यमुनेच्या तीरी वाजवी बासरी
भुलवितोस ती राधा बावरी
येती सारे बोल लावत कान्हा
करशील का सांग खोड्या पुन्हा?
गोपबाला धावत येती घरी
वस्त्रे पळविलीस तू यमुनातीरी
आले भांडत गोकुळ बघ कान्हा
करशील का सांग खोड्या पुन्हा?
दही दुधाची चोरी करुनी
गोपांसवे मग गट्टम करिसी
मथुरेच्या बाजरी काय धाडू कान्हा
करशील का सांग खोड्या पुन्हा?
वाटेवरती फोडीसी हंड्या
ओलेत्या गोपी बोलती साऱ्या
द्वाड म्हणती यशोदेचा तान्हा
करशील का सांग खोड्या पुन्हा?
कशी देऊ सजा सांग लल्ला
खांबासी बांधता तुला माधवा
ब्रह्मान्ड दिसे तुजभोवती कान्हा
कशा सावरू सांग खोड्या पुन्हा
मज ठावे सारे तू पालनकर्ता
लीला दाविसी रे तू विश्वत्राता
सामान्य भक्ता कळेना कान्हा
म्हणुनी तू करू नकोस खोड्या
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment