Tuesday, 28 February 2023

पालवी

 


वेशीवरी आला

आला ऋतुराज

लेऊन कोवळ्या

पालवीचा साज


लालसर थोडी

जराशी पिवळी

हिरव्या रानात

पालवी वेगळी


चंपक फुलला

गंध बहरला

कुहुकुहू स्वर

सुरेल जाहला


आम्रतरू वरी

मोहर गंधला

हळदुल्या रंगी

बहावा फुलला


रम्य तळ्याकाठी 

विहरे गारवा

धवल मोगरा

कुंतली मारवा


रसिका राजीव हिंगे 





प्रतिबिंब

 



      केशरी रंगाचे वसने ल्याली पूर्वा सृष्टीच्या सौंदर्यात भर घालत होती. रविराजाच्या स्वागताला उत्सुक झालेली उषा राणी उगाचच आपला वाऱ्याचा पदर धरून सलज्ज उभी होती. हळूहळू रविराज सागराच्या कुशीतून वर आले अन् त्याचे लोभस केशरी तांबडे रूपाचे प्रतिबिंब सागराच्या पाण्यात उठून दिसू लागले. जणू निळे पाणी केशरी झाले. लाटा गगनाला गवसणी घालत उंच जणू रविराजला कवेत घ्यायला निघाल्या असाव्यात. अन् लाटांच्या मनातही सोनसळी प्रतिबिंब दिसू लागले. क्षणभर सागराला वाटले असावे रविराज त्याच्या पाण्यात उतरला आहे. पण हे भासमान आहे. सूर्य तर आकाशी तळपतो आहे. 

      पाण्यातले प्रतिबिंब भासमान असेल ही, पण मनातल्या प्रतिबिंबाचे काय? आपल्याच विचारांचे प्रतिबिंब जेव्हा  मन:पटलावर उमटतं तेव्हा सगळचं ढवळून निघतं. तेव्हा जसे विचार असतील तसेच त्याचे प्रतिबिंब उमटतं. काही वेळेस म्हणण्यापेक्षा बरेचदा वाईट विचार, नकारात्मक विचारच जास्त येतात. त्याचे प्रतिबिंब आपल्या देहावर देखील पडतं. त्यावेळी आपली देहबोली बदलत जाते. आनंदाचे क्षण आयुष्यात आले की मन ही आनंद विभोर होतं. याचे प्रतिबिंब डोळ्यात, बोलण्यात थुई थुई नाचत असतं, काळे मेघ दाटून आले की मयूर जसा पिसारा फुलवून नृत्य करतो अगदी तसेच. सकारात्मक विचारांचे प्रतिबिंब, कुठेही उमटले तरी ते सुंदरच उमटते,कारण ते राजहंसा सम दिसते. नकारात्मक कुरूप वेड्या बदकासारखे नाही. म्हणजे प्रतिबिंब जरी भासमान असले तरी त्याचा परिणाम आपल्या जगण्यावर होतोच होतो.

      एखादी नव यौवना सारखी आरसा घेऊन स्वतःचे प्रतिबिंब पहात असते. ती जशी असेल तसेच दिसेल हे तिलाही पटलेले असते, तरीही तिला हा चाळा लागलेला असतो स्वतःचे रुप न्याहळण्याचा. कधी आरशात तर कधी पाण्यात आणि हो कधीतरी कोणाच्या डोळ्यातही ती आपले प्रतिबिंब अजमावण्याचा प्रयत्न करते.  तिने पाहिले तिचे प्रतिबिंब, 

      षोडश वर्षा अवखळ बाला

      प्रतिबिंब पाही घेऊनी ऐना

      लाजत मुरकत गिरकी घेई

      सौंदर्य असे का मला दिसेना


रसिका राजीव हिंगे 

      

      


     

चाफा


 

गंधित सोहळे
चाफ्याचा बहर
अंगणी उत्सव
प्रहर प्रहर

प्रीत सोनचाफा
मोहरला मानी
हळूच गुपित
कुजबुजे कानी

डाव सुगंधाचा
दिसरात खेळे
भरे ठायी ठायी
परिमळ मेळे

सुखद क्षणांनी
मोहरे अंतरी
साक्षीदार चाफा
दुःखाच्याही द्वारी

रातराणी संगे
रंगे हितगुज
सुरेल सुगंधी
ओठी अलगुज

रसिका राजीव हिंगे
22.02.2023






निसर्ग विज्ञान

 




चल ये रे सोन्या,राजा,नामा
शोधूनी पाहू नवे काही
प्रदूषणाला आळा बसेल
असेच शोधू काही बाही

निसर्ग रम्य या सृष्टिवरी
विज्ञानाची कास धरू
जैसे आराधिले ऋषीमुनींनी
पंचमहाभूतांना आवाहन करू

नाव बलाढ्य पाण्यावरती
कशी तरंगते सागरात
प्रयोगातूनी सिद्ध करू या
नाद भरलाय आकाशात

नभांगणीचा रविराज तो
प्रचंड स्त्रोत ऊर्जेचा
साठवून घेऊ ठायी ठायी
नाश करू या अंधाराचा

निसर्गातले विज्ञान पाहू
कृत्रिमतेला जरा साठवू
जलस्त्रोत जमिनीतले
भरता येतील तसे भरवू

आठवते का सांग तुला रे
लहानपणीची गंमत न्यारी
भिरभिरणाऱ्या वाऱ्यासवे
पवनचक्कीची फिरे भिंगरी

झाले शास्त्रज्ञ बहुत इथे
पुण्यभूमी ही भारत माता
अंधश्रद्धेला देऊन फाटा
विज्ञान ज्योत उजळवू आता

रसिका राजीव हिंगे
20.02.2023




स्वप्न सत्यात येता

 



संध्याराणी फुलवत आली

स्वप्न मनीचे देख साजणा
प्रितीच्या या दरबारी गडे
कशी सावरू लाज सांग ना

गुलाब फुलले रानी वनी
रंग मेंदीचा हातावरती
जणू प्रीतीची लाली चढली
अवखळ या गालावरती

साक्षीदार बघ आला नभी
काळोखाचा पटल सारूनी
अवगुंठन शीतलतेचे
चराचरा देई पांघरुणी

असेच घडते क्षितिजासी
अंबर धरणीचे मिलनी
प्रणयाला येतसे भरती
उचंबळे सागर गगनी

स्वप्न सत्यात येता उमजे
जगण्याचे हे सारे बहाणे
याच साठी असे अट्टहास
गावे नवीन प्रीत तराणे

रसिका राजीव हिंगे
16.02.2022

थांग पत्ता मनाचा

 



थांग पत्ता मनाचा
कोणी सांगेल मला
प्रासाद की महाल
विचारू कोणाला

एका क्षणी जवळ
दुसऱ्या क्षणी दिसेना
शोधून थकले परी
काही केल्या आकळेना

उंडारे इथे तिथे
क्षणभर ना विसावा
स्थिर करू म्हणते
सापडेना ठावा

रानोमाळ फिरले
कडेकपारी धुंडले
कुठे आहे मना तू
हृदयात ही हुडकले

कसे आवरू तुला
थांग लागत नाही
कसे लगाम खेचू
तू काही भेटत नाही

रसिका राजीव हिंगे
15.02.2023


अबोल प्रीती...


    ऐश्वर्या! नावाप्रमाणेच ऐश्वर्य संपन्न. सौंदर्या बरोबरच बुध्दीचेही ऐश्वर्य लाभलेली. मेडीकल सायन्सला प्रवेश घेऊन स्त्रीरोग तज्ञ व्हायचे होते तिला. चारुता आणि सुबोधला आपल्या मुलीचे गुण पाहून खूप अभिमान वाटायचा. दोघेही आय. टी.कंपनी मध्ये नोकरीला होते. सतत घराबाहेर असल्यामुळे ऐश्वर्या आजी आजोबांच्या सहवासात लहानाची मोठी होत होती. चारुता आणि सुबोध दोघेही ऐश्वर्यासाठी वेळ देत होतेच. क्वालिटी टाइम देणे गरजेचे आहे हे दोघांनाही लहानपापासूनच बाळकडू मिळाले होते जणू. 

     ऐश्वर्या एमबीबीएस झाली. आता पुढे तिला गायनिक म्हणजे स्त्रीरोग तज्ञ होण्यासाठी मास्टर डिग्री घेणे गरजेचे होते. NEET PG ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि केजे सोमय्या वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र मुंबई येथे तिला प्रवेश मिळाला.

     सगळं सुरळीत चालले असले की नियती कुठेतरी खदाखदा हसत पुढे येतेच,असे म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या आयुष्यात सगळचं चांगलं कसं बरे असेल! ऐश्वर्या याला अपवाद कशी राहणार. 

     कॉलेजमधून हॉस्टेलवर घाईने  जाताना एका भरधाव जाणाऱ्या कारचा तिला धक्का लागला अन् ती खाली पडली.  क्षणभर तिला कळालेच नाही काय झाले नेमके. तिचा पाय दुखावला होता. तिला उठता पण येत नव्हते. मित्र मैत्रिणीच्या साहाय्याने ती दवाखान्यात पोचली. तिच्या पायाला प्लास्टर लागले. सगळा अभ्यास पूर्ण झालेला असूनही तिला सेमीस्टर परीक्षा देता आली नाही.  

     शनिवार असल्याने चारुता आणि सुबोध घरीच होते. दुपारी जेवण झाल्यावर गप्पा करत असताना ऐश्वर्याचा मोबाईल वाजला. 

     "हॅलो, कोण बोलतेय?"

     " नमस्कार, मी ज्ञानेश बोलतोय. माझ्या कारचा धक्का लागून तुम्ही खाली पडलात अन् तुम्हाला प्लास्टर लागले. क्षमा करा मला. माझ्यामुळे तुम्हाला परीक्षा पण देता आली नाही,याचे मला फार वाईट वाटते आहे."

     त्याला मध्येच तोडत ऐश्वर्या म्हणाली,"कोण आहात तुम्ही? माझा नंबर कसा मिळाला तुम्हाला. अन् क्षमा कसली मागता आहात! 

     "ते महत्वाचे नाही, मला भेटायचे आहे तुम्हाला."

     "मी भेटू इच्छित नाही तुम्हाला.  अन् मला पुन्हा फोन पण करू नका."

     असे म्हणून तिने फोन बंद केला. 

     "अगं असं काय करतेस ऐश्वर्या! त्याला काय म्हणायचे ते तर ऐकून घे."

     "आई, कशाला उगाच. कोण कुठला तो. त्याचवेळेस का नाही त्याने क्षमा मागितली? तेव्हा  नुसता ठोंब्यासारखा उभा होता. ऐश्वर्या खूप चिडली होती. ऐश्वर्या चिडली होती तरीही तिला आत कुठेतरी त्याला भेटायची इच्छा होत होती.

     दारावरची बेल वाजली. चारुताने दार उघडले अन् समोर श्री डोंगरे यांना पाहून तिला आश्चर्य वाटले.  डोंगरे सहा महिन्यांपूर्वीच तिच्या कंपनीत जॉईन झाले होते. मेहनती असलेले डोंगरे सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असत. फक्त त्यांचा रागाचा पारा एकदम चढत असे. 

     "या डोंगरेजी. अचानक येणं केलंय काही विशेष."

     "अरे मला हे माहीतच नव्हते की आपण इथे राहता. मी तर ऐश्वर्याला भेटायला आलो आहे. ऐश्वर्या....."

     "माझी मुलगी. तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.त्यामुळे ती इथेच आहे सध्या."

     "माहित आहे मला"

     "म्हणजे, तुम्ही ओळखता तिला."

     "नाही."

     चारुताच्या काहीच लक्षात येत नव्हते. आश्चर्य आणि भीती यांचे द्वंद्व सुरू झाले तिच्या मनात. तिने त्यांना बसायला सांगितले अन् ती ऐश्वर्याला विचारायला धावली. " कोण आले आहे ग आई?"

     "माझ्या ऑफिस मधील  डोंगरे तुला भेटायला आले आहेत."

     "तू सांगितले का ऑफिसमध्ये माझ्या अपघाताबद्दल?"

     "नाही ग, यांना कसे कळले देव जाणे बाई."

     चारुता भराभर तिचा बेड आवरू लागली. तोपर्यंत सुबोध आला होता ऑफिस मधून. तो तिथेच डोंगरे यांचेशी बोलत बसला होता. तिने सुबोधला ओळख करून दिली. ऐश्वर्याला भेटायला आल्याचे सांगितले. त्यावर सुबोध इतका सहज बोलला की त्यांची फार जुनी ओळख असावी.

     " हो माहित आहे मला. त्यांचा फोन आला होता. पण हे नव्हते माहित की हे तुझ्या कंपनीत आहे."

     "फोन आला होता म्हणजे, तुम्ही ओळखता का यांना?"

     "नाही, आजच ओळख झाली."

     चारुताचे डोके गरगरायला लागले. तिला कशाचाच काही थांग लागत नव्हता. चहा झाल्यावर डोंगरे सुबोध बरोबर ऐश्वर्याच्या खोलीत गेले तिला भेटायला. डोंगरेना पाहिले अन् जन्मजन्मांतरीची ओळख असावी असे ऐश्वर्याला जाणवले.

     "मी ज्ञानेश डोंगरे. व्यक्तीगत तुमची क्षमा मागायला आलो आहे इथे."

     आता उलगडा झाला चारुताला. डोंगरे म्हणजे कोण. ऐश्वर्या काय प्रतिक्रिया देते यावर तिघांचेही लक्ष होते. पण ती काहीच बोलली नाही. स्वतः च्या विचारात गुरफटल्या सारखी वाटली. चारुता  बोलायचे म्हणून म्हणाली, "पोहे करते चालेल न?" 

     "चालेल, काहीही चालेल."ज्ञानेश ऐश्वर्याकडे पहात बोलत होता. जणू तिला तो वाचत होता. अन् ऐश्वर्या! त्याच्याकडे न बघता त्याला अनुभवत होती,  सुखद मार्ग गवसत होता. 

     नयन बोलले मम हृदयाशी

     सांगून गेले गूज मनीचे

     अशीच अवस्था झाली होती दोघांचीही. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या तरी निमित्त हवे भेटायला. वाईटातून चांगले निघते म्हणतात ते असे. जगायला असाच एखादा भावक्षण पुरेसा असतो. खरे आणि निर्मळ प्रेम असेच असते अबोल, भावरम्य, गंधित आणि उत्कट. याची जाणीव ऐश्वर्याला झाली. सुबोध आणि चारुता आजी आजोबांच्या साक्षीने आपल्या लेकीची सुखाची वाट आनंदाश्रुनी शिंपीत होते, ज्ञानेश आणि ऐश्वर्या हा भाळलेला सुगंधित क्षण धरून ठेवण्याचा प्रयत्न करत होते....


रसिका राजीव हिंगे