर देह मिळाला आहे त्याचे सार्थक करून घे. यासाठीच ती फिरत असावी, सगळ्यांना जागे करण्यासाठी....

 

रसिका राजीव हिंगे



Tuesday, 17 September 2024

बाप्पा.....

 बाप्पा.....


"येतो ग बयो मी."

"अरे कोण कुजबुजले कानात?" ओह बाप्पा बोलतोय.

 निघालास तू! हो जावे लागेल म्हणतोय. ठीक आहे. तुला म्हणून सांगते बाप्पा, तुला काय सांगते! सगळं तुला माहीत असतं. तरी सांगते, ऐक. श्रावणाच्या सरी येतात. उन पावसाचा खेळ खेळत. घननीळ सावळ्या, जांभुळल्या मेघांच्या संगतीने त्या सरींमध्ये चिंब भिजताना सृष्टीच्या मोहक रुपात सारे जगत वेडावून जाते. श्रावण सरींचा आनंद लुटायला लागले की लगेच भादवा घेऊन तू वेशीवर उभा दिसतो. मग मात्र साऱ्यांचे भान हरपतं. तुझ्या तयारीसाठी तुझ्या भक्तांसवे सृष्टी ही सज्ज होते. तुझ्या साठी काय काय करू न किती करू असे प्रत्येकाचेच आहे बरं का. तू येतो वाजत गाजत. ढोल ताशांच्या गजरात.कधी कधी निसर्ग सुद्धा मेघांच्या मृदंगाने तुझे स्वागत करतो. फक्त आनंद आणि आनंद. सकाळ संध्याकाळची तुझी आरती करण्याची सवय होते न होते तर तू आज लगेच माझ्या कानाशी कुजबुजला, येतो ग बयो. 

     तसा तू चराचरात भरलेला आहे. तू नाही अशी जागाच नाही. तरी तुझी जाण्याची वेळ आली की दाटून येतं बघ. कितीही कळत असलं की तू आहेच, समर्थ रामदास स्वामी कळकळीने सांगतात रीता ठाव या राघवेवीण नाही, दिसे घनदाट हरी भरलेला माऊली पण सांगते आहे. पण खरंच सांगू तुला, तुझे सगुण रूप पहायची सवय असलेल्या माझ्या सारख्या सामान्यांना हे पचनी पडत नाही. ज्याला जसे भावेल, जसे आवडेल त्या रुपात सजवायला फार आवडतं तुझ्या भक्तांना. तू पण निमूटपणे सगळे सोपस्कार करून घेतो. मजा वाटते न तुला. तुझ्याच फॅक्टरी मध्ये तयार झालेल्या वेगवेगळ्या मानव रूपाला बघतांना. हौशे, गवशे, कुणी तुझ्यावर प्रेम करणारे, कुणी तुला आजमावत असतं तर कुणी तुझी परीक्षा घेत असतं. तुझ्या उत्सवात सगळ्यांना बिनधास्त प्रवेश असतो. राग नाही येत का रे तुला? कुणी कसाही असू दे तू त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतोच. तीनही गुणांच्या पल्याड असलेला तू, काळाची सत्ता तुझ्यावर चालत नाही असा तू , तूच ब्रह्म आहेस, तूच कर्ता तूच धर्ता आणि हर्ता ही तूच. उत्पत्ती, स्थिती, लय सगळं सगळं तूच तू. मग आता मला सांग सगळं तूच आहेस तर हे लीला वैभव कशासाठी रे. तुझी स्थापना, तुझी आरती, तुझे विसर्जन हे सगळे कशासाठी बाप्पा. तुझ्या अनुसंधानात राहण्याचा हा एक मार्ग आहे हे सांगतो आहेस न तू. मान्य आहे. तू आलास की जातो पण. पुन्हा येण्याचे वचन देऊन. वर्षभर तू येणार तू येणार असे म्हणत सतत तुझ्या नामात सारे असतात. तुला जे करायचे ते तू करतो. तुझे नाम सतत घ्यावे म्हणूनच तुझा हा अट्टाहास असतो. जे तुझे नाम घेतात त्यांनाही जे हवे ते देतोस अन् जे तुला आजमावत असतात, तुझा तिरस्कार करतात, त्यांनाही देतोस. रामावतारात रावणाचा उद्धार केलास आणि पूर्णावतार कृष्णाच्या रुपात कंसाचा उद्धार केलास. अजब तुझी माया. माझ्यासारख्या अज्ञानी भक्ताला काही कळत नाही हे खरं आहे तरी पण बाप्पा, तुझी माया आवर आता, अन् कळू दे मला तू आणि मी एकच आहे.... एवढंच सांगायचे आहे.....


रसिका राजीव हिंगे

Tuesday, 10 September 2024

प्रवास.

 


जीर्ण झालीत पाने

रोजनिशीची अन् आयुष्याची पण....

एक एक अनुभवाचे पान....उलटले

किती शिल्लक आहेत पाने..कोण जाणे

त्या एका परमात्म्याशिवाय..

कर्माचे पारडे जड झाले की पुण्याचे!

हिशोब कसा लागणार?

नकळत घडलेल्या पापांचा आणि पुण्याचा पण

धनी आहेच की मी....

संचित कमी..झाले..वाढले....कशी करावी बेरीज वजाबाकी...

किती ठिकाणी ठेवल्यात खुणा...

आठवणीसाठी...कधी काटेरी..तर..

कधी सुगंधित फुलांसारख्या...विरून गेल्या..

की पुसट झाल्यात...काही कळत नाही...अन्

वळत ही नाहीत...लेखणी असते...

सोबत रोजनिशीच्या...पण आयुष्यातील..

एक एक सोबत गळत जाते...एकट्याचा...

प्रवास असतो का हा?.... नाहीच...तो...

ईश्वर...परमात्मा असतो न सोबत....

लेखणी सारखाच.......


रसिका राजीव हिंगे 

Saturday, 22 June 2024

सप्तपदी

 


rasraj#सप्तपदी#विवाह संस्कार#


     विवाह संस्कार! गृहस्थाश्रम स्वीकारण्याची पहिली पायरी. अत्यंत पवित्र असलेला हा संस्कार दोन मनांना जोडणारा, दोन घराणी एकत्र बांधणारा, सोयरा निर्माण करणारा. सोयरा याचा अर्थ एकमेकांची सोय जाणतो तो. अनेक शास्त्रशुद्ध विधी असलेल्या ह्या संस्कारातील सप्तपदी हा एक विधी. 

सप्तपदी हे रोज चालते

तुझ्यासवे ते, शत जन्मीचे हो, माझे नाते

     सप्तपदी चालणे म्हणजे एक यज्ञ आहे. आपल्या जोडीदाराबरोबर सात पावलं म्हणजे आयुष्यभर चालायचे म्हणजे एकमेकांचे गुणदोष स्विकारून निर्दोष वृत्तीने, कोणताही विकल्प मनात न ठेवता केलेली वाटचाल म्हणजे सप्तपदी. फक्त अग्नीभोवती सात फेरे घेणे म्हणजे सप्तपदी नव्हे. अग्नीला साक्षी ठेवून, जी सात पावलं चालली जातात त्याला अर्थपूर्ण असा शास्त्रीय आधार आहे, त्या मंत्रांमध्ये शक्ती,सामर्थ्य आहे. विवाहानंतर येणाऱ्या जबाबदारीची, कर्तव्याची जाणीव आहे. गृहस्थाश्रम स्वीकारण्याची एक प्रकारे ही संमती आहे. शास्त्रानुसार सप्तपदी चालताना जी वचनं एकमेकांनी द्यायची घ्यायची आहे ती खरेच आचरणात आणली तर आयुष्य सुखाचं होईलच शिवाय मनुष्य जन्माचे सार्थक होईल. समाधान लाभेल.

     प्रत्येक पाऊल समजून उमजून उचलायचे आहे हा विचार सप्तपदी देते. जोडीदाराच्या हातात हात देऊन केलेली ही वाटचाल म्हणजे प्रत्येक क्षणी, सुख दुःखात मी तुझ्याबरोबर आहे याची ग्वाही आहे. एकमेकांना आधार,सहाय्य करावे या जाणिवेतून जीवनाची यशस्वी वाटचाल करायची आहे.

     पहिले पाऊल शाश्वत म्हणजे कायम टिकणारे. तुझे माझे नाते हे काम टिकणारे राहो. सुख दुःखाचे डोंगर उभे राहिले तरी सारासार विचार करून सहनशीलतेने कायम तू माझ्यासोबत रहा. क्षुल्लक कारणावरून वाद नको व्हायला. असे हे निरंतर कायम टिकणारे नाते निर्माण व्हावे.

     दुसरे पाऊल हे विश्वासाचे आहे. नाते तेव्हाच टिकेल जेव्हा एकमेकावर दृढ विश्वास असेल. विश्वासाने हात हातात दिलेला आहेस तर त्याचे सार्थक करण्याची जबाबदारी दोघांची आहे. एकमेकांचे बळ, शक्ती वाढवीत आयुष्य जगायचे आहे. 

     तिसरे पाऊल दृढ परिचय. एकदा विश्वास टाकला की मनातले सगळे संकल्प विकल्प यांचा निरास होऊन ओळख वाढत जाते. Made for each other असेच वाटायला लागते. प्रेम आणि विश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचे आहे.

     चौथे पाऊल प्रतिसाद. साद घातली की प्रतिसाद मिळावा. सुख देणारी, कुटुंब व्यवस्था सांभाळणारी तू हो. जीवनात अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरे शोधायची म्हणजे सोबत तू असशील तर सहज शक्य होईल. 

     पाचवे पाऊल सन्मान. कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ, याचे उत्तर शोधूच नये. आपापल्या कर्तृत्वाने अहंकार न करता याचे उत्तर देता आले तरच एकमेकांचे होता येते, एकमेकांचा सन्मान केल्या जातो. सन्मान म्हणजे रोज पायघड्या घालाव्या असे नाही. पण अपमान होईल असेही वागू नये.

     सहावे पाऊल महत्वाकांक्षा. सन्मान करतांना मोठेपणाची हाव मनात नसावी. मी मी माझे माझे अशी वृत्ती असेल तर संसार सुखाचा कसा होईल?.  कुणी कोणाची सेवा करावी हा प्रश्नच नको निर्माण व्हायला. एकमेकांप्रती आदर ठेवला की मोठेपणाचा हव्यास आपोआप गळून पडतो.

     सातवे पाऊल आत्मसमर्पण. इथे आत्मसमर्पण म्हणजे शरणागती नव्हे. हा एक पैलू असला तरी दोघांनी मिळून सामर्थ्य, धैर्य, संपत्ती यासाठी ईश्वराला प्रार्थना करायची आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहील यासाठी प्रयत्नशील असावे. तसेच सकारात्मक विचारांची कास धरली तर उत्तम संतती प्राप्त होईल. निष्ठा, एकत्रता, सख्य असेल तर संसार सुखाचा होईल.

     अर्थात संसार म्हटला की भांड्याला भांडे लागणारच पण त्याचा आवाज दिवाणखान्यात येता कामा नये. सप्तपदी कडे फक्त एक इव्हेंट म्हणून न पाहता त्यातील मंत्राचा प्रभाव किती खोलवर आहे, सुखावह आहे आयुष्य जगण्यासाठी हे पाहिले तर खरेच संसार छान होईल. उठसुठ घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे ते कमी होईल हे निश्चित.  मित्रत्वाची भावना असेल तर नात्यामध्ये परिपक्वता येते. या संसाराच्या सहप्रवासात कधी कोणी सारथ्य करावे तर कधी कोणी रथी व्हावे. कधी नमते घ्यावे तर कधी पडते घ्यावे. तरच संसाराच्या सारीपटावर मनासारखे दान पडेल अन् सौख्याचे क्षण अनुभवता येतील...हे निर्विवाद सत्य आहे..


©️®️रसिका राजीव हिंगे 



    








Thursday, 13 June 2024

बाप

 बाप


बाप म्हणजे..कवच कुंडले..

जन्मजात मिळालेले...

भीती युक्त आदर असलेला

बाप...म्हणजे वेगळंच रसायन..

आई देव रूप असेल तर बाप

प्रत्यक्ष देव आहे...

येत नाही ओळखता..असतो

तोपर्यंत...झेलून घेतो सगळी

संकटे...आस पण लागू देत

नाही..एवढं बळ कुठून आणतो..

चंदनासारखा झिजत राहतो...अन्

सुगंधित करतो बाळाचं आयुष्य...

नाही शब्द त्यांच्या शब्दकोशातच

नसतो... जीवाचं रान करतो..

पण सुखं आणून देतो... स्वतःचं 

मन मारून हौस पूर्ण करतो.. तो

असतो बाप...भिऊ नकोस..

मी आहे म्हणणारा असतो बाप...

आयुष्यावरची...घनदाट सावली...

पण कधीही न दिसणारी..फक्त 

जाणवणारी गडद सावली...म्हणजे

बाप..परमात्म्या सारखा.....


रसिका राजीव हिंगे 

Saturday, 8 June 2024

अपेक्षा का करावी?


 


अपेक्षा का करावी?

#rasraj#अपेक्षा#संचित#प्रारब्ध#कर्म#

     


     भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेली अशी ही आपली कुटुंब संस्था आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असायचे. साठ लोकांचे असलेले कुटुंब मी स्वतः पाहिले आहे. आजचा एक मिनी इव्हेंट होईल इतके सगळे एका छताखाली गुण्यागोविंदाने राहत असत. पुढे काळ बदलला, काळाची गरज म्हणून विभक्त कुटुंब अस्तित्वात आली. पर्याय नाही म्हणून दूर राहूनही नात्यांमध्ये जवळीक होती. हळूहळू व्याप वाढत गेले, दूर राहिल्याने आपसूकच संवाद कमी होऊ लागले. आज इतका अतिरेक झाला आहे की नात्यांमधला संवाद हरवत चाललाय. मी आणि माझं असे करता करता आपलं याला जागाच राहिली नाही. जो तो फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतो आहे असे चित्र समोर दिसते आहे. पालकांच्या आणि मुलांच्या संवादात दरी निर्माण झाली आहे. आईवडिलांचे फक्त शारीरिक आरोग्य जपणे म्हणजे त्यांची काळजी घेणे असा सर्वसाधारण समज म्हणा किंवा अलिखित नियम झालेला आहे. पण त्यांच्या मनाच्या आरोग्याचे काय? हा प्रश्न अनुत्तरीत राहतोच. जसे प्रत्येक नियमाला अपवाद आहेत तसे याला पण अपवाद आहेतच. मी माझ्या मुलाला मोठे करताना किती कष्ट घेतले, म्हणजे अगदी हाडाचे काडं केलीत, रक्ताचे पाणी केले, रात्रीचा दिवस केला असा भावनिक पातळीवर आईवडील विचार करतात. मी केलं म्हणजे त्याने किंवा तिने आमचं करायलाच पाहिजे, निदान दोन शब्द प्रेमाने बोललेच पाहिजे असा अट्टाहास असतो. अपेक्षा असते. व्यावहारिक पातळीवर हे ठीक आहे. पण आईवडील आणि मुलांच्या नात्यामध्ये असा विचार का येतो? इथे भावना महत्वाच्या आहेत असे नाही तरीही हे साटेलोटे आहेच. कशासाठी? हा तर व्यवहार झाला. वास्तविक पाहता जिथे व्यवहार येतो तिथे प्रेम संपतं. आणि जिथे अपेक्षा आहे तिथे अपेक्षाभंग आहेच. 

     आपल्या मुलांनी उत्तुंग भरारी घ्यावी, विदेशात शिक्षण आणि नोकरी करावी हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते, नव्हे असा आग्रहच असतो असे म्हटले तर वावगे ठरू नये. पण तो आकाशाला गवसणी घालत असेल तर त्याच्याकडून पुन्हा स्वतः बद्दलच्या अपेक्षा ठेवू नये.  जेव्हा मला गरज असेल तेव्हा त्याने यावे. नाही आला तर त्याला काही प्रेमच राहिले नाही, आईवडिलांची काळजी नाही, साधा फोन सुद्धा करत नाही या गोष्टींना काही अर्थ उरत नाही. मी त्याचा बोट धरून त्याला चालायला शिकवले म्हणजे त्याने माझी म्हातारपणाची काठी व्हावी हे गृहीत धरल्यामुळे अपेक्षाभंग होतो. 

     आईवडील आपल्या मुलांवर चांगलेच संस्कार करतात. घरातले वातावरण, रूढी, परंपरा अनुभवत, अजमावत मुले मोठी होत जातात. काही प्रमाणात का होईना सुसंस्कृत मुले घडविण्याचे दायित्व पालक पार पाडत असतातच. तरीही माझा मुलगा आमच्याकडे लक्ष देत नाही याला जबाबदार कोण? प्रत्येक प्राणीमात्र जन्माला येतांना त्याचे कर्म आणि संचितानुसार आपले प्रारब्ध घेऊन येतो. जसे प्रारब्ध असेल तसे भोग भोगल्याशिवाय पर्याय नाही हे अगदी सामान्य माणूस सुद्धा जाणून आहे. मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याचे काही कर्तव्य असतात. मुलांना मोठे करून या जगात जगण्याचा मार्ग दाखविण्याचे कर्तव्य प्रत्येक आईबापाला करावे लागते म्हणण्यापेक्षा प्रारब्धाने ही जबाबदारी टाकली आहे. जन्मजन्मांतरीचे आपले जसे कर्म असेल तसेच सुख आणि दुःख आपल्या वाट्याला येतात. यात बदल होत नाही. ते स्वीकारावेच लागतात. असे असेल तर विदेशात गेलेला मुलगा आला नाही, तो आला असता तर त्याची आई गेली नसती, तिने देह ठेवला नसता याला काहीच अर्थ नाही. कारण जे निर्माण झाले आहे त्याचा नाश अटळ आहे. तिचा जीव मुलांमध्ये अडकला होता. त्यांची भेट झाली असती तर कदाचित ती गेली नसती. हे सगळे पाण्यावरचे बुडबुडे आहेत. केव्हा यायचे आणि जायचे हे ठरलेले आहे. सांगून सवरून येणे जाणे नाही. तरीही मुलांना दोषी ठरवून आईबाप मोकळे होतात. असे अजिबात नाही की मुले सर्वस्वी बरोबर आहेत. आईबापाचे जसे कर्तव्य आहे तसेच मुलांचे पण आहे. प्रत्येक जण आपापल्या कर्माचे फळ भोगत असतोच, त्याशिवाय सुटका नाही. कोणीही यातून पळवाट काढू शकत नाही अन् अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेले नाही. 

     कर्म, संचित, प्रारब्ध याचा विचार नाही केला तरी एक जबाबदार माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न केला, समाजभान ठेवले तरीही जीवनात अपेक्षित यश मिळेलच आणि आनंदही. कोणाकडून कशाचीच अपेक्षा न ठेवता  प्रारब्धानुसार आपले कर्तव्य पार पाडले तर संवादाची ही जी दरी  निर्माण झाली आहे ती कमी होईल. आरोप प्रत्यारोप केल्यामुळे संचित कमी होणार नाही तर मनुष्य जन्माला आला आहेस न मग तुला क्रियामाण कर्म करण्याचा अधिकार आहे. सत्कर्म आणि सदाचार करत रहा आणि आनंदरूप होऊन जगण्याचा प्रयत्न करावा. यापरीस दुसरे सुख ते कोणते!...


रसिका राजीव हिंगे

Friday, 31 May 2024

अनावश्यक खर्च टाळता येतात...

  


 


अनावश्यक खर्च टाळता येतात...

#rasraj#खर्च#संसार#

 

    मोह आणि आसक्ती माणसाला सरळ सात्विक जीवन जगण्यापासून परावृत्त करतात हेच खरे. आजकाल सोशल मीडियावर होणाऱ्या जाहिरात बाजीमुळे नको तिथे लक्ष जाते आणि अमाप खर्च होत जातो. हे खरे असले तरी स्वतः चा स्वतःवर संयम असला की बऱ्याच गोष्टी टाळता येतात.

     पूर्वीच्या काळी कोंड्याचा मांडा करून काटकसर केली जात असे. म्हणजे घरात जे आहे तेच करून खाणे असा अलिखित नियम होता. आवड निवड असा काही प्रकार नसायचा. तरीसुद्धा समाधान असायचे. एकटाच कमवणारा असल्याने  कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी घरातल्या गृहिणीला काटकसर करून संसार करावा लागत असे. काडी काडी जमवून मुलांना सुशिक्षित करण्या सोबतच सुसंस्कृत करण्याची हातोटी पूर्वीच्या स्त्रियांमध्ये होती. 

     काळाची गरज म्हणून स्त्री उंबरठया बाहेर पडली. हातात पैसा खेळू लागला आणि भरीसभर पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संस्कृतीचा पगडा, विविध प्रलोभने, माणसाला खर्च करायला भाग पाडू लागलीत. पैसा आहे म्हणून खर्च करावाच का? हा प्रश्न कधीच पडत नाही कारण तो खर्च करण्यासाठीच असतो असे गृहितक झाले आहे जणू.  पूर्वीच्या काळी ज्या आवश्यक गरजा आहेत त्याच पूर्ण करण्या कडे कल होता. पण आज आवश्यकता नसेल तरी खरेदी (शॉपिंग) केले जाते. कधी हौस म्हणून तर कधी प्रलोभनांना बळी पडून. 

     कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलंमुली फॅशन म्हणून वाट्टेल तसे कपडे खरेदी करतात. ज्याची इतकी आवश्यकता पण नसते. तिच्याजवळ इतके आहेत तर माझ्याजवळ पण हवेत असा अट्टाहास असतो आणि पालक तो पुरवतात. का? कशासाठी? पालकांनी जर सांगितले नाही गरज इतक्या कपड्यांची तर काहीतरी परिणाम होऊ शकेल एखाद वेळेस. लहानपणा पासूनच या सवयी लावल्या तर फायदा होईलच. कपड्यांसारखेच चपलांचे जोड असतात. प्रत्येक ड्रेस वर मॅचींग हवे. या सगळ्या अनावश्यक गोष्टी टाळता येऊ शकतात. ज्याने खर्च कमी व्हायला मदत होईल.

     मॉल संस्कृती ने तर अक्षरशः धिंगाणा घातला आहे. एकदा मॉल मध्ये गेले की नको असलेल्या बऱ्याच गोष्टी घेतल्या जातात. घ्यायला गेलो असतो एक अन् घेऊन येतो दहा वस्तू ज्याची खरच गरज आहे का याचा विचार करावा असे का वाटत नाही. असूया. सगळ्यांकडे आहे मला पण हवे. या विचारातून अनाठायी खर्च होतो आहे याकडे हेतू पुरस्पर कानाडोळा केला जातो.

     असेच सौंदर्य प्रसाधने. मॉल मध्ये किंवा इतर कुठेही इतकी महाग असतात की सर्वसामान्य लोकांना परवडणारी नसतात. तरीही ती घेतली जातात. विशेष म्हणजे या सौंदर्य प्रसाधनांमुळे मूळचे सात्विक सौंदर्य नष्ट होते आहे हे कळत नाही. एखादे दुसरे घ्यावे स्टेटस मेन्टेन करण्यासाठी. भरमसाठ घेतली जातात. वाट्टेल तसा खर्च यावर होतो. हा खर्च अनावश्यक आहे. समजा यातून पैसे वाचले तर छान पुस्तके खरेदी करून वाचावीत. त्यामुळे ज्ञानात भर पडेल. पण आज कोणाला ते नको आहे. याला अपवाद असू शकतील. 

     किराणा दुकान आज असे राहिलेच नाही की काय असे वाटते. सुपर शॉपी मुळे यादीतील वस्तू सोबत यादी बाहेरच्या ही वस्तू घेतल्या जातात. रेडी टू कुक या बद्दल तर काही बोलणेच खुंटावे. आयते मिळते आहे न घेऊन घेऊ. वेळ कुठे आहे करायला. पण पासष्ट रुपयाचे बटाटा पराठा चे पाकीट आणले तर त्यामध्ये फक्त आठ पराठे झाले. तेच जर घरी केले असते तर पासष्ट रुपयात तीन चार वेळा आठ पराठे झाले असते. किती खर्च वाचला असता. आवड असली की सवड मिळते हे खरे जरी असले तरी काटकसर करून संसार करण्याची कला अवगत असली की चार पैसे गाठी बांधले जातात असा सरळ सोपा विचार का येत नाही. 

     किती अन् काय केले म्हणजे संसार काटकसरीचा होऊन अडीअडचणीच्या वेळी पैसा उपयोगी पडेल याचा सारासार विवेक जागृत ठेवून जर खर्च केला तर संसारात आनंदी आनंद निर्माण होईल यात तिळमात्र शंका नाही. फक्त थोडा विवेक आणि विचार करण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी लागेल. अगदी सोपी आहे ही सवय लावणे फक्त स्वतःची तयारी हवी......


रसिका राजीव हिंगे

Wednesday, 22 May 2024

जागतिक वाढते तापमान एक समस्या

 



जागतिक वाढते तापमान एक समस्या

#rasraj#तापमान#हवामान#पृथ्वी#

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।

     जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी हा अभंग लिहिला कारण त्यांना वृक्षांचे महत्व पटले होते. ज्या गोष्टीचे महत्त्व कळते ती गोष्ट आपल्या जीवाभावाची असते यात शंका नाही. अलीकडच्या काळात रानावनांचे महत्व किंवा उपयोग म्हणू, फक्त जंगल सफारी एन्जॉय करण्यासाठी होतो आहे. त्यातील वनस्पती, पशू, प्राणी, पक्षी यांचे दृष्टीसुख घेण्या पुरसे होतो की काय असे वाटायला लागले आहे. बेसुमार जंगल तोड, वृक्ष तोड यामुळे वातावरणातील गारवा, थंडावा हरवत चालला आहे. परिणाम पृथ्वीचे तापमान वाढते आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. पण ते ओरबाडून घेतले तर तोही कोपेलच. त्याला पण राग येतोच की. 

     स्वतः च्या सुखासाठी विज्ञानाच्या टिमक्या मिरवत जी निसर्गाची अवहेलना केली जात आहे त्याचे परिणाम आपण सगळेच भोगत आहोत.  ऋतुचक्र बदलले का? नेमेची येतो पावसाळा ही म्हण आज खोटी का ठरते आहे? याचा विचार करून पाहिला तरी इतकी भयानक परिस्थिती समोर उभी राहते की क्षणात मनातला विचार झटकून टाकल्या जातो. 

     पाणी जपून वापरा असे नुसते म्हटल्याने खरेच पाणी जपून वापरल्या जाईल का? मी एकट्याने जास्त पाणी वापरल्याने काय फरक पडणार आहे असा प्रत्येक जण विचार करतो अन् हवे तसे वागत राहतो. फक्त स्वतः पुरसे जगणे मानव शिकला आहे. थोडाच विचार करा, आज मला पाणी मिळाले, उद्या माझ्या बाळाला पाणी नाही मिळाले तर काय होईल?  पाण्याचे साठे भराभर संपत आहेत, वेळेवर पाऊस पडत नाही, कुठे ओला दुष्काळ तर कुठे कोरडा दुष्काळ, कशामुळे? पृथ्वीचे वाढलेले तापमान.  बाष्प तयार झाले तरच त्याचे ढग तयार होतील अन् वारा लागून पाऊस पडेल. पण बाष्प तयार होण्यासाठी आधी पाणी तर हवे न पृथ्वीवर. हे दुष्ट चक्र कुठेतरी तर थांबायलाच हवे. मानव निर्मित आहेत ही संकटे. 

     प्रगतीच्या नावाखाली विविध प्रकल्प राबवले जातात. रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी विषारी वायूची निर्मिती करावी लागते. हे करत असताना हा विषारी वायू वातावरणात पसरत जातो. त्याचे दूरगामी परिणाम होऊन धरणी माय गुदमरते आहे. समुद्र मंथन करताना मंथनातून विष निघाले त्यावेळी भगवान शिवाने ते ग्रहण केले अन् सगळा अनर्थ टळला.  जर भगवान शिव यावे असे वाटत असेल तर प्रगती व्हावी पण निसर्गाचे रक्षण हे ऐरणी वर हवे म्हणजे प्राधान्याने करायला हवे. तरच मानव टिकू शकेल.       

औद्योगिक क्रांती करण्याच्या नादात मोठमोठ्या कारखान्यांची निर्मिती झाली. त्यातून निर्माण होणाऱ्या घातक वायू आणि कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण वाढले की हरित गृह परिणाम होतो. हरित वायू परिणामा मुळे तापमानात वाढ झाली. अनेक शास्त्रज्ञांनी हरित वायूंचे परिणाम तापमान वाढते आहे असे सांगितले आहे. मानव निर्मित कार्बन डायऑक्साइड चे प्रक्रियेमुळे पृथ्वी तापते आहे. कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण नियंत्रित केले नाही तर फार मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 

     या विघातक वायूमुळे पृथ्वीच्या ओझोन वायूच्या थराला धक्का बसतो आहे. ओझोन वायूचा थर सूर्याकडून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून रक्षण करतो. हा थरच जर कमी झाला किंवा त्याला भगदाड पडले तर हे सूर्याचे किरण पृथ्वीला किती तापवतील विचार करा. हे तापमान सहन न झाल्यामुळे कितीतरी प्रजाती नष्ट होतील. त्यामुळे रोगराई पसरेल, आताच आपण कोरोना सारख्या राक्षसासी झुंजलो आहे. तापमान वाढले तर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार आहे, खाऱ्या पाण्याच्या प्रवाहात शेती करणे कठीण होईल. विचार करू या, कारण विचारांनीच ज्ञान मिळतं. 

     निसर्गाचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य समजून त्याची निगा राखली तर तो ही त्याच्या स्वभावा नुसार भरभरून देणार आहे हे लक्षात ठेवावे. आपली वनराई, पाण्याचे साठे, खनिजांचे साठे, थोडक्यात आपल्या निसर्ग संपत्तीचे रक्षण करणे हेच सत्य आहे त्रिवार सत्य आहे. तरच आणि तरच आपला तरणोपाय आहे......


©️®️रसिका राजीव हिंगे 

      


     

Sunday, 12 May 2024

अट्टाहास दरवळण्याचा...





फुलला होता अंगणात

शुभ्र धवल मनमोहक..

अन् गंधभारला पण.

वायू सुद्धा सुखावला...

त्याचा गंध...मिरविण्यात

आसमंत सुगंधित झाला

कणकण दरवळला...

सृष्टी हर्षली.....अन्

मोहित झाली त्या गंधावर...

ऋतुराज वसंत आल्याची..

नांदी होती ही....

काळ्याभोर कुंतली ऐटीत 

विराजमान झालेला शुभ्रसा गजरा...

मन वेधून घेणारा.

रम्य कैलासशिखरी 

पिनाकपाणी तिष्ठला...

आदिशक्ती केव्हा या फुलांचा

भार मला अर्पण करेल...

अपर्णेची वाटुली पहात होता...

ती आली....क्षणात तिने...

ओंजळ रीती केली तिच्या

प्राणसख्याच्या चरणांवर...

अन् मोगरा ही थरारला....

कृतार्थ झाला... महेशाच्या

चरणी स्थिरावून... सार्थक

झाले उमलण्याचे, फुलण्याचे....

आता निर्माल्य झाले तरी....

तरी दुःख नव्हते....

शिवशक्तीचा सहवास म्हणजे

मोक्ष निश्चित आहे...

याच साठी होता अट्टाहास...

दरवळण्याचा... गंधाळण्याचा...


रसिका राजीव हिंगे 







Friday, 3 May 2024

रूढी आणि परंपरा

रूढी आणि परंपरा


     पहाटेचे अभ्यंगस्नान, तेलाचा दरवळ उटण्याचा सुगंध पदार्थांची रेलचेल, फटाक्यांची आतषबाजी अशी झाली दिवाळी साजरी चार दिवस परंपरेनुसार पारंपरिकपणे. सगळे कुळकुलाचार सांभाळत. लेकीचे माहेरपण करतांना स्वतःचे माहेर लक्षातच रहात नाही. जसे आईने केले तसेच पुढे ही परंपरा सुरू असते. रूढी मनात घर करून बसतात आणि त्यानुसार परंपरा पाळल्या जातात, मनात भीती घेऊन किंवा घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा दबाव! म्हणण्यापेक्षा धाक यामुळे असेल कदाचित. 

     काळानुरूप बदल होतात आणि ते अपेक्षित ही आहेत. आजच्या सारखाच उद्या कुठे असतो. नव्हे या क्षणासारखा पुढचा क्षण देखील नसतो. त्यामुळे ज्या रीतीभाती आहेत, रूढी आहेत त्या जपाव्यात पण शास्त्रात सांगितल्या नुसार जे योग्य आहे ते करावे. आपले शास्त्र इतके पुरातन आहे की त्यामध्ये जीवन जगताना जे आवश्यक आहे तेच सांगितले आहे. जशा चालू आहेत तशाच चालू ठेवाव्यात. कुणीतरी एखादा तर यातून कशी न काही उचलत असेलच. उगाच आपल्या संस्कृतीची टिंगल न करता ज्याला जे रुचेल,पचेल ते त्याने घ्यावे. म्हणून तरी या रूढी आणि परंपरा, रीतिभाती पुढे अशाच चालू राहाव्यात.

     अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या परंपरा म्हणून पुढे चालविल्या जातात. एखादी त्यावेळेसच्या काळानुसार केल्या गेलीली गोष्ट तीच पुढे तशीच चालू राहते, त्यात बदल होत नाहीत. आता महालक्ष्मी हा सण. प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. भाव तोच असला तरी साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे. सुरुवात जिथून झाली त्यावेळी जी परिस्थिती असेल, जे उपलब्ध असेल त्याचा उपयोग करून आपली भक्ती, श्रद्धा आपण जोपासत असतो. त्यावेळी महालक्ष्मी चे आवाहन करताना त्यादिवशी भाकरी आणि मेथीची भाजी असेल तोच नैवेद्य दाखवला. कारण अंबाबाई म्हणजे माहेरवाशीण  घरी आली तर तिचे आगत स्वागत करायला हवे हा साधा भोळा भाव मनात. झाले तिथून सुरू झाले आमच्याकडे भाकरी आणि मेथीची भाजीच नैवेद्याला असते. मला थोडक्यात हेच सांगायचे आहे की जसे आणि जे उपलब्ध असेल त्याने सण साजरा करावा. त्यात काळानुसार घरातल्या कर्त्या स्त्री च्या म्हणण्यानुसार बदल घडत जातात आणि ह्याच परंपरा आहे असे मानल्या जातात. आज जर तुम्ही तुमच्या वेळेनुसार पंच पक्वान्न जर वाढले तर देवी खाणार नाही का? अहो ती तर जगन् माय आहे. स्वतःच्या लेकरावर ती रागे भरेल का कोपेल का? आधी कुलाचार म्हणजे काय? ते का करतात, ह्या कुलाचाराच्या, सणांच्या परंपरा का सुरू झाल्या याचे ज्ञान आपल्या पुढील पिढीला जर दिले गेले न तर आपल्यापेक्षाही ही पिढी चांगल्या रूढी आणि परंपरा जोपासतील यात तिळमात्र शंका नाही. कुलदेवतेचे स्मरण व्हावे, तिची आपल्यावर कृपा राहावी हीच एक माफक अपेक्षा आहेत आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या परंपरेच्या मागे.  मग आपण ती कशी करतो यापेक्षा ती परंपरा पाळतो हे महत्वाचे आहे. 

     श्राद्ध पक्ष या बाबतीत पण तेच. आपल्या पितरांचे आपल्याला आशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांचं स्मरण करणे. शास्त्रात सांगितले म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी अनुभवाच्या कसोटीवर शास्त्र नियम लिहिले आहेत. पिंडदान करायचे म्हणजे ज्यावेळेस ते गेले ते स्वतः इथे येत नाहीत तर पिंडदान करण्याच्या वेळी ते ज्या जन्मात असतात तिथून ते येतात अन् आपली सेवा पिंडदान स्वीकारतात. असे अगदी अधिकारी असलेल्या गुरुजींनी आम्हाला गोकर्ण  महाबळेश्वर येथे सांगितले. शास्त्राला आव्हान देऊ नये असे असले तरी पिंडदान याला पर्याय अन्नदान नाही असेही ते गुरुजी म्हणाले. अन्नदान हे पुण्यकर्म निश्चित आहे. सत्कर्म आहे अन्नदान करणे. वेळ मिळत नाही ही सबब असली तरी एक पंधरावीस मिनिटांचे तर्पण केले तरी आपले पूर्वज संतुष्ट होतात. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतात. फक्त डोळसपणे ते पाहता आले तर परंपरा आणि रुढीचे ओझे वाटणार नाही. महत्वाचे म्हणजे का करायचे याचे ज्ञान व्हायला हवे. वयोमानानुसार किंवा त्यावेळच्या परिस्थितीनुसार एखादी क्रिया घडली तर तीच पुढे चालत येते. त्यामागचं शास्त्रीय कारण समजून घेतले तर नव्या रुपात जुन्याच रूढी आणि परंपरा आपल्या समोर येतील येतील येतीलच....


रसिका राजीव हिंगे 


Monday, 22 April 2024

मारुती राया...

 



तुला जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा...

मी इतकी मोठी नाही रे..

तुला शुभेच्छा देण्याइतकी..

तूच तर सांभाळतोस चराचराला..

तूच दिलेले तुला देतांना..

आनंद होतो बरं... 

जे मला मिळाले आहे ते कोणीतरी

दिलेलेच आहे न...म्हणून मी माझे

माझे करू का? हा देह सुद्धा मला

उसना मिळालेला आहे...माझे विचार..

माझी बुद्धी सगळेच परमात्म्याचे..

माझा फक्त अहंकार आहे...तो तू घे..

मी तू पण सरू दे माझे म्हणजे मला..

तुझ्या चरणी स्थिरावता येईल...

श्रीगुरुच्या कृपेने....

यासाठीच तुला शुभेच्छा देते आहे..

माझा अहंकार घे तू अन् मला स्वरूपाची

ओळख करून दे...

यापरिस काय मागू तुझ्याकडे...


रसिका राजीव हिंगे

Sunday, 21 April 2024

सामन्यातून असामान्यतेचा प्रवास महर्षी ब्रह्मगुप्त - गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ

 



महर्षी ब्रह्मगुप्त - गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ


     गरज ही शोधाची जननी आहे असे वचनच आहे. जसा जसा मानव विकसित होत गेला,त्याच्या गरजा वाढत गेल्या आणि या गरजांतून जिज्ञासा, कुतूहल वाढत गेले, यातून कळत नकळत बरेच शोध लागले, आणि विज्ञानाची प्रगती झाली. संशोधनाच्या पद्धती विकसित झाल्या आणि प्रगतीची अनेक क्षितिजे मानवाला खुणावू लागली. मुख्यत: खगोलशास्त्र, भूगोल, गणित, वैद्यक या क्षेत्रांमध्ये संशोधन केले. विश्वाचे गूढ उकलणं आग णि मानवी प्रगतीला अत्यावश्यक असलेले संशोधन शास्त्रज्ञांनी केले.

     प्राचीन काळापासून अनेक ऋषीमुनींनी, शास्त्रज्ञांनी आपल्या अनुभवाच्या कसोटीवर ज्ञान घासून जे शोध लावले ते आजही भारतीय संस्कृतीला प्रेरक ठरतात आहे. त्यापैकीच एक आहेत महर्षी ब्रह्मगुप्त! सातव्या शतकातील एक प्राचीन गणितज्ञ आणि खगोशास्त्रज्ञ. त्यांनी केलेले संशोधन भारतातील गणित आणि खगोलशास्त्र याच्या विकासासाठी उपयुक्त ठरले आहे, तसेच अरबांनी त्यांच्या ग्रंथाचे भाषांतर करून पुढे  युरोपमध्येही ब्रह्मगुप्ताचे संशोधन गणितज्ञाना प्रभावित  ठरले आहे.

     ब्रह्मगुप्तांचा जन्म राजस्थान मधील भीनमाळ या शहरात सन 598 मध्ये झाला.  आपल्या पूर्वजांबद्दल म्हणजे अशा थोर,महान व्यक्तीबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. लिखाणाचे साधन किंवा पाठांतर यावर त्याकाळी भर असल्यामुळे ही असेल कदाचित. त्यांच्या सुरवातीच्या काळातील त्यांच्या जीवनाबद्दल,शिक्षण, कौटुंबिक माहिती उपलब्ध नाही. पण त्या काळाच्या परिस्थितीनुरूप त्यांनी गणित आणि खगोलशास्त्र याविषयात  शिक्षण घेऊन महत्वाचे कार्य, शोध आपल्यासमोर ठेवले हे विशेष. जगाच्या दृष्टीने गणितीय योगदान फारच महत्वाचे ठरले.

     ब्रह्मगुप्तांच्या काळात आजच्या सारखे संगणक, कॅल्क्युलेटर  वगैरे नव्हते. स्वतः आकडेमोड करून सिद्धांत तयार करावे लागत असे. अंक म्हणून शून्य ही संकल्पना मांडली. शून्याचा समावेश असलेले समीकरणांचे नियम त्यांनी विकसित केले.दशांश संख्या प्रणाली जी आजही आपण वापरतो तिचा पाया ब्रह्मगुप्तांनी घातला आहे. किती प्रखर बुद्धिमत्ता होती. गणितासारख्या विषयात त्यांनी दिलेले हे योगदान फार महत्वाचे ठरले आहे. बीजगणितीय तंत्रात चतुर्भूज समीकरणांसाठी उपाय प्रदान केले. एकाधिक अज्ञान(two or more than variables) जसे की x, y, z यासारखे variables असलेले समीकरण याची उकल करण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. (x+3=5) तसेच नकारात्मक गुणांक(-2, -3, -4)असलेले समीकरणे यासाठी उपाय सांगितले आहेत. भारतीय बीजगणितीय तंत्राच्या विकासाचा पायाच त्यांनी घातला आहे.

     ब्रह्मगुप्ताने सन 628 मध्ये ब्रह्मस्फूटसिद्धांत हा अंकगणितावरील सर्वसमावेशक असा ग्रंथ लिहिला. यामध्ये अपूर्णांक, बीजगणितीय समीकरणे,संख्या प्रणाली या विषयी सोदाहरण विवेचन केलेले आहे. हा ग्रंथ त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी लिहिला. हा ग्रंथ लिहिण्या मागचे कारण सांगताना ब्रह्मगुप्त म्हणतात, "ब्रह्मदेवाने सांगितलेले ग्रहगणित पुष्कळ काळ लोटल्यामुळे दृक प्रत्ययाच्या निकषावर अचूक येत नाही,म्हणून जिष्णूगुप्तांचा पुत्र ब्रह्मगुप्त ते स्पष्ट करून सांगत आहे." यावरून असे दिसते की, स्वतः वेध घेऊन ज्योतिष शास्त्रात शुद्धता आणण्याचे महनीय कार्य ब्रह्मगुप्ताने केले आहे, प्रखर बुद्धिमत्ता आणि स्वतः वेध घेऊन ज्योतिषशास्त्रात संशोधन केले होते. उज्जैनच्या वेध शाळेचे प्रमुख होते ब्रह्मगुप्त.

     गणित या विषयाच्या सगळ्याच क्षेत्रात किंवा आपण विभागात म्हणू ब्रह्मगुप्तांनी मुशाफिरी केली आहे. भूमिती सारख्या क्लिष्ट विषय देखील त्यांनी सहजपणे हाताळला आहे. भौमितिक आकार म्हणजे त्रिकोण, चौकोन, वर्तुळ अशा आकृत्यांचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्रे तयार केली.  चक्रीय चौकोनाचे क्षेत्रफळ मोजण्याचे सूत्र तयार केले. त्रिकोणामिती मध्ये काटकोन त्रिकोण याविषयीचे त्यांचे ज्ञान, साईन , कोसाईन ची गणना करण्यासाठी तयार केलेली सूत्रे त्याला प्रमेय म्हणता येईल, ती आजही आपल्याला मार्गदर्शक ठरत आहेत. अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार या व्यतिरिक्त प्रमाण आणि गुणोत्तरांची संकल्पना ब्रह्मगुप्ताने सर्व प्रथम मांडली.

     खगोलशास्त्रीय घटनाची गणना अचूक करण्याचे तंत्र विकसित केले. ग्रहांची स्थिती, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण यांची स्तिथी, कोणत्या वेळेस, कधी असेल याची अचूक गणना पद्धती शोधली. त्यामुळे याचा अंदाज घेता आला. पृथ्वीचा परीघ त्यांनी दोन decimal  पर्यंत अचूक मोजला आहे. खगोलशास्त्रीय घटनांची अचूक गणना करण्यासाठी त्यांनी ऑस्टोलेब्स आणि सनडियल ही उपकरणे तयार केली.

     सन 665 मध्ये खंडखड्याक हा ग्रंथ त्यांनी लिहिला. पण ब्रह्मस्फुटसिद्धांत सारखा हा ग्रंथ जास्त प्रचलित झाला नाही. यामध्ये ही गणिती आणि गणना याविषयी माहिती असावी. ब्रह्मस्फुटसिद्धांत (ब्रह्माच्या ग्रंथात दुरुस्ती) हा ग्रंथ नंतरच्या विद्वानांनी, गणितज्ञांनी आभ्यासला. 

     ब्रह्मगुप्ताच्या संशोधनाचा गणित आणि खगोलशास्त्राच्या विकासावर खोलवर परिणाम झाला, केवळ प्राचीन भारतातच नव्हे तर त्यानंतरच्या आलेल्या नवनवीन संस्कृतींवरही. त्याच्या ग्रंथांचे नंतर अरबीमध्ये भाषांतर करण्यात आले, ज्याने इस्लामिक जगामध्ये गणिताच्या विकासावर आणखी प्रभाव पाडला.

     ब्रह्मगुप्ताच्या कर्तृत्वाने आणि अंतर्दृष्टीमुळे भारतीय गणितातील आणि खगोलशास्त्रातील एक प्रणेते,  म्हणून त्यांची कीर्ती निर्माण झाली.  या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी सगळे भारतीय आणि जगातील ज्यांनी त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास केला, त्यांचे ग्रंथ संदर्भ म्हणून उपयोगात आणले ते सगळेच त्यांचे ऋणी आहेत यात तिळमात्र शंका नाही.


रसिका राजीव हिंगे


प्रश्नावली


1. महर्षी ब्रह्मगुप्त कोण होते?

उत्तर - महर्षी ब्रह्मगुप्त ज्यांना ब्रह्म गुप्त किंवा ब्रह्म स्फुट असेही म्हंटले जात. ते एक प्राचीन गणितज्ञ आणि खगोल शास्त्रज्ञ होते.


2. ब्रह्म गुप्त यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? त्यांच्या वडिलांचे नाव काय होते?

उत्तर - ब्रह्म गुप्त यांचा जन्म राजस्थान मधील भीनमाळ या जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जिष्णूगुप्त होते.

3. ब्रह्म गुप्ताने कोणते ग्रंथ लिहिले?

उत्तर -  ब्रह्मस्फुटसिद्धांत आणि खंडखड्याक हे दोन ग्रंथ ब्रह्म गुप्ताने लिहिले आहे.

4. ब्रह्म गुप्तांच्या सिद्धांताची रचना केव्हा झाली?

उत्तर - ब्रह्मस्फुटसिद्धांत ची रचना इसवी सन 628 मध्ये झाली.

5. ब्रह्म गुप्ताने ग्रंथ कोणत्या विषयावर लिहिलेले आहेत?

उत्तर - ब्रह्म गुप्ताने लिहिलेले ग्रंथ गणित आणि खगोलशास्त्र या विषयावर लिहिलेले आहेत.

6. शून्य अंकाचा शोध कोणी लावला?

उत्तर - ब्रह्म गुप्ताने शून्याला स्वतः च्या गुणधर्म आणि क्रियांसह संख्या म्हणून स्थापित केले.

7. ब्रह्म गुप्ताचा व्यवसाय काय होता?

उत्तर - गणितज्ञ आणि खगोशास्त्रज्ञ या विषयातील विद्वान आणि शास्त्रज्ञ.

8. ब्रह्म गुप्त कोणत्या वेध शाळेचे प्रमुख होते?

उत्तर - उज्जैन येथील वेध शाळेचे ब्रह्म गुप्त प्रमुख होते?

9. ब्रह्म गुप्ताने खगोलशास्त्रीय अचूक गणना करण्यासाठी कोणती दोन उपकरणे डिझाईन केली आहेत?

उत्तर - खगोलशास्त्रीय घटनांची अचूक गणना करण्यासाठी त्यांनी ऑस्टोलेब्स आणि सनडियल ही उपकरणे तयार केली.

10. ब्रह्म गुप्तांचे ग्रंथ कोणत्या भाषेत अनुवादित झाले आहेत?

उत्तर - ब्रह्म गुप्तांचे ग्रंथ अरबी भाषेत अनुवादित झाले आहेत.


रसिका राजीव हिंगे