काय तुझ्या मनात
सांग माझ्या कानात
खुल्लमखुल्ला रे.....
अगबाई! कोण बोललं ग? मला भास तर होत नाही न? का शब्दांच्या हिंदोळ्यावर झुलता झुलता शब्द सखा बोलला असेल!
काय बाई हे मन तरी सारखं तुझ्याकडेच धाव घेतं..... तुझ्या आठवणी लिहू म्हटले तरी गाली लाली येते.... सारखा तुझाच विचार.
हळूहळू सांज घराकडे परतत आहे आणि रात्र धरेवर आपलं साम्राज्य वसवू बघते आहे...
चांदण फुलांनी आभाळ गच्च भरले आहे....सारी नक्षत्र आपलं देणे द्यायला आतुरले आहेत... अलवार शी निळी झुळूक ...मधूनच तिचं अस्तित्व जाणवून देते आहे, रातराणी दरवळते आहे नि..... निशिगंध.... मुग्ध होऊन गंधित असा हा सोहळा पहाण्यास उत्सुकला आहे.......पण अजून नभी रजनींनाथ आलेला नाही, त्याची वाट सगळे चराचर बघतो आहे...
अगदी तशीच माझी अवस्था झाली आहे.
सारा शृंगार करून मी बसली आहे. ....तुझ्या आठवात प्रत्येक क्षण युगासारखा भासावा अशी माझी परिस्थिती आहे..
माझी काजळरेखा पुसट होण्याआधी ये....हातातली कांकणं ही सारखी लगबग करतात आहे का कुणास ठाऊक! आणि माझ्या पायीची पैंजणे स्तब्ध झाली आहेत तुझी वाट पाहून पाहून....
नजर तुझ्या वाटेकडे सारखी वळून चाहूल घेण्याचा प्रयत्न करत होती,शेवटी थकली रे ती पण....
का उशीर होतो आहे येण्यास? मन रमावे म्हणून तुझ्या आठवणी , तुझ्या सहवासातील सारे क्षण शब्दबद्ध करण्याचा खुळा प्रयत्न करते आहे.....पण....
शब्द ही रुसले आहेत आज.... गहिवर दाटून येतो आहे शब्दांना.... लेखणीतून उतरायलाच तयार नाहीत....
तू असतोस त्यामुळे लेखणीची कधी आवश्यकता च भासली नाही....
नयन बोलती गुज मनीचे
हळवे क्षण ते सांगे प्रीतीचे
असे होतं .....
पण आज तू नाही तर सगळेच माझ्यावर रुसले आहेत की माझ्याभोवती फेर धरून माझं मन रिझवायला रास खेळतात आहे...
काही कळत नाही तुझ्याशिवाय.......
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment