Sunday, 11 June 2023

अरे संसार संसार.....

 




ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा

काय भुललासी वरलिया रंगा

       अगदी असेच आहे आजकाल समाजात. बाह्य सौंदर्यावर भाळून मुले मुली प्रेमाचा खेळ खेळतात. वास्तवाची जाणीव झाली की खेळ मोडून टाकतात. आयुष्य  म्हणजे अक्षरशः खेळखंडोबा वाटतो.  सारासार विचार करून अंतर्गत सौंदर्याकडे, गुणांकडे कोणी पहातच नाही म्हणण्यापेक्षा त्याची कुणाला गरजच भासत नाही. म्हणून संसार लगेच मोडल्या जातो. घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे म्हणजे काय तर संसार म्हणजे काय? लग्न म्हणजे काय या संस्कृती मूल्यांना पायदळी तुडविले जाते आहे. या संस्कृती मूल्यांचे अवमूल्यन होते आहे. 

       अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर 

       आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर

 संसाराचे अवघे सार बहिणाबाईंनी या दोन ओळीत मांडले आहे. संसार म्हणजे काय? चूल मांडून दोन वेळेचे खाणे, मुलांना जन्म देणे आणि वाढविणे एवढाच संकुचित अर्थ नाही संसाराचा. पूर्ण समर्पण असल्याशिवाय संसार कसा बरे होईल! संसार किंवा प्रपंच म्हणजे विवाहा सारख्या उच्चतम संस्कारावर उभी असलेली इमारत. दोन मनांचे, घराण्यांचे मिलन म्हणजे संसार. एकमेकांस समजून घेऊन आयुष्याची वाटचाल सोबत करण्याचे दिलेले वचन म्हणजे संसार. आपल्या घराण्याच्या परंपरा, वारसा एका पिढीकडून पुढच्या पिढीला हस्तांतरीत करणे म्हणजे संसार. या शिवाय पूर्व संचितानुसार वाट्याला आलेले कर्म आणि कर्तव्ये पार पाडणे म्हणजे संसार. याला आपण स्वतः चा संसार म्हणू शकतो. जो व्यक्तिगत पातळीवर आपल्या जोडीदाराच्या सोबत, आपले सगे सोयरे यांचे भान ठेवत केलेला प्रपंच किंवा संसार. 

       संसार म्हटला की भांड्याला भांड लागणारच. पण त्याचा आवाज बैठकीत यायला नको. असे माझी आई नेहमी मला सांगायची. तात्पर्य एकच की समजून उमजून एकमेकांचा आदर करत संसार केला तर तो सुखाचा होईल. वास्तविक पाहता संसार फक्त दोघांचाच असतो असे नाही तर या दोघांच्या अनुषंगाने बांधल्या गेलेल्या नात्यांचा एकत्रित असतो. स्वीकार केला म्हणजे तो गुणदोषांसह केलेला आहे हे सूत्र लक्षात ठेवले की संसार सुखाचा होतो.

       दुसरा आहे तो विश्व संसार. समाजात राहतो तर समाजाचे पण आपण देणे लागतो. हे विश्वची माझे घर असे म्हणता यायला हवे इतकी प्रगल्भता विचारांची असावी लागेल. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा व्यक्तिगत पातळीवरचा संसार आणि त्याचा अर्थ कळेल, समाजात राहून समाजाची बांधिलकी जपली जाईल, देशाप्रती आदर वाटत असेल तरच विश्व या संकल्पनेला न्याय देता येईल. "मुला-मुलींची वीण वाढवणं आणि चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच संसार म्हणायचे असेल तर, असले संसार कावळे-चिमण्याही करीतच आहेत. पण संसाराचा याहून  भव्यतर  अर्थ  घेणे असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात  आपणही कृत्यकार्य झालो आहोत." सावरकरांचे संसारा विषयी विचार ऐकले, वाचले की हे वाटतं यांनी केला विश्वाचा संसार. यांनाच कळला होता का संसाराचा अर्थ. 

       संसार किंवा प्रपंच हा मानवी आयुष्यात आहेच. नरदेह प्राप्त झाला आहे म्हणजे संसार हा आहेच. संसार म्हणजे जन्म मृत्यूचे चक्र. यातून सुटका हवी असेल तर संसारात राहून परमार्थ साधा असे रामदास स्वामी म्हणतात. "आधी प्रपंच करावा नेटका l मग घ्यावे परमार्थ विवेका l"  त्यांनी स्वतः प्रपंच केला नाही पण प्रपंचात म्हणजेच संसारात राहून परमार्थ कसा साधता येईल हे सांगितले आहे. तुकाराम महाराज हेच सांगतात, "प्रपंच करावा नेटका, कुठे नसावा फाटका" म्हणजे आधी संसार नीट करायचा आहेच. पण त्यासोबतच परमार्थ पण करायचा आहे. प्रगल्भ विचारांच्या माध्यमातून प्रपंच केला तर परमार्थ साधता येतो. गृहस्थाश्रम स्वीकारून आपल्या बऱ्याच संतांनी परमार्थाची कास धरून आत्मज्ञान प्राप्त केले आहे. संसार टाकून परमार्थ करणे आणि परमार्थ टाकून संसार करणे दोन्ही दोषयुक्त. म्हणून दोन्ही सोबतच करायचे. आधी याचा अर्थ इथे वयाचा दाखला नाही तर संसारात राहून परमार्थ करण्याचा  मार्ग समर्थांनी आपल्याला सांगितला आहे. दोन्ही बरोबरच करायचे. प्रपंचात राहून परमार्थ करायचा पण प्रपंचात पडायचे नाही.

       संसारात राहूनच सगुणाचा ध्यास घेऊन निर्गुण निराकार परमात्म्याचे स्वरूप ओळखण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आत्मज्ञान होऊन नरदेहाचे सार्थक होईल यात तिळमात्र शंका नाही..


रसिका राजीव हिंगे 


       

    

ती....

 



     उमा आज लवकरच उठली. भराभर सगळी कामे करून तिने महेशचा डबा भरून स्वतः चा पण डबा भरला. आज वड पौर्णिमा असल्याने तिच्यासाठी आणि सासूबाईसाठी फराळाचे केले अन् महेश आणि सासऱ्यांसाठी भाजी पोळी करून ती तयार झाली. वडाची पूजा करायची होती. पूजेची तयारी सासूबाई करत होत्या. उमाचे हे पहिलेच वर्ष होते पूजा करण्याचे. नटून थटून दोघीही पूजेला निघाल्या. सोसायटीत अजून कोणाला जाग आली नव्हती. उमा ने पटकन पूजा केली अन् मी निघते आता, उशीर झाला म्हणत ती निघाली पण.  ऑफिस मध्ये गेल्यावर पाहिले तर फक्त उमाच छान पारंपारिक साडी, बांगड्या, टिकली, साधेच पण दोन दागिने घातलेली अशी ऑफिस ला आली होती. सगळेच तिच्याकडे पाहून आपसात डोळ्यांच्या खाणाखुणा करत हसल्यासारखे करत होत्या. उमाच्या लक्षात येत होते पण ती काही बोलली नाही. तिचे काम करत होती. लंच ब्रेक मध्ये शारदाने विचारलेच, " काय ग उमा, पूजा वगैरे करून आलेली की काय? अन् एकदम हशा पिकला. उमा पटकन बोलून गेली, "का? तुम्ही नाही केली पूजा? यावर सगळ्या हसायला लागल्या. त्या हसण्यात काय नव्हते! एक कुत्सित भाव, बावळट ठरवत होत्या सगळ्या उमाला. "वेडी आहेस उमा तू, अग कोण करतं आजकाल झाडाजवळ जाऊन पूजा. It's so disgusting. आम्ही तर कालच घरी जाताना वडाची फांदी घेऊन गेलेलो . आज सकाळी फांदीची पूजा केली.ऑफिस मध्ये निघायच्या वेळेस पटकन आटोपली पूजा. काय अर्थ ग अशा झाडाला फेऱ्या घालून सात जन्म हाच नवरा मागत राहायचे. काहीतरी चेंज नको का? शारदा ने आपले नसलेले अर्धवट ज्ञान पाजळले.  उमा आतून खूप अस्वस्थ होत होती. यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही असे तिला वाटले एकवेळ. पण आता जर बोललो नाही तर या अशाच वेडेपणा करत राहतील आणि माझ्यासारख्या सामान्य मुलींना वेडे ठरवत राहतील. उमा काहीच बोलत नाही, विचारात पडली आहे हे पाहून पूर्ती म्हणाली, "केली की नाही बोलती बंद?  अगं हे सगळं थोतांड आहे उमा. पूर्वीच्या बायकांना काही कामधाम नव्हते तर असे करत राहायचे अन् वेळ घालवायच्या." पूर्तीला मध्येच थांबवत उमा एकदम म्हणाली, "काहीही बोलू नकोस पूर्ती, ज्याचा अर्थ आपल्याला कळत नाही त्यावर आपण बोलू नाही. तुला माहित आहे का आपले पूर्वज वेडे नव्हतेच. अनुभवाच्या कसोटीवर घासून ज्ञान मिळविलेले ऋषीमुनी, संत होते ते. त्यांच्यामुळे आपल्याला आज जीवन जगणे शक्य झाले आहे."

     "तू होती का तेव्हा, सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मिळवले त्यावेळी. असा कुठे यमराज येत असतो का?"

     "नसेल आला यमराज.मान्य आहे तू म्हणते ते. पण श्रद्धा होती ग सावित्री ची. ही श्रद्धाच जगण्याचं बळ देते. अगं पण तू विज्ञान युगात जगते आहे न तेच विज्ञान आपल्या पूर्वजांना जास्त माहित होते. वडाच्या झाडाखाली जास्त प्रमाणात ऑक्सीजन मिळतो, त्याची सावली दाट असल्यामुळे. म्हणून सावित्री तिच्या पतीला वडाच्या झाडाखाली घेऊन गेली. तिथे भरपूर प्रमाणात ऑक्सीजान सत्यवानास मिळाला असेल अन् प्राण वाचले असतील.असा का विचार करत नाहीत तुम्ही. रूपकात्मक आहे सत्यवानाची कथा. पण तात्पर्य लक्षात घ्यावे. खूप वजन वाढले तर आज डॉक्टर सांगतात पंचेचाळीस मिनिटे रोज चालायचे म्हणजे वजन कमी होईल. पूर्वी घरातल्या कामामुळे वजन वाढतच नव्हते पण चुकून एखादीचे वाढले तर त्यांना सांगण्यात येई, समोरच्या टेकडीवर मंदिर आहे तिथे जाऊन रोज पाणी घालत जा महादेवाच्या पिंडीवर. आता फिरायला जा असे सांगितले तर घरात इतके माणसं असायची की वेळच मिळत नव्हता. पण देवळात जा म्हंटले की श्रद्धा असल्यामुळे याला परवानगी मिळायची. टेकडीवर जाऊन यायला पंचेचाळीस मिनिटे किंवा कमी जास्त जे काय असेल ते लागायचे. शिवाय देवळाच्या परिसरात वड औंदुंबर, पिंपळ अशी वृक्ष असायची, त्यामुळे आपसूकच ऑसिजन पण मिळत असे. कारण दर्शन झाल्यावर "देवाचिये द्वारी बसा क्षणभरी" या न्यायाने तिथे बसल्या जात होतेच. आता मला सांग होते की नाही आपले पूर्वज हुशार! वडाच्या फांद्या तोडून पर्यावरणाचा तोल का डळमळू द्यायचा. त्यापेक्षा झाडाखाली जाऊन पूजा करायचीच, पण ऑक्झिजन चा साठा पण आत्मसात करायचा. याला म्हणतात स्वार्था बरोबर परमार्थ साधणे."

     "उमा असा विचार तर आम्ही केलाच नाही ग. तुला बरे सुचतात असे विचार. आम्ही तुला काकूबाई समजत होतो पण तू तर आमच्या पेक्षाही फॉरवर्ड निघालीस ग."

     "एक लक्षात असू द्यावे की, निसर्गात जे आहे त्याचा कुठेतरी आयुष्यात उपयोग आहेच. निर्माण झालेले आहे म्हणजे कुठेतरी निर्माती शक्ती आहेच. सावित्री म्हणजे स्त्री शक्तीचे प्रतिनिधित्व करणारी, समर्पण भाव शिकवणारी आदिशक्ती आहे. स्वतः झिजून आपल्या पुढच्या पिढ्यांसमोर आदर्श ठेवणारी शक्ती. हीच परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे कारण निसर्गाने हे कार्य आपल्यावर सोपवले आहे. सावित्री सोबत जसा तिचा सत्यवान होता तसाच आपल्या सोबत पण आहे. शिव शक्ती शिवाय जगरहाटी कशी चालेल?"

     सगळया एकाग्रतेने ऐकत होत्या. विचारांची दिशा बदलली की सगळचं बदलतं हे निश्चित. उमा ला पण छान वाटत होते. बोलल्याचे सार्थक झाले याचे समाधान तिला मिळाले होते.

     "चला मैत्रिणींनो, लंच ब्रेक संपला आहे."उमाच्या या सुचनेमुळे सगळेच भानावर आलेत अन् नव्या उत्साहाने कामाला सुरुवात झाली.....


रसिका राजीव हिंगे