Sunday, 31 January 2021

मान्य आहे का?*



 *मान्य आहे का?* 


            कुठली गे तू सुंदरी

           आलीस माझ्या जीवनी

           आहेस का मान्य तुला

           साथ देशील का राणी


    असेच विचारेल का मला माझा साजण? हो साजणच! मी मनोमन वरलंय त्याला. 

    आज बागेत🌷🌺 आलेला राजहंस🦆 सांगत होता. सगळं ऐकून त्याला न पाहता ही मी केव्हा त्याची झाले कळलं ही नाही. अगदी माझ्या नकळत  माझ्या मनाची ही मनमानी सुरू होती.

    आता या हृदयीचे💕 त्या हृदयी व्हावे. आकाशाचे आणि धरतीचे जसे क्षितिजासी मिलन होतं तसेच घडावे.

    बागेत तळ्याकाठी बसून ही ललना असे स्वप्न रंगवीत होती. तिच्या स्वप्नात रंग भरायला  निसर्ग जणू तत्पर होता. सारे चराचर बहरले,मोहरले होते. गुलाबाचे ताटवे गंधाची उधळण करत होते तर एकीकडे शुभ्र निशिगंध दरवळत होता. 

    मनाची घालमेल थांबत नव्हती. शंका कुशंकाचे मळभ सारखे दाटून येत होते. खरच मान्य करेल का माझ्या मनीचा राजकुमार मला. 

    केव्हा एकदा भेटेल आणि माझ्या हृदयीचे गुपित त्यास सांगेल असे झाले होते मला. एकेक क्षण एकेक युगासारखा भासू लागला. चांदणे मनाला शांत करू शकत नव्हते. 

    कोण असेल हा,कसा असेल याचा विचार न करता मन का त्याच्या कडे धावते आहे. मनमंदिरी तर प्रीती दरबार भरला आहे जणू. अंगावर मोरपीस फिरावे इतके कोमल स्वर ऐकू येतात आहे प्रीती गीताचे. भारावल्या मनाने केव्हाच भावपुष्पांच्या पायघड्या अंथरल्या आहेत. 

    मनाचे अश्व असे चौखूर उधळले होते. त्याला लगाम घालणे शक्यच नव्हते. अन पांढऱ्या शुभ्र अश्वावर स्वार होऊन तो आला. नयनांची भाषा नयनांना कळली. या हृदयीचे त्या हृदयी झाले.

    मान्य आहे साथ तुझी

    ये साजणी खेळू खेळ 

    तुझ्यासवे डाव रंगेल

    आली आली शुभवेळ 



©️रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment