अशी का रुसली बयो
ये माझ्या पापणीवरी
तुज सगळ्या उपायी
आळविते परोपरी
काळाकभिन्न काळोख
पसरला चराचरी
चंद्र चांदण्यांची सभा
बघ भरली अंबरी
परी अजूनही अशी
उभी का ग दुरवरी
अशी का रुसली बयो
ये माझ्या पापणीवरी
पाखरांच्या घरट्याची
बंद झाली कवाडे ग
निजल्या ग पायवाटा
शांतल्या रान वाटा ग
निशाचर गस्त घाली
पहुडल्या सृष्टीवरी
अशी का रुसली बयो
ये माझ्या पापणीवरी
नको ओलावू सारखा
नयनी पापणकाठ
आठवांच्या घागरीही
भरल्या ग काठोकाठ
ये ग ये ग नीज बाई
चटकन झडकरी
अशी का रुसली बयो
ये माझ्या पापणीवरी
किती चाळले ग्रंथ मी
जपजाप केले किती
किती सूर आळविले
काव्य ही रचले किती
नभी आला शुक्रतारा
येई पहाट हासरी
अशी का रुसली बयो
ये माझ्या पापणीवरी
अशी का रुसली बयो
ये माझ्या पापणीवरी
तुज सगळ्या उपायी
आळविते परोपरी
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment