राऊळी मंदिरी दर्शनास जातांना आधी पहिल्या पायरीवर सगळेच नतमस्तक होतात. का होत असतील बरे सगळे नतमस्तक? तुझ्यावर पाय ठेवून मला गाभाऱ्यातल्या परमेशाचे दर्शन घ्यायचे आहे. तुझ्याशिवाय मी तिथे पोहचू शकत नाही. म्हणून हे माये मला क्षमा कर आणि तिथपर्यंत घेऊन चल म्हणून तिला हे वंदन असावे असे वाटतं. दर्शन घेतल्यावर कृतार्थ मन क्षणभर पायरीवर विसावतं पायरीला धन्यवाद देण्यासाठी.
आयुष्याच्या प्रवासात कधी दुःखाच्या पायरीवर मन हेलकावे घेतं तर कधी सुखाच्या पायरीवर समाधान अनुभवतं. यशोशिखराकडे वाटचाल करतांना कितीतरी पायऱ्यावर सुख-दुःख, यश-अपयश, मान-सन्मान यांचे चढ उतार अनुभवास येतात. पण भक्कम पाय रोवून पायऱ्या चढत गेलं तर शिखर गवसतंच. कारण पायरीचे हेच कर्तव्य असावे जो तिच्या संगतीत आला त्याला त्याच्या इप्सित स्थळी पोहचविणे. फक्त चढणारे कसे आहेत हे महत्त्वाचे, ती तर साथ देतेच न. उत्कर्ष साधायचा असेल तर स्वतःची पायरी ओळखता यायला हवी.
सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत ही असेच. एकमेकांचे हात धरून, आधार देत, हसत खेळत नात्यातल्या प्रत्येक पायरीवर चढत गेलो तर नाते फुलत जाईल. "तू तुझी पायरी ओळखून रहा, उगाच गगनाला गवसणी घालायला जाऊ नकोस" असे बोलतांना सुद्धा स्वतः कोणत्या पायरीवर उतरलो आहे याचेही भान असायला हवे. उगाच तुझं माझं करत, मत्सर,द्वेष, असूया या पायऱ्यांवर पाऊल पडले तर जगणेच अशक्य होईल. शिवाय पदरी निराशाच येईल. प्रत्येकाची पायरी परमेश्वराने प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार ठरवून दिली आहे. सत्कर्माच्या पायऱ्यांवर पावलं टाकत नामस्मरणाची काठी हातात घेऊन, सद्गुरूच्या साहाय्याने चढत गेलो की परमात्मा भेटेलही.
मात्र पायरी चढतांना आत्मविश्वास, श्रध्दा असणे गरजेचे आहे.
रसिका राजीव हिंगे


No comments:
Post a Comment