उठा उठा चिऊताई*
*सारी कडे उजाडले*
*डोळे तरी मिटलेले*
*अजूनही* !*
अगं चिऊराणी ऊठ! किती वेळ झोपशील ग.... चल चारा
पाणी आणू आपल्या पिलांसाठी!
काय करायचं लवकर उठून... तुला आठवतं पूर्वी आपल्या आवाजाने सारे जग जागे व्हायचे. नादमय चिवचिवाट झाला म्हणजे चला कामाला लागा असा अलिखित नियम होता जणू.
पण आताशा कुठे आपल्या आवाजाने कुणी जागे होतं, उलट आपला आवाज येऊ नये म्हणून सगळं बंद करतात अन छान वातानुकूलन लावून निवांत झोपतात.
आणि समजा कुणाला लवकर उठावे लागले तरी आपल्या आवाजाकडे कुणाचेच लक्ष नसतं.... जो तो स्वतःतच मशगुल आहे रे.
झुंजूमुंजू झालं की अंगणात सडा सारवण व्हायचे, तुळशीजवळ, अंगणात सुबक रांगोळीचे रेखाटन व्हायचे आणि तुळशीच्या बाजूला आपल्यासाठी, आपल्यासारख्या पाखरांसाठी चिमूटभर दाणे ठेवलेले असायचे.
तुला सांगते चिमणराजा किती बरे वाटायचे रे त्यावेळी,खूप श्रीमंती नव्हती रे माणसाकडे पण सुबत्ता मात्र होती. घासातला घास देण्याची वृत्ती होती,त्यामुळे आपले विहरणे ही देखील त्यांच्यासाठी एक सवय झाली होती. त्यांच्या छोट्याश्या घरकुलात आपल्या घरट्यास जागा होती.
प्राणिमात्रांवर दया करा ही साधुसंतांची शिकवण होती ते जगत होती ही पिढी.
पण आता सगळंच बदललं आहे. यंत्राचा शोध लावता लावता मानव यंत्रवत झाला आहे. आपले अस्तित्व च धोक्यात आले आहे या यंत्रांच्या राज्यात.आपल्या बाळांचे कसे होईल ही काळजी वाटते आहे रे सारखी.
अगं चिऊराणी घाबरू नकोस. निसर्ग आहे ग हा. निसर्गाचं चक्र गोल फिरतं आहे. पुन्हा सगळं छानच होईल ग.
तुला सांगतो मानव पण पुन्हा निसर्गाचा विचार करतो आहे बरे..... आणि तो आहे न सगळ्यांचा निर्मिक.... तो जन्माला घालतो तर जगणही शिकवेलच न....
म्हणून सांगतो पुन्हा तसंच होईल... चिऊचा घास खाऊनच बाळ मोठं होईल.... आपला चिवचिवाट पुन्हा त्याला मोहवीत राहील. कारण कळलं का तुला निसर्गाचे देणे आहे ते जपावे असे आता मानवाला कळू लागलें आहे.
चल आवर आता,काय बोलत बसलो आपण, बाळे उठतील त्यांना चारा पाणी आणायला जाऊ या...
चल असे म्हणत दोघेही नव्या उमेदीने भुर्रकन उडाले.... नवा जोश, नवा उत्साह घेऊन......
दोघांनाही गाण्याचे स्वर ऐकू येऊ लागले...
*या चिमण्यांनो परत फिरा रे* *घराकडे अपुल्या.....*
अन दोघेही मनोमन हसले आनंदाने.....
©️रसिका राजीव हिंगे