Sunday, 31 January 2021

चित्र ललित









             




             कोण गे तू सौंदर्यवती चंद्राची चंद्रिका

             सख्याची वाटुली पाहते अभिसारिका

     लांब क्षितिजावर रेंगाळणारी सांज जणू लुप्त झाली आणि हे जांभुळले मेघ आभाळात गर्दी करतायेत. आभाळ अगदी दाटून आलंय बघ न साजणा तू अजून आला नाहीस. 

     केव्हाही ह्या दाटल्या आभाळातून थेंबाचे पैंजण घालून या सरी कोसळतील आणि सारा परिसर चिंब होईल. वृंदावनी ये म्हणालास आणि अजून कसा नाही आलास? माझा भवताल पण तुझी आतुरतेने वाट बघतो आहे. झाडांची सळसळ थांबली आहे, वारा स्तब्ध झाला आहे, पक्षांनी सुद्धा त्यांचा कलरव आज शांत केला आहे.

     या स्तंभाच्या आधाराने व्याकुळ होऊन मी तुझी वाट बघते आहे. तुला आवडतो तसाच शृंगार मी केला आहे. माझ्या मोकळ्या कुंतली सुगंधित पुष्पांचे गजरे माळलेत तुला आवडतात म्हणून. दाटलेल्या मेघासारखीच माझ्या नयनातील काजळरेखा दाटून आली आहे. केव्हाही पापणकाठ ओलांडून सरी कोसळतील बरे आणि ही काजळरेखा पुसली जाईल.सारा शृंगार विस्कटेल राजसा. त्यापरिस तू झडकरी ये.

     आणि हे काय? या शुकास का पाठविलेस माझ्याकडे? हा काय माझे सांत्वन करणार का? तोच त्याच्या मैनेस सोडून आला माझ्याकडे. त्याचे चित्त तरी थाऱ्यावर कसे राहील बरे. आधीच मिलनास अधीर झालेला शुक मला कसा रिझवू शकेल? कळत नाही का रे हे.  

     मी त्यासाठीच जांभुळल्या मेघांना तुझ्याकडे पाठविले होते निरोप घेऊन. तेही तसेच आलेले दिसले माझ्याभोवती गर्दी करत आहेत.  मेघ ही अधीर झाले आहेत धरतीचे मिलनास.

         ये रे साजणा ये रे माधवा

         अधीर जाहली वेडी राधा

         वाटुली पाहुनी थकले रे

         थकली कान्हा तुझी राधा

     नभी चांदण्या आल्यात आता चंद्रही येईल आपला मिलनोत्सव पहायला. म्हणून सांगते ये आता सत्वरी शुक्रतारा नभी यायच्या आधी.....


©️रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment