विश्व निर्मितीच्या आधीपासून असलेला तू निर्गुण निराकार. तुझं रुप कसे असेल हा अनादी काळापासून निर्माण झालेला प्रश्न किंवा जिज्ञासा. एवढं मात्र खरं की तू मनभावन आहेस. तुझ्या भक्ताला तुझं जे रूप भावतं तेच तो पुजत असतो. तुझ्या भक्तांसाठी तसचं रुप घेऊन तू सगुण साकार रुपात अवतरतो. अवतार म्हणजे खाली येणे. किती भक्तवत्सल आहेस तू विश्व निर्माता तरी कमीपणा घेतोस अन् भक्तांसाठी अवतरण करतोस.
तुझं ते शांत रुप, जे संतांनी वर्णिले आहे. सुंदर ते ध्यान म्हणत तुला आळविणारे सगळेच तुझ्या पायी लिन होतात. तुझं ध्यानमग्न रुप डोळ्यासमोर येतं अन् त्यातच हरवून जायला होतं. शांत, सोज्वळ भाव, ब्रह्मानंदी लिन झालेले सात्विक भाव चेहऱ्यावर उमटतात. किती अवतार घेतो. प्रल्हादासाठी अक्राळविक्राळ नरसिंह रुप पण घेतलेस. पण तुझे खरे भक्त नाही घाबरत बरे कशाला. तुझा श्रीराम अवतार म्हणजे तर आदर्शांची नियमावली ठरली. सावळ्या रामाचे रुप असेच शांत, सात्विक, निर्मळ. देवा, तुला माहित आहे आम्हाला मानव रुपात तू जन्माला घातलेस तेव्हा सोहम म्हणणारा जीव लगेच बाहेर आल्याबरोबर कोहं म्हणायला लागला तरी तू रागवला नाहीस. शांतपणे ठीक आहे आता द्वैत मानतो आहेस न पण जन्मापासून तर मृत्यू पर्यंत वेळ देतो मानवा, या प्रवासात तू अद्वैता पर्यंतचा प्रवास कर आणि माझ्यात लिन हो. फक्त मानव जन्मच असा आहे की ज्याला तू बुध्दी प्रदान केली आहे. पण आम्ही इतके कृतघ्न की सगळं करतो पण तुला विसरून. तुझ्या आश्रयानेच प्रपंचातील कर्तव्ये पार पाडली तरच तुझ्या चरणाचा लाभ होतो. सगळं कळतं रे पण आचरण नाही होत. षडरिपुंचा इतका घट्ट पाश आवळून घेतला आहे न की त्याच्या पल्याड काही दिसतच नाही. तरीही तू येतोस तुला साद घातली की प्रतिसाद द्यायला. पण कोणत्या रुपात येशील हे मात्र कळत नाही. कारण ती दृष्टीच आम्ही जागवली नाही.
तुझा श्रीकृष्ण अवतार तर फक्त दुष्टांचे निर्दालन आणि सुष्टांचे रक्षण यासाठीच होता. वेड लावणारं तुझं रुप अन् तुझ्या लीला. तुझ्या प्रत्येक शब्दामागे काहीतरी अर्थ आणि कारण दडलेले आहेच. अर्जुनाला निमित्त करून तू समस्त मानव जातीला गीता सांगितली. प्रत्येक जीव हा तुझाच अंश आहे, जो मला भजतो त्याचे योगक्षेम करण्याची जबाबदारी माझी आहे असे तू सांगितले तरीही आम्ही तुला आमच्या सवडीने भजत असतो. ही भक्ती नाही हे तू गोपिंच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. भक्ती कशी तर गोपींनी केली ती भक्ती. पण पालथ्या घड्यावर पाणी असे आमचे सुरू असते. केलेलं कर्म मला अर्पण करा, फळाची आशा करू नका, मी आहे तुमच्यासाठी असे वारंवार सांगत असतोस, भावाचा भुकेला तू. खल प्रवृत्तीच्या लोक जरी मला अनन्य भावाने मला शरण आले तरी त्यांचे कल्याण करेल असा निर्वाळा देतोस.
तुझे ते चरण कमल जिथे दृष्टी जरी गेली तरी तू कल्याण करतोस, तू धारण केलेला पितांबर, तुझे नाभिकमल ज्यातून ब्रह्म निर्माण होऊन प्रकृतीच्या साहाय्याने सृष्टी निर्माण करणारा, तुझ्या गळ्यातील वैजयंती माला जी कधीच निर्माल्य होत नाही, तुझ्या वक्षावरचे वत्सलांच्छन म्हणजे तर तुझ्या प्रेमाचे कोणते रूप कळत नाही. तुझ्या शुभ्र दंतपंक्ती, तुझे अधर ज्यावर कधी बासरी विराजत होती, तुझे राजीव लोचन ज्यात अपार कारुण्य, प्रेम, भरले आहे, चेहऱ्यावर सात्विक, निर्मळ, तेजस्वी भाव, विशाल भाळ, मस्तकी खोवलेले मोरपीस, तुझा रत्न जडीत मुगुट, बस हेच तुझं रुप मी पहावे अशी मला शक्ती दे, याच रूपाचे ध्यान करावे, याच रूपाचे नाम घ्यावे असे बळ दे मला.. हे परमात्मा, यापरीस मी काय मागू शकते?
रसिका राजीव हिंगे
#rasraj#परमात्मा#सगुण साकार #

No comments:
Post a Comment