देव आणि दानवांचे युद्ध सुरू होते. या युद्धात दानवांचे पारडे जड झाले. तेव्हा दानव म्हणाले आपण समुद्रमंथन करू. देव तयार होईना. पण बृहस्पतीच्या सांगण्यावरून देव तयार झाले आणि समुद्र मंथन सुरू झाले. या मंथनातून चौदा रत्ने बाहेर आली. त्यापैकी एक रत्न म्हणजे लक्ष्मी. तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून प्रत्येकाला तिच्याशी विवाह करण्याची इच्छा झाली. यामध्ये तपाचरणामुळे तापलेले क्रोधी ऋषीमुनी होते, ज्ञानवंत होते पण ते फारच आसक्त होते, काही थोर पुरुष होते, त्यागी होते पण त्यांना मुक्तीचा मार्ग माहित नव्हता, शौर्य होते पण काळावर मात करणारे नव्हते, सनकादिक होते पण त्यांनी आजन्म ब्रह्मचर्य पालन केले होते, मंगल गुण असलेले होते पण त्यांना लक्ष्मी विषयी आसक्ती नव्हती. दानव तर समुद्र मंथन विसरून गेले होते तिच्या सौंदर्यामुळे. हे सगळे तिच्या मागे होते पण तिने यापैकी कोणालाही वरले नाही. लांब ध्यानस्थ बसलेल्या षडेश्वर संपन्न श्रीविष्णू च्या गळ्यात तिने वरमाला घातली. कारण जो माझ्या मागे लागतो त्याच्या जवळ मी कधीच रहात नाही. माझी आसक्ती ज्याला नसते त्याच्या पाठीमागे मी असते.
आज आपण पाहतो आहे सगळीकडे जो तो पैशाच्या मागे लागलेला दिसतो. आजची तरुण पिढी करीयर च्या मागे लागलेली आहे. सतत नोकरीची धरसोड करतात आहे. कारण जिथे पैसा जास्त मिळेल तिथे नोकरी करायची. त्यासाठी सगळ्याच गोष्टींवर तुळशीपत्र ठेवलं जातं याची जाणीव या तरुण पिढीला अजूनही होत नाही. वाटेल तशी मेहनत करून अमाप माया गोळा करतात, पण त्याचा उपभोग घ्यायला वेळ तर द्यायला हवे ना. एकवेळ उपभोग घेऊ नका पण घरातल्या तुमच्या नात्यांना तर वेळ द्यायला हवा आहे. तुमच्या आजूबाजूला जी सुगंधित फुले आहेत ती तुमच्या प्रेमाच्या पाण्याच्या सिंचना अभावी कोमेजली जातात आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उगाच पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करून आपली संस्कृती लयास जाते आहे.
आजकाल सरळ विद्या विभूषित पिढी म्हणते की पैसा खूप मिळतो म्हणून अमेरिकेत स्थायिक व्हावे. पण हे का कळत नाही आपल्या भरवशावर ही राष्ट्रे विकसित होतात आहे. पर्यायाने आपल्याच देशाची संस्कृती, ज्ञान या राष्ट्रांना विकसित करते आहे. जेवढे पैसे कमवावे तेव्हढेच गमवावे पण लागतात. कारण घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे काम केले तर शरीर नीट राहील का? शरीर सुद्धा एक यंत्र आहे असे समजले तरी त्यालाही मधून मधून प्रेमाची सर्व्हिसिंग करावी लागतेच. तुमच्या सोबत सात जन्म चालण्याचं वचन दिलेली तुमची सहचारिणी, ज्यांनी जन्माला घातले ते आईवडील, जन्मभर पुरणार आहेत ती मुलं ही आहेत तुमच्या मनाची म्हणजेच पर्यायाने शरीराची सर्व्हिसिंग करणारे प्रेमाचे साधनं. फक्त लक्ष्मीच्या मागे लागल्याने आपण काय जमवतो आहे यापेक्षा किती गमवितो आहे हे पाहणे काळाची गरज आहे.
आपले पूर्वज वेडे नक्कीच नव्हते. वरील कथा ही रूपकात्मक मानली तरी केवढा गर्भितार्थ भरला आहे यामध्ये. लक्ष्मीच्या मागे न लागता आपले कर्तव्य करत जर तिची पूजा मांडली तर तिच्या तेजामुळे, सौंदर्यामुळे ती घरदार उजळून टाकेल यात तिळमात्र शंका नाही...
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment