अखजी....
ठायी ठायी शिशिराची पानगळ सरली अन सळसळत्या पानांचे पैंजण लेऊन, जणू हिरव्या पाचूने सालंकृत होऊन सृष्टीचे रूप बहरले. कोवळे कोवळे गुलाबीसर पानांचे देठ कोवळी सुगंधित हिरवाई लेऊन उभे ठाकले, वसंतांच्या स्वागतास. ही हिरवाई शुभकारक, मनमोहक, आकर्षक आणि सृजनात्मक. असा हा ऋतुराज म्हणजे वसंताची चाहूल लागली की शांताबाईची धावपळ सुरू व्हायची उन्हाळी कामं उरकण्याची. काय करू नि काय असे होऊन जायचे शांताबाईंना.
शांताबाईंच्या माहेरी पण खूप मोठं खटलं म्हणजे कुटुंब होतं. एकत्र कुटुंब असल्याने घरात वीस पंचवीस लहान थोर होते. सगळ्या घराला शांताबाईंच्या काकांनी एकसंध बांधून ठेवले होते. कुटुंबातल्या प्रत्येक जीवावर त्यांचं जीवापाड प्रेम होत. शिक्षणासाठी मुलं मुली असा भेदभाव न करता शिक्षण घेणं गरजेचे आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्या काळात मुलींच्या शिक्षणाची पण त्यांनी चोख व्यवस्था केली होती. शांताबाई घरात सगळ्यात लहान होत्या. समंजस होत्या. बारावी पास झाल्यावर पुढे शिकायला तालुक्याच्या गावी जायचे असे ठरविले होते शांताबाईंनी. पण म्हणतात न आपण जे ठरवतो त्याला ईश्वराची पण साथ हवी तरच संकल्प पूर्ण होतात. त्यांचे ही तसेच झाले. कौंडण्यपुर च्या कुलकर्णी चे स्थळ शांताबाई साठी आले. मुलगा एम.एस.सी. कृषीविज्ञान झालेला असून गावातच घरची शेती सांभाळत होता. सगळचं मनासारखे होते, नाही म्हणायला जागा नव्हतीच. महेश त्याच्या आईवडील यांचे बरोबर शांताला पहायला आला होता. योग जुळून आले की सगळ्या गोष्टी अनुकूल होतात. शांता देशपांडे ची शांता कुलकर्णी होऊन तिने उंबाऱ्यावरचे माप ओलांडले. शिवशक्ती आहेत हे दोघे असे म्हणून महेशच्या आजीने नव परिणीत जोडप्यावरून मीठ मोहरी ओवाळून टाकली. शांताबाईंचे सासर पण मोठे होते. इथेही एकत्र कुटंबपद्धती होती. घरातली मोठी सून होण्याचा मान शांताबाईंनी मिळाला होता. आजेसासू आणि सासूबाईंच्या मदतीने शांताबाईंनी घराच्या जबाबदाऱ्या हळूहळू उचलायला सुरुवात केली. माहेरची सुसंस्कृत संस्कारांची शिदोरी प्रत्येक वेळी कामं करतच होती. बघता बघता शांताबाई घरातल्या सर्वेसर्वा झाल्या. त्यांच्याशिवाय घरात कोणाचेही पान हलत नसे. त्या पण सगळ्यांचे हौसेने आणि प्रेमाने करत होत्या. सगळ्या लेकीबाळींचे माहेरपण उत्साहाने करत होत्या. कुलकर्णी घराण्याच्या परंपरा, सणवार, लग्नकार्य सारेच कसे त्यांच्या अंगवळणी पडले होते.
दरवर्षी प्रमाणे सगळ्या माहेरवाशिणी चैत्रात जसा वेळ मिळेल तसे येऊन जात. प्रत्येकी सोबत उन्हाळ्याचे वाळवण, घरच्या कैरीचे,लिंबाचे लोणचे, पापड, मसाला सगळचं देत होत्या. त्यांच्या नणंदा, पुतण्या आणि लेक दरवर्षी अक्षय्य तृतीया आली की आठ दहा दिवस माहेरी येत असत. विदर्भात अखाजी म्हणजे अक्षय्य तृतीया हा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.
शांताबाईचा उन्हाळी वाळवणं करण्यात दिवसच्या दिवस जात असे. शिवाय लेकिबाळी येणार म्हणून अंगात नवा उत्साह संचारला असायचा. अखजीला विशेष महत्व असतं ते चिंचवणीला. नवी चिंच निघाली असते. ती आधी आखजीला वापरायची असा अलिखित नियम. चिंच फोडण्यापासून तर ती मीठ लावून वाळवून साठवली जाते वर्षभरासाठी.
आखजीच्या आदल्या दिवशी घरात धांडे आणून ठेवायला गडी माणसाला सांगून शांताबाई पुरण शिजवायला बसल्या. या धांड्यावरच मांडा करायचा असतो. घागर किंवा करवा कुंभाराकडून आणण्यासाठी गावात धान्य घेऊन महेश गेला होता. धान्य देऊन घागर किंवा करवा आणण्याची परंपरा आजही गावात आहे आणि शांताबाई पण आपल्या घराची रीत निभावत होत्या. घागर ही स्वर्गस्थ पुरुषाचे प्रतीक तर लहान करवा हे बाईचे प्रतीक. देवासमोर ते ठेऊन त्यांत पाणी भरायचे आणि झाकण म्हणून खरबूज ठेवायचे. त्याच्यासमोर पाने मांडायची. पानावर वडे, भजे, कढी, नव्याने केलेले उन्हाळी वाळवण, पुरणाची पोळी किंवा मांडा, चटणी, कोशिंबीर, भाज्या, चिंचवणी असा विविध पदार्थांचा थाट दरवर्षी शांताबाई करत असत. मांडे करण्यात शांताबाई तरबेज होत्या. कणकेचा गोळा घेऊन त्यात पुरण भरायचे अन् हातावर वरती घेऊन गोल गोल फिरवत मांडा चांगला गोलाकार मोठा झाला की खापराच्या मडक्यावर शेकायचा. पाहूनच खायची इच्छा व्हायची घरातल्या सगळ्यांना. असं सगळं साग्रसंगीत झालं की सगळ्यांचे जेवणं झाली की शांताबाईंना भरून यायचे. सासूबाईंनी दिलेला वारसा आपण नीट सांभाळू की नाही याची त्यांना काळजी वाटायची. पण सासरे म्हणायचे, तुझ्या सासूच्या मागे तू छान घर सांभाळते आहे. ती वर अगदी तृप्त होत असेल बघ. असे सासरे म्हणाले की शांताबाईंचे पापणकाठ ओलसर व्हायचे अन् कृतार्थ झाल्यासारखे वाटायचे.
घरात माहेरवाशिणीचे हर्ष भरीत आवाज आणि नातवांचे बोबडे बोल ऐकल्यामुळे घर हसत खेळत नाचत होतं. प्रत्येकीच्या घरचे वेगवेगळे किस्से ऐकून हास्याला जणू उधाण आले होते. अंगणातल्या बंगळी वर बसून आत्या भाच्या, बहिणी बहिणी, भाऊ बहिण यांच्या गप्पांना ऊत आलेला होता जणू.
आखाजी झाली अन् सगळ्या आपापल्या घराकडे जायला निघाल्या. जाताना प्रत्येकीचं समान वाढलेलं होतं. त्या सामना बरोबरच माहेरचे प्रेम, जिव्हाळा सोबत होता, भावाच्या डोळ्यातले पुन्हा लवकर ये ग असे भाव सासरची वाट धूसर करत होती, तर बाबांचे पुन्हा भेट होईल का ग हा प्रश्न घेऊन भरून आलेले डोळे साथ देत होते, मधून मधून येत जा ग असे सांगताना कर्तव्य कठोर शांताबाईंचा डोळे पुसून ओला झालेला पदर मार्गात रामरक्षेचे कवच झाला होता.
सगळ्या आपापल्या वाटेने निघून गेल्या अन् शांताबाईंना घर खायला उठले. पण लगेच पुढच्या वर्षी येतीलच न अखाजीला या विचाराने पुन्हा त्या उत्साहित झाल्या अन् पुढच्या अखजीचे स्वप्न मनात रंगविण्यात रमून गेल्या...
©️®️रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment