Tuesday, 30 May 2023

कसे सावरू मला...

  कसे सावरू मला...


     सगळ्या गोष्टी जुळून यायला योग यावा लागतो हेच खरं आहे. आजकाल राधिकाचे चित्त काही थाऱ्यावर रहात नव्हते. मोठा मुलगा भावेशचे लग्न झाले, मुंबई सारख्या ठिकाणी घर  झाले याचा आनंद होताच तिला. सून भाग्यश्री पण खूपच समंजस होती.  पण लहान मुलगा राजेशची तिला काळजी वाटायची. 

     माधव आणि राधिकाने नोकरी करून कष्ट उपसत मुंबईत आपला संसार रेटून धरला होता. काटकसर करत मुलांचे शिक्षण करून घर ही घेतले होते. वनरूम किचन असले तरी डोंबिवली सारख्या शहरात होते. शिवाय भावेशला घर घेण्यास मदत ही केली होती. राजेश साधा, हरहुन्नरी मुलगा होता. शिक्षणात खूप पुढे गेला नाही पण कंपनी मध्ये नोकरी करत होता. भावेश च्या मानाने त्याची मिळकत कमी होती तरी त्याला पुरेशी होती. माधव आणि राधिका दोघेही सेवानिवृत झाले होते. राजेश साठी मुली सांगून यायला लागल्या. राधिकाच्या भावाच्या ओळखीने एक मुलगी सांगून आली. नात्यातीलच होती. मुलगी सगळ्यांना आवडली. राजेशने पण आपली पसंती सांगितली. राधिकाला जुळवून घेण्याचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले होते. सोय जाणतो तो सोयरा या न्यायाने एकमेकांची साथ देत दोन्ही कुटुंबांनी लग्न चांगले करण्यावर भर दिला. दोन्ही घराणी सुशिक्षित आणि सुसंस्कृत होती. 

     राधिका उत्साहाने लग्नाच्या तयारीला लागली. जसे भावेशचे केले तसेच राजेशचे पण सगळं व्यवस्थित करायचे यावर तिचा जोर होता. यावेळी मदतीचा एक हात तिच्या सोबत होता. तिची सून भाग्यश्री. कपडा खरेदी, दागिने, देणेघेणे सगळं अगदी साग्रसंगीत केले राधिकाने. घराला लग्न घराचे स्वरूप आले. पाहुणे यायला सुरुवात झाली. देवदेवक, ग्रहयज्ञ उत्साहात पार पडले. अन् वरात निघाली मुलीच्या गावाकडे. जाताना पण सगळ्याच्या उत्साहाला उधाण आले होते. दोन दिवसांचे लग्न धूमधडाक्यात झाले. राधिका फारच आनंदात होती. माधवला सगळं व्यवस्थित पार पडलं याचं समाधान होत. वरात घरी आली. लक्ष्मीपूजन झालं. राधिकाने नव्या सुनेचे नाव राजश्री ठेवले. इति कर्तव्यतेचे समाधान राधिका आणि माधव अनुभवत होते. अन् नियती कोपऱ्यात बसून खदाखदा हसत होती.

     लग्नाच्या दोन दिवसांनीच राधिका तिची नणंद कुसुमावती कडे कार्यक्रम होता म्हणून गेली. वास्तविक पाहता लग्नाचा पसारा तसाच होता शिवाय दगदग पण खूप झाली होती. पण आपले घर लहान आहे. राजेश राजश्री जरा जवळ येतील,ओळख वाढेल या हेतूने ती नणंदेकडे गेली. 

     इकडे पहिल्याच रात्री राजेश्रीने आपले गुण उधळायला सुरुवात केली. "मला हात लावायचा नाही, मी सांगते तेव्हढे ऐक".

     "अरे असे काय झाले. देवा ब्राह्मणांना साक्षी ठेवून आपलं लग्न झाले आहे. हा काय नवा गेम".

"माहित नाही"

     राजेशला वाटले नवीन आहे. आपली माणसं सोडून आली आहे, घाबरली असेल होईल तिला या घराची सवय. असा विचार करून राजेश म्हणाला ठीक आहे. समंजस आणि सहनशील व्यक्तींचीच परीक्षा ईश्वर घेतो की काय न कळे. सकाळी उठल्याबरोबर राजेश ने स्वतःचे आवरले अन् तो ऑफिस ला जायला निघाला तेवढ्यात भावेश आणि भाग्यश्री आले. "हे काय राजेश, लग्न होऊन चार दिवस झाले नाही तर तू ऑफिस ला निघालास! नको जाऊ, आज आम्ही दोघांनी पण सुट्टी काढली आहे. मस्त कुठेतरी जाऊ या. आजचा पूर्ण दिवस बाहेर एन्जॉय करू." भाग्यश्री पण म्हणाली, चल राजश्री आपण जाऊ या मस्त बाहेर. अग हेच दिवस असतात एन्जॉय करायचे." पण राजश्री काहीच बोलली नाही. मला यायचे नाही एवढेच ती म्हणाली अन् आत चालली गेली. राजेश म्हणाला, "भाऊ राहू दे, तुम्ही दोघे जा. मी जातो आज ऑफिसला". काय झाले काही कळले नाही पण भाग्यश्री  पण घरी चल म्हणाली अन् ते घरी गेले. माधव भावेश कडेच होता. "काय झालं! तुम्ही आज दिवसभर बाहेर जाणार होता न." भावेश काहीच बोलला नाही. शाळेची वेळ होत आली म्हणून दोघांनी लवकर आवरले अन् गेले ही शाळेत. माधवला काही कळेना काय झालं ते. पण त्याने जास्त विचार न करता स्वतः चे रूटीन सुरू ठेवले.

     संध्याकाळी राजेश उशिराच घरी आला. राजश्रीने काहीच केले नव्हते. सकाळी स्वतः पुरेसे स्विगी वरून मागवले आणि नुसती बसून होती खोली मध्ये. राजेशने सगळे तिचे ताल तांबोरे पाहिले अन् खूप चिडला मनातल्या मनात. कुठेतरी पाणी मुरते आहे असे राजेशला वाटले. त्याने बाहेरून जेवण मागवले अन् दोघेही जेवली. राजश्रीचे जेवणात पण लक्ष नव्हते. राजेशच्या नजरेतून हे सुटले नाही. शांतपणे राजेश तिला म्हणाला, "काय अडचण काय आहे तुझी? अशी का वागते आहेस. तुला कोणी काही बोलले का? आपलं चार दिवसांपूर्वी लग्न झाले आहे असे वाटतच नाही."

     "मला तुझ्याशी लग्न करायचेच नव्हते". अगदी चिडून राजश्री बोलत होती. आता मात्र राजेशच्या पायाखालची जमीन सरकली. हे कोणतं संकट माझ्या समोर आले. त्याचा त्याच्यावर विश्वास बसेना, हे असं माझ्या आयुष्यात घडेल याची कल्पना सुद्धा मी करू शकत नाही. मनातून खूप चिडला राजेश. तरीही शांत राहून त्याने विचारले,"हे तू आधीच का नाही सांगितले? सगळं पुढचं टाळणे शक्य झालं असतं". 

     "आईबाबा नाही म्हणाले, त्यामुळे मला काही बोलता आले नाही."

     "अग पण मला तरी सांगायचे, मी काहीही कारण सांगून हा सगळा प्रकार थांबवला असता."

     "किती प्रश्न विचारतो आहेस? मला तुझ्याशी लग्न करायचे नव्हते अन् आता इथे राहायचे पण नाही. मी चालली आहे आज. मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. विषय संपला."

     "विषय संपला काय ? तुझ्या अशा वागण्यामुळे माझ्या आयुष्याचे किती नुकसान झाले आहे याची कल्पना तरी आहे का तुला? अन् आईबाबा नाही म्हणाले म्हणून बोलली नाही म्हणतेस तर आता घरी गेल्यावर काय तुला दिवे ओवळणार आहेत का? थोडा तर विचार करायचा ना असे मुर्खासारखे वागण्या आधी."

     "हे बघ राजेश, तुला मला बोलण्याचा काही अधिकार नाही. दुसरी गोष्ट मी आईकडे जाणारच नाही, मी अनिल कडे जाणार आहे. माझं प्रेम आहे त्याच्यावर. आम्ही दोघे लग्न करणार आहे."

     "तू इथून कुठेही जाणार नाहीस, आई घरी येईपर्यत. नंतर घेऊ निर्णय."

     "तुझ्या अटी घालणं बंद कर. तुझी आई कोण लागून गेली मला अडवायला? मी जाणार म्हणजे जाणार. तू जास्त जबरदस्ती केली तर मी पोलीस तक्रार करेल, लग्न होऊन चार दिवस झाले नाही तर हा मला मारझोड करतो आहे वगैरे. नाहीतर काही बर वाईट करून घेईल मग बस जन्मभर तुरुंगात."

     राजेशला काही कळेना. डोळ्यासमोर अंधारी यायला लागली. त्याने आधी बाबांना फोन करून घरी बोलावले. माधव घरी आला. सगळा प्रकार त्याला राजेशने सांगितला. माधवने राजश्रीला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकेना. उलट माधवचा अपमान करायला लागली. शेवटी माधवने राधिकाला सगळं कळविले आणि राजश्रीला तिच्या वडिलांकडे सोडून देतो असे सांगितले.  तिला एकटीला पाठवणे धोक्याचे होते. कारण उद्या तिचे वडील म्हणाले माझी मुलगी मी तुमच्याकडे दिली होती. असे म्हंटले तर! जबाबदारी आपली आहे असे ठरवून माधव निघाला तिला घरी सोडायला. राजश्रीने खूप आकांड तांडव केले. मी एकटीच जाते, तुम्ही कशाला येता. येऊ नका. पण माधवने तिचे काहीच ऐकले नाही अन् तिला तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले. तिथे गेल्यावर सविस्तर राजश्रीच्या वडिलांना कल्पना दिली. गहिवरल्या स्वरात माधवने त्यांना विचारले," तुम्हास माहित होते तरी माझ्या मुलाची फसवणूक का केली. आधीच का नाही सांगितले?  पोलीस तक्रारीच्या आणि जीवाचे बरेवाईट करण्याच्या धमक्या तुमची मुलगी माझ्या मुलाला देते. काय कारण तो सज्जन आहे म्हणून  की तुमच्या मुलीला काही कळत नाही म्हणून?"

     राजश्री चे बाबा काहीच बोलू शकले नाहीत. त्यांचा समज खोटा ठरला होता. स्वतः च्या मुलीचे गुण,स्वभाव सगळे माहित असताना ही ती सुधारेल या खोट्या आशेवर त्यांनी एका सद्गुणी मुलाच्या आयुष्याचा खेलखंडोबा केला होता.

     जगात कितीही चांगले वागले तरी अशा अति शहाण्या मुलींच्या वागण्यामुळे चांगली मुले फसवल्या जातात, आयुष्यातून सगळा आनंद निघून जातो. पुन्हा उभारी धरणे कठीण आहे.  काहीही कारण नसताना राजेश वर घटस्फोटाचा शिक्का लागला ही किती मोठी हानी आहे त्याच्या आयुष्याची. त्या क्षणी एकच विचार होता त्याच्या मनात कसे सावरू मला..

     मुलींना एकच सांगावेसे वाटते आपण समाजात राहतो तर समाजाचे देणे लागतो. उगाच पाश्चिमात्य चे अनुकरण करून सगळ्यांची आयुष्य पणाला लावू नका. तुमचीच सारासार बुध्दी जागृत ठेवा तरच या जगात तरणोपाय आहे हेच निर्विवाद सत्य आहे सत्य आहे...


रसिका राजीव हिंगे 

  

     

समझोता गमोंसे करलो....

 समझोता गमोंसे करलो....


 मानवी जीवन असे अनुभवाची खाण

 सुख दुःखाचा फेरा, वर्म आयुष्याचे जाण

      जीवन म्हणजे काय तर दोन घडीचा डाव. तो कसा खेळायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे. माणूस जन्माला येतो तेव्हाच सोबत त्याचं संचित, प्रारब्ध आणि मृत्यू पण घेऊन येतो. जन्म आणि मृत्यू हे जरी आपल्या हातात नसले तरी जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास करताना क्रियमाण कर्म करण्याचा अधिकार आपल्याला असतो. सत्कर्म करत जायचे म्हटले तरी परिस्थिती कशी आहे  आणि आपली शक्ती किती आहे यावर अवलंबून आहे.

      आयुष्य आहे म्हणजे सुख आणि दुःख यांचा पाठशिवणीचा खेळ सतत चालत असतो. दुःखात माणूस होरपळून निघतो तर सुखात आनंदाच्या झुल्यावर झोके घेतो. असे असले तरी सर्वसाधारण दुःखाला कुरवाळत बसण्याची सवय असते माणसाला. कितीही मोठे संकट आले तरी त्याच्या सन्मुख होऊन त्याच्याशी लढता आले पाहिजे. हे केव्हा शक्य होईल, जेव्हा मनात सकारात्मक विचार येतील तरच. तशी सवय मनाला लावून घ्यावी लागेल. स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले होते सर्वधर्म परिषदेत बोलायला. वास्तविक पाहता त्यांना आमंत्रण नव्हते. पण या परिषदेत जायला कसे मिळेल यावरच ते सतत विचार करत होते. अपमान झाला त्यांचा, त्यांना तिथे जेवायला मिळाले नाही,पण स्वामीजी डगमगले नाहीत. संकटांशी दोन हात करण्याची त्यांची धाडसी वृत्तीच त्यांना सर्वधर्म परिषदेत घेऊन गेली. हातपाय हलवले की मार्ग दिसतात. जेवण मिळत नाही, तिथे कोणी ओळखत नाही, उपहासाने सगळे पाहतात आहे, हे कमी दुःख होतं का? पण सकारात्मक विचार आणि येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याची शक्तीच त्यांची ऊर्जा बनली होती. सांगायचा उद्देश हाच की दुःख तर येतातच पण त्याच्यावर मात करत आयुष्याची वाटचाल करत गेले तर आयुष्य खूप सुंदर आहे. 

      सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वता एवढे ॥

      तुकाराम महाराजांचे हे बोल हे अनुभवाच्या कसोटीवर घासून तपासून आलेले आहेत. आयुष्यात सुख कमीच आहे, त्यामानाने दुःख जास्त प्रमाणात आहे. असे असले तरी संतांचे वचन ध्यानात ठेवावे, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत गेले तर दुःखाची झळ कमी जाणवेल. जे जे दृश्य आहे ते सगळे नाशिवंत आहे. त्यामुळे जन्म आहे म्हणजे मुत्यू अटळ आहे. कर्तृत्व असे असावे की मरणोत्तर कीर्ती रूपाने आपण जीवंत रहावे.

      मोठ्या ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या आधी सामान्यच होत्या. त्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला. दुःखांचे डोंगर त्यांच्यावर कोसळले. शिवाजी महाराज आग्र्याहून परत आले ते त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या बळावर. शंभू राजे मागे ठेऊन आलेले महाराज स्थितप्रज्ञ होते. कशाच्या बळावर? माझं बाळ माझं बाळ म्हणत ते रडत बसले नाहीत. त्यांचा त्यांच्या मनगटावर आणि स्वतः वर पूर्ण विश्वास होता. हाच विश्वास त्यांना बळ प्रदान करत होता. आईचा बोट धरून आलेला पाच सहा वर्षाचा बाळ स्वराज्याची स्थापना करतो म्हणजे हे सहजासहजी घडले नाही. पन्नास वर्षांची हयात पणाला लावली. 

      दुःख येतच राहतील. संकट येतीलच कारण ती येण्यासाठीच असतात. दुःखाला कुरवाळत न बसता त्यावर सकारात्मक विचारांनी आणि स्वतः वरच्या विश्वासाने मात करता आली पाहिजे. तेच जगणं होय. संघर्षाचे बाळकडू लहानपणीच पाजले तर पुढे दुःखाचा बाऊ केल्या जात नाही. माहित असतं काहीही झालं तरी आणि कोणतीही परिस्थिती उद्भवली तर त्याच्याशी लढण्याची ताकद आहे. दुःखाशी समझोता करण्यापेक्षा त्याला ओलांडून पल्याड गेलं म्हणजे कळतं आयुष्य किती सुंदर आहे. यालाच जीवन ऐसे नाव......


©️®️रसिका राजीव हिंगे


मी एक फुल...

 


शुभ्र फुले रेखित रचिला चांद तू जुईचा

म्हणालीस, "चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा !"

     कॉलेजमध्ये असल्यापासूनच अरुण दाते यांच्या गाण्यांची आवड होती. अगदी अभ्यास करतांना सुद्धा गाणे ऐकत असे. ह्या ओळी ऐकल्या की डोळ्यासमोर चित्र उभे राहायचे. फुले वेचताना मीच स्वतःला पहायची. त्याचा चंद्र मीच रेखत होते. जुईची फुले कशी दिसतात ते पाहिले नव्हते. पण चंद्रोत्सव म्हणजे पांढरी फुलं आहेत एवढेच कळले.  त्यावेळी काही आता सारखे मोबाईल अन् गुगल बाबा नव्हते पटकन इमेज पाहू कशी आहे ते. असो. पण लग्न झाल्यानंतर माझ्या अंगणात जुईची वेल होती. पूर्ण गच्चीवर चढवलेली, पावसाळ्यात संध्याकाळी शुभ्र झालेली, आणि मंद गंधाने अंगण भारलेले. फुल खूपच नाजूक पाच पाकळ्यांचे. पण मोहवणारे. संध्याकाळी शाळेतून आले की गच्चीवर जाऊन पदरात जुईच्या कळ्या तोडून आणायची. सासूबाई गजरे करायच्या. सगळं घर मंद सुवासाने दरवळायचे. देवाजवळ लावलेला दिवा अन् घरात मंद धुंद सुगंध. प्रसन्न वातावरण असायचे. यावेळी कोणी आले तर या गंधाचे कौतुक केल्याशिवाय राहत नसे. जाताना हातात एखादा गजरा असायचाच. मी तर खूप माळायची गजरे. कळी उमलण्या आधी गजरा अगदी छोटासा असायचा. मी म्हणायची पण, अजून मोठा करा. म्हणजे मला लावता येईल. पण कळ्या उमलल्यावर  शुभ्र फुले इतकी गोड दिसतात की हातात घेऊन मोरपिसा सारखे अलगद गालावरून फिरवून घ्यावे. छान मंदधुंद गंध. 

     माझं आयुष्य ही या जुईच्या फुलासारखे गंधाळलेले होते. येणारा प्रत्येक दिवस अन् सांज माझी मोहरलेली असायची. येईल त्याला मी गंध गजऱ्याच्या रूपाने आणि माझ्या स्वभावानुसार देतच होते. रोज नवीन रुप घेऊन येणारा सुगंध मला मोहवत होता. याचा अर्थ संघर्ष नव्हता असे नाही. पण माझे घर माझ्यासोबत होते.  त्यामुळे धग कमी जाणवली त्यावेळी. एकाच देठातून निघतात कोणत्याही फुलांच्या पाकळ्या. जुईच्या फुलांच्या पाकळ्या नाजूक असल्या तरी समर्पण करण्यात कुठेच कुचराई करत नाहीत. माझ्या घरात पण असेच सगळेच समर्पण करण्यात तरबेज होते. मग ते कोणतेही क्षेत्र असो. तसे बाळकडू आम्हाला लहानपणीच मिळाले आहे.

     जुई नाजूक आणि गंधित आहे. नाजूक असल्यामुळे असेल किंवा निसर्ग नियम आणि तिचे संचित, प्रारब्ध असेल पण ती लवकर कोमेजून जाते. सकाळी संध्याकाळ सारखा तिचा माज? हो माजच रहात नाही. निर्माल्य स्वरूप घेते हळूहळू ती. समर्पणाचा दरवळ संपला की संपले सगळे. माझ्या आयुष्याशी किती जुळलेली आहे  ही जुई.  सुगंधाचे दान देऊन झाले की, संपले सगळे. माझे आयुष्य ही असेच लवकर कोमेजून गेले. सुखाच्या हिंदोळ्यावर उंच झोके घेताना मला कधी असे वाटलेच नाही मी पडणार आहे. त्यावेळी माझ्या आयुष्याची वेल जुई सारखीच आधाराने जगत होती. पण जुईचे फुल वेलीपासून वेगळे झाले की लवकर कोमेजते, पण कुठल्यातरी आधाराने वेलीवरच असले की बराच वेळ टवटवीत राहते. मात्र आधार गेला की सगळचं संपतं. उरतो तो फक्त निर्माल्याकडे जाणारा प्रवास..... असं असलं तरी हा प्रवास सुखदायी कसा होईल याचाच विचार हे फुल कोमेजतांना करत असावं. कारण पुन्हा संध्याकाळी उमलायचे आहे. त्या तयारी साठी पुन्हा कळीचे रुप धारण करतं. मी कोमेजली तरी माझा उपयोग कोणासाठी किती होईल याचाच विचार मी करत आहे. आपला मार्ग आपण शोधायचा हा निसर्गाने घालून दिलेला पायंडा ही जूईची वेल आत्मसात करते. साधी फांदी लावली तरी जागा मिळेल तिथून बहरत वर येतेच येते. तसेच असावे आयुष्य हा आत्मबोध मला जुईने करून दिला. देत रहा आणि आनंद मिळवून सुखरूप हो हा संदेश जणू जुई सगळ्यांना देत आहे...

 निसर्गाचे रूप सुंदर समर्पणाचे भाव

 सुगंधाचे दान देणे हेच जगण्याचे नाव


रसिका राजीव हिंगे 

मीच माझा सारथी.....

 



     आज कितीतरी दिवसांनी राघव लवकर घरी निघाला होता. काहींना काही कारण निघून त्याला ऑफिस मधून निघायला वेळ व्हायचाच. आज सगळीच कामं लवकर आणि मनाजोगती झालीत आणि मीटिंग पण कमी होत्या त्यामुळे कधी नव्हे तो खूश होऊन घरी निघाला.  ड्रायव्हर गाडी घेऊन आला तसे त्याने आज मीच ड्रायव्हिंग करणार आहे तू पण जा घरी लवकर असे सांगून तो गाडी घेऊन निघाला.  शीळ वाजवत शांतपणे राघव गाडी चालवत होता. सिग्नल वर गाडी थांबली अन् त्याच्या गाडीसमोर एक छोटासा मुलगा "गजरे घ्या साहेब, ताजे हायेत, तीस ला दोन देतो." त्याच्या चेहऱ्यावरचे भाव इतके केविलवाणे होते की, सगळी टोपली विकत घ्यावी असे राघवला वाटले. पण त्याने भावना आवरल्या अन् गरज नसतांनाही दोन गजरे विकत घेतले. तेवढ्यात सिग्नल सुटला अन् राघव पण पुढे निघाला. पण त्याचं मन मात्र मागेच राहिले. त्या गजरे विकणाऱ्या मुलाच्या केविलवाण्या नजरेत. त्याच्यामध्ये तो स्वतः ला पहात होता. विचारांच्या आवर्तनात तो खूप मागे गेला,  तिथे त्याचे सुकोमल बाल्य कोमेजत होते. एकेक आठवणींचा कप्पा अलगद उघडत गेला अन् राघव त्यात गुरफटत गेला.

     लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरविल्यामुळे राघव अवघ्या आठव्या वर्षी  पोरका झाला. काका काकू कडे काही दिवस राघव होता.पण त्यांनी त्याच्या वडिलांची जमीन स्वतः च्या नावावर करून घेतली. राघवला काकू खूपच त्रास देत होती.धड जेवण पण मिळत नसे. शाळेत जातो म्हणाला तर "तुझा बाप वरून येऊन फी भरेल का? काही शाळा नको. बस घरी अन् काम कर शेतातले अन् घरचेही." असे बोलून राघवला मारहाण पण करीत होते.  काकू घरच्या फुलांचे गजरे करून राघवला विकण्यासाठी तालुक्याच्या गावी पाठवत होती. या कामाचा राघवला खूप त्रास होत होता. त्याला शिकायचे होते. एक दिवस असाच राघव गजरे विकायला तालुक्याच्या गावी आला. लहानग्या राघवच्या मनात असंख्य विचार येत होते. मला शिकायचे आहे. इथे राहिलो तर मला शिकता येणार नाही. इथून जायला हवे. पण कुठे? कोण सांभाळणार आपल्याला!  असे उलट सुलट विचार करत राघव गजरे विकत होता. सांज व्हायला आली. पोटात कावळे ओरडत होते. पण त्याचे मन वेगळाच निश्चय करीत होते. सगळे गजरे विकले गेले. राघव निघाला पण आज राघवने काकुच्या घराच्या विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात केली. पाय जिथे नेतील तिथे, वाट फुटेल तिथे हा आठ नऊ वर्षांचा बालक चालत राहिला. अंधार होता चारी बाजूने. पण मन पक्के होते. आईने शिकवलेली रामरक्षा म्हणत चालत राहिला. पोटात अन्नाचा कण नाही. निश्चय बळ देत होता चालण्याचे. कुठपर्यंत चालत आला याचेही भान नव्हते त्याला. 

     पाखरांचा कलरव ऐकू आला तसा त्याला थोडा धीर आला. आता पहाट झाली. म्हणजे उजाडेल. अंधार नाहीसा होईल. तो एका इमारती जवळ उभा राहिला. रात्रभर चालल्याने दमला होता. पाणी कुठे मिळेल का या आशेने तो इकडेतिकडे पहात होता. पण काही दिसेना. पक्षी घरट्या बाहेर पडले चारा पाणी शोधायला. अन् राघव उभा होता आपले नशीब आजमावत. 

     "कोण रे बाळ तू? काय हवे तुला?" या आवाजाने राघव दचकला. "काही नको काका, सहज उभा होतो इथे."

     "दमलेला दिसतोस. कुठून आलास? कोणी बरोबर आहे का?" या प्रश्नांनी राघवचे डोळे भरून आले. तो थरथर कापायला लागला. काय बोलावे त्याला काही कळत नव्हते. अनुभवी कुलकर्णी काकांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. हा नक्कीच एकटा आहे. मनात खूप स्वप्न घेऊन धावतो आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला जवळ घेतले. पाठीवरुन प्रेमाने हात फिरवला. तसा राघव ओक्साबोक्शी रडायला लागला. काकांनी त्याला रडू दिले. त्याच्याकडून हळूहळू सगळी माहिती काढून घेतली. राघव पण थोडा शांत झाला. काका त्याला  आत घेऊन गेले. आधी गरम दूध दिले अन् थोड्या वेळातच गरम नाश्ता दिला. उपाशी पोर अधाशासारखे सगळं खात होता. काका फिरून आले. राघवला जवळ बोलावले. 

     "हे बघ बाळा, हे माझे घर असले तरी इथे तुझ्यासारखी बरीच अनाथ मुले आहेत. मला त्यांना अनाथ म्हणायचे नाही, कारण सगळी एकत्र आल्यामुळे आपण सगळेच सनाथ झालो की नाही?"

     छोट्या राघवला काही कळत नव्हते. तो फक्त त्यांच्याकडे आणि आजूबाजूच्या मुलांकडे आळीपाळीने पहात होता. तेव्हा काकांच्या लक्षात आले की हा फारच लहान आहे.याला वळण लावायला वेळ लागेल. काका म्हणाले, "तुला इथे राहायला मिळेल पण आपली सगळी कामं म्हणजे जेवण सुद्धा तुला तुझं बनवून घ्यावे लागेल. काही दिवस कुणाची मदत लागली तर घे, पण नंतर तुलाच तुझे सगळे करायचे आहे हे मान्य असेल तर तू इथे रहा."

     राघवला अतिशय आनंद झाला. तो लगेच म्हणाला, "काका, मला सगळं मान्य आहे. फक्त मला शाळेत जाण्याची, शिकण्याची परवानगी द्या. मला खूप शिकायचे आहे." 

     "ते तर करावेच लागेल, शाळेत जावे लागेल. पहिल्या वर्षाची फी मी भरेन पण पुढे तुला तुझे सगळे पहावे लागेल."

     राघवने शाळेसाठी काकांच्या सगळ्या अटी मान्य केल्या. अन् सुरू झाला राघवचा यशोशिखराकडे जाण्याचा प्रवास. मिळेल ते काम करून, शाळेचा अभ्यास करून राघव यशाची एकेक पायरी चढत गेला. कुलकर्णी काका त्याचा हा प्रवास पहात होते, अनुभवत होते. मनातून त्यांना खूप समाधान मिळत होते. कारण विद्येचे माहेर घर असलेल्या पुणे शहरात त्यांनी त्यांच्या आयुष्यात ज्या हाल अपेष्टा सोसल्या त्याच या अनाथ मुलांना सोसाव्या लागू नये म्हणून काका प्रयत्नशील होते.  स्वतः चा मार्ग स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांनी मुलांना दिले होते, ते ही स्वबळावर. काकांच्या घरात जी मुले होती ती सगळी शिकून मोठी झाली होती. प्रत्येकाने स्वतः च्या जीवन रथाचे सारथ्य स्वतः केले होते, करतात आहे. राघव ने स्वतः च्या बळावर बिझिनेस अडमिनिस्ट्रेशन या विषयात पदवी प्राप्त केली आणि पुढे एमबीए करून वित्त विभागात उच्च पदावर कार्यरत झाला. पहिला पगार राघवला मिळाला तेव्हा काकांना पुन्हा एकदा आनंद झाला. राघवचा पगार झाला म्हणून नाही तर आपली निवड चुकली नाही. राघवने स्वतः त्याच्या जीवन रथाचे लगाम यशस्वी पणाने पेलले होते, त्याचा मार्ग त्याने स्वतः शोधला होता. 

     हॉर्न चा आवाज आल्यामुळे राघव भानावर आला. तो घरी पोहचला होता. पण विचारांच्या तंद्रीत कार मधून उतरून घरात जावे लक्षात आले नाही.  कल्याणी ऑफिस मधून घरी आली तर राघवला कार मध्येच बसलेले पाहून तिने जोरात तिच्या बाईकचा हॉर्न वाजवून त्याला जणू पुन्हा वर्तमानात घेऊन आली....


रसिका राजीव हिंगे 

     

पुस्तक परीक्षण - गोष्ट तुझी माझी

  

  


     एक पुरुष स्त्री मनाचे इतके बारीक सारीक कंगोरे कसे उलगडून लिहू शकतो हा प्रश्न वैभव धनावडे लिखित "गोष्ट तुझी माझी" हा कथा संग्रह वाचतांना जाणवले. नोकरी करणाऱ्या स्त्री चे मन असो की गृहिणी म्हणून घरी कामात स्वतः ला गुंतवून घेणारी स्त्री असो तिचे मन जवळून अनुभवले असे वाटले.

     अश्विनी या पात्राभोवती फिरणाऱ्या विविध प्रश्नांचा उहापोह या कथा संग्रहात केलेला आहे. नवीन लग्न होऊन आलेली अश्विनी स्वतः घरात बदल घडविण्याच्या प्रयत्न करते. ठिणगी पेट घेण्याच्या आधी समंजस पती सावरून घेतो. एकमेकांना सावरून सुखाचा संसाराचे प्रात्यक्षिक दाखवून देते तर  "कल करे सो आज, आज करे सो अब" या न्यायाने जे करायचे ते आताच कर, उद्याचा काय भरवसा? नंतर मनाला जी बोचणी लागून राहते ती आयुष्यभर त्रासदायक ठरते, आयुष्य कुरतडत राहते.  सहवासात आलेल्या प्रत्येक मुलाचे अंतरंग ओळखून वागावे, कोणावर केव्हा आणि किती विश्वास ठेवावा हे अंतरंग मधील मेघना सहज सांगून जाते. आयुष्य हे चित्रपट आहे. आपल्याशी कोण कसे वागते यापेक्षा आपण कोणाशी कसे वागावे? गैरसमज न करून घेता समोरच्याकडे आपण एक पाऊल टाकले तर तो आनंदाने आपल्याकडे दहा पावले चालत येतो. चित्रपट ही कथा घर दोघांचे आहे, एकाने पसरवले तर दुसऱ्याने आवरावे हा धडा शिकवून जाते.

     सच्ची मैत्रीण वेगळ्याच धाटणीची, स्वतः स्वतः कडे लक्ष देणे गरजेचे आहे हेच अश्विनी सांगते. आयुष्याच्या वळणावर केव्हा कशी आणि कोणत्या गुणाला किंवा गोष्टीला तिलांजली द्यावी लागेल हे सांगता येत नाही. आहे त्या परिस्थितीत सुधारणा करून पुढे चालत जाणे अपरिहार्य ठरते. तिलांजली या कथेतून अश्विनी ला हेच सांगायचे आहे. झुलता पूल ही कथा म्हणजे स्त्री हीच घराचा आधार आहे, घराचा तोल सांभाळणे म्हणजेच पर्यायाने आपली माणसे जपणे. आयुष्य जगायचे तर राज मार्गाने. म्हणजे सुखाची झोप मिळते, स्वास्थ ही चांगले रहाते स्वतचे अन् देशाचे पण. रागावून, मारून मुटकून मुलांना वळण लावता येत नाही तर वेळ प्रसंगी त्यांच्याशी गोड बोलून त्यांच्या मनाचा थांग काढावा लागतो.  तर कधी स्वतःची ओळख स्वतः च मुलांना करून देऊन वळण लावणे किती गरजेचे आहे हे अनलॉक आणि पंखा बंद या कथेतील नायिका सहज सांगून जाते. तुळस कथा वाचताना नकळत पापणकाठ ओलावतात.  आपण समाजात राहतो तर समाजाचे देणे लागतो ही कथा समाज भान शिकवते. काहीही चूक नसताना एखादी स्त्री सतत झगडत असते. माचिस ची गणितज्ञ नायिका कुणाला किती किंमत द्यावी हे सम आणि व्यस्त प्रमाणात शिकवून जाते. वळण असो की प्रेशर कुकर आणि रिंग असो काहीतरी दृष्टांत देऊन च नायिका तिचे मन उलगडत जाते. काय गमावले यापेक्षा काय आणि किती लाभले हे महत्वाचे आहे. कुलूप ची नायिका याचं विचाराच्या भोवऱ्यात सापडते. स्पर्धेत टिकायचे असेल तर दुबळेपणा असून उपयोगाचा नाही हे किती मोठं तत्वज्ञान हरिणी या कथेत गवसले. कितीही संकटे आली खचून न जाता त्याचा सामना करायचा. हिट मी म्हणत उभे राहायचे. आयुष्यातील सगळी वळणे स्त्री पेलू शकते. तिला आधार मिळो अथवा ना मिळो. समुद्र या कथेत तर स्त्री मनाचे सखोल विश्लेषण केले आहे.

     काहीतरी छान वाचावे असा हा कथासंग्रह वाचनीय आहे. वळण ही कथा विशेष भावली. कारण आयुष्यात बरीच वळणं येतात, काही सुखकर तर काही क्लेशदायक. प्रत्येक वळणावर घेतलेला निर्णय हा महत्त्वाचा ठरतो....


रसिका राजीव हिंगे 

     

     

    

मन बावरे हळवे झाले

 


मन बावरे हळवे झाले


मेघ सावळे पुन्हा एकदा नभी दाटले

तुझ्या आठवात मन बावरे हळवे झाले ll धृ ll


क्षणात येई गिरकी घेउन निळसर वारा 

आठवणींच्या हिंदोळ्यावर झुले शहारा

अशीच होती सोबत सजणा मज आठवले

तुझ्या आठवात मन बावरे हळवे झाले ll 1 ll


सर कोसळते मोतीयांचा लेऊन साज

या बिजलीचा गगनी भरला किती आवाज

कसे आवरू सांगना अता क्षण  भिजलेले

तुझ्या आठवात मन बावरे हळवे झाले ll 2 ll


डोंगर झाडे चिंब जाहली धरा सावळी

कुणी वाजवी सुरेल पावा कातरवेळी

कसे साठवू रुप सृष्टीचे मंतरलेले

तुझ्या आठवात मन बावरे हळवे झाले ll 3 ll


रसिका राजीव हिंगे 


हिमाचल प्रदेश (05.05.2023 ते 12.05.2023)



 
  05.05.2023
     आज तीन साडेतीन महिन्या नंतर घराबाहेर निघाले ते थेट हिमाचल प्रदेशाच्या सहलीसाठी. पुणे ते चंदीगड विमान प्रवासात आलेले अनुभव. पहाटे साडेचार ला  विमानाने टेक ऑफ केले त्यावेळी चांदण्यांचे काळेभोर नभांगण धरेवर उतरून खाली आले आहे, असे वाटावे इतका सुंदर दिव्यांचा झगमगाट दिसत होता.
     अक्षरशः पोकळी. खाली वर आकाश. कुठे  ढग दाटलेले तर कुठे निळसर आकाश. कापूस पिंजून ठेवला आहे असे वाटावे इतके पांढुरके ढग. तर कुठे असं वाटत होतं की सागराचे पाणी आहे त्यावर बर्फ जमा झाला आहे. आकाश आणि सागर एकच रुप आहे असे वाटायला लागले.
     ज्यांना ब्रह्म ज्ञान झालेले आहे, जे या मायेच्या पल्याड गेले आहे, माया काय आहे ज्यांना कळले. त्यांनी सगळीकडे ब्रह्म भरले आहे हे स्वतः च्या अनुभवाच्या कसोटीवर घासून ज्ञान प्राप्त केले आहे. ही किमया आहे की भास कळत नाही. कारण मी तर सामान्य अज्ञानी जीव आहे. पण हे सगळं पाहिलं की कळतं एक शक्ती आहे जी हे विश्व निर्माती आहे. अन् तेच कळायला साधनेच्या किती पायऱ्या खाली आहे म्हणण्यापेक्षा पहिल्या पायरी पर्यंत सुद्धा अजून पोहचले नाही. निसर्गाचा चमत्कार म्हणू की संतांनी सांगितलेले हेच ते ब्रह्म सगळं व्यापून उरलेले हे खरे मानू. ब्रह्म सत्य जगत मिथ्या हेच खरे का? असंख्य विचारांचा भुंगा कुरतडतो आहे.....

रसिका राजीव हिंग

 

06.05.2023

     एकीकडे डोंगराच्या उंचच उंच रांगा तर एकीकडे खोल दऱ्या. या दऱ्या मध्ये वसलेली वस्ती. जवळ जवळ घरे असलेली ही वस्ती बसमधून जातांना पत्यांचे बंगले वाटावे असे वाटतात. शिमला चे सौंदर्य, तिथला स्नो फॉल पाहण्यासाठी डोळे आतुरलेले होते. शिमला जाता जाता चंदीगड साईड सिन पहातच निघावे लागले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय च्या गजरात दिवसाची सुरुवात झाली.यावेळचा प्रवास केसरी टूर्स सोबत असल्यामुळे सामान उचलणे वगैरे काही टेन्शन नव्हते. प्रवास म्हंटला की याचेच जास्त टेन्शन असत. सकाळीच आठ वाजता चंदीगड साईड सिन पहाण्यासाठी बस ने निघालो. चौतीस सहकारी सोबत घेऊन गप्पा आणि हशा सोबतीला होतेच. टूर मॅनेजर कल्पेश आणि त्यांचा सहकारी हार्दिक मध्येच हिंदी तर मधेच मराठी किंवा इंग्लिश मध्ये सूचना देत होते. चंदीगड शहर पंजाब आणि हरियाणा ची राजधानी. उत्तम शहर रचना असलेले हे शहर फ्रेंच आर्टिस्ट ली कार्बोझियार याने या शहराची रचना केली आहे. या शहराची देवता चंडी देवी आहे म्हणून यालां चंदीगड नाव पडले. अशी माहिती टूर मॅनेजर  कल्पेशने दिली. हमारा पहला पाडाव था सुखना लेक. हा सुखना लेक कृत्रिम रीतीने तयार केलेला आहे. पंजाब मधील भाक्रा नानगल धरणाचे पाणी आणि पावसाचे पाणी यामध्ये  साठवले जाते. कृत्रिम असला तरी सौंदर्याने नटलेला आहे. वर्षभर पाणी पुरवठा करणे सोईचे होत असेल. रस्त्याने जातांना दुतर्फा आब्यांची झाडे, त्याला लगडलेल्या हिरव्या कंच कैऱ्या पाहून मन ही हिरवं व्हायला लागले. कोणी तोडत नसेल का असा बाळबोध? की शंकेखोर विचार मनात आला.
     कुठल्याही स्थळाचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेण्यापेक्षा कॅमेरा मध्ये बंद करण्याची वृत्ती आजकाल जास्त असते. इथेही असेच झाले. प्रत्येक जण मोबाईल सरसावून फोटो सेशन करत होते. वेगवेगळ्या पोझेस देत प्रत्येक जण फोटो काढण्यात रंगून गेलेले. पुढे कधीतरी हे फोटो पाहिले की त्या क्षणाचा पुन्हा अनुभव येतो, कारण डोळ्यात ही साठवलेले असतातच. "चला केसरी चला" या आरोळीने सगळे भानावर आले अन् पुढच्या स्थळाला भेट देण्यास आगेकूच केली.
     रॉक गार्डन. चंदीगड शहराची रचना करतांना जे वेस्ट मटेरियल म्हणजे उरलं सुरलं सामान होते त्याच्यातून  रॉक गार्डन ची निर्मिती झाली.  तुटलेल्या काचेच्या बांगड्या, टाईल्स चे तुकडे वापरून दगड धोंड्यांचा वापर सुंदर प्राणी,पक्षी, मानव यांच्या छान मूर्ती तयार केलेल्या आहेत. बाहुल्यांचे प्रदर्शन. गुहेत आल्यासारखे वाटते काही ठिकाणी. सगळीकडे दगड आणि दगडच. उगाचच ह्या दगडांचे नेटकेपण, त्याचा अतिशय कल्पकतेने केलेला उपयोग पाहून मला असे वाटले या दगडांना पण मन भावना असाव्यात, म्हणून तर ते इतके सजीव सुंदर दिसतात आहे. सतत मान वाकवून नम्रपणे वागायला शिकवणारा रॉक गार्डन नेकचंद यांनी आकारास आणला आहे.
     कर्नाटकातील वृंदावन गार्डनची प्रतिकृती म्हणजे पिंजोर गार्डन. वेगवेगळी फुले, कारंजे असलेला हा पिंजोर गार्डन पाहण्यात मला तरी कशी मजा नाही आली. छान आहे, पण वयोपरत्वे असेल रमली नाही मी गार्डन मध्ये. पुन्हा एकदा टूर मॅनेजर चा पुकारा झाला आमच्या बसरुपी रथाचे लगाम सैल झाले, अन् दौडत निघालो शिमला च्या दिशेने....

रसिका राजीव हिंगे

  

07.05.2023

    शिमल्याच्या वेशीवरच गार वारे स्वागताला उभे होते. सगळा प्रवासाचा शीण नाहीसा करण्याचे सामर्थ्य असलेले आल्हादक, थंड वातावरण याचा अनुभव घेतच संध्याकाळी साडे सहा वाजता हॉटेल सत्यम पॅराडाईज मध्ये डेरेदाखल झाले. शिमल्याच्या गारव्याचा आनंद घेण्यासाठी जवळपास एक ते दीड तास सिटी मध्ये फिरायला गेलो. बराच वेळ प्रवास झाल्यामुळे पायांना पण थोडे चालायचे होते. पाणीपुरी, मसाला पुरी चाट याचाही इथे आस्वाद घेतला मी सोडून. मस्त मजा आली फिरताना. रस्त्याच्या बाजूला काही ठिकाणी कठडे नव्हते, अगदी काठावर कार लावल्या होत्या. कसे काढतील तिथून कार,थोडी जरी मागे गेली तर दरी आहेच  झेलायला. पाहूनच धडकी भरली. अर्थात तिथल्या लोकांना सवय आहे त्या भागाची,  तरी भीती वाटलीच.
    ढगाळलेले आकाश, धुक्यानी दाटलेल्या दऱ्या लांब प्रवासासाठी (long drive) आवश्यक असलेले वातावरणाची भेट घेऊन आली सकाळ. अशा रम्य वातावरणामध्ये आम्ही धडक दिली कुफ्री येथे. जेव्हाही या भागात बर्फ पडायला सुरुवात होते तेव्हा सर्वात आधी कुफ्री येथे बर्फ पडतो. या भागात बटाट्याची शेती केली जाते. या बटाट्याचे नाव कुफ्री आहे. त्यामुळे या भागास कुफ्री हे नाव पडले. या बटाट्या मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. कुफ्रि ला जाण्या आधी एका सैनिकी वाहनतळावर बस पार्क करावी लागते. कारण पुढे खूपच अरुंद रस्ते असल्यामुळे फक्त लहान गाड्या म्हणजे तवेरा,सुमो,झायलो यासारख्या गाड्यांनी  प्रवास करावा लागतो. सैनिकी विमानतळावर स्नो फॉल बर्फाच्या पावसाने आमचे स्वागत केले. आनंद आणि स्वतःचा बचाव करतच कुफ्री च्या प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी मिळेल त्या गाडीतून सगळेच निघालो. पाच सात मिनिटे खूप भारी बर्फाचा पाऊस पहायला मिळाला. इथे केव्हा कोणते वातावरण राहील याचा अंदाज येत माझी. घटकेत पाऊस तर घटकेत ऊन. बालकवींच्या श्रावण मासी या कवितेतील क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे या ओळींची आठवण करून देणारे वातावरण. प्राणी संग्रहलयातील वाघोबा दादांची भेट झाली मात्र. मस्त डौलदार चालत होते दादाश्री. मृग मात्र कोण आलंय, याचा अंदाज घेत हळूच दुडक्या चालीने आपल्याकडे कोण कोण पाहतंय हे पाहण्यासाठी वळून वळून पाहत होते. कस्तुरी मृग आहे असे लिहिले होते. साध्या हरणा पेक्षा वेगळा. कस्तुरीचा वास काही आला नाही. पण असावा कस्तुरी मृग. काही पक्षी होते. लिहिले होते पण काही कळे ना. खूप नव्हते. ओळखीचे नव्हते पक्षी. ते पण येऊन पाहायचे अन् लपून जायचे कशाच्याही आड. तिथेच थोडीफार चुटुक पुटुक खरेदी केली.
    02 जुले 1972 रोजी भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जो करार झाला तो सिमला करार या नावाने प्रसिद्ध आहे. ज्या ठिकाणी झाला ते चिनी बंगला म्हणजे इंदिरा हाऊस पहायला गेले. आतून काही दाखवत नाही. फक्त त्या ऐतिहासिक घटनेची साक्ष असलेली ही वास्तू पाहून मनात विचार आला, की असे करार करून वेळ मारून नेण्याची कला पाकिस्तान ला चांगली जमते. या करारातील कोणत्याच अटी पुढे पाकिस्तान सरकारने पाळल्या नाहीत याचा प्रत्यय कारगिल चे युद्ध.  हा करार होत असताना तिथे खूप गर्दी झाली होती. करार काय होतो हे ऐकण्यासाठी नाहीतर झुल्फिकार भुट्टो ची मुलगी बेनझीर भुट्टो तिथे आली होती. ती अतिशय सुंदर होती म्हणून तिला पहायला गर्दी झाली होती. तिथून निघालो
     पुढे  इनडोअर आऊट डोअर गेम होते. ज्यांची लहान मुले होती, मोठ्यांना पण गेम खेळण्यात आवड होती तेच खेळ खेळण्याची मजा लुटत होते. मला खेळ खेळता येत नाही पण खिलाडूवृत्ती आहे माझ्याजवळ? असो. जेवण झाल्यानंतर पुढे निघाले.
    शिमला समुद्र सपाटीपासून 2200मीटर उंचावर आहे. त्याच्यावर मॉल रोड 200मीटर वर आहे. हे 200 मीटर चे अंतर आम्ही लिफ्ट ने पार केले. मॉलरोड हा इग्रजांच्या  काळातील आहे. जोपर्यंत इंग्रज भारतात होते तोपर्यंत भारतीय नागरिकांना मॉल रोडवर प्रवेश नव्हता. तीन स्तर असलेले मार्केट आहे. मॉल म्हंटले की मोठे मोठे शोरुम वगैरे असतील असे वाटले. नामांकित कंपनीच्या वस्तू मिळतात. इथेच चर्च आहे. आम्ही गेलो नाही पण छान असावे.
    प्रत्येक प्रांताचे काही  वैशिष्ट्ये असतातच. हिमाचल प्रदेश म्हणजे थंडी, बर्फ, वारा,पाऊस. कसे जगत असतील इथले लोकं असा प्रश्न पडतो.  ज्या भागात राहतो तिथली सवय होऊन जाते. तिथली जीवन शैली अंगवळणी पडते. ठिकठिकाणी रस्त्याचे कामे चालू आहेत, कुठे बोगद्याची कामे सुरू आहेत, इतकेच नव्हे तर उड्डाण पूलाचे कामे सुरू आहेत. कसे इतक्या थंडीत हे लोकं काम करत असतील देव जाणे. त्यांना पाहिले की एक कडक सलाम द्यावासा वाटला, अन् मनोमन दिल्या गेला.  सगळ्यांना शक्ती दे रे देवा म्हणतच निद्रा देवीच्या कुशीत पहुडले, सकाळी उठून मनाली गाठायचे होते....

रसिका राजीव हिंगे

 

08.05.2023 आणि 09.05.2023

     सकाळी आठ वाजता मनाली कडे आगेकूच केली. पूर्ण दिवसाचा प्रवास. जाता जाता सगळ्यात मोठी असलेली हसन व्हॅली पाहिली. किती खोल आहे याचा अंदाज लागत नाही. सतलज आणि बियाज नदीचा संगम पहायला मिळाला. सतलज नदीवरचे भाक्रा नानगल धरण हे सगळे प्रवास करतांनाच पाहिले. एसीसी सिमेंटचा कारखाना सतलज नदीच्या जवळ आहे. या नदीतील किंवा किनाऱ्या वरील दगड सिमेंट बनवण्यासाठी वापरतात. खूप मोठा प्लांट आहे. दहा हजार कर्मचारी इथे तीन शिफ्ट मध्ये काम करतात.
     पावसाची रिमझिम सोबत करतच होती. मध्येच आमच्या बस ड्रायव्हर ने एका टॅक्सीला धडक मारली. त्यामुळे ते सगळे प्रकरण निस्तरायला दोन अडीच तास लागले. त्यामुळे संध्याकाळी मनाली पोचण्यास उशीर होत होता. मध्ये येताना आर.के.फॅक्टरी मध्ये खरेदीसाठी गाडी थांबविली होती. खरेदी म्हंटले की स्त्रियांचा उत्साह अगदी उतू जातो. आर. के. चा मस्त गल्ला भरून दिला अन् मगच केसरी चे सहकारी बाहेर पडले. तिथून थेट मनाली गाठले. पाऊस, वारा यामुळे थंडी चांगलीच भरली होती अंगात. हातपाय गारठले होते म्हणजे खरोखर आक्रसले होते. हॉटेलच्या पायऱ्या चढताना काहीच दिसत नव्हते इतका पाऊस. कसेबसे आत शिरलो. म्हणजे सेफ झोन मध्ये. तसंही माणसाला नेहमी सुरक्षितता हवी असते. आपण सेफ झोन मध्ये आहे न विषय संपला अशी वृत्ती साधारण असते आजकाल. याला अपवाद आहेतच पण साधारणतः असेच असते.
     मनालीची बर्फाच्छादित थिजलेली असली तरी चैतन्यमय सकाळ. मनाली साईड सिन पाहण्यासाठी सगळेच तयार होऊन खाली आलोत. सकाळ छान झाली पण थोड्याच वेळात अत्यंत वाईट बातमी कळली. आमच्या सोबत असलेल्या गादेवार मॅडम यांना हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांचे दुखःद निधन झाले. सगळ्यांशी बोलणाऱ्या माधुरी ताई अचानक निघून गेल्या. वास्तविक पाहता चार पाच दिवसांची ओळख.  सरसरून अंगावर काटा आला. कळेचना काय करावे. कोणीही नीट नाश्ता केला नाही. सगळे आपापसात चर्चा करत होते. ग्रुप मधील सौ. खांबेकर मॅडम यांचा पुढच्या दिवशी वाढदिवस आहे कळल्यावर फक्त त्यांनीच शुभेच्छा दिल्या होत्या आधीच्याच दिवशी. जणू त्यांना कळलं होतं का उद्या शुभेच्छा द्यायला मी नसेल म्हणून. एक सहकारी गेले चार पाच दिवस आपल्या सोबत "होता" असे म्हणावे लागत होते. लगेच चैतन्याचे रूपांतर बॉडी म्हणजे शव,कलेवर मध्ये झाले. इतकं क्षणभंगुर जीवन असूनही आपण मी मी माझे माझे करत राहतो. शो मस्ट गो ऑन या न्यायाने सहाय्यक टूर मॅनेजर सोबत मनाली येथील वसिष्ठ ऋषींचे मंदिराला भेट दिली. वसिष्ठ हे ब्रह्माचे पुत्र. पहिले पाच जीव निर्माण झाले त्यात वसिष्ठ ऋषी आहेत. वसिष्ठ मुनींचे शंभर पुत्र कल्माषपाद राक्षसाने मारले. पुत्र शोकात वसिष्ठ अतिशय उद्विग्न झाले. मन अस्थिर झालेले असताना ते मनाली इथे बियाज नदीच्या मध्यभागी देह समर्पण करण्यासाठी गेले. तिथे गेल्यावर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. त्यानंतर त्यांनी तिथेच बरीच वर्षे तप केले. राम रावण युद्धात रावणाचा वध झाला. ब्रह्म हत्येचे पाप नष्ट व्हावे म्हणून रामाने अश्वमेध यज्ञ करण्याचे ठरविले. वसिष्ठ ऋषी हे रघु कुळाचे गुरू होत. त्यांना शोधण्यासाठी रामाने लक्ष्मण यास पाठविले. खूप शोध घेतल्यानंतर लक्ष्मणाला वसिष्ठ ऋषी सापडले. खूप थंड वातावरण असल्यामुळे आपल्या गुरूंना स्नानासाठी गरम पाण्याची व्यवस्था करावी या उद्देशाने लक्ष्मणाने बाण सोडून एक कुंड तयार केले ज्यामध्ये गरम पाणी होते. पण वसिष्ठ हे तर ब्रह्मज्ञानी, त्यांना गरम पाण्याची गरज नव्हती. म्हणून लक्ष्मणाला त्यांनी त्या कुंडात स्नान करण्याची आज्ञा केली. यापुढे जे कोणी या कुंडात स्नान करतील त्यांचे सगळे पाप नाहीसे होईल, त्वचा रोग नाहीसे होतील असे वरदान दिले. आजही इथे गरम पाणी आहे. बरेच भाविक येथे स्नान करतात. या गावाचे नावच वसिष्ठ आहे. समोरच रामाचे मंदिर, शिवाचे मंदिर होते. या सहलीमध्ये मंदिरात जाणे पूजा, अभिषेक असे काहीच नव्हते त्यामुळे थोडे चुकल्या सारखे वाटले. पण वसिष्ठ ऋषींच्या मंदिरात गेल्यावर सहल सुफळ संपन्न झाल्यासारखे वाटले. कुठलीही सहल  देव दर्शना शिवाय पूर्ण करणे अजून तरी पचनी पडत नाही असे वाटले. म्हणून की काय आजचा दिवस मंदिरासाठी होता जणू. हिडिंबा मंदिर. पाच पांडवांपैकी भीम याची सहचारिणी. पांडव वनवासात असताना भीम आणि हिडिंबा यांनी लग्न केले होते. मनालीच्या जंगलात ती राहत असावी.ती या जंगलाची राणी होती. हिडिंबा या गावाची ती ग्राम देवता आहे. खूपच गर्दी होती दर्शनाला. पण छान झाले दर्शन. मंदिर पुरातन आहे. पन्नास साठ पायऱ्या चढून जावे लागते. मंदिर जंगलातच आहे. हिडिंबा मंदिराच्या परिसरातच घटोत्कच याचे मंदिर आहे. घटोत्कच हा भीम आणि  हिडिंबा यांचा मुलगा. अतिशय पराक्रमी. मंदिरात प्रवेश केला तेव्हा मस्त उन होते. दर्शन घेऊन निघाले तेव्हा एकदम गार वारा, हुडहुडी भरली अंगात. क्षणाक्षणाला बदलणारे हवामान. तिथे काही जंगलात राहणारे लोक अजगर घेऊन बसले होते. बरेच पर्यटक खांद्यावर घेऊन फोटो काढून घेत होते. मुक्या प्राण्याचा असाही उपयोग पैसे कमविण्यासाठी. ससा सगळ्यात भित्रा प्राणी. त्यालाही हातात घेऊन फोटो काढत होते. सशाला धडकी भरली होती, थरथरत होता. कोण कोणाचा कसा उपयोग करून घेईल हे सांगता येत नाही हेच खरे.
     संध्याकाळी स्थानिक लोकांनी लोक कला सादर केल्या. हिमाचल प्रदेशातील छान पारंपारिक लोकगीत आणि लोकनृत्य सादर केलेले. आम्ही ही सगळे त्यांच्यासोबत फेर धरून त्यांनी सांगितल्या तशा स्टेप करत नृत्य केले. मजा आली. काही गेम खेळलो. कच्ची पपई,पक्की पपई सारखे. दोन तास धूम केली सगळ्यांनी. लय भारी.
     चला केसरी चला चा पुकारा झाला. उद्या सकाळी स्नो पॉइंट ला जायचे आहे. सकाळी सात वाजता निघायचे आहे. या आनंदातच उद्याचे उत्साहित करणारे स्वप्न बघत निद्रादेवीच्या मांडीवर स्वतः ला झोकून दिले...

रसिका राजीव हिंगे 

 

10.05.2023

     ओली पहाट. मनालीची दुसऱ्या दिवशीची सकाळ. सृष्टीचे आरसपानी रुप डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न तसाच कॅमेरा बंद करण्याचा अट्टाहास. किती पाहू अन् किती नको असे होते. सकाळीच सात वाजता रोहतांग पास च्या पाच किलोमीटर आधी कोकसर मध्ये स्नो पॉइंट  पहायला निघालो. रोहतांग पास पॉइंट बंद असल्या मुळे कोकसर मध्ये पाहू असे ठरले. आधीच्याच दिवशी जायचे होते पण खूप बर्फ पडला त्यामुळे  जाणे शक्य नव्हते. तेव्हा बराच जणांचा विरस झाला. हवामान खराब आहे त्यामुळे जाता आले नाही. "आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है, आज मौसम" असे उगाचच वाटून गेले. अर्थात मौसम त्याच्या प्रमाणेच चालणार. पण आपल्याला हवे ते मिळाले नाही की आपण लगेच त्यावर बोट ठेवणार.
     रस्ता अरुंद असल्यामुळे छोट्या गाड्या घेऊन जावे लागले. बर्फात खेळायचे होते शिवाय केव्हा वातावरण बदलेल आणि पाऊस सुरू होईल किंवा बर्फ पडायला लागेल याचा काहीच अंदाज नव्हता. त्यासाठी डंगरी म्हणजे जंक सुट भाड्याने घेणे गरजेचे होते. तसेच गम बुट, लोकरीचे मोजे, हातातले मोजे असा सगळा लवाजमा घालून जणू चंद्रावर चाललो आहे की काय या थाटात बर्फाच्छादित शिखरे गाठण्यासाठी छोट्याश्या बस रुपी अश्वाला टाच मारली.
     जिकडे नजर जाईल तिकडे पांढरे शुभ्र बर्फाच्छादित डोंगर, त्यावर पडलेले कोवळे पिवळसर ऊन, अप्रतिम दृश्य. किती फोटो काढले, व्हिडिओ काढले तरी मन भरत नव्हते. कुठे आभाळ टेकलेले तर कुठे कापूस पिंजून ठेवलाय इतके बर्फाचे पुंजके. उंच उंच देवदार वृक्ष, फर चे वुक्ष त्यांच्यामधून दिसणारी बर्फाच्छादित शिखरे. सृष्टीचे सौंदर्य पहावे तितके कमी. शब्द नाहीत माझ्याकडे या सौंदर्याचे वर्णन करायला. निसर्गाचे हे ईश्वरी रुप पाहता पाहता आपोआपच नतमस्तक होता होता गहिवर दाटून आला.
     सगळ्यात मोठा म्हणजे 9.7 किमी असलेला अटल टनल मधून गाडी जाताना पुन्हा एकदा ज्यांनी हा घडविला त्यांच्यासाठी त्रिवार मुजरा केल्या गेला. इतक्या थंड वातावरणात, कमी जागेत, एकीकडे बर्फाचे डोंगर तर एकीकडे खोल दरी, अशा आव्हानात्मक कार्याला सुरुवात केली ती अटलजी सारख्या कविमनाच्या पण कणखर व्यक्तिमत्वाने भूमी पूजन करून. काम करणाऱ्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तेच अटलजींनी केले. त्यांच्या हयातीत त्यांना हा भव्य प्रकल्प पाहता आला नाही हे त्यांचे म्हणण्यापेक्षा आपले दुर्दैव. किती विचारपूर्वक बनविलेला आहे हा बोगदा. या कार्यासाठी जीवाची पर्वा न करता काम करणारे अभियंता, कर्मचारी, महत्वाचे म्हणजे मजूर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना केव्हा डोळ्यांतून अश्रू धारा व्हायला लागल्या कळले नाही. एक कडक सलाम पुन्हा एकदा मनोमन दिला अन् समोर साद घालणाऱ्या हिमशिखरांना प्रतिसाद देण्यासाठी गाड्या अटलच्या बाहेर आल्या तसेच मन ही धाव घेत होते.
     कोकसर येथे आम्ही पोहचलो तेव्हा गर्दी काहीच नव्हती. तिथल्या वेगवेगळ्या पाच खेळांचे एकत्रित पॅकेज होते. बाईक राईड, ट्युब राईड, याक राईड, झिप लाईन, स्केटिंग. मस्त वाटले हे इव्हेंट करताना. झिप लाईन आणि याक राईड केले नाही. बाकी मस्त मजा. बर्फात मस्त वाटले. मौसम आज बेईमान नहीं था. हमारे साथ था. त्यामुळे तिथे सगळ्याच गोष्टीचा आस्वाद घेता आला. मॅगी कधीच खाल्ली नाही, आवडतच नाही, तरीपण तिथे खाल्ली. गरम गरम छान वाटली. बर्फात बसून वेगवेगळ्या आकार बनविणे, पुन्हा मोडणे, बर्फ झेलत अंगावर उडवणे म्हणजे अगदी बालपण जागे झाले जणू. तिथे आलेले लहान मुलांनी छान पुतळे बनविले. पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या रंगात निरनिराळ्या रंगाचे जंक सुट घातलेले पर्यटक म्हणजे रांगोळीत भरलेले रंग असे वाटले. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी असते हेच खरे. इथे हे प्रकर्षाने जाणवले. लहान, थोर, तरुण,प्रौढ सारेच होते इथे. वय विसरायला लावणारे वातावरण. रोप वे म्हणजे  केबल कार द्वारा सोलांग व्हॅली चढून वर गेले. हा पण एक जीव मुठीत घेऊन चढणारा अनुभव होता.वर गेल्यावर पूर्ण मनाली शहराचा  व्ह्यू पाहता आला. निळे, राणी कलरचे छप्पर असलेले घरे थेट डोंगराच्या कुशीत पहुडलेली दिसत होती. बेसुमार फोटो काढले इथे. गावातील पण काही फोटोग्राफर इथे येतात. त्याच्या कडून पण फोटो काढून घेतले. भरार वारा होता. वर वातावरण जर खराब असेल तर मनाली शहर दिसणार नाही असे टूर मॅनेजर म्हणाले होते.आज मौसम ने खूपच मेहरबानी केली होती. सगळ्याच सौंदर्याला,लावण्याला दाद देता आली. सगळं अनुभवता खूपच थकायला झाले. सव्वातीन साडेतीनला जेवण झाले. निद्रा माय ने अंगाई गायला सुरुवात केली अन् अलगद कुशीत घेतले. झोपेतही जीव मुठीत घेऊन केलेले बाईक रायडिंग, स्केटिंग दिसत होते.
     खूप दिवसांनी जादूचे प्रयोग पहायला मिळाले. संध्याकाळी गेट टुगेदर मध्ये मुंबई पुण्याचे जादूगार आले होते. केसरी टूर साठी ते जून पर्यंत मनाली ला राहतात. त्यांनी नाव सांगितले पण मला काही कळलेच नाही. खूपच छान जादूचे प्रयोग होते. हसून हसून पुरेवाट झाली. लहान मुलांबरोबर मोठेही आनंद घेत होते.  अफलातून हातचलाखी होती. शेवटी तर एकमेकांच्या हातावर हात ठेवून आवडणारे फुल कोणते हे विचारले. हात एकमेकांवर घासायला सांगितले अन् आता वास घ्या म्हणाले, तर खरच ज्याने जे फुल सांगितले होते त्याचा गंध आला. हा काय प्रकार कळला नाही, मस्त दरवळ होता हे मात्र खरे.
     आता घर आठवायला लागले होते. घरचे साधं वरण भात दिसायला लागला. केसरी ने याची जाणीव करून दिल्यामुळे तर जास्तच घर डोळ्यासमोर यायला लागले. शेवटी  घर ते घर. चला केसरी टूर चला. उद्या पासून आपला घराकडे जाण्याचा प्रवास सुरू होईल. घरी जाण्याच्या विचारातच माधुरी ताई गादेकर यांच्या रूम समोरून जाताना त्याची आठवण झाली. पुण्या हून निघताना भेटलेले पहिले केसरी ग्रुप चे सहकारी. "अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेऊनी जाती" हेच खरे.... सकाळी लवकर उठून चंदीगड सर करायचे आहे हे ठरवतच निद्रादेवीच्या अंकी आरूढ झाले....

©️®️रसिका राजीव हिंगे 

 
11.05.2023 आणि 12.05.2023

     आजचा दिवस प्रवासाचा. लांबच लांब प्रवास. 310किमी. मनाली ते चंदीगड. घाटाचा रस्ता, पुन्हा हिमशिखरे साद घालत होती. पण प्रतिसाद फक्त नजरेनेच देणे शक्य झाले. वारा डरकाळ्या मारत वाहतो आहे की काय असे वाटले. मनाली हून निघाल्या बरोबर दीड दोन तासातच आर के(are key) शॉल फॅक्टरी वर पुन्हा धाड टाकली. अन् राहिलेली म्हणण्यापेक्षा आलोच आहे तर घेऊनच घेऊ असे म्हणत आर के चे दुकान रिकामे व्हायला सुरुवात झाली. चला चला म्हणता म्हणता जवळपास  दीड तास फक्त चहा कॉफी साठी लागला. निसर्गाचा चमत्कार पहात पदार्थांच्या, सिनेमाच्या भेंड्या खेळत प्रवासाचा वेळ घालवणे चालले होते. सिनेमाच्या भेंड्या खेळताना वेगळेपण अनुभवायला मिळाले.  टेक्नोसॅवी पिढी सोबत असल्यामुळे सिनेमाचे नाव सांगितले की "हा नाही सिनेमा काही सांगायचे नाही" असे म्हणून ही पिढी थांबली नाही तर लगेच गुगल बाबाला पाचारण करून खरे खोटे ठरवत होते. मी सहज म्हटले की गुगल प्रत्येक वेळी उत्तर बरोबर देतोच असे नाही.  सगळेच खळखळून हसले कारण जणू काही मला  माहीतच नाही  गुगल. गुगल म्हणजे प्रमाण असे झाले आहे सध्या. स्मरणशक्तीला ताण द्यायचा नाही, गुगल सर्च करायचे अन् वेळ साजरी करायची किंवा मारून न्यायची ही गोष्ट मात्र अधोरेखित झाली हे सत्य आहे कटू असलं तरी.  मजल दरमजल करीत एकदाचे रात्री नऊ वाजता चंदीगड गाठले.
     आली निरोपाची वेळ
     जीव भारावून जातो
     राहू द्यावा स्नेहबंध
     आम्ही विनंती करतो
     दुसरा दिवस उजाडला तो निरोपाचे वारे घेऊनच. आठ दिवसांची ओळख पण ऋणानुबंध छानच जुळले होते. टूर मॅनेजर कल्पेश ने तर चंदीगड पोहचल्या बरोबरच निरोप घेतला. सहाय्यक टूर मॅनेजर हार्दिक मात्र एअर पोर्ट पर्यंत सोडायला आला होता. त्यांच्या पण कितीतरी अशा टूर्स होत असतात, प्रत्येक ग्रुप चा निरोप घेताना त्यांच्या मनात काय भावना असतील बरे! प्रत्येक सहलीचा अनुभव वेगळा, व्यक्ती वेगळे,  प्रत्येकाला न चिडता सांभाळणे म्हणजे कठीणच. त्यांना या करीयर मध्ये यश हवे असेल तर हेच महत्वाचे होय. तरीपण प्रवृत्ती असतेच काहीतरी वेगळे वैशिष्टे असलेली. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले माणसे एकत्र येतात म्हणजे नक्कीच कुठेतरी ऋणानुबंध असतातच असतात. उगाचच कोणाशी भेट होत नाही. इतके अठरा पगड लोक आहेत, पण सगळ्यांशीच कुठे ओळख होते. ज्यांच्या व्हायच्या त्यांच्याच  भेटी होतात.
     हिमाचल प्रदेशातील निसर्गाच्या सौंदर्याचे, लावण्याचे विविध रुप पाहताना असे वाटले इथे राहणारे लोक किती भाग्यवान यांना रोजच हा अनुभव घेता येतो. प्रत्येक भागाचे वैशिष्टे वेगळी असतात, सृष्टीचे सौंदर्य सगळीकडे विविध रुपात अवतरले आहे, फक्त ते पाहण्याची शक्ती दे हीच प्रार्थना करून मनोमन निर्मात्याचे आभार मानले इतकी छान सहल घडविली म्हणून अन् घराच्या दिशेने पावले वळली....

रसिका राजीव हिंगे
    
    

rasraj#हिमाचल प्रदेश # सहल#   

    


     

   
   
   
     





रसग्रहण

      माहेर म्हणजे स्त्री च्या जीवनातील एक हळवे पण बहारदार वळण. यासाठी जेव्हा गदिमांची लेखणी बोलू लागते तेव्हा प्रत्येक स्त्री भारावली असते. नववधू जेव्हा पहिल्यांदा माहेरी येते तेव्हा सगळ्या घरादाराला अप्रूप वाटतं. कोकण तर छोटंसं. इथली माहेरवाशीण येणार म्हणजे सोहळाच. नावेत बसलेले गोमू आणि गोमुचा पती यांना पाहून नावाड्याला अतिशय आनंद झालेला आहे. गोमुच्या नवऱ्याला आपले कोकण कसे हिरवाईने नटलेले आहे, इथला निळसर सागर, फुलांचे ताटवे दाखवण्याचा नाविकाला आनंद होतो आहे. कोकणातली माणुसकी, शहाळ्या सारखी गोड रसदार माणसे म्हणजे सगळचं वेड लावणारे. वाऱ्यालाही विनंती करून गलबत जमिनीला थांबवण्याची हिंमत ग. दि.माडगूळकर  यांच्या लेखणीतून साकारली आहे. अबोली फुलांना भगवा रंगाचे ताटवे अशी उपमा देणारे गदिमा निसर्गाशी किती एकरूप झालेले आहेत. म्हणूनच त्यांच्या कविता भावतात. 


रसिका राजीव हिंगे 

रसग्रहण

     



 मुक्ताबाई यांचे वय लहान असूनही त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. वेळप्रसंगी त्या ज्ञानदेवांना सुद्धा समजावत असत. ताटीचे अभंग याचेच एक उदाहरण आहे.

     प्रस्तुत अभंगात मुंगी उडाली आकाशी म्हणजे मायेने जी अस्तित्वात नाही तिने परमात्म्याला, ब्रह्मस्वरूपाला गिळले आहे.  मायेच्या आवरणाखाली आजूबाजूला असलेले विश्व म्हणजे सगळे मिथ्या आहे. देह मिथ्या आहे. तरी सामान्य माणूस हेच सगळे खरे आहे असे समजतो म्हणून मुक्ताई ला हसू येतं कारण त्या स्वतः ब्रह्म  ज्ञानी आहेत. माशी घार झाली, वांझेला पुत्र झाला यासारख्या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत, भ्रम आहे. मुळात माझा देह म्हणजे मी हाच मोठा भ्रम आहे. यामुळे मुक्ताई हसली असे म्हटले आहे.


रसिका राजीव हिंगे 

रसग्रहण

 



ही मोरोपंतांची केकावली. केकावली म्हणजे मोराच्या आवाजातील गाणे किंवा मोराचा टाहो. जगात सुष्ट आणि दुष्ट दोन्ही प्रकारची माणसे असतात. संत सज्जनांचा सहवास सदा घडावा. संत संगतीचा परिणाम नेहमीचं चांगला होतो. खळांची व्यंकटी सांडो असे ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितले. विशेष म्हणजे वाईट गुण लगेच आत्मसात केल्या जातात,पण सद्गुण अंगी येण्यासाठी श्रद्धा असावी लागते आणि वेळ लागतो. 

रसग्रहण

 




रमण रणदिवे यांची बहुमोल जीवन ही कविता मानवी जीवनावर भाष्य करणारी आहे. मानवाच्या आयुष्यात सगळचं मनासारखं घडत नाही. तरीही जगणे सोडता येत नाही. प्रारब्धा नुसार येईल तो क्षण जगावाच लागतो. दुःख आहे म्हणून कोणाला जबाबदार धरता येणार नाही. सुख दुःखाचा पाठशिवणीचा खेळ सतत आयुष्यात सुरू असतो. दुःख आले म्हणून उगाच शोक करण्यात काय अर्थ आहे. रोजच्या आयुष्यात बदल होत राहतात. संकटे येतच असतात पण त्यांच्याशी लढण्यात  खरा पुरुषार्थ आहे. एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणजे त्रागा करण्यात काय अर्थ?  जीवनाचे चित्र रेखाटताना, सुख दुःखाचे दाखले देताना गुलाब, त्याचे काटे,  वसंत ऋतू, पौर्णिमा यासारख्या उपमा दिल्या मुळे वेगळा बाज काव्याला प्राप्त झाला. कवीच्या प्रतिभेला बहर आलेला जाणवतो.


रसिका राजीव हिंगे 

Friday, 26 May 2023

फळांची सभा

 फळांची सभा


चला जाऊ आपण सारे

सृष्टीच्या या अजब सभेला

गर्दी झाली विविध फळांची

अनुभवू या गंध रसाला


व्यासपीठावर विराजमान

ऐटीत बसला हापूस आंबा

लंगडा काही चढेना वरती

पायरी म्हणे इथेच थांबा


अवघड ओझे सावरीत

काटेरी ते फणस आले 

जरा अंमळ कोपऱ्यात

जाऊनी थोडे विसावले


केशर पित प्रभा फेकत

संत्र आले रसाळलेले 

मोसंबी येई मागुती त्याच्या

हरितसर वस्त्र ल्यायलेले


अंदाज घेई लाजरा चिक्कू

माझेच रुप का मळलेले

पपई म्हणे का खंत करिसी

आपण दोघे मधाळलेले


बदाम, नीलम, राजापुरी

केशर, गोटी, खोबऱ्या, दशेरी

वंशावळ ही फळराज्याची

केळ्या, लालबाग नि तोतापुरी


कलिंगडाची कैसी जादू

बाहेर हिरवे आतून लाल

खरबूज आले गोल गोल

सांभाळत गे बियांचा ताल


गंध भारल्या सभेत या

ठराव ऐसा पारित झाला

वैशाखाच्या या वणव्यात

सांभाळू रे या चराचराला


रसिका राजीव हिंगे 




ओंजळ

 



कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती । 

करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥

     दोन हात एकमेकांना जोडले की होते ओंजळ. रामप्रहरी दोन हात एकमेकांना जोडून प्रात: प्रार्थना म्हणण्याची आपली संस्कृती. हृदयाची कवाडं सताड उघडी ठेवायला शिकवणारी ओंजळ. दारात आलेला वासुदेव याला पसाभर म्हणजेच ओंजळभर धान्य दिले जाते.  दारी आलेला याचक तृप्त झाला की ओंजळभर सुख आपल्या पदरात घालून जातो. हात जोडून प्रार्थना केली जाते आणि जोडलेले हात  पसरून सगुण सुंदर परमात्म्या जवळ मागणं मागितले जाते. मी पणाची ओंजळ इथे रिकामी होते. पुन्हा या ओंजळीत कोणतं दान तो आपल्याला देईल हे कळत नसेलही पण ओंजळ भरते हे नक्की. या ओंजळीत सारे ब्रह्मांड सामावले आहे.  दातृत्वाचे प्रतीक आहे ओंजळ. कायम भरलेली ओंजळ कधी आठवणींची असते, कृष्ण सख्याच्या चरणी अर्पण होणाऱ्या प्राजक्ताच्या गंधित फुलांनी भरलेली, तर कधी संसाराच्या सुखाच्या हिंदोळ्यावर झुलणारी आनंदाची, तर कधी भक्तीची असते ही ओंजळ. भक्तीची ओंजळ म्हटले की आठवते सुदाम देवांची ओंजळ, मूठभर पोह्यांचा बदल्यात परमात्म्याने त्याची भक्ती पाहून सुखाने भरून दिलेली ओंजळ. अठरा विश्व दारिद्य्र असलेला सुदामा. मात्र कृष्णाचा परम सखा. अवघ्या विश्वाचे राजेपण पेलणारा कृष्ण आपल्याला काय देईल म्हणण्यापेक्षा याचना करणे हेच सुदाम्याच्या तत्वात नव्हते. पण पत्नीच्या आग्रहाखातर मूठभर शेजारून मागून आणलेले पोहे घेऊन सुदामा द्वारका नगरीत येतो. पण हिंमत होत नाही की का मागायचे याला आपण? याच्याजवळ आहे म्हणून. कृष्ण तर मनकवडा आहे. ज्याला स्वतः चा अभिमान नाही तोच खरा कृष्णाचा महत्वाचा अतिथी. सुदाम्याने हात पसरले नाहीत तरी त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन  त्याची भक्तीची ओंजळ सुखाने भरून दिलीच. अहंकाराची ओंजळ रिती झाली की भक्तीने ती भरून येतेच येते.

     निसर्ग भरभरून देतो पण आपण आपल्या ओंजळीत मावेल इतकेच घ्यावे हा अलिखित नियम आहे. ज्याला कळला त्याची ओंजळ कायम सुखाने भरलेली असेल. आपण पाहतो आहे आजकाल हवे हवे आणि हवे एवढंच माहित आहे. मिळण्यासाठी द्यावे लागेल हेच कळत नाही म्हणून की काय आज ओंजळ भरतच नाही. वास्तविक पाहता कधीच रिकामी नसते ओंजळ. पण दुःखाने भरण्यापेक्षा आनंदाने भरावी न. रिती केल्याशिवाय कशी बरे भरेल पुन्हा ओंजळ. निसर्ग आपला गुरू आहे तर त्याचे सारखेच सतत रिते होणे शिकले पाहिजे म्हणजे पुन्हा भरता येईल. ओरबाडणे थांबले पाहिजे. कारण ओंजळीत मावेल इतकेच अन्न पुरेसे आहे सुदृढ जगण्याला. तहानलेल्या जीवाला ओंजळ भर पाणी प्यायल्याने तृप्ती लाभते. 

     जन्मापासून लाडाकोडात वाढवलेल्या लेकीचे दान जावयाच्या ओंजळीत पाणी सोडूनच करण्याची परंपरा आहे. लाजलेले सौंदर्य लपविण्यासाठी ओंजळच सरसावते. मानवाच्या प्रत्येक टप्प्यावर ओंजळ आहेच. परमेश्वर निर्मिती करतो ती निष्कारण करत नाही. आधी दिले तेच मिळते हा निसर्ग नियम आहे. म्हणून आधी ओंजळ रिकामी करा आणि मग आपोआप भरते की नाही ते पहा. आपण विज्ञान युगात जगणारे असलो तरी आपल्या संस्कृतीने च विज्ञान निर्माण केले आहे याचा प्रत्यय देणारी ओंजळ कायम सुखाने भरलेली असावी. समर्पण शिकवणारी ओंजळ अशीच असेल......


रसिका राजीव हिंगे 

 rasraj#ओंजळ#हिंगे#

     


तुझ्या नामाचा छंद जडला

 तुझ्या नामाचा छंद जडला


युगे अठ्ठावीस l उभा विटेवरी l 

विठ्ठल श्रीहरी l पंढरीत l 


ज्ञानदेव तुका l नामा जनाबाई l 

सोपान मुक्ताई l नाम गाती l 


चोखा नि सावता l गोरोबा निवृत्ती l

नामात रंगती l विठ्ठलाच्या l


नामाचा गजर l कीर्तन श्रवण l

आनंदे नर्तन l भाविकांचे l


ऐसा भक्त मेळा l चंद्रभागे तीरी l

रंगे दरबारी l श्रीरंगाच्या l


ऐसा छंद जडला l तुझिया नामाचा l

सगुण रूपाचा l मनालागी l


रसिका राजीव हिंगे 


घरटे

 



काडी काडी जोडूनिया

माझे घरटे बांधले

चिवचिव पाखरांची

किती मन आनंदले


सोनसळी किरणांनी

दिले सुखाचे आंदण

भरारला वारा दारी

वृक्ष वेलींचे कोंदण


निळ्या आभाळाची माया

अंगाईने जोजविते

नाते जोडता जोडता

ऋणबंध शिकविते 


सैल झाली वीण कशी

कैसी फिरली ही सृष्टी

उसवले धागे सारे

थिजे पापणीत दृष्टी


नको नको रे पाखरा

धावू नको वेडापीसा

घरट्यात परतुनी

माझ्या येई रे पाडसा


दान दे ओंजळ पसा

देवा साकडे घालते

पैलतीर खुणावतो

मन का हुरहुरते


रसिका राजीव हिंगे 

रंग बावरे फुलून आले

 रंग बावरे फुलून आले


मनास होता सावळ बाधा नभी चांदणे बहरुन आले

कालिंदीच्या तीरावरती रंग बावरे फुलून आले llधृll


फेर धरूनी रास खेळते अवतीभवती रूप सावळे 

टिपरीवरती ताल धरूनी पावा छेडी सुर आगळे 

मृदुंगाचा नाद जागला पैंजण पाउल पुन्हा थिरकले

कालिंदीच्या तीरावरती रंग बावरे फुलून आले ll1ll


भुरभुरणारा मुजोर वारा अंगलट येइ शेला उधळत

भाळावरती विसावले गे कुरळे कुंतल उगाच नाचत

घर्म बिंदू ते स्पर्शावया गोऱ्या गाली हर्षत आले

कालिंदीच्या तीरावरती रंग बावरे फुलून आले ll2ll


कृष्णसख्याचे मानस पूजन सखे मांडले काठावरती

त्या यमुनेच्या डोहा समती तरंग उठती मनावरती

परमात्म्याचे दर्शन व्हावे अंतःकरणी भाव जागले 

कालिंदीच्या तीरावरती रंग बावरे फुलून आले ll3ll


रसिका राजीव हिंगे 

rasraj#रंग बावरे#,कृष्ण सखा#

Tuesday, 23 May 2023

रसग्रहण

  




ज्ञानपीठ  पुरस्कार प्राप्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या कविता म्हणजे प्रतिभेला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे. त्यांच्या कवितांमुळे किती आयुष्य जगले, फुलले. प्रस्तुत कविता "समिधाच सख्या या_ कवी कुसुमाग्रज यांची ही कविता, एखाद्याच्या जीवनाचे प्रतिबिंब असू शकेल, ध्येय वादाने वाहणारी सरिता जशी किती ही अडथळे आले तरी मार्ग शोधत सागरा पर्यंत पोहचतेच.  तसेच माझ्या  काव्यात ओलावा असेल नसेलही, पण त्याची इच्छा न धरता विचारांचा अग्नी मात्र फुलावा अशी अपेक्षा कवी ची आहे. नवेपण ल्यायलेली कविता कधी कुणाचा आधार होईल, तर कधी कुणाला शाप भासेल. शाप आणि दुर्वास मुनी यांची सांगड घालून तिथे चपखल भाव प्रगट झाला आहे.  कविता म्हणजे रुक्ष समिधा अशी किती सुंदर उपमा त्यांनी सुचवली आहे. त्यांच्या प्रतिभेला त्रिवार मुजरा केल्याशिवाय राहवत नाही.


रसिका राजीव हिंगे 

रसग्रहण

      



     माहेर म्हणजे स्त्री च्या जीवनातील एक हळवे पण बहारदार वळण. यासाठी जेव्हा गदिमांची लेखणी बोलू लागते तेव्हा प्रत्येक स्त्री भारावली असते. नववधू जेव्हा पहिल्यांदा माहेरी येते तेव्हा सगळ्या घरादाराला अप्रूप वाटतं. कोकण तर छोटंसं. इथली माहेरवाशीण येणार म्हणजे सोहळाच. नावेत बसलेले गोमू आणि गोमुचा पती यांना पाहून नावाड्याला अतिशय आनंद झालेला आहे. गोमुच्या नवऱ्याला आपले कोकण कसे हिरवाईने नटलेले आहे, इथला निळसर सागर, फुलांचे ताटवे दाखवण्याचा नाविकाला आनंद होतो आहे. कोकणातली माणुसकी, शहाळ्या सारखी गोड रसदार माणसे म्हणजे सगळचं वेड लावणारे. वाऱ्यालाही विनंती करून गलबत जमिनीला थांबवण्याची हिंमत ग. दि.माडगूळकर  यांच्या लेखणीतून साकारली आहे. अबोली फुलांना भगवा रंगाचे ताटवे अशी उपमा देणारे गदिमा निसर्गाशी किती एकरूप झालेले आहेत. म्हणूनच त्यांच्या कविता भावतात. 


रसिका राजीव हिंगे 

Wednesday, 17 May 2023

रसग्रहण

 




जनाबाई या अतिशय संवेदनशील होत्या. नामदेवांच्या घरी लहानाच्या मोठ्या झालेल्या जनाबाई  नामदेवांच्या शिष्या  झाल्या. 

विठ्ठल नामाचा ध्यास घेतलेल्या जनीला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी फक्त विठ्ठल दिसत असे. 

अत्यंत गरिबीत जीवन जगणाऱ्या जनी कडे विठ्ठल खायला मागायला येतो म्हणजे जनीची परीक्षा घ्यायला आलेला आहे का?असे वाटते. पण आलेल्या अतिथी ला  विन्मुख कसे धाडायचे म्हणून घरातले पंचामृत आणि भात वाढला. विठ्ठल प्रसन्न झाला. चार ओळींच्या अभंगात निरक्षर जनाबाई किती मोठे तत्वज्ञान सांगून जातात. 


रसिका राजीव हिंगे

रसग्रहण

 





संत नामदेव यांचा हा अभंग म्हणजे माय लेकरांचे जसे नाते असते तसेच परमेश्वर म्हणजे पांडुरंगाला माय म्हटले आहे. आई जशी बाळासाठी काहीही करते तसेच पांडुरंग त्याच्या भक्तांसाठी आहे.  बाळ जर कुठल्या संकटात असेल तर माता जशी त्याच्यासाठी जीवाचे रान करते आणि त्याला वाचविते. थोडक्यात बाळ हे आईच्या ताब्यात आहे, स्वाधीन आहे म्हणजे सुरक्षित आहेत तसेच मी तुझ्या ताब्यात आहे. तुझा दास आहे. पक्षिणी,हरिणी, चातक यासारखे उदाहरणे देऊन त्यांनी त्याच्या अभंगाची गोडी वाढविली आहे. पांडुरंगमय झालेले नामदेव यापरिस  काय लिहू शकणार.


रसिका राजीव हिंगे