Friday, 31 December 2021

चित्रकाव्य




पूर्वा ल्याली सोनसळ साज

आरक्त प्राची सवे रविराज

तम पेंगुळला वेगळा बाज

उषा स्वागता सावरीत लाज


पायात ताल छमछम वाळा 

सूर छेडीत थाट आगळा

लय साधता रंग सोहळा

वासुदेव ये कृष्ण सावळा


वासुदेवाची स्वारी आली

धनधान्यानी झोळी भरली

आषिशांची उधळण झाली

सृष्टी सारी तृप्त जाहली


जागवीत ये चराचराला

उत्साहाला नि चैतन्याला

अंगणात ही गंध पसरला 

अन रामप्रहर गंधित झाला


ऐसी रम्य पहाट यावी

धरा सावळी खुलून यावी

वासुदेवाची स्वारी यावी

सावळमाया दाटुन यावी


रसिका राजीव हिंगे



Sunday, 21 November 2021

चित्रकाव्य

 


निरागसता हृदयातली

पानाफुलात अवतरली

हास्यात फुलली फुले

जणू चांदणे नभातळी


कोमलता स्पर्शातली

निसर्गाने अनुभवली

सावळ्याशा भूईवरी

हळूवारशी अंथरली


निसर्गाची सृजनता

अंगोपांगी बहरली

जणू ही विश्वनिर्माती

रोमारोमी शृंगारली


हिंदोळ्यावर सृष्टीच्या

चंद्रमौळी धनसंपदा

आनंदही उधाणला

कुठे दिसेना आपदा


विश्वाच्या या प्रांगणी

जीवनचक्र चितारले

लक्ष लक्ष आकाशदिप

लावुनिया सजविले


©️रसिका राजीव हिंगे







Tuesday, 26 October 2021

लावण्य

 


      लावण्य म्हणजे लावण्य! याला पर्यायी शब्द असूच शकत नाही असे वाटतं. सौंदर्याची परिभाषा वेगळी, सौंदर्य पाहण्याची ज्याची जशी दृष्टी असेल तसे त्यास जाणवते.

     नाक तुझे चाफेकळी, नयन कमळाच्या पाकळीसम, दात कुंद कळ्या जणू, कुंतल म्हणजे तर काळ्या मेघांनी लाजावे आणि रेशमाला ही हेवा वाटावा इतके मऊ मुलायम. वर्ण गोरापान गव्हाळी, चाल म्हणजे गजगामिनी, आणि हास्य म्हणजे झुळझुळ वाहणाऱ्या निर्झराचा खळखळ.असे जिचे रूप ती लावण्यवती. अशी साधारण लावण्याची परिभाषा असावी.

     जसे सौंदर्य पाहण्याची दृष्टी तसेच लावण्य ही शोधण्याची दृष्टी प्रत्येकाजवळ असते. लावण्य आणि सौंदर्य एकच नाही पण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

     चंद्राचा शांत, शीतल, पिठूर,दुधाळ प्रकाश, काळ्याशार नभांगणात लुकलूकणारे चांदणे म्हणजे एखाद्या सौंदर्यवतीने काळी चंद्रकळा ल्यायली म्हणजे ती जितकी लावण्यसुंदर भासेल तसेच हे निसर्ग रूप आहे. लावण्याची लयलूट म्हणजे काय ते म्हणजे हे निसर्ग रूप.

     सूर्योदयाच्या वेळेस पूर्व क्षितिजावर जणू केशराची बाग फुलली की काय असे वाटावे इतके विलोभनीय दृश्य दिसते. एखादी पक्षांची माळ उंच आकाशी विहरत उडते हे मनमोहक लावण्य होय.

     सागराची लाट, शांत गाज, सागरावरून येणारी निळी झुळूक,  शंख शिंपले,सागरकिनारा, मऊ वाळू, झावळ्यांची सावली सगळंच वेड लावणारे लोभसवाणे. 

     कुठे कुठे लपलेले आहे लावण्य. सगळी परमेशाची निर्मिती, एखादा  कुरूप समजणारा असतो स्वतःला. तरी त्याच्याजवळ लावण्य असतंच कुठेतरी लपलेले. त्याच्या हास्यात,बोलण्यात, गुणात कुठेतरी लावण्य असतंच असतं. फक्त ते शोधता आले पाहिजे.

     परमेश्वराने जे जे निर्माण केले आहे ते ते सगळे लावण्यपूर्ण आहे कारण स्वतः परमेश्वर च लावण्यसुंदर आहे, मनमोहन आहे. त्यामुळे सारे चराचर म्हणजे लावण्याची खाण होय नाही का?......


©️रसिका राजीव हिंगे

     


     

Tuesday, 28 September 2021

चित्रकाव्य




निळ्या सागरी फुलून आली

हिरवी हिरवी सृष्टी न्यारी

निळे आकाश झुकले थोडे

नवयौवन हे तोलून धरी


प्रीतसागरी जणू पहुडली

निळी सावळी प्रीत बावरी

मंत्रमुग्धही झाले क्षण क्षण

जलाशयाच्या खोल अंतरी


तरंग उठती लाटेवरती

जलबिंदूचे भासे नर्तन

धुंद मन जरा हिंदोळले

कोण नाविका तू मनभावन


वात्सल्याच्या छायेतूनी

जीवन नौका पार करी रे 

सावळमाया धरी सुकाणू

चरणी आता आश्रय दे रे


रसिका राजीव हिंगे


Monday, 27 September 2021

चित्र ललित

 

गंध फुलांचा गेला सांगून

तुझे नि माझे व्हावे मिलन


      अल्लड नवयौवना धुंद गंधाळल्या क्षणांना सोबत घेऊन तिच्या प्रियाच्या कानी अलगद गुज सांगण्यासाठी निघाली. मंद गार वाऱ्यामुळे तिचे कुंतल ही तिच्या गर्भ रेशमी गालांशी लगट करताहेत. काय बरे सांगायचे आहे तिला!

      तुझी नि माझी  उत्कट प्रीत आता मिलनाकडे वाटचाल करते आहे. ऐक ना सखया, सारे चराचर दरवळले आहे आपल्या प्रीतीच्या सुगंधाने. 

      होय! गंधित च आहे आपले नाते. अगदी पुराण काळापासून चालत आलेला वारसा आहे हा. प्रेम ही एक तरल भावना. प्रत्यक्ष परमात्मा सुद्धा या भावनेत अडकला म्हणण्यापेक्षा त्यानेच तर ही प्रीत, प्रेम या भावना निर्माण केल्या नाही का?

      कृष्णसखा आणि राधा यांची  अशीच मंत्रमुग्ध करणारी प्रीत, जिथे वासनेला थारा नाही तशीच आपली पण प्रीत आहे ही.

      प्रीत असावी नजरेची भाषा बोलणारी, स्पर्शातून जन्मजन्मांतरीचे नाते घट्ट करणारी,या हृदयी चे भाव त्या हृदयी सहज समजणारी, मनातल्या भावनांचा अनाहत नाद ऐकणारी. विश्वासाच्या पायावर प्रीतीचा राजमहाल तोलून धरणारी.

      तुला सांगते प्रेम करणे म्हणजे काही गुन्हा नाही रे. प्रेम आंधळं असलं तरी ते डोळसपणे करावे, केवळ आकर्षण म्हणजे प्रेम नाही. प्रेम सौंदर्यावर करावं असे जरी असले तरी बाह्य सौंदर्य च नव्हे,  प्रेम अंतर्गत सौंदर्यावर करावे, गुण दोषांवर करावे,स्वभावावर करावे. 

      प्रेम अगदी अंतरंगातून करावे, एकदा स्वीकार केला की त्याच्या गुण दोषांसह स्वीकारावे. 

      हेच असेच विचार मनात घेऊन ही अभिसारीका निघाली आहे सजणा ला भेटायला. सुगंधाने भारलेल्या पुष्पांचा सांगावा द्यायला.

      सख्या ऐक ही गंधित पुष्पे काय बरे सांगतायत! तिच्या तरल प्रीतीची कहाणी..... आणि तिच्या प्रेमाचे ऋणाईत व्हायला....

      प्रेमा काय देऊ तुला

      भाग्य दिले तू मला


रसिका राजीव हिंगे

Thursday, 23 September 2021

चित्रकाव्य

 





निरागस सुकोमल

भाव दाटले नयनी

मौन होऊनीया भाषा

सामावली या लोचनी


मनी विचारांची जणू

खळबळ माजलेली

डोकावता अंतरात

रान भेटे दावानली


बाल्य कुठेसे लपले

भिरभिर ते शोधतो

अराजक या जगती

पाहुनिया खंतावतो


अंधारल्या उजेडात

कधी भेटतील वाटा

माय तात दीपस्तंभ

नच रुते पायी काटा


कुठे कसा गवसेल

जगण्याचा हा किनारा

सान असुनी कळले

आहे जाणे भवपारा


रसिका राजीव हिंगे




पंख पसरूनी वाटे

 पंख पसरूनी वाटे


पंख पसरूनी वाटे मुक्त विहरत जावे

सृष्टीचे हे रम्य सोहळे मनी अनुभवावे


बळ भरुनी पंखात वाटे नभांगणी जावे

घ्यावे चांदणे मोजून नक्षत्रांना ही वेचावे


पंखाखाली अलगद  पांघरावे सागराला

नभी चांदवा पाहता  इथे का हा उधाणला


जावे मनाच्या पल्याड मन पाखरू होऊनि

नियतीचे खेळ सारे यावे जरासे पाहुनी


पंख पसरूनी वाटे घ्यावी कवेत निळाई

कृष्णसखा भेटे तिथे जर असेल पुण्याई


रसिका राजीव हिंगे


अतिथी

 अतिथी!


          येता अवचित दारी

         तोच असेल श्रीहरी

         स्वागतास अतिथीच्या

         यजमाना ये सत्वरी


     अतिथी देवो भव!  घरी आलेला अतिथी किंवा पाहुणा हा देवा सम आहे असे संस्कार जपणारी आपली संस्कृती.

     अतिथी म्हणजे आगंतुक. कोणतीही सूचना न देता अचानक पणे घरी आलेला पाहुणा. आलेला पाहुणा कोणत्या उद्देशाने आला आहे, केवळ भेटीचे प्रयोजन आहे की अजून विशेष काही हे महत्वाचे न मानता त्याचे स्वागत हे हसून केलेच पाहिजे असा पायंडा आपल्या परंपरेचा.

     आपल्या घरी आलेला पाहुणा किंवा अतिथीचे स्वागत चांगल्या बुद्धीने, विचाराने, मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता करावे असे पूर्वजांनी सांगितले आहे. थोडक्यात काय तर सकारात्मक भावनेने करावे. ही सकारात्मकता म्हणजे प्रचंड ऊर्जा आहे जगण्याची. या सकारात्मक विचारांच्या लहरी म्हणजे weves घरातील अदृश्य वाईट शक्तींचा सामना करायला कायम सज्ज असतात. म्हणून म्हणतात न की चांगले बोलावे. मनापासून स्वागत करतांना त्यातून जे सकारात्मक स्पंदने निर्माण होतात ती अतिथी आणि यजमान यांच्यामध्ये भावनिक नाते निर्माण करणारा दुवा आहे.

     जसे अन्न ग्रहण करतो तसेच विचार होतात, मन तसंच होतं. सात्विक भावनेने बनविलेले भोजन अतिथीस अर्पण करावे म्हणजे ते ही आनंदी होतील आणि त्याचा परिणाम सारे घरही आनंदी होईल. आलेल्या अतिथीस समाधान  लाभेल आणि आदरातिथ्य करण्याऱ्यास ही शुभाशीर्वाद लाभतील. माणुसकी आपोआपच जपली जाईल.

     हे सगळे विज्ञान आहे जे ऋषी मुनींनी शोधले आहे,  अनुभवले आहे. हा वारसा असाच पुढे जायला हवा हीच इच्छा?


हास्याचे उडावे तुषार

भावनेचा हो आदर

मान सन्मान सत्कार

व्हावे आनंदे सादर



रसिका राजीव हिंगे

     

     

     

Tuesday, 21 September 2021

 


एक शलाका प्रकाशवेडी

कृष्ण मेघ ते भेदुन आली

अवनीवरती जलाशयाला

कवेत घेई ही धवलाली


सहस्ररश्मी येती अवचित

समीर डोलतो गार मंदसा 

गिरिशिखरावर हिरवाईचा

उत्सव सजला रूप गंधसा


दशदिशातून येई नाद

प्रणवाचे हो हे उच्चारण 

चैतन्य उजळे बहरे सृष्टी

नैराश्याचे हे उच्चाटन


ऐसी पसरे धरणीवरती

सारी माया परमेशाची

कणाकणातुन अस्तित्वाची

जाणीव देत निजरूपाची


रसिका राजीव हिंगे




Monday, 20 September 2021

पायरी




     राऊळी मंदिरी दर्शनास जातांना  आधी पहिल्या पायरीवर सगळेच नतमस्तक होतात. का होत असतील बरे सगळे नतमस्तक? तुझ्यावर पाय ठेवून मला गाभाऱ्यातल्या परमेशाचे दर्शन घ्यायचे आहे. तुझ्याशिवाय मी तिथे पोहचू शकत नाही. म्हणून हे माये मला क्षमा कर आणि तिथपर्यंत घेऊन चल म्हणून तिला हे वंदन असावे असे वाटतं. दर्शन घेतल्यावर कृतार्थ मन क्षणभर पायरीवर विसावतं पायरीला धन्यवाद देण्यासाठी. 

     आयुष्याच्या प्रवासात कधी दुःखाच्या पायरीवर मन हेलकावे घेतं तर कधी सुखाच्या पायरीवर समाधान अनुभवतं.  यशोशिखराकडे वाटचाल करतांना कितीतरी पायऱ्यावर सुख-दुःख, यश-अपयश, मान-सन्मान यांचे चढ उतार अनुभवास येतात. पण भक्कम पाय रोवून पायऱ्या चढत गेलं तर शिखर गवसतंच. कारण पायरीचे हेच कर्तव्य असावे जो तिच्या संगतीत आला त्याला त्याच्या इप्सित स्थळी पोहचविणे. फक्त चढणारे कसे आहेत हे महत्त्वाचे, ती तर साथ देतेच न. उत्कर्ष साधायचा असेल तर स्वतःची पायरी ओळखता यायला हवी.


      सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत ही असेच. एकमेकांचे हात धरून, आधार देत, हसत खेळत नात्यातल्या प्रत्येक पायरीवर चढत गेलो तर नाते फुलत जाईल. "तू तुझी पायरी ओळखून रहा, उगाच गगनाला गवसणी घालायला जाऊ नकोस" असे बोलतांना सुद्धा स्वतः कोणत्या पायरीवर उतरलो आहे याचेही भान असायला हवे. उगाच तुझं माझं करत, मत्सर,द्वेष, असूया या पायऱ्यांवर पाऊल पडले तर जगणेच अशक्य होईल. शिवाय पदरी निराशाच येईल. प्रत्येकाची पायरी परमेश्वराने प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार ठरवून दिली आहे. सत्कर्माच्या पायऱ्यांवर पावलं टाकत नामस्मरणाची काठी हातात घेऊन, सद्गुरूच्या साहाय्याने चढत गेलो की परमात्मा भेटेलही. 

     मात्र पायरी चढतांना आत्मविश्वास, श्रध्दा असणे गरजेचे आहे. 

     

रसिका राजीव हिंगे

Tuesday, 24 August 2021

चित्रकाव्य

 








दैवगतीच्या खेळात कधी  हरले नाही

मानापमान कुचेष्टा कधी सरले नाही


आकाशाशी नाते माझे  मीच जोडले

झरोक्यातले जीवन कुणा कळले नाही


इंद्रधनूचा वेध घेतसे नजर सारखी

सप्तरंगांत मात्र कधीही रमले नाही


आयुष्याची परीक्षा कधीच संपत नाही

स्वप्न डोळ्यातले अजूनही पुसले नाही


नवी भरारी, नवी आशा घेऊनि आली

वळून मागे पाहणे कधी जमले नाही


रसिका राजीव हिंगे







Wednesday, 4 August 2021

 प्रसंगकाव्य

(ये हसीं वादियां, ये खुला आसमां या गाण्यावर आधारित)


ये ना साजणा समीप 

निसर्गाच्या कुशीत रे 

साद घालिती कुणास

उंच ही हिमशिखरे


प्रीत भारलेली सृष्टी

भासे नवयौवना रे

अंथरला हा गालिचा

कुणी हिरवळीचा रे


खळाळत्या निर्झराचा 

ऐक ना पदन्यास रे

शीळ घालितो समीर

बासरीचा हा भास रे


नाथ उमेचा नांदतो

शुभ्र हिमनगरी रे

शिवशक्ती एकरूप

होई सृजन इथे रे


रसिका राजीव हिंगे










      काय काय स्वप्न पाहिली न दोघांनी! मन उंडारत होतं अक्षरशः त्याच्यासवे. देहभान विसरून रमले दोघेही एकमेकांच्या सहवासात. आनंदाच्या अश्वावर स्वार होऊनच घरी परतली ती.

     घरात पाऊल टाकताच आजी म्हणाली "बयो तुझं नाव नोंदवलंय विवाह संस्थेत. लग्न ठरवायचे आहे तुझे".


रसिका राजीव हिंगे

लेखणी


शब्दफुलांना वेचित बसते

मम हृदयाची दौत लेखणी

भान नच परी  तिला कशाचे

ओसंडली ग परडी भरुनी 


माझेच मला सांगत येते

गुज मनातले  हळूच कानी

अन अल्लडशा बाल्या समती

फुरंगटूनी बसते  रुसुनी



स्वातंत्र्याच्या समारांगणी

चल गाऊ या अता वीरश्री

अश्वावरती दौडत दौडत

येतांना ती भासे यशश्री


रसिका राजीव हिंगे


लेखणी

 

जिथे थांबते वैखरी

तिथून धावे लेखणी

मध्यमेचे शब्द घेऊनि

पश्यंतीला गवसे झणी


परेचा ही माग घेतांना

हृदयी विसावे लेखणी

परा पश्यंती मध्यमा

वैखरीचे साधन लेखणी 


रसिका राजीव हिंगे


खरंच कुठे काही चुकतंय का?



     काल पासून सारखा पाऊस येतो आहे. जलद भरून बरसण्यासाठी मेघ काळे तर कधी जांभळे भासताय. मनभावन श्रावण वेशीवर येऊन थांबला आहे. 

     सृष्टीत  उत्साह संचारला आहे. धरा पण नटून बसली आहे श्रावणाचे स्वागत करायला.

     पण मग मनाकाशी मळभ का दाटावेत? काय होतंय असं? खरंच कुठे काही चुकतंय का?


रसिका राजीव हिंगे

चित्रकाव्य


काळोखल्या नभांगणी 

धवलशा प्रकाशात

कुणी चषक दुधाचा

लवंडला अकस्मात


चंद्रकोर चमचम 

सौंदर्याची परिसीमा

प्राजक्ताची फुले जणू 

मनी हर्षली गे भामा


माळ सखे कुंतली गे

चांदण्यांची गंधफुलें

याचसाठी अट्टहास

बघ जरा स्वप्नफुलें


ऐसे नक्षत्रांचे देणे

जणू सारा असे भास

तळहाती हे सौंदर्य 

घेता वाटे गे आभास


रसिका राजीव हिंगे





Thursday, 29 July 2021

चित्रकाव्य

 

एक कवडसा पुरेसा

वाट दावण्या यशाची

घेइ भरारी शैशवा 

भीती नकोच कुणाची


दशदिशातून उमटतो

हुंकार काळोखाचा

बिंदुतूनही बहरतो

सुगंध प्रकाशाचा


उजेडातील तारका  

की लखलख सौदामिनी

काळोखाचा सरे पटल

अल्लडशा बाल्यातुनी


अदमासे उचलुनी पद

यशोशिखरे गाठावी

अवकाश घेउनि कवेत

किर्ती दिगंतरा जावी


रसिका राजीव हिंगे





रिक्त

 

कोसळती बघ धरेवरी गे

आल्हादक या सरींवर सरी

रिक्त जाहले मेघ जांभळे

रितेपण का जाणवे उरी


रिक्त होऊनि जलद सावळे

धरेस करतो सारे अर्पण

बीजांकुरांनि भारावते ग

वसुंधरेचे अवघे तनमन


मेघदूत हा प्रीत सख्याचा

क्षुब्ध होऊनि करितो तांडव

पापणकाठी सर ओघळते

उधळून देइ क्षणात मांडव


वेशीवरती टांगली पुन्हा 

संसाराची जणू लक्तरे 

मेघ सावळा स्तब्ध जाहला

पाहुनिया ही नवी झुंबरे

 


 रसिका राजीव हिंगे



Thursday, 24 June 2021

गाव




कालिंदीच्या तीरावर

एक सावळेसे गाव

दऱ्या डोंगर साजिरे

ज्याचे गोकुळ गे नाव


गाव सात्विक सुंदर

जिथे निर्मिक विश्वाचा

गोपांसवे रमतसे

देव भुकेला भावाचा


निळी झुळूक मोहक

फेर धरी लाटेवर

संथ वाहे यमुनाई

रास खेळे पाण्यावर


होतो हंबर गोठ्यात

जैसा मृदुंगाचा नाद

रुणझुण वाहे वारा

जणू पैंजणांची साद


धनधान्य समृद्धन

आनंदाचे संकीर्तन

आल्हादक वाटे तिथे

मन मोराचे नर्तन


जिथे वसे पवित्रता 

भक्ती नांदते मनात

प्रेमभाव साधाभोळा

नाते फुलवी उरात


ऐसा आहे एक गाव

जेथे अमृताचा पान्हा

भक्तिभाव जागवितो

माय यशोदेचा कान्हा


ऐसा गाव वाटे पाहू

डोळे पाहण्या व्याकुळ

जीव शिवा भेटण्यास

मन झाले गे गोकुळ



BPL - 3383



Saturday, 12 June 2021

चित्रकाव्य

 चित्रकाव्य



एखाद्या तरी सांजवेळी

ऐसे लाभावे निवांत क्षण

देहभानासी विसरूनिया

वेचावेत असे सुवर्णकण


एका रेघेवरचे जगणे

क्षणाक्षणाला करती सावध

भिरभिरे नजर गस्त घालण्या

चुकता अवचित होई पारध


सावळमाया दाटत आली

विहंग शोधीती आसऱ्यास

ठायी ठायी भासे गनीम

कैसे गाठु गे निवाऱ्यास


पुनवेच्या या चांदण राती

सृष्टीच जणू भासे ऐना

तळ्याकाठच्या प्रतिबिंबाची

पडता छाया अपुली दैना


चांद्रप्रकाशी विहरत असता

जगण्यावरचे हितगुज सारे

द्यावयास ह्या वारस दाना

गाठावेत आता किनारे


रसिका राजीव हिंगे






माझेच गीत मी उलगडले

 माझेच गीत मी उलगडले


सृष्टीचे हे सर्द सावळे

रूप पाहता मन गहिवरले

जांभुळले मेघ बरसतांना

माझेच गीत मी उलगडले


 मृग नक्षत्र भिजवी धरणी

 नभी जलद हे गडगडले

 सौदामिनी करी लखलख

अन शब्दप्रभु मला गवसले


पदन्यास तो जलधारांचा

तांडव करी अवखळ वारा

माझेच गीत मी उलगडले

पाहता हा सृष्टीचा पसारा


ऐक ना रे पर्जन्य राजा

बरसावे फक्त मेघातुनी

गीत मज कसे उलगडावे

आलास जर नयनामधुनी


रसिका राजीव हिंगे


चित्रकाव्य

 



कधी पडलंय का

सारीपाटावर मनासारखे दान?

बुद्धीचा कस लावायचा

हा डाव खेळतांना

पण बुद्धीवरही अंकुश

त्याचाच

त्याला हवं तेच दान 

पडणार

चाल ही प्रत्येकाची

त्यानेच ठरवली

लक्ष्मी संगे परमात्मा 

खेळत बसतो

चौसष्ट घरांच्या वाड्यात

बसून  

प्रत्येकाचे आयुष्य

घडवीत

चित्रगुप्ताने पाठविलेल्या

पाप पुण्याची 

गोळाबेरीज करत

सगळं तोच ठरविणार आहे

सोबतीला असतं संचित

प्रारब्ध कर्म

तेवढच फक्त आपलं

हक्काचं....


रसिका राजीव हिंगे


खेळ सुखदुःखाचा

 खेळ सुखदुःखाचा


जीवनात खेळ असे सुखदुःखाचा न्यारा

रंगत जाई खेळ अवघा मांडुनि पसारा


सुखाचे बोट धरुनी  दुःख येतसे द्वारा

गिरकी घेऊनि धावत पुन्हा ये माघारा


कधी न जुळतो सुखदुःखाचा ताळेबंद

अधिक उणे करतांना सुख होई जेरबंद


सुख दुःख म्हणजे काय ते साराच भास

समजुन घेता सारे कळे अथवा आभास


शाश्वत सुख लाभे जीवनी रामनाम स्मरा

नाविकावरी विसंबून व्हावे भवपारा


रसिका राजीव हिंगे

चित्रकाव्य




रानवाटा जाहल्या या

ओसाडले कणकण

वाट धूसर भासते

हरवले सुख क्षण


किलबिल पाखरांची

कुठे हास्याची लकेर

कधी छडी छम छम

कधी भावुक नजर


फळ्यावरी सारे ज्ञान

शब्द शब्दांचे श्रवण

गुरुकुल भासे असे

देई संस्काराचे दान


कुण्या शत्रूचा भयाड

हल्ला हा ज्ञान मंदिरी

शिष्यविण गुरुकुल

कोमेजली फुले सारी


अरे अरे थांबा जरा

नका सोसू रे दबाव

घंटानाद होईल रे

देतो ग्वाही हा गुलाब


रसिका राजीव हिंगे

निर्मिक

 


तूच विश्वाची निर्मिक

देई जीवना आकार

चित्रकार सृष्टीची या

ईशरूप घेई नार


गंधराणी मालती गे

सुकोमल रातराणी

महिषासुरमर्दिनी

भासे ग रणरागिणी


दशदिशा व्यापुनिया

जाहलीस तू सम्राज्ञी

अमृताते पैजा जिंके

ऐसी सखे तूच राज्ञी


चंद्र तारे ओंजळीत

गगनासी गवसणी

हृदयात वत्सलता

उरी ममता भरुनी


शतपैलू व्यक्तिमत्त्व

पूर्णत्वाचा तू आधार

संस्कारांनी जपतेस

संस्कृतीचा सारा भार


रसिका राजीव हिंगे

शोषण

 विषय - शोषण


जीवनात जगतांना

जिथे न कळे पोषण

अलवार भावनेचे

होई तिथेच शोषण


बाल असो वा यौवन

अर्थ न कळे तयांसी

चीज काय हे शोषण

ठावे नच सकलांसी

माय बाप हतबल

कैसे करावे पालन

अलवार भावनेचे

होई तिथेच शोषण


दारिद्रय़ाने गांजलेल्या

तया इतकेच  कळे

भरावया खळगीस

लागतात हो जोंधळे

वीतभर पोटासाठी

करीतसे वणवण

अलवार भावनेचे

होई तिथेच शोषण


हक्क जणू श्रीमंतीचा

गंधफुलें कुस्करीचा

माजलेल्या धनाड्यांचा

छंद नवा मस्करीचा

धुंदलेल्या वळूस या

कोण  घालील वेसण

अलवार भावनेचे

होई तिथेच शोषण


वेशीवरी टांगलेली

आयुष्याची लक्तरे

भाव भावनांचा खेळ

मूकपणे जगतो रे

माणुसकी मानवता

भासे सारी चणचण

अलवार भावनेचे

होई तिथेच शोषण


Sunday, 6 June 2021

श्रवण भक्ती

 



      "आजी, गोष्ट सांग न! आज कोणती सांगशील ग?" आजीचे नातवंडं तिच्या भोवती फिरत फिरत गोष्ट सांगण्यासाठी तगादा लावत होते.

     "आधी सगळे बसा इथे, मी आज सांगणार आहे ससुल गड्याची गोष्ट. ससुल म्हणजे ससा."

     सगळे आजीच्या चेहऱ्याकडे लक्ष देऊन ऐकू लागले ससुल गड्याची गोष्ट. "मी तर ससुल गडी,वाघोबाचे कान च तोडी" आजी अगदी तालासुरात गावून गोष्ट सांगत होती आणि सगळे आजीची गोष्ट ऐकत होते. 

      हेच संस्कार. साध्या सोप्या भाषेत गोष्टीरूपाने केलेले.कधी रामायण तर कधी महाभारत तर कधी ऐतिहासिक. या श्रवणातून  पेरले जाते श्रवण भक्तीचे बीज. सगळ्यात महत्वाचे म्हणजे श्रवण करण्याची, लक्षपूर्वक ऐकण्याची सवय होत जाते. अक्षर ओळख नसली तरी शब्द कळत जातात. हावभाव, शब्द उच्चारण्याची लकब,पद्धत यामुळे त्या शब्दांचा अर्थ कळत जातो.

       पूर्वीच्या काळी कुठे ग्रंथ संपदा होती. श्रवणाद्वारेच ज्ञान संपादन करत असत. ज्ञान देणारे कोण तर आपल्याच अनुभवाच्या कसोटीवर घासून ज्ञान मिळविलेले असे ऋषीमुनी, संत महात्मे, योगी आणि घरातील अनुभवसिद्ध आधारवड. 

       उपनयन संस्कारानंतर गुरुगृही शिक्षण घ्यावे लागत असे. तिथेही गुरुमुखातून निघालेले श्रवण करून कंठस्थ केल्या जायचे. प्रत्येक विद्यार्थ्यांची ज्ञानाची कसोटी लागत असे. अध्यापन,अध्ययन हे ज्ञाननिर्मिती च्या उद्देशाने केले जायचे. रट्टा मार प्रकार नव्हता. आज शिक्षण क्षेत्रातील  ज्ञानरचनावाद ही नवसंकल्पना फार पूर्वी गुरुकुलात राबवली जायची त्यामुळे श्रवण, मनन, चिंतनाच्या आधारे विद्यार्थी बहुश्रुत होत असे. 

       श्रवण हे ज्ञान मिळविण्याचे उत्तम साधन आहे. श्रवणा द्वारे आध्यत्मिक, वैज्ञानिक ज्ञानप्राप्ती तर होतेच होते, आत्मज्ञान मिळविणेही शक्य होतं जातं.




     दासबोधामध्ये रामदास स्वामींनी श्रवण काय करायचे तर पिंडी ते ब्रहमांडी जे जे आहे ते सगळे श्रवण करावे. जे चांगले आहे तेच फक्त नीरक्षीर बुद्धीने वेचावे, ग्रहण करावे, आत्मसात करावे. मनन चिंतन करत परमात्म्याशी संधान साधावे. तंत्रज्ञानाने केलेली प्रगती पाहता, तसेच छपाई ची कला विकसित झाल्यावर ही श्रवण करण्याची सवय कमी झाली नाही.  संत, ज्ञानसंपन्न बहुश्रुत व्यक्तींचे शब्द ऐकायला आजही आनंदाने उत्सुक असतात.

     सौंदर्याकडे आकर्षित होणारी मानवाची प्रवृत्ती. ही प्रवृत्ती लक्षात घेऊनच भगवंताचे सगुण साकार रूप म्हणजे श्रीकृष्ण आणि राम. ही दोन्ही रूपं मनमोहक आहेत. गोपी,राधा याना आधी कृष्णाचे रूप भावले, कुंती, द्रौपदी, कुब्जा, उद्धव यांनी कृष्णाच्या बाललीलांचे, पराक्रमाचे वर्णन  श्रवण करीत करीत च त्याच्याकडे आकर्षित झाले  आणि हळूहळू त्याच्यात प्रेम म्हणजेच भक्तीचे बीजांकुरण झाले. 

     ऐन युद्धच्या वेळी समरभूमीवर शस्त्र खाली ठेवणारा अर्जुन भगवंताने सांगितलेले ऐकले,श्रवण केले आणि त्याचा अज्ञानाचा पडदा सारला गेला. अर्जुन युद्ध करायला तयार झाला. ,हीच भगवद्गीता ऐकली आणि सत्यावर विजय मिळविणे शक्य झाले.भगवंतांच्या चरित्राचे, पराक्रमाचे वारंवार श्रवण करावे म्हणजे प्रेम उत्पन्न होत जातं आणि भक्तीरुप घेतं.

     यज्ञ याग करतांना राक्षस,आसुरी शक्तींचा त्रास होतो म्हणून राम आणि लक्ष्मणास आपल्या सोबत घेऊन जातात विश्वामित्र ऋषी या शक्तींचा नाश करण्यासाठी. जाता येता किती ज्ञान दिलं विश्वामित्रांनी, किती शस्त्र,अस्त्र याचे प्रदान केले,ते कसे केव्हा उपयोगात आणायचे यासंबंधीचे सगळे बारकावे सांगितले, विश्वामित्र म्हणजे तर चालते फिरते विद्यापीठच नाही का? विश्वामित्र सांगत होते आणि हे दोघे ऐकत होते. श्रवणेंद्रिया द्वारे मिळालेले ज्ञान सर्वश्रेष्ठच. किती श्रवण केलं असेल राम लक्ष्मणांनी!  त्याचे सतत चिंतन, मनन केले म्हणून तर असुरीशक्ती वर विजय मिळविता आला.

     त्यांच्या या गुणांचे, पराक्रमाचे,चरित्राचे सतत श्रवण करत जावे. वारंवार एखादी गोष्ट होत गेली की त्यातील अर्थ,सौंदर्य हळूहळू कळायला लागतं. म्हणूनच भगवंतांचे, संतांचे चरित्र पारायण करण्याची पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. पारायण करणे म्हणजे वारंवार एकाच गोष्टीचे पठण,वाचन,श्रवण करणे. पठण,वाचन एकप्रकारे श्रवणच होय. पारायणे केली की भगवंता बद्दल प्रेम वाढू लागतं, यातूनच भक्तीची वाट चालणे सोयीचे होते. भक्ती आणि प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

    

 ऐसे हे अवघे ऐकावे ।

परंतु सार शोधुनि घ्यावे ।

असार ते जाणोनि त्यागावें ।

या नाव श्रवणभक्ती । (दा. ४.१.२९)

     जे जे चांगले आहे ग्रहण करावे, निरुपयोगी समजून सोडून द्यावे. यालाच समर्थांनी श्रवण भक्ती म्हंटले आहे. 

       सतत चांगले विचार पठण,श्रवण केले की त्याच्या आयुष्यात फायदा होतो.  धुंधुकारीने जेव्हा भागवत कथा श्रवण केली त्यावेळी त्याची प्रेत योनीतुन सुटका झाली. 

     भवसागर पार करतांना श्रवणभक्तीचा सोपान चढणे कठीण असले तरी अशक्य ही नाही. स्थिर,शांत वृत्तीने चालत गेल्यास भगवंताशी एकरूप होणे सहज शक्य होईल .... 



©️रसिका राजीव हिंगे

Friday, 21 May 2021

ओठ बंद

 



ओठावरी पहारे बसवून कोण गेले

श्वासास भार आता देऊन कोण गेले


ओठात काय आहे सामावले अजुनी

नादावल्या क्षणांना फसवून कोण गेले


आभाळ भेटलेले आहे जणू धरेला

स्पर्शातल्या सुखानी लाजून कोण गेले


मौनातली असावी भाषांतरे प्रितीची

निःशब्द भावनांना सजवून कोण गेले


ओठात बंद केले जगण्यातले निखारे

दुःखात या तरीही मोहून कोण गेले


©️रसिका राजीव हिंगे

Thursday, 20 May 2021

माझी आठवण आल्यावर

 


सोनसळी कातरवेळी

दूर दूर कुठे क्षितिजावर

दिसे मोरपीस प्रीतीचे

माझी आठवण आल्यावर


कालिंदीच्या तीरावरी

राधेच्या गंधित कुंतली

माळतांना सुगंधित फुले

रानवाट ही गंधाळली

अभिसारिका भासे नवथर

माझी आठवण आल्यावर


चांदणफुले होती बरसत

नवी स्वप्ने नवा उन्मेष

येता नभांगणी शशीनाथ 

उधळला चौफेर प्रकाश

आठवे सुख हिंदोळ्यावर

माझी आठवण आल्यावर


विसरूनिया हेवेदावे

रंगला होता डाव छान

इंद्रधनू सम सौंदर्याची

सप्तसुरांची सजे रुणझुण

असेच भास होती क्षणभर

माझी आठवण आल्यावर


सोनसळी कातरवेळी

दूर दूर कुठे क्षितिजावर

दिसे मोरपीस प्रीतीचे

माझी आठवण आल्यावर


©️रसिका राजीव हिंगे

Wednesday, 19 May 2021

चित्रकाव्य




काळाच्या गर्भातुनी वेळ येतसे जन्मास

क्षणांच्या सृजनातून  आकार आयुष्यास


प्रहर घटिका पळे निसटून ऐसे जातात

नक्षीदार संवत्सरे जणू एका निमिषात


मी  तू अहंकारात का तू ऐसा बुडविसी

सख्य जोडीत जावे मोजलेल्या श्वासांसी


कसा कधी पडेल घाला विचित्र दैवाचा

कर्म संचित प्रारब्ध खेळ हा नियतीचा


उगाच अट्टहास का भौतिकी जगण्याचा

शाश्वत आहे तोच आधार असे  सृष्टीचा


रसिका राजीव हिंगे

Tuesday, 18 May 2021

आधार

 



    दारावरची बेल वाजली. मालतीबाई नी दार उघडलं समोर पोलीस उभे पाहून त्यांचे सर्वांग थरथरू लागलं. "विजयराव देशमुख आहेत का घरी?"

 " हो, आहेत. काय काम होतं?" थरथरत मालतीबाई कशा बशा बोलल्या. 

 "त्यांनाच भेटायचे आहे. आत येऊ का?"

 "अ, हो  या ऽऽ नं."

 तोपर्यंत विजयराव बाहेर आले, कोण आहे ते पहायला. दारात आयपीएस भरत दराडे यांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले. "या आत या सर" असे म्हणत त्यांना विजयराव घरात घेऊन आलेत.

     विजयराव आणि मालतीबाई बैठकीत त्यांच्या समोरच बसले होते. आयपीएस दराडे बैठकीत सभोवार नजर फिरवत सोफ्यावर स्थानापन्न झाले. 

     घर छान सजविले होते. कुठे भपका नाही की पाश्चात्य संस्कृती चे प्रदर्शन नाही. टीव्ही,सोफा, एसी असलेलं साधं चार खोल्यांचा घर होत. उच्च मध्यमवर्गीय घर जसं असतं तसंच. विजयरावांकडे पाहून वाटलं एक सेवानिवृत्त सुखी आयुष्य जगत असलेले समाधानी व्यक्तिमत्त्व. सारं बघता बघता मालतीबाई कडे नजर जाताच भरत दराडे यांचे डोळे पाणावले. अश्रू च्या अंधुकशा प्रकाशात त्यांच्यासमोर सिनेमातील खेळाप्रमाणे सारा भूतकाळ तरळून गेला. पंचवीस वर्षांपूर्वी चा तो दिवस त्याच्या डोळ्यासमोर आला.

     संसाराचा गाडा नीट चालावा म्हणून मालतीबाई शाळेत नोकरी करत होत्या. विजयराव बँकेत असले तरी खूप पगार नव्हता. नोकरी लागल्याबरोबर लगेच मालतीबाई शी प्रेम विवाह केला असल्यामुळे आधीची काहीच शिल्लक नव्हती. शिवाय पदरात दोन गोंडस मुलं होती. त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी  मालतीबाई ना नोकरी करणे गरजेचे होते.

     मालतीबाई ची सवय होती रोज संध्याकाळी शाळेतून घरी येतांना  त्या वाटेतल्या  गजानन महाराजांच्या मंदिरात न चुकता जात असत. 

     एके दिवशी त्या मंदिरात आल्या तर त्यांच्या समोर एक सात आठ वर्षाच्या छोटा मुलगा उभा राहून 

     "आई हार घे ना, बाबासाठी, आज गुरुवार आहे, महाग नाही फक्त पाच रुपये."

      मालतीबाई नि विचार न करता पाच रुपयाचा हार  घेतला आणि त्या मंदिरात गेल्या. दर्शन घेऊन बाहेर आल्या आणि नेहमी प्रमाणे चप्पल घालून निघाल्या तर पुन्हा तो समोर आला. 

      " आई आज तुम्ही हार घेतला न बघा माझ्या धंद्याचीच बोहनी झाली हो. आठवड्यापासून इथे फुलं विकतो आहे पण कोणी घेई ना. खूप उपकार झाले तुमचे."

     "बरं बरं रोज घेईल मी हार" असे म्हणून मालतीबाई घराकडे झपझप चालू लागल्या. यानंतर त्यांचा रोजचाच क्रम झाला, याचेकडून हार घ्यायचा अन दर्शन घेऊन त्याच्याशी थोडं जुजबी बोलून त्या घरी येत. हळूहळू ओळख वाढत गेली.  

  "काय रे नाव काय तुझं?"

 "राजू" 

 " कुठे राहतो?, आईबाबा काय करतात तुझे?"

 " मी समोरच्या घरात राहतो. मावशी कडे. मावशी म्हणजे आईची शाळेतली मैत्रीण आहे. तिच्याकडे सगळी कामे करतो. अन संध्याकाळी इथे फुलं विकतो."

      त्याची कर्म कहाणी ऐकून मालतीबाई ना खूप वाईट वाटायचे. इतका गोड मुलगा का त्याच्या वाट्याला असे कष्ट यावे. खेळायचे, बागडायचे दिवस त्याचे अन तो व्यवहार शिकतो आहे. खरंच काय असेल बरं त्याचं प्रारब्ध. 

      घरी आल्यावर एकदा जेवतांना  मुलांना त्या सांगत होत्या. "बाहेर किती वाईट परिस्थिती आहे. शिक्षणासाठी काय काय करावं लागतं. तुम्हाला मिळतं आहे तर तुम्ही मेहनत करा आणि यशाची शिखरे गाठा जी तुम्हाला खुणावत आहेत." असे रोज काहींना काही मालतीबाई मुलांना सांगून त्यांना प्रोत्साहित करत होत्या.

      आज राजू खूपच उदास दिसत होता. त्याचे डोळे सारखे भरून येत होते.काय करावे काहीच त्याला सुचत नव्हते. तेवढ्यात मालती बाई मंदिरात पोहचल्या. त्याच्याकडे पाहताच  आज काहीतरी झालं आहे हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. दर्शन झाल्यावर  त्या राजूजवळ आल्या, "काय रे काय झालं आज? का असा दिसतोस? रडला का?"

 "आई, मावशी म्हणते आता पुढं काही शिकू नको, एवढे पैसे नाहीत आमच्याजवळ" 

 "पण मला शिकायचे आहे,कसेही करून मला आयपीएस अधिकारी व्हायचे आहे. सरफरोश सिनेमामध्ये जसा अमिरखान होतो तसे ."

 "तू कुठे बघितला सरफरोश?"

 "मावशीची मुलं बघत होती तेव्हा पाहिला टीव्हीवर. आई तुम्ही करू शकता काही माझ्यासाठी. म्हणजे मावशीला सांगा न मला पुढे शिकू दे."

 "ठीक आहे बघू आपण ."

      असे म्हणून मालतीबाई विजयरावांना याविषयी सांगतात,पण विजयरावांना असे काही आवडत नव्हते. त्यांचे म्हणणे एवढेच होते की "असे कितीतरी प्रत्येक मंदिरासमोर असतात, फुटपाथवर असतात त्यांना काय प्रत्येकाला तू मदत करीत फिरशील का?" पण मालतीबाई ना काही हे पटेना. राजू चा रडवेला चेहरा सारखा त्यांच्या डोळ्यासमोर येत होता.

      त्यांचं शिक्षकी मन त्यांना शांत बसू देत नव्हतं. कसंही करून राजुला मदत करायची पण कशी हे सुचत  नाही. शेवटी शिक्षकच खरा मार्ग दाखवितो ये सत्य आहे. त्यांनी राजुला जवाहर नवोदय विद्यालय दिल्ली ची परीक्षा द्यायला सांगितले. त्या परीक्षेची फी,पुस्तके सारा खर्च मालतीबाई करत होत्या. विजयरावांचा विरोध पत्करून. राजू ने त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. राजू नवोदय विद्यालयाची परीक्षा पास झाला आणि पाचवीपासून राजू नवोदय विद्यालयात दाखल झाला. त्याचे स्टेट बँकेत मालतीबाई नी खाते उघडले आणि दरमहा त्याच्या खात्यात पैसे जमा करू लागल्या. 

      राजुचे शिक्षण सुरू झाले. दरवर्षी पहिल्या तीन क्रमांकात त्याचा क्रमांक येत होता. पाचवीपासून राजू बाहेरगावी असल्यामुळे कधी त्याची भेट होत नव्हती. त्याच्या शाळेत मुख्याध्यापकामार्फत त्यांची चौकशी मालतीबाई करत असत. त्याच्या अवांतर खर्चाचा सगळा भार एक पालक म्हणून मालतीबाई नी उचलला होता.याबाबत विजयराव आणि त्यांचे कधीच एकमत झाले नाही. तरीही त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले.

      मालतीबाई आणि विजयराव दोघेही आता सेवानिवृत्त झाले. त्यांची दोन्ही मुलं शिक्षण पूर्ण करून नुकतीच नोकरीला लागली होती.

      एक दिवस अचानक राजुचा फोन आला,"आई आता मला पैसे पाठवू नको,माझे शिक्षण पूर्ण झाले आहे मी नोकरीला लागलो आहे. लवकरच भेटू आपण." 



राजू च्या आवाजातील आत्मविश्वास,मार्दव ऐकून मालतीबाईचे पापणकाठ पाणावलेत. आपण योग्य निर्णय घेतल्याने त्या सुखावल्या. कधी एकदा राजुला भेटते असे झाले त्यांना. किती मोठा झाला असेल न आता, ओळखायला येईल की नाही आपल्याला या विचारात त्या रमू लागल्या. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचीही जपवणूक करता आली याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

      "मालती, हे आयपीएस भरत दराडे. नव्याने रुजू झाले आहेत इथे. कालच माझी एका कार्यक्रमात यांची ओळख झाली."  विजयरावांच्या आवाजाने आयपीएस भरत दराडे भानावर आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून विजयराव चपापले. 

      "काका माझी ओळख काय करून देता या माऊलीला! हिच्या खंबीर आधाराने मी आजचा दिवस पाहतो आहे. ही माऊली नसती तर मी कुठेतरी हमाली करत असतो आज."

आई मी राजू तुला हार विकणारा राजू..... "

     राजुचे शब्द ऐकले आणि मालतीबाई नी  डोळयातल्या आनंदाश्रू ना वाट करून दिली.....


©️रसिका राजीव हिंगे

      

   #Adhar#sobat#rasraj#shikshn#ips#

Sunday, 16 May 2021

वाट



अंगावरी उन्हाळा घेऊन वाट जाते

गुलमोहरी फुलांना पाहून वाट जाते


वारा उनाड झाला थैमान पावसाचे

पाण्यात चिंब भिजली वाहून वाट जाते


अंधारले तरीही आधार देत राही

मार्गात चालण्यासी  शिकवून वाट जाते


चाफ्यास गंध आला दारात लावलेल्या

ग्रीष्मात गारव्याला  देऊन वाट जाते


दुःखास मागतांना कुंती जरा न ढळली

कृष्णावरी विसावत चालून वाट जाते


रसिका राजीव हिंगे


Wednesday, 5 May 2021

चित्रकाव्य

 



काय सांगू नवलाई

माझ्या मराठी मातीची

बहू रत्नांची निर्माती

माय साऱ्या संस्कृतीची


मांदियाळी संतांची गे

येई इथेच जन्मास

शौर्य नि पराक्रमाचा

रुजे इथे इतिहास


सालंकृत झाली भूमी

गड किल्ले कपारींनी

गोदा, चंद्रभागा तीर्थे

पापे सारे प्रक्षाळणी


सह्याद्रीच्या सावलीत

महाराष्ट्र सुरक्षित

आर्थिकाच्या सिंहासनी

विराजतो माझा प्रांत


जरीपटक्याचा डौल

ऐसी गौरवाची गाथा

तुज त्रिवार मुजरा

तव चरणी हा माथा


 

रसिका राजीव हिंगे



Monday, 3 May 2021

चित्रकाव्य

 



गर्भातल्या या फुलानी

हाक हळूच दिधली

नाळ तुटता क्षणांती

साद आईचीच आली


मार्गावरी वात्सल्याचे

स्तंभ आगळे वेगळे

जीवनाच्या वाटेवरी

जगण्याचे हे सोहळे


मखमली झाली वाट

आधाराला कुठे माप

कोण्या जन्माची पुण्याई

सुख दाटले अमाप


ऐसा चालतो वारसा

जन्मा मागुती जन्माचा

दान ममतेचे लाभे

खेळ सारा संचिताचा


रसिका राजीव हिंगे



Sunday, 2 May 2021

स्वप्नपूर्ती

 

   


     सकाळपासूनच आज अंजलीची धावपळ सुरू होती. घर आवरण्यात वेळ भराभर पुढे जात होता. दिवाणखान्यातील सोफ्याचे कव्हर बदलले, पडदे बदलले, फुलदाणीतील फुले बदलून आज टवटवीत छान मोगऱ्याचा गुच्छ फुलदाणीत ठेवला होता. सगळं घर मोगऱ्याच्या सुगंधाने दरवळले होते. दारावर द्वारकेला घेतलेले तोरण लावले होते.

     अंगणात सुरेख रांगोळी घातली होती. अंगणातील सगळीच फुले गुलाब, निशिगंध, मोगरा अबोली आज विशेष फुललेली होती.

     स्वयंपाक पण सगळा चारी ठाव केला होता, नाहीतर रोज फक्त दोघांच्या पुरेसा हलका फुलका स्वयंपाक असायचा. आज वरण भात, बटाट्याची भाजी,आंब्याचा रस, शेवयाची खीर,चटणी,कोशिंबीर सारच कसं सगळं मनासारखे करून घेतले. माठात वाळा घालून ठेवला होता थंडगार वाळ्याचे पाणी पिण्यासाठी.

     हो.  आज समीर यायचा होता, खूप दिवसांनी घरी. आज अजय अंजलीच्या आयुष्यातील खूपच महत्वाचा दिवस. स्वप्नपूर्ती चा दिवस. त्यांचा समीर आज विंग कमांडर झाला होता. स्वयंपाक करता करता अंजली समोर सगळा भूतकाळ तरळून गेला. 

     लहानपणा पासूनच देशसेवा करायची असे समीर ने ठरविले होते. त्याच दिशेने त्याची वाटचाल सुरू होती.अजय  एका  खाजगी कंपनीत नोकरीला होता, अंजली एक गृहिणी.  काटकसर करून कोंड्याचा मांडा करून पै पै जमवून समीर चे शिक्षण सुरू होते. एकुलता एक मुलगा असल्याने सर्वसाधारण मुलांप्रमाणे समीर ने इंजिनिअरिंग करावे, जमल्यास पदव्युत्तर व्हावे एवढी माफक अपेक्षा असलेले अजय अंजली होते.

     पण समीर चे स्वप्न वेगळेच होते. शाळेत असल्या पासूनच त्याला भारतीय वायुसेनेचे आकर्षण होते. विंग कमांडर अभिनंदन म्हणजे समीरचा आदर्श जणू. त्याला  विंग कमांडरच्या गणवेशाचे  ही अप्रूप वाटायचे.अभिनंदन  सारखेच मला व्हायचे असे तो सारखा ठरवायचा.



     पण त्याच्या आईवडिलांना मात्र हे सगळं कठीण आहे, याला झेपेल का असं वाटत होतं. ज्यावेळी बारावीनंतर मला (एन.डी.ए.) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे असे समीर ने म्हणल्यानंतर आई चा जीव कळवळला. 

      "समीर, तुला हे सगळं जमणार आहे का? फार कठीण असतात या परीक्षा, नंतरचे प्रशिक्षण. सगळा नीट विचार करायला हवा समीर!"

      "आई बाबा तुम्ही काळजी करू नका, मी ठरवले आहे (एन.डी.ए.)  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मार्फत मला भारतीय वायुसेने मध्येच नोकरी करायची आहे. आई,  ८ ऑक्टोबर १९३२ पासून भारतीय वायुसेना देशाचे रक्षण करते आहे. हवाई युद्ध करण्यासाठी या दलाची स्थापना झाली. आजपर्यंत कितीतरी शूर योद्धे भारतीयांचे रक्षण करतात आहेत. विंग कमांडर अभिनंदन आपल्या प्राणाची बाजी लावू शकतो तर मी का नाही. बाबा, तो पण एक भारतीय आणि मी पण भारतीय आहे. मला भारताच्या सरंक्षण क्षेत्रात वायुसेने मध्ये जाऊन वेगळं करायचं आहे. मला परवानगी द्या." यावर दोघेही काय बोलणार! काहीतरी वेगळं करायला निघालेल्या मुलाला त्यांनी भरभरून आशिष दिले.

      अथक परिश्रम करून समीर ने (एन.डी.ए) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ची प्रवेश परीक्षा पास केली आणि तेथील शिक्षण पूर्ण केले. नजरेच्या टप्प्यात आपले स्वप्न दिसू लागले याचा किती आनंद झाला होता समीरला आणि त्याच्या आईबाबांना पण. 

      एकुलता एक मुलगा देशासाठी आपलं आयुष्य द्यायला निघाला आहे हे पाहून अजय ला भरून आलं. कारण त्याचे आजोबा सुद्धा स्वातंत्र्य युद्धात सावरकरांच्या सोबत कोणत्या न कोणत्या रुपात देशसेवा करतच होते. आजोबांनी कधी घराचा विचार केला नव्हता. दोनतीन वेळ तुरुंगात पण जावे लागले होते. आता आपला मुलगा त्याच्या पणजोबांचा वारसा चालवितो आहे यामुळे अजय अंजली दोघांनाही  कृतार्थ झाल्यासारखे वाटले.

       (एन.डी.ए.) राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समीर ची वायुसेने मध्ये पायलट ऑफिसर या रँक वर नियुक्ती झाली आणि या तिघांनाही आभाळ ठेंगणे वाटू लागले. "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" ही समर्थांची शिकवण आचरणात आली होती.

       समीर आता मागे वळून पहायला तयार नव्हता. मनासारखे सारे जुळून आले होते. प्रत्येक काम लीलया करण्याचा जणू त्याने सपाटाच लावला. देवभोळ्या आईबाबांचा हा देवभोळा मुलगा. परमेश्वरावर प्रचंड विश्वास असलेल्या समीर ला हे माहीत होते 

"सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे।  

परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे।"

     चळवळ म्हणजे आपले कर्म करत रहावे असे समजून समीर एक एक रँक वर चढत होता. त्याचा या क्षेत्रातील चढता आलेख पाहून,त्याची अद्वितीय कामगिरी पाहून त्याला अल्पावधीतच विंग कमांडर या रँक वर बढती मिळाली होती. शालेय जीवनापासून विंग कमांडर अभिनंदन सारखे होण्याचे स्वप्न पहात असलेल्या समीरची स्वप्ने प्रत्यक्षात उतरली होती. 

     दारात गाडी थांबल्याचा आवाज झाला आणि अंजली भानावर आली, दारात समीर उभा होता,विंग कमांडर समीर अजय कुलकर्णी, विंग कमांडर च्या गणवेशात. ....


रसिका राजीव हिंगे

Monday, 26 April 2021

कर

चित्र ललित

कर#रसराज#युगंधर#बासरी#कृष्ण#









कसे सांगू काय सांगू

भाव माझ्या मनातले 

कर करात तुझीया

सुख हे विश्वातले



   नीलवर्णी युगंधराच्या बासरीचे सूर .....कालिंदी च्या किनारी सारा भवताल सुरमय करीत होते... कदंबाच्या पानापानातून सळसळ जाणवत होती...  कालिंदीच्या काळ्या पाण्यावर भावतरंग थुईथुई करत होते... सांज ऐन भरात असतांना च छम छम पदन्यास करीत ही बावरी धावत होती ......

   बासरीच्या सुरामुळे उतावीळ झालेली. तिचे महावस्त्र  वाऱ्याशी झगडते आहे. ...नजर शोधते आहे कालिंदीचा तीर ...कधी एकदा तिथे पोहचते आणि कृष्णसख्याला पाहते असे झाले होते.....

   हुरहूर मनी दाटते

   कधी पाहू गे श्रीरंग

   ताल धरिती पैंजणे

   परी दिसेना मृदंग

 अशी अवस्था झाली आहे राधाराणीची.... 

   आणि श्रीरंग! नभी चंद्र स्वतःच्या सौंदर्याने झळकत आहे,सभोवती त्याच्या तारकांचा रास रंगला आहे....पण मुरारीच्या गोपिका, राधा कुठे आहेत?  माधवाची नजर सारखी भिरभिरते आहे.... बासरीचे सूर व्याकुळ यायला लागलेत याची जाणीव श्रीहरीला होते.....

    पैंजणांची छम छम ऐकू यायला लागते, राधेच्या सौंदर्याचा, तिच्या प्रीतीचा सुगंध सारा आसमंत भारुन टाकतो आहे ,तिच्या गोऱ्या रंगाचा प्रकाश इतका शांत आणि शीतल आहे की चंद्राची ही शीतलता फिकी पडावी असेच भासते मुरलीधरास जणू....

    राधा कालिंदीच्या किनारी पितांबर धारी सावळे परब्रह्म पाहून हरखून जाते, कृष्णसख्या भोवती तिचे मन रास खेळायला लागतं, समर्पणाचे सारे भाव ती तिच्या कान्हाच्या  करात समर्पित करते, आत्म्याचे परमात्म्याशी झालेले मिलन....

    नीलवर्णी सावळ्याच्या हाती आपला गोरा हात देतांना क्षणभर समाजभान विसरून राधा असे तर म्हणत नसेल न

    

चंपक गोरा कर कोमल हा, करात तुझिया देते

नेशील तेथे-येते, सखया, नेशील तेथे-येते

     

रसिका राजीव हिंगे

 

Wednesday, 21 April 2021

अमृतवेल

 


अमृतवेल* 

वि. स.खांडेकर यांची अमृतवेल ही कादंबरी आठवीत असतांनाच वाचली होती. आता पुन्हा वाचली.

जीवनाविषयी जास्त लिहितात वि. स.खांडेकर असे वाचले होते. अमृतवेल या कादंबरीत विविध पात्रांच्या माध्यमातून जीवनाच्या कितीतरी व्याख्या त्यांनी इथे सांगितल्या आहेत. ज्याला जसे अनुभव येतात तशीच जीवनाची व्याख्या होते का असा प्रश्न पडतो. 

सहज बोलता बोलता जीवन विषयक तत्त्वज्ञान सांगणारी ही गोष्ट आहे नंदा, वसू आणि देवदत्ताची.

एका सामान्य सुसंस्कृत घरात जन्मलेली ही नायिका, भरभरुन प्रेम करणारे आई वडील. एम.ए. झालेली हुशार,वाचनाची आवड असलेली.  नंदाचे लग्न ठरते व विमान अपघातात तिचा होणारा पती शेखर याचे निधन होतं. सुखी संसाराची स्वप्न रंगवीत असतानाच नियतीचा असा विचित्र खेळ तिच्या वाट्याला येतो.

आता आयुष्यात काहीच उरलं नाही, जगून तरी काय करायचं असा विचार तिच्या मनात सारखा येत राहतो,मनाची घुसमट वाढत जाते आणि यातच एक दिवस ती आत्महत्या करण्याचा विचार करते. सागरतीरावर उलटसुलट विचारांत ती खूप आत चालत जाते पण क्षणात आईचा विचार मनात येतो अन ती भानावर येते.

आत्महत्या करायला जाण्यापूर्वी मनातले सगळे विचार पत्र रूपाने दादां साठी लिहून जाते.

घरी यायला उशीर होतोय म्हणून दादा तिच्या खोलीत जातात आणि सहजच तिचे पुस्तक पहात असतांना त्यांना पत्र गवसतं जे त्यांच्यासाठीचं लिहिलेलं असतं.

दादा ते पत्र वाचतात. नंदाने तिच्या मनातील कोलाहल, विचारांची उलथापालथ या पत्रामध्ये लिहिलेली वाचून दादा अस्वस्थ होतात आणि तिला समजावणीच त्याच उत्तर लिहून तिच्या पुस्तकाजवळ ठेऊन देतात. उशिरा आलेली नंदा हे पत्र वाचते आणि शांत होते.

पीएचडी करावी या उद्देशाने ती आणि दादा दासबाबूंच्या घरी जातात.इथे दादा आणि दासबाबू तसेच नंदा आणि दासबाबू यांच्यातील संवाद लालित्यपूर्ण जीवनावर भाष्य करीत इतका सुंदर रंगवला आहे की पारिजात झाडावरून टपटप पडतो आहे का असे सुगंधित शब्द कितीही वेळा वाचलं तरी मन पुन्हा वाचावयास हो च म्हणतं.

नंदाच्या मनाची मनस्थिती बघता तिला 5-6 महिने बाहेरचे जग पाहू द्यावे असे दादांना वाटतं असतं. विलासपूरच्या जहागिरदारीण वसुंधरा यांना एक कंपॅनियन ची गरज आहे असे दासबाबू सांगतात. विलासपूरची जहागिरदारीन दुसरी कुणी नसून आपली कॉलेज मधील मैत्रीण आहे हे कळल्यावर नंदा तिच्या सोबत विलासपूरला येते.

विलासपूरला  आल्यावर वसुंधरा आणि तिचे पती देवदत्त वेगळे राहतात असे कळते. वसुंधरा याबाबत नंदाशी काहीच बोलत नाही. वसुंधराची मुलगी मधुराला फ़िट्स येत असतात त्यामुळे ती फार त्रस्त आहे.

उत्सुकता म्हणून नंदा एक दिवस देवदत्ताच्या घरी येण्याचा प्रयत्न करते. हरिणाच्या पाडसासोबत देवदत्ताचे बोलणे ऐकते. हरिणाचे पाडस आणि मृत्यू च फक्त माझे मित्र आहेत  देवदत्त असे बोलत असतानाच तिथेच नंदाची देवदत्ताशी ओळख होते. त्यांची लायब्ररी, पुस्तक वाचनाचे वेड,त्यावरील नोट्स वाचून नंदा आणि देवदत्ताची पुढे मैत्री वाढत जाते.

छोट्या मधुराच्या मनात देवदत्त म्हणजे एक राक्षस आहे अशी भावना का निर्माण झाली, आधीची हसतखेळत वागणारी , सुरेल गळ्याची वसुंधरा का चिडचिड करते, असे कोणते दुःख तिच्या मनात कोंडले आहे देवदत्त आणि वसुंधरा यांचे वादाचे कारण काय असु शकेल याचा शोध घ्यायचा असे नंदा ठरवते. 

देवदत्ताच्या आई वडिलांचे रहस्य उलगडल्यावर तिच्या हाती जे लागतं ते खूपच वेगळं आहे, यात दोष कुणाचाच नाही.

काय गवसतं तिला?यासाठी नक्की वाचा वि. स.खांडेकर यांची अमृतवेल.

शब्द सामर्थ्य, वाचत रहावे असे लालित्यपूर्ण लेखन वाचतांना मन लेखकाला नकळत  त्रिवार वंदन करतं......


©️रसिका राजीव हिंगे

Tuesday, 20 April 2021

चित्रकाव्य

 











ओंकाराचा नादातूनी

पडछाया झाली सुरेल

बिंब प्रतिबंब भेटतांना

जलाशयाचे भाव तरल


भूपाळीच्या स्वरांचा

प्रवास निर्मोही सगुण

घेई कवेत पश्चिमा

शिणलेला तो निर्गुण


सांज ही आळसावली

आठवांचे शेले विणत

दूर क्षितिजावर कुठे

कातरवेळेची सांजवात


काळोखल्या गर्भातल्या

धूसर झाल्या वृक्षछाया

भास सावल्यांचे भासे

आभासल्या काही छाया


रसिका राजीव हिंगे



Sunday, 18 April 2021

 प्रसंगकाव्य


चांद्रनगरीतून चांदण शेला 

लेऊन आलीस गे प्रिये तू 

मज भूलवाया प्रीत लाजरी

होऊनि अभिसारिका तू


गंधशाली मनरमणी ग

दरवळ उधळत वाटेवरी

मोहवीत हृदयास सखये

पदन्यास करी राधाबावरी


स्वप्नवत भासे साजणी ग

तव स्पर्शाची जादू अधिरी

मधाळलेले शब्द तुझे ग

नयन तुझे जणू कट्यारी


स्वप्नझुल्यावरी झुलतांना

तुझा हात असावा हाती

तुझ्या संगे दिवस फुलावे

गंधाळाव्यात चांदण राती


रसिका राजीव हिंगे



 








रुप अनेक परी तू एकच

भक्तांसाठी होसी सगुण

निराकार परब्रह्म तूच

साकारतो रे तू निर्गुण


प्राशावी भरली ओंजळ

भक्तीच्या  जलाशयातून

तेज गुरुकृपेचे गवसेल

घ्यावे  निरांजन ओवाळून


भुरभुरणारा वारा जैसा

अनाहत नाद नामाचा

व्यापून आकाश अवघे

नाद लावितो गुरुचरणांचा


असे त्रिस्थळीचे एकच सत्य

गुरुविण नाही नर नारायण

भवसागरी तारावया भक्त

गुरुतत्वाचे झाले अवतरण



रसिका राजीव हिंगे


प्रसंगकाव्य (सखी मंद झाल्या तारका...)


मनगंध पायघड्या

वाटेवरी घातल्या ग

ऐसी रुसुनी बसली

चल ये झडकरी ग


रजनीचा नाथ नभी

आला ग ऐन भरात

पारिजात टपटपे

यावे तैसे गे मनात


सुगंधित रात्र झाली

कमलिनी फुलल्या गे

लेऊनिया साज तू ये

सालंकृत होऊनि गे


उधळीत प्रीतगंध

वाट गंधित जाहली

दरवळ आसमंती

सखे अशी का तिष्ठली


शुक्रतारा चमकेल

आता गगनात राणी

घेऊनी ये ओंजळीत

फुले ती सौंदर्यखाणी


रसिका राजीव हिंगे





 आर्त


गात्र गात्र शहारले

हाक आर्त ऐकूनिया

कोण गात विरहिणी

सांज भरल्या समया


सांज प्रहर व्याकुळ

आस भेटीची मनात

आर्त हाक दे समीर

येई गे भिरभिरत


सांजवत लावतांना

थबकली सांज दारी

आठवांची ये चाहूल

परतुनी  पुन्हा घरी


शांत ज्योत थरथरे

आर्ततेने क्षणभरी

रानातला रव येई

ऐसा गोठ्यात हंबरी


आर्त त्राण परायण

भाव माझा दत्तगुरु

स्मर्तृगामी उभा ठाके

हाक देता विश्वंभरू


रसिका राजीव हिंगे


रंग

 

नवी दिशा नवी आशा

रंग हळवा रंग पिवळा

वैभव नि मांगल्याचा

असे रंग हा आगळा


रंग लाल रक्ताचा

प्रेरणा अन ऊर्जेचा

धगधगत्या ज्वाळेचा

रंग लाल क्रांतीचा


आकाशाची निळाई

निळसर हे सरोवर

रंग निळा हा देखणा

शोभे कृष्णाच्या तनुवर


राग,लोभ,शांततेचा

संगम म्हणजे जांभळा

मौज आणि मस्तीचा

रंग असे हा वेगळा


समृद्धीचा अन चैतन्याचा

रंग हिरवा रंग बरवा मी

जगण्याची लय सृष्टीचा त्राता

सौख्याचा दाता मारवा मी


त्यागाचा अन शौर्याचा

शिवबाच्या भगव्याचा

रंग केशरी सौंदर्याचा

सुगंधित केशर रानाचा


रंग पांढरा तेजाचा

पावित्र्याचा शांततेचा

सर्व रंगाचा जन्मदाता

रंग पांढरा शीतलतेचा


सात रंग हे इंद्रधनुचे

सूर्यकिरणांनी फुलती

आकाशात हे बागडती

ऐक्याचे हे गीत गाती


रसिका राजीव हिंगे

भाव तिथे देव

 


श्रद्धा नि भक्तीचा जेथे जाहला संगम

भाव मनी प्रगटला सारुनिया अहं तम


अहंकार असे मन बुद्धीची अशुद्धता

मनी भाव दाटता होई सारीच शुद्धता


विश्वासाचे पारडे जड जेव्हा होईल हो

भक्तीभावाची तुला तेव्हाच होईल हो 


क्षणभर जागतो मनामनातला भाव 

समोरच उभा ठाके आराधीला देव


नको जडजवाहीर नि पंचपक्वान्न

देव भावाचा भुकेला हवे समर्पण


रसिका राजीव हिंगे







 


दया प्रेम शांती 

हीच खरी भक्ती

भक्तीची ही शक्ती, गुरुराज।

शांत असे चित्ती

प्रशांत ही वृत्ती

माधुर्याची व्याप्ती गुरुदेव।

निस्वार्थ निर्मळ

जगण्याचे बळ

देई आत्मबळ गुरुमाय।

मी तू पण सरे

निवृत्ती अहं ची

वाट साधनेची गुरुनाथ।

ज्ञान तेज प्रेम

करुणा सागर

रूप निराकार गुरुदेव।

आकारात बद्ध

होई भक्तांसाठी

उभा राही पाठी सद्गुरू।

सद्शिष्य नित्य

येतसे शोधीत

न शोधावे रानात गुरुदेवा।

भावाचा भुकेला

मनी जागे भाव

भेटे गुरुदेव झडकरी।


रसिका राजीव हिंगे




शब्दांच्या वाटेवरती



शब्दांच्या वाटेवरती

मळा अक्षरांचा गवसे

कुण्या पांथस्थाची ही

शिदोरी नकळत दिसे


थंडीने लपेटून घ्यावी

शाल पांढुरकी जैसी

तैसे शब्द बिलगले

वासरा गाय भेटे जैसी


ऊन पांघरुनी आले

शब्द शब्द वाटेवरी

तेज सांभाळीत सूर्य

येई पूर्व क्षितिजावरी


हलकेच शीळ वाऱ्याची

कानी गुणगुणू लागली

शब्द परडी सुगंधित

हळूच उधळून गेली


वाट मखमली झाली

वरुण राजा भेटताच

पापणकाठ ओलावले

आठवात  शब्दांच्याच


शब्दांच्या या वाटेवरती

भाव शब्द भरून आले

मोत्यास लाभे कोंदण

तैसे भावनेस लाभले


पांथस्थ हो भावविभोर

उचलता शब्दशिदोरी

शब्द वाट वारसा देई

आनंदवन गे अंतरी


रसिका राजीव हिंगे





 


 


प्रसंग काव्य


काय असेल त्याच्या मनात

तिच्याविषयी

प्रेम? का अजून काही!

कळतही नसेल त्याला....

तरीही ही अनावर ओढ कशाची?

शहारतं वय त्याचं, अर्धवट ज्ञान

असलेलं......कुठेतरी वाचलेलं की

अनुकरण कोणाचं!

 हुंदडायचे ही वय नाही...  

 कुणा स्त्रीबद्दल आकर्षण 

 समजण्याचे... ही वय नाही

 अजाणते वय आहे  म्हणूनच ही

 संभ्रमावस्था.

 ती तर अभिजात सौंदर्याची

 परिसीमा

 तिला कळतंय..... पण वळत

 नाही...... त्रिशंकू सारखी अवस्था

 नजरेला नजर देता येत

 नाही..... त्याच्या

 अथांग सागर डहुळतो आहे

 त्याच्या डोळ्यात

 सैरभैर मन झालंय 

 तिचं ही

 कुठे थांबेल हे सगळं

 का असेच असेल

 स्वप्न

 अपूर्णतेच्या वाटेवरचं.....

 

सप्तपदी संसाराची

 सप्तपदी संसाराची


स्वप्न वाटावे ऐसेच

आले घडूनिया सारे

सप्तपदी संसाराची

आले चालून सख्या रे


साथ तुझी सुगंधित

मन मोहरून आले

ठसे माझ्या पावलांचे

तुझ्या सवे गंधाळले


सात पावलात सख्या

सात जन्म बांधीयले

जन्मोजन्मी तूच लाभो

ऐसे ईश्वरा प्रार्थिले


विश्वासाने फुलावी रे

फुलबाग जीवनाची

तडजोड करतांना

साथ तुझ्या रे प्रीतीची


संसाराची सप्तपदी

ऐसी फुलावी फळावी

कोंदणात प्रीतीच्या रे

बहरून नित्य यावी



रसिका राजीव हिंगे


चित्रललित

 



     काय तुझ्या मनात

     सांग माझ्या कानात

     खुल्लमखुल्ला रे.....

          

 अगबाई! कोण बोललं ग? मला भास तर होत नाही न?  का शब्दांच्या हिंदोळ्यावर झुलता झुलता शब्द सखा बोलला असेल! 

 काय बाई हे मन तरी सारखं तुझ्याकडेच धाव घेतं..... तुझ्या आठवणी लिहू म्हटले तरी गाली लाली येते.... सारखा तुझाच विचार. 

 हळूहळू सांज घराकडे परतत आहे आणि रात्र धरेवर आपलं साम्राज्य वसवू बघते आहे...

 चांदण फुलांनी आभाळ गच्च भरले आहे....सारी नक्षत्र आपलं  देणे द्यायला आतुरले आहेत... अलवार शी निळी झुळूक ...मधूनच तिचं अस्तित्व जाणवून देते आहे, रातराणी दरवळते आहे नि..... निशिगंध.... मुग्ध होऊन गंधित असा हा सोहळा पहाण्यास उत्सुकला आहे.......पण अजून नभी रजनींनाथ आलेला नाही, त्याची वाट सगळे चराचर  बघतो आहे...

 अगदी तशीच माझी अवस्था झाली आहे. 

 सारा शृंगार करून मी बसली आहे. ....तुझ्या आठवात प्रत्येक क्षण युगासारखा भासावा अशी माझी परिस्थिती आहे..

 माझी काजळरेखा पुसट होण्याआधी ये....हातातली कांकणं ही सारखी लगबग करतात आहे का कुणास ठाऊक! आणि माझ्या पायीची पैंजणे स्तब्ध झाली आहेत तुझी वाट पाहून पाहून....

नजर तुझ्या वाटेकडे सारखी वळून चाहूल घेण्याचा प्रयत्न करत होती,शेवटी थकली रे ती पण....

 का उशीर होतो आहे येण्यास? मन रमावे म्हणून तुझ्या आठवणी , तुझ्या सहवासातील  सारे क्षण शब्दबद्ध करण्याचा खुळा प्रयत्न करते आहे.....पण....

 शब्द ही रुसले आहेत आज.... गहिवर दाटून येतो आहे शब्दांना.... लेखणीतून  उतरायलाच तयार नाहीत....

 तू असतोस त्यामुळे लेखणीची कधी आवश्यकता च भासली नाही....

 नयन बोलती गुज मनीचे

 हळवे क्षण ते सांगे प्रीतीचे

 असे होतं .....

 पण आज तू नाही तर  सगळेच माझ्यावर रुसले आहेत की माझ्याभोवती फेर धरून माझं मन रिझवायला रास खेळतात आहे...

 काही कळत नाही तुझ्याशिवाय.......

 

रसिका राजीव हिंगे

 

सांज

 


सांज क्षितिजासी

आली सोनसळी

रंग केशरिया

पश्चिमा उधळी


उधळी केशर 

सांजवेळी कोण

अशी गंधाळत

आली आठवण


आठवांचा सडा

जणू पारिजात

केशरिया देठ

ऐसी सांजवात


सांजवात देई

चाहूल तुझी रे

नजर दाराशी

जाई सारखी रे


 रे हुरहूरती

अशी सांजवेळ

तुझ्या आठवांची

ही कातरवेळ


कातरवेळ रे

कशाचा हा भास

उंबरठ्यावरी

सोनपावलांस


सोनपावलांनी

लक्ष्मी येते घरा

माझ्या घरी वाहे

समृद्धीचा झरा


रसिका राजीव हिंगे

चित्रकाव्य






कुण्या राजाचा महाल

नभा घाली गवसणी

जणू नीलवर्णी तारा

गवसला या गगनी


खुणावतो इतिहास

संपदेचा समृद्धीचा

राजा सारख्या मनाचा

शौर्य नि माणुसकीचा


पैंजणांची छमछम

कशी गंधाळली प्रीती

काळ्या मेघापरी दाटे

क्षण विरह एकांती


नक्षीदार गवाक्षात

कलासक्त हात गुणी

झिरमिळ्या पटलाचे

कुणी फिरविले झणी


पाय घट्ट रोवूनिया

नाते जोडीले भूमीशी

उंच जाई गगनासी

राखे इमान मातीशी



रसिका राजीव हिंगे

रम्य ते बालपण...

 




               असेच असू दे लहानपण

               जे जे मज बहु आवडे

               मनासारखे जगता येते

               ना चिंता ना कशाचे वावडे

       मस्त! ना चिंता ना काळजी! हे शब्दच माहीत नसतात बालपणी. निरागस,निरोगी आणि स्वच्छंदी बाल्य.

       प्रत्येकाच्याच वाट्याला येतं रम्य बालपण. असं कधीच होत नाही न एकदम तरुणपणच आले. बालपण आल्याशिवाय कसे बरे तरुण, वृद्धा वस्था येईल?असा खोडकर विचार आताच माझ्या मनात आला अन मी गेले हुंदडत भूतकाळात जिथे माझं बाल्य होतं.

       पाखरासारखे भुर्रऽऽऽकन उडून जातात हे बालपणातील दिवस. असे असले तरी या वयात झालेले संस्कार,लाभलेले मैत्र आजन्म पुरतील असे असतात.

       त्यावेळी कळतही नाही. चिमणदातांनी तोडलेले छोटे चिंचेचे बाटूक मैत्रिणीला देतांना वाटून खाण्याचा संस्कार नकळतपणे होत जातो.  भांडणे पण कशी तर आहे काय नाय काय. क्षणात गट्टी तर क्षणात कट्टी करणारी.

       शाळेत जातांना येतांना होण्याऱ्या गमतीजमती, एकमेकांसाठी थांबणे, म्हणजे सोबतच जाणे येणे. घरातील कामे सुद्धा आम्ही मैत्रिणी एकमेकींना करू लागायचो पाचवीत होते त्यावेळेस चे आठवले. असा आधार असायचा बालपणात मैत्रीचा.

       संध्याकाळी गिल्ली दांडू,लगोरी,दोरीवरच्या उड्या, पतंग उडविणे आणि चिडवचिडवी. राग आला तर येऊ दे असा खाक्या होता. अभ्यास ही सोबतच करायचा,जणू मिनी शाळाच भरायची रोज आळीपाळीने एकेका घरी.

       हरतालिकेची पूजा सोबतच, गल्लीतले सगळे मुलेमुली मिळून कार्यक्रम सादर करायचे हरताळकेच्या दिवशी. त्याची 15 दिवस आधीपासूनच तयारी.  कार्यक्रमच्या तालमी अशा थाटात व्हायच्या की जणू राज्यस्तरीय कार्यक्रम आहे.  त्यावेळी काही भाड्याने वगैरे ड्रेपरी आणण्याची पद्धत नव्हती. घरातलेच जे कपडे आहे ते त्या भूमिकेला साजेसे घालायचे, एखादीला कमी पडले तर ज्याचे जवळ आहे त्याने द्यायचे हा अलिखित नियम, नाही दिले तर भांडून घ्यायचे अन कार्यक्रम साजरा व्हायचा.

       तुझा भाऊ,बहीण ते माझेही असायचे असे विश्व बंधुत्वाचे बीज पेरणारे बालपण आजकाल च्या मुलांना नाही अनुभवता येत याची खंत वाटते.ही तंत्रज्ञान प्रेमी(टेक्नोसॅव्ही) पिढी असे स्वच्छंदी, रम्य बालपण जगू शकेल का? बाल्य हरवले तर नाही ना अशी भीती,काळजी वाटते या पिढीकडे पाहून. असो. कालाय तस्मै नमः.

       बालपणाने दिलेली ही शिदोरी आजही पुरते आहे म्हणून तर या जगात घट्ट पाय रोवून उभे राहणे शक्य झाले आहे असे मला वाटतं....

       

       रसिका राजीव हिंगे

       

चित्रकाव्य


 




नाद वेणूचा भुलवी 

कान्हा रे वेळी अवेळी

मुग्ध कालिका फुलती 

अन सृष्टी ही गंधाळी


कालिंदीच्या जळावरी

शुभ्र धवल चांदणे

तुज भेटण्यासी शोधी

मन बावरे बहाणे


रीत शृंगाराची न्यारी

रातराणी नि चमेली

चाफा जाई जुई अन

किती माळीसि कुंतली


आंदोळते मन माझे

जैसी यमुना डहुळी

कुठवर ऐसे येणे

तुजसाठी तरुतळी


नीलवर्णी आकाशात

तूच भासतो मजसी

जांभुळल्या आभाळात

तूच चांदवा आभासी


रसिका राजीव हिंगे






सहज सुचलं म्हणून.....

 





हिंदू नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


    सकारात्मकतेची गुढी उभारू आज... आणि करू तिचे मानस पूजन... कारण मानस पूजनात जास्त शक्ती आहे.

    जसे विचार तसा आचार या न्यायाने ह्या हिंदू नवं वर्षाच्या सुमंगल पर्वावर मनात सकारात्मक विचार आणायचे... मान्य आहे सोपे नाही पण प्रयत्न करूयात. 

    सकारात्मक विचारात खूप मोठी ताकद आहे. आपल्या पूर्वजांनी वारसाच दिलाय आपल्याला. 

    श्रीराम जरी विष्णूचा अवतार असले तरी ते मानव रुपात होते. त्यांच्या सकारात्मक विचारामुळेच सागरावर सेतुबंधन झाले आणि दुष्ट शक्तीचा बिमोड झाला. अंदमानच्या काल कोठडीत सावकारांनी साहित्याचा नजराणा भारतीयांना बहाल केला केवळ सकारात्मक विचारांवर. 

    आजपासून म्हणजे चैत्र प्रतिपदेपासून शालिवाहन शक

 सुरू झाले असे म्हणतात. शालिवाहन राजाने त्याच्या सैन्यात चैतन्य निर्माण केले, सकारात्मक विचार दिले शकाचा पराभव केला आणि शालिवाहन शक सुरू झाले म्हणून गुढ्या तोरणे उभारले गेले असे इतिहास सांगतो.

    सकारात्मक विचार केले की आपल्या मनातुन हळूहळू नकारात्मकता कमी व्हायला लागते. आपण सगळे विज्ञान युगात जगणारे आहोत,प्रत्येक गोष्ट प्रयोगाने सिद्ध करून मान्य करतो.

    तसंच करून तर पाहू सकारात्मक विचार. आणि काय सिद्ध होतं ते पाहू असं मला वाटतं....


रसिका राजीव हिंगे




 

साक्षीदार


      अहाहा! काय नयनरम्य, सुंदर दिसतंय न नभांगण... शुभ्र शशी आज निळाई घेऊन आला आहे... अग बाई सावळी धरा पण निळीच भासते आहे....वृक्ष , लतावेली सारीच निळाई...

कृष्ण कृष्ण कृष्ण

     अलगद शब्द आले ओठावर.... अरे रजनीनाथा कसली ही निळाई...  आज पुनवेची रात, तुझा दुधाळलेला पांढुरका प्रकाश येईल अवनीवरती असे वाटत असतानाच तू असा निळा का झालास?

     का तुलाही झाली कृष्ण सख्याची बाधा... राधेसारखी! असो. तू नभी आलास न की मन वेडावते तुला बघण्यासाठी  बऱ्याच आठवणी आहेत तुझ्या संगतीच्या...

     आता ही निळाई च बघ न तुझ्या स्वभावाचे द्योतकच जणू. शांत, आल्हादक.... एखादी निळी झुळूक यावी अन मन सुखावून जावे असेच तुझे रूप आजचे रे. 

     नवपरिणीता प्रीतमहाली अवगुंठून बसली आहे सख्याची वाट बघत तुझ्याच साक्षीने. अशा कितीतरी सखींचा तू सोबती होतास,आहेस आणि राहशील पण. नाही का? कारण सगळ्या रात्री तर तुझ्याच साक्षीने फुलतात,बहरतात आणि विरह पण तुझ्याच साक्षीने सोसतात. खरे आहे न!

    अल्लड षोडशा तुझ्याच संगतीने स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलते, रोमांचित होते. तुझं हे लोभसवाणे रूप पाहिले की सारं विसरायला होतं आणि तूच खरा सखा असे वाटायला लागतं. 

    तुला असं कधी वाटत का तुझ्या स्वच्छ प्रकाशात एखादी तुला न रुचणारी,क्रूर,समस्त मानवजातीला काळिमा फासणारी एखादी घटना घडली तर तू त्याची पण साक्ष देऊ शकशील? देऊ शकशील. नक्की च देशील कारण जिथे तू आहेस तिथे काहीच लपत नाही,आपोआप ते उघडकीस येतं....अशा अप्रिय कथा नको गडे.. 

    तुझी एक गोष्ट मला फार आवडते. देत राहणे. तू स्वतः स्वयं प्रकाशित नाहीस. रविराजकडून तुला प्रकाश मिळतो आणि तू तो हो वाटून टाकतोस,अगदी जे जे आहे मजपाशी ते ते घे तू तुजपाशी असे म्हणत सगळं समर्पण करतोस.... किती  ही उदात्त भावना.....

    पण खरंच तू म्हणूनच खूप छान दिसतोस,सौंदयाची परिसीमा म्हणजे तू असं मला वाटतं...


रसिका राजीव हिंगे

    

    

Tuesday, 30 March 2021


 चित्रकाव्य


भूगर्भाच्या मातीशी

नाते घट्ट ठेवत

जगण्याची जिद्द

कायम ठेवून हा

पसारा मांडला

त्या निर्मिकाच्या सेवेसाठी.

पण तो तरी कुठे आहे

खोल रुजलेली मुळे

भूगर्भास जोजवत 

आताशा मुळांनी मातीशी

प्रतारणा केली.

एक गंधित निष्पर्ण चांदण 

फुलांचा वर्षाव आहे

त्याचा दरवळ अंथरतो

फुलांनी फुलायचे, गंधळायचे

एवढेच उरले.

अनाहत नादाचे गुंजन 

ऐकले या ओसाड माळरानावर

नादच स्तब्ध 

सावळ्या आईशी नाळ

तुटायची आहे अजून

म्हणून  धरून ठेवले

आहे खोल खोल

मुळाशी.....


©️रसिका राजीव हिंगे

Saturday, 27 March 2021

उधळीत रंग प्रीतीचा


 


उधळीत रंग प्रीतीचा

चांद आला गगनात

जणू सावळ्या मिठीत

विसावली राधा क्षणात


सागराची लाट निळी

धाव घेई किनाऱ्यावर

निळ्या प्रीतीत रंगली

राधा भाळली काळ्यावर


कृष्ण कृष्ण म्हणतांना

बासरीचे सूर डोलती

विसरुनिया देहभान

रंग प्रीतीचा उधळती


निळे निळे  हे आकाश 

धरा ही सावळी सुंदर

कृष्णसख्याच्या रंगात

रंगले अवघे चराचर


राधा राधा नादत असतो

यमुनेचा गे तीर सावळा

रंग प्रीतीचा न्याहाळीत

कदंब उभा असे बावळा



रसिका राजीव हिंगे