Friday, 11 February 2022

चित्रकाव्य

 



का पुन्हा पुन्हा

पुढे करते आहेस

हिरवी कंकणे.

नाव कोणाचं आहे

त्यावर...

कळलंय ग.

पण तुझ्या मनाच्या

गवाक्षात

काय दिसतं 

पाहिलंस तू?

मोरपिसापेक्षा ही

मऊ निळी झुळूक

आलो आहे 

घेऊन...

घे पांघरून.

राधेने घेतले 

तसे मुरलीचे

स्वर ...

सखी होऊन बघ न

कृष्णेसारखी...

दे झोकून आयुष्य

तेच होईल जे 

असेल

प्रारब्धात......


©रसिका राजीव हिंगे


Monday, 7 February 2022

चित्रकाव्य

 




संसाराची लक्तरे जरी

टांगली बयो वेशीवरती

तरी उद्याची स्वप्ने पहात

जगणे नवीन आशेवरती


हिरव्या देठी सामावलेत

नभी भरारी घेण्याचे बळ

खळाळ हास्य मुखावरती

देई सकला मनी आत्मबळ


दशदिशातुनी नवीन आशा 

होउनि आल्या अश्वावर स्वार

आवर सावर मळभ मनातले

उचल पाऊल मार्ग सहस्रार


तेजाळलेलं चांदणं नभी

अवकाश सारे कवेत घेई

नशिबाला दे उत्तर आता

भाग्योदय मग पुढ्यात येई


©रसिका राजीव हिंगे

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं....

 


स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं....

     "अरे चला उठा, काय झोपलेत सगळे? भाग्य दाराशी येतं तेव्हा असे झोपू नये."
     संध्याकाळी साडे पाच वाजता ऑफिस मधून घरी आलेल्या जानकीचा उर आनंदाने भरला होता.  चेहऱ्यावरून आनंद अगदी ओसंडून वहात होता. जणू साता जन्माची पुण्याई आज फळाला आली होती.
     हो. तिच्या मुलीचे मधुश्री चे लग्न ठरत होते. दुपारीच तिला ऑफिस मध्ये श्री. कुलकर्णी यांचा फोन आला होता. 
     " हॅलो, नमस्कार मी कुलकर्णी बोलतोय,  मधुश्री रोहितला पसंत आहे. तुमची  हरकत नसेल तर आपण या रविवारी भेटू आणि पुढचे काय ते सगळं ठरवू, चालेल का आपणास?"
     "ठीक आहे, मधुश्रीशी बोलून तुम्हाला कळवते."  अति आनंदाने तिचे पापणकाठ ओलावले. आधीच मधुश्रीशी बोलणे झाले होते. "त्यांच्याकडून जर होकार आला तर आपण पुढे जायचे. उगाच नकारघंटा वाजवू नकोस आता.
     जानकी राघवची वाट पहात बसली. केव्हा एकदा राघवला ही आनंदाची बातमी सांगते असे झाले होते तिला. सोफ्यावर पेपर चाळतांना विचारांच्या आवर्तनात केव्हा ती 26 वर्षे मागे गेली तिला कळलेच नाही.
     जानकी आणि राघव उच्च मध्यमवर्गीय जीवन जगणारे. राघव  आय.टी. कंपनी मध्ये नोकरी करीत होता तर जानकी बँकेत नोकरी करीत होती. दोघेही फावल्या वेळात जमेल तसे समाज कार्य करत होती. अनाथ आश्रमात जाऊन तिथल्या मुलांना खेळविणे,  खाऊ घेऊन जाणे किंवा वृद्धाश्रमात कोणाला औषधे देणे, त्यांच्याशी गप्पा करणे हे दोघांच्याही आवडीचे काम होते. समाजकार्य करतांनाच त्या दोघांची ओळख झाली होती. जानकी आणि राघवने  प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर  जसे जमेल तसे दोघेही त्यांचे कार्य करतच होते. हळूहळू त्यांच्या संसाराच्या गाडीने वेग घेतला.  एक गोंडस फुल मधुश्रीच्या रूपाने त्यांच्या आयुष्यात आले.
     मधुश्री चे बालपण, शैक्षणिक प्रगती, मित्र मैत्रिणी, तिचा तिच्या आईबाबांप्रमाणेच समाजातील वावर,घरातील आजी आजोबाचे संस्कार, सहवास, याच्या बळावर ती सुसंस्कृत आणि सुशिक्षित होत होती.
     सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करणाऱ्या जानकीला तिने डॉक्टर इंजिनियर होऊ नये असे वाटत होत. मधुश्रीला स्थापत्यशास्त्रज्ञ (architecture) व्हायचे होते. त्यासाठी तिने नाटा (National Aptitude Test for Architecture) ची प्रवेश परीक्षा दिली होती. तसेच JEE चा पेपर 2 पण दिला होता. प्रवेश परीक्षेचा निकाल आल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीत मधुश्रीला मनाजोगते महाविद्यालय मिळाले तिचा प्रवेश निश्चित झाला.
     पुण्यातच  प्रवेश झाल्यामुळे मधुश्रीला बाहेर शिकायला पाठवावे लागले नाही. त्यामुळे जानकीच्या जीवात जीव आला. बाहेर शिकायला पाठवणे म्हणजे तिच्याकडे लक्ष देणे शक्य होणार नाही असे तिला सारखे वाटायचे. पण इतर भागातल्या मुली एकट्याच येतात पुण्यात शिकायला याचे तिला कौतुक ही वाटायचे. अशा संभ्रमावस्थेत होती जानकी. तशी जानकी अनाथ आश्रमात असलेल्या मुलांना जाणत होती,अनुभवत होती, तरीही तिचं मन हळवं होत होतंच. अन राघव! त्याला आपल्या मुलीची बुद्धिमत्ता कोणत्या प्रकारची आहे  कळत नव्हते. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ हावर्ड गार्डनरच्या बहुबुद्धि   सिद्धांता नुसार हिची अवकाशीय म्हणजे स्थानिक(spital) बुद्धिमत्ता असावी का? कारण जे आपल्यासमोर नाही ते मांडणारे, त्याचे चित्र समोर उभे करणारे असतात स्थापत्यशास्त्रज्ञ.  मुळात कलेची आणि नाविन्याची आवड असलेल्या मधुश्री जवळ सौंदर्यदृष्टी होती. पाच वर्षाचे पदवीपर्यतचे शिक्षण 65 टक्के मार्क्स मिळवून पूर्ण झाल्यावर तिने  गृहविभाग हा विषय घेऊन पदव्युत्तर साठी प्रवेश घेतला. मनासारखे विषय असल्यामुळे भराभर यशाची शिखरे पादाक्रांत करत होती. पाहता पाहता तिचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले.
     आता पुढे नोकरी करायची होती. पण जानकीला वाटत होते की नोकरी तर करायचीच पण एकीकडे लग्नाचे पण पहायला हवे. पण यावर मधुश्री मूग गिळून चुप बसायची प्रत्येक वेळी.
     एक दिवस रात्रीचे जेवणं वगैरे झाल्यावर सगळेच गप्पा करत बसले असतांना जानकीने मधुश्रीला विचारले.
   " मधु आता तुझ्यासाठी स्थळ पहायला हवेत बाळा, आपण एखाद्या विवाह संस्थेत नाव नोंदवायचे का? तुझं कुठे काही बाहेर जुळलं असेल तर तसे सांग. पण काहीतरी निर्णय घ्यायला हवा आहे आता."
   तरीही मधु काहीच बोलली नाही उठून चालली गेली झोपायला. राघव जानकीला काही कळेना काय करावे.   दिवसेंदिवस मधुश्रीचे जास्त वेळ बाहेर रहाणे, उशिरा घरी येणे जानकीला खटकत होते. याविषयी राघव पण चिंतीत होता.
     तिची चाललेली घालमेल सासूबाईंच्या लक्षात येत होती. त्यांचेही मनात चलबिचल सुरू होतीच. कधी त्या जानकीला समजवायच्या, "पोरीची जात आहे थोडं तिच्या कलाने घेऊन पाहू. तरुण मुलीला अगदी तळहातावरच्या फोडासारखे जपावे लागते. तिच्या मनाविरुद्ध झाले तर काही करता काही होऊन बसेल."
     रात्रीचे साडे अकरा वाजून गेले तरी मधुश्री घरी परतली नव्हती. तिचा फोन पण बंद  होता. जानकीला काळीजी वाटायला लागली. कुठे असेल, कुठे अडकली तर नसेल ना, तिच्यावर काही संकट तर ओढवले नसेल ना, मन चिंती ते वैरी न चिंती असे तिला सारखे वाटत होते. राघव निघणार तेवढ्यात  मधुश्री घरात आली. तिला पाहून दोघांच्याही जीवात जीव आला.
     "कुठे होतीस मधु? किती वाजले. फोन तर करायचा उशीर होतो आहे म्हणून!" जानकीने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
     "आई मी काय आता लहान आहे का, प्रत्येकवेळी माझे अपडेट्स तुम्हाला देत राहू? सिनेमाला गेले होते मी." झाले ठिणगी पडली. राघव चिडला होता तिच्या ह्या उत्तराने.
     "कोण होतं मधु तुझ्याबरोबर?
     "स्वराज, माझा मित्र होता."
     आता तिला विचारण्यात काही अर्थ नाही असे वाटून दोघेही गप्प बसले. सकाळी बघू. रात्रभर झोप नाही. जानकीच्या डोळ्यातले अश्रू थांबायला तयार नव्हते. कुठे चुकली मी संस्कार करायला, मी आई म्हणून योग्य नाही का? सकाळी मधुशी बोलायचेच, जे  असेल ते होऊ दे आज, एक घाव दोन तुकडे. मधु उठल्याबरोबर राघव शांत पणे तिच्याजवळ बसला.
      "मधु तू मला सगळं सांगतेस, पण इतकी मोठी गोष्ट  माझ्यापासून का लपविलीस?. तुला मित्र असण्यावर माझा आक्षेप नाही. तू तुझ्या मित्रमैत्रिणी च्या ग्रुप बरोबर सिनेमाला गेली असतीस तर मला काही वाटले नसते पण फक्त तू आणि स्वराज दोघेच गेले, ते पण रात्रीच्या वेळी हे आक्षेपार्ह आहे बाळा. काय करतो हा स्वराज?"
     " चार वर्षे झाले बाबा तो माझा मित्र आहे, माझ्याच कॉलेजमध्ये होता. आम्ही दोघांनी लग्न करायचे ठरवले आहे."
     इथपर्यंत मजल गेली तरी तुला घरी सांगावेसे का वाटले नाही मधु?  तुझ्यावर आणि माझ्या संस्कारावर माझा पूर्ण विश्वास होता." जानकीला दुःख आवरत नव्हते.
     "मी स्वराजला सांगितले आहे, माझे बाबा जोपर्यंत हो म्हणत नाहीत आपल्या लग्नाला, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. बाबा तुम्ही प्लीज हो म्हणा"
     स्वराज  एका साध्या कंपनी मध्ये काम करत होता. शिक्षण जेमतेम बी.कॉम. पर्यंतच. Architechtur ला प्रवेश घेतला होता पण दोन वर्षातच सोडून दिले होते. घरी  आई वडील भाऊ आणि बहीण. अशा एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी पेलेलं का हा प्रश्न जानकीला नव्हताच, तर दोन वेळेचं जेवण तरी हा मुलगा आपल्या मुलीला सुखाने खाऊ देईल की नाही याची शाश्वती नव्हती तिला. त्याच्या बद्दल पूर्ण माहिती राघवने काढली तेव्हा खूपच विचित्र चित्र डोळ्यासमोर आले. मधूच्या काळजीने घरदार अगदी उदासले होते. 
     आजीच्या लक्षात येत होतं, काहीतरी मधूच्या मनात खळबळ चालली आहे. अनेक पावसाळे झेललेले, अनुभवाचे गाठोडे होते तिच्याजवळ.  मधु जवळ आजी जाऊन बसली, तिच्या डोक्यावरून,पाठीवरून हात फिरवला. तशी मधु आजीच्या कुशीत  रडायला लागली. तिला रडू दिले आजीने. थोडी शांत झाल्यावर आजीने तिला समजावले.
     " मधु, लग्न म्हणजे खेळ नसतो, ते असतं दोन घराण्याचं नातं, आपल्या सुरक्षेच्या कक्षा रुंदावल्या जातात लग्नामुळे हे तुला माहीत आहे का? प्रेम केव्हा? जेव्हा सहवास  असेल तेव्हांच. एकमेकांना समजून सहवासोत्तर जे प्रेम असतं नं ते खरे प्रेम. जगण्यासाठी व्यवहार हवा. आणि कालांतराने ह्या व्यवहाराचेच रूपांतर प्रेमात होतं बरं. म्हणून तुला सांगते जे पाऊल उचलशील ते योग्य विचार करून उचल." मधु काही बोलू शकली नाही. पण तिला जे समजायचे ते समजले होते.जेव्हा कळून वळत नसतं तेव्हा आजीसारखं कोणीतरी हवं असतं वळवणारं.
     राघव आणि जानकी अगदी मेटाकुटीला आले होते मधुश्री साठी स्थळ पाहतांना. शेवटी राघवने विचारले, "मधु काय ठरविले बाळा? "राघवने विचारताच मधु अगदी लहान होती त्यावेळी  तशीच आईच्या गळ्यात हात घालून म्हणाली बाबा तुम्ही म्हणाल तसंच. माझं मला कळलं आहे काय करायचे ते."
     मधूचे  शब्द ऐकले अन सगळं घर आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलायला लागले. घराचा कोपरा न कोपरा उत्साहाने भरून गेला.
     "जानकी कसला विचार करते आहे? कुठे हरविलीस?" राघवच्या आवाजाने जानकी भानावर आली.  राघवला पाहताच तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. सगळे आनंदाचे क्षण राघवच्या ओंजळीत देऊन जानकी पुढच्या तयारीला लागली. सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली लग्नाची तयारी करत म्हणता म्हणता लग्नाचा दिवस उजाडला.
     स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं.... मंगलाष्टकांचा गुरुजींचा स्वर कानावर आला अन जानकीच्या डोळ्यात आसवं गोळा झालीत...आनंदाचे, मुलीच्या विरहाचे, कृतार्थतेचे की परिपूर्णतेचे.......

रसिका राजीव हिंगे
अकोला
संपर्क - 8600047066
    
    
    

संवादन नात्यांचे...

 

साहित्योन्मेष लेख क्र. 2

  संवादन नात्यांचे...
      
    संवादन हे घडवित असते नात्याचे ते अतूट बंधन
    सहवासाने कळते सारे सरते माझे माझे मी पण

     "तीळगुळ घ्या गोड गोड बोला" असं म्हणत शेजारची धीटूकली माझ्याजवळ आली आणि तिच्या गोंडस, गोऱ्या, लहानग्या हातानी माझ्या हातावर तीळ गुळ दिला. देतांना  तिच्या मनात काहीतरी चालले आहे, डोळे काहीतरी बोलतात आहे असे वाटले मला उगाच. " काय ग तू खाल्ला का तीळगुळ? थांब मी देते तुला"
       "काय ग मावशी, फक्त तीळगुळ दिला की आजच्या दिवशीच फक्त गोड बोलायचं असतं की नुसतच म्हणायचे असते असं?"
       तसं काही नसतं ग! हे आपलं काहीतरी निमित्त असतं. तीळगुळ गोड असतो म्हणून" मी तिच्या प्रश्नांनी भांबावले होते.
       " सगळे खोटं बोलतात, कुणीच खरं सांगत नाही. कोणाला बोलायला वेळ पण नाही. असे काहीतरी अस्पष्ट मनाशी बडबडत ती निघून गेली. ती निघून गेली पण मी मात्र विचारांच्या आवर्तनात गुंतत गेले.
       संक्रांत! सूर्याचे मकर राशीत संक्रमण म्हणजे उत्तरायण प्रारंभ होतो तो दिवस किंवा उत्तरायणास गती देणारा म्हणून शुभ दिवस.  पर्व काळ शुभंकर. तीळगुळा सम एकमेकांना धरून,गोडी कायम ठेवून जीवन जगण्याचा संदेश देणारा हा सण. असे आपले सगळेच सण आहेत, संस्कार आणि संस्कृती जपणारे, शिकविणारे तरीही आपण काय शिकतो आहोत. कुठे चाललो आहोत. त्या छोट्याशा मुलीला कळले कुणीच बोलत नाही कुणाशी, सगळेच आपल्यात मशगुल आहेत. का असे व्हावे, कुठे हरवते आहे आपली संस्कृती, कुटुंब व्यवस्था हाच आपल्या संस्कृतीचा पाया आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. संवाद हा शब्दच शब्दकोशातून हरवला आहे का? ह्या प्रश्नांची रास माझ्यापुढे ठेवून ती गेली. जीवनाचे, जगण्याचे सार्थक व्हावे, म्हणूनच मानव जन्म लाभला आहे.
    चौऱ्यांशी लक्ष योनी फिरून आल्या नंतर मानवाचा जन्म मिळतो. जो सर्वश्रेष्ठ मानला जातो. अर्थात सगळेच प्राणीजीवन आपापल्या जन्मात श्रेष्ठच. पण कर्म करण्यासाठी, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होण्यासाठी म्हणजे मोक्षप्राप्ती साठीच मानवी जन्म आहे असे मानले जाते.
     गर्भात सोहम सोहम म्हणणारा जीव या जगात आल्याबरोबर कोहम कोहम म्हणायला लागतो. इतका लगेच या नवीन जीवाला अहं चा वारा लागतो की पुढे तर योग्य काय अयोग्य काय ह्याचा विचार करणे सुद्धा दुरापास्त होते. स्वतःचा शोध थांबतो आणि मीच सर्वश्रेष्ठ आहे असे आपण मानायला लागतो. मी आणि मी फक्त यामध्ये "तू" किंवा "तुम्ही" नाहीच, मग "आपण सगळे" तर दूरच राहिलो नाही का?  त्यामुळे काय होतंय, संवाद होतच नाहीत. घरातल्या घरात बोलायला वेळ नाही. इतका मानव पळत सुटला आहे.
     सगळ्यात महत्वाचे म्हणजे जीवघेणी स्पर्धा. स्पर्धा हवीच, त्याशिवाय खेळ कसा रंगणार? पण स्पर्धा ही निकोप हवी, हरण्यात सुद्धा विजयाची धुंदी यावी. पण कुणी पुढे जायला लागला की लगेच त्याचे पाय खेचायचे, षड्रिपू नी  नुसते थैमान घातले आहे. पुढे कसे जाता येईल, मी कसा सर्वश्रेष्ठ हे सिध्द करण्यासाठी नुसती पळापळ, दमायला तर होणारच ना! दमला भागला जीव उशिरा घरी आल्यावर मुलांना, घरातील इतरांना वेळ देऊ शकत नाही.
     साद घालता मिळतो
     प्रतिसाद जेथे जेथे
     सुख संवादन घडते
     मनामनातील तेथे
     प्रत्येक क्षेत्रात काळानुरूप बदल होत गेलेत.  स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर कष्ट, मेहनत करावी लागेलच, तरी कुठेतरी मर्यादा यावी, स्वतः मर्यादा घालता यावी. काळाची गरज म्हणून दोघेही नोकरी करतात, मुलांना उच्च शिक्षण देता यावे, सगळ्या हौशी पूर्ण करता याव्यात, थोडक्यात काय तर सुखाने जगता यावे यासाठी ही धडपड. पण सुखाच्या मृगजळामागे धावतांना आपलं काय अमूल्य हरवत चाललंय हे कळत नाही. सुखाच्या भोवऱ्यात अडकतांना आपण आपली मुलं ज्यांना आपली गरज जास्त आहे ती विसरत आहोत. सगळं मुलांसाठीच आहे असे जरी असले तरी हे सगळं सुख उपभोगायला मुलांना तयार करणे,घडविणे हे आईबाबांचे कर्तव्य आहे. असं फुकट आई बाबा नाही होता येत कधी.
     वीस बावीस वर्षाची मुलं आत्महत्या करतात. का? तर नैराश्य आले म्हणून. कुठून येतं हे नैराश्य. जगण्याला आता तर कुठे सुरवात होते आहे, सगळीकडून दडपण आलं असतं मुलांवर, मार्क्स मिळविण्याची सक्ती, इतके टक्के मिळायलाच हवे, सगळया कला क्षेत्रात पारंगत हवाच कारण किती स्पर्धा वाढली आहे. क्लास मध्ये ही आजपर्यंत माझ्या क्लासचा निकाल 100 टक्के आहे. प्रत्येकाने पास होणे गरजेचे आहे. अशा कितीतरी पद्धतीने मुलांवर आघात केले जातात. कोणी का विचार करत नाही त्याला जे व्हायचे असेल ते होऊ दे. कधीतरी आपल्या मुलांच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न करून तर पहावा. आपलंच सगळं बरोबर हे कसं शक्य आहे. या दडपणाखाली मुलं येतात आणि आत्महत्या करतात.
     घरात जेव्हा प्रेम, आपुलकी मिळत नाही त्यावेळी ही मुलं बाहेर ते मिळविण्याचा प्रयत्न करतात. एखादी अशीच फसव्या प्रेमाला भुलून नको त्या मार्गाने जात राहते. काही मुले व्यसनाधीन होतात. मग हेच पालक इतरांवर याची जबाबदारी टाकून मोकळे होतात. देशातल्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढून आपण किती जबाबदार नागरिक आहोत याचे दाखले देण्यात काय अर्थ. आधी आपण स्वतः ला बदलले पाहिजे. आपल्या बाळाला जर हवे ते देऊ शकत नाही तर इतरांकडून अपेक्षा का करावी? कारण अपेक्षा केली की अपेक्षाभंगाचे दुःख सहन करणे आलेच.
     मानव अनुकरणप्रिय आहे. घरातूनच नकळतपणे मुलांवर संस्कार होत असतात. "ये बैस, मी तुझ्यावर संस्कार करते" असे म्हणून संस्कार होत नसतात. आपल्या देहबोलीतून, वागण्यातून मुलं संस्कारित होत जातात.  संध्याकाळचे जेवण सगळ्यांनी एकत्रच केले पाहिजे असा माझ्या आईचा दंडक होता. जेवतांना हसत खेळत दिवसभरातील सगळा लेखाजोखा मांडला जातो. विचारपूस होते. मुलांच्या आनंदात सहभागी होता येतं. एकप्रकारे हा त्यांच्याशी साधलेला संवाद असतो. त्यातून प्रेम, जिव्हाळा, आपुलकी निर्माण होते.
     पूर्वी घरात  संध्याकाळी सांजवात लागायची. आजी आजोबा सगळ्यांना घेऊन परवचा म्हणून घ्यायचे, कधी गोष्ट सांगायचे. गोष्ट का सांगायची? तर त्यातून स्थिर बसण्याची, एकाग्रतेची सवय लागते. श्रवण भक्ती ही अशी बालपणापासून शिकवली जाते,जोपासली जाते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकमेकांचा सहवास लाभतो.
     आणि घडत जातो संवाद, जो नात्यांना करतो सुदृढ, सशक्त. आपल्या आजूबाजूला सुद्धा संवाद होणे गरजेचे आहे. उगाच वेळच नाही च्या सबबीखाली, आपले राहणीमान राखण्याच्या कारणास्तव शेजारी बोलायचेच नाही असे वागण्याचे काहीच प्रयोजन नाही. याउलट विचारांची देवाणघेवाण झाली तर नवं, चांगलं काहीतरी गवसेल, ज्यामुळे स्वतः तर मोठे होणारच, त्याचबरोबर देश ही मोठा होईल. स्वतःसाठी तरी कमीतकमी संवादन होऊ द्या. नात्याचे बंध अधिक पक्के होतील.
    
     माणुसकीचा कर धरूनिया विश्वासावर जगते दुनिया
     संवादाचे आंदण द्यावे बाल्य बहरते मोहरुनीया

रसिका राजीव हिंगे
अकोला
8600047066

    

मन अचपळ माझे......

 


मन अचपळ माझे......


      जसे मनात विचार

     तशी घडतसे कृती

     कधी मोजता येई का

     इवल्या मनाची गती 

        जशा आपण मनाला सूचना देऊ तसंच मन असतं किंवा होतं. सकारात्मक विचार करायला लागले की मन ही सकारात्मक कृती करायला लागतं. पण इतकं सोपं नाही अस्थिर आणि चंचल मनाला सूचना देणं.  मन! इवलं  म्हणता येईल का त्याला?. कधी इवलं तर कधी आकाशा एव्हढं. क्षणात इथे तर क्षणात  कल्पनेच्याही पल्याड. क्षणात मीच मनाशी भांडते तर मला कळण्याच्या आधीच ते दुसऱ्याच कुणाचा तरी विचार करायला लागलेले असते. हे लक्षात येतं आहे तोवर पुन्हा तिसरीकडेच उंडारत असतं. इतकं चंचल असतं मन. याला लगाम घालणे किती कठीण आहे हे कळतं पण वळत नाही . मनाची गती मोजण्यासाठी परिमाण तरी आहे का? असेल तर खरच गती मोजता येईल मनाची?असं का?  

        मना तू आहेस तरी कोण आणि कसा? तासनतास त्याच्याशी वाद घालत बसले, त्याला बोलतं करायचा प्रयत्न करत राहिले आणि माझ्या मनाने मला त्याच्या फक्त किनाऱ्यावर बसण्याची परवानगी दिली. त्यामुळे मला कमीतकमी मन आहे एवढंच गवसलं. 

        एखादं काम असल्याशिवाय आपले  पंचेंद्रिय सुद्धा कृती करत नाहीत पण मन मात्र , आपण कोणतंही काम करत नसेल तरी विचारांची आवर्तने मनात चालूच असतात. त्या विचारांशी निगडित आपले कार्य नसले तरी. फार कमी असं होतं की आपण जे कार्य करत असतो त्याविषयीच मन पण विचार करत असतं. ज्या वेळी हे विचारांचे दळणवळण थांबेल विचारांची आवर्तने थांबतील त्यावेळी मन सुद्धा स्थिर होईल.आणि हे शक्य करण्यासाठी सुद्धा मनालाच तशा सूचना द्याव्या लागतील म्हणजे सकारात्मक निकाल हाती येईल. 

        मन आणि बुद्धी याचा जवळचा संबंध आहे. एखादे भावनात्मक काम करत असाल तर मन ही भावविभोर होतं.मनाची भावनात्मक शक्ती जागृत होते. म्हणजे भावनेशी मनाचा संबंध आहे. बुद्धीच्या कसोटीवर केलेला एखादा संकल्प पूर्ण करायचा ठरवले तर मन ही दृढनिश्चयी होतं, मन कणखर होतं आणि आपला संकल्प पूर्ण होतो.म्हणजेच जसं आपण ठरवू तसंच घडत जातं.

         लहानपणी आई म्हणायची "अगं, मनाला आवर घाल, असं उंडारू देऊ नये मनाला. आतापासून मनावर ताबा ठेवायला हवा बयो." पण त्यावेळी कधी लक्ष दिले नाही या सुचनेकडे. जसं माती ओली आहे तोपर्यत तिला हवा तो आकार देता येतो.तसेच अगदी मनाचे असावे, लहान वयातच त्याचे स्थिर होण्याकडे लक्ष लागले की मग ते वाटेल तसे वाऱ्याच्या दिशेने उंडारत नाही. मनाचे एकदा लाड सुरू झाले की ते पुढे पुढे कोणाचे ऐकत नाही हे निर्विवाद सत्य आहे. आणि मग सुरू होते रस्सीखेच. काय चांगलं, काय वाईट हे ही कळत नाही. विशेष करून  वाईट मार्गावरच नेऊन ठेवतं माणसाला मन. सगळेच वाममार्गाला लागतात असे नाही पण तुलनेने विचार केला तर असेच दिसेल. ज्यांचे मन बालवयातच स्थिर व्हायला सुरुवात होते ते पुढे संतपदाला पोहोचतात, गुरुपदाला पोहचतात.

 येती नकोसे विचार

मनी सारखे सारखे

सकारात्मक कृतीस

होतो आपणच पारखे

     मनविचारांचा डोह इतका खोल खोल आहे की कितीही प्रयत्न केला तरीही सकारात्मक विचार करणे शक्य होत नाही. नको नको ते विचार मनात येतात, आपल्यास हवे असतील तसे विचार करणे अक्षरशः कठीण होऊन जातं. आधी मनात वाईटच विचार येतात.ठरवून सुद्धा चांगले विचार आपण करू शकत नाही. मग एखादी नैसर्गिक आपत्ती असो किंवा मानव निर्मित आपत्ती असो,अशा वेळी किंवा स्वतःच्या आयुष्याच्या वाटेवर चालतांना दुःखाच्या प्रसंगातही आणि सुखाच्या वेळीही आपण नकारात्मक विचार जास्त करतो असे मला जाणवतं

       सकारात्मकतेच्याच

       द्याव्या मनास सूचना

       भीती दहशत सारे

       खेळ तुझेच रे मना

असं काहीवेळेस वाटतं. मनातले विचार, त्यावरील कृती ही परिस्थिती सापेक्ष असावी. 

     असं म्हणतात मन मोठं असलं की त्यात सगळं   सामावलं जातं.  ब्रह्मान्ड   आहे मनात.  म्हणजे सगळीच सृष्टी भरली आहे आहे मनात. सारसार विचार करण्याची बुद्धी ज्यांना असते त्याचंच मन मोठं असावे. एखादी बहिणाबाई सारखी अशिक्षित बाई जेव्हा मनाचे सखोल विवेचन करते म्हणजे त्यांचं मन किती विशाल असेल. तरीही देवाला विचारलेच तू कसा यवगी आहेस, तुला कुठे दिसलं हे मन. अनुभवातून गवसलेलं तत्वज्ञान त्यांनी लिहिले. 

     समर्थ रामदास स्वामींनी पण मनाला उद्देशून श्लोक लिहिले आहेत. पहा म्हणजे मानवाला सांगून काही होणार नाही असे समर्थनाच कळले आणि त्यांनी थेट मनालाच गवसणी घातली. मनाचे श्लोक जे आज अजरामर आहेत, काहीतरी गवसेल या श्लोकातून असे प्रत्येक मानवाला म्हणजे ज्यांना समर्थ माहीत आहेत त्यांना कळतं आहे आणि त्याचा अर्थ,भावार्थ समजून घेण्याची इच्छा झाली  आहे.मनाचे श्लोक लिहिण्याचा मुख्य उद्देश प्रबोधन तर होताच, मनावर ताबा कसा मिळवायचा, हे सांगण्यासाठी मनाचे श्लोक समर्थांनी लिहिले असावेत.अशी अनुभव सिध्द आणि योगसामर्थ्य  परंपरा आपल्याला लाभली आहे तरीही आपण मनाला स्थिर करू शकलो नाही. 

     समर्थ मनाला गवसणी घालतात तर तुकाराम महाराज "मन करा रे प्रसन्न" म्हणत मनाचे सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न करतात. मन प्रसन्न असलं की सगळेच व्यवहार सुरळीत होतात, जगण्याचे निदान सापडले असे वाटू लागते. मनाच्या बळावरच मानवी देहाचा डोलारा तोलून धरला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मनोबल जर नसेल तर कितीही शक्ती असू दे साध्य होणार नाही. मनोधैर्य, मनोबल,मनशक्ती वाढविण्यासाठी आजकाल कितीतरी सेमिनार्स, कार्यशाळ मानोपसाचार तज्ञांच्या मदतीने आयोजित केल्या जातात.

     मन शांत, स्थिर करायचे असेल तर सद्गुरू चरणा शिवाय पर्याय नाही. कारण सद्गुरूच काय योग्य अयोग्य याचे ज्ञान भक्तास देतात आणि अगदी सोपा उपाय सांगतात  तो म्हणजे आपल्या आराध्याचे नामस्मरण. सोपा वाटणारा हा उपाय कठीण आहे मोठमोठ्या संतांना हे साध्य होत नाही. याचा अर्थ असा नाही की मन स्थिर करण्याचे प्रयत्न च करू नये. मन स्थिर करण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे नामस्मरण हाच आहे. 

        संकटांशी भिडण्याचे

       आहे सामर्थ्य माझ्यात

       ऐसे सांगावे मनास

       भीती जाईल क्षणात

 असे मनाला सारखे बजावत रहावे,सांगत रहावे, सकारात्मक विचारांची मांदियाळी एकदा मनात स्थिरावली की मन शांत शांत होईल.........